पती व वडील—या जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणे
‘पर्यवेक्षक एका स्त्रीचा पती असावा.’ —१ तीमथ्य ३:२.
१, २. पाळकीय सडेपण अशास्त्रवचनीय का आहे?
पहिल्या शतकात विश्वासू ख्रिश्चनांना त्यांच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखण्याची चिंता लागली होती. एक ख्रिस्ती जेव्हा सडा राहतो तेव्हा “अधिक बरे करितो,” असे प्रेषित पौलाने म्हटले तेव्हा, असा मनुष्य ख्रिस्ती मंडळीत पर्यवेक्षक या नात्याने कार्य करण्यास योग्य असेल असा त्याचा म्हणण्याचा अर्थ होता का? खरे पाहता तो, वडील होण्याकरता सडेपणाला एक आवश्यकता ठरवत होता का? (१ करिंथकर ७:३८) कॅथलिक पाळकांकडून सडेपणाची अपेक्षा केली जाते. पण पाळकीय सडेपण शास्त्रवचनीय आहे का? पूर्वेकडील कर्मठ चर्च आपल्या पॅरिश पाळकांना विवाहित असण्यास संमती देते खरे, परंतु आपल्या बिशपांना देत नाही. ते बायबलच्या सुसंगतेत आहे का?
२ ख्रिस्ताच्या १२ प्रेषितांपैकी अनेक जण, ख्रिस्ती मंडळीचे मूळ सदस्य, विवाहित होते. (मत्तय ८:१४, १५; इफिसकर २:२०) पौलाने लिहिले: “इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व केफा [पेत्र] ह्यांच्याप्रमाणे आम्हालाहि एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?” (१ करिंथकर ९:५) न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ असंतुष्टतेने कबूल करतो, की “सडेपणाच्या नियमाचा आरंभ चर्चमधून झाला” व ‘नव्या कराराच्या सेवकांना सडे राहण्याचे बंधन नव्हते.’ यहोवाचे साक्षीदार चर्चच्या नियमांऐवजी शास्त्रवचनीय नमुन्याचे पालन करतात.—१ तीमथ्य ४:१-३.
वडीलपण व विवाह अनुरुप आहेत
३. कोणत्या शास्त्रवचनीय वस्तुस्थिती, विवाहित पुरुष ख्रिस्ती पर्यवेक्षक होऊ शकतात ते दाखवतात?
३ पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलेल्यांनी अविवाहित असले पाहिजे अशी अपेक्षा करण्याऐवजी, पौलाने तीताला लिहिले: “मी तुला क्रेतांत ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील [ग्रीक, प्रेसबीटेरॉस] नेमावे. ज्याला नेमावयाचे तो अदूष्य, एका स्त्रीचा पति असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. अध्यक्ष [पर्यवेक्षक] [ग्रीक, एपीस्कोपॉस, ज्यातून “बिशप” हा शब्द आला] हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदूष्य असला पाहिजे.”—तीत १:५-७.
४. (अ) ख्रिस्ती पर्यवेक्षक होण्याकरता विवाह ही एक अपेक्षा नाही ते आपल्याला कसे माहीत होते? (ब) वडील असलेल्या अविवाहित बांधवाला कोणता फायदा असतो?
४ दुसऱ्या बाजूला पाहता, विवाह ही वडीलपणाकरता शास्त्रवचनीय अपेक्षा नाही. येशू अविवाहित राहिला. (इफिसकर १:२२) पहिल्या शतकाच्या ख्रिस्ती मंडळीतील उल्लेखनीय पर्यवेक्षक, अर्थात पौल तेव्हा अविवाहित होता. (१ करिंथकर ७:७-९) आज, वडील या नात्याने सेवा करणारे अनेक अविवाहित ख्रिश्चन आहेत. अविवाहित असल्यामुळे त्यांना पर्यवेक्षक या नात्याने त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कदाचित जास्त वेळ मिळतो.
‘विवाहित पुरुषाचे मन द्विधा झालेले असते’
५. विवाहित बांधवांनी कोणती शास्त्रवचनीय वस्तुस्थिती कबूल केली पाहिजे?
५ एखादा ख्रिस्ती पुरुष विवाह करतो तेव्हा त्याला याची जाणीव झाली पाहिजे, की त्याचा वेळ व अवधान यांची अपेक्षा करणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या तो हाती घेत आहे. बायबल म्हणते: “अविवाहित पुरूष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करितो; परंतु विवाहित पुरूष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे, अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करितो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते.” (१ करिंथकर ७:३२-३४) कोणत्या अर्थाने द्विधा झालेले असते?
६, ७. (अ) कोणत्या एका मार्गाने विवाहित पुरुषाचे मन “द्विधा” होऊ शकते? (ब) पौल विवाहित ख्रिश्चनांना कोणता सल्ला देतो? (क) कामाची नेमणूक स्वीकारण्याच्या एखाद्याच्या निर्णयावर याचा परिणाम कसा होऊ शकतो?
६ एक गोष्ट म्हणजे, विवाहित पुरुष आपल्या स्वतःच्या शरीरावरील अधिकाराचा त्याग करतो. पौलाने हे अगदी स्पष्ट केले: “पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाहि स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.” (१ करिंथकर ७:४) विवाह करण्याच्या योजना करणाऱ्यांना कदाचित वाटेल, की लैंगिक संबंधांना आपल्या विवाहात जास्त महत्त्व दिले जाणार नसल्यामुळे हे इतके महत्त्वपूर्ण नाही. परंतु, विवाहाआधी शुद्धाचरण ही शास्त्रवचनीय अपेक्षा असल्यामुळे ख्रिश्चनांना खरे तर त्यांच्या भावी सोबत्याच्या अंतर्गत गरजा ठाऊक नसतात.
७ पौलाने दाखवून दिले, की ‘आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावलेल्या’ जोडप्यानेही एकमेकांच्या लैंगिक गरजांना विचारात घेतले पाहिजे. त्याने करिंथमधील ख्रिश्चनांना सल्ला दिला: “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेहि पतीला द्यावा. एकमेकांबरोबर वंचना करू नका, तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकापासून दूर राहा मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हास परीक्षेत पाडू नये.” (रोमकर ८:५; १ करिंथकर ७:३, ५) हा सल्ला अनुसरला नाही तेव्हा जारकर्माची अनेक प्रकरणे घडली आहेत ही दुःखाची गोष्ट आहे. ह्यामुळे, एखाद्या विवाहित ख्रिश्चनाने, आपल्या पत्नीपासून जास्त काळासाठी वेगळे करणाऱ्या कामाची नेमणूक स्वीकारण्याआधी सर्व बाबी तोलून पाहिल्या पाहिजेत. अविवाहित असताना त्याला जे स्वातंत्र्य होते ते स्वातंत्र्य आता राहिलेले नाही.
८, ९. (अ) विवाहित ख्रिस्ती “जगाच्या गोष्टींविषयीची चिंता” करतात असे पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता? (ब) विवाहित ख्रिश्चनांनी काय करण्यास उत्सुक असले पाहिजे?
८ विवाहित ख्रिस्ती पुरुष, ज्यामध्ये वडीलजनही समाविष्ट आहेत ते, “जगाच्या [कॉसमॉस] गोष्टींविषयीची चिंता” करत असतात हे कोणत्या अर्थाने म्हटले जाऊ शकते? (१ करिंथकर ७:३३) पौल, सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी ज्याच्यापासून दूर राहिले पाहिजे अशा जगाच्या वाईट गोष्टींविषयी बोलत नव्हता ही गोष्ट अगदीच उघड आहे. (२ पेत्र १:४; २:१८-२०; १ योहान २:१५-१७) देवाचे वचन आपल्याला ‘अभक्तीला व जगिक [कॉसमीकॉस] वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने’ वागत राहण्याची सूचना देते.—तीत २:१२, १३.
९ यास्तव, एखादा विवाहित ख्रिस्ती “जगाच्या गोष्टींविषयीची चिंता” करतो म्हणजे, सर्वसामान्य वैवाहिक जीवनाचा भाग असलेल्या सांसारिक गोष्टींविषयी तो किंवा ती योग्यपणे चिंतातुर असते. यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, मनोरंजन यांचा समावेश होतो आणि मुले असल्यास इतर अगणित चिंतांबद्दल तर काय सांगायलाच नको. परंतु मूल नसलेल्या जोडप्याचाही विवाह यशस्वी होण्याकरता, दोघा पती पत्नीने आपल्या वैवाहिक सोबत्याला ‘संतोषविण्यास’ उत्सुक असले पाहिजे. हे, ख्रिस्ती वडिलांकरता ते आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखत असताना विशेष आस्थेचे आहे.
चांगले पती तसेच चांगले वडील
१०. एखाद्या ख्रिश्चनाने वडील या नात्याने पात्र ठरण्याकरता त्याच्या बांधवांच्या व बाहेरील लोकांच्या लक्षात काय आले पाहिजे?
१० विवाह ही वडीलपणाकरता एक अपेक्षा नसली तरीही, वडील म्हणून एखाद्या ख्रिस्ती पुरुषाला नियुक्त करण्याआधीच त्याचा विवाह झाला असल्यास, योग्य मस्तकपण दाखवताना त्याने एक चांगला, प्रेमळ पती होण्याचा प्रयत्न करत असल्याचा पुरावा दिला पाहिजे. (इफिसकर ५:२३-२५, २८-३१) पौलाने लिहिले: ‘कोणी पर्यवेक्षकाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आंकाक्षा धरितो. पर्यवेक्षक अदूष्य, एका स्त्रीचा पती असला पाहिजे.’ (१ तीमथ्य ३:१, २) एक वडील, आपली पत्नी सहख्रिस्ती असो वा नसो, चांगला पती होण्याचा होता होईल तितका प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट दिसून आले पाहिजे. वास्तविक, तो आपल्या पत्नीची आणि त्याच्या इतर जबाबदाऱ्यांची चांगली काळजी घेतो हे मंडळीच्या बाहेरील लोकांच्याही लक्षात आले पाहिजे. पौल पुढे म्हणतो: “त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीहि चांगली साक्ष दिलेली असावी.”—१ तीमथ्य ३:७.
११. “एका स्त्रीचा पति” या वाक्यावरून काय सूचित होते व यामुळे वडिलांनी कोणती खबरदारी बाळगावी?
११ अर्थात, “एका स्त्रीचा पति” या वाक्यामुळे बहुपत्नीकत्वाचा तर प्रश्नच उरत नाही, पण त्यावरून वैवाहिक विश्वासूपणा देखील सूचित होतो. (इब्री लोकांस १३:४) वडिलांनी विशेषकरून, मंडळीतील बहिणींना मदत करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सल्ला किंवा सांत्वनाची गरज असलेल्या एखाद्या बहिणीला भेट देताना त्यांनी एकटे राहणे टाळले पाहिजे. त्यांनी, आपल्यासोबत एखाद्या वडिलास, सेवा-सेवकास अथवा उत्तेजनात्मक भेट द्यायची असते तेव्हा आपल्या पत्नीस घेऊन जाणे उचित ठरेल.—१ तीमथ्य ५:१, २.
१२. वडिलांच्या आणि सेवा-सेवकांच्या पत्नींनी कोणत्या वर्णनाशी साम्य राखण्यास झटले पाहिजे?
१२ प्रासंगिकपणे, वडील आणि सेवा-सेवकांकरता असलेल्या अपेक्षांची यादी करताना प्रेषित पौलाने अशा प्रकारच्या विशेषाधिकारांसाठी निवडलेल्यांच्या पत्नींनाही सल्ला दिला. त्याने लिहिले: “तसेच, स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्या.” (१ तीमथ्य ३:११) ख्रिस्ती पती, आपल्या पत्नीला या वर्णनाशी साम्य राखण्यात मदत करण्यासाठी पुष्कळ काही करू शकतो.
पत्नीप्रती शास्त्रवचनीय कर्तव्य
१३, १४. एखाद्या वडिलाची पत्नी सहसाक्षीदार नसली तरीसुद्धा त्याने तिच्यासोबत राहून उत्तम पती का असावे?
१३ अर्थात, वडिलांच्या किंवा सेवा-सेवकांच्या पत्नींना दिलेला हा सल्ला, अशा पत्नी स्वतः समर्पित ख्रिस्ती असल्याचे आधीच गृहीत धरतो. सामान्यपणे, हे असे आहे कारण ख्रिश्चनांकडून “केवळ प्रभूमध्ये,” विवाह करण्याची अपेक्षा केली जाते. (१ करिंथकर ७:३९) पण मग, अशा बांधवाबद्दल काय ज्याने यहोवाला आपले जीवन समर्पित केले तेव्हा सत्यात नसलेल्या स्त्रीबरोबर त्याचा विवाह आधीच झालेला होता किंवा ज्याची पत्नी त्याची काहीही चूक नसताना सत्याचा त्याग करते?
१४ केवळ या गोष्टी त्याला वडील होण्यापासून अटकाव करणार नाहीत. पण त्याचवेळी त्याची पत्नी त्याचे विश्वास मानत नाही, केवळ या कारणास्तव तिला सोडून देणेही न्याय्य ठरणार नाही. पौलाने सल्ला दिला: “तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नको.” (१ करिंथकर ७:२७) त्याने पुढे म्हटले: ‘जर कोणाएका बंधूची पत्नी सत्यात नसली, आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. तथापि, जर सत्यात नसलेली व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे. कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाहि काय ठाऊक?’ (१ करिंथकर ७:१२, १५, १६) एखाद्या वडिलाची पत्नी साक्षीदार नसली तरी त्याने चांगला पती असले पाहिजे.
१५. प्रेषित पेत्र ख्रिस्ती पतींना कोणता सल्ला देतो व एखादा वडील निष्काळजी पती ठरल्यास कोणते परिणाम उद्भवू शकतात?
१५ ख्रिस्ती वडिलाची पत्नी साक्षीदार असो वा नसो, तिला त्याच्या प्रेमळ अवधानाची गरज आहे हे त्याने जाणले पाहिजे. प्रेषित पेत्राने लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या [पत्नींबरोबर], त्या अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) आपल्या पत्नीच्या गरजांची काळजी घेण्यात जाणूनबुजून अपयशी ठरणारा पती यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात घालतो; यहोवाकडे तो प्रार्थनेद्वारा जातो तेव्हा कदाचित त्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो, जणू काय त्याचा मार्ग ‘अभ्राने आच्छादिले असून त्यामधून प्रार्थनेचा प्रवेश होत नाही.’ (विलापगीत ३:४४) यामुळे, त्याला ख्रिस्ती पर्यवेक्षक या नात्याने सेवा करण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.
१६. पौलाचे मुख्य मर्म कोणते आहे, व त्याविषयी वडिलांना कसे वाटले पाहिजे?
१६ आधी नमूद केल्याप्रमाणे, पौलाच्या वादविषयाचे मुख्य मर्म हेच आहे, की एखादा पुरुष विवाह करतो तेव्हा तो काही प्रमाणात त्या स्वातंत्र्याचा त्याग करतो ज्या स्वातंत्र्याने, तो अविवाहित असताना “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करण्यास त्याला अनुमती दिली होती. (१ करिंथकर ७:३५) अहवाल दाखवतात, की काही विवाहित वडील पौलाच्या या प्रेरित तर्कासोबत नेहमीच संतुलित राहिलेले नाहीत. त्यांच्या मते उत्तम वडिलांकडून जे काही अपेक्षिले जाते ते साध्य करण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे ते कदाचित पती या नात्याने असलेल्या त्यांच्या काही कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू शकतात. काहींना, मंडळीतील एखादा विशेषाधिकार, नाकारण्यास जड जाईल, तो विशेषाधिकार स्वीकारल्यामुळे त्यांच्या पत्नीच्या आध्यात्मिकतेला हानी पोहंचली तरी देखील ते तो नाकारत नाहीत. विवाहामुळे येणाऱ्या विशेषाधिकारांचा ते आनंद लुटतात पण त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास ते इच्छुक आहेत का?
१७. काही पत्नींच्या बाबतीत काय झाले आहे व हे कसे टाळता आले असते?
१७ वडील या नात्याने आवेश दाखवणे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. पण एखादा ख्रिस्ती, मंडळीतील त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याच्या पत्नीबद्दलच्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याला संतुलित ख्रिस्ती असे म्हणता येईल का? मंडळीतील लोकांना पाठिंबा देण्याची इच्छा असताना, एक संतुलित वडील आपल्या पत्नीच्या आध्यात्मिकतेचीही चिंता करेल. काही वडिलांच्या पत्नी आध्यात्मिकरीत्या दुर्बळ झाल्या आहेत व काहींचे तर आध्यात्मिक ‘तारू फुटून गेले आहे.’ (१ तीमथ्य १:१९) पत्नी तिचे स्वतःचे तारण मिळवण्यास जबाबदार असली तरी देखील काही बाबतीत, ‘ख्रिस्त जसा मंडळीचे पालनपोषण करतो’ तसे वडिलांनी आपल्या पत्नीचे “पालनपोषण” केले असते तर आध्यात्मिक समस्या टाळता आली असती. (इफिसकर ५:२८, २९) खरे सांगायचे तर, वडिलांनी ‘स्वतःकडे व सर्व कळपाकडे लक्ष’ दिले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) ते जर विवाहित आहेत तर यामध्ये त्यांच्या पत्नींचा समावेश होतो.
“संसारात हालअपेष्टा”
१८. विवाहित ख्रिश्चनांना अनुभवाव्या लागणाऱ्या ‘हालअपेष्टांचे’ काही पैलू कोणते आहेत, व यांचा एखाद्या वडिलाच्या कार्यांवर कसा प्रभाव पडू शकतो?
१८ प्रेषिताने असेही लिहिले: “कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही; तरी पण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हाला भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ७:२८) सडेपणासंबंधी पौलाच्या उदाहरणाचे अनुसरण करू शकणाऱ्यांना विवाह केल्याने अनिवार्यपणे येणाऱ्या चिंता भोगाव्या लागू नयेत अशी त्याची इच्छा होती. मूल नसलेल्या जोडप्यांच्या बाबतीतही, या चिंतांमध्ये आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणी तसेच एखाद्या सोबत्याच्या वृद्ध पालकांप्रती शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या समाविष्ट असू शकतात. (१ तीमथ्य ५:४, ८) वडिलाने या जबाबदाऱ्या उदाहरणीयरीत्या स्वीकारल्या पाहिजेत व यामुळे ख्रिस्ती पर्यवेक्षक या नात्याने त्यांच्या कार्यांवर काही वेळा प्रभाव पडू शकतो. बहुतेक वडील आपल्या कुटुंबाच्या व मंडळीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
१९. “ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे,” असे पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता?
१९ पौलाने पुढे म्हटले: “काळाचा सक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे.” (१ करिंथकर ७:२९) अर्थात, करिंथकरांना उद्देशून असलेल्या या अध्यायात त्याने आधी जे लिहिले त्याबाबतीत पाहता, विवाहित ख्रिश्चनांनी आपल्या पत्नींकडे काहीसे दुर्लक्ष करावे असा त्याच्या म्हणण्याच्या अर्थ नव्हता हे अगदी उघड आहे. (१ करिंथकर ७:२, ३, ३३) “जे ह्या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे,” असे त्याने लिहिले तेव्हा त्याला जे म्हणावयाचे होते ते त्याने दाखवून दिले. (१ करिंथकर ७:३१) पौलाच्या दिवसापेक्षा किंवा प्रेषित योहानाच्या दिवसापेक्षा आता ‘जग नाहीसे होत’ चालले आहे. (१ योहान २:१५-१७) यास्तव, ज्या विवाहित ख्रिश्चनांना ख्रिस्ताचे अनुकरण करताना काही त्याग करावेसे वाटतात ते, विवाहाच्या आनंदात व विशेषाधिकारात पूर्णपणे बुडून जाऊ शकत नाहीत.—१ करिंथकर ७:५.
आत्मत्यागी पत्नी
२०, २१. (अ) अनेक ख्रिस्ती पत्नी कोणते त्याग करण्यास तयार आहेत? (ब) एक पत्नी, तिचा पती वडील असला तरी, त्याच्याकडून कोणत्या गोष्टीची योग्यपणे अपेक्षा करू शकते?
२० इतरांच्या लाभाकरता वडीलजन जसे त्याग करतात, अनेक वडिलांच्या पत्नी महत्त्वपूर्ण राज्य आस्था आणि त्यांच्या वैवाहिक जबाबदाऱ्या यांच्यामध्ये संतुलन राखण्यासाठी झ़टल्या आहेत. हजारो ख्रिस्ती स्त्रियांना आपल्या पतींना पर्यवेक्षक या नात्याने त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात सहकार्य देण्यास आनंद वाटतो. यामुळे यहोवा त्यांच्यावर खूष होतो व त्या जो उत्तम आत्मा प्रदर्शित करतात त्याबद्दल तो त्यांना आशीर्वाद देतो. (फिलेमोन २५) तरीदेखील, पौलाचा संतुलित सल्ला, पर्यवेक्षकांच्या पत्नी आपल्या पतींकडून योग्यपणे तर्कशुद्ध प्रमाणात समय व अवधानाची अपेक्षा करू शकतात हे दाखवतो. पती आणि पर्यवेक्षक या नात्याने आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखण्याकरता आपल्या पत्नींसोबत पुरेसा वेळ घालवणे हे विवाहित वडिलांचे शास्त्रवचनीय कर्तव्य आहे.
२१ परंतु पती, एक ख्रिस्ती वडील असण्याव्यतिरिक्त पिता देखील असतो तेव्हा काय? यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि देखरेखीचे आणखी एक क्षेत्र त्याच्यासमोर खुले होते. त्याबद्दल आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
उजळणीद्वारे
◻ विवाहित पुरुष ख्रिस्ती पर्यवेक्षक असू शकतात हे कोणत्या शास्त्रवचनीय वस्तुस्थिती दाखवतात?
◻ एखादा अविवाहित वडील विवाह करतो तेव्हा त्याला कोणत्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे?
◻ कोणत्या प्रकारे एखादा विवाहित ख्रिस्ती “जगाच्या गोष्टींविषयीची चिंता” करत असतो?
◻ कशाप्रकारे अनेक पर्यवेक्षकांच्या पत्नी आत्म-त्यागाचा उत्तम आत्मा प्रदर्शित करतात?
[१७ पानांवरील चित्रं]
ईश्वरशासित कार्यांत व्यग्र असतानाही वडिलाने आपल्या पत्नीकडे प्रेमळ लक्ष दिले पाहिजे