या अंतसमयातील मुलांची जबाबदारीची वाढ
“आपल्या मुलाबाळांची . . . व्यवस्था चांगली ठेवणारे.”—१ तीमथ्य ३:१२.
१. बहुतेक स्त्रियांठायी कोणती स्वाभाविक इच्छा असते, आणि ती जीवनात सुरुवातीलाच कशी दिसून येते?
पालक होण्याचा आनंद अवर्णनीय आहे. मातृत्वाची भावना स्वाभाविक आहे आणि ती काही स्त्रियांत इतरांपेक्षा अधिक प्रखर असते. मुलांना यांत्रिक खेळणी खेळण्यात तर मुलींना बाहुलीचा खेळ खेळण्यात विशेष आनंद वाटत असतो. खेळणी बनविणाराही शक्य आहे तितकी खरी बनविण्याचा प्रयत्न करतो. कित्येक मुली तर अशा दिवसाकडे आपले डोळे लावून असतात जेव्हा त्यांना कोणा बाहुलीला नव्हे तर स्वतःच्या जिवंत, चिमुकल्या, उबदार व खळखळणाऱ्या बाळाला आपल्या कुशीत कुरवाळता येईल.
आनंद व जबाबदाऱ्या
२. नवजात बालकाकडे पालकांचा दृष्टीकोन कसा असावा, आणि काय करण्याची त्यांनी तयारी केली पाहिजे?
२ मुलांची जबाबदारीने वाढ करण्यात पालकांनी नवजात बालकाकडे एक खेळणे नव्हे तर मानव या अर्थी पाहण्याचे जरुरीचे आहे. कारण त्याच्या जीवनाविषयी व भविष्याविषयी ते निर्माणकर्त्यास जबाबदार आहेत. ते कोणा बालकाला जगात आणतात त्यावेळी पालकांनी स्वतःवर मोठी जबाबदारी उचलण्याची व त्याच्या अनुषंगाने स्वतःमध्ये आवश्यक असणारा बदल करण्याची तयारी ठेवली पाहिजे. याकरवी, ते भरविणे, कपडे पुरविणे, आजारपणात काळजी घेणे व शिक्षण देणे या २० वर्षीय योजनेची सूत्रे हाती घेत असतात, ज्याचा अंतिम परिणाम मात्र तेव्हा सांगता येत नाही.
३. कित्येक ख्रिस्ती पालकांच्या बाबतीत नीतीसूत्रे २३:२४, २५ चा अवलंब का करता येतो?
३ तरीपण हे आनंदाचे आहे की कित्येक ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांची वाढ अशा पद्धतीने केली जे विश्वासू व यहोवाचे समर्पित सेवक बनले. काहींना आपली मुले वाढून पायनियर्स, मिशनरी वा बेथेल कुटुंब सदस्य या सारख्या पूर्ण वेळेची कार्ये घेताना दिसले. अशांच्या पालकांबद्दल हे खरेपणाने म्हणता येतेः “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो. सूज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत; तुझी जन्मदात्री हर्ष पावो.”—नीतीसूत्रे २३:२४, २५.
पालकांच्या हृदयव्यथा
४, ५. (अ) मुले असणाऱ्या वडील व उपाध्य सेवकांच्या बाबतीत शास्त्रवचनीय दृष्ट्या कसली अपेक्षा आहे? (ब) काही मुले आपल्या पित्याला “अरिष्टाप्रमाणे” कशी ठरली आहेत?
४ तरीपण असे नेहमीच घडते असे नाही; ज्यांना मुले आहेत अशा मंडळीतील वडीलांच्या बाबतीत सुद्धा. प्रेषित पौलाने लिहिलेः “देखरेखा अदूष्य, एका स्त्रीचा पति, . . . आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. (ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?)” पुढे पौलाने म्हटलेः “उपाध्य सेवक एका स्त्रीचा पति असावा. ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे.”—१ तीमथ्य ३:२-५, १२.
५ अर्थात, ख्रिस्ती वडीलांना व उपाध्य सेवकांना, त्यांची मुले समज असताना सुद्धा यांनी यहोवाची सेवा करण्याचे नाकारले तर जबाबदार धरता येणार नाही. तरीपण ते आपल्या लहान मुलांबद्दल किंवा जे त्यांच्याकडे राहतात अशा मुलांविषयी जबाबदार आहेत. “आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे” ही शास्त्रवचनीय गरज पुरी करण्यामध्ये हेळसांड केल्याबद्दल वा गंभीररित्या अपयशी ठरल्यामुळे वडीलांना व उपाध्य सेवकांना सेवेचे मोलवान हक्क गमवावे लागले. अशांसाठी त्यांच्या मुलांनी आनंद नव्हे तर अधिक दुःख आणले. “मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे,” हे नीतीसूत्र किती वेळेला तरी खरे ठरले आहे!—नीतीसूत्रे १९:१३.
जबाबदारीचे पितृत्व
६. ख्रिस्ती पतींनी कोणता प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे?
६ सर्व ख्रिस्ती पतींनी, मग त्यांच्यावर मंडळीच्या जबाबदाऱ्या असोत वा नसोत, त्यांनी, लहान मुलांची काळजी त्यांच्या बायकांना घ्यावी लागत असल्यामुळे, बायकोच्या आध्यात्मिकतेवर कसा परिणाम होत असतो याचाहि विचार करावा. प्रत्यक्षात जर बायकोच आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ नाही तर लहान मूल किंवा मुले, तिचा व्यक्तीगत अभ्यास व प्रचारामध्ये सहभागी होण्याच्या विविध संधीवर केवढा परिणाम घडवून आणतील बरे?
७. काही ख्रिस्ती पत्नींच्या बाबतीत काय घडले आहे आणि अशी परिस्थिती येण्यास काय जबाबदार असते?
७ बालकांची व लहान मुलांची काळजी घेत राहण्यात सतत लक्ष द्यावे लागत असल्यामुळे बायकांना मंडळीचा पुस्तक अभ्यास, राज्य सभागृहातील सभा तसेच विभागीय संमेलने आणि प्रांतिय अधिवेशन यातील कार्यक्रमाचा पूर्ण फायदा उचलता येत नाही याची पतींना कल्पना आहे का? अशी ही परिस्थिती, जेव्हा कुटुंबात एकामागून एक मुले येऊ लागतात तेव्हा कित्येक महिने काय पण वर्षानुवर्षे चालूच राहते. मुलांना सांभाळण्याचा भार स्वाभाविकरित्या बापापेक्षा आईवरच जास्त प्रमाणात पडत राहतो. त्यामुळे कधी कधी हे प्रत्ययास येते की ख्रिस्ती पुरुष मंडळीतील खास हक्काच्या प्राप्तीपर्यंत प्रगति करुन दाखवितात; पण त्यांची बायको मात्र आध्यात्मिकदृष्ट्या मागे पडत राहते. हे असे का? कारण लहान मुले आपल्या आईला सभेत लक्ष देऊन ऐकण्यापासून, पवित्र शास्त्राचा खोल अभ्यास करण्यापासून किंवा साक्षीकार्यात पूर्ण रुपाने सहभाग घेण्यापासून परावृत्त करीत असतात. अशी ही स्थिति आहे तर पालकाचे पितृत्व जबाबदार स्वरुपाचे आहे असे म्हटले जाऊ शकते का?
८. मुलांची काळजी घेण्याचा भार काही पिता कसा सांभाळतात व यामुळे त्यांच्या बायकोला कोणता लाभ घडतो?
८ तरीपण हे नित्य घडत नाही हे चांगले आहे. कित्येक ख्रिस्ती पिता मुलांकडे लक्ष ठेवण्याच्या कर्तव्यात आपल्या शिकस्तीनुसार सहकार्य देत आहेत. मंडळीच्या सभेत मुले शांत बसत आहेत याकडे ते जातीने लक्ष देतात. मूल रडू लागले वा मुलाने दंगा करायला सुरुवात केली तर ते त्याला बाहेर घेऊन जातील आणि योग्य शिक्षा देतील. सभेतील कार्यक्रमाचा भाग आईनेच नेहमी का गमवावा बरे? घरी असताना विचारशील पति आपल्या बायकोला घरातील कामे उरकण्यात, मुलांना रात्री निजवण्यात सहकार्य देतात व यामुळेच त्यांना व त्याच्या बायकोला शांतपणे बसून आध्यात्मिक गोष्टी एकाग्रपणे ग्रहण करता येतात.
९. मुले नेहमीच अडथळा बनत नसतात हे कशावरुन सिद्ध होते?
९ मंडळीत सर्व गोष्टींची सुव्यवस्था राखल्यास, लहान मुले असणाऱ्या माता सहाय्यक पायनियर कार्यात सहभागी होऊ शकतात. काही तर नियमित पायनियर सुद्धा आहेत. तद्वत, मुले नेहमीच अडथळा असे नाहीत. कित्येक ख्रिस्ती पालकांनी उत्तम पायनियर आत्मा प्रदर्शित केला आहे.
अपत्यहीन तरी आनंदी
१०. काही विवाहीत जोडप्यांनी कोणता निर्णय घेतला, आणि यामुळे ते कसे आशीर्वादित झाले?
१० काही तरुण जोडप्यांनी अपत्यविना राहण्याचा विचार राखला. इतर स्त्रियांप्रमाणे यांनाही मातृत्वाची स्वाभाविक भावना वाटत होती, पण त्यांनी आपल्या पतींच्या अनुमतीने, मुले होऊ न देण्याचा व यहोवाची सेवा पूर्ण वेळ करण्याचा निर्णय स्विकारला. यापैकी कित्येकांनी पायनियर तर बाकीच्यांनी मिशनरी या अर्थाने कार्य केले आहे. ते मागे वळून, गेलेल्या वर्षांकडे बघतात तेव्हा त्यांना मोठी धन्यता वाटते. त्यांना दैहिक मुले झाली नाहीत. पण त्यांनी नवीन शिष्यांना निपजविले, जे आजतागायत यहोवाची सेवा विश्वासूपणे करीत आहेत. आपल्याला “सत्याचे वचन” प्रदान करण्यात कोणी महत्वपूर्ण काम केले ते ही ‘विश्वासातील खरी लेकरे’ कधीही विसरणार नाहीत.—१ तीमथ्य १:२; इफिसकर १:१३; पडताळा १ करिंथकर ४:१४, १७; १ योहान २:१.
११. (अ) अपत्यहीन असणारी कित्येक जोडपी यहोवाची सेवा कोणत्या प्रमाणात करीत आहेत आणि त्यांना खंत का वाटत नाही? (ब) “राज्यासाठी” ज्यांनी निःसंतान राहण्याचा निर्णय घेतला अशा दांपत्यांच्या बाबतीत कोणते शास्त्रवचन लागू होणारे आहे?
११ जगभरातील इतर कित्येक विवाहीत जोडप्यांनी यहोवाची पूर्ण वेळेची सेवा विभागीय, प्रांतिय वा बेथेल प्रमाणात करण्यासाठी पालकत्वाच्या हक्काच्या आनंदावर पाणी सोडले. त्या खास हक्काद्वारे त्यांना यहोवाची तसेच त्यांच्या बांधवांची जी सेवा करता आली त्याकडे ते आता समाधानाने पाहू शकतात. त्यांना कोणतीही खंत वाटत नाही. या जगात मुलांचा जन्म घडवून आणण्याचा आनंद त्यांना लाभला नसला तरी कार्याच्या विविध क्षेत्राद्वारे देवाच्या राज्याची आस्था वाढविण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. “राज्यासाठी” निःसंतान राहण्याचा ज्या जोडप्यांनी निर्णय घेतला त्यांच्याबाबत हे शास्त्रवचन उचितार्थाने लागू होण्याजोगे आहे, जे म्हणतेः “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति ही विसरुन जाण्यास तो अन्यायी नाही.”—मत्तय १९:१२; इब्रीयांस ६:१०.
व्यक्तीगत बाब
१२. (अ) मुलांना जन्मास आणणे हा अद्वितीय हक्क का आहे? (ब) मुलांची निपज ही कोणत्या काळी देवाकडील नेमणूक होती?
१२ आमच्या चर्चेच्या आरंभाला आम्ही हे पाहिले होते की, मुले जन्मास आणणे ही देवाची देणगी आहे. (स्तोत्रसंहिता १२७:३) हा असा अद्वितीय हक्क आहे जो यहोवाच्या आत्मिक प्राण्यांना नाही. (मत्तय २२:३०) तो एक असा काळ होता जेव्हा यहोवाने पृथ्वीवरील आपल्या सेवकांना जे काम नेमून दिले त्यामध्ये मुले जन्मास आणणे हा एक भाग होता. ही गोष्ट आदाम व हव्वेविषयी खरी होती. (उत्पत्ती १:२८) तीच गोष्ट जलप्रलयातून वाचलेल्या लोकांविषयीही खरी होती. (उत्पत्ती ९:१) मुलांची निपज करण्याद्वारे इस्त्राएल लोक संख्येने बहुतपट व्हावेत असे यहोवाने इच्छिले होते.—उत्पत्ती ४६:१-३; निर्गम १:७, २०; अनुवाद १:१०.
१३, १४. (अ) आजच्या काळात मुलांची निपज याविषयी काय म्हटले जाऊ शकते, आणि कोणती टीका अयोग्य आहे? (ब) मुलांची निपज ही या अंतसमयात व्यक्तीगत बाब असली तरी कोणता सल्ला दिलेला आहे?
१३ यहोवाने आज आपल्या लोकांना जे काम नियुक्त करुन दिले आहे त्याचा मुले जन्मास आणणे हा खासपणे भाग नाही. तरीपण ज्यांची तशी इच्छा आहे त्या विवाहीत जोडप्यांना देव तो हक्क देऊन आहे. कोणा ख्रिस्ती दांपत्याने आपल्याला मुले असावीत हा निर्णय घेतला तर त्याबद्दल त्यांची टीका करता कामा नये. याचप्रमाणे जे निःसंतान राहू इच्छितात अशांची देखील टीका केली जाऊ नये.
१४ अशाप्रकारे या अंतसमयात मुलांची निपज ही व्यक्तिगत बाब आहे व ती प्रत्येक दांपत्याने स्वतःच ठरवली पाहिजे. तथापि, “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे” हा दृष्टीकोण लक्षात ठेवता विवाहीत दांपत्यांनी जगात मुले जन्मास आणण्यामुळे जे लाभ व तोटे होतील त्यांचा काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करुन पाहणे बरे ठरेल. (१ करिंथ ७:२९) ज्यांना मुले व्हावीत असे वाटते त्यांनी मुलांच्या जन्मामुळे जो आनंद मिळतो त्याविषयीची जाणीव त्यांच्याठायी असली तरी ज्या मुलांना ते जगात आणतात त्यांच्याविषयीच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत व त्यातून स्वतःसाठी तसेच मुलांसाठी कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल त्याचीहि पूर्ण जाण राखली पाहिजे.
जेव्हा अनपेक्षित घडते
१५, १६. (अ) अनपेक्षितरित्या गर्भधारणा घडल्यास कोणती मनोवृत्ती टाळावी, व का? (ब) कोणाही बाळाबद्दल काय वाटण्यास हवे आणि त्यात कोणत्या जबाबदारींचा समावेश आहे?
१५ कोणी म्हणेलः ‘हे ठीक आहे. पण अनपेक्षितपणे मूल जन्माला येत आहे त्याचे काय?’ अशी ही गोष्ट, ज्या दांपत्यांना ही पूर्ण जाणीव होती की, मुले जन्मास आणण्याचा हा योग्य काळ नाही त्या कित्येकांच्या बाबतीत घडली. यापैकीचे काही पूर्ण वेळेच्या कार्यात कित्येक वर्षांपासून होते. आता अनपेक्षितरित्या आगमन करणाऱ्या नव्या पाहुण्याविषयी त्यांनी काय वाटू द्यावे?
१६ येथेच पालकत्वाची जबाबदारी सामोरी येते. गर्भधारणा अनपेक्षित असू शकेल, पण जन्माला येणारे बाळ नको असे कोणाही ख्रिस्ती पालकांनी वाटू देऊ नये. बाळाच्या आगमनाने त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे आव्हान आणले असेल तरीही त्यांनी याचा त्रागा वाटू देता कामा नये. कारण वस्तुतः बाळाच्या गर्भधारणेस तेच व्यक्तीशः जबाबदार होते. तर आता मुलाचा जन्म होऊ घातला आहे तेव्हा त्यांनी आपल्या बदललेल्या स्थितीचे स्वागतच करावे, कारण सर्व मानवांना “काळपरत्वे आणि अनपेक्षित गोष्टीं”ना सामोरे जावे लागतेच हे त्यांना ठाऊक असले पाहिजे. (उपदेशक ९:११, न्यू. व.) स्वेच्छेने म्हणा वा अनपेक्षितरित्या, त्यांनी, यहोवा देव या रचनाकाराच्या निर्मिती कार्यात भाग घेतलेला असतो. याकरताच त्यांनी बाळाचा, एक पवित्र ठेवा या नात्याने स्विकार केला पाहिजे व “प्रभूमध्ये आपल्या पालक”त्वाची जबाबदारी पत्करली पाहिजे.—इफिसकर ६:१.
‘सर्वकाही प्रभूच्या नावाने करा’
१७. पौलाने कलस्सैकरांना कोणता सल्ला दिला आणि हाच सल्ला आज कसा अनुसरता येईल?
१७ कौटुंबिक प्रकरणाविषयीच्या सूचना सादर करण्याआधी प्रेषित पौलाने असे लिहिलेः “बोलणे किंवा करणे, जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभु येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुति करा.” (कलस्सैकर ३:१७-२१) ख्रिश्चनाने स्वतःला कोणत्याहि स्थितीत आल्याचे पाहिले तरी त्याने त्याविषयी देवाचे उपकारस्मरण करावे आणि ‘प्रभुच्या नावाने सर्व काही करावे.’
१८, १९. (अ) सडे ख्रिस्तीजन तसेच अपत्यविना असणारी दांपत्ये ‘सर्वकाही प्रभुच्या नावात’ कसे करु शकतील? (ब) ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांविषयी कोणता दृष्टीकोन राखावा, आणि त्यांनी स्वतःपुढे कोणती ध्येये ठेवावीत?
१८ ज्या ख्रिश्चनाने स्वतःला सडे राखण्याचे ठरविले आहे तो किंवा ती आपली ही स्वतंत्रता चैनबाजी वा सुखलोलुपतेसाठी नव्हे तर “यहोवासाठी जिवेभावे” सेवा करण्यासाठी वापरील. शक्य आहे तर तो पूर्ण वेळेच्या सेवेत स्वतःला समाविष्ट करील. (कलस्सैकर ३:२३; १ करिंथकर ७:३२) याचप्रमाणे, ज्या विवाहीत दांपत्यांनी स्वतःला अपत्यविना राखण्याचे ठरविले असेल ते ‘ह्या जगाचा पूर्ण उपयोग करणार नाहीत’ तर त्याऐवजी देवाच्या राज्याच्या सेवेला आपल्या जीवनात शक्य तितकी मोठी जागा देतील.—१ करिंथकर ७:२९-३१.
१९ ज्या ख्रिस्तीजनांना मुले आहेत त्यांनी आपले पालकत्व जबाबदारीने पत्करले पाहिजे. आपली मुले यहोवाच्या सेवेत अडथळा आहेत या दृष्टीने बघण्यापेक्षा त्यांनी मुलांसंबंधीची प्राप्त झालेली खास नेमणूक या अर्थाने पाहण्यास हवे. याचा काय अर्थ होतो? कोणा समर्पित ख्रिश्चनाला कोणी सत्यात आस्था दाखविणारा भेटतो तेव्हा तो त्याचा नियमित रुपाने पवित्र शास्त्र अभ्यास घेऊ लागतो. अभ्यास सुरु झाल्यावर अभ्यास घेणारा त्याच्यासाठी खूप परिश्रम घेतो. तो या नव्या आस्थेवाईकाने आध्यात्मिक प्रगति करावी याकरता दर आठवड्याला नियमाने भेटी देतो. तर ख्रिश्चनांच्या मुलांविषयी यापेक्षा काही कमी नाही. मुलांनी आध्यात्मिकरित्या प्रगति करावी व आपल्या निर्माणकर्त्यावर प्रेम करण्यास शिकावे म्हणून शक्य आहे तितक्या लवकर आणि योग्यरितीने आयोजित करण्यात आलेला अभ्यास नियमित रुपात चालविणे आवश्यक आहे. (२ तीमथ्य ३:१४, १५) याशिवाय पालकांनी, राज्य सभागृहात राखतात तेच चांगले उदाहरण घरीही राखण्याची दक्षता घ्यावी. तसेच शक्य आहे तितक्या परिमाणात ते आपल्या मुलांना क्षेत्रकार्याची तालीम देण्याची जबाबदारी पूर्ण करतील. अशाप्रकारे क्षेत्रात इतरांना प्रचार करण्यासोबत पालक, यहोवाच्या मदतीने आपल्या मुलांना ‘शिष्य बनवतील.’—मत्तय २८:१९.
“मोठे संकट” काळातील मुले
२०. आम्हापुढे काय उभे आहे आणि कोणत्या अडचणींविषयी येशूने इशारा दिला?
२० आता आम्हापुढे “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट” सामोरे आहे. (मत्तय २४:२१) तो काळ प्रौढ व मुले या दोघांसाठी त्रासाचा असेल. सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयीच्या भविष्यवादात येशूने भाकित केले की, ख्रिस्ती सत्य कुटुंबात विभक्तता निर्माण करील. तो म्हणालाः “तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारविण्यासाठी धरुन देईल आणि मुले आपल्या आईबापावर उठतील व त्यांचा प्राणघात करवितील.” (मार्क १३:१२) त्यामुळे हे उघड आहे की अंतसमयात मुलांची निपज करणे हे नेहमीच शुद्ध प्रकारचा आनंद देऊ शकणार नाही. ते अंतःकरण दुःखविणारे, निराशाजनक व येशूच्या वर अवतरीत केलेल्या शब्दांप्रमाणे धोक्याचेहि ठरु शकते.
२१. (अ) भविष्याच्या वास्तवतेची जाणीव असली तरी पालकांनी अवास्तवपणे चिंताग्रस्त का होऊ नये? (ब) त्यांना स्वतःबद्दल आणि आपल्या मुलांबद्दल कोणती आशा बाळगता येईल?
२१ तथापि, येणाऱ्या अडचणींची वास्तवता लक्षात असली तरी मुले असणाऱ्यांनी भविष्याविषयीची अवास्तव चिंता करण्याची गरज नाही. ते स्वतः विश्वासू राहिले आणि आपल्या मुलांना “यहोवाचे शिक्षण व बोध” करण्यात करता येईल तितके त्यांनी केले तर त्यांच्या आज्ञाधारक मुलांना संमती लाभेल असा आत्मविश्वास त्यांना राखता येईल. (इफिसकर ६:४; पडताळा १ करिंथकर ७:१४.) “मोठा लोकसमुदाय” याचा भाग या नात्याने त्यांना व त्यांच्या मुलांना “मोठे संकट” यातून बचावण्याची आशा धरता येईल. अशी ही मुले यहोवाचे विश्वासू सेवक या अर्थी वाढली तर आपल्याला जबाबदारीचे पालक लाभले याची त्यांना सतत धन्यता वाटेल आणि ते यहोवाला सदासर्वदा कृतज्ञ राहतील.—प्रकटीकरण ७:९, १४; नीतीसूत्रे ४:१, ३, १०.
उजळणी प्रश्न
◻ मुलाच्या जन्मामुळे कोणता दीर्घ कार्यक्रम लागू होतो?
◻ काही वडील व उपाध्य सेवकांनी सेवेचे आपले हक्क का गमाविले?
◻ बायकोच्या गर्भधारणेसंबंधाने ख्रिस्ती पतींनी कोणकोणत्या गोष्टींचा आधीच विचार करण्यास हवा?
◻ कोणी ख्रिस्ती दांपत्य अपत्यविना राहून देखील आनंदी असू शकते हे कशामुळे दिसते?
◻ बाळाच्या जन्माविषयी पालकांनी कोणता दृष्टीकोन राखण्यास हवा, आणि त्यांनी भविष्याविषयी अवास्तव चिंता का करु नये?
[२५ पानांवरील चित्रं]
सभांमध्ये मुलांना शांत बसविण्याच्या जबाबदारीत पित्याला सहकार्य देता येईल