पालकांनो—आपल्या मुलांना बालपणापासूनच देवाविषयी शिकवा
बायबल म्हणते: “पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.” (स्तो. १२७:३) म्हणूनच, बाळाचा जन्म होतो तेव्हा ख्रिस्ती पालकांना इतका आनंद का होतो हे आपण समजू शकतो.
पण, आनंदासोबतच पालकांवर एक गंभीर जबाबदारीही येते. आपल्या मुलाची वाढ होऊन त्याने पुढे एक सुदृढ व्यक्ती बनावे असे जर पालकांना वाटत असेल तर त्याला नियमितपणे पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. त्याच प्रकारे, मुलांनी खऱ्या उपासनेसाठी खंबीर भूमिका घ्यावी म्हणून त्यांना आध्यात्मिक आहाराची आणि पालकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. याद्वारे पालक आपल्या मुलांच्या मनात देवाची तत्त्वे बिंबवण्याचा प्रयत्न करतात. (नीति. १:८) पण पालकांनी कधीपासून आपल्या मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली पाहिजे, आणि यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
पालकांनाही शिकण्याची गरज आहे
प्राचीन इस्राएलमधील सरा गावात राहणाऱ्या दानवंशातील मानोहाचे उदाहरण लक्षात घ्या. यहोवाच्या देवदूताने मानोहाच्या वांझ असलेल्या बायकोला सांगितले की ती एका बाळाला जन्म देईल. (शास्ते १३:२, ३) हे ऐकून देवभीरू मानोहाला आणि त्याच्या बायकोला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो! पण त्याचबरोबर त्यांना काही गोष्टींची चिंताही होती. त्यामुळे, मानोहाने अशी प्रार्थना केली: “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे असे कर.” (शास्ते १३:८) येणाऱ्या बाळाचे संगोपन कसे करावे याबद्दल मानोहाला आणि त्याच्या पत्नीला चिंता होती. त्यांनी आपल्या मुलाला, शमशोनाला देवाच्या आज्ञा शिकवल्या असतील यात काहीच शंका नाही आणि त्यांचे हे प्रयत्न नक्कीच सफल ठरले. कारण बायबल म्हणते: “परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने [शमशोन] संचार करू लागला.” आणि यामुळेच इस्राएलचा शास्ता या नात्याने शमशोन बरीच शक्तिशाली कामे करू शकला.—शास्ते १३:२५; १४:५, ६; १५:१४, १५.
येणाऱ्या बाळाचे संगोपन कसे करावे याबद्दल मानोहाने देवाकडे मार्गदर्शन मागितले
पालकांनी, मुलांना कधीपासून देवाविषयीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली पाहिजे? तीमथ्याला त्याची आई युनीके आणि आजी लोईस यांनी “बालपणापासूनच,” “पवित्र शास्त्राची माहिती” देण्यास सुरुवात केली होती. (२ तीम. १:५; ३:१५) यावरून दिसून येते की, तीमथ्याला अगदी लहानपणापासून शास्त्रवचनांचे शिक्षण देण्यात आले होते.
ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलाला “बालपणापासूनच” देवाविषयीचे शिक्षण देण्याकरता मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि आधीपासूनच योजना केली पाहिजे. नीतिसूत्रे २१:५ (मराठी कॉमन लँग्वेज) म्हणते: “उद्योग्याच्या योजना सुबत्ता आणतात.” बाळाचा जन्म होण्याआधीच पालक त्याच्या येण्याची काळजीपूर्वक तयारी करतात यात काही शंका नाही. येणाऱ्या बाळाला लागणार असलेल्या गोष्टींची ते कदाचित यादीही बनवून ठेवत असतील. पण, याबरोबरच आध्यात्मिक गोष्टींचीही तयारी करणे महत्त्वाचे आहे. बाळ अगदी लहान असते तेव्हापासूनच त्याला देवाविषयीचे शिक्षण देण्याचे ध्येय पालकांनी ठेवले पाहिजे.
अर्ली चाइल्डहूड काउन्ट्स—अ प्रोग्रामिंग गाइड ऑन अर्ली चाइल्डहूड केअर फॉर डेव्हलपमेंट हे पुस्तक म्हणते: “बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांत त्याच्या मेंदूची झपाट्याने वाढ होत असते; त्यामुळे सुरुवातीचा तो काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या काळात सिनॅप्सेसची म्हणजे ज्यांमुळे शिकणे शक्य होते त्या मेंदूतील जोडांची संख्या वीसपट वाढते.” तेव्हा, पालकांनी मुलांच्या मनात आध्यात्मिक गोष्टी व मूल्ये रुजवण्यासाठी त्यांच्या मानसिक विकासातील या अल्प काळाचा पुरेपूर फायदा घेणे किती सुज्ञतेचे आहे!
सामान्य पायनियर असलेली एक आई आपल्या लहान मुलीबद्दल म्हणते: “माझी मुलगी फक्त एक महिन्याची होती तेव्हापासून मी तिला माझ्यासोबत क्षेत्र सेवेत घेऊन जायचे. तिला त्यातलं काही कळत नसलं तरी बालपणापासूनच या गोष्टी केल्यामुळं तिच्या मनावर खूप चांगला प्रभाव पडला. कारण ती दोन वर्षांची झाली तेव्हा न घाबरता क्षेत्र सेवेत लोकांना ट्रॅक्ट देऊ लागली.”
अशा प्रकारे, बालपणापासूनच मुलांना देवाविषयीचे शिक्षण दिल्यामुळे नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतात. पण, मुलांना आध्यात्मिक शिक्षण देत असताना पालकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.
वेळ काढा
लहान मुले चुळबुळी असतात. ती एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष देऊ शकत नाहीत. आणि हेच पालकांसाठी एक मोठे आव्हान असू शकते. लहान मुलांचे लक्ष पटकन एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ शकते. कारण ती फार जिज्ञासू असतात, नवनवीन गोष्टींविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. तर मग, पालक आपल्या मुलांना जे शिकवण्याचा प्रयत्न करतात त्यावर लक्ष केंद्रित करण्यास ते त्यांना कशी मदत करू शकतात?
मोशेने काय म्हटले ते विचारात घ्या. अनुवाद ६:६, ७ म्हणते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.” “बिंबव” असे जे म्हटले आहे त्याचा अर्थ, एखादी गोष्ट वारंवार सांगून शिकवणे. लहान मूल एका रोपासारखे असते ज्याला वेळोवेळी पाणी देण्याची गरज असते. एखादी गोष्ट वारंवार सांगितल्यामुळे जर मोठ्यांना फायदा होतो, तर लहान मुलांनाही होणार नाही का?
मुलांना देवाविषयीचे सत्य शिकवण्यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. आजच्या धावपळीच्या जगात असा वेळ काढणे खरेच कठीण असू शकते. पण, प्रेषित पौलाने सल्ला दिला की आवश्यक ख्रिस्ती कार्यांसाठी, “वेळेचा सदुपयोग करा,” म्हणजेच वेळ काढा. (इफिस. ५:१५, १६) पालकांना हे कसे करता येईल? एका ख्रिस्ती वडिलांना आपल्या मुलीला देवाविषयीचे शिक्षण देणे, ख्रिस्ती जबाबदाऱ्या सांभाळणे आणि नोकरी करणे यांत समतोल राखणे कठीण जायचे; त्यांची पत्नी सामान्य पायनियर असल्यामुळे तीही खूप व्यस्त असते. मग, आपल्या मुलीला देवाविषयीचे शिक्षण देण्यासाठी हे पालक वेळ कसा काढतात? ते वडील म्हणतात: “दररोज सकाळी मी कामाला जाण्याआधी मी आणि माझी बायको आमच्या मुलीसाठी बायबल कथांचं माझं पुस्तक यातून किंवा शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेतून काहीतरी वाचतो. रात्री ती झोपायच्या आधी आम्ही तिच्यासाठी आपल्या प्रकाशनांतून काहीतरी वाचतो आणि क्षेत्र सेवेतही आम्ही तिला आमच्यासोबत घेऊन जातो. तिला देवाविषयीचं शिक्षण देण्यासाठी तिच्या जीवनातली सुरुवातीची ही वर्षं खूप महत्त्वाची आहेत आणि आम्हाला ती हातची घालवायची नाहीत.”
मुले “बाणांप्रमाणे” असतात
आपली मुले मोठी होऊन जबाबदार व्हावीत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण, मुलांना देवाबद्दलचे शिक्षण देण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या मनात देवाविषयी प्रेम जागृत करणे.—मार्क १२:२८-३०.
स्तोत्र १२७:४ म्हणते: “तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत.” मुलांची तुलना निशाणावर लागणाऱ्या बाणांशी करण्यात आली आहे. धनुष्यातून एकदा सुटलेला बाण परत कधीच धनुर्धाऱ्याकडे येत नाही. पालकांजवळही त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची संधी फक्त काही काळच असते. म्हणूनच, मुलांच्या मनात देवाची तत्त्वे बिंबवण्यासाठी पालकांनी या महत्त्वाच्या काळाचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे.
प्रेषित योहानाने त्याच्या आध्यात्मिक मुलांबद्दल म्हटले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.” (३ योहा. ४) तसेच, आपली मुले “सत्यात चालतात” हे पाहून ख्रिस्ती पालकांनीही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.