वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १२/१ पृ. ८-१३
  • सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सैतानाची खरी ओळख
  • सैतानाच्या धूर्त व कावेबाज युक्त्या
  • आम्हाला सैतानाचा प्रतिकार करता येऊन देवाशी कसे विश्‍वासू राहता येईल?
  • सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • दुरात्मे—आपण त्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • दियाबल कोण आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १२/१ पृ. ८-१३

सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरा

सैतानाच्या डावपेचांपुढे [ग्रीक, “कुयुक्त्यांपुढे”] तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.”—इफिसकर ६:११.

१. सैतान अस्तित्वात आहे हे येशूवरील मोहपाशाच्या प्रसंगावरुन कसे स्पष्ट करण्यात आले?

सैतान खराच अस्तित्वात आहे का? काही लोकांचे असे म्हणणे आहे की, पवित्र शास्त्रामध्ये ज्याला “सैतान” असे म्हणण्यात आले आहे तो केवळ मानवातील दुष्ट गुण आहे. पण शास्त्रवचने आम्हास काय सांगतात? मत्तय व लूककरवी लिखित असणारे शुभवर्तमानाचे अहवाल दाखवितात की, येशू ख्रिस्ताची सैतानाकरवी तीनदा थेटपणे परिक्षा घेण्यात आली व दर खेपेला येशूने शास्त्रवचनांचा वापर करुन त्याचा धिक्कार केला. पण येशूने त्याला इब्री शास्त्रवचनातून का उत्तर दिले बरे? कारण याच शास्त्रवचनांचा सैतानाने विपर्यास करुन येशूला पापात पाडावे आणि देवाचा पुत्र, वचनयुक्‍त संतान या अर्थाने त्याला अपमान मिळावा हा त्याचा हेतू होता.—मत्तय ४:१-११; लूक ४:१-१३.

२. सैतानासोबतच्या प्रसंगांना येशूने काल्पनिकपणे कल्पिले नाही हे आम्ही कसे जाणू शकतो?

२ अर्थात, येशू या परिपूर्ण मनुष्याने हे प्रसंग काल्पनिक असल्याचे गृहीत धरले नाही. (इब्रीयांस ४:१५; ७:२६) त्याला या प्रसंगात तोच सामोरा आला जो एदेन बागेतील सर्पाच्या आड एक प्रेरक शक्‍ती होता. हा येशूचा पूर्वीचा दिव्यदूत भाऊ होता, याने कित्येक युगांआधी बंड केले होते व आता तो उत्पत्ती ३:१५ ची होऊ घातलेली पूर्णता रोखण्यास पुढे आला होता. वचनयुक्‍त संतानाची सचोटी भंगवावी ही सैतानाची इच्छा होती. त्याच्या चतुर कुयुक्त्यांना येशूने अगदी दृढपणे नाकारले. तेव्हा सैतानाने कसली प्रतिक्रिया दाखवली? “मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधि मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.” होय, येशूने माघार घेतली नाही. सैतान चिडला, हताश झाला व सोडून निघून गेला “आणि पाहा, देवदूत येऊन [येशू]ची सेवा करु लागले.”—लूक ४:१३; मत्तय ४:११.

३. दियाबलाच्या अस्तित्वाचा ख्रिस्ती धर्मासोबत केवढा अभूतपूर्व संबंध आहे हे एक इतिहासकार कसे दाखवितो?

३ एक इतिहासकार हे अगदी व्यावहारिकपणे म्हणतोः “दियाबलाचे अस्तित्व तसेच त्याचा ख्रिस्ती धर्माशी असणारा महत्त्वपूर्ण संबंध अमान्य करणे म्हणजे प्रेषितीय शिक्षणाच्या आणि ख्रिस्ती तत्त्वांच्या ऐतिहासिक घडामोडींच्या विरुद्ध जाणे होय. ख्रिस्ती धर्माचे वर्णन सैतानाला वगळून करणे म्हणजे अक्षरशः निरर्थक, बौद्धिकदृष्ट्या सुसंगत नसणारे आहे. जर दियाबलच अस्तित्वात नाहीच तर मग, ख्रिस्ती धर्म हा, सुरवातीपासूनच व केंद्रभागातूनच चुकीचा आहे असे म्हणावे लागेल.”a हा निर्वाळा आज, पृथ्वीवरील प्रत्येक माणसापुढे आव्हान उभे करतो. तुम्ही, कोणी अदृश्‍य शत्रू अस्तित्वात असून तो देवाचे सार्वभौमत्व आणि माणसाची निष्ठा काढून टाकण्यास सर्वत्र फिरत आहे हे ओळखता का?

सैतानाची खरी ओळख

४. एक परिपूर्ण प्राणी सैतान कसा झाला?

४ सैतान हा सामर्थ्यशाली आत्मिक प्राणी असून त्याची मूलतः देवाने दिव्यदूत अशी निर्मिती केली होती. तेव्हा तो यहोवाच्या स्वर्गीय दालनात येजा करीत असे. (ईयोब १:६) तथापि, सैतानाने आपल्या स्वेच्छा शक्‍तीचा देवाच्या विरुद्ध वापर केला; त्याने मोठ्या चतुराईने हव्वेला व तिच्याद्वारे आदामाला बंडखोरपणा करण्याकडे व मृत्युकडे निरविले. (२ करिंथकर ११:३) यामुळेच तो सैतान म्हणजे, “विरोधक”—बंडखोर, दुरात्मा, मनुष्यघातक, आणि लबाड बनला. (योहान ८:४४) सैतान वस्तुतः ‘या अंधकारमय जगाचा अधिपती’ असला तरी तो “स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो” हे पौलाने त्याच्याविषयी केलेले वर्णन किती समर्पक आहे! (२ करिंथकर ६:१४; ११:१४; इफिसकर ६:१२) दुसऱ्‍या देवदूतांना बंडखोर बनविण्यासाठी मोहीत करुन त्याने यांना देवाच्या प्रकाशातून बाहेर काढून आपल्या अंधःकारात घेतले. तो “भूतांचा अधिपती” झाला. येशूने याची, “जगाचा अधिपती” अशीही ओळख दिली. तद्वत, एक अधिपती म्हणून रहायचे आहे तर त्याला निर्माण झालेला आत्मिक प्राणी म्हणून अस्तित्त्वात असलेच पाहिजे.—मत्तय ९:३४; १२:२४-२८; योहान १६:११.

५. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात सैतानाची केवढ्या स्पष्टरितीने ओळख देण्यात आली आहे?

५ इब्री शास्त्रवचनात सैतानाचा अल्प उल्लेख आला असला तरी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात त्याला पूर्णपणे उघड करण्यात आले आहे, ते इतके की, त्याचा सैतान या नावाने ३६ वेळा तर दियाबल या नावाने ३३ वेळा उल्लेख आला आहे. (पहा, कॉम्प्रेहेन्सिव्ह काँकार्डन्स ऑफ द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ दी होली स्क्रिपचर्स.) त्याला आणखी काही नावांनी व पदव्यांनी संबोधिण्यात आले आहे. यापैकींच्या दोघांचा वापर योहानाने प्रकटीकरण १२:९ मध्ये केला आहेः “मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला; म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला.”—तसेच पहा मत्तय १२:२४-२७; २ करिंथकर ६:१४, १५.

६. “दियाबल” या शब्दाचा काय अर्थ होतो?

६ येथे “दियाबल” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो डा․याʹबो․लोस हा ग्रीक शब्द प्रकटीकरणात दिसतो. जे. एच. थायर या ग्रीक प्रामाण्यांच्या मते त्याचा शब्दशः अर्थ “दोषारोप करणारा, खोटे आरोप लावणारा, निंदक” असा आहे. (१ तीमथ्य ३:११; २ तीमथ्य ३:३ यांचा पडताळा करा, किंग्डम इंटरलिनियर.) डब्ल्यु. ई. वाईन हे दियाबलाचे वर्णन “देव व मानव यांचा अतिशय घातकी शत्रू” असे देतात.b

७. सैतान यहोवाच्या लोकांवर आपले लक्ष का केंद्रित करुन आहे?

७ हा मोठा शत्रू आळशी नाही. कदाचित याच कारणामुळे एक इंग्रजी म्हण अशी पडली आहेः “दियाबल आळशी हातांना काम करायला देतो.” तो तर सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा विध्वंस करावयाला बाहेर पडला आहे! (२ तीमथ्य ३:१२) शिवाय यहोवाच्या लोकांवर त्याचे लक्ष केवळ एकाच कारणामुळे आहे व ते हे आहे की बाकीचे सारे जग त्याच्या ताब्यात आहे! (१ योहान ५:१९) सध्याचे जग हे सैतानी जग आहे. लोकांना याची जाणीव असो वा नसो, तो त्याचा अधिपती व देव आहे. (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४) यामुळेच तो यहोवाच्या लोकांचा विध्वंस साधण्यासाठी हरप्रकारचे डावपेच, कुयुक्त्या किंवा प्रस्ताव आजमावून पाहतो व तसे करीत राहील. तर आता आपण तो आपले कार्य ज्या पद्धतीने करीत आहे त्याचे परिक्षण करु या.—मार्क ४:१४, १५; लूक ८:१२.

सैतानाच्या धूर्त व कावेबाज युक्त्या

८. आमचा कोणता गैरफायदा घेऊन सैतान आम्हाविरुद्ध कार्य करतो?

८ सैतानाला मानवी मानसशास्त्राचा अभ्यास करण्यास, मानवी स्वभावात असणारे उपजत गुण तसेच वंशपरत्वे प्राप्त झालेल्या उणीवा यांचे परिक्षण करण्यास बराच लांब काळ मिळाला. आमचा अशक्‍तपणा हाताशी धरुन आमच्याशी खेळत राहून आम्हाला गर्तेत कसे पाडावे हे त्याला आता चांगले कळते. समजा की, तुमच्या शत्रूने तुमची पडती बाजू ओळखली आहे पण ती तुम्ही स्वतः ध्यानात घेतली नाही तर काय? तर मग, तुम्हाला स्वतःचे रक्षण करता येणार नाही कारण आपल्यापाशी असलेल्या आध्यात्मिक सामग्रीमध्ये कोठे भेग पडली आहे त्याची तुम्हाला कल्पनाच नसते. (१ करिंथकर १०:१२; इब्रीयांस १२:१२, १३) स्कॉटलंडमधील एका कवीने हे जे काव्य रचले आहे ते किती समर्पक आहे की, ‘अहा, बाकीचे आम्हात जे पाहतात तेच पाहण्याची शक्‍ती आम्हाला मिळाली तर किती बरे! तेव्हा आम्ही स्वतःला कितीतरी चुकांपासून वाचवू खरे.’

९. आम्ही आमचे परिक्षण करण्यात हेळसांड केली व आवश्‍यक तो बदल केला नाही तर काय दुःखद गोष्ट घडेल?

९ दुसरे, जसे की, खासपणे देव व सैतान आम्हाकडे पाहतात तसेच आम्ही स्वतःला पाहण्याची इच्छा धरतो का? याकरता स्वतःचे प्रामाणिक परिक्षण व मोजमाप करुन आवश्‍यक असणारा बदल करण्याची इच्छा असणे जरुरीचे आहे. स्वतःची भूलवणूक करणे अगदी सहजासहजी घडत असते. (याकोब १:२३, २४) आम्ही चोखाळलेल्या मार्गाचे आम्हीच कधीकधी केवढे समर्थन करीत असतो बरे! (पडताळा १ शमुवेल १५:१३-१५, २०, २१, २२) तसेच केवढ्या सहजपणे आम्ही म्हणतो की, “परिपूर्ण माणूस कोणी आहे का?” हेच तर सैतानाला माहीत आहे व तो आमच्या अपूर्णतेचाच गैरफायदा उचलतो. (२ शमुवेल ११:२-२७) आपल्या अनियंत्रित, भावरहित किंवा निर्दयी स्वरुपाच्या आचरणामुळे इतकी वर्षे निघून गेली व त्यामुळे आपण दुसऱ्‍याच्या नजरेत क्रुर ठरलो आहोत हे एखाद्या माणसाला मध्यमवयस्क होताना कळते तेव्हा ते किती दुःखाचे असते बरे; याशिवाय आपण इतरांना सुखी करण्यासाठी थोडेफार किंवा काहीच करु शकलो नाही हे कळायला लागल्यावर देखील किती दुःख वाटू लागते बरे! आम्हाठायी उपजत असलेल्या स्वार्थबुद्धीने आम्हाला अंधळे करुन सैतान अशाप्रकारचे जीवन जगण्यास आम्हाला निरवितो. ख्रिस्ताच्या खऱ्‍या मनोवृत्तीचे सार—प्रेम, दया व कळवळा—यांना कवटाळण्यास आम्ही मागे पडलेलो असतो.—१ योहान ४:८, ११, २०.

१०. आम्ही कोणते प्रश्‍न स्वतःला विचारुन पहावेत व का?

१० यास्तव, सैतानाचा प्रतिकार करायचा आहे तर आम्ही आपले परिक्षण करण्यास हवे. सैतान ज्याआधारे तुमचा अवास्तव फायदा घेऊ शकेल वा सध्या घेत आहे असा काही अशक्‍तपणा तुम्हाठायी आहे का? तुम्हाठायी बढाई मारण्याची लक्षणं दिसतात का? आपण नेहमीच पहिले असावे असे तुम्हाला वाटत असते का? गर्व ही तुमच्यातील कार्यप्रवर्तक शक्‍ती आहे का? हेवा, द्वेष आणि संपत्तीचे प्रेम यांनी तुमच्या व्यक्‍तीमत्वाला ग्रासून टाकले आहे का? तुमचा राग नाकाच्या शेंड्यावर असतो का? तुम्ही नेहमीच अबोल तसेच तुसड्या प्रवृत्तीचे आहात का? जेव्हा काही प्रस्ताव वा टीका तुम्हासमोर मांडण्यात येते तेव्हा अधिकच संवेदनाशील बनता का? तुम्ही सूचना मिळताना द्वेष वागवता व ती त्याज्य मानता का? आम्हीच आपली चांगली ओळख करुन घेतली तर आम्हाला या सर्व समस्या दूर करता येतील; पण यासाठी आम्हाठायी नम्रभाव असला पाहिजे. तसे न झाल्यास आम्ही सैतानापुढे स्वतःला मोकळे सोडत असतो.—१ तीमथ्य ३:६, ७; इब्रीयांस १२:७, ११; १ पेत्र ५:६-८.

११. सैतान कोणत्या धूर्त मार्गाने आमच्या आध्यात्मिकतेस पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करतो?

११ सैतान धूर्त व कावेबाजपणे आमच्या आध्यात्मिकतेची पायमल्ली करु शकतो. मंडळी किंवा संस्था याजमध्ये गोष्टी ज्या पद्धतीने हाताळल्या जातात ते पाहून आम्हाला कदाचित अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. खरे म्हणजे आम्हाला सर्व वस्तुस्थिती माहीत नसते पण आम्ही लगेच निर्वाळा घेऊन बसतो. आमचे यहोवा देवासोबतचे नाते कमकुवत असेल तर मग आमच्या मनात नकारार्थी विचार अधिकपणे भारावतात आणि आम्हाला सत्याविषयी शंका कुशंका येऊ लागतात. सत्यामुळे ज्या जबाबदाऱ्‍या पडतात त्यापासून अंग काढून घेण्याचे स्वसमर्थन काहीजणांठायी जडते. अशावेळी सैतान त्यांच्या अंतकरणी बेईमानपणा व फितुरी जडवितो. याचा परिणाम, हे लोक लवकरच धर्मत्यागाचे बळी होण्यात दिसतो. ते पाहून सैतानाला किती आनंद वाटतो!—लूक २२:३-६; योहान १३:२, २७; २ योहान ९-११.

१२. (अ) काहींना सैतानाने काय करण्याचे धाडस दिले? (ब) सैतान कित्येकांना अनैतिकतेच्या पाशात कसे गुरफटतो?

१२ इतर काही जणांच्या बाबतीत सैतान, त्यांना नुसते गंभीर पातक करायला प्रवृत्त करुन बहिष्कृत होऊ देतो इतकेच नाही तर मंडळीच्या वडीलांना मूर्खात काढावे यासाठी बतावण्या व खोटेपणा याचाही तो काहींना अंगिकार करायला लावतो. हनन्या व सप्पीरा यांच्याप्रमाणे यांना वाटते की त्यांनाही स्वर्गदूत व देवाच्या पवित्र आत्म्याला फसविता येऊ शकते. (प्रे. कृत्ये ५:१-१०) अलिकडील काही वर्षांत कित्येक हजारो जण सैतानाकरवीच्या अनैतिकतेच्या पाशात गुरफटले गेले. मानवजातीची लैंगिक इच्छा प्रबळ आहे हे सैतानाला ठाऊक आहे याकारणास्तव तो आपल्या जगाच्या व्यवस्थेकरवी लैंगिक आकर्षण वाढवितो, विपर्यास करतो आणि त्याविषयीचे स्वरुप बिघडवितो. (गणना २५:१-३) अविवाहीत ख्रिश्‍चनांना जारकर्म किंवा इतर लैंगिक अनिती आचरण्याच्या मोहात पाडले जाते. (नीतीसूत्रे ७:६-२३) विवाहीत ख्रिश्‍चनांनी आपली मने व अंतःकरणे भटकू दिली तर ते फितुरीच्या वागणुकीत सहजपणे अडकतील आणि याद्वारे त्यांनी ज्याच्याशी लग्नशपथा घेतल्या त्या त्यांच्या विवाहीत सोबत्यास ते विश्‍वासघाती ठरतील.—१ करिंथकर ६:१८; ७:१-५; इब्रीयांस १३:४.

१३. (अ) दूरदर्शन आमचे विचार कसे घडवू शकतो? (ब) अशा प्रभावाचा आम्हाला कसा प्रतिकार करता येईल?

१३ आम्ही अशा जगात रहात आहोत जेथे लबाड्या, फसवणूक आणि हिंसाचारी क्रोध या सर्वसाधारण गोष्टी बनल्या आहेत. सैतान, उपलब्ध असणाऱ्‍या सर्व माध्यमांचा उपयोग करुन या भ्रष्ट मनोवृत्तींना सामोरे घालतो. दूरदर्शनवरील मालिका सुंदर व आकर्षक व्यक्‍ती एकमेकांची कशी फसवणूक साधता येते त्याचे प्रदर्शन करते. आम्ही याकरवी आमचे विचार भारावू दिले तर लवकरच आपण “लहानसहान” पापांना वाट देत आहोत हे दिसेल व हे ओघाओघाने “मोठ्या” पापांना अंगवळणी पाडते. सैतानाचे धूर्त प्रस्ताव अगदी सहजपणे आमच्या विचारात प्रवेश मिळवतात. तर मग, अशा प्रभावांचा आम्हाला कसा प्रतिकार करता येईल? पौलाने सूचना दिली की, “सैतानाला वाव देऊ नका.” याचा हा देखील अर्थ होतो की, तुमच्या दूरदर्शनकरवी जो तुमच्या घरात येऊ इच्छितो त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. आमच्या बैठकीच्या खोलीत हिंसाचार, अनैतिकता, शिवराळ माणसे याकरवी दूरदर्शन जे प्रदुषण ओकतो ते आम्ही थोपवू नये का?—इफिसकर ४:२३-३२.

आम्हाला सैतानाचा प्रतिकार करता येऊन देवाशी कसे विश्‍वासू राहता येईल?

१४. सैतानाचा प्रतिकार करण्यात कोणता दुहेरी निश्‍चय जरुरीचा आहे, व याला कशाची गरज आहे?

१४ इतका हा प्रबळ, अतिमानुष शत्रु आम्हा अपूर्ण मानवप्राण्यांमागे शिकाऱ्‍यासारखा लागला आहे तर मग, आम्हाला आपली सचोटी कशी राखता येईल? याचे उत्तर याकोबाच्या शब्दात आहे. तो म्हणतोः “देवाच्या अधीन व्हा व सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) याकोबाची सूचना कशी दुहेरी आहे ते लक्षात घ्या. आम्ही दियाबल व त्याच्या इच्छेचा धिक्कार करतो त्याचवेळी आम्ही स्वतःला देवाच्या इच्छेच्या अधीन केले पाहिजे. याचा अर्थ देवाच्या इच्छेसंबंधाने प्रेम व सैतानी इच्छेविषयी द्वेष प्रदर्शित झाला पाहिजे. (रोमकर १२:९) यासाठीच याकोब म्हणतोः “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.” (याकोब ४:८) होय, आम्ही सैतानाचा प्रतिकार करीत असता त्यामध्ये अर्धवट मनास किंवा अनिश्‍चितपणास वाव मिळता कामा नये. दुष्टाईला न शिवता त्याच्या किती जवळ जाता येते हे पाहण्यासाठी आम्ही आमच्या सचोटीची जोखीम पत्करणार नाही. आम्ही कटाक्षाने “वाईटाचा वीट मान”ला पाहिजे.—स्तोत्रसंहिता ९७:१०.

१५. देवाकडील “संपूर्ण शस्त्रसामग्री” का जरुरीची आहे? विवेचीत करा.

१५ सैतानाचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत इफिसकराच्या सहाव्या अध्यायात उल्लेखनीय सल्ला आढळतो. येथे, आम्ही सैतानाचे “डावपेच,” “कुयुक्त्या,” “योजना,” किंवा “पद्धती” यांचा कसा प्रतिकार करावा असे पौल म्हणतो? (इफिसकर ६:११, फिलिप्स, न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन, द जरुसलेम बायबल) “देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा,” असे तो म्हणतो. “संपूर्ण . . . सामग्री” या संज्ञेकरवी, जसा कोणी रोमी शिपाई युद्धाची तयारी करताना गबाळेपणा करीत नाही तसे ख्रिस्तीयत्वाच्या बाबतीत कसल्याही गबाळी प्रवृत्तीस थारा नाही हा अर्थ ध्वनित होतो. कोणी सैनिक कवच व शिरस्त्राण न घालता बाकीच्या सर्व गोष्टी घेऊन युद्धाला गेल्यास त्याला युद्ध कसे जमेल? तो कदाचित विचार करीलः ‘कवच तर भले मोठे आहे आणि शिरस्त्राण खूप जड आहे. त्यांचे वजनच खूप भारी आहे आणि खरे पाहता मला त्यांची तितकी आवश्‍यकता नाही.’ तर अशा रोमी सैनिकाला, जो रक्षणाची प्रमुख हत्यारे सोडून युद्धास जातो, त्याची स्थिती कशी होईल त्याचा जरा विचार करा.—इफिसकर ६:१६, १७.

१६. (अ) ‘तलवारी’चा वापर करण्यामध्ये आम्ही येशूचे उदाहरण कसे अनुसरावे? (ब) आम्हाला सैतानाचे “जळते बाण” कसे विझविता येतील व याचा काय परिणाम दिसेल?

१६ तसेच आणखी विचार करा की, कोणी सैनिक तरवार न घेता चालला आहे. “आत्म्याची तरवार” ही खरीच चांगली संरक्षक आहे, कारण ख्रिश्‍चनांविरुद्ध सैतान जी शस्त्रे उगारतो त्यांना ती छाटून टाकते. आमची “तरवार” नेहमीच तयार असली पाहिजे. आम्ही आमच्या व्यक्‍तीगत व कौटुंबिक अभ्यासाकडे दुर्लक्ष न केल्यास ती नेहमीच पाजळलेली राहणार. पण प्रामुख्यत्वे, ही “तरवार म्हणजे देवाचे वचन” हे आमचे चाल करण्याचे शस्त्र आहे. येशूने याचा दोन्ही प्रकारांनी वापर केला. (मत्तय ४:६, ७, १०; २२:४१-४६) आम्हीही तसेच केले पाहिजे. आम्ही, सत्याविषयीच्या आमच्या रसिकतेस नेहमी चकाकविले पाहिजे. सत्यामध्ये आलो तेव्हा काही महिने किंवा काही वर्षे आम्ही जे शिकलो त्याच्यावर आम्हाला आपली आध्यात्मिकता टिकवता येणार नाही. आमच्या मनाचे आध्यात्मिक क्षेत्र आम्ही पुनर्नवीन केले नाही तर मग आमची आध्यात्मिक दृष्टी अंधूक होत जाईल. यहोवाच्या खऱ्‍या भक्‍तीविषयी आम्हाला वाटणारी आस्था मंद होईल. आम्ही आध्यात्मिक रितीने दुबळे होऊ. तेव्हा आमच्या विश्‍वासाचा उपहास करणारे आमचे नातेवाईक, मित्र, सहचारी आणि धर्मत्यागी यांच्या हल्ल्याला आपणाला दूर सारता येणार नाही. पण, आम्ही “देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री” याकरवी स्वतःला सिद्ध ठेवले तर देव आम्हाला जरुर सैतान व त्याचे “जळते बाण” यापासून वाचवील.—यशया ३५:३, ४.

१७, १८. आमची लढत कोणाविरुद्ध आहे, आणि आम्हाला कसा विजय मिळू शकतो?

१७ ख्रिस्ती लढतीत केवढ्या धोक्यांना तोंड द्यावे लागते ते पौलाला ठाऊक होते आणि यासाठीच त्याने लिहिलेः “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर विश्‍वातील सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिकाऱ्‍यांबरोबर, अधिपतींबरोबर, आकाशातील अतिमानुष शक्‍तींबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२, द न्यू इंग्लिश बायबल) असे हे विजोड युद्ध आम्हा कृमी मानवांना कसे लढता येईल? पौल पुन्हा एकदा आपला मुद्दा मांडतोः “तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या.” (इफिसकर ६:१३) यात, “सर्व काही केल्यावर” हे विधान प्रमुख आहे. याद्वारे हे दिसते की, अर्धवट मन किंवा गोंधळलेल्या ख्रिस्तीयत्वाला येथे थारा नाही.—१ योहान २:१५-१७.

१८ यास्तव, आपण सत्यात स्थिर उभे राहू या, यहोवाच्या धार्मिकतेवर प्रेम करु या, शांतीची सुवार्ता घोषित करु या आणि यहोवा ख्रिस्त येशूमार्फत जे तारण देणार आहे त्यावरील आपला विश्‍वास दृढ धरुन ठेवू या. यासोबत देवाचे वचन हे आमचे प्रमुख साधन यावर विसंबून राहू या. (इफिसकर ६:१४-१७) हे लक्षात घ्या की, देव आमची काळजी वाहतो आणि तो या सैतानी व्यवस्थीकरणात आम्हाला ज्या परिक्षा व चिंता येतील त्यातून विजयाने पार होण्यास आमची मदत करील. तर आपण सर्व हा इशारा लक्षात ठेवू याः “सावध असा, जागे रहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” होय, “त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा.”—१ पेत्र ५:६-९.

१९. (अ) सैतानाचा प्रतिकार करता यावा यासाठी आणखी कोणत्या तरतुदीचा वापर आम्ही केला पाहिजे? (ब) सैतानाचे शेवटी काय होणार?

१९ पौलाने “शस्त्रसामग्री” मध्ये ज्याची आणखी भर घातली ते आम्ही विसरु नये. तो म्हणतोः “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. आणि ह्‍या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा.” (इफिसकर ६:१८) आमचा अदृश्‍य शत्रु हा इतका प्रबळ आहे की आम्ही ‘सर्व प्रकारच्या प्रार्थने’चा अवलंब केला पाहिजे. तर मग, आमच्या या प्रार्थना किती खऱ्‍या व विविध स्वरुपाच्या असावयास हव्या! आम्हाला लढतीत विजय मिळवायचा आहे आणि आपली सचोटी राखायची आहे तर यहोवावर पूर्णपणे विसंबून राहणे आवश्‍यक आहे. तोच आम्हाला “सामर्थ्याची पराकोटी” देऊ शकतो व यामुळेच आम्हाला त्या शत्रुसोबत नित्याने प्रतिकार करता येईल. आमचा हा आद्य शत्रु लवकरच अगाधकुपात जाणार व शेवटी कायमचा नष्ट होणार जे जाणणे किती सांत्वनदायक आहे!—२ करिंथकर ४:७; प्रकटीकरण २०:१-३, १०.

[तळटीपा]

a  सॅटान—द अर्ली ख्रिश्‍चन ट्रेडीशन, लेखक जेफ्री बर्टन रसेल, पृष्ठ २५.

b  ॲन एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्डस्‌.

तुम्हाला उत्तर देता येईल का?

◻ सैतान खरी व्यक्‍ती आहे हे आपल्याला कसे कळते?

◻ सैतानाची इतर नावे व पदव्या त्याला का योग्य आहेत?

◻ स्वतःविषयी केलेले कोणते आत्मपरिक्षण आम्हाला सैतानाच्या युक्‍तीबाज हल्ल्यांचा प्रतिकार करण्यास समर्थ करील?

◻ सैतानावर मात करण्यासाठी कोणती सूचना आम्हाला मदत करु शकेल व का?

[१० पानांवरील चित्रं]

सैतानाच्या प्रभावाचा प्रतिकार करण्याचा एक मार्ग म्हणजे दुसऱ्‍याच्या मदतीस पुढे होणे, मदतगार ठरणे व प्रेमळ असणे

[११ पानांवरील चित्रं]

सैतानापुढे स्वतःस नमविणाऱ्‍या हनन्या व सप्पीरा यांच्याप्रमाणे न होण्याविषयीची दक्षता आपण घेतली पाहिजे

[१२ पानांवरील चित्रं]

सैतानाच्या हल्ल्यांना परतवून लावायचे आहे तर आमच्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीतील कोणतेहि अस्त्र मागे ठेवता येणार नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा