शेवट जवळ येत आहे तोच यहोवाचे ऐकणे
“जो . . . माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते.”—नीतीसूत्रे ८:३४, ३५.
१, २. (अ) सबंध मानवी इतिहासात शांतीची उणीव भासत राहिली आहे तरी आता काहींचे म्हणणे काय आहे? (ब) मानवी प्रयत्नांद्वारे खरी शांती प्राप्त होणे असंभवनीय का आहे?
सबंध इतिहासात व विशेषेरित्या या २०व्या शतकात शांतीची उणीव राहिली असली तरी काही म्हणतात की राष्ट्रे आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक अशी पावले घेत आहेत. ते हे दर्शवितात की जगातील नेते शांतीविषयी बोलणी करण्यासाठी शिखर परिषदा घेत आहेत व विविध तहावर स्वाक्षऱ्या करीत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा मागील वर्ष “आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष” घोषित केले नव्हते का? त्याद्वारे ही आशा धरली गेली की शांती वाढविण्यासाठी राष्ट्रे अधिक परिश्रम घेऊ लागतील व त्यामुळे नजीकच्या भवितव्यात त्याच्या यशाचे परिणाम दिसू लागतील.
२ तथापि, सबंध इतिहासात अशाच स्वरूपाचे जे प्रयत्न झाले त्यामुळे चिरकाल शांती लाभली का? हे मानवी बळाकरवी साध्य होण्याजोगे असते तर शांती ही केव्हाची—५ अब्ज लोकांचे विविध अशा १६० राष्ट्रात विविध राजकीय, अर्थ आणि धार्मिक तत्वज्ञान याजमध्ये विभाजन होण्याच्या आधी आली असती. तथापि, अशी शांती प्रस्थापित झाली नाही व ती जगातील नेत्यांच्या प्रयत्नांकरवी येऊ शकणार नाही. का बरे? एक कारण हे की, मानवजातीच्या समस्या आता इतक्या गंभीर बनल्या आहेत की त्या एकट्या मानवी प्रयत्नाद्वारे सोडविता येऊच शकत नाही. यिर्मया १०:२३ खरेपणाने म्हणते त्याप्रमाणे “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”
मानवी प्रयत्न यशस्वी का होऊ शकत नाही
३. मनुष्ये व राष्ट्रे आणखी कोणत्या कारणास्तव खरी शांती आणू शकणार नाही?
३ मनुष्ये व राष्ट्र यांच्या प्रयत्नांना खरी शांती आणण्याचे का यश येऊ शकत नाही त्याचे आणखी एक कारण आहे. पवित्र शास्त्र त्याविषयीचा १ योहान ५:१९ मध्ये निर्देश करून म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे.” प्रकटीकरण १२:९ स्पष्ट करते की तो “दुष्ट” “सर्व जगाला ठकविणारा दियाबल सैतान” आहे. करिंथकरास दुसरे पत्र ४:४ त्याला “या व्यवस्थीकरणाचा देव” संबोधिते. या कारणास्तव ज्यामुळे आज इतका हिंसाचार उद्भवला गेला ते सध्याचे राजकारणी, अर्थव्यवस्था व धर्मराजवट यांचे व्यवस्थीकरण हे देवाच्या नव्हे तर सैतानाच्या अधिपत्याचा परिणाम आहे. देवाकडून येणाऱ्या सूज्ञानविषयी १ करिंथकर २:८ अगदी उचितरित्या म्हणते: “ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नाही.”—लूक ४:५, ६.
४. आमच्या पहिल्या पालकांनी यहोवा देवाचे ऐकण्याचे सोडून दिल्यामुळे काय परिणाम घडला?
४ सैतानाने देवाविरूद्ध बंडखोरपणा आचरला तेव्हा त्याने आमच्या पहिल्या पालकांनी देवाचे ऐकू नये म्हणून त्यांचा कान फिरवून आपणाकडे घेतला. याचा परिणाम हा झाला की ते देवाला आज्ञांकित राहायला मुकले व त्यांनी मानवी कुटुंबावर सुमारे ६,००० वर्षांची अवकळा आणली. पवित्र शास्त्र अगदी स्पष्टरित्या सांगते की निर्माणकर्त्याचे न ऐकण्यामुळे आपले भलेच होऊ शकेल असे मानण्यास सैतानाने मानवाला उद्युक्त केले. (उत्पत्ती ३:१–५) त्यामुळे यहोवाने आपल्या सूज्ञानामुळे मानवजातीच्या सर्वसाधारण जगाला त्याच्या मार्गदर्शनाविना आजतागायत स्वतःच्या मार्गाने भटकू दिले. याचा परिणाम या सर्व शतकात अगदी स्पष्टरित्या दिसला की मानवाची राजवट अपयशी ठरली आहे.—अनुवाद ३२:५, उपदेशक ८:९.
५. मानवी प्रयत्नांनी शांती आणता आली तरी आम्हापाशी कोणत्या गोष्टी अद्याप असतील?
५ यापेक्षा अधिक म्हणजे आदाम व हव्वा यांनी परिपूर्ण जीवनाचा उगम यहोवा याचे एकण्याचे सोडून दिले त्यावेळी ते अपूर्ण बनले व ओघाओघाने मरण पावले. त्यामुळे त्यांचे सर्व वंशजसुद्धा अपूर्ण असेच जन्मले. आजार, वार्धक्य व मरण ही मानवजातीच्या वाट्यास आली. (रोमकर ५:१२) या कारणास्तव, माणसाला शांती ही जरी आणता आलीच तरी त्याला अनुवंशिक अपूर्णतेपासून स्वतःला बरे करता येणार नाही. आमचे आजारी पडणे, वृद्ध होणे व मरणे होतच राहील. या गोष्टींना सैतान जबाबदार होता त्यामुळे येशूने त्याच्याबद्दल म्हटले: “तो प्रारंभापासून मनुष्यघातक [खुनी] होता आणि तो सत्यात टिकला नाही.” (योहान ८:४४) खरेच, तुम्ही थोडासा विचार केला की गतकाळात जितके अब्ज लोक जन्मले व वारले तेव्हा हे कळेल की या सर्वांना जणू सैतानाने ठार केले आहे.
६. शांतीचा भंग करणारे कोण आहेत व त्यांचे काय झालेच पाहिजे?
६ सैतानाने आणखी काही आत्मिक प्राण्यांना त्याच्या बंडखोरपणात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. या सर्व दुष्टांनी यहोवा बोलला त्या वेळी त्याचे ऐकण्याचे साफ नाकारले. तद्वत, दियाबल सैतान, त्याचे दुरात्मे व बंडखोर मानव यांनीच या जगाची सद्य परिस्थिती घडवली आहे. या सर्वांनाच त्यांच्या मार्गतून दूर करण्यास हवे आणि देवापासून स्वतंत्र होऊन स्वानुभवाचा प्रयोग करून निर्मिलेला ६,००० वर्षांच्या वैतागाचा इतिहासही संपुष्टात आणला पाहिजे. “शांतीदाता देव,” रोमकरांस पत्र १६:२० हमी देते, “सैतानाला . . . लवकरच,” देव बोलतो त्यावेळी त्याचे न ऐकणाऱ्या सर्व दुरात्मे व मानव यासहित “तुडवील.”—मत्तय २५:४१.
ऐकून घेण्याची सध्याची मोठी गरज
७. यहोवाची सेवा करण्यासाठी आम्ही उत्कट इच्छा का धरली पाहिजे?
७ आम्ही सध्या “शेवटल्या काळा”च्या शेवटासमीप येऊन पोहचलो आहोत. (२ तिमथ्यी ३:१–५) त्यामुळेच यहोवा जे काही म्हणत आहे ते ऐकण्याची मोठी गरज आहे. यासोबत त्याची सेवा करण्यासाठी आवश्यक असणारे स्वार्थत्याग करण्याची सुद्धा उत्कट इच्छा वाढविण्याची गरज आहे. ही उत्कट इच्छा का? कारण “आपला काळ थोडा आहे” हे सैतानाला चांगले ठाऊक आहे. (प्रकटीकरण १२:१२) त्यामुळेच आम्हाला भ्रष्ट करून आमचा नाश करावा यासाठी तोहि उत्कटपणे प्रयत्न करणार हे निश्चित आहे.
८. (अ) प्रचाराचे कार्य त्याच्या शत्रूंना का थांबविता येऊ शकणार नाही? (ब) इश्वरी पाठबळ राखून ठेवण्यासाठी आम्ही काय केलेच पाहिजे?
८ राज्याच्या सुवार्तेचा प्रचार यहोवाच्या साक्षीदारांनी थांबवावा हे सैतानाला नक्कीच आवडेल. पण त्याला ते जमणार नाही. कारण यहोवाने आपल्या लोकांना हे अभिवचन दिले आहे: “तुझ्यावर चालविण्याकरता घडलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.” (यशया ५४:१७) त्याच्या सेवकांना विरोध करणारे सर्व “देवासोबत झगडणारे” ठरतील. (प्रे. कृत्ये ५:३८, ३९) या कारणास्तव यहोवाचा आत्मा, ख्रिस्त येशू व अगणित दूतसैन्य यांचा शक्तीशाली पाठिंबा यामुळे राज्याच्या घोषणेचे कार्य दरवर्षी अधिक प्रखर होत आहे. हे इश्वरी पाठबळ राखून ठेवण्यासाठी यहोवाचे सेवक याकोबाचे पत्र ४:७, ८ मधील सल्ला काळजीपूर्वक मानतात की, “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”
९. आम्ही सैतानाला कमी प्रतीचे का लेखू नये?
९ फसवणूक व इजा करण्याच्या बाबतीत सैतानाला कमी प्रतीचे समजू नका. देवाचे वचन इशारा देते: “सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. त्याच्या विरूद्ध विश्वासात दृढ़ असे उभे राहा.” (१ पेत्र ५:८, ९) तुमच्या परिसरात कोणी वेडा सिंह मोकाट सुटला आहे हे तुम्हाला कळाले तर स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे याकरता आवश्यक उपाययोजना तुम्ही करणार नाही का? तसेच सैतानाच्या बाबतीत पाहता, आम्ही अधिक दक्षता घेतली पाहिजे कारण तो आमची चिरकालिक हानि करू शकतो. आज बहुतेक लोक संरक्षणविना आहेत कारण सैतान अस्तित्वात आहे हे त्यांना माहीत सुद्धा नाही. ते का बरे? कारण ते यहोवाचे वचन ऐकण्याकडे आपला कान देत नाहीत. अशा या वाईट निवडीमुळे कोणता परिणाम लाभेल? “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.
“शांती आहे, निर्भय आहे! अशी ते ओरड करतात तेव्हा
१०, ११. (अ) शांती आणण्यात राष्ट्रांना जे यश मिळणार त्याबद्दल आम्ही काय लक्षात ठेवावे? (ब) आमच्या काळी राष्ट्रे शांतीचा जो शोध घेतील त्याबद्दल कोणता पवित्र शास्त्रीय भविष्यवाद लागू होणारा आहे? (क) अशा प्रकारातील शांती ही किती टिकाऊ असेल?
१० शांती आणण्यात राष्ट्रांना जे काही यश मिळेल त्याविषयी स्वतःला शिथिल बनवू नका. शांतीप्रीत्यर्थ यहोवा या जगाचे कोणतेही माध्यम वापरीत नाही हे सदा ध्यानात असू द्या. खरी शांती आणण्याचा यहोवाचा स्वतःचा मार्ग आहे व तो म्हणजे ख्रिस्त वर्चस्वाखाली असणारे त्याचे राज्य होय. तद्वत, शांती प्रस्थापित करण्यामध्ये राष्ट्रांना जे यश मिळणार ते नुसते अल्प व भ्रामक असेल. खरा असा कोणताच बदल दिसणार नाही. गुन्हे, हिंसाचार, युद्ध, दारिद्य्र, कुटुंबाची वाताहत, अनैतिकता, आजार, मरण आणि सैतान व त्याचे दुरात्मे या गोष्टी, यहोवा त्यांचा संपूर्ण नायनाट करीत नाही तोपर्यंत आम्हाबरोबर असतील. “यहोवा घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत.”—स्तोत्रसंहिता १२७:१.
११ पवित्र शास्त्र स्पष्ट दाखविते की राष्ट्राचे आमच्याकाळी शांतीसंबंधीचे मसलतीपूर्वक प्रयत्न करतील. ते म्हणते: “तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो तसा यहोवाचा दिवस येतो. ‘शांती आहे, निर्भय आहे’ असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत.” (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३) “शांती आहे, निर्भय आहे!” अशा ओरडीचा अर्थ जगाचा होत असलेला ऱ्हास उलटला आहे असा होणार नाही. दुसरे तिमथ्यी ३:१३ म्हणते की, “दुष्ट व भोंदू माणसे ही . . . दुष्टपणात अधिक सरसावतील.” वस्तुस्थिति ही, एका पर्यावरण संघटनेच्या प्रमुखाने जे म्हटले तशीच असणार की, “समाजास भेडसावणारी केंद्रिय समस्या ही आहे की तिजवर आता ताबा राहिलेला नाही.”
१२. ‘शांती व निर्भयते’ विषयीच्या भावी ओरडीसंबंधीच्या अर्थसूचकतेबद्दल यहोवाचे सेवक काय जाणून आहेत?
१२ “शांती आहे, निर्भय आहे!” या भावी ओरडीतील व्यर्थ आशेकरवी जगातील पुष्कळ जण स्वतःची बुद्धीपुरस्सर फसवणूक करून घेतील. पण यहोवाचे सेवक फसणार नाही, कारण देव बोलतो तेव्हा ते त्याचे ऐकून घेतात. त्यांना त्याच्या वचनाकरवी कळाले आहे की, अशी ही घोषणा खरी शांती व निर्भयता आणणार नाही. उलटपक्षी हे प्रत्यक्षात त्यांच्यावर ‘अकस्मात नाश येत आहे’ याचा अंतिम संकेत असणार. तो, येशूने भाकित केलेल्या व आमच्याकाळी येणाऱ्या ‘मोठ्या संकटा’ची सुरुवात होण्याचा वेध दर्शविणार. येशूने या संकटाबद्दल म्हटले होते. “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्याकाळी येईल.”—मत्तय २४:२१.
१३. मानवी राजवटीच्या अंताविषयी पवित्र शास्त्र कोणते वर्णन देते?
१३ “मोठ्या संकटा”त मानवी राजवट संपुष्टात आणली जाईल. स्तोत्रसंहिता २:२–६ म्हणते: “यहोवाविरूद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरूद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, ‘चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ.’ स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे. यहोवा त्यांचा उपहास करीत आहे. यावेळी तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करील. तो म्हणेल: ‘मी आपल्या पवित्र [स्वर्गीय] सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.’” स्तोत्रसंहिता ११०:५, ६ पुढे म्हणते: “यहोवा आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बीमोड करील. तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील.” सर्व राजकारणी योजनांचा अंत होईल. कारण यशया ८:९, १० घोषित करते: ‘तुम्ही आपली कमर बांधा, पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा, पण ती निष्फळ होईल. विचार प्रगट करा पण तो टिकणार नाही. कारण आमच्या सान्निध देव आहे!”
बचाव होण्याचा आत्मविश्वास
१४. या जगाच्या अंतामधून बचावणारे कोणी असतील याचा आम्हाला का आत्मविश्वास आहे?
१४ आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की यहोवा आपल्या लोकांना योग्य ती माहिती कळवीत राहील की ज्याद्वारे त्यांना येणाऱ्या “मोठ्या संकटातून” बचाव मिळविण्यासाठी योग्य ती पावले उचलता येतील. याबद्दलची इतकी खात्री आम्हाला कशी आहे? कारण प्रकटीकरण ७:९, १४ मधील भविष्यवाद दाखवितो की एक “मोठा लोकसमुदाय” खरेपणाने वाचेल. ते का? कारण यहोवा बोलतो त्यावेळी नीट ऐकून घेतल्यामुळे व स्वतःला योग्य ते शिक्षण दिल्यामुळे. याकारणामुळे “मोठा लोकसमुदाय” याच्या सदस्यांना प्रकटीकरण ७:१५ जे म्हणते ते करता येते: “ते अहोरात्र त्याला . . . पवित्र सेवा सादर करीत आहेत.” या प्रकारे ते देवाची इच्छा करीत राहतात, त्याची मर्जी मिळवतात आणि जगाच्या नाशातून बचाव होण्यासाठी संरक्षणामध्ये येतात.—१ योहान २:१५–१७.
१५. या व्यवस्थीकरणाला तुडवून टाकण्याचे वर्णन योएल कसे करतो व याचा देवाच्या सेवकांस्तव कोणता परिणाम होईल?
१५ योएल ३:१३–१६ हे सुद्धा सध्याचे व्यवस्थीकरण द्राक्षकुंडात द्राक्षे तुडविली जातात त्याप्रमाणे तुडविले जाईल तेव्हा त्यामधून देवाच्या सेवकांचा बचाव होईल हे सूचित करते: “विळा चालवा, पीक तयार आहे . . . कुंडे भरून वाहात आहेत, कारण लोकांची दुष्टाई फार आहे. लोकांच्या झुंडी निर्णयाच्या खोऱ्यात आहेत. कारण निर्णयाच्या खोऱ्यात यहोवाचा दिवस येऊन ठेपला आहे. सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशावयाचे थांबतात. यहोवा [स्वर्गीय] सियोनेतून गर्जना करतो . . . आकाश व पृथ्वी थरथर कापत आहे; तरी यहोवा आपल्या लोकांचा आश्रय आहे.”
१६. यहोवा आपल्या लोकांना जगाच्या नाशातून वाचवील हे आणखी कोणत्या भविष्यवादात दाखविले आहे?
१६ याचप्रमाणे यशया २६:२०, २१ मध्ये यहोवा त्या येणाऱ्या वेळेबद्दल म्हणतो. “चला माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या. क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. कारण पाहा, यहोवा पृथ्वीवरील रहिवाश्यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे.” या कारणास्तव सफन्या २:२, ३ आर्जविते: “यहोवाचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. पृथ्वीवरील सर्व नम्र जनांनो, यहोवाच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय करा. धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.”
यहोवाकडे ‘धावणे’
१७. (अ) यहोवाच्या संरक्षण प्राप्तीसाठी काय केलेच पाहिजे? (ब) जलप्रलयापूर्वीच्या जगतातील लोकांनी कोणती चूक केली?
१७ नीतीसूत्रे १८:१० म्हणते: “यहोवाचे नाम बळकट दुर्ग आहे. त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” तुम्ही यहोवाकडे “धावत” जाता का? येशूने नोहाच्या काळातील लोकांबद्दल जे म्हटले ते ध्यानात घ्या. ते “नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत . . . खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी कोणीच लक्ष दिले नाही.” (मत्तय २४:३८, ३९) त्या काळी देव, “धार्मिकतेचा उपदेशक” नोहा या आपल्या सेवकाद्वारे बोलला तेव्हा लोकांनी लक्ष न देता ते आपापल्याच कामात दंग राहिले ही त्यांनी चुकीची गोष्ट केली. (२ पेत्र २:५) त्यांनी न ऐकल्यामुळेच जलप्रलय आला तेव्हा त्याने “सर्वांस वाहवून” नाशात लोटले.
१८. ज्यांचा जलप्रलयात नाश झाला ते वस्तुतः “चांगले” लोक असले तरी ते का वाचू शकले नाहीत?
१८ जलप्रलयात जे मृत्यु पावले त्यापैकी कित्येक जण स्वतःला “चांगले” लोक असल्याचे समजून होते यात काही शंका नव्हती. कदाचित त्यांनी त्या काळी समाजात जो हिंसाचार होत होता त्यात भाग घेतला नसावा. तरीपण त्यांचे “चांगले” असणे त्यांना वाचवू शकले नाही. आपल्या उदासीन वृत्तीमुळे त्यांनी त्यांच्या काळातील दुष्टाईकडे दुर्लक्ष करून सूट दिली होती. ते यहोवाकडे ‘धावले’ नाही. देवाचा सेवक बोलत होता तेव्हा त्याचे त्यांनी ऐकले नाही ही मोठी खडतर गोष्ट होती. याकारणामुळे ते बचावासाठी योग्य पावले उचलू शकले नाही. उलटपक्षी, ज्यांनी तसे केले ते बचावले.
१९. यहोवाचे सेवक आताही कोणत्या अद्र्भित फायद्यांची कापणी करीत आहेत व का?
१९ आज जे लोक देवाचे ऐकून घेतात अशांना तो शांतीचे बोलणे करतो. याचा त्यांना कोणता परिणाम मिळणार? यशया ५४:१३ म्हणते: “तुझी सर्व मुले यहोवापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” होय. “यहोवा आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल.” (स्तोत्रसंहिता २९:११) तद्वत, या हिंसाचारी जगामध्ये यहोवाचे साक्षीदार आपणात खऱ्या, अतूट शांतीचा अनुभव घेत आहेत. त्यांना प्रेमळ असे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे बंधुत्व आहे ज्याची नक्कल जगातील नेते, त्यांची रा आणि त्यांच्या धर्मांना करता येणार नाही. का बरे? कारण हे सर्व देव बोलतो तेव्हा त्याचे खरेपणाने ऐकून घेत नाहीत. त्यामुळेच तो म्हणतो तशी कृति हे आचरीत नाहीत. पण यहोवाचे साक्षीदार देवाचे ऐकतात. ते उपदेशक १२:१३चे शब्द गांभिर्याने घेतात: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”
२०. देवाच्या नव्या जगात बचावून जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काय करण्यास हवे?
२० हेच त्या प्रत्येक व्यक्तीने व ज्यांना देवाच्या नव्या जगात जगण्याची इच्छा आहे त्यांनी केले पाहिजे. विलंब न लावता त्यांनी यहोवाकडे “धावत” आले पाहिजे. त्यांनी देव–प्रणीत सूज्ञान या शब्दात जो पुकारा करीत आहे त्याकरवी स्वतःला मार्गदर्शित केले पाहिजे: “तर आता . . . माझे ऐका. जे माझ्या मार्गानी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. जो . . . माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते.”—नीतिसूत्रे ८:३२–३५.
तुमचा प्रतिसाद कोणता आहे?
◻ शांती आणण्यात मानवी प्रयत्न कधीच का यशस्वी होऊ शकणार नाहीत?
◻ यहोवाचे ऐकून घेण्याची सध्या मोठी गरज का आहे?
◻ “शांती आहे, निर्भय आहे!” या आगामी ओरडीचा खरा अर्थ कोणता असेल?
◻ देवाच्या नव्या व्यवस्थेत बचावून जाण्याची आमची इच्छा आहे तर आम्ही काय केलेच पाहिजे?
[१७ पानांवरील चित्रं]
गजणाऱ्या सिंहाप्रमाणे सैतान आपले प्रयत्न लोकांना भ्रष्ट करण्यासाठी व नष्ट करण्यासाठी प्रखर करतो
[१८ पानांवरील चित्रं]
द्राक्षे द्राक्षकुंडात तुडवितात त्याप्रमाणे हे व्यवस्थीकरण तुडविले जाईल तेव्हा “यहोवा आपल्या लोकांचा आश्रय” असेल