मन वळवण्याच्या कलेद्वारे हृदयाचा ठाव घेणे
अनेक लोक “मन वळवणे” या शब्दांकडे जरा संशयानेच पाहतात. मन वळवणे म्हटले, की लगेच एखाद्याच्या मनात, बळजबरीने काहीतरी विकत घेण्याची गळ घालणारा विक्रेता किंवा ग्राहकांना फसविणाऱ्या अथवा चालाखीने त्यांचा गैरफायदा घेण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या जाहिरातीचा विचार येईल. बायबलमध्येही, काहीवेळा मन वळवण्याच्या कल्पनेला नकारात्मक अर्थाने वापरण्यात आले आहे. काहीवेळा बायबलमध्ये ही कल्पना भ्रष्ट करण्यास किंवा मार्गभ्रष्ट करण्यास सूचित करते. उदाहरणार्थ, ख्रिस्ती प्रेषित पौलाने गलतीकरांना लिहिले: “तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही खरेपण मानू नये म्हणून तुम्हास कोणी अडवेल? हे मन वळवणे तुम्हास बोलावणाऱ्याकडून नाही.” (गलतीकर ५:७, ८, पं.र.भा.) पौलाने कलस्सैकरांना इशारा दिला: ‘तुम्हाला कोणी लाघवी भाषणाने भुलवू नये [तुमचे मन वळवू नये].’ (कलस्सैकर २:४) अशाप्रकारचे मन वळवणे खोट्या आधारांवरील धूर्त युक्तिवादांवर अवलंबून असते.
परंतु, तीमथ्याला लिहिलेल्या आपल्या दुसऱ्या पत्रात प्रेषित पौलाने मन वळवण्याच्या कल्पनेला एका वेगळ्या अर्थाने उपयोगात आणले. त्याने लिहिले: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे [मन वळवण्यात आले] त्या धरून राहा.” (२ तीमथ्य ३:१४) तीमथ्याचे ‘मन वळवण्यात’ आले त्याअर्थी त्याच्या आईने आणि आजीने त्याची फसवणूक केली नाही, उलटपक्षी त्यांच्यामुळेच त्याला शास्त्रवचनीय सत्य शिकण्यास मिळाले.—२ तीमथ्य १:५.a
रोममध्ये पौल जेव्हा नजरकैदेत होता तेव्हा त्याने त्या लोकांना चांगल्याप्रकारे साक्ष दिली आणि “मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरिता [मन वळवण्याकरता] तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करीत होता.” (प्रेषितांची कृत्ये २८:२३) पौल त्याच्या श्रोत्यांना ठकवत होता का? निश्चितच नाही! तर मग हे स्पष्ट आहे, की मन वळवणे हे नेहमीच वाईट नसते.
“मन वळवणे” या भाषांतरित ग्रीक मूळ शब्दाचा मूलभूत अर्थ सकारात्मक आहे जसे पटवून सांगणे, सबळ तर्कशुद्ध गोष्टींनी एखाद्याचे विचार बदलणे. अशाप्रकारे एखादा शिक्षक शास्त्रीय आधार तयार करू शकतो आणि मन वळवण्याच्या कलेचा उपयोग करून दुसऱ्यांमध्ये बायबल सत्याचा विश्वास रुजवू शकतो. (२ तीमथ्य २:१५) खरोखरच, हे पौलाच्या सेवाकार्याचे एक चिन्ह होते. ख्रिस्ती शिकवणींना खोटे समजणाऱ्या देमेत्रिय नामक सोनाराने सुद्धा असे लिहिले, की “हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनांत भरवून त्यांना फितविले आहे [त्यांचे मन वळवले आहे].”—प्रेषितांची कृत्ये १९:२६.
मन वळवण्याच्या कलेचा सेवाकार्यात उपयोग करणे
आपल्या शिष्यांना येशू ख्रिस्ताने अशी सूचना दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) सुमारे २३० पेक्षा अधिक देशांत, यहोवाचे साक्षीदार या आज्ञेचे पालन करत आहेत. सन १९९७ या त्यांच्या सेवा वर्षाच्या प्रत्येक महिन्यात त्यांनी जगभरात सरासरी ४५,५२,५८९ बायबल अभ्यास चालवले.
गृह बायबल अभ्यास चालवण्याचा विशेषाधिकार तुम्हालाही लाभला असल्यास मन वळवण्याच्या कलेचा उपयोग करण्याच्या आव्हानाची तुम्ही अपेक्षा करू शकता. उदाहरणार्थ, समजा अभ्यासाच्या पुढील सत्रादरम्यान त्रैक्यावर एखादा प्रश्न उद्भवतो. तुमचा विद्यार्थी या सिद्धान्तावर विश्वास ठेवतो, अशावेळेस तुम्ही काय कराल? या विषयावरील एखादे प्रकाशन तुम्ही त्याला देऊ शकता. कदाचित तुम्हाला आढळेल, की विद्यार्थ्याला देव आणि येशू एक नाहीत याची खात्री पटलेली आहे. पण अद्यापही त्याच्या मनात याविषयी काही प्रश्न घोळत असल्यास काय?
काळजीपूर्वक ऐका. विशिष्ट विषयाच्या बाबतीत तुमच्या विद्यार्थ्याचा आधीपासूनच कोणता विश्वास आहे, हे ठरविण्यास तुम्हाला यामुळे मदत होईल. उदाहरणार्थ, तुमचा विद्यार्थी म्हणतो, “माझा त्रैक्यावर विश्वास आहे,” तेव्हा तुम्ही या सिद्धान्ताला खोडून काढण्यासाठी लगेच शास्त्रवचनावर चर्चा सुरू कराल. पण त्रैक्याविषयी वेगवेगळे विश्वास बाळगले जातात. तुमचा विद्यार्थी कदाचित अशाचप्रकारचा काहीसा वेगळा विश्वास बाळगत असेल आणि त्रैक्याविषयीच्या तुमच्या मतापेक्षा तो विश्वास अगदी भिन्न असेल. पुनर्जन्म, अमरत्व आणि तारण यांसारख्या इतर विश्वासाच्या बाबतीतही हीच गोष्ट होऊ शकते. म्हणून बोलण्याच्या आधी लक्षपूर्वक ऐका. विद्यार्थ्याचा एखादा विशिष्ट विश्वास आहे असे गृहीत धरू नका.—नीतिसूत्रे १८:१३.
प्रश्न विचारा. यामध्ये पुढील प्रश्नांचा समावेश होईल: ‘तुम्ही आधीपासूनच त्रैक्यावर विश्वास करत आला आहात का? बायबल या विषयावर काय म्हणते याचा तुम्ही संपूर्ण अभ्यास केला का? देव जर त्रैक्याचा भाग असता, तर त्याचे वचन अर्थात बायबल आपल्याला त्याविषयी स्पष्ट आणि थेटपणे सांगणार नाही का?’ विद्यार्थ्याला शिकवत असताना अधूनमधून खालील प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही अंमळ थांबावे: ‘आतापर्यंत आपण काय शिकलो, तुम्हाला ते खरोखरच पटतं का? या स्पष्टीकरणाशी तुम्ही सहमत आहात का?’ कौशल्याने प्रश्न विचारण्याद्वारे तुम्ही शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यालाही सामील करता. तुम्ही एखाद्या विषयावर स्पष्टीकरण देत राहावे आणि त्यांनी मात्र नुसतेच ऐकत राहावे हे योग्य नाही.
अर्थपूर्ण युक्तिवादाचा उपयोग करा. उदाहरणार्थ, त्रैक्याच्या सिद्धान्तावर चर्चा करत असताना तुम्ही विद्यार्थ्याला असे म्हणू शकता: ‘येशूचा बाप्तिस्मा होत असताना, आकाशातून अशी वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस.” जर देव या पृथ्वीवर खरोखरच बाप्तिस्मा घेत होता तर पृथ्वीवरील लोकांना तो आवाज ऐकविण्यासाठी देवाने त्याचा आवाज पृथ्वीवरून आकाशात आणि आकाशातून पुन्हा पृथ्वीवर का प्रक्षेपित करावा? हे फसवण्यासारखे होणार नाही का? “खोटे बोलू न शकणारा” देव अशाप्रकारची फसवेगिरी करील का?’—लूक ३:२१, २२; तीत १:१, २.
कौशल्याने अर्थपूर्ण वादविवाद केल्यामुळे त्याचा फार प्रभाव पडतो. एका स्त्रीच्या उदाहरणाचा आपण विचार करू या; आपण त्यांना बार्बरा म्हणू. लहानपणापासून त्यांचा असा विश्वास होता, की येशू हा देव आहे आणि पवित्र आत्म्याचा समावेश असलेल्या त्रैक्याचा तो एक भाग आहे. परंतु यहोवाच्या एका साक्षीदाराने त्यांना सांगितले, की देव आणि येशू या वेगवेगळ्या दोन व्यक्ती आहेत आणि आपल्या विधानाच्या आधारासाठी त्याने त्यांना शास्त्रवचनेही दाखवली.b बार्बरा बायबलचे खंडन करू शकत नव्हत्या पण त्याचवेळी त्या अगदी हताश झाल्या. कारण आजवर त्या त्रैक्याच्या सिद्धान्तावर फार मनोभावाने विश्वास करत आल्या होत्या.
त्या साक्षीदाराने बार्बरासोबत सहनशीलतेने वादविवाद केला. त्याने विचारले, “कुटुंबात दोन व्यक्तींचा समान दर्जा आहे हे समजावयाचे असल्यास तुम्ही कुणाचे उदाहरण द्याल?” त्यांनी काहीवेळ विचार केला आणि मग म्हटले: “कदाचित दोन भावांचं.” त्या साक्षीदाराने म्हटले, “अगदी बरोबर, कदाचित एकसारखे दिसणाऱ्या जुळ्या भावांचं उदाहरण देता येईल. परंतु आपण देवाकडे पिता या नात्याने पाहावं आणि त्याच्याकडे पुत्र या नात्याने पाहावं, असं शिकवताना येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?” “हो, आता मला कळलं,” बार्बरा यांनी म्हटले आणि तिने आश्चर्यही व्यक्त केले. “म्हणजे, त्या दोघांपैकी एक मोठा असून त्याच्याकडे जास्त अधिकार आहे, असं तो म्हणतोच तर.”
“बरोबर” साक्षीदाराने उत्तर दिले, “आणि पितृप्रधान समाजातील येशूच्या श्रोतृगणांना हे कदाचित सहज समजलं असावं.” सांगत असलेल्या गोष्टीवर जोर देत साक्षीदाराने म्हटले: “दोन व्यक्ती समान दर्जाच्या आहेत हे जर इतके चपलख बसणारे उदाहरण देऊन आपण सांगू शकलो—दोघा भावांचा किंवा एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या भावांचे उदाहरण—तर मग येशूसारख्या महान शिक्षकाला असं करणं कठीण नव्हतं. पण तसं करण्याऐवजी, त्याच्यातील आणि देवातील संबंधाचे वर्णन करण्यासाठी त्याने ‘पिता’ आणि ‘पुत्र’ या शब्दांचा उपयोग केला.”
अखेरीस बार्बरा यांना मुद्दा समजला आणि तो त्यांनी मान्यही केला. मन वळवण्याच्या कलेने त्यांच्या हृदयाचा ठाव घेतला होता.
भावना गोवलेल्या असतात तेव्हा
अगदी मुळावलेल्या धार्मिक विश्वासांमध्ये बहुतेक वेळा भावना गोवलेल्या असतात. कॅथलिक पंथाच्या उपासक असणाऱ्या एडना यांच्या उदाहरणाचा विचार करा. देव आणि येशू एक व्यक्ती नाहीत, हे त्यांच्या किशोरवयीन नातवांनी त्यांना शास्त्रवचनातून स्पष्टपणे दाखवून दिले. एडना यांनी जे ऐकले ते त्यांना समजले सुद्धा. तरीदेखील त्यांनी विनयशीलतेने आणि तरीही दृढतेने म्हटले: “माझा पवित्र त्रैक्यावरच विश्वास आहे.”
तुम्हाला सुद्धा कदाचित अशाप्रकारचा अनुभव आला असेल. काही लोक त्यांच्या धर्मसिद्धान्ताकडे अशाप्रकारे पाहतात जणू काही त्या सिद्धान्तावरून त्यांची ओळख व्हावी. अशा बायबल विद्यार्थ्यांचे मन वळवण्यासाठी, भावनाशून्य वादविवादांपेक्षा किंवा पुष्कळ शास्त्रवचने दाखवण्यापेक्षा अधिक काही करण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन चुकीचा आहे, हे शाबीत होऊ शकेल. मन वळवण्याच्या कलेसोबत समंजसपणाद्वारे अशाप्रकारच्या स्थितींना चांगल्यारितीने हाताळले जाऊ शकते. (पडताळा रोमकर १२:१५; कलस्सैकर ३:१२.) प्रभावशाली शिक्षकाचा विश्वास दृढ असला पाहिजे हे मान्य आहे. उदाहरणार्थ, पौलाने अशाप्रकारच्या शब्दांचा उपयोग केला जसे, “माझी खात्री आहे” आणि “मला ठाऊक आहे आणि प्रभु येशूमध्ये माझी खातरी आहे.” (रोमकर ८:३८; १४:१४) परंतु आपले ठाम विश्वास व्यक्त करताना, आपण हटवादी, फाजील धार्मिक स्वरात बोलू नये तसेच बायबलमधील सत्य सादर करताना आपण कोणास टोमणे मारू नये किंवा काही अपमानजनक बोलू नये. आपल्या बोलण्यातून विद्यार्थ्याच्या भावना दुखावल्या जाव्यात किंवा त्याचा अपमान व्हावा, असे आपल्याला निश्चितच वाटत नाही.—नीतिसूत्रे १२:१८.
त्याऐवजी, विद्यार्थ्याच्या विश्वासांचा आदर करणे आणि असे विश्वास बाळगण्याचा त्याला हक्क आहे हे ओळखणे अधिक परिणामकारक आहे. सर्वात मुख्य म्हणजे—नम्रता. एखाद्या नम्र शिक्षकाला आपण विद्यार्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, असे केव्हाही वाटणार नाही. (लूक १८:९-१४; फिलिप्पैकर २:३, ४) ईश्वरीरीत्या मन वळवण्यात अशाप्रकारची नम्रता समाविष्ट आहे. ज्यामुळे आपण जणू असे म्हणतो: ‘हे समजण्यास यहोवाने मला प्रेमाने मदत केली आहे. मला जे समजलं ते तुम्हाला सांगावं असं मला वाटतं.’
करिंथमधील आपल्या सहख्रिश्चनांना पौलाने लिहिले: “आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो.” (२ करिंथकर १०:४, ५) यहोवास अप्रसन्न करणाऱ्या खोट्या सिद्धान्तांच्या मजबूत तटबंदीचे तसेच अगदी खोलवर मुळावलेल्या चालीरीतींचे खंडन करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार आज देवाच्या वचनाचा उपयोग करत आहेत. (१ करिंथकर ६:९-११) असे करताना, साक्षीदार लक्षात ठेवतात, की यहोवा देखील त्यांच्यासोबत प्रेममय सहनशीलतेने वागला आहे. त्याचे वचन अर्थात बायबल त्यांच्याजवळ असल्यामुळे तसेच खोट्या शिकवणींचे निर्मूलन करण्यासाठी आणि मन वळवण्याच्या कलेद्वारे लोकांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी या प्रबळ साधनाचा उपयोग करण्यात ते किती आनंदी आहेत!
[तळटीपा]
a याच टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे ७-९ वरील “युनीके व लोईस—अनुकरणीय शिक्षक,” हा लेख पाहा.
b पाहा योहान १४:२८; फिलिप्पैकर २:५, ६; कलस्सैकर १:१३-१५. अधिक माहितीसाठी, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित तुम्ही त्रैक्यावर विश्वास ठेवावा का?, हे माहितीपत्रक पाहा.
[२३ पानांवरील चौकट]
तुमच्या विद्यार्थ्याच्या हृदयाचा ठाव घेणे
◻ बायबल विद्यार्थ्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याकरता यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा.—नेहम्या २:४, ५; यशया ५०:४.
◻ बायबल विद्यार्थ्याचा विश्वास नेमका काय आहे आणि एखादा खोटा विश्वास त्याला अपीलकारक का वाटतो, ते समजून घ्या.—प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३.
◻ एक सामान्य पाया कायम ठेवताना कृपाळू, सहनशीलरीत्या एक तर्कशुद्ध, शास्त्रवचनीय चर्चा करा.—प्रेषितांची कृत्ये १७:२४-३४.
◻ शक्य असल्यास प्रभावी दृष्टान्ताद्वारे बायबलमधील सत्यावर जोर द्या.—मार्क ४:३३, ३४.
◻ बायबलच्या अचूक ज्ञानाचा स्वीकार केल्याने मिळणारे लाभ विद्यार्थ्यांना दाखवा.—१ तीमथ्य २:३, ४; २ तीमथ्य ३:१४, १५.