वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w19 नोव्हेंबर पृ. १४-१९
  • तुमची “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या ढालीचं जवळून परीक्षण करा
  • अवाजवी चिंता, अफवा आणि निराशा यांपासून स्वतःचं रक्षण करा
  • भौतिक गोष्टींच्या लोभापासून सावध राहा
  • तुमची विश्‍वासाची ढाल घट्ट धरून ठेवा
  • “देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवा आपलं संरक्षण कसं करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तरुणांनो—सैतानाविरुद्ध दृढ उभे राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • “विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
w19 नोव्हेंबर पृ. १४-१९

अभ्यास लेख ४६

तुमची “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत आहे का?

“विश्‍वासाची मोठी ढाल हाती घ्या.”—इफिस. ६:१६.

गीत ५४ खरा विश्‍वास बाळगू या!

सारांशa

१-२. (क) इफिसकर ६:१६ या वचनानुसार आपल्याला विश्‍वासाच्या मोठ्या ढालीची गरज का आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

तुमच्याकडे “विश्‍वासाची मोठी ढाल” आहे का? (इफिसकर ६:१६ वाचा.) यात काहीच शंका नाही की ती तुमच्याकडे आहे. एक मोठी ढाल ज्या प्रकारे जवळजवळ संपूर्ण शरीराचं रक्षण करते, त्याच प्रकारे तुमचा विश्‍वास तुमचं अनैतिकता, हिंसा आणि या जगातल्या इतर वाईट गोष्टींपासून रक्षण करतो.

२ पण आपण आज “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत आणि त्यामुळे आपल्या विश्‍वासाची परीक्षा होतच राहील. (२ तीम. ३:१) तुमची विश्‍वासाची ढाल मजबूत आहे की नाही, याचं तुम्ही परीक्षण कसं करू शकता? आणि ती मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? या प्रश्‍नांची उत्तरं आता आपण पाहू या.

तुमच्या ढालीचं जवळून परीक्षण करा

प्राचीन काळात युद्धात सैनिक आपली ढाल वापरायचे; एक सैनिक आणि त्याचा सहायक ढाल दुरुस्त करतात

युद्धानंतर सैनिक आपली ढाल चांगल्या स्थितीत आहे की नाही याची खातरी करायचे (परिच्छेद ३ पाहा)

३. आपल्या ढालीला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी सैनिक काय करायचे आणि का?

३ बायबलच्या काळात सैनिकांच्या ढालींवर सहसा चामडं लावलेलं असायचं. चामडं टिकून राहावं आणि धातूला गंज लागू नये म्हणून सैनिक ढालीला तेल लावायचे. जर एखाद्या सैनिकाच्या ढालीला दुरुस्तीची गरज असेल, तर तो लगेच तिची दुरुस्ती करायचा. यामुळे तो पुढच्या युद्धासाठी तयार असायचा. हे उदाहरण आपल्या विश्‍वासाला कसं लागू होतं?

४. विश्‍वासाच्या ढालीचं परीक्षण करणं गरजेचं का आहे आणि आपण ते कसं करू शकतो?

४ प्राचीन काळातल्या सैनिकांप्रमाणे आपणही आपल्या विश्‍वासाच्या ढालीचं वेळोवेळी परीक्षण केलं पाहिजे आणि तिला चांगल्या स्थितीत ठेवलं पाहिजे. यामुळे आपण परीक्षांचा सामना करण्यासाठी नेहमी तयार असू. ख्रिस्ती या नात्याने आपलं युद्ध आध्यात्मिक स्वरूपाचं आहे आणि यात आपण दुष्ट आत्मिक शक्‍तींसोबत लढतो. (इफिस. ६:१०-१२) दुसरं कोणीही तुमच्या विश्‍वासाच्या ढालीचं परीक्षण करून तिची दुरुस्ती करू शकत नाही, तर ते तुम्हालाच करावं लागणार. परीक्षा आल्यावर तुमचा विश्‍वास मजबूत राहील याची तुम्ही आधीच खातरी कशी करू शकता? सर्वात आधी तुम्ही यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. मग देवाच्या वचनाचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे जाणून घेतलं पाहिजे. (इब्री ४:१२) बायबल सांगतं: “अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (नीति. ३:५, ६) हे तत्त्व मनात ठेवून अलीकडे तुम्ही जे निर्णय घेतले आहेत त्यावर थोडा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागला आहे का? अशा परिस्थितीत इब्री लोकांना १३:५ मध्ये यहोवाने जे अभिवचन दिलं आहे ते तुमच्या मनात आलं का? त्यात म्हटलं आहे: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” या अभिवचनामुळे यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल असा भरवसा तुम्हाला मिळाला का? जर असं झालं असेल, तर तुम्ही म्हणू शकता की तुमची विश्‍वासाची ढाल चांगल्या स्थितीत आहे.

५. विश्‍वासाचं जवळून परीक्षण केल्यावर तुम्हाला कदाचित काय दिसून येईल?

५ आपल्या विश्‍वासाचं जवळून परीक्षण केल्यावर तुम्हाला कदाचित अशा कमतरता दिसून येतील ज्यांचा तुम्ही आधी इतका विचार केला नसेल. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित जाणवेल की अवाजवी चिंता, अफवा किंवा निराशा यांमुळे तुमचा विश्‍वास आता कमी झाला आहे. तुमच्याबाबतीत असं झालं असेल, तर विश्‍वासाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

अवाजवी चिंता, अफवा आणि निराशा यांपासून स्वतःचं रक्षण करा

६. योग्य प्रकारच्या चिंता कोणत्या असू शकतात?

६ काही गोष्टींबद्दल चिंता करणं योग्य आहे. उदाहरणार्थ, यहोवा आणि येशू यांचं मन आनंदित करण्याबद्दल आपल्याला चिंता वाटू शकते. (१ करिंथ. ७:३२) आपल्या हातून एखादं गंभीर पाप घडलं, तर यहोवासोबतची मैत्री पुन्हा जोडण्यासाठी आपण चिंतित असू शकतो. (स्तो. ३८:१८) आपल्या जोडीदाराला खूश करण्याबद्दलही आपण नेहमी विचार करतो. तसंच, आपल्या कुटुंबाची आणि बांधवांची काळजी घेण्याबद्दलही आपल्याला चिंता असते.—१ करिंथ. ७:३३; २ करिंथ. ११:२८.

७. नीतिसूत्रे २९:२५ या वचनानुसार आपल्याला लोकांना घाबरण्याची गरज का नाही?

७ दुसरीकडे पाहता अवाजवी चिंता केल्यामुळे आपला विश्‍वास कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण खाणंपिणं, कपडेलत्ते यांबद्दल सतत चिंता करत असू. (मत्त. ६:३१, ३२) आणि ही चिंता दूर करण्यासाठी मग आपण जास्त भौतिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू. यामुळे आपल्या मनात पैशाबद्दल प्रेम उत्पन्‍न होऊ शकतं. आपण असं होऊ दिलं तर यहोवावरचा आपला विश्‍वास कमी होईल आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री धोक्यात येईल. (मार्क ४:१९; १ तीम. ६:१०) आपण आणखी एका अवाजवी चिंतेला बळी पडू शकतो. ती म्हणजे इतरांची पसंती मिळवण्याबद्दल जास्त विचार करणं. यहोवाला कोणत्या गोष्टींमुळे दुःख होतं हा विचार करण्याऐवजी आपल्या मनात कदाचित अशी भीती निर्माण होईल की लोक आपली थट्टा करतील किंवा आपला छळ करतील. या धोक्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आणि चिंतेचा सामना करण्यासाठी आपण यहोवाला प्रार्थनेत विश्‍वास आणि धैर्य मागितलं पाहिजे.—नीतिसूत्रे २९:२५ वाचा; लूक १७:५.

एक ख्रिस्ती कुटुंबप्रमुख कुटुंबासोबत टिव्ही पाहत असताना टिव्ही बंद करतो

(परिच्छेद ८ पाहा)b

८. लोक आपल्याबद्दल अफवा पसरवतात तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

८ सैतान हा “खोटेपणाचा बाप आहे” आणि तो त्याच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांचा उपयोग करून यहोवा आणि बांधवांबद्दल अफवा पसरवतो. (योहा. ८:४४) उदाहरणार्थ, धर्मत्यागी लोक यहोवाच्या संघटनेबद्दल अफवा पसरवतात आणि आपल्या शिकवणींमध्ये फेरबदल करून खोट्या गोष्टी पसरवतात. या खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी ते वेबसाईट्‌स, टिव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांचा उपयोग करतात. या अफवा सैतानाच्या जळत्या बाणांचाच एक भाग आहेत. (इफिस. ६:१६) आपल्याला जर कोणी अशा खोट्या गोष्टी सांगत असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण लगेच त्यांचं ऐकण्याचं थांबवलं पाहिजे. असं का? कारण आपला यहोवावर आणि आपल्या बांधवांवर पूर्ण भरवसा आहे. आपण धर्मत्यागी लोकांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधणार नाही. तसंच, आपण त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करणार नाही; मग आपल्याला त्यांचं म्हणणं जाणून घेण्याची उत्सुकता वाटत असली तरीही.

९. निराशेचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

९ निराशा आपला विश्‍वास कमी करू शकते. हे खरं आहे की आपल्या समस्यांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि असं करणं चुकीचंही ठरेल. समस्यांवर विचार केल्यामुळे आपण निराश होऊ शकतो. पण तरी त्यांबद्दल सतत विचार करत राहणं चुकीचं ठरेल. कारण असं केल्यामुळे यहोवाने आपल्याला भविष्यासाठी जी आशा दिली आहे तिचा आपल्याला विसर पडेल. (प्रकटी. २१:३, ४) आपण सावध नसलो तर निराशेमुळे आपण हताश होऊ आणि कदाचित यहोवाची सेवा करायचंही सोडून देऊ. (नीति. २४:१०) आपल्या बाबतीत असं कधीही होऊ नये.

१०. एका बहिणीने जे पत्र लिहिलं त्यातून आपण काय शिकू शकतो?

१० अमेरिकेत राहणाऱ्‍या एका बहिणीच्या उदाहरणावर विचार करा. तिचे पती गंभीर आजाराचा सामना करत आहेत. आणि त्यांची काळजी घेत असताना ही बहीण आपला विश्‍वास कसा मजबूत ठेवते त्याबद्दल तिने मुख्यालयाला एका पत्रात म्हटलं: “आमची परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे आणि कधीकधी मी निराश होते, पण माझी आशा खूप पक्की आहे. आमचा विश्‍वास वाढवण्यासाठी आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी यहोवाने जे आध्यात्मिक अन्‍न पुरवलं आहे त्यासाठी मी मनापासून खूप आभारी आहे. या परिस्थितीत आम्हाला या सल्ल्यांची आणि प्रोत्साहनाची खूप गरज आहे. यामुळे मला धीर धरायला मदत होते. सैतान आमच्यावर ज्या समस्या आणतो त्यांचा सामना करायला आम्हाला बळ मिळतं.” या बहिणीच्या शब्दांवरून कळतं की आपल्याला निराशेवर मात करणं शक्य आहे. हे आपण कसं करू शकतो? समस्या येतात तेव्हा सैतान आपली परीक्षा घेत आहे हे लक्षात ठेवा. यहोवा आपल्याला सांत्वन देईल असा भरवसा ठेवा. आणि तो जे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे त्याबद्दल नेहमी कदर बाळगा.

कौटुंबिक उपासनेदरम्यान कुटुंबप्रमुख बायबलचा वापर करून कुटुंबाचा विश्‍वास मजबूत करत आहे

तुम्ही “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत ठेवत आहात का? (परिच्छेद ११ पाहा)c

११. आपल्या विश्‍वासाचं परीक्षण करण्यासाठी आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

११ तुम्हाला काही पैलूंमध्ये तुमचा विश्‍वास मजबूत करण्याची गरज जाणवली आहे का? मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही अवाजवी चिंता करण्याचं टाळलं आहे का? धर्मत्यागी लोक आपल्याबद्दल जे खोटं पसरवतात ते ऐकण्याचा किंवा त्यावर चर्चा करण्याचा मोह तुम्ही टाळला आहे का? किंवा तुम्ही निराशेचा सामना करू शकला आहात का? तुम्ही जर या प्रश्‍नांची सकारात्मक उत्तरं दिली असतील तर तुमचा विश्‍वास चांगल्या स्थितीत आहे असं म्हणता येईल. पण आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे, कारण सैतान इतर हत्यारांचा उपयोग करूनही आपला विश्‍वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांपैकी एकावर आता आपण चर्चा करू या.

भौतिक गोष्टींच्या लोभापासून सावध राहा

१२. भौतिक गोष्टी मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे काय होण्याची शक्यता आहे?

१२ आपण भौतिक गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलो तर आपला विश्‍वास कमी होईल आणि यामुळे आपण यहोवाची सेवा कमी प्रमाणात करायला लागू. प्रेषित पौलने म्हटलं: “कोणताही सैनिक जगाच्या व्यवहारांत स्वतःला गुरफटून घेत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात भरती केले त्याला खूश करता यावे.” (२ तीम. २:४) खरंतर रोमी सैनिकांना इतर कोणतंही काम किंवा व्यवसाय करण्यास सक्‍त मनाई होती. पण एखाद्या सैनिकाने याकडे दुर्लक्ष केलं असतं तर काय होण्याची शक्यता होती?

१३. एक सैनिक कधीही इतर कामाला किंवा व्यवसायाला वेळ का देणार नाही?

१३ कल्पना करा की सैनिकांची एक तुकडी सकाळी तलवार चालवण्याचा सराव करत आहे. पण त्यांपैकी एक सैनिक त्यांच्यासोबत नाही. त्या सैनिकाचं शहराच्या बाजारात एक दुकान आहे आणि तो तिथे वस्तू विकत आहे. मग संध्याकाळी, सैनिकांची ती तुकडी आपल्या शस्त्रांचं परीक्षण करत आहे आणि तलवारीला धार लावत आहे. पण तो सैनिक दुसऱ्‍या दिवशी कोणतं सामान विकायचं याची तयारी करत आहे. दुसऱ्‍या दिवशी सकाळीच शत्रू अचानक हल्ला करतात. तुम्हाला काय वाटतं, अशा परिस्थितीत कोणते सैनिक लढाईसाठी तयार असतील आणि आपल्या सेनापतीची पसंती मिळवतील? तुम्ही जर त्या सैनिकांपैकी एक असता, तर तुमच्या बाजूला कोणता सैनिक असावा असं तुम्हाला वाटलं असतं, जो आपल्या तुकडीसोबत प्रशिक्षण घेत होता तो की जो दुकानात माल विकण्याची तयारी करत होता तो?

१४. येशू ख्रिस्ताचे सैनिक या नात्याने आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असली पाहिजे?

१४ आपणही त्या सतर्क आणि चांगल्या सैनिकांसारखंच असलं पाहिजे. आपले सेनापती यहोवा आणि येशू यांना खूश करणं ही आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. सैतानाच्या जगात आपल्याला ज्या गोष्टी मिळू शकतात, त्या सर्वांपेक्षा जास्त महत्त्व आपण यहोवाची पसंती मिळवायला दिलं पाहिजे. यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याजवळ पुरेसा वेळ आणि शक्‍ती आहे याची आपण खातरी केली पाहिजे. तसंच, आपली विश्‍वासाची ढाल आणि देवाकडून मिळणारी इतर शस्त्रसामग्री चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठीही आपण नियमितपणे वेळ काढला पाहिजे.

१५. पौलने आपल्याला कोणती ताकीद दिली आणि का?

१५ आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे. असं का? प्रेषित पौलने आपल्याला ताकीद दिली की “ज्यांना कसेही करून श्रीमंत व्हायचे आहे” ते “विश्‍वासापासून भरकटले आहेत.” (१ तीम. ६:९, १०) “भरकटले आहेत” या शब्दांवरून आपल्याला समजतं की आपण गरज नसलेल्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलो, तर आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. यामुळे आपण “अनेक मूर्खपणाच्या व घातक इच्छांना बळी” पडू शकतो. पण आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की सैतान या इच्छांचा उपयोग आपला विश्‍वास कमी करण्यासाठी करतो.

१६. मार्क १०:१७-२२ मध्ये दिलेल्या अहवालाच्या आधारावर आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१६ समजा आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत आणि आपण हवी ती गोष्ट विकत घेऊ शकतो. मग ज्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज नाही त्या विकत घेणं पूर्णपणे चुकीचं ठरेल का? नाही. पण अशा परिस्थितीत पुढील प्रश्‍नांवर विचार करा: एखादी वस्तू विकत घेण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे असले, तरी ती वस्तू वापरण्यासाठी व चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी माझ्याजवळ खरंच पुरेसा वेळ आणि शक्‍ती आहे का? तसंच, त्या वस्तू मला खूपच प्रिय वाटू लागतील का? येशूने एकदा एका तरुणाला आपली सेवा वाढवण्याचा सल्ला दिला, पण त्याने तो नाकारला. भौतिक गोष्टींवर असलेल्या प्रेमामुळे आपणही कदाचित त्या तरुणासारखंच सेवा वाढवण्याच्या संधी नाकारू. (मार्क १०:१७-२२ वाचा.) असं करण्यापेक्षा एक साधं जीवन जगणं जास्त चांगलं आहे. यामुळे आपण आपला मौल्यवान वेळ आणि शक्‍ती यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करू शकतो.

तुमची विश्‍वासाची ढाल घट्ट धरून ठेवा

१७. आपण नेहमी काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१७ आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं युद्ध दुष्ट आत्मिक शक्‍तींसोबत आहे. त्यामुळे आपण दररोज लढाईसाठी तयार असलं पाहिजे. (प्रकटी. १२:१७) लक्षात असू द्या की आपले भाऊबहीण आपल्यासाठी आपली विश्‍वासाची ढाल धरू शकत नाहीत, तर आपल्यालाच ती घट्ट धरून ठेवावी लागेल.

१८. प्राचीन काळातले सैनिक आपल्या ढालीला घट्ट का धरून ठेवायचे?

१८ प्राचीन काळात, युद्धात धैर्याने लढून आलेल्या सैनिकाचा सन्मान केला जायचा. पण जर तो आपल्या ढालीशिवाय परत आला, तर ती खूप लज्जेची गोष्ट समजली जायची. रोमी इतिहासकार टॅसिटस यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं: “एका सैनिकाने जर आपली ढाल युद्धात गमावली, तर ती खूप लाजिरवाणी गोष्ट समजली जायची.” यामुळे सैनिक नेहमी आपल्या ढालीला घट्ट धरून ठेवायचे.

एक बहीण बायबलचं वाचन करते, सभेत उत्तरं देते, प्रचारात भाग घेते आणि सैतानाच्या बाणांपासून वाचण्यासाठी एक मोठी ढाल समोर धरते

प्रार्थनापूर्वक बायबल वाचण्याद्वारे, नियमितपणे सभांना जाण्याद्वारे आणि सेवाकार्यात आवेशाने भाग घेण्याद्वारे एक बहीण आपल्या विश्‍वासाची ढाल घट्ट धरून ठेवत आहे (परिच्छेद १९ पाहा)

१९. आपल्या विश्‍वासाच्या ढालीला आपण घट्ट कसं धरून ठेवू शकतो?

१९ आपल्याला आपली ढाल घट्ट धरून ठेवायची असेल, तर आपल्याला नियमितपणे सभांना हजर राहावं लागेल. तसंच, यहोवाच्या नावाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगत राहावं लागेल. (इब्री १०:२३-२५) यासोबतच आपल्याला दररोज बायबलचं वाचन करावं लागेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यातला सल्ला लागू करावा लागेल. (२ तीम. ३:१६, १७) आपण असं करत राहिलो तर सैतानाच्या कोणत्याही हत्यारांमुळे आपलं कायमचं नुकसान होणार नाही. (यश. ५४:१७) “विश्‍वासाची मोठी ढाल” आपलं रक्षण करेल. यामुळे आपल्याला नेहमी बांधवांसोबत मिळून धैर्याने सेवा करता येईल. तसंच, विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी आपण दररोज जे युद्ध लढत आहोत तेही जिंकायला आपल्याला मदत होईल. आणि येशू जेव्हा सैतान व त्याच्या प्रभावाखाली असणाऱ्‍या लोकांविरुद्ध लढाई जिंकेल, तेव्हा त्याच्या बाजूने असण्याचा मोठा बहुमान आपल्याला मिळेल.—प्रकटी. १७:१४; २०:१०.

आपण पुढील गोष्टींपासून स्वतःचं रक्षण कसं करू शकतो?

  • अवाजवी चिंता

  • अफवा आणि निराशा

  • भौतिक गोष्टींचा लोभ

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

a शत्रूंच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक सैनिक आपल्या ढालीवर अवलंबून राहायचा. आपला विश्‍वासही एका ढालीसारखाच आहे. आणि जसं एक सैनिक आपली ढाल चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी वेळोवेळी तिचं परीक्षण करतो, तसंच आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी आपल्यालाही त्याचं परीक्षण करण्याची गरज आहे. आपल्या “विश्‍वासाची मोठी ढाल” चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल या लेखात सांगण्यात आलं आहे.

b चित्रांचं वर्णन: यहोवाच्या साक्षीदारांबद्दल अफवा पसरवणाऱ्‍या धर्मत्यागी लोकांची एक बातमी टिव्हीवर येते, तेव्हा एक कुटुंब लगेच टिव्ही बंद करतं.

c चित्रांचं वर्णन: नंतर कौटुंबिक उपासनेत कुटुंबप्रमुख कुटुंबाचा विश्‍वास वाढवण्यासाठी बायबलच्या एका अहवालावर चर्चा करतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा