समर्पण आणि निवडीचे स्वातंत्र्य
“ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे.”—गलतीकर ५:१.
१. “समर्पण,” “प्रतिष्ठापना,” किंवा “अर्पण” असे भाषांतर करण्यात आलेले हिब्रू किंवा ग्रीक शब्द मुख्यतः कशाला लागू होतात?
बायबल लेखकांनी, एखादा पवित्र उद्देश साध्य करण्याकरता वेगळे केलेले, किंवा वेगळे ठेवलेले, असा अर्थ देण्याकरता कित्येक हिब्रू आणि ग्रीक शब्द वापरले आहेत. इंग्रजी बायबलमध्ये या शब्दांचा, “समर्पण,” “प्रतिष्ठापना,” किंवा “अर्पण” असा अर्थ देणाऱ्या शब्दांचे भाषांतर करण्यात आले आहे. कधीकधी या संज्ञांचा वापर इमारतींसंबंधाने करण्यात येतो. सामान्यपणे, प्राचीन यरुशलेममधील देवाचे मंदिर आणि तेथे चालणारी उपासना यांसंबंधाने. फार क्वचित त्यांचा गैर धार्मिक बाबींच्या संबंधाने वापर होतो.
‘इस्राएलाच्या देवाला’ समर्पण
२. यहोवाला “इस्राएलचा देव” असे उचितपणे का म्हणता येऊ शकत होते?
२ सा.यु.पू. १५१३ मध्ये, देवाने इस्राएल लोकांना इजिप्शियन बंदिवासातून सोडवले. त्यानंतर त्याने त्यांना आपले खास लोक म्हणून वेगळे केले, त्यांच्याशी एक करार केला व नातेसंबंध प्रस्थापित केला. त्यांना असे सांगण्यात आले होते: “म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे.” (निर्गम १९:५; स्तोत्र १३५:४) इस्राएल लोकांना आपला खास निधी बनवल्यामुळे यहोवाला “इस्राएलचा देव,” असे उचितपणे म्हणता येऊ शकत होते.—यहोशवा २४:२३.
३. केवळ इस्राएल लोकांनाच आपले लोक म्हणून निवडण्यामध्ये यहोवा पक्षपात का दाखवत नव्हता बरे?
३ इस्राएल लोकांना आपले समर्पित लोक बनवल्यामुळे यहोवा कोणत्याही प्रकारचा पक्षपात दाखवत नव्हता, कारण त्याला गैर इस्राएल लोकांविषयीही प्रेमळ काळजी होती. त्याने त्याच्या लोकांना असा बोध केला: “कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका. तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करा; कारण तुम्हीहि मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” (लेवीय १९:३३, ३४) अनेक शतकांनंतर, देवाचा हा दृष्टिकोन प्रेषित पेत्राच्या मनावर खोलवर बिंबला गेला होता; त्याने असे कबूल केले: “‘देव पक्षपाती नाही,’ हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
४. देव आणि इस्राएल लोक ह्यांमधील नातेसंबंध कोणत्या अटीवर होता, आणि इस्राएल लोक त्यानुसार वागले का?
४ एक गोष्ट विसरता कामा नये व ती म्हणजे देवाचे समर्पित लोक होण्याकरता एक अट होती. त्यांनी देवाची वाणी कटाक्षाने पाळली व त्याचा करार अनुसरला तरच ते त्याचे “खास निधि” होऊ शकत होते. दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएल लोक यात उणे पडले. सा.यु. पहिल्या शतकात देवाने पाठवलेल्या मशीहाला नाकारल्यानंतर त्यांनी त्यांचा विशेषाधिकार गमावला. तेथून पुढे यहोवा “इस्राएलचा देव” राहिला नाही. शिवाय, स्वाभाविक इस्राएल लोकही देवाचे समर्पित लोक राहिले नाहीत.—पडताळा मत्तय २३:२३.
‘देवाच्या इस्राएलचे’ समर्पण
५, ६. (अ) मत्तय २१:४२, ४३ मधील येशूच्या भविष्यसूचक शब्दांवरून त्याला काय म्हणावयाचे होते? (ब) ‘देवाचे इस्राएल’ केव्हा आणि कसे अस्तित्वात आले?
५ म्हणजे, आता यहोवाकडे कोणीही समर्पित लोक नव्हते का? नाही. स्तोत्रकर्त्याचे बोल उद्धृत करत येशू ख्रिस्ताने भाकीत केले की: “‘जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.”—मत्तय २१:४२, ४३.
६ ख्रिस्ती मंडळी ‘फळ देणारी प्रजा’ शाबीत झाली. आपल्या पार्थिव मुक्कामादरम्यान येशूने त्या राष्ट्राच्या पहिल्या भावी सदस्यांची निवड केली. परंतु, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट दिवशी, त्या राष्ट्राच्या १२० पहिल्या सदस्यांवर आपला पवित्र आत्मा ओतून यहोवा देवाने स्वतः ख्रिस्ती मंडळीची प्रस्थापना केली. (प्रेषितांची कृत्ये १:१५; २:१-४) प्रेषित पेत्राने नंतर लिहिले त्याप्रमाणे, ही नवीन स्थापिलेली मंडळी मग, “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” अशी बनली. कशासाठी? ह्यासाठी, की ज्याने त्यांना “अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण [त्यांनी] प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९) देवाच्या आत्म्याने अभिषिक्त झालेले ख्रिस्ताचे अनुयायी आता एक समर्पित राष्ट्र, ‘देवाचे इस्राएल’ झाले.—गलतीकर ६:१६.
७. देवाच्या इस्राएलचे सदस्य कशाचा उपभोग घेणार होते व यासाठी त्यांना कशापासून दूर राहावयास सांगितले होते?
७ या पवित्र राष्ट्राचे सदस्य “देवाचे स्वतःचे लोक” असले तरी त्यांना गुलाम करून ठेवण्यात येणार नव्हते. उलट, स्वाभाविक इस्राएलच्या समर्पित राष्ट्रापेक्षा अधिक स्वातंत्र्य त्यांना उपभोगायला मिळणार होते. “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” हे अभिवचन येशूने या नवीन राष्ट्राच्या भावी सदस्यांना देऊ केले. (योहान ८:३२) प्रेषित पौलाने दाखवून दिले, की ख्रिश्चनांना नियमशास्त्र कराराच्या अपेक्षांपासून मुक्त करण्यात आले होते. याबाबत त्याने गलतीयातील सहविश्वासूंना सल्ला दिला: “ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.”—गलतीकर ५:१.
८. कोणत्या बाबतीत ख्रिस्ती व्यवस्था लोकांना नियमशास्त्र कराराखाली असलेल्यांपेक्षा अधिक स्वातंत्र्य प्रदान करते?
८ देवाच्या इस्राएलने समर्पणाच्या अपेक्षा आजपर्यंत काटेकोरपणे पूर्ण केल्या आहेत; प्राचीन स्वाभाविक इस्राएल राष्ट्राने असे केले नव्हते. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही कारण त्याच्या सदस्यांनी आपणहून आज्ञेत राहणे पसंत केले आहे. स्वाभाविक इस्राएलचे असे नव्हते, ते जन्मापासूनच समर्पित होते; देवाच्या इस्राएलने स्वतःहून आज्ञेत राहण्याची निवड केली. अशाप्रकारे, ख्रिस्ती व्यवस्था आणि यहुदी नियमशास्त्र करार यात भिन्नता दिसून येते; यहुदी नियमशास्त्र कराराने लोकांना निवड करण्याचे स्वातंत्र्य न देता त्यांच्यावर समर्पण थोपवले.
९, १०. (अ) समर्पणाबाबत एक बदल होईल हे यिर्मयाने कसे सूचित केले? (ब) आज सर्वच समर्पित ख्रिस्ती देवाच्या इस्राएलचे सदस्य नाहीत असे तुम्ही का म्हणाल?
९ “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन; परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांस मिसर देशातून बाहेर आणिले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही; मी त्यांजबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील,” असे यिर्मया संदेष्ट्याने लिहिले तेव्हा त्याने समर्पणाबाबत एक बदल भाकीत केला.—यिर्मया ३१:३१-३३.
१० देवाचे धर्मशास्त्र त्यांच्या “अंतर्यामी,” जणू काय त्यांच्या “हृदयपटलावर” लिहिलेले असल्यामुळे देवाच्या इस्राएलचे सदस्य त्यांच्या समर्पणानुसार जीवन जगण्यास प्रवृत्त होतात. त्यांची ही प्रेरणा, निवडीने नव्हे तर जन्मानेच समर्पित असलेल्या स्वाभाविक इस्राएल लोकांपेक्षा प्रबळ आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्याची प्रबळ प्रेरणा आज, देवाच्या इस्राएलने दाखवल्याप्रमाणे संपूर्ण जगभरात पन्नास लाखांपेक्षा अधिक सहउपासक प्रदर्शित करीत आहेत. यांनीही यहोवा देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपले जीवन त्याला समर्पित केले आहे. देवाच्या इस्राएलप्रमाणे यांना स्वर्गीय जीवनाची आशा नसली तरी, देवाच्या स्वर्गीय राज्य शासनाखाली पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याच्या आशेत ते आनंद मानतात. ‘ज्याने त्यांना अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध’ करण्याची कामगिरी पूर्ण करण्यासाठी आध्यात्मिक इस्राएलच्या शेष सदस्यांना सक्रियपणे पाठिंबा देऊन ते त्यांच्याबद्दल गुणग्राहकता व्यक्त करतात.
देव-प्रदत्त स्वातंत्र्याचा सुज्ञपणे उपयोग करणे
११. मानवाला कोणत्या क्षमतेसह निर्मिले होते, व त्याने त्याचा कसा उपयोग करण्यास हवा?
११ देवाने मानवांना स्वातंत्र्य जतन करून ठेवण्यासाठी निर्मिले. स्वतंत्र इच्छा बाळगण्याची क्षमता त्याने त्यांना बहाल केली. पहिल्या मानवी जोडप्याने त्यांच्या स्वतंत्र्य इच्छेचा वापर केला. परंतु, त्यांनी मूर्खतेने व निर्दयीपणे एक निवड केली जी स्वतःसाठी आणि त्यांच्या अपत्यासाठीही घातक ठरली. पण यावरून आपल्याला हे दिसून येते, की यहोवा बुद्धिमान प्राण्यांना त्यांचे आंतरिक हेतू किंवा आकांक्षा यांच्याविरुद्ध मार्ग निवडण्याची जबरदस्ती करीत नाही. शिवाय, देवाला “संतोषाने देणारा” आवडत असल्यामुळे प्रीतीवर आधारित असलेले, संतोषाने व स्वेच्छेने केलेले, निवडीच्या स्वातंत्र्यावर आधारलेले समर्पणच त्याला मान्य आहे. (२ करिंथकर ९:७) इतर सर्व अमान्य आहे.
१२, १३. उचित बाल शिक्षणाकरता तीमथ्याचे उदाहरण एक आदर्श कसा आहे व त्याच्या उदाहरणाने अनेक तरुणांना काय करण्यास प्रवृत्त केले आहे?
१२ या अपेक्षेची पूर्ण जाणीव असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार, अशाप्रकारचे समर्पण करण्यास कोणावरही, त्यांच्या मुलांवरही जबरदस्ती करीत नाहीत, तर एखाद्याने स्वतःहून देवाला स्वतःचे समर्पण करावे यास ते समर्थन करतात. साक्षीदार त्यांच्या तान्ह्या बाळांचा बाप्तिस्मा करीत नाहीत; अनेक चर्चेसमध्ये असे केले जाते, जणू व्यक्तिगत निवडीशिवाय समर्पण करण्यासाठी कोणालाही जबरदस्ती केली जाऊ शकते. तरुण तीमथ्याने अनुसरलेला शास्त्रवचनीय नमुना अनुकरणीय आहे. प्रौढ या नात्याने त्याला प्रेषित पौलाने सांगितले: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे.”—२ तीमथ्य ३:१४, १५.
१३ एक गोष्ट उल्लेखनीय आहे, तीमथ्य पवित्र लिखाणांशी परिचित होता कारण त्याला बालपणापासूनच त्यांची शिकवण मिळालेली होती. त्याच्या आईने व आजीने त्याला ख्रिस्ती शिकवणुकी पटवून दिल्या होत्या, जबरदस्तीने त्याच्यावर थोपवल्या नव्हत्या. (२ तीमथ्य १:५) म्हणूनच, ख्रिस्ताचा अनुयायी होण्यात जी सुज्ञता होती ती तो पाहू शकला व अशाप्रकारे त्याने ख्रिस्ती समर्पण करण्याची व्यक्तिगत निवड केली. आधुनिक काळांत, ज्यांचे पालक यहोवाचे साक्षीदार आहेत अशा हजारो तरुण मुलामुलींनी हेच उदाहरण अनुसरले आहे. (स्तोत्र ११०:३) इतरांनी तसे केले नाही. ती एक व्यक्तिगत निवड आहे.
कोणाचा गुलाम व्हायचे याची निवड?
१४. रोमकर ६:१६ आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्याविषयी काय सांगते?
१४ कोणीही मानव पूर्णपणे स्वतंत्र नाही. गुरूत्वाकर्षणाचा नियम, यांसारख्या प्राकृतिक नियमांचे प्रत्येकाच्या स्वातंत्र्यावर बंधन असते ज्यांच्याकडे निर्भयपणे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच, आध्यात्मिक अर्थाने कोणीही पूर्णपणे स्वतंत्र नाही. पौलाने तर्क केला: “आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहा, हे तुम्हाला ठाऊक नाही काय?”—रोमकर ६:१६.
१५. (अ) लोकांना गुलाम असण्याविषयी कसे वाटते, पण शेवटी बहुतेक लोकांचे काय होते? (ब) कोणते उचित प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो?
१५ कोणाचा तरी गुलाम होणे ही कल्पनाच बहुतेक लोकांना नकोशी वाटते. तरीसुद्धा, आजच्या जगातील वास्तविकता अशी आहे की, लोक स्वतः इतक्या वेगवेगळ्या मार्गांनी अजाणतेने इतरांच्या इशाऱ्यांवर नाचतात किंवा त्यांच्यामुळे प्रभावित होतात की शेवटी इच्छा नसतानाही ते इतरांचे कटपुतळे होऊन जातात. जसे की, जाहिरात कंपन्या आणि मनोरंजनाचे जग लोकांना एका साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करते, लोकांनी अनुकरण करावे असे दर्जे त्यांच्यासाठी ठरवते. राजनैतिक आणि धार्मिक संघटना, नेहमीच खात्री पटवून देणाऱ्या चर्चेद्वारे नव्हे तर बहुतेकवेळा एकोप्याच्या किंवा एकनिष्ठेच्या नावाखाली लोकांकडून आपले विचार आणि आपल्या उद्दिष्टांचे समर्थन करवून घेतात. आपण ‘ज्याची आज्ञा मानतो त्याचे गुलाम आहोत’ असे पौलाने म्हटल्यामुळे, ‘मी कोणाचा गुलाम आहे? माझ्या निर्णयांवर आणि जीवनशैलीवर सर्वात जास्त कोणाचा पगडा आहे? धार्मिक पाळकांचा, राजनैतिक पुढाऱ्यांचा, उद्योगधंद्यातील बड्या आसामीचा की मनोरंजन क्षेत्रातील कोणा व्यक्तीचा? मी कोणाची आज्ञा मानतो—देवाची की मानवाची?’ असे प्रश्न प्रत्येकाने स्वतःस विचारणे उचित ठरेल.
१६. कोणत्या अर्थाने ख्रिस्ती देवाचे दास आहेत, व अशा दास्यत्वाचा उचित दृष्टिकोन कोणता आहे?
१६ देवाच्या आज्ञेत राहणे म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर अवाजवी बंधन, असे ख्रिश्चनांना वाटत नाही. ते त्यांचा आदर्श, येशू ख्रिस्त याच्याप्रमाणे आपल्या व्यक्तिगत आकांक्षा आणि प्राथमिकता देवाच्या इच्छेनुरूप ठेवून आपल्या स्वातंत्र्याचा स्वेच्छेने उपयोग करतात. (योहान ५:३०; ६:३८) ते “ख्रिस्ताचे मन” विकसित करतात, मंडळीचा मस्तक या नात्याने ते त्याच्या अधीन होतात. (१ करिंथकर २:१४-१६; कलस्सैकर १:१५-१८) याची तुलना आपण एका स्त्रीबरोबर करू शकतो जी विवाह करते आणि विवाह केलेल्या पुरुषावरील प्रीतीपोटी स्वेच्छेने त्याला सहकार्य देते. आणि खरे तर, अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळाला, ख्रिस्ताची वाग्दत्त शुद्ध कुमारिका असे म्हणण्यात आले आहे.—२ करिंथकर ११:२; इफिसकर ५:२३, २४; प्रकटीकरण १९:७, ८.
१७. यहोवाच्या सर्व साक्षीदारांनी काय बनण्याचे निवडले आहे?
१७ स्वर्गीय आशा अथवा पार्थिव आशा असलेल्या यहोवाच्या प्रत्येक साक्षीदाराने, देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता व शासक या नात्याने त्याच्या आज्ञेत राहण्याकरता त्याला व्यक्तिगत समर्पण केले आहे. प्रत्येक साक्षीदाराच्या बाबतीत म्हणजे, मनुष्यांचा गुलाम होण्याऐवजी देवाचा दास होण्याची व्यक्तिगत निवड ठरली आहे. हे, प्रेषित पौलाच्या सल्ल्याच्या सुसंगतेत आहे की: “तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; माणसांचे गुलाम होऊ नका.”—१ करिंथकर ७:२३.
स्वतःचा लाभ करून घेण्यास शिकणे
१८. एक संभाव्य साक्षीदार बाप्तिस्मा घेण्यास पात्र केव्हा ठरतो?
१८ यहोवाचा साक्षीदार होण्यास पात्र होण्याआधी एखाद्याने शास्त्रवचनीय योग्यता पूर्ण केल्या पाहिजेत. साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्याला, ख्रिस्ती समर्पणाचा अर्थ काय होतो हे खऱ्या अर्थाने समजले आहे की नाही हे वडील अगदी विचारपूर्वक व पक्की खात्री करून घेतात. त्याला खरोखरच यहोवाचा साक्षीदार व्हावयाचे आहे का? यहोवाचा साक्षीदार बनल्यामुळे त्याला जगावे लागणारे जीवन तो स्वेच्छेने जगण्यास तयार आहे का? नसल्यास, तो बाप्तिस्मा घेण्यास पात्र नाही.
१९. एखादा देवाचा समर्पित सेवक होण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याची टीका करण्याचे काहीही कारण का नसते?
१९ पण मग, एखाद्याने सर्व अपेक्षा पूर्ण केल्या तर, देवाचा आणि त्याच्या ईश्वरप्रेरित वचनाचा स्वतःवर स्वेच्छेने प्रभाव होऊ देण्याचा व्यक्तिगत निर्णय तो घेतो तेव्हा त्याची टीका का करावी? मनुष्यांपेक्षा देवाचा प्रभाव होऊ देणे कम स्वीकारयोग्य आहे काय? की त्याचा कमी फायदा होईल? यहोवाचे साक्षीदार असा विचार करीत नाहीत. यशयाद्वारे लिहिण्यात आलेल्या देवाच्या वचनाशी ते पूर्ण मनाने सहमत आहेत की: “परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु, म्हणतो; तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.
२०. कोणत्या प्रकारे लोक बायबल सत्यांद्वारे बंधमुक्त होतात?
२० एका धगधगत्या नरकात चिरकालिक यातना, यासारख्या खोट्या धार्मिक शिकवणुकी पाळण्यापासून बायबल सत्य लोकांना मुक्त करते. (उपदेशक ९:५, १०) त्याऐवजी, मृतांसाठी असलेल्या खऱ्या आशेबद्दल—येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर शक्य करण्यात आलेल्या पुनरुत्थानाच्या आशेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास ते त्यांना प्रवृत्त करते. (मत्तय २०:२८; प्रेषितांची कृत्ये २४:१५; रोमकर ६:२३) सारखेसारखे अपयशी ठरणाऱ्या राजनैतिक वायद्यांवर विश्वास ठेवल्यामुळे येणाऱ्या निराशेपासून बायबल सत्य लोकांना मुक्त करते. त्याऐवजी, यहोवाचे राज्यशासन स्वर्गात सुरू झालेले असून लवकरच ते संपूर्ण पृथ्वीवर चालवले जाईल हे जाणल्यावर लोकांची अंतःकरणे आनंदाने ओतप्रोत भरतात. बायबल सत्य लोकांना अशा प्रथांपासून मुक्त करते ज्या पापी शरीराला अपीलकारक वाटत असल्या तरी, देवाचा अनादर करतात आणि बिघडलेले नातेसंबंध, आजारपण व अकाली मृत्यू यांच्या रुपाने भारी किंमत मोजावयास लावतात. थोडक्यात, देवाचा गुलाम होणे मनुष्यांचा गुलाम होण्यापेक्षा कैक पटीने लाभाचे आहे. खरे तर, देवाला समर्पण केल्यावर “सांप्रतकाळी [लाभ] . . . आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवनही” मिळण्याची आशा आहे.—मार्क १०:२९, ३०.
२१. यहोवाच्या साक्षीदारांकरिता समर्पण म्हणजे काय व ते काय करू इच्छितात?
२१ आज यहोवाचे साक्षीदार, प्राचीन इस्राएल लोकांप्रमाणे आपल्या जन्मामुळे एका समर्पित राष्ट्राचे भाग बनले नाहीत. साक्षीदार समर्पित ख्रिश्चनांच्या मंडळीचे भाग आहेत. प्रत्येक बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार निवडीच्या स्वातंत्र्यामुळे व समर्पण करून या मंडळीचा भाग बनला आहे. खरेच, यहोवाचे साक्षीदार समर्पण करतात तेव्हा, देवाची सेवा करण्याची स्वेच्छा याने चिन्हित असलेला एक उबदार व्यक्तिगत नातेसंबंध ते देवाबरोबर जोडतात. हा आनंदविणारा नातेसंबंध ते पूर्ण मनाने टिकवू इच्छितात, येशू ख्रिस्ताने ज्याकरता त्यांना बंधमुक्त केले त्या स्वातंत्र्याला अनंतकाळसाठी जडून राहू इच्छितात.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ केवळ इस्राएल लोकांनाच आपला “खास निधि” म्हणून निवडून यहोवा पक्षपात का दाखवत नव्हता बरे?
◻ ख्रिस्ती समर्पणाचा अर्थ स्वातंत्र्य गमावणे असा होत नाही असे तुम्ही का म्हणाल?
◻ यहोवा देवाला समर्पण केल्याचे फायदे कोणते आहेत?
◻ मनुष्यांचा गुलाम होण्यापेक्षा यहोवाचा दास होणे उत्तम का आहे?
[१५ पानांवरील चित्र]
प्राचीन इस्राएलात, देवाला केलेले समर्पण हे जन्मावर अवलंबून होते
[१६ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती समर्पण निवडीवर अवलंबून आहे