वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 १/१ पृ. ८-१७
  • आता विशेषतः, जागृत राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आता विशेषतः, जागृत राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत
  • प्रेषितांच्या समयोचित सूचना
  • लाखोजण जागृत राहात आहेत
  • लोटाच्या उदाहरणावरून धडा
  • पाँपेई जेथे समय गतिहीन झाला
    सावध राहा!—१९९६
  • “जागृत राहा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करीत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • जागृत राहणारे ते धन्य!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 १/१ पृ. ८-१७

आता विशेषतः, जागृत राहा!

“आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.”—१ थेस्सलनीकाकर ५:६.

१, २. (अ) पाँम्पेई आणि हर्क्युलेनियम कशाप्रकारची शहरे होती? (ब) पाँम्पेई व हर्क्युलेनियम शहराच्या बऱ्‍याच रहिवाशांनी कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले आणि याचा काय परिणाम झाला?

सामान्य युगातील पहिल्या शतकात, पाँम्पेई आणि हर्क्युलेनियम ही व्हेसुव्हिअस पर्वताच्या पायथ्याशी वसलेली दोन वैभवी शहरे होती. श्रीमंत रोमी लोकांकरता ही शहरे करमणुकीची केंद्रे होती. त्यांची नाट्यमंदिरे एक हजारपेक्षा जास्त लोक बसू शकतील इतकी मोठी होती आणि पाँम्पेई शहरात तर सर्व रहिवासी बसू शकतील इतके प्रचंड प्रेक्षकस्थान होते. पाँम्पेई शहराचे उत्खनन करणाऱ्‍या संशोधकांनुसार तेथे ११८ पथिकाश्रमे होती ज्यांत जुगार व वेश्‍याव्यवसाय सर्रास चालत असे. भित्तीचित्रांवरून व इतर अवशेषांवरूनही स्पष्ट होते की त्या समाजात अनैतिकता आणि चंगळवाद बोकाळला होता.

२ सा.यु. ७९ सालच्या ऑगस्ट २४ रोजी व्हेसुव्हिअस पर्वताचा उद्रेक होऊ लागला. ज्वालामुखींचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सांगतात की पहिला उद्रेक झाला तेव्हा या दोन शहरांवर लाव्हारसाचा आणि राखेचा वर्षाव झाला पण यानंतर शहरातील रहिवाशांना पळून जाण्याकरता कदाचित संधी मिळाली असावी. किंबहुना, बऱ्‍याच जणांनी असे केलेही. पण ज्यांना धोक्याची गंभीरता लक्षात आली नाही किंवा ज्यांनी धोका सूचित करणाऱ्‍या लक्षणांकडे दुर्लक्ष केले ते तेथेच राहिले. मग मध्यरात्रीच्या सुमारास अतितप्त वायू, लाव्हारस आणि खडकांचा एकाएक प्रचंड लोट हर्क्युलेनियम शहरात वाहात आला आणि शहरात राहिलेल्या लोकांचा त्यात गुदमरून अंत झाला. दुसऱ्‍या दिवशी पहाटे, पाँम्पेई शहरातही तोच प्रकार घडला आणि त्या शहरात देखील सर्व रहिवाशांचा अंत झाला. धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे किती दुःखदायक परिणाम!

यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत

३. पाँम्पेई व हर्क्युलेनियम शहरांच्या व जेरूसलेम शहराच्या नाशात कोणते साम्य आहे?

३ पाँम्पेई व हर्क्युलेनियम शहरांच्या धक्कादायक अंतापेक्षाही कितीतरी पटीने भयंकर असा नाश नऊ वर्षांआधी जेरूसलेम शहराचा झाला होता; अर्थात ही विपत्ती मानवनिर्मित होती. दहा लाखांहून अधिक यहुद्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विपत्तीचे, “इतिहासातील सर्वात भयंकर सैन्यवेढा” या शब्दांत वर्णन करण्यात आले आहे. पण पाँम्पेई व हर्क्युलेनियम शहरांच्या विपत्तीप्रमाणेच जेरूसलेमचा नाशही धोक्याच्या सूचनेशिवाय घडला नाही.

४. एका व्यवस्थीकरणाचा अंत जवळ आल्याचे सूचित करणारे कोणते भविष्यसूचक चिन्ह येशूने आपल्या अनुयायांना दिले आणि याची पहिल्या शतकात कशाप्रकारे पहिली पूर्णता झाली?

४ येशू ख्रिस्ताने या शहराच्या नाशाविषयी भाकीत केले होते. तसेच हा नाश होण्याआधी कोणत्या घटना घडतील याविषयीही त्याने भाकीत केले होते, उदाहरणार्थ, लढाया, दुष्काळ, भूकंप आणि अनाचार वाढेल असे त्याने सांगितले होते. तसेच खोटे संदेष्टे पुढे येतील पण देवाच्या राज्याची सुवार्ता सबंध जगात गाजवली जाईल हे देखील त्याने भाकीत केले होते. (मत्तय २४:४-७, ११-१४) येशूच्या शब्दांची मुख्य पूर्णता जरी आजच्या काळात असली तरीसुद्धा, त्याकाळातही काहीशा प्रमाणात त्याच्या शब्दांची पूर्णता झाली होती. ऐतिहासिक अहवालांनुसार यहुदियात एक भयंकर दुष्काळ आला होता. (प्रेषितांची कृत्ये ११:२८) यहुदी इतिहासकार जोसीफसच्या अहवालात जेरूसलेमच्या नाशाच्या केवळ काही काळाआधी त्या भागात एक भूंकप झाल्याचा उल्लेख आहे. जेरूसलेमचा अंत जवळ आला तेव्हा बंड, यहुदी राजकीय गटांत लढाया आणि यहुदी व गैरयहुदी लोक एकत्र राहात असलेल्या शहरांत कत्तली सतत सुरू होत्या. पण राज्याच्या सुवार्तेचा “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” प्रचार केला जात होता.—कलस्सैकर १:२३.

५, ६. (अ) सा.यु. ६६ साली येशूचे कोणते भविष्यसूचक शब्द पूर्ण झाले? (ब) सा.यु. ७० साली जेरूसलेम शहराचा शेवटी पाडाव झाला तेव्हा मरणाऱ्‍या लोकांची संख्या इतकी मोठी का होती?

५ शेवटी, सा.यु. ६६ साली यहुद्यांनी रोमनांविरुद्ध बंड पुकारले. सेनाधीश सेस्टिअस गॅलस याच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने जेरुसलेमला वेढा दिला तेव्हा येशूच्या अनुयायांना त्याच्या शब्दांची आठवण झाली: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२०, २१) जेरूसलेम सोडण्याची वेळ आली होती—पण जायचे कसे? कोणीही अपेक्षा केली नसताना, गॅलसने आपल्या सैन्यासहित माघार घेतली आणि अशारितीने जेरूसलेम व यहूदिया येथे राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना येशूच्या आज्ञेनुसार डोंगरात पळून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.—मत्तय २४:१५, १६.

६ यानंतर चार वर्षांनी वल्हांडण सणाच्या वेळी रोमी सैन्य परतले आणि या वेळी जेनरल टायटस याच्या नेतृत्वाखाली ज्याने यहुद्यांचा विद्रोह चिरडून टाकण्याचा चंगच बांधला होता, त्याच्या सैन्याने जेरुसलेमला वेढले आणि त्याभोवती ‘मेढेकोट उभारले’ ज्यामुळे शहरातून बाहेर पडणे अशक्य झाले. (लूक १९:४३, ४४) युद्धाची भीती असूनही सबंध रोमी साम्राज्यातील असंख्य यहुदी वल्हांडण सण साजरा करण्याकरता जेरूसलेम येथे जमले होते. आता ते शहरात अडकले. जोसीफसच्या अहवालानुसार रोमी सैन्याला बळी पडलेल्या लोकांपैकी बहुतेक हे बाहेरून आलेले यहुदीच होते.a जेरूसलेम शहराचा शेवटी पाडाव झाला तेव्हा रोमी साम्राज्यातील एकूण यहुद्यांपैकी जवळजवळ एक सप्तांश यहुद्यांचा अंत झाला. जेरुसलेम व त्यातील मंदिराच्या नाशाचा असा अर्थ होता की यहुदी राष्ट्र व मोशेच्या नियमशास्त्रावर आधारित असलेली धार्मिक यंत्रणा संपुष्टात आली होती.b—मार्क १३:१, २.

७. विश्‍वासू ख्रिश्‍चन जेरूसलेमच्या नाशातून का बचावले?

७ सा.यु. ७० साली जेरुसलेममधील यहुदी ख्रिश्‍चनांनाही शहरात असलेल्या इतरांसोबत मारले जाण्याची अथवा गुलाम बनवले जाण्याची शक्यता होती. पण ऐतिहासिक पुराव्यानुसार त्यांनी येशूने ३७ वर्षांआधी दिलेल्या धोक्याच्या सूचनेची दखल घेतली होती. ते शहर सोडून गेले व त्यात परतले नाहीत.

प्रेषितांच्या समयोचित सूचना

८. पेत्राने कशाची गरज ओळखली आणि त्याच्या मनात येशूचे कोणते शब्द कदाचित असावेत?

८ आजच्या काळात फार मोठ्या प्रमाणात होणार असलेल्या नाशाची आपण वाट पाहात आहोत ज्यात या सबंध व्यवस्थीकरणाचा नाश केला जाईल. जेरूसलेमच्या नाशाच्या सहा वर्षांपूर्वी प्रेषित पेत्राने तातडीचा व समयोचित असा सल्ला दिला जो खासकरून आपल्या काळातील ख्रिश्‍चनांना लागू होतो. तो सल्ला म्हणजे: सतर्क राहा! ‘प्रभु [येशू ख्रिस्त] ह्‍याने दिलेल्या आज्ञेकडे’ त्यांनी दुर्लक्ष करू नये म्हणून त्यांचे “निर्मळ मन जागृत” करण्याची गरज पेत्राने ओळखली. (२ पेत्र ३:१, २) ख्रिश्‍चनांना सतर्क राहण्याचे उत्तेजन देताना पेत्राच्या मनात कदाचित येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधीच प्रेषितांना उद्देशून काढलेले उद्‌गार असावेत: “सावध असा, जागृत असा कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.”—मार्क १३:३३.

९. (अ) काही जणांत कोणती धोकेदायक मनोवृत्ती विकसित होणार होती? (ब) संशयवादी मनोवृत्ती अतिशय धोकेदायक का आहे?

९ आज काहीजण उपरोधाने विचारतात: “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे?” (२ पेत्र ३:३, ४) या लोकांना असे वाटते की सर्वकाही जसे जगाच्या सुरवातीपासून चालत आले आहे तसेच चालत राहणार, काहीही बदलणार नाही. अशाप्रकारची संशयवादी विचारसरणी धोकेदायक आहे. शंकांमुळे आपली तातडीची जाणीव कमकुवत होते आणि आपण स्वार्थी जीवनशैलीकडे वाहवत जाण्याची शक्यता आहे. (लूक २१:३४) शिवाय, पेत्राने सांगितल्याप्रमाणे अशाप्रकारे थट्टा करणारे नोहाच्या काळात आलेला जलप्रलय विसरतात, ज्यात एका सबंध जागतिक व्यवस्थी-करणाचा नाश झाला होता. तेव्हा जग खरोखरच बदलले होते!—उत्पत्ति ६:१३, १७; २ पेत्र ३:५, ६.

१०. अधीर वृत्ती दाखवणाऱ्‍यांना पेत्र कोणत्या शब्दांत प्रोत्साहन देतो?

१० पेत्र आपल्या वाचकांना धीरोदात्त वृत्ती विकसित करण्यास मदत करण्यासाठी त्यांना याची आठवण करून देतो की बऱ्‍याचदा देव लगेच कारवाई करत नाही. सर्वप्रथम पेत्र म्हणतो: “प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.” (२ पेत्र ३:८) यहोवा अनादिअनंत असल्यामुळे तो सर्व गोष्टी लक्षात घेऊन कार्य करण्याकरता सर्वात उत्तम वेळ निवडू शकतो. त्यानंतर पेत्र याकडे लक्ष वेधतो की सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्‍चात्ताप करावा अशी यहोवाची इच्छा आहे. देवाने लगेच पाऊल उचलले असते तर बऱ्‍याच जणांचा नाश झाला असता, पण देवाने सहनशीलता दाखवल्यामुळे त्यांना तारण प्राप्त झाले आहे. (१ तीमथ्य २:३, ४; २ पेत्र ३:९) पण यहोवा सहनशील आहे याचा अर्थ तो कधीही पाऊल उचलणार नाही असा होत नाही. पेत्र म्हणतो, “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” (तिरपे वळण आमचे.)—२ पेत्र ३:१०.

११. आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल आणि यामुळे यहोवाचा दिवस कशाप्रकारे ‘लवकर’ आल्यासारखे होईल?

११ पेत्राने केलेली तुलना लक्ष देण्याजोगी आहे. चोरांना पकडणे काही सोपे काम नाही, पण सबंध रात्रभर जागृत राहणाऱ्‍या पहारेकऱ्‍याला, अधून मधून डुलक्या घेणाऱ्‍या पहारेकऱ्‍याच्या तुलनेत चोराला पकडणे अधिक सोपे जाण्याची शक्यता आहे. पहारेकरी कशाप्रकारे जागृत राहू शकतो? एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा इकडे तिकडे चालत राहिल्याने एक व्यक्‍ती सतर्क राहू शकते. त्याचप्रकारे ख्रिस्ती या नात्याने, आध्यात्मिकरित्या क्रियाशील राहिल्याने आपल्याला जागृत राहण्यास मदत मिळेल. म्हणूनच पेत्र आपल्याला “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” स्वतःला गुंतवून ठेवण्याचा आग्रह करतो. (२ पेत्र ३:११) अशाप्रकारची क्रियाशीलता आपल्याला ‘देवाचा दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत राहण्यास’ सहायक ठरेल. म्हणूनच पेत्राने आपल्याला “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” व्यस्त राहण्याचा सल्ला दिला. (२ पेत्र ३:१२) अर्थात, आपण यहोवाचे वेळापत्रक बदलू शकत नाही. त्याचा दिवस त्याच्या नियुक्‍त वेळीच येईल. पण आपण त्याच्या सेवेत व्यस्त राहिल्यास तो दिवस येईपर्यंतचा मधला वेळ लवकर निघून जाईल.—१ करिंथकर १५:५८.

१२. आपण व्यक्‍तीशः यहोवाच्या सहनशीलतेचा कशाप्रकारे फायदा घेऊ शकतो?

१२ म्हणून, यहोवाचा दिवस येण्यास उशीर लागत आहे असे ज्या कोणाला वाटत असेल त्याने यहोवाच्या नियुक्‍त वेळेकरता धीरोदात्तपणे थांबून राहण्याच्या पेत्राच्या सल्ल्याचे पालन करावे असे प्रोत्साहन दिले जाते. अर्थात, देवाने सहनशीलतेने जो अतिरिक्‍त वेळ दिला आहे त्याचा आपण सुज्ञतेने सदुपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, आपण अत्यावश्‍यक ख्रिस्ती गुण आत्मसात करण्याचा सातत्याने प्रयत्न करू शकतो, तसेच ज्यांना सुवार्ता सांगणे शक्य झाले नसते अशा कित्येकांना आपण ती सांगू शकतो. आपण जागृत राहिलो, तर या व्यवस्थीकरणाचा अंत येईल तेव्हा आपण यहोवाला “निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले” आढळू. (२ पेत्र ३:१४, १५) हा किती मोठा आशीर्वाद ठरेल!

१३. पौलाने थेस्सलनीकाकर ख्रिश्‍चनांना लिहिलेले कोणते शब्द आज खासकरून समर्पक आहेत?

१३ थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौल देखील जागृत राहण्याच्या गरजेविषयी सांगतो. तो असा सल्ला देतो की, “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:२, ६) आज, सबंध जागतिक व्यवस्थीकरणाचा अंत जवळ आला असताना असे करणे खरोखर किती गरजेचे आहे! यहोवाच्या उपासकांना जगात सर्वत्र आध्यात्मिक गोष्टींविषयी उदासीन मनोवृत्तीला तोंड द्यावे लागते आणि साहजिकच याचा त्यांच्यावरही परिणाम होतो. म्हणूनच पौल असा सल्ला देतो: “आपण सावध असावे, विश्‍वास व प्रीति हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:८) देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास केल्याने आणि सभांमध्ये आपल्या बांधवांसोबत नियमितरित्या सहवास राखल्याने आपल्याला पौलाच्या सल्ल्याचे पालन करण्यास आणि काळाच्या निकडीची जाणीव राखण्यास मदत मिळेल.—मत्तय १६:१-३.

लाखोजण जागृत राहात आहेत

१४. कोणत्या संख्यांवरून दिसून येते की जागृत राहण्याविषयीच्या पेत्राच्या सल्ल्याचे अनेकजण आज पालन करत आहेत?

१४ सतर्क राहण्याच्या देव प्रेरित प्रोत्साहनाला प्रतिसाद देणारे बरेचजण आहेत का? होय. २००२ सेवा वर्षादरम्यान एकूण प्रचारकांची ६३,०४,६४५ इतकी विक्रमी संख्या नोंदली गेली, जी २००१ वर्षाच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक होती. या सर्व प्रचारकांनी इतरांशी देवाच्या राज्याविषयी चर्चा करण्यात १,२०,२३,८१,३०२ तास खर्च करण्याद्वारे आध्यात्मिकरित्या जागृत असल्याचे शाबीत केले. त्यांच्या दृष्टीने हे कार्य म्हणजे केवळ एक औपचारिकता नव्हती. तर हे कार्य त्यांच्या जीवनातले सर्वात महत्त्वाचे होते. त्यांच्यापैकी अनेकांनी दाखवलेल्या मनोवृत्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे एल साल्व्हादोर येथे राहणारे एद्वार्दो आणि नोएमी.

१५. एल साल्व्हादोर येथील कोणत्या अनुभवावरून दिसून येते की बरेचजण आध्यात्मिकरित्या सतर्क राहात आहेत?

१५ काही वर्षांपूर्वी, एद्वार्दो व नोएमी यांनी पौलाच्या पुढील शब्दांकडे लक्ष दिले: “ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथकर ७:३१) त्यांनी आपल्या जीवनातल्या अनावश्‍यक जबाबदाऱ्‍या कमी करून पूर्णवेळेची सेवा सुरू केली. काळाच्या ओघात त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले. त्यांना विभागीय व प्रांतीय देखरेख कार्यातही सहभाग घेण्याची संधी मिळाली. अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा पूर्ण वेळेच्या सेवेकरता आपण भौतिक संपन्‍नतेचा त्याग केला हा योग्यच निर्णय होता याविषयी एद्वार्दो व नोएमी यांना जराही शंका नाही. एल साल्व्हादोर येथील २९,२६९ प्रचारक, ज्यांपैकी २,४५४ पायनियर आहेत, त्यांनीही अशाचप्रकारची आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवली आहे. या देशात मागील वर्षी प्रचारकांच्या संख्येत २ टक्के वाढ झाली यामागचे हे एक कारण म्हणता येईल.

१६. आयव्हरी कोस्टवर राहणाऱ्‍या एका तरुण बांधवाने कोणती मनोवृत्ती दाखवली?

१६ आयव्हरी कोस्ट येथेही एका तरुण ख्रिस्ती बांधवाने अशीच मनोवृत्ती प्रदर्शित केली. त्याने शाखा दफ्तराला असे पत्र लिहिले: “मी एक सेवा सेवक आहे. पण बांधवांसमोर आदर्श न ठेवता मी त्यांना पायनियर सेवा करण्यास सांगू शकत नाही. म्हणून मी माझी चांगल्या पगाराची नोकरी सोडून खासगी काम सुरू केले आहे. यामुळे मला सेवेकरता अधिक वेळ मिळतो.” हा तरुण आयव्हरी कोस्ट येथे असलेल्या ९८३ पायनियरांत सामील झाला. या देशात मागील वर्षी ६,७०१ प्रचारकांनी सेवेचा अहवाल दिला आणि ही संख्या ५ टक्क्यांनी अधिक होती.

१७. बेल्जियम येथील एका तरुण साक्षीदार मुलीने आपण पूर्वग्रहामुळे निराश होणार नाही हे कसे दाखवले?

१७ असहिष्णुता, पूर्वग्रह आणि भेदभाव यांमुळे बेल्जियम येथील २४,९६१ राज्य प्रचारकांना बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीसुद्धा ते आवेशी आहेत आणि परिस्थितीपुढे त्यांनी हात टेकलेले नाहीत. १६ वर्षांच्या एका साक्षीदार मुलीच्या शाळेत एथिक्स विषयाच्या वर्गात यहोवाच्या साक्षीदारांचे एक गुप्त पंथ (कल्ट) म्हणून वर्णन करण्यात आले तेव्हा तिने या संदर्भात दुसरी बाजू मांडण्याची परवानगी मागितली. यहोवाचे साक्षीदार—नावामागील संघटन (इंग्रजी) हा व्हिडिओ आणि यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? या माहितीपत्रकाचा उपयोग करून यहोवाचे साक्षीदार खरोखर कोण आहेत हे तिला आपल्या वर्गाला समजावून सांगता आले. तिने दिलेली माहिती सर्वांना आवडली आणि पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांची एक चाचणी परीक्षा घेण्यात आली ज्यात सर्व प्रश्‍न यहोवाचे साक्षीदार या ख्रिस्ती धर्माच्या संबंधात होते.

१८. अर्जेन्टिना व मोझांबिक येथील प्रचारक आर्थिक समस्यांमुळे यहोवाची सेवा करण्यापासून विचलित झालेले नाहीत हे कशावरून दिसून येते?

१८ बहुतेक ख्रिश्‍चनांना या शेवटल्या काळात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीसुद्धा ते आपले लक्ष विचलित न होऊ देण्याचा प्रयत्न करतात. अर्जेन्टिना येथील आर्थिक समस्या तर सर्वज्ञात आहेत, पण तरीसुद्धा येथे मागील वर्षी १,२६,७०९ साक्षीदारांची विक्रमी संख्या नोंदण्यात आली. मोझांबिकमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात दारिद्र्‌य आहे. असे असूनही ३७,५६३ प्रचारकांनी साक्षकार्याचा अहवाल दिला जो मागील वर्षाच्या तुलनेत ४ टक्के अधिक होता. अल्बेनिया देशातही बहुतेकांचे जीवन कठीण आहे, पण या देशातही १२ टक्क्यांची वाढ आणि प्रचारकांची २,७०८ इतकी विक्रमी संख्या नोंदण्यात आली. यावरून हेच स्पष्ट होते की यहोवाचे सेवक त्याच्या राज्याच्या कार्याला प्राधान्य देतात तेव्हा कठीण परिस्थितीही देवाच्या आत्म्याला कार्य करण्यापासून रोखू शकत नाही.—मत्तय ६:३३.

१९. (अ) अद्यापही बायबलचे ज्ञान घेण्यास आसूसलेले अनेक मेंढरांसमान लोक आहेत हे कशावरून दिसून येते? (ब) वार्षिक अहवालातील आणखी कोणत्या काही गोष्टी दाखवून देतात की यहोवाचे सेवक आध्यात्मिकरित्या जागृत राहात आहेत? (पृष्ठे १२-१५ वरील तक्‍ता पाहा.)

१९ सबंध जगातील मागील वर्षीच्या ५३,०९,२८९ बायबल अभ्यासांचा अहवाल हेच दाखवून देतो की अद्यापही अनेक मेंढरांसमान लोक आहेत जे बायबलमधील सत्याकरता आसूसलेले आहेत. स्मारकदिनाला उपस्थित राहिलेल्या १,५५,९७,७४६ जणांच्या उच्चांकापैकी बहुतेकजण अद्यापही यहोवाचे सक्रिय सेवक बनलेले नाहीत. त्यांनी आपल्या ज्ञानात वाढ करत राहावी आणि यहोवाबद्दल व बांधवांबद्दल सतत आपले प्रेम विकसित करत राहावे हीच आपली प्रार्थना आहे. ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ “मोठा लोकसमुदाय” आपल्या आत्म्याने अभिषिक्‍त बांधवांच्या सोबतीने निर्माणकर्ता यहोवा याच्या ‘मंदिरात अहोरात्र’ त्याची फलदायी सेवा करत आहेत हे पाहून खरोखर किती आनंद होतो.—प्रकटीकरण ७:९, १५; योहान १०:१६.

लोटाच्या उदाहरणावरून धडा

२०. लोट व त्याच्या पत्नीच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

२० अर्थात, देवाचे विश्‍वासू सेवक देखील काही वेळापुरती का होईना पण काळाची निकड विसरू शकतात. अब्राहामचा पुतण्या लोट याच्याविषयी विचार करा. पाहुण्यांच्या रूपात आलेल्या दोन देवदूतांकडून त्याला कळले की देव सदोम व गमोरा या शहरांचा लवकरच नाश करणार आहे. त्या शहरांतील ‘अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेल्या’ लोटासाठी ही बातमी नक्कीच आश्‍चर्याची नव्हती. (२ पेत्र २:७) तरीसुद्धा, दोन देवदूत त्याला सदोममधून बाहेर काढण्याकरता आले तेव्हा तो “दिरंगाई करू लागला.” देवदूतांना त्याला व त्याच्या कुटुंबाला शहराबाहेर नेण्याकरता अक्षरशः त्यांना ओढून बाहेर काढावे लागले. नंतर लोटाच्या पत्नीने मागे वळून न पाहण्याच्या देवदूतांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. तिच्या निष्काळजी वृत्तीमुळे तिला मोठी किंमत चुकवावी लागली. (उत्पत्ति १९:१४-१७, २६) म्हणूनच येशूने ताकीद दिली, “लोटाच्या बायकोची आठवण करा.”—लूक १७:३२.

२१. आज विशेषतः जागृत राहण्याची गरज का आहे?

२१ पाँम्पेई व हर्क्युलेनियम येथील विपत्ती आणि जेरुसलेमच्या नाशाच्या वेळी घडलेल्या घटना, तसेच नोहाच्या काळातील प्रलय व लोटाचे उदाहरण या सर्वांवरून आपल्याला धोक्याच्या सूचनांकडे गंभीरतेने लक्ष देण्याचे महत्त्व कळून येते. यहोवाचे सेवक या नात्याने अंताच्या काळाचे चिन्ह आपण ओळखले आहे. (मत्तय २४:३) खोट्या धर्मापासून आपण स्वतःला विलग केलेले आहे. (प्रकटीकरण १८:४) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आपण ‘देवाचा दिवस लवकर यावा म्हणून खटपट’ केली पाहिजे. (२ पेत्र ३:११) होय, आपण आता विशेषतः जागृत राहण्याची गरज आहे! जागृत राहण्याकरता आपण काय करू शकतो आणि कोणते गुण विकसित करू शकतो? पुढील लेखात याविषयी विचार केला जाईल.

[तळटीपा]

a पहिल्या शतकातील जेरुसलेम शहराची लोकसंख्या जास्तीतजास्त १,२०,००० असावी. युसेबियसच्या हिशोबाप्रमाणे यहूदिया प्रांतातील जवळजवळ ३,००,००० रहिवाशी सा.यु. ७० साली वल्हांडणाकरता जेरूसलेमला आले असावे. बळी पडलेले इतरजण साम्राज्यातील इतर ठिकाणांहून आले असण्याची शक्यता आहे.

b अर्थात, यहोवाच्या दृष्टिकोनातून सा.यु. ३३ सालीच नव्या कराराने मोशेच्या नियमशास्त्राची जागा घेतली होती.—इफिसकर २:१५.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

•कोणत्या घटनेमुळे यहुदी ख्रिश्‍चनांना जेरूसलेमच्या नाशातून बचावणे शक्य झाले?

• प्रेषित पेत्र व पौल यांच्या लिखाणांतील मार्गदर्शनामुळे आपल्याला जागृत राहण्यास कशाप्रकारे मदत मिळते?

• आज कोण लोक पूर्णपणे जागृत असल्याचे दाखवून देत आहेत?

• लोट व त्याच्या पत्नीच्या वृत्तान्तावरून आपण काय शिकू शकतो?

[१२-१५ पानांवरील तक्‍ता]

जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांचा २००२ सेवा वर्षाचा अहवाल

[९ पानांवरील चित्र]

सा.यु. ६६ साली जेरूसलेममधील ख्रिस्ती लोकांनी येशूच्या सूचनांचे पालन केले

[१० पानांवरील चित्र]

क्रियाशील राहिल्यामुळे ख्रिश्‍चनांना जागृत राहण्यास मदत मिळते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा