वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १२/१ पृ. २६-२९
  • तुमच्या चांगल्या गुणालाच अवगुण बनू देऊ नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या चांगल्या गुणालाच अवगुण बनू देऊ नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बौद्धिक क्षमतांचा सुजाणपणे वापर करा
  • ख्रिस्ती तत्त्वांचे पालन करून आपल्या उत्तम गुणांची वृद्धी होऊ द्या
  • विशेषाधिकारांबद्दल संतुलित दृष्टिकोन
  • सद्‌गुणी स्त्रिया—एक आशीर्वाद!
  • प्रभावी व्यक्‍तिमत्त्व नियंत्रणात ठेवणे
  • यहोवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • बढाई मारण्यापासून सावध राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “मनुष्यांतील दाने” यांची कदर बाळगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पिता व वडील—या दोन्ही भूमिका निभावणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १२/१ पृ. २६-२९

तुमच्या चांगल्या गुणालाच अवगुण बनू देऊ नका

सोळा पाणीबंद विभाग आणि सर्व सुखसोयींनी युक्‍त असलेले टायटॅनिक जहाज कधीच बुडणार नाही असे मानले जात होते. १९१२ साली या जहाजाच्या पहिल्याच जलप्रवासात फक्‍त निम्म्या जीवनरक्षक बोटी सोबत घेण्यात आल्या होत्या. आणि नेमक्या याच पहिल्यावहिल्या प्रवासात ते एका हिमनगाला धडकून १,५०० जणांसह सागरात विलीन झाले.

प्राचीन जेरूसलेममध्ये उज्जीया नावाचा देवाला भिऊन वागणारा एक राजा होता. तो उत्तम लढवैय्या होता आणि हजारो सैनिक त्याच्या हातखाली होते. यहोवाच्या मदतीने त्याने एका मागोमाग एक शत्रूवर विजय मिळवला. “[उज्जीयाची] कीर्ति दूरवर पसरली; त्यास इतके विलक्षण साहाय्य मिळाले की, तो महासामर्थ्यवान झाला.” पण तो समर्थ झाला तेव्हा, “त्याचे हृदय उन्मत्त [झाले] . . . आणि आपला देव परमेश्‍वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले.” उज्जीयाच्या अहंकारामुळे त्याच्या अंगावर कोड उठला.—२ इतिहास २६:१५-२१; नीतिसूत्रे १६:१८.

या दोन उदाहरणांवरून आपल्याला हे शिकायला मिळते की, सुबुद्धी, मर्यादशीलता आणि नम्रता हे गुण जोडीला नसतात तेव्हा आपल्या व्यक्‍तिमत्त्वातली जमेची बाजू किंवा चांगला गुण हाच आपला दोष किंवा उणीव बनू शकतो. ही गंभीर व विचार करण्याजोगी गोष्ट आहे; कारण आपल्या प्रत्येकाच्या व्यक्‍तिमत्त्वात एखादा खास गुण असतो. ती आपली जमेची बाजू असते. आणि आपल्या या चांगल्या गुणाचा आपल्यालाच नव्हे तर सर्वांना फायदा व्हावा, खासकरून त्याच्या साहाय्याने आपण आपल्या निर्माणकर्त्याला संतोषवावे असे प्रत्येकाला वाटते. आणि म्हणून, देवाने दिलेल्या चांगल्या गुणांचा आपण पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. पण त्याच वेळी त्यांचा अतिरेक होता कामा नये, म्हणजे ते आपल्याकरता मौल्यवान ठरतील.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती आपल्या कामात खूप रस घेते; हा तिचा चांगला गुण आहे. पण जर ही व्यक्‍ती इतर सर्व गोष्टी विसरून रात्रंदिवस कामच करत राहिली, तर मग तिचा हा चांगला गुणच तिचा अवगुण ठरू शकतो. काहीजण कोणताही निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतात; हा त्यांचा चांगला गुण असतो. यामुळे त्यांना सहजासहजी कोणी फसवू शकत नाही. पण प्रमाणापेक्षा जास्तच विचारपूर्वक असल्यामुळे ते कोणत्याच निर्णयाप्रत पोहंचत नसले तर काय उपयोग? कार्यक्षमतासुद्धा एक उत्तम गुण आहे पण तिचा अतिरेक केला, अर्थात, कोणाचा जीव गेला तरी चालेल पण काम पूर्ण झाले पाहिजे अशी वृत्ती बाळगली तर काम करणाऱ्‍यांना कामात उत्साह, आनंद राहणार नाही. या उदाहरणांप्रमाणे, तुमच्या व्यक्‍तिमत्त्वातही काही खास गुण असतील, त्यांचा जरा विचार करा. त्यांचा तुम्ही योग्य उपयोग करता का? इतरांना त्यांचा फायदा होतो का? मुख्य म्हणजे, “प्रत्येक उत्तम देणगी” देणाऱ्‍या यहोवाचे गौरव करण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर करता का? (याकोब १:१७) आपण दक्ष नसलो, तर आपल्या व्यक्‍तिमत्त्वातली जमेची बाजूच आपली उणीव बनू शकते, आणि फायदा होण्याऐवजी आपल्या या गुणांमुळे नुकसानही होऊ शकते. याची काही उदाहरणे पाहू या.

बौद्धिक क्षमतांचा सुजाणपणे वापर करा

चांगली बुद्धी ही निश्‍चितच एक जमेची बाजू आहे. पण, जर या बुद्धीमुळे कोणाच्या मनात फाजील आत्मविश्‍वास निर्माण होतो किंवा जर तो स्वतःला खूपच विशेष समजू लागतो (खासकरून, जेव्हा लोक त्याची सतत प्रशंसा करतात किंवा वाहवा करतात) तर हा त्याच्या व्यक्‍तिमत्त्वातला दोष बनतो. तसेच, बुद्धिमान व्यक्‍ती केवळ बौद्धिक समाधानाकरता बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचे वाचन आणि अभ्यास करू लागण्याची शक्यता आहे.

फाजील आत्मविश्‍वास अनेक मार्गांनी दिसून येतो. उदाहरणार्थ, कोणा बुद्धिवान व्यक्‍तीला ख्रिस्ती मंडळीत एखादे जाहीर भाषण किंवा ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत एखादा भाग मिळतो तेव्हा तो अगदी शेवटच्या घटकेपर्यंत तयारी करणार नाही; कदाचित यहोवाच्या मदतीकरता प्रार्थनाही करणार नाही. त्याउलट, बऱ्‍याच विषयांचे ज्ञान असल्यामुळे आणि तयारी न करताही चांगले बोलता येत असल्यामुळे तो कदाचित शेवटपर्यंत निश्‍चिंत राहील. आणि या त्याच्या स्वाभाविक कुवतीमुळे त्याने शेवटच्या मिनिटाला तयारी केली आहे हे कदाचित त्याच्या भाषणातून कोणाला कळणारही नाही. परंतु यहोवाचा पूर्ण आशीर्वाद नसल्यामुळे हळूहळू त्याची आध्यात्मिक प्रगती मंदावेल—कदाचित पूर्णपणे थांबेलही. चांगला गुण अंगी असूनही हा असा परिणाम झाल्यास ते केवढे दुर्दैव!—नीतिसूत्रे ३:५, ६; याकोब ३:१.

एखादी हुशार व्यक्‍ती केवळ बौद्धिक समाधानाकरता किंवा फक्‍त ज्ञान वाढवण्याकरता बायबल आणि बायबल आधारित साहित्य वाचत असेल. परंतु, असले हे ज्ञान फक्‍त “फुगविते” म्हणजेच, ती व्यक्‍ती गर्वाने फुगते. अशा ज्ञानाने ख्रिस्ती नातेसंबंधांची “उन्‍नती” होत नाही. (१ करिंथकर ८:१; गलतीकर ५:२६) आध्यात्मिक वृत्तीचा पुरुष मात्र मुळात कितीही बुद्धिवान असला तरी सतत देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि त्याच्यावर विसंबून राहतो. प्रीती, नम्रता, ज्ञान आणि बुद्धी हे गुण त्याच्या व्यक्‍तिमत्त्वात समप्रमाणात विकसित झाल्यास त्याच्या विशेष गुणाचा सर्वांना अधिकच फायदा होतो.—कलस्सैकर १:९, १०.

आपल्याजवळ एखादी खास क्षमता असल्यामुळे जर आपण स्वतःला इतरांपेक्षा फारच वरचढ समजू लागलो तर ती क्षमता नव्हे तर एक उणीव बनू शकते. शिवाय आपल्या ठायी नम्रतेचा गुण नसल्याचेही दिसून येईल. १९७४ इयरबुक ऑफ जेहोवाज विटनेसेस यामध्ये जर्मनीच्या छळ छावणीतील एका बांधवाविषयी सांगितले आहे; त्यांची स्मरणशक्‍ती म्हणजे अगदी बेजोड होती. “त्यांच्या या खास क्षमतेमुळे ते अनेक आध्यात्मिक गोष्टी आठवून इतरांना सांगायचे. सुरवातीला, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे बांधवांना उत्तेजन मिळायचे. पण नंतर, बांधव त्यांनाच आदर्श मानू लागले, ‘बुचेनवॉल्डचे आश्‍चर्य’ मानू लागले; ते जे काही म्हणतील, मग ते त्यांचे व्यक्‍तिगत मत असले तरीही तोच कायदा असे समजले जात होते.” शिवाय, त्यांच्याशी असहमत असलेले सगळे, मग जरी ते यहोवाला निष्ठावान असल्यामुळे तुरुंगवास भोगत असले तरीसुद्धा त्यांचे शत्रू ठरत!

यावरून स्पष्ट दिसून येते की, विशिष्ट देणगी प्राप्त झालेली ही व्यक्‍ती—त्याचप्रमाणे त्यांची खुशामत करणारे लोकही—हे विसरून गेले की “जे शहाणपणाचा अभिमान वाहतात, त्यांजकडे [यहोवा] लक्ष देत नाही”; मग त्यांच्याकडे एखादी खास कुवत असली तरीही. (ईयोब ३७:२४) “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते,” असे देवाचे वचन म्हणते. (नीतिसूत्रे ११:२) प्रेषित पौल अत्यंत बुद्धिमान आणि पुष्कळ शिकलेला होता तरी तो करिंथकरांना म्हणाला: ‘बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्‍तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने . . . आलो असे नाही. . . . आणि मी तुमच्याजवळ अशक्‍त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्‍वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्‍त अशा मन वळविणाऱ्‍या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य ह्‍यांची निदर्शक होती.’—१ करिंथकर २:१-५.

खरोखर बुद्धिमान असलेली व्यक्‍ती, बुद्धी किंवा यशाबद्दल जगाचा जो दृष्टिकोन आहे त्याने फसत नाही. त्यामुळे, लोकांची वाहवा मिळवण्याकरता किंवा धनसंपत्ती गोळा करण्याकरता नव्हे तर ज्याने तिला जीवन दिले आहे आणि हे चांगले गुण दिले आहेत त्या महान देवाची पूर्ण मनाने सेवा करण्याकरता ती या चांगल्या गुणांचा उपयोग करील. (१ योहान २:१५-१७) अशी व्यक्‍ती आपल्या जीवनात देवराज्याच्या कार्यांना प्राधान्य देते आणि “पाण्याच्या प्रवाहाजवळ” लावलेल्या फळ देणाऱ्‍या झाडाप्रमाणे होते. तिच्या स्वतःच्या गुणांमुळे नव्हे तर यहोवाच्या आशीर्वादामुळे ती ‘जे काही हाती घेईल ते सिद्धीस जाईल.’—स्तोत्र १:१-३; मत्तय ६:३३.

ख्रिस्ती तत्त्वांचे पालन करून आपल्या उत्तम गुणांची वृद्धी होऊ द्या

ख्रिस्ती धर्म उत्तम गुणांना इतका पोषक आहे की जगीक तत्त्वज्ञान त्यांच्यासमोर फिके पडते. उदाहरणार्थ, ख्रिस्ती तत्त्वांचे पालन केल्यामुळे लोक उत्तम पती-पत्नी, उत्तम शेजारी आणि उत्तम कर्मचारी बनतात; अर्थात, इमानदार, आदरभाव दाखवणारे, शांतिपूर्ण आणि मेहनती बनतात. (कलस्सैकर ३:१८-२३) शिवाय, इतरांशी बोलण्याचे आणि शिकवण्याचे ख्रिस्ती प्रशिक्षण मिळाल्याने त्यांच्यामध्ये दळणवळणाच्या उत्तम कौशल्यांची वृद्धी होते. (१ तीमथ्य ४:१३-१५) म्हणूनच बऱ्‍याच कंपन्यांचे मालक यहोवाच्या साक्षीदारांना आणखी जबाबदारी आणि बढती देऊ इच्छितात. पण आपण सतर्क राहिलो नाही तर या चांगल्या गुणांचा दुरुपयोगही होऊ शकतो. बढती किंवा चांगल्या नोकरीची ऑफर म्हटले, की सहसा कंपनीतच जास्त वेळ घालवावा लागतो, वारंवार ख्रिस्ती सभा चुकवाव्या लागतात किंवा आपल्या कुटुंबासोबत घालवत असलेल्या मौल्यवान वेळेचा त्याग करावा लागतो.

ऑस्ट्रेलियात, मुलेबाळे असलेल्या व ख्रिस्ती मंडळीत वडील असलेल्या एका बांधवाचा फार मोठा व्यापार होता. त्यांच्यासमोर “अमाप संपत्ती आणि यश मिळवण्याची सुवर्ण संधी” होती. पण या जगात आणखी यश मिळवण्याचा मोह त्यांनी टाळला. ते म्हणाले, “मला माझ्या कुटुंबासोबत आणि ख्रिस्ती सेवाकार्यात जास्त वेळ खर्च करायचा होता. म्हणून माझ्या पत्नीशी सल्लामसलत केल्यावर मी माझ्या कामाची वेळ कमी करायचं ठरवलं. गरज नसताना उगाच आठवड्यातले पाच दिवस कशाला काम करायचं?” सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी आपल्या जीवनात काही तडजोडी केल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आठवड्यातले फक्‍त तीन किंवा चार दिवस काम केले तरीही त्यांना कुटुंबाची काळजी घेता येते. कालांतराने, त्यांना ख्रिस्ती सेवेसंबंधी आणखी जबाबदाऱ्‍या देण्यात आल्या जसे की, स्थानिक संमेलन गृह समितीचे आणि प्रांतीय अधिवेशनाच्या व्यवस्थापनेचे काम त्यांना देण्यात आले. आपल्या चांगल्या गुणांचा सुजाणपणे उपयोग केल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आनंद आणि समाधान लाभले.

विशेषाधिकारांबद्दल संतुलित दृष्टिकोन

ख्रिस्ती पुरुषांना मंडळीतील सेवेच्या विशेषाधिकारांसाठी पुढे येण्याचे उत्तेजन दिले जाते. “कोणी अध्यक्षाचे [किंवा सेवा सेवकाचे] काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो.” (१ तीमथ्य ३:१) आपण आताच पाहिल्याप्रमाणे, जबाबदाऱ्‍या स्वीकारण्याच्या तयारीसह चांगली निर्णयशक्‍ती असणे देखील जरूरीचे आहे. कोणाही व्यक्‍तीने इतक्या जबाबदाऱ्‍या स्वीकारू नयेत की जबाबदारींच्या ओझ्यामुळे तिला यहोवाची सेवा करण्यात काहीच आनंद उरणार नाही. जबाबदाऱ्‍या स्वीकारण्यासाठी पुढे येण्याची वृत्ती प्रशंसनीय आहे, इतकेच नव्हे तर आवश्‍यकही आहे कारण अंगचुकारपणा यहोवाला मुळीच आवडत नाही; पण अशी तयारी दाखवण्यासोबतच समतोलपणा आणि ‘मर्यादशीलता’ देखील महत्त्वाची आहे.—तीत २:१२; प्रकटीकरण ३:१५, १६.

येशूचा सौम्यपणा, दूरदृष्टी आणि संवेदनशीलता यांमुळे अगदी गरिबातल्या गरीब व्यक्‍तीलाही त्याच्यासोबत अस्वस्थ वाटायचे नाही. आजही सहानुभूतीपूर्ण व दुसऱ्‍यांबद्दल आपुलकी दाखवणाऱ्‍या व्यक्‍तींबरोबर सहसा कोणाला अस्वस्थ वाटत नाही. ख्रिस्ती मंडळीतले असे सहानुभूतीपूर्ण आणि प्रेमळ वडील खरोखर मौल्यवान अशी “मनुष्यांतील दाने” आहेत. ते “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया” असे आहेत.—इफिसकर ४:८; यशया ३२:२.

पण वडिलांनी आपला व्यक्‍तिगत अभ्यास, मनन, प्रार्थना आणि जाहीर सेवा यांचा विचार करून इतरांसोबत घालवत असलेल्या वेळेमध्ये समतोल साधावा. विवाहित वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी देखील पुरेसा वेळ दिला पाहिजे; त्यांच्या कौटुंबिक सदस्यांना त्यांच्याशी आपल्या कोणत्याही समस्येबद्दल संकोच न बाळगता अगदी मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे.

सद्‌गुणी स्त्रिया—एक आशीर्वाद!

कार्यक्षम वडिलांप्रमाणे, आध्यात्मिक वृत्तीच्या स्त्रियांचा देखील यहोवाच्या संघटनेला फारच फायदा होतो. स्त्रियांना सहसा इतर लोकांबद्दल आपुलकी असते—यहोवाच्या नजरेत हा गुण अत्यंत मोलाचा आहे आणि तो याला उत्तेजनही देतो. प्रेषित पौलाने लिहिले, “तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” (फिलिप्पैकर २:४) अर्थात, ‘दुसऱ्‍याचेही हित पाहण्याला’ काही मर्यादा असते कारण कोणाही ख्रिश्‍चनाने “दुसऱ्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा” होऊ नये किंवा इतरांबद्दल चुगल्या करू नये.—१ पेत्र ४:१५; १ तीमथ्य ५:१३.

स्त्रियांजवळ इतरही अनेक चांगले गुण असतात. उदाहरणार्थ, कोणा ख्रिश्‍चनाची पत्नी त्याच्यापेक्षा जास्त हुशार असेल. असे असले तरीही, यहोवाला भिऊन वागणारी “सद्‌गुणी स्त्री” या नात्याने ती आपल्या पतीचा आदर करील आणि आपल्याला लाभलेल्या उत्तम गुणाचा उपयोग त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे तर त्याच्यामधल्या उणिवा भरून काढण्यासाठी करील. त्याचप्रमाणे आपल्या पत्नीच्या या उत्तम गुणांचा हेवा करण्याऐवजी किंवा तिचा राग करण्याऐवजी एक सुजाण, नम्र पती तिच्या या उत्तम गुणांची कदर बाळगेल व त्यांविषयी त्याला आनंद वाटेल. आपल्या या उत्तम गुणांचा पुरेपूर उपयोग करून आपल्या घराची उभारणी करण्यासाठी आणि स्वतःप्रमाणे आपल्या मुलांनाही “परमेश्‍वराचे भय” बाळगण्यास शिकवण्यासाठी तो तिला उत्तेजन देईल. (नीतिसूत्रे ३१:१०, २८-३०; उत्पत्ति २:१८) अशा शालीन आणि नम्र पती-पत्नींचे विवाह खऱ्‍या अर्थाने समाधानकारक आणि यहोवाला सन्मान देणारे ठरतात.

प्रभावी व्यक्‍तिमत्त्व नियंत्रणात ठेवणे

नीतिमत्तेने चालण्यास आणि पूर्ण अंतःकरणाने यहोवाची इच्छा करण्यास इच्छुक असलेल्या प्रभावी व्यक्‍तिमत्त्वाच्या व्यक्‍तीला विनयशीलता आणि नम्रता या गुणांची जोड असेल तर केवढा फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, अशा प्रभावी व्यक्‍तिमत्त्वाने दुसऱ्‍यांवर अधिकार गाजवण्याचा किंवा दरारा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास ती एक कमतरता बनू शकते, खासकरून ख्रिस्ती मंडळीत. ख्रिश्‍चनांना एकमेकांच्या सहवासात असताना अस्वस्थपणा वाटू नये—अगदी मंडळीतल्या वडिलांच्या सहवासात देखील.—मत्तय २०:२५-२७.

तसेच, वडिलांनाही कधी एकमेकांच्या सहवासात संकोच वाटू नये. आणि मंडळीचे सर्व वडील एकत्र येतात तेव्हा कोणाच्या व्यक्‍तिमत्त्वामुळे नव्हे तर पवित्र आत्म्याच्या निर्देशनामुळे त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. पवित्र आत्म्याचा प्रभाव कोणावरही होऊ शकतो; वयाने सर्वात लहान असलेल्या वडिलांवर किंवा अगदी शांत स्वभावाच्या वडिलांवरही होऊ शकतो. म्हणून, प्रभावी व्यक्‍तिमत्त्वाच्या लोकांना आपलेच बरोबर आहे असे वाटत असले तरीही त्यांनी इतरांचे म्हणणे मानले पाहिजे आणि अशातऱ्‍हेने सोबतच्या वडिलांना ‘आदर’ दाखवला पाहिजे. (रोमकर १२:१०) उपदेशक ७:१६ मध्ये सौम्यतेने असा इशारा देण्यात आला आहे की, “फाजील धार्मिक होऊ नको; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको; तू आपला नाश का करून घ्यावा?”

‘प्रत्येक उत्तम देणगीचा’ दाता यहोवा परमेश्‍वर आपल्या उत्तम गुणांना परिपूर्णतेने हाताळतो. (याकोब १:१७; अनुवाद ३२:४) आणि तोच आपला शिक्षक आहे! म्हणून आपण त्याच्याकडून शिकू या आणि आपल्याला स्वभावतः प्राप्त झालेले उत्तम गुण वाढवण्याकरता आणि सुज्ञपणे, मर्यादशीलतेने आणि नम्रपणे त्यांचा उपयोग करण्याचा सदैव प्रयत्न करू या. असे केल्याने इतरांकरता आपण केवढा आशीर्वाद ठरू!

[२७ पानांवरील चित्रं]

प्रार्थनापूर्वक अभ्यास आणि यहोवावर विसंबून राहणे यांवर आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते

[२९ पानांवरील चित्र]

कोणाबद्दलही योग्य प्रमाणात आपुलकी दाखवणे सर्वात उत्तम

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of The Mariners’ Museum, Newport News, VA

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा