वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुम्ही देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत आहात का?
    टेहळणी बुरूज—१९९१ | मे १
    • तुम्ही देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत आहात का?

      “कोणी देखरेखा होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो.” —१ तीमथ्य ३:१.

      १. कोणत्या हेतूची पूर्ति करणे हे यहोवाच्या साक्षीदारांना अत्यंत महत्त्वाचे वाटत असते?

      यहोवाचे साक्षीदार योग्य ध्येये वा हेतू राखून आहेत व यांची पूर्ति ते ईश्‍वरी मार्गाने करीत आहेत. हे आश्‍चर्याचे नाही, कारण त्यांचा देव देखील उदात्त हेतूंची योजना करतो व आपल्या उद्देशांची पूर्ति करीत राहतो. (यशया ५५:८-११) ज्यांना योग्य ध्येये नाहीत व जे आपले जीवन निरर्थक घालवितात तसेच आपणाशिवाय इतरांच्या लाभाचे असे काहीच करीत नाही अशांसारखे यहोवाच्या सेवकांनी असता कामा नये. देवाच्या साक्षीदारांना जे उदात्त हेतू वाटतात त्यापैकी एक, राज्याची सुवार्ता गाजविणे आणि देवाच्या वचनातील जीवनदायी ज्ञानाची इतरांमध्ये सहभागी करणे, हा होय.—स्तोत्रसंहिता ११९:१०५; मार्क १३:१०; योहान १७:३.

      २. ख्रिस्ती पुरुषांसाठी कोणत्या हेतूची माहिती पौलाने १ तीमथ्य ३:१ मध्ये दिली?

      २ यहोवाच्या संस्थेमध्ये आणखी काही उदात्त हेतू आहेत. याविषयीची माहिती प्रेषित पौलाने दिली, तो म्हणतोः “कोणी देखरेखा होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. हे वचन विश्‍वसनीय आहे.” असा माणूस इतरांचे चांगले करण्यासाठी काही गोष्टी साध्य करीत असतो. तो आरामशीर जीवन आणि गौरव मिळविण्याची नव्हे तर “चांगल्या कामाची” इच्छा धरतो. आणखी एक भाषांतर म्हणतेः “हे अगदीच सत्य आहे की, जो मन लावून पुढाकार घेतो तो प्रशंसनीय आकांक्षा बाळगून असतो.”—१ तीमथ्य ३:१, फिलिप्स्‌.

      वडीलांसाठी धोक्याचे असे काही

      ३, ४. देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करणाऱ्‍या पुरुषाने आपल्या अंतःकरणाविषयी का दक्षता बाळगली पाहिजे?

      ३ ख्रिस्ती देखरेखा होण्याच्या विचारावर मन लावणारा माणूस कोणत्या मार्गी “प्रशंसनीय आकांक्षा” राखून असतो? आकांक्षा म्हणजे विशिष्ट ध्येयाची साध्यता करण्यासाठी असलेली कळकळीची इच्छा होय. हे खरे की, काही उदात्त आकांक्षा तर काही नीच स्वरुपाच्या महत्त्वाकांक्षा आहेत. पण, कोणी माणूस इतरांची सेवा करता यावी या हेतूने देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत असतो तर त्याच्याकडून होणारी सेवा सरळ हेतू राखून होत असते व त्यामुळे आध्यात्मिक आशीर्वाद मिळतो. पण त्याने आपले अंतःकरण सांभाळले पाहिजे.—नीतीसूत्रे ४:२३.

      ४ काही महत्त्वाकांक्षी लोक गौरव संपादण्याच्या मागे असतात. इतर लोक सहमानवावर आपले वर्चस्व स्थापू इच्छितात. पहिले स्थान किंवा सत्ता यासाठी असणारा लोभ हा कुजलेल्या मुळासारखा आहे व तो बाहेरुन पुष्ट दिसणाऱ्‍या वृक्षाला आतून पोखरुन त्याचा नाश करीत असतो. अशा या चुकीच्या आकांक्षेस ख्रिश्‍चनानेही बळी पडण्याची शक्यता आहे. (नीतीसूत्रे १६:१८) “मी मंडळीला थोडेसे लिहिले,” असे प्रेषित योहान म्हणाला. “परंतु तिजमध्ये अग्रगण्य होण्याची [“सर्वच बाबतीत पुढे असण्याची,” फिलिप्स्‌] आवड धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. यामुळे मी आलो तर, तो जी कर्मे करतो त्यांची आठवण देईन. तो आम्हाविरुद्ध अपशब्द बोलून बडबड करतो. तेवढ्याने समाधान न होता तो बंधुजनांचा स्वीकार करीत नाही, आणि जे त्यांचा स्वीकार करावयास पाहतात त्यांस तो मना करतो व मंडळीबाहेर घालवितो.” (३ योहान ९, १०) महत्त्वाकांक्षी दियत्रफेस वाईट हेतू बाळगणारा ख्रिस्ती होता. त्याने दाखविलेल्या अरेरावीपणास व सत्ताप्राप्तीच्या महत्त्वाकांक्षी धोरणास येशूच्या खऱ्‍या अनुयायांमध्ये थारा नाही.—नीतीसूत्रे २१:४.

      ५. देखरेख्यांनी कोणत्या मनोदयाने आपली कर्तव्ये पूर्ण करावीत?

      ५ चांगल्या मनोदयाने आपल्या कर्तव्यांची काळजी करणारा देखरेखा निश्‍चितच स्वार्थी आकांक्षा जोपासणार नाही. ख्रिस्ती देखरेखीच्या या चांगल्या कामाकडे तो, देवाकडून मिळालेला हक्क या दृष्टीने पाहील आणि “भाग पडते म्हणून नव्हे तर . . . संतोषाने, . . . द्रव्यलोभानेही नव्हे तर उत्सुकतेने, . . . देवाच्या लोकांवर धनीपणा करणारे असे नव्हे तर कळपाला [कित्ता]” होण्यासाठी तो देवाच्या कळपाची देखरेख करील. (१ पेत्र ५:२, ३) होय, आपणामध्ये अहंकार येऊ नये आणि बळाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी देखरेख्यांनी दक्षता घेतली पाहिजे.

      ६. कोणा वडीलाने देवाच्या लोकांवर का धनीपणा करू नये?

      ६ कोणा वडीलाने इतर ख्रिस्तीजनांवर धनीपणा करता कामा नये, कारण प्रत्यक्षात तो त्यांचा सहकारी आहे, ‘त्यांच्या विश्‍वासावर सत्ता करणारा’ नव्हे. (२ करिंथकर १:२४) काही प्रेषितांनी प्रमुख पद मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा येशूने म्हटलेः “विदेश्‍यांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हामध्ये तसे नसावे. तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो, त्याने तुमचा दास व्हावे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला.” (मत्तय २०:२०-२८) कोणी वडील प्रमुख मेंढपाळ नाही, तर तो सहमेंढपाळ आहे. कळपावर धनीपण करण्याचा त्याचा मनोदय आहे तर मग, तो अहंकारी आहे. तसेच तो आपल्या अहंकारी गुणाची वाढ करण्यासाठी इतरांना हाताशी धरतो तर मग, त्रासच संभवतो. एक नीतीसूत्र म्हणतेः “प्रत्येक गर्विष्ठ अंतःकरणाच्या मनुष्याचा यहोवाला वीट आहे. कोणी त्याच्या हातास हात देईल, पण त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.”—नीतीसूत्रे १६:५.

      ७, ८. (अ) ख्रिस्ती वडीलाने नम्र राहावे हे का अगत्याचे आहे? (ब) एका नम्र वडीलांचे उदाहरण द्या.

      ७ यासाठीच, ख्रिस्ती देखरेख्याने स्वतःला ‘देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन ठेवावे.’ आध्यात्मिक उपयुक्‍ततेच्या मार्गात गर्व आड येतो, कारण ईश्‍वरी इच्छेला पूर्ण करावयास मनाची व अंतःकरणाची सुस्थिती केवळ नम्र जनांमध्येच राहते. “देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो.” (१ पेत्र ५:५, ६) होय, नम्र मनोवृत्तीच्या लोकांना यहोवा आशीर्वादित करतो. यामधूनच लायक पुरुषांची निवड ख्रिस्ती वडीलपदासाठी केली जाते.

      ८ ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांनी जी नम्र सेवा सादर केली त्याविषयी यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक इतिहासाची पाने भरली आहेत. उदाहरणार्थ, एकेकाळचे फिरते देखेरेखे पण आता बहुतकाळ बेथेल कर्मचारी असणारे सौम्य मनोवृत्तीच्या डब्ल्यु. जे. थॉर्न यांचे उदाहरण लक्षात घ्या. यांच्याविषयी एकदा एका ख्रिश्‍चनाने म्हटलेः “बंधु थॉर्न यांनी जे उद्‌गार काढले ते मी कधी, कधीच विसरणार नाही. त्यांनी असे म्हटले होते, ‘जेव्हा जेव्हा माझ्या मनात, मी कोणी तरी मोठा आहे असा विचार येतो तेव्हा मी जणू मला कोपऱ्‍यात नेऊन म्हणतोः ‘अरे कसपट मनुष्या, तुझ्यापाशी घमेंड करण्याजोगे आहे तरी काय?”’” खरेच, वडील व इतरांनी प्रदर्शित करावी ही केवढी प्रशंसनीय वृत्ती! लक्षात ठेवा की, “नम्रता व यहोवाचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन ही होत.”—नीतीसूत्रे २२:४.

      सेवा करण्याची देव-प्रणीत इच्छा

      ९. देखरेखा बनून सेवा करण्याची इच्छा ही देव-प्रणीत असते असे का म्हणता येऊ शकते?

      ९ देखरेखा होऊन सेवा करण्याची इच्छा देव-प्रणीत असते का? होय, आपली पवित्र सेवा घडावी यासाठी यहोवा आपल्या आत्म्याद्वारे चालना, धैर्य आणि बळ देत असतो. उदाहरणार्थ, येशूच्या छळग्रस्त अनुयायांनी धैर्याने प्रचार करता यावा यासाठी देवाकडे प्रार्थना केल्यावर काय घडले गेले बरे? “ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.” (प्रे. कृत्ये ४:२७-३१) पवित्र आत्म्याद्वारे असे हे परिणाम निष्पण्ण होत असल्यामुळे हाच आत्मा एखाद्यास देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करण्यासाठी चालना देऊ शकतो.

      १०. (अ) कोणी ख्रिस्ती माणूस का प्रयत्न करीत नसेल याचे एक कारण कोणते असू शकेल? (ब) देव जर आम्हाला सेवेचा हक्क देतो तर मग आम्हाला कोणती खात्री बाळगता येईल?

      १० पण मग, प्रौढ ख्रिस्तीजन हा प्रयत्न कधी कधी का करीत नाही? तो कदाचित आध्यात्मिक माणूस असेल पण आपण अपात्र आहोत असे त्याला वाटत असेल. (१ करिंथकर २:१४, १५) हे खरे की, आपल्या मर्यादा आपल्याला ठाऊक असल्या पाहिजेत आणि आपण आपणाविषयी विनम्र दृष्टीकोण राखला पाहिजे. (मीखा ६:८) एखाद्या विशिष्ठ जबाबदारीसाठी आपण अत्यंत निपुण आहोत असे उद्दामपणे समजण्यापेक्षा हे लक्षात ठेवणे चांगले की, “नम्रजनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीतीसूत्रे ११:२) पण यासोबत हेही लक्षात ठेवावे की, देव जर आपल्याला सेवा करण्याचा हक्क देत आहे तर मग, ती पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असणारे बळ देखील तो निश्‍चये पुरवील. पौलाने देखील तेच म्हटले होते की, “मला सामर्थ्य देणाऱ्‍याच्या ठायी मी सर्व काही करावयास शक्‍तीमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.

      ११. सल्ला देण्यासाठी आपणापाशी पुरेसे ज्ञान नाही म्हणून जो कोणी देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत नाही अशाला काय करता येण्याजोगे आहे?

      ११ कदाचित एखाद्या ख्रिश्‍चनाला वाटेल की, इतरांना सूचना वा सल्ला देण्याइतके ज्ञान मजठायी नाही व म्हणून तो देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत नसेल. असे असेल तर मग, देवाच्या वचनाचा अधिक परिश्रमी अभ्यास करणारा विद्यार्थी बनून व शिवाय प्रार्थना करून त्याला हे ज्ञान संपादन करता येईल. याकोबाने लिहिलेः “तुम्हामध्ये जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्‍वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य दोन मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आपणाला यहोवापासून काही मिळेल असे त्याने समजू नये.” (याकोब १:५-८) शलमोनाने केलेल्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून देवाने त्याला “बुद्धिमान व विवेकी अंतःकरण” दिले. यामुळे त्याला चांगले व वाईट याचा योग्य न्याय करता आला. (१ राजे ३:९-१४) शलमोनाचे प्रकरण खास असे होते, पण मंडळीत जबाबदार पदी असलेले लोक आपल्या परिश्रमी अभ्यासाने व देवाच्या मदतीने इतरांना धार्मिक स्वरुपाच्या सूचना देऊ शकतात. “ज्ञान यहोवा देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सूज्ञता येतात.”—नीतीसूत्रे २:६.

      १२. कोणी जर चिंतेमुळे देखरेखा बनण्याचा प्रयत्न करीत नाही, तर त्याला कशामुळे मदत मिळू शकेल?

      १२ कधी कधी चिंता ही एखाद्या माणसाला मागे ठेवत असते. त्याला वाटते की, वडील बनण्यामुळे जी भारी जबाबदारी येते ती आपल्याला खांद्यावर वाहता येणार नाही. पौलानेही हे कबूल केले की, “माझा रोजचा रगडा, म्हणजे सर्व मंडळ्यांची चिंता,” ही त्याला होती. (२ करिंथकर ११:२८) पण चिंता असताना काय करायचे हे प्रेषिताला ठाऊक होते, कारण त्याने लिहिलेः “कशाचीही चिंता करू नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) होय, प्रार्थना व देवावरील भिस्त या गोष्टी चिंतेला दूर पळवून लावतात.

      १३. देखरेखा बनण्याचा प्रयत्न करण्याच्या बाबतीत कोणी जर विचलीत असेल तर त्याला कशी प्रार्थना करता येईल?

      १३ चिंता अधिकच पकड धरुन आहे तर मग, एखाद्याला दावीदासारखी प्रार्थना करता येईलः “हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे अस्थिर विचार तपास. माझ्याठायी काही वेदनायुक्‍त भावना आहेत का ते बघ आणि मला सनातन मार्गाने ने.” (स्तोत्रसंहिता १३९:२३, २४, न्यू.व.) “अस्थिर,” विचार किंवा “चिंता” असण्याचा प्रकार कोणताही असला तरी देव आम्हाला यांच्याशी सामना करण्यात मदत देऊ शकतो व यामुळे आम्हाला आध्यात्मिक प्रगती साधता येते. (पहा द न्यू इंटरनॅशनल व्हर्शन.) हीच गोष्ट आणखी एका स्तोत्रात अत्यंत सुंदरपणे मांडली आहेः “माझा पाय निसरला असे मी म्हणतो, तोच हे यहोवा तुझी दया मला आधार देते. माझे मन बहुत चिंताक्रांत होते तेव्हा तुजपासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”—स्तोत्रसंहिता ९४:१८, १९.

      यहोवा इच्छितो त्याप्रमाणे आनंदाने सेवा करा

      १४. देखरेख्यासंबंधाने प्रयत्न न करणाऱ्‍या माणसाने देवाच्या आत्म्यासाठी का प्रार्थना करावी?

      १४ चिंता, अपात्रता किंवा प्रेरणेचा अभाव या गोष्टींमुळे जर कोणी ख्रिस्ती माणूस प्रयत्न करण्यात मागे पडला असेल तर त्याने देवाच्या आत्म्यासाठी निश्‍चितपणे प्रार्थना करावी. येशूने म्हटलेः “तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते तर मग, स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल!” (लूक ११:१३) शांती व इंद्रियदमन ही आत्म्याची फळे असल्यामुळे हा आत्मा चिंता किंवा अपात्रतेच्या भावनेस तोंड देण्यास आम्हास मदत देऊ शकेल.—गलतीकर ५:२२, २३.

      १५. सेवेच्या हक्कासाठी उपलब्ध होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या प्रेरेणचा अभाव आहे त्यांना कोणत्या प्रकारातील प्रार्थना साहाय्य करील?

      १५ आता प्रेरणेचा अभाव याविषयी काय? बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने आम्ही देवाला ही प्रार्थना करावी की, जे काही त्याला संतुष्ट करते ते करण्यासाठी त्याने आम्हाला प्रेरणा द्यावी. दावीदाने याचना केलीः “हे यहोवा, तुझे मार्ग मला प्रकट कर. . . . तू आपल्या सत्पथाने मला ने.” (स्तोत्रसंहिता २५:४, ५) अशा प्रकारातील प्रार्थना आम्हाला चुकीचा मार्ग टाळण्यास मदत देईल. आम्हाला प्रेरणेचा अभाव दिसत असला तर हीच प्रार्थना म्हणता येईल. सेवेच्या हक्काचा स्वीकार आमच्या हातून घडावा अशी विनंती आम्ही यहोवाला करू शकतो. खरे म्हणजे, आम्ही देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली व त्याच्या मार्गदर्शनाला अनुसरले तर मग, सेवेचे जे हक्क आम्हाला मिळतील ते घेण्यासाठी आम्ही निश्‍चितच आपल्याला तयार ठेवू शकू. काही झाले तरी देवाच्या सेवकांनी आत्म्याचा कोणाही मार्गाने प्रतिकार करू नये.—इफिसकर ४:३०.

      १६. मंडळीतील जबाबदाऱ्‍या मिळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोणती प्रवृत्ती बळकट प्रेरणा देते?

      १६ “ख्रिस्ताचे मन” बाळगल्यास आम्हाला ईश्‍वरी इच्छेनुरुप कार्य करण्यात आनंद वाटेल. (१ करिंथकर २:१६) येशूचीही स्तोत्रकर्त्याप्रमाणेच हीच मनोवृत्ती होती. स्तोत्रकर्त्याने म्हटलेः “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तोत्रसंहिता ४०:८) ख्रिस्ताने म्हटलेः “पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे,” आणि हे त्याने वधस्तंभावरील मरणापर्यंत पूर्ण करून दाखविले. (इब्रीयांस १०:९, १०) यहोवाच्या सेवेत शक्य आहे ते करण्याची इच्छा ही एखाद्याला मंडळीतील जबाबदाऱ्‍या मिळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी बळकट प्रेरणा देते.

      भावी काळाकडे बघा

      १७. (अ) ज्यांनी पूर्वी काम केले पण आता करीत नाही अशांनी निराश होण्याची का जरूरी नाही? (ब) सर्वात महत्त्वाचा हक्क कोणता आहे?

      १७ स्वास्थ्यविषयक समस्या किंवा इतर काही कारणांमुळे पूर्वी ज्यांनी मंडळीतील जबाबदार कर्तव्ये हाताळली होती ते आता असा हक्क अनुभवीत नसतील. आम्हाला ठाऊक आहे की, पुष्कळ विश्‍वासू माणसांना पूर्वीइतकी सेवा करता येत नाही, पण ते अद्याप आपली सचोटी दृढ धरून आहेत. (स्तोत्रसंहिता २५:२१) खरेच, नम्र अशा दीर्घकालीन वडीलांना वडीलवर्गात राहून आपल्या अनुभवाचा अमोल ठेवा इतरांसाठी उपलब्ध करता येईल. वार्धक्य किंवा अपंगत्व आले असले तरी यांनी वडीलांच्या पदावरून हटण्याची जरुरी नाही. पण, दरम्यान यहोवाच्या प्रत्येक साक्षीदाराने त्याचे पवित्र नाम उंचावून धरणारे आणि ‘त्याच्या राजपदाचे प्रबल वैभव’ विदित करणारे या अर्थी असणारा सेवेचा सर्वोत्तम हक्क जोपासत राहावे.—स्तोत्रसंहिता १४५:१०-१३.

      १८. (अ) कोणा वडील किंवा उपाध्य सेवकाला दूर करण्यात आले असले तर कशाची जरूरी असणार? (ब) एका दूर करण्यात आलेल्या वडीलांनी कोणती सुंदर मनोवृत्ती प्रदर्शित केली?

      १८ तुम्ही एकेकाळी वडील किंवा उपाध्य सेवक होता पण या पातळीवर सध्या नाहीत, तरीही देव तुमची काळजी करून आहे याची खात्री असू द्या, आणि कदाचित भावी काळात तो तुम्हाला अनपेक्षितपणे काही हक्क बहाल करू शकेल. (१ पेत्र ५:६, ७) तुम्हाला काही सुधारणा करण्याची गरज आहे तर आपला दोष कबूल करा व देवाच्या मदतीने त्यावर काम करा. ज्यांना वडीलपदावरून दूर करण्यात आले अशा काहींनी आपणामध्ये ख्रिस्तीजनांना न शोभणारी वृत्ती जडविली, तर काही अक्रियाक झाले आणि सत्यामधून बाहेर पडले. पण ज्यांनी सुंदर आत्म्याचे प्रदर्शन केले त्यांच्यासारखे असणे हे किती चांगले आहे बरे! उदाहरणार्थ, मध्य अमेरिकेत बरीच वर्षे सेवा करीत असलेल्या एका वडीलाला त्या हक्कापासून दूर केले गेले. त्यांनी म्हटलेः “इतका काळ जतन करून ठेवलेला हा हक्क मजपासून गेला याचे मला खूप दुःख झाले. पण बांधवांना माझा ज्या पद्धतीने वापर करून घेता येईल त्यासाठी आता मी काम करणार आणि सेवेचे हक्क पुन्हा मिळविण्यासाठी झटत राहणार.” काही वेळातच, या बंधुला पुन्हा वडील होता आले.

      १९. वडील किंवा उपाध्य सेवकपदापासून दूर झालेल्या बांधवांना कोणता उचित सल्ला दिलेला आहे?

      १९ तुम्हाला वडीलपदावरुन किंवा उपाध्य सेवकपदावरुन दूर करण्यात आले असले तर सौम्य मनोवृत्ती बाळगा. कटू वृत्ती प्रदर्शित करण्याचे टाळा, कारण यामुळे कदाचित सेवेच्या पुढील हक्कासाठी तुम्ही अपात्र ठराल. ईश्‍वरी प्रवृत्तीचा आत्मा आदरास पात्र ठरतो. निराश होण्यापेक्षा यावर मनन करीत राहा की, यहोवा तुमच्या उपाध्यपणावर किंवा घराण्यावर कसा आशीर्वाद देत आहे. आपल्या कुटुंबातील आध्यात्मिकता वाढवा, आजाऱ्‍यांची भेट घ्या आणि अशक्‍तांना प्रोत्साहन द्या. सर्वात अधिक म्हणजे, देवाची स्तुती करण्याचा तसेच यहोवाच्या साक्षीदारांमध्ये राहून सुवार्तेची घोषणा करण्याचा हक्क जोपासत राहा.—स्तोत्रसंहिता १४५:१, २; यशया ४३:१०-१२.

      २०. पूर्वीच्या देखरेख्याला किंवा उपाध्य सेवकाला वडील वर्ग कशी मदत करू शकेल?

      २० पूर्वीचा देखरेखा किंवा उपाध्य सेवकाला दूर करण्यात आल्यामुळे किंवा त्याने स्वेच्छेने ते त्यागल्यामुळे किती उद्विग्नता वाटली असेल याविषयीची जाण वडीलवर्गाने राखण्यास हवी. तो बहिष्कृत केलेला नाही, पण वडीलांना हे दिसते की तो निराश झालेला आहे तर अशावेळी त्यांनी प्रेमळपणे त्याला आध्यात्मिक साहाय्य द्यावे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) त्याची मंडळीत गरज आहे याची जाणीव करून देण्यात त्यांनी त्याला मदत करावी. जरी सूचना देण्याची गरज भासली होती तरी नम्र व कृतज्ञता प्रदर्शित करणाऱ्‍या माणसाला मंडळीत सेवेचे हक्क प्रदान करण्यात दीर्घ काळ लागणार नाही.

      २१. सेवेच्या हक्कासाठी कोण थांबून राहिले, आणि जे आज याकरता थांबून आहेत अशांना काय सुचविले आहे?

      २१ तुम्ही प्रयत्न करीत असाल तर सेवेचे पुढील हक्क मिळण्याआधी काही काळ तुम्हाला थांबावे लागेल. पण अधीर होऊ नका. इस्राएलांना मिसरी दास्यत्वातून सोडवण्यासाठी देवाने मोशेचा वापर करण्याआधी मोशेला ४० वर्षे थांबावे लागले. (प्रे. कृत्ये ७:२३-३६) मोशेचा वारस या अर्थी नेमणूक मिळण्याआधी यहोशवाला किती तरी काळ त्याची सेवक म्हणून सेवा करावी लागली. (निर्गम ३३:११; गणना २७:१५-२३) याचप्रमाणे, इस्राएलाच्या राजासनावर येण्याआधी दावीद देखील काही काळ थांबला. (२ शमुवेल २:७; ५:३) पेत्र व योहान मार्क यांना आपणामध्ये सुधारणा करण्यासाठी काही काळ द्यावा लागला. (मत्तय २६:६९-७५; योहान २१:१५-१९; प्रे. कृत्ये १३:१३; १५:३६-४१; कलस्सैकर ४:१०) यास्तव तुम्हाला सध्या काही मंडळीची कर्तव्ये नसली तर यहोवा तुम्ही अधिक अनुभव मिळवावा व त्याद्वारे आपली जुळवणूक करून घ्यावी यासाठी हा वेळ देत आहे. काहीही झाले तरी, तुम्ही पुढे येण्याचा प्रयत्न करताना देवाच्या मदतीची याचना करा आणि मग तो तुम्हाला कार्याचे हक्क प्रदान करून देईल. मध्यंतरात, मंडळीची जबाबदारी हाताळण्यास पात्र होण्यासाठी परिश्रमाने काम करा आणि दावीदासारखी मनोवृत्ती ठेवा, ज्याने असे म्हटलेः “माझे मुख यहोवाचे स्तवन करील; सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद युगानुयुग करो.”—स्तोत्रसंहिता १४५:२१.

  • तुम्ही देखरेख्याच्या पदासाठी प्रयत्न करीत आहात का?
    टेहळणी बुरूज—१९९१ | मे १
    • [११ पानांवरील चित्रं]

      नम्र वडील या नात्याने डब्ल्यु. जे. थॉर्न यांनी उत्तम उदाहरण घालून दिले

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा