वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१५ पृ. १५-२०
  • देवाचे वचन वाचा आणि सत्याने त्याची सेवा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे वचन वाचा आणि सत्याने त्याची सेवा करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चिरस्थायी फायदे
  • सर्वांसाठी महत्त्वपूर्ण
  • देवाचे वचन मोठ्याने वाचा
  • विषयवार अभ्यासाची पद्धत
  • नेहमी सत्याने चाला
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • राजांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • बायबलचा स्वीकार करा कारण ते विश्‍वसनीय आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१५ पृ. १५-२०

देवाचे वचन वाचा आणि सत्याने त्याची सेवा करा

“हे परमेश्‍वरा, [यहोवा, NW] तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.” —स्तोत्र ८६:११.

१. मूलभूतपणे, या नियतकालिकाच्या पहिल्या अंकाने सत्याविषयी काय म्हटले?

यहोवा, प्रकाश व सत्य प्रगट करतो. (स्तोत्र ४३:३) तो आपल्याला त्याचे वचन बायबल वाचण्याचे व सत्य शिकण्याचे कौशल्यही प्रदान करतो. या नियतकालिकाच्या पहिल्या अंकाने—जुलै १८७९—म्हटले: “सत्य, जीवनाच्या ओसाड प्रदेशातील एका लहान विनयशील फुलाप्रमाणे आहे जे सभोवती असलेल्या दाट पसरलेल्या खोटेपणाच्या निदणामुळे जवळजवळ चेंगरून गेले आहे. तुम्हाला ते सापडल्यास तुम्ही नेहमी दक्ष राहिले पाहिजे. तुम्ही जर त्याचे सौंदर्य पाहिले तर खोटेपणाच्या निदणाला व धर्मवेडेपणाच्या काटेरी झुडूपाला बाजूला सारले पाहिजे. तुम्हाला ते हवे असल्यास ते तोडण्यासाठी तुम्हाला खाली वाकले पाहिजे. सत्याच्या केवळ एकाच फुलाने समाधानी होऊ नका. एकच फूल पुरेसे असते तर इतर फुलांना निर्माणच करण्यात आले नसते. फुले वेचत राहा व आणखी शोधत राहा.” देवाच्या वचनाचे वाचन व अभ्यास आपल्याला अचूक ज्ञान प्राप्त करण्यास व त्याच्या सत्यानुसार चालण्यास मदत करते.—स्तोत्र ८६:११.

२. एज्रा आणि इतरांनी प्राचीन जेरूसलेममधील यहुद्यांना देवाचे नियमशास्त्र वाचून दाखवले तेव्हा काय झाले?

२ सा. यु. पू. ४५५ मध्ये जेरूसलेमच्या भिंती पुन्हा उभारण्यात आल्या तेव्हा, एज्रा याजकाने आणि इतरांनी, यहुद्यांना देवाचे नियमशास्त्र वाचून दाखवले. त्यानंतर आनंदी मांडवांचा सण, पातकांची कबुली व “दृढ करार” करण्यात आला. (नहेम्या ८:१–९:३८) आपण वाचतो: “त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखविला; वाचले तेवढे लोकांस चांगले समजले.” (नहेम्या ८:८) यहुद्यांना हिब्रू भाषा इतकी समजत नव्हती व ग्रंथाचा अरामी भाषेत अनुवाद करण्यात आला, असे काही विद्वानांचे मत आहे. पण हे वचन, हिब्रू भाषेच्या संज्ञांचे निव्वळ स्पष्टीकरण सुचवत नाही. एज्रा आणि इतरांनी नियमशास्त्राचे सविस्तर स्पष्टीकरण केले जेणेकरून लोक त्या नियमशास्त्राच्या तत्त्वांना समजू शकले व त्यांना लागू करू शकले. ख्रिस्ती प्रकाशने व सभा देखील, देवाच्या वचनाचे ‘स्पष्टीकरण’ देण्याचे कार्य करतात. “शिकविण्यात निपुण” असलेले नियुक्‍त वडील सुद्धा असेच करतात.—१ तीमथ्य ३:१, २; २ तीमथ्य २:२४.

चिरस्थायी फायदे

३. बायबल वाचनातून काही कोणते फायदे टिपले जाऊ शकतात?

३ ख्रिस्ती कुटुंबे एकत्र मिळून बायबल वाचतात तेव्हा त्यांना बहुधा चिरस्थायी फायदे प्राप्त होतील. देवाच्या नियमशास्त्राशी त्यांचा परिचय होतो व ते सिद्धांत, भविष्यसूचक बाबी आणि इतर विषयांबद्दलचे सत्य शिकतात. बायबलचा एखादा भाग वाचल्यावर घराचा प्रमुख विचारू शकतो: याचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे? हे इतर बायबल शिकवणींशी कसे संबंधित आहे? सुवार्तेच्या प्रचारकार्यात आपण या मुद्यांचा कसा उपयोग करू शकतो? एखादे कुटुंब बायबलचे वाचन करतेवेळी टेहळणी बुरूज प्रकाशन सूची (इंग्रजी) किंवा इतर सूचींचा उपयोग करून संशोधन करते तेव्हा अधिक सूक्ष्मदृष्टी प्राप्त करते. शास्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), या दोन्ही खंडांतून आपण माहिती मिळवू शकतो ज्याचा आपल्याला लाभ होईल.

४. यहोशवा १:८ मधील सूचना, यहोशवाला कशी लागू करावयाची होती?

४ शास्त्रवचनांतून घेतलेली तत्त्वे जीवनामध्ये आपले मार्गदर्शन करू शकतात. शिवाय, ‘पवित्र शास्त्राचे’ वाचन आणि त्याचा अभ्यास आपल्याला, “तारणासाठी ज्ञानी करू” शकतात. (२ तीमथ्य ३:१५) जर आपण देवाच्या वचनाला आपणास मार्गदर्शन करू दिले तर आपण त्याच्या सत्यात नेहमी चालत राहू व आपल्या धार्मिक भावना पूर्ण केल्या जातील. (स्तोत्र २६:३; ११९:१३०) परंतु, मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा याने केल्याप्रमाणे आपणही समजदारी प्राप्त केली पाहिजे. “नियमशास्त्राचा हा ग्रंथ” सदैव त्याच्या मुखात हवा होता व रात्रंदिवस त्याला तो वाचावयाचा होता. (यहोशवा १:८) “नियमशास्त्राचा हा ग्रंथ” त्याच्या तोंडातून निघून जाऊ नये याचा अर्थ, यहोशवाने त्यातील ज्ञान देणाऱ्‍या गोष्टी इतरांना सांगण्याचे थांबवायचे नव्हते. रात्रंदिवस नियमशास्त्र वाचण्याचा अर्थ यहोशवाला त्यावर मनन करावयाचे होते, त्याचा अभ्यास करावयाचा होता. अशाचप्रकारे प्रेषित पौलाने तीमथ्याला त्याचे वर्तन, सेवा आणि शिकवण यांचा “अभ्यास” करावयास—त्यावर मनन करावयास—आर्जवले. ख्रिस्ती वडील या नात्याने, तीमथ्याला त्याचे जीवन उदाहरणशील होते व तो शास्त्रवचनीय सत्य शिकवणारा होता याविषयी विशेष दक्ष राहण्याची गरज होती.—१ तीमथ्य ४:१५.

५. आपल्याला देवाचे सत्य शोधावयाचे असल्यास कशाची आवश्‍यकता आहे?

५ देवाचे सत्य मौल्यवान ठेवा आहे. तो प्राप्त करण्यासाठी शास्त्रवचनांना खोदण्याची, नेटाने त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. महान शिक्षकाचे बालविद्यार्थी या नात्यानेच केवळ आपल्याला सुज्ञान प्राप्त होते व यहोवाचे आदरयुक्‍त भय समजू लागते. (नीतिसूत्रे १:७; यशया ३०:२०, २१) अर्थात आपण शास्त्रवचनांद्वारेच गोष्टी शाबीत केल्या पाहिजेत. (१ पेत्र २:१, २) बिरूयातील यहुदी “थेस्सलनीकांतल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि [पौलाने सांगितलेल्या] ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” याबद्दल बिरूयातील लोकांना फटकारण्याऐवजी त्यांची प्रशंसा करण्यात आली.—प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११.

६. शास्त्रवचनांचा शोध काही यहुद्यांना लाभदायक ठरला नाही, असे येशू सूचित का करू शकला?

६ येशूने विशिष्ट यहुद्यांना सांगितले: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही.” (योहान ५:३९, ४०) ही शास्त्रवचने त्यांना जीवनाकडे नेतील—या योग्य हेतूने त्यांनी ती शोधली. हे खरे आहे, की शास्त्रवचनांमध्ये येशूद्वारे जीवन मिळू शकते हे प्रदर्शित करणाऱ्‍या मशीहाविषयक भविष्यवाण्या होत्या. पण यहुद्यांनी त्याला नाकारले. यास्तव, शास्त्रवचनांचा शोध त्यांच्यासाठी फायदेकारक ठरला नाही.

७. बायबलच्या ज्ञानामध्ये वाढत जाण्यासाठी कशाची गरज आहे, व का?

७ बायबलविषयी आपल्याला असलेल्या समजुतीमध्ये वाढत जाण्यासाठी देवाच्या आत्म्याचे किंवा कार्यकारी शक्‍तीचे मार्गदर्शन आपल्याला हवे आहे. “आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो,” जेणेकरून त्यांचा अर्थ काय आहे ते स्पष्ट होईल. (१ करिंथकर २:१०) थेस्सलनीकामधील ख्रिश्‍चनांनी कोणतीही भविष्यवाणी ऐकल्यावर ‘सर्व गोष्टींची त्यांना पारख करावयाची होती.’ (१ थेस्सलनीकाकर ५:२०, २१) पौलाने थेस्सलनीकाकरांना (सा.यु. ५० च्या सुमारास) लिहिले तेव्हा ग्रीक शास्त्रवचनातील केवळ मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या भागाचे लिखाण पूर्ण झाले होते. यास्तव, थेस्सलनीकामधील आणि बिरूयातील लोक, संभवतः हिब्रू शास्त्रवचनांची ग्रीक सेप्ट्युजंट आवृत्ती तपासून सर्व गोष्टींची पारख करू शकत होते. शास्त्रवचने वाचणे आणि त्यांचा अभ्यास करणे, या गोष्टींची त्यांना गरज होती, आणि आपल्यालाही तेच करणे आवश्‍यक आहे.

सर्वांसाठी महत्त्वपूर्ण

८. नियुक्‍त वडिलांनी बायबलच्या ज्ञानामध्ये तरबेज का असावयास हवे?

८ नियुक्‍त वडिलांनी बायबलच्या ज्ञानात तरबेज असले पाहिजे. त्यांनी “निपुण शिक्षक” व ‘विश्‍वसनीय वचनाला दृढ धरून’ राहणारे असले पाहिजे. पर्यवेक्षक तीमथ्याला “सत्याचे वचन नीट सांगणारा” असे असावयाचे होते. (१ तीमथ्य ३:२; तीत १:९; २ तीमथ्य २:१५) त्याची आई युनीके व आजी लोईस यांनी त्याचा पिता सत्य न मानणारा होता तरीदेखील बालपणापासून त्याला पवित्र लिखाणे शिकवली होती, त्याच्यामध्ये ‘निष्कपट विश्‍वास’ बिंबवला होता. (२ तीमथ्य १:५; ३:१५) सत्य मानणाऱ्‍या पित्यांनी आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवले’ पाहिजे, शिवाय खासकरून पिता असलेल्या वडिलांची मुले, “विश्‍वास ठेवणारी असावी. बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.” (इफिसकर ६:४; तीत १:६) तेव्हा, आपली परिस्थिती कोणतीही असली तरी आपण देवाच्या वचनाचे वाचन, अभ्यास आणि अनुसरण करण्याच्या गरजेला गांभीर्याने घेतले पाहिजे.

९. सह ख्रिश्‍चनांच्या संगतीने बायबलचा अभ्यास का केला पाहिजे?

९ सहविश्‍वासूंच्या सहवासात असताना देखील आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. थेस्सलनीकाकरातील ख्रिश्‍चनांनी, त्यांना दिलेल्या सल्ल्याची चर्चा एकमेकांबरोबर करावी, असे पौलाला, वाटत होते. (१ थेस्सलनीकाकर ४:१८) सत्याबद्दल असलेली आपली समजूत आणखी धारदार तीक्ष्ण करावयाची असल्यास, इतर अभ्यासू विद्यार्थ्यांसोबत शास्त्रवचनांचे परीक्षण करण्याव्यतिरिक्‍त दुसरा कोणताही उत्तम मार्ग नाही. “लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते. माणूस माणसाची बुद्धी तीक्ष्ण करतो,” हे नीतिसूत्र किती खरे आहे. (नीतिसूत्रे २७:१७, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) एखाद्या लोखंडी साधनाचा उपयोग न केल्यास व त्याला तीक्ष्ण न केल्यास त्यावर गंज चढतो. त्याचप्रकारे, आपणही नियमितरीत्या एकत्र येऊन देवाच्या सत्य वचनाचे वाचन, अभ्यास आणि मनन यांद्वारे प्राप्त केलेले ज्ञान सांगून एकमेकांना तीक्ष्ण केले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२४, २५) शिवाय, आध्यात्मिक प्रकाशाच्या चकाकण्यापासून आपण लाभ मिळवून घेऊ ही खात्री बाळगण्याचा हा एक मार्ग आहे.—स्तोत्र ९७:११; नीतिसूत्रे ४:१८.

१०. सत्याने चालण्याचा अर्थ काय होतो?

१० स्तोत्रकर्त्याने देवाला केलेल्या प्रार्थनेप्रमाणेच शास्त्रवचनांचा अभ्यास करताना आपणही अशा प्रकारे प्रार्थना करू शकतो: “तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर; ती मला मार्ग दाखवोत.” (स्तोत्र ४३:३) देवाची स्वीकृती प्राप्त करण्याची आपली इच्छा आहे तर मग आपण त्याच्या सत्यानुरूप चालले पाहिजे. (३ योहान ३, ४) यामध्ये त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे व विश्‍वासूपणे आणि प्रामाणिकपणे त्याची सेवा करणे समाविष्ट आहे. (स्तोत्र २५:४, ५; योहान ४:२३, २४) यहोवाच्या वचनात प्रकट केल्याप्रमाणे आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून’ येणाऱ्‍या प्रकाशनांत स्पष्ट केल्याप्रमाणे आपण त्याची सेवा सत्याने केली पाहिजे. (मत्तय २४:४५-४७) यासाठी शास्त्रवचनांच्या अचूक ज्ञानाची गरज आहे. तर मग, देवाच्या वचनाचे वाचन आणि अभ्यास आपण कसा करावा? उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून सर्व ६६ पुस्तके वाचून काढावीत का? होय, प्रत्येक ख्रिश्‍चनाने, आपल्या भाषेत असणारे संपूर्ण बायबल उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत वाचले पाहिजे. बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशने वाचण्याचा आपला हेतू, ‘विश्‍वासू दासाकरवी’ देवाने उपलब्ध करून दिलेल्या अमाप शास्त्रवचनीय सत्याबद्दलची समज वाढवणे, हा असला पाहिजे.

देवाचे वचन मोठ्याने वाचा

११, १२. सभांमध्ये बायबलचे मोठ्याने वाचन करणे लाभदायक का आहे?

११ आपण एकटे असतो तेव्हा कदाचित मनातल्या मनात वाचन करू. परंतु, प्राचीन काळी व्यक्‍तिगत वाचन मोठ्याने केले जाई. इथियोपियन षंड आपल्या रथातून जात असताना तो यशयाचा ग्रंथ मोठ्याने वाचत असल्याचे सुवार्तिक फिलिप्पाने ऐकले. (प्रेषितांची कृत्ये ८:२७-३०) “वाचणे” असा भाषांतरीत केलेल्या हिब्रू शब्दाचा प्रमुख अर्थ “बोलवणे” असा होतो. यास्तव, सुरवातीला हलक्या आवाजात वाचून त्याचा अर्थ न समजणाऱ्‍यांना प्रत्येक शब्द मोठ्याने उच्चारण्याबद्दल निरुत्साहित करू नये. देवाचे लिखित वचन वाचण्याद्वारे सत्य शिकणे ही प्रमुख गोष्ट आहे.

१२ ख्रिस्ती सभांमध्ये मोठ्याने बायबल वाचन करणे लाभदायक आहे. प्रेषित पौलाने त्याचा सहकर्मचारी तीमथ्य याला आर्जवले: ‘सामूहिक वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव.’ (१ तीमथ्य ४:१३) पौलाने कलस्सैकरांना सांगितले: “हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतहि वाचावयास मिळावे; व लावदिकीयाकडील पत्र तुम्हीहि वाचावे.” (कलस्सैकर ४:१६) तसेच प्रकटीकरण १:३ म्हणते: “ह्‍या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.” यास्तव, एक जाहीर वक्‍ता मंडळीला काही सांगत असल्यास त्याच्या बोलण्याला आधार देण्याकरता त्याने बायबलमधील वचने वाचली पाहिजेत.

विषयवार अभ्यासाची पद्धत

१३. बायबल सत्य शिकण्याची सर्वात प्रगतिशील पद्धत कोणती, व शास्त्रवचने शोधून काढण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकते?

१३ विषयवार अभ्यास, शास्त्रवचनीय सत्ये शिकण्याची सर्वात प्रगतिशील पद्धत आहे. वर्णानुक्रमाने बायबलच्या शब्दांची, त्यांच्या संदर्भाप्रमाणे पुस्तक, अध्याय व वचनानुसार यादी देणारे कॉन्कॉरडन्स एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित वचने शोधण्यास सोपे बनवतात. अशा शास्त्रवचनांचा एकमेकांसोबत मेळ घालता येतो कारण बायबलच्या लेखकाचे म्हणणे परस्परविरोधी नाही. त्याने पवित्र आत्म्याद्वारे जवळजवळ १६ शतकांच्या कालावधीत सुमारे ४० लोकांना बायबलचे लिखाण करण्यासाठी प्रेरित केले व त्याचा विषयवार अभ्यास करणे बऱ्‍याच वर्षांपासून सत्य शिकण्यासाठी एक परिणामकारी मार्ग ठरला आहे.

१४. हिब्रू आणि ग्रीक शास्त्रवचनांचा अभ्यास एकत्र का करावा?

१४ बायबल सत्याबद्दल आपण जी कदर बाळगतो तिने आपल्याला हिब्रू शास्त्रवचनांसोबत ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे वाचन व अभ्यास करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. हे, ग्रीक शास्त्रवचनांचा संबंध देवाच्या उद्देशासोबत कशा प्रकारे आहे ते दाखवील आणि हिब्रू शास्त्रवचनातील भविष्यवाणींवर प्रकाश टाकील. (रोमकर १६:२५-२७; इफिसकर ३:४-६; कलस्सैकर १:२६) याबाबतीत पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी), हे अतिशय फायदेकारक आहे. ते, ज्यांनी मूळ बायबल पाठ तसेच त्याची पार्श्‍वभूमी व वाक्यप्रचाराच्या अभिव्यक्‍तींविषयी उपलब्ध असलेल्या वाढत्या ज्ञानाचा फायदा घेतला त्या देवाच्या समर्पित सेवकांनी तयार केले होते. बायबलच्या अभ्यासासाठी ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाकरवी’ यहोवाने पुरवलेली साधने देखील महत्त्वपूर्ण आहेत.

१५. बायबलमधून इकडचे तिकडचे अवतरण देणे बरोबर आहे हे तुम्ही कसे शाबीत कराल?

१५ काही जण तुम्हाला म्हणतील: ‘तुमची प्रकाशने बायबलची हजारो अवतरणे देतात, पण तुम्ही ती इकडून तिकडून का घेता?’ बायबलच्या ६६ पुस्तकांतून इकडून तिकडून अवतरणे देऊन एखाद्या शिकवणीच्या खरेपणाला शाबीत करण्यासाठी प्रकाशने अनेक प्रेरित साक्षी देतात. स्वतः येशूने सूचना देण्याच्या या पद्धतीचा उपयोग केला. त्याने डोंगरावरील प्रवचन दिले तेव्हा हिब्रू शास्त्रवचनांतून २१ अवतरणे दिली. त्या प्रवचनात, निर्गमाच्या पुस्तकातून तीन, लेवीयमधून दोन, गणनामधून एक, अनुवादातून सहा, दुसरे राजे यातून एक, स्तोत्रसंहितेतून चार, यशयातील तीन व यिर्मायातील एक, इतकी अवतरणे आहेत. असे केल्याने येशू ‘काहीतरीच शाबीत करू पाहत होता का?’ नाही, त्याने ‘त्यांच्या शास्त्री लोकांसारखे नव्हे तर अधिकारवाणीने त्यांना शिकवले.’ कारण तो देवाच्या लिखित वचनाच्या अधिकाराने ही शिकवण देत होता. (मत्तय ७:२९) प्रेषित पौलाने देखील असेच केले.

१६. रोमकर १५:७-१३ मध्ये पौलाने कोणती शास्त्रवचनीय अवतरणे दिली आहेत?

१६ रोमकर १५:७-१३ मधील शास्त्रवचनीय उताऱ्‍यात पौलाने हिब्रू शास्त्रवचनांच्या तीन विभागातून—नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रसंहिता, यांतून अवतरणे दिली आहेत. यहुदी आणि विदेशी देवाचा महिमा करतील व अशा प्रकारे ख्रिश्‍चनांनी सर्व राष्ट्रांतील लोकांचे स्वागत केले पाहिजे हे त्याने दाखवले. पौलाने म्हटले: “म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजास दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे. शास्त्रात [स्तोत्र १८:४९ मध्ये] असे लिहिले आहे की, ‘म्हणून परराष्ट्रीयांमध्ये तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.’ ‘परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा,’ असे तो [अनुवाद ३२:४३ मध्ये] पुन्हा म्हणतो. ‘सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्‍वराचे [यहोवाचे] स्तवन करा;’ आणि ‘सर्व लोक त्याचे स्तवन करोत,’ असेहि तो [स्तोत्र ११७:१ येथे] पुन्हा म्हणतो. आणखी यशया [११:१, १०] म्हणतो, ‘इशायाचा अंकुर फुटेल, तो परराष्ट्रीयांवर अधिकार करावयास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील.’ आता आशेचा देव विश्‍वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरिता की, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.” या विषयवार पद्धतीद्वारे पौलाने, बायबल सत्ये शाबीत करण्यासाठी शास्त्रवचनांचे अवतरण कसे द्यावे हे दाखवले.

१७. कोणत्या पूर्वोदाहरणाच्या सुसंगतेत ख्रिस्ती संपूर्ण बायबलमधून इकडचे तिकडचे अवतरणे देतात?

१७ प्रेषित पेत्राच्या पहिल्या प्रेरित पत्रामध्ये नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रसंहिता यातील दहा पुस्तकांमधील ३४ अवतरणे आहेत. पेत्र त्याच्या दुसऱ्‍या पत्रात, तीन पुस्तकांतून सहा वेळा अवतरण देतो. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये उत्पत्तीपासून मलाखीपर्यंतचे १२२ अवतरणे आहेत. ग्रीक शास्त्रवचनांच्या २७ पुस्तकांमध्ये उत्पत्ती ते मलाखीपर्यंतचे ३२० थेट अवतरणे तसेच हिब्रू शास्त्रवचनांतील इतर शेकडो संदर्भ आहेत. येशूने मांडलेल्या आणि त्याच्या प्रेषितांनी अनुसरलेल्या पूर्वोदाहरणाच्या सुसंगतेत, आधुनिक दिवसांतील ख्रिस्ती एखाद्या शास्त्रवचनीय विषयाचा विषयवार अभ्यास करतात तेव्हा ते संपूर्ण बायबलमधून इकडचे तिकडचे अवतरण घेतात. हे ‘शेवटल्या काळामध्ये,’ म्हणजे बहुतेक हिब्रू आणि ग्रीक शास्त्रवचने पूर्ण होत असताना खासकरून उचित आहे. (२ तीमथ्य ३:१) अशा प्रकारे ‘विश्‍वासू दास’ आपल्या प्रकाशनांमध्ये बायबलचा उपयोग करतो, परंतु, देवाच्या वचनामध्ये भर टाकत नाही अगर त्याच्यातून काही काढत नाही.—नीतिसूत्रे ३०:५, ६; प्रकटीकरण २२:१८, १९.

नेहमी सत्याने चाला

१८. ‘सत्याने चालण्याची’ गरज का आहे?

१८ बायबलमधून आपण काहीही काढू नये कारण देवाच्या वचनातील सर्व ख्रिस्ती शिकवणी “सत्य” किंवा “सुवार्तेचे सत्य” आहेत. या सत्याचे अनुपालन—‘सत्याने चालणे’—तारणाकरता आवश्‍यक आहे. (गलतीकर २:५; २ योहान ४; १ तीमथ्य २:३, ४) ख्रिस्ती धर्म ‘सत्य मार्ग’ असल्यामुळे त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी इतरांना मदत करून आपण “सत्यामध्ये त्यांचे सहकारी” होतो.—२ पेत्र २:२; ३ योहान ८.

१९. आपण ‘सत्याने कसे चालत राहू’ शकतो?

१९ ‘सत्यात चालत राहण्याची’ आपली इच्छा आहे तर आपण बायबल वाचले पाहिजे आणि ‘विश्‍वासू दासाकरवी’ देव जी आध्यात्मिक मदत पुरवतो तिचा फायदा घेतला पाहिजे. (३ योहान ४) हे आपण आपल्या भल्यासाठी करू या जेणेकरून आपण इतरांना यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि ईश्‍वरी उद्देशाबद्दल शिकवण्याच्या स्थितीत असू. यहोवाचा आत्मा आपल्याला त्याचे वचन समजण्यास व सत्याने त्याची सेवा करण्यास यश मिळण्यास मदत करतो याबद्दल आपण त्याचे आभार मानू या.

तुमची उत्तरे काय आहेत?

◻ बायबल वाचनाचे काही टिकाऊ फायदे कोणते?

◻ सहविश्‍वासूंच्या संगतीने बायबलचा अभ्यास का करावा?

◻ संपूर्ण बायबलच्या विविध भागांतून अवतरण देणे उचित का आहे?

◻ ‘सत्याने चालण्याचा’ काय अर्थ होतो, व ते आपण कसे करू शकतो?

[१७ पानांवरील चित्रं]

पालकांनो, तुमच्या मुलांना शास्त्रवचने शिकवा

[१८ पानांवरील चित्रं]

डोंगरावरील प्रवचनात येशूने हिब्रू शास्त्रवचनांच्या विविध भागांतून अवतरण दिले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा