तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कठीण परिश्रम करा
“प्रभुच्या [यहोवा, NW] शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.
१, २. आज पालकांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
एका लोकप्रिय मासिकाने त्यास आमुलाग्र बदल असे म्हटले. त्यातील एका लेखाने, अलिकडील वर्षांमध्ये कुटुंबात जे आश्चर्यकारक बदल झाले त्याचे वर्णन केले. “यामुळे सर्वत्र पसरत असलेल्या घटस्फोटाचे परिणाम पुनर्विवाह, पुनःघटस्फोट, अनौरसता, व घटस्फोट किंवा विभक्ततेमुळे वेगळे न झालेल्या कुटुंबात नवीन तणाव निर्माण झाले आहेत,” असे म्हटले जाते. अशाप्रकारचे दबाव व तणाव आश्चर्याचे नाहीत, कारण पवित्र शास्त्राने या “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील,” असे आधीच भाकीत केले होते.—२ तीमथ्य ३:१-५.
२ आज, पालक आधीच्या पिढ्यांना माहीत नसणाऱ्या समस्यांचा सामना करत आहेत. आमच्यापैकी काही पालकांनी त्यांच्या मुलांचे संगोपन “बालवयापासून” केले असले तरी, अनेक कुटुंबांनी अलिकडेच “सत्यात चालण्यास” सुरवात केली आहे. (२ तीमथ्य ३:१५; ३ योहान ४) अशा पालकांनी त्यांच्या मुलांना देवाच्या मार्गाविषयी सांगण्यासाठी सुरवात केली, तेव्हा ती मुले आधीच प्रौढ झालेली असावीत. शिवाय, आम्हामध्ये दिसणाऱ्या एक-पालकीय कुटुंबात तसेच सावत्र कुटुंबात वाढ होत असल्याचे आम्ही पाहू शकतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असला तरी, प्रेषित पौलाचा हा बोध लागू होतो: “प्रभुच्या [यहोवा, NW] शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.
ख्रिस्ती पालक आणि त्यांच्या भूमिका
३, ४. (अ) पित्याच्या भूमिकेचा ऱ्हास कोणत्या गोष्टींनी केला आहे? (ब) ख्रिस्ती पित्यांनी केवळ पोशिंदे का असू नये?
३ प्रेषित पौलाने इफिसकर ६:४ मधील त्याचे शब्द मुख्यत्वे “बापांना” संबोधून म्हटले, याकडे लक्षात द्या. एक लेखक खुलासा करतात की, आधीच्या पिढ्यांमध्ये “पालक त्यांच्या मुलांच्या नैतिक व आध्यात्मिक संगोपनासाठी; तसेच मुलांच्या शिक्षणासाठी जबाबदार होते. . . . परंतु, औद्योगिक क्रांतीने या सलगीला दूर केले; बापांनी त्यांच्या शेतमळ्यांना व दुकानांना सोडून दिले; कारखान्यात व नंतर दप्तरात काम करण्यासाठी त्यांनी घर सोडले. एके काळी, पिता करीत असलेली अनेक कामे आता मातेच्या पदरी पडली. उत्तरोत्तर, पितृत्व हे कृती ऐवजी केवळ सिद्धांतातच राहिले.”
४ ख्रिस्ती पुरूषांनो: तुमच्या मुलांना शिक्षण देण्याचे व त्यांचे पालनपोषण करण्याचे सर्व काम पत्नीवर टाकून, केवळ पोशिंदे असण्यातच समाधान मानू नका. नीतीसूत्रे २४:२७ प्राचीन काळातील पित्यांना आर्जवते: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” अशाचप्रकारे आज, कामकरी पुरूषाला उपजीविकेसाठी अधिक वेळ कार्य व परिश्रम करण्याची जरुरी असेल. (१ तीमथ्य ५:८) तथापि, त्यानंतर, भावनात्मकरित्या व आध्यात्मिकरित्या—‘आपले घर बांधण्याकरता’ कृपया वेळ काढा.
५. ख्रिस्ती पत्नी त्यांच्या घराण्याच्या तारणासाठी कशाप्रकारे कार्य करु शकतात?
५ ख्रिस्ती स्त्रियांनो: तुम्ही देखील तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कठीण परिश्रम केले पाहिजे. नीतीसूत्रे १४:१ म्हणते: “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते.” वैवाहिक सोबती या नात्याने तुम्ही व तुमचे पती, तुमच्या अपत्यांना तालीम देण्यात सहभागी आहात. (नीतीसूत्रे २२:६; मलाखी २:१४) यामध्ये मुलांना शिस्त लावण्याचे, त्यांना ख्रिस्ती सभा व क्षेत्र सेवेसाठी तयार करण्याचे, किंवा पती, कौटुंबिक अभ्यास संचालित करु शकत नसल्यास तो घेण्याचा देखील समावेश असू शकतो. तुमच्या मुलांना तुम्ही गृहकौशल्य, चांगल्या सवया, शारीरिक आरोग्याविषयी, व अशा अनेक उपयुक्त गोष्टी देखील शिकवू शकता. (तीतास २:५) अशाप्रकारे, पती आणि पत्नी दोघांनी एकत्रपणे कार्य केल्यास त्यांच्या मुलांच्या गरजा ते चांगल्याप्रकारे पुरवू शकतात. त्यापैकी काही गरजा कोणत्या आहेत?
त्यांच्या भावनात्मक गरजांची काळजी घेणे
६. मुलांच्या भावनात्मक विकासाकरता माता आणि पिता यांच्या कोणत्या भूमिका आहेत?
६ ‘दाई आपल्या मुलांबाळांचे लालनपालन करते” तेव्हा त्यांना सुखरूप, सुरक्षित, प्रीती केली जात असल्याचे वाटते. (१ थेस्सलनीकाकर २:७; स्तोत्र २२:९) बालकांकडे वाजवीपेक्षा अधिक लक्ष देण्याच्या आर्जवाला केवळ थोड्याच माता नाकारु शकतात. संदेष्टा यशयाने विचारले: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय?” (यशया ४९:१५) मुलांच्या भावनात्मक विकासामध्ये माता एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. असे असले तरी, पिताही या संबंधी महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतात. कौटुंबिक अध्यापक पौल लुईस म्हणतात: “[आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या] मुलाचे त्याच्या वडिलासोबत चांगले संबंध असल्याची एकही घटना, कुटुंबातील समस्यांना विचारात घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याकडून मी ऐकली नाही. शंभरामध्ये एक देखील नाही.”
७, ८. (अ) यहोवा देव आणि त्याचा पुत्र यांच्यामध्ये एक मजबूत बंधन आहे याला काय पुरावा आहे? (ब) पिता त्यांच्या मुलांमध्ये प्रेमळ बंधन कसे घडवू शकतात?
७ या कारणास्तव, ख्रिस्ती पित्यांनी त्यांच्या मुलांसोबत प्रीतीचे बंधन काळजीपूर्वक विकसित करणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताचा विचार करा. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी, यहोवाने म्हटले: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (लूक ३:२२) या काही शब्दांत अधिक गोष्टी स्पष्ट केल्या! यहोवाने (१) त्याच्या पुत्राची कबुली दिली, (२) येशूसाठी त्याची प्रीती उघडपणे प्रकट केली व (३) येशूसाठी त्याची संमती प्रदर्शित केली. तरीही, यहोवाने त्याच्या पुत्रासाठी दाखविलेल्या प्रीतीची ही पहिलीच वेळ नव्हती. येशूने नंतर त्याच्या पित्याला म्हटले: “जगाच्या स्थापनेपासून तू माझ्यावर प्रीति केली.” (योहान १७:२४) यास्तव, सर्वच आज्ञांकित मुलांना व मुलींना खरोखर त्यांच्या पित्यांकडून मान्यता, प्रीती, व पसंतीची गरज लागत नाही का?
८ तुम्ही पिता असल्यास, नियमितपणे प्रीतीच्या उचित शारीरिक तसेच तोंडी आविर्भावाद्वारे तुमच्या मुलांना तुम्ही प्रीतीच्या बंधनात आणण्यासाठी बरेच काही करु शकता. हे खरे आहे की, काही पुरूषांना विशेषपणे जर स्वतःच्या वडिलांकडून कधीही ममता मिळाली नसेल तर, स्वतःच्या मुलांना ती दाखविण्यास त्यांना कठीण वाटते. तुमच्या मुलांना प्रीती दाखविण्यासाठी केलेल्या अकुशल प्रयत्नाचा देखील शक्तीशाली प्रभाव होऊ शकतो. शेवटी, “प्रीति उन्नति करते.” (१ करिंथकर ८:१) तुमच्या पितृत्वाच्या प्रीतीमुळे मुलांना सुरक्षित वाटत असल्यास, ‘खरे पुत्र व कन्या’ असण्याकडे त्यांचा अधिक ओढा असेल व विश्वासाने तुमच्या स्वाधीन होण्यासाठी त्यांना मोकळेपणा वाटेल.—नीतीसूत्रे ४:३.
त्यांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे
९. (अ) देवभिरु इस्राएली पालकांनी त्यांच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांची कशी काळजी घेतली? (ब) मुलांना अनौपचारिकरित्या शिकविण्यासाठी ख्रिश्चनांना कोणत्या सुसंध्या आहेत?
९ मुलांच्याही आध्यात्मिक गरजा असतात. (मत्तय ५:३) मोशेने इस्राएली पालकांना बोध केला: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) तुम्ही ख्रिस्ती पालक असल्यास, औपचारिकपणे म्हणजे “मार्गाने चालत असता” अधिक शिक्षण देऊ शकता. प्रवास करताना घालविलेल्या वेळेत, बाजारहाट करण्यात किंवा तुमच्या मुलासोबत ख्रिस्ती सेवेत घरोघरचे कार्य करण्यासाठी चालत जात असताना अशा शिथिल परिस्थिती शिक्षण देण्यासाठी हितकारी संधी पुरवितात. कुटुंबांना संभाषण करण्यासाठी जेवणाच्या वेळा खास उत्तम असतात. “दिवसभरात काही गोष्टी उद्भवतात तेव्हा बोलण्यासाठी आम्ही जेवणाच्या वेळेचा उपयोग करतो,” असे एक स्त्री सांगते.
१०. कौटुंबिक अभ्यास कधी कधी आव्हानात्मक का ठरतो, व पालकांजवळ कोणता करारीपणा असला पाहिजे?
१० तथापि, तुमच्या मुलांसोबत नियमित पवित्र शास्त्राभ्यासाद्वारे औपचारिक शिक्षण देणे देखील आवश्यक आहे. बालकाच्या “हृदयात मूर्खता जखडलेली असते” हे मान्य आहे. (नीतीसूत्रे २२:१५) काही पालक म्हणतात की, त्यांची मुले कौटुंबिक अभ्यासाला जाणूनबुजून अडथळा आणतात. कशाप्रकारे? सारखी हालचाल व कंटाळवाणे वाटण्याद्वारे, लक्ष दुसरीकडे नेऊन चीड आणण्याद्वारे (जसे की, समवयस्कांबरोबर भांडण करून), किंवा पवित्र शास्त्राच्या मूलभूत सत्याविषयी अज्ञानी असल्याचे ढोंग करण्याद्वारे अडथळा आणतात. कोणाची इच्छा प्रबळ आहे हे ठरवण्याप्रत जेव्हा हा झगडा पोहंचतो तेव्हा पालकांची इच्छा प्रबळ असली पाहिजे. ख्रिस्ती पालकांनी या गोष्टीच्या स्वाधीन होऊन मुलांना स्वामित्व गाजवू देऊ नये.—पडताळा गलतीकर ६:९.
११. कौटुंबिक अभ्यासाला आनंददायक कसे बनविले जाऊ शकते?
११ तुमच्या मुलांना कौटुंबिक अभ्यास आवडत नसल्यास कदाचित तुम्ही काही बदल करु शकता. उदाहरणार्थ, अभ्यासाचा वापर मुलांनी अलिकडेच केलेल्या चुकांची पुर्नचर्चा करण्याची सबब म्हणून केला जातो का? कदाचित अशा समस्यांची चर्चा खाजगीरित्या करणे अधिक उत्तम असेल. तुमचा अभ्यास नियतिमपणे होतो का? तुमच्या आवडीच्या दूरदर्शन कार्यक्रमासाठी किंवा खेळ पाहण्यासाठी तो रद्द केल्यास, नक्कीच तुमची मुले कौटुंबिक अभ्यासाला इतके गंभीर समजणार नाहीत. अभ्यास चालविण्याच्या बाबतीत तुम्ही निश्चयी व उत्साही आहात का? (रोमकर १२:८) होय, अभ्यास हा आनंददायक असला पाहिजे. सर्व मुलांना सहभागी करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक आणि उभारणीकारक असा, मुलांनी घेतलेल्या सहभागाबद्दल त्यांची मनःपूर्वक प्रशंसा करा. अर्थातच, केवळ साहित्याला पूर्ण करु नका, मुलांच्या हृदयांप्रत पोहंचण्याचा प्रयत्न करा.—नीतीसूत्रे २३:१५.
धार्मिकतेत शिस्त लावणे
१२. शिस्त लावण्यात नेहमीच शारीरिक शिक्षा का असू नये?
१२ मुलांना शिस्त लावण्याची देखील मोठी गरज आहे. पालक या नात्याने, यासाठी तुम्ही काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. नीतीसूत्रे १३:२४ म्हणते: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.” तथापि, नेहमी छडी मारण्याद्वारे शिस्त लावली जाऊ शकते असे पवित्र शास्त्र सांगत नाही. नीतीसूत्रे ८:३३ सांगते: “शिस्त ऐक,” तसेच आम्हाला सांगितले आहे की, “वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.”—नीतीसूत्रे १७:१०.
१३. मुलांना शिस्त कशी लावली पाहिजे?
१३ काही वेळा, शारीरिक शिस्त आवश्यक असते. तथापि, ती रागाने लावल्यास प्रमाणाबाहेर व व्यर्थ असण्याची शक्यता असते. पवित्र शास्त्र सावधानतेचा इशारा देते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” (कलस्सैकर ३:२१) खरोखर, केवळ “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” (उपदेशक ७:७) दुखवला गेलेला तरुण धार्मिक दर्जांच्या विरुद्ध बंडाळी करु शकतो. यास्तव, पालकांनी मुलांना दृढ पण संतुलित मार्गाने धार्मिकतेत शिस्त लावताना शास्त्रवचनांचा वापर केला पाहिजे. (२ तीमथ्य ३:१६) ईश्वरी शिस्त प्रीती व सौम्यतेने दिली जाते.—पडताळा २ तीमथ्य २:२४, २५.a
१४. पालकांचा क्रोधित होण्याकडे कल असल्यास त्यांनी काय केले पाहिजे?
१४ अर्थातच, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” (याकोब ३:२) नेहमी प्रेमळ वागणारे पालक देखील दबावाला बळी पडू शकतात व काही निर्दयीपणे बोलू शकतात, किंवा क्रोध व्यक्त करु शकतात. (कलस्सैकर ३:८) असे झाल्यास, या अधिक दुःखदायक परिस्थितीत तुमच्या मुलावर किंवा स्वतःच्या चिडलेल्या अवस्थेत सूर्य मावळू देऊ नका. (इफिसकर ४:२६, २७) या गोष्टीला तुमच्या मुलांसोबत मिटवा, क्षमा मागणे उचित असल्यास तसे करा. (पडताळा मत्तय ५:२३, २४.) अशी लीनता दाखविल्याने ती मुलाला व तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणील. तुमच्या क्रोधाला आवरता येत नसल्याचे, क्रोधाला बळी पडत असल्याचे तुम्हाला वाटल्यास मंडळीतील नेमस्त वडिलांची मदत घेऊ शकता.
एक पालकीय घराणे व सावत्र कुटुंबे
१५. एक पालकीय कुटुंबांतील मुलांना कशी मदत केली जाऊ शकते?
१५ परंतु, सर्वच मुलांना दोन्ही पालकांकडून संगोपन मिळत नाही. अमेरिकेत, ४ पैकी एका मुलाचे संगोपन एक पालकाकडून होते. पवित्र शास्त्रीय काळात ‘पोरकी मुले’ एक साधारण गोष्ट होती, व शास्त्रवचनांत त्यांच्याविषयीच्या कळकळीचा वारंवार उल्लेख आढळतो. (निर्गम २२:२२) आज, एक पालकीय ख्रिस्ती घराण्यांना अशाचप्रकारच्या दबावांचा व समस्यांचा सामना करावा लागत असला तरी, यहोवा “पितृहीनांचा पिता, विधवांना कैवारी” असल्याचे माहीत असल्याने त्यांना सांत्वन मिळते. (स्तोत्र ६८:५) ख्रिश्चनांना, “अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार” घेण्याविषयी आर्जवले आहे. (याकोब १:२७) एक पालकीय कुटुंबांना मदत करण्यासाठी सहविश्वासू पुष्कळ मदत करु शकतात.b
१६. (अ) एक पालक असलेल्यांनी त्यांच्या घराण्यासाठी काय केले पाहिजे? (ब) शिस्त कठीण का असू शकते, पण ती का दिली पाहिजे?
१६ तुम्ही एक पालक असल्यास, तुमच्या घराण्याच्या लाभासाठी स्वतः काय करु शकता? तुम्ही कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यासात, सभेच्या उपस्थितीत, व क्षेत्र सेवेत परिश्रमी असण्याची गरज आहे. असे असले तरी शिस्त लावणे, विशेषपणे कठीण काम असू शकते. तुम्ही अजूनही, प्रिय सोबत्याला मृत्युत गमावल्याच्या दुःखात असाल. किंवा वैवाहिक फारकत झाल्यामुळे तुम्ही अजूनही दोषी व क्रोधी भावनांशी झगडत असाल. मुलांवरील कायदेशीर ताब्याची सहभागिता तुम्ही तुमच्या सोबत्याबरोबर करीत असल्यास, तुमचे मूल विभक्त किंवा घटस्फोट घेतलेल्या सोबत्याकडे जाण्याची निवड करील, याची कदाचित तुम्हाला भीती वाटत असेल. अशा परिस्थिती, समतोल शिस्त लावण्यास भावनात्मकरित्या कठीण बनवू शकते. तथापि, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतीसूत्रे २९:१५) यास्तव, आधीच्या वैवाहिक सोबत्याकडील दोषी, पश्चात्तापी, किंवा भावनात्मक दबावाला बळी पडू नका. व्यवहार्य व अढळ दर्जे ठेवा. पवित्र शास्त्रीय तत्त्वांची हातमिळवणी करु नका.—नीतीसूत्रे १३:२४.
१७. एक पालकीय घराण्यात कौटुंबिक सदस्यांची भूमिका कशी अस्पष्ट होऊ शकते, व हे टाळण्यासाठी काय केले जाऊ शकते?
१७ एक पालकीय कुटुंबात मातेने तिच्या मुलाला तो जणू घरातील प्रमूख आहे असे समजले किंवा मुलीला सर्व गुप्त गोष्टी सांगून तिच्यावर खाजगी समस्यांचे ओझे लादल्यास, समस्या उद्भवू शकतात. असे करणे मुलासाठी अयोग्यपणाचे व त्याला गोंधळात टाकणारे असेल. पालकांची तसेच मुलांची भूमिका अस्पष्ट होते तेव्हा शिस्त लावणे बंद होऊ शकते. पालक तुम्ही आहात हे माहीत होऊ द्या. तुम्ही माता आहात व तुम्हाला पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या सल्ल्याची गरज असल्यास, तो वडिलांकडून किंवा कदाचित प्रौढ वयस्कर बहिणीकडून घ्या.—पडताळा तीतास २:३-५.
१८, १९. (अ) सावत्र कुटुंबे कोणत्या आव्हानांचा सामना करतात? (ब) सावत्र कुटुंबातील पालक व मुले बुद्धी व समंजसपणा कशाप्रकारे दाखवू शकतात?
१८ अशाप्रकारच्या आव्हानांचा सावत्र कुटुंबांना देखील सामना करावा लागतो. सावत्र पालकांना, सावत्र मुलांकडील “आवश्यक प्रेम” कमी असल्याचे अनेकदा दृष्टिपथात येते. उदाहरणार्थ, सख्ख्या मुलांना दाखवलेल्या कोणत्याही दिखाऊ पक्षपातीपणाबद्दल सावत्र मुले बरेच संवेदनाक्षम असतील. (पडताळा उत्पत्ती ३७:३, ४.) वस्तुतः, सावत्र मुले विभक्त झालेल्या पालकाबद्दलच्या दुःखाचा सामना करीत असतील. सावत्र पालकावर प्रीती करीत असल्याने त्यांचा सख्खा बाप किंवा आईला ते कसेतरी बेइमान झाले असे त्यांना भय वाटत असेल. आवश्यक असलेली शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास, ‘तुम्ही माझे खरे पालक नाही!’ असे आक्रमक स्वरुपाचे वक्तव्य ऐकवले जाते.
१९ नीतीसूत्रे २४:३ म्हणते: “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.” होय, सावत्र कुटुंब सिद्धीस जाण्यासाठी सर्वांकडे बुद्धी व समंजसपणाची अपेक्षा असते. काही काळातच, मुलांनी सर्व गोष्टी आता बदललेल्या आहेत ही दुःखदायक वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. अशाचप्रकारे, सावत्र पालकांनी शांत, दयाशील असणे हे शिकण्याची गरज आहे. त्यांनी, वरवर दिसणाऱ्या नकाराचा सामना करताना लगेच, मनस्वी दुःख करु नये. (नीतीसूत्रे १९:११; उपदेशक ७:९) शिस्तीच्या भोक्त्याची भूमिका गृहीत धरण्याआधी, सावत्र मुलासोबत मैत्री करण्यासाठी कार्य करा. असे बंधन स्थापन होईपर्यंत, सख्ख्या पालकाने शिस्त लावल्यास बरे असा विचार काही जण करतील. तणाव उद्भवतात तेव्हा, दळणवळण करण्याचा प्रयत्न करा. नीतीसूत्रे १३:१० म्हणते, “चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असते.”c
तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कार्य करत राहा!
२०. ख्रिस्ती कुटुंबातील प्रमुखांनी काय केले पाहिजे?
२० दृढ ख्रिस्ती कुटुंबे आपोआप होत नसतात. कुटुंब प्रमुखांनो, तुम्ही तुमच्या घराण्याच्या तारणासाठी सतत परिश्रम घेतले पाहिजेत. रोगट लक्षणे किंवा जगीक प्रवृत्त्यांना पाहण्यात सावध असा. भाष्य, वर्तन, प्रीती, विश्वास, आणि शुद्धतेत चांगले उदाहरण ठेवा. (१ तीमथ्य ४:१२) देवाच्या पवित्र आत्म्याची फळे प्रदर्शित करा. (गलतीकर ५:२२, २३) तुमच्या मुलांना देवाचे मार्ग शिकवण्याच्या प्रयत्नांस सहनशीलता, विचारीपणा, क्षमाशीलता, व मायाळूपणा ह्या गोष्टी बळकट करु शकतात.—कलस्सैकर ३:१२-१४.
२१. एखाद्याच्या घरामध्ये उत्साही, आनंदी वातावरण कसे राखले जाऊ शकते?
२१ आपल्या घरात देवाच्या मदतीसह आनंदी, उत्साही आत्मा टिकवण्याचा प्रयत्न करा. कुटुंब मिळून एकत्र वेळ घालवा. प्रत्येक दिवशी, सर्वांनी एकत्र बसून किमान एक वेळचे जेवण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. ख्रिस्ती सभा, क्षेत्रकार्य, व कौटुंबिक अभ्यास आवश्यक आहे. असे असले तरी, “हसण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ४) होय, उभारणीकारक मनोरंजनासाठी वेळ राखून ठेवा. वस्तुसंग्रहालयांना, प्राणीसंग्रहालयांना तसेच अशाचप्रकारच्या इतर स्थळांना दिलेल्या भेटी संपूर्ण कुटुंबाला आनंद देणाऱ्या आहेत. अथवा तुम्ही दूरदर्शन बंद करुन गीत गाण्यात, संगीत ऐकण्यात, खेळ खेळण्यात, व बोलण्यात देखील वेळ घालवू शकता. यामुळे कुटुंबाला अधिक जवळ येण्यास मदत होऊ शकते.
२२. तुम्ही तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कठीण परिश्रम का घेतले पाहिजे?
२२ “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी” होण्यासाठी, तुम्ही सर्व ख्रिस्ती पालक यहोवाला पूर्णपणे संतुष्ट करण्यासाठी सतत कार्य करीत राहा. (कलस्सैकर १:१०) तुमचे घराणे देवाच्या वचनावरील आज्ञाधारक मजबूत पायावर बांधा. (मत्तय ७:२४-२७) तुमच्या मुलांना ‘प्रभूच्या [यहोवा, NW] शिस्तीत व शिक्षणात वाढविण्याच्या’ तुमच्या प्रयत्नांवर त्याची कृपादृष्टी असेल याची खातरी बाळगा.—इफिसकर ६:४.
[तळटीपा]
a सप्टेंबर ८, १९९२ च्या अवेक! मधील “पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन: ‘वाग्दंडाची छडी’—ती कालबाह्य झाली आहे का?” हा लेख पाहा.
b सप्टेंबर १५, १९८० च्या वॉचटावर मधील पृष्ठे १५-२६ पाहा.
c ऑक्टोबर १५, १९८४, च्या वॉचटावर मधील पृष्ठे २१-५ पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ पती पत्नी त्यांच्या घराण्याला मजबूत करण्यासाठी कसे सहकार्य देऊ शकतात?
▫ मुलांच्या काही भावनात्मक गरजा कोणत्या आहेत, व त्या कशा पूर्ण केल्या पाहिजेत?
▫ कुटुंब प्रमुख त्यांच्या मुलांना औपचारिक तसेच अनौपचारिकपणे शिक्षण कसे देऊ शकतात?
▫ पालक मुलांना धार्मिकतेत कशी शिस्त लावू शकतात?
▫ एक पालकीय व सावत्र कुटुंबांच्या लाभासाठी काय केले जाऊ शकते?
[१६ पानांवरील चित्रं]
मुलाचा भावनात्मक विकास होण्यासाठी पित्याचे प्रेम व संमती महत्त्वाची असते