मुख्य विषय: जगाच्या अंताची आपल्याला भीती वाटावी का?
जगाचा अंत भीती, कुतूहल आणि निराशा
२१ डिसेंबर २०१२! या तारखेविषयी तुम्हाला काय वाटते? माया कॅलेंडरनुसार या तारखेला जगाचा कायापालट होईल असे अनेकांचे मत होते. या तारखेसंबंधी तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्यानुसार एकतर तुम्हाला हायसे वाटले असेल, तुमची निराशा झाली असेल किंवा मग तुम्हाला काहीच फरक पडला नसेल. जगाच्या अंताविषयी आजवर करण्यात आलेल्या अनेक चुकीच्या भाकितांपैकीच हेसुद्धा एक चुकीचे भाकीत होते का?
पण, “जगाचा शेवट” किंवा जगाचा अंत याबद्दल बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? (मत्तय २४:३, ईझी टू रीड) काहींना असे वाटते की जगाचा अंत होईल तेव्हा पृथ्वी जळून खाक होईल. इतर काही जण अंताच्या वेळी कोणकोणत्या घटना घडतील हे पाहण्यास उत्सुक आहेत. तर इतर अनेक जण जगाच्या अंताबद्दलच्या गोष्टी ऐकून ऐकून थकले आहेत. पण, या सर्व प्रतिक्रिया एका वास्तविक घटनेपेक्षा निव्वळ कल्पना केलेल्या घटनेसंबंधी असाव्यात का?
अर्थात, जगाच्या अंताविषयी बायबल काय सांगते हे जाणून तुम्ही चकित व्हाल. जगाच्या अंताकडे आशेने पाहण्याची अनेक कारणे बायबलमध्ये दिली आहेत. तसेच, अंताची वाट पाहून थकलेले लोक निराश होऊ शकतात हेसुद्धा बायबल कबूल करते. जगाच्या अंताविषयी सहसा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची बायबल काय उत्तरे देते याचे परीक्षण करण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो.
पृथ्वी जळून खाक होईल का?
बायबलचे उत्तर: देवाने पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापन केली आहे की ती कधीही ढळणार नाही.—स्तोत्र १०४:५.
पृथ्वीचा अग्नीने अथवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने नाश होणार नाही. याउलट, ती मानवांचे कायमचे निवासस्थान आहे असे बायबल शिकवते. बायबलमधील स्तोत्र ३७:२९ हे वचन म्हणते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ११५:१६; यशया ४५:१८.
देवाने पृथ्वीची व पृथ्वीवरील गोष्टींची निर्मिती केली तेव्हा सर्व “फार चांगले आहे” असे त्याने म्हटले. आणि आत्तासुद्धा पृथ्वीबद्दल देवाला असेच वाटते. (उत्पत्ति १:३१) त्यामुळे, पृथ्वीचा नाश करण्याचे तर दूरच, उलट “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करण्याचे अभिवचन त्याने दिले आहे. दुसऱ्या शब्दांत, तो केव्हाही पृथ्वीचे कायमस्वरूपी नुकसान होऊ देणार नाही.—प्रकटीकरण ११:१८.
पण मग तुम्ही कदाचित म्हणाल की २ पेत्र ३:७ या वचनात जे म्हटले आहे त्याचे काय? ते वचन म्हणते: “आताचे आकाश व पृथ्वी . . . अग्नीसाठी राखलेली आहेत.” यावरून पृथ्वी जळून खाक होईल हे सिद्ध होत नाही का? खरेतर, बायबलमध्ये ‘आकाश,’ ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’ हे शब्द काही वेळा लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आले आहेत. उदाहरणार्थ उत्पत्ति ११:१ मध्ये, “सर्व पृथ्वीची एकच भाषा” होती असे जे म्हटले आहे तेथे ‘पृथ्वी’ हा शब्द मानवसमाजाला सूचित करतो.
दुसरे पेत्र ३:७ या वचनाच्या संदर्भावरून दिसून येते की तेथे उल्लेख केलेले आकाश, पृथ्वी आणि अग्नीदेखील लाक्षणिक आहेत. वचन ५ आणि ६ यांत जे म्हटले आहे त्याची तुलना आपण नोहाच्या काळात आलेल्या जलप्रलयाशी करू शकतो. त्या वेळी, जुन्या जगाचा नाश झाला, पण आपला पृथ्वीग्रह नाहीसा झाला नाही. तर मग, जलप्रलयात ‘पृथ्वीचा’ नाश करण्यात आला असे जे वचनात म्हटले आहे ते त्या काळातील सर्व दुष्ट व हिंसक समाजाला सूचित करते. तसेच, त्या वेळी ‘आकाशाचा’ नाश झाला असे जे म्हटले आहे ते त्या लोकांवर राज्य करणाऱ्यांना सूचित करते. (उत्पत्ति ६:११) त्याच अर्थाने, २ पेत्र ३:७ भाकीत करते की लवकरच दुष्ट मानवसमाजाचा आणि त्याच्या भ्रष्ट राज्यकर्त्यांचा जणू अग्नीने कायमचा नाश केला जाईल.
जगाचा अंत होईल तेव्हा नेमके काय घडेल?
बायबलचे उत्तर: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.
“जग” नाहीसे होईल असे जे म्हटले आहे ते पृथ्वीसंबंधी नव्हे, तर देवाच्या इच्छेविरुद्ध वागणाऱ्या जगातील लोकांसंबंधी म्हटले आहे. ज्याप्रमाणे एक डॉक्टर, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या शरीरातील कॅन्सरची गाठ काढून टाकतो त्याचप्रमाणे देवसुद्धा, चांगल्या लोकांना पृथ्वीवर आनंदाने जीवन जगता यावे म्हणून पृथ्वीवरून दुष्ट लोकांचा “उच्छेद” करेल अर्थात त्यांना काढून टाकेल. (स्तोत्र ३७:९) त्याअर्थी, ‘जगाचा अंत’ ही एक चांगली घटना आहे.
जगाच्या अंताविषयीचा हाच सकारात्मक दृष्टिकोन बायबलच्या काही भाषांतरांमधून सूचित होतो. त्यांत, ‘जगाचा अंत’ या वाक्यांशाचे भाषांतर काळाची समाप्ती किंवा युगाची समाप्ती असे करण्यात आले आहे. (मत्तय २४:३, पं.र.भा.) जगाच्या अंतातून चांगले लोक आणि पृथ्वी या दोन्हींचा बचाव होणार आहे त्यावरून एका नव्या युगाची, एका नव्या काळाची सुरुवात होईल असे मानणे तर्कशुद्ध नाही का? नक्कीच आहे; कारण बायबल येणाऱ्या युगाविषयी बोलते.—लूक १८:३०.
भविष्यात येणाऱ्या त्या काळात “सर्व गोष्टींचे नूतनीकरण होईल” असे येशूने म्हटले. त्या वेळी, देवाच्या मूळ उद्देशानुसार येशू सर्व मानवजातीला परिपूर्ण स्थितीत आणेल. (मत्तय १९:२८, सुबोध भाषांतर) त्या वेळी आपण पुढील गोष्टींचा आनंद घेऊ:
आपण “देवाच्या इच्छेप्रमाणे” केले म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार आपण वागलो तर जगाच्या अंताविषयी आपल्याला मुळीच भीती वाटणार नाही. उलट, आपण आशेने त्याची वाट पाहू.
जगाचा अंत खरोखरच जवळ आहे का?
बायबलचे उत्तर: “ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.”—लूक २१:३१.
द लास्ट डेज आर हियर अगेन या पुस्तकात प्राध्यापक रिचर्ड काइल यांनी लिहिले की “एकाएकी होणाऱ्या आमूलाग्र बदलांमुळे आणि सामाजिक गोंधळामुळे जगाच्या अंताविषयीच्या भाकितांना ऊत आला आहे.” आणि हे बदल व गोंधळ का होत आहे याचे नेमके कारण माहीत नसते तेव्हा खासकरून असे होते.
पण, बायबलमधील भविष्यवक्त्यांनी जगाच्या अंताविषयी जे लिहिले ते त्यांच्या काळातील चक्रावून टाकणाऱ्या घटनांविषयी नव्हते. उलट, लवकरच जगाचा अंत होणार आहे हे सूचित करणाऱ्या घटनांचे वर्णन करण्यासाठी देवाने त्यांना प्रेरित केले होते. त्यांपैकी काही भविष्यवाण्या विचारात घ्या आणि त्या आपल्या काळात पूर्ण होत आहेत किंवा नाहीत याचे स्वतःच परीक्षण करा.
येशूने म्हटले त्यानुसार, “ह्या सर्व गोष्टी” आपण पाहू तेव्हा जगाचा अंत जवळ आला आहे असे आपण समजू. (मत्तय २४:३३) हा पुरावा अगदी खातरीलायक आहे असा यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास आहे, आणि याविषयी ते २३६ देशांत लोकांना सांगतात.
जगाच्या अंताविषयीच्या अपेक्षा चुकीच्या ठरल्या याचा अर्थ अंत येणारच नाही असा होतो का?
बायबलचे उत्तर: “शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर ५:३.
बायबलमध्ये जगाच्या विनाशाची तुलना प्रसूतीच्या वेदनांशी करण्यात आली आहे. एका गरोदर स्त्रीला प्रसूतीच्या वेदना होतातच आणि त्या एकाएकी सुरू होतात. जगाच्या अंताआधीचा काळसुद्धा गरोदरपणाच्या काळासारखा आहे; कारण गरोदरपणाच्या काळातील वाढती लक्षणे त्या स्त्रीला जाणवतात. बाळंतपण केव्हा होईल याची अंदाजे तारीख डॉक्टर तिला देतो. त्याच तारखेला बाळंतपण झाले नाही, बाळंतपणाला उशीर झाला तरी बाळाचा जन्म नक्कीच होईल याची तिला खातरी असते. त्याचप्रमाणे, जगाच्या अंताविषयीच्या अपेक्षा चुकीच्या ठरल्या असल्या तरी शेवटल्या काळाचे वर्णन करणारी लक्षणे चुकीची ठरू शकत नाहीत.—२ तीमथ्य ३:१.
पण तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, की ‘अंत जवळ आला आहे हे सूचित करणारी लक्षणे इतकी स्पष्ट व धडधडीत असताना अनेक जण ती मान्य का करत नाहीत?’ अंत जवळ येईल तेव्हा अनेक जण त्याच्या पुराव्यांकडे डोळेझाक करतील, असे बायबल सांगते. शेवटल्या काळात होणारे मोठमोठे बदल मान्य करण्याऐवजी ते थट्टा करतील आणि म्हणतील: “वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:३, ४) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, शेवटल्या काळाची चिन्हे अगदी स्पष्ट आहेत, पण अनेक जण त्यांकडे दुर्लक्ष करतील.—मत्तय २४:३८, ३९.
जगाचा अंत जवळ आहे याचे बायबलमधील केवळ काही पुरावे आपण विचारात घेतले आहेत.a तुम्हाला आणखी पुरावे जाणून घ्यायचे आहेत का? असल्यास, मोफत गृह बायबल अभ्यासासाठी यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा. हा अभ्यास तुमच्या घरी, तुम्हाला सोयीस्कर असलेल्या ठिकाणी किंवा मग फोनवरूनसुद्धा केला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा वेळ खर्च करावा लागेल. पण, त्या बदल्यात तुम्हाला जे फायदे मिळतील त्यांची किंमत तुम्ही पैशात करू शकत नाही. ▪ (w१३-E ०१/०१)
a अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील “आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?” असे शीर्षक असलेला अध्याय ९ पाहा.