वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ९/८ पृ. ५-७
  • दबावाखाली वावरणारे आईवडील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दबावाखाली वावरणारे आईवडील
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “कठीण दिवस”
  • “नैसर्गिक स्नेह नसलेले”
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आपली मुले—मोलाची संपत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ९/८ पृ. ५-७

दबावाखाली वावरणारे आईवडील

नव्यानेच आईवडील बनलेल्यांना तुम्ही पाहिलं असेल; त्यांचा उत्साह जणू गगनात मावेनासा होत असतो. त्यांच्या बाळाच्या प्रत्येक कृतीने, प्रत्येक हालचालीने ते हरखून जातात. बाळाचे पहिलेवहिले स्मित, त्याने उच्चारलेले पहिले बोबडे शब्द, त्याची पहिली पावलं, आईवडिलांसाठी हे सारंच अविस्मरणीय असतं. आपल्या बाळाच्या गंमतीजमती सांगून, त्याचे फोटो दाखवून ते मित्रांचं आणि नातेवाईकांचं अविरत मनोरंजन करीत असतात. साहजिकच, त्यांना त्यांचे मूल प्रिय असते.

पण काही कुटुंबांत, कालांतराने परिस्थिती एक दुःखद वळण घेते. आधी लडिवाळपणाच्या भाषेत बोलणारे आईवडील आता मनाला लागणारे, खोचक शब्द वापरू लागतात; प्रेमाने कुरवाळण्याचे सोडून आता ते रागाच्या भरात आपल्या मुलांना फटके मारू लागतात, किंवा मग त्यांना अजिबातच कधी स्पर्श करत नाहीत; आपल्या अहंकारामुळे आईवडिलांना शेवटी पस्तावा होऊ लागतो. कित्येक तर असे म्हणतात की “नसतीच झाली ब्याद तर परवडलं असतं.” इतर कुटुंबांत ही समस्या आणखीनच भयंकर असते—मूल तान्हं असताना देखील आईवडिलांनी त्याचा कधी लाड केलेला नसतो! या दोन्ही प्रकरणांत, पाणी कुठं मुरलं? प्रेम का आटलं?

अर्थात, मुलांना या प्रश्‍नांची उत्तरं सहजासहजी उमजत नाहीत. पण म्हणून ती आपल्या मनाप्रमाणे निष्कर्ष काढणार नाहीत, असे नाही. मनातल्या मनात एखादं मूल कदाचित असा निष्कर्ष काढेल की, ‘आईबाबांचे माझ्यावर प्रेम नाही, याचा अर्थ नक्की माझ्यातच काहीतरी दोष आहे. मी खूप वाईट असेन.’ ही धारणा हळूहळू मनात मुळावून—सबंध जीवनात यामुळे नाना प्रकारचे नुकसान होऊ शकते.

पण, आईवडील आपल्या मुलांसाठी आवश्‍यक असलेले हे प्रेम व्यक्‍त करीत नाहीत यामागे खरं तर अनेक कारणं असू शकतात. पालकांना हल्ली भयंकर दबावांना तोंड द्यावं लागतं, हे कबूल करावंच लागेल; आज काही दबाव तर पूर्वी कधी नव्हते इतक्या प्रमाणावर वाढले आहेत. यशस्वीपणे या दबावांना तोंड देण्यास असमर्थ असणाऱ्‍या आईवडिलांना आपली पालकीय भूमिका पार पाडणे अत्यंत जड जाते. एका प्राचीन सुभाषिताप्रमाणे: “पीडन सुज्ञानाला मूर्ख करते.”—उपदेशक ७:७, पं.र.भा.

“कठीण दिवस”

आदर्श युग. या शतकात ते येईल अशी अनेकांची अपेक्षा होती. आर्थिक दबाव, अन्‍नटंचाई, दुष्काळ, युद्धं नाहीत—केवढी सुखावह कल्पना! पण, असली स्वप्नं पार धुळीस मिळाली आहेत. उलटपक्षी, आज जगाची अवस्था सा.यु. पहिल्या शतकात बायबलच्या एका लेखकाने भाकीत केल्याप्रमाणेच झाली आहे. त्याने लिहीले होते की आपल्या काळात “कठीण दिवस” येतील. (२ तीमथ्य ३:१-५) बहुतेक पालक या शब्दांना लगेच दुजोरा देतील.

आजच्या जगात मुलांचे संगोपन करण्यासाठी लागणारा भरमसाट खर्च पाहून कमअनुभवी असणारे बरेच आईवडील अक्षरशः गोंधळून जातात. कसाबसा उदरनिर्वाह करण्यासाठी देखील सहसा आईवडील दोघांनाही घराबाहेर पडून काम करावे लागते. औषधपाणी, कपडेलत्ते, शिक्षण, पाळणाघरांचा खर्च, शिवाय खाणेपिणे, घरभाडे, अशा अनेक खर्चांचा अखंड प्रवाह सुरूच असतो, आणि या प्रचंड खर्चांच्या ओघात अनेक पालक बिचारे अक्षरशः गटांगळ्या खाऊ लागतात. ही आर्थिक परिस्थिती पाहून बायबलच्या विद्यार्थ्यांना प्रकटीकरणातील एका भविष्यवाणीची आठवण होते; या भविष्यवाणीत एका अशा काळाविषयी भाकीत करण्यात आलं होतं जेव्हा लोकांना एका दिवसापुरत्या गरजा भागवण्यासाठी सबंध दिवसभराची कमाई खर्च करावी लागेल!—प्रकटीकरण ६:६.

मुलं आपल्या आईवडिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या या सर्वच दबावांची जाणीव ठेवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाही. कारण नैसर्गिकरित्या मुलं स्वतःच प्रेम व लक्ष मिळण्यासाठी भुकेली आणि आसूसलेली असतात. शिवाय बाजारातील सर्वात नवीन प्रकारची खेळणी, कपडे, आणि इलेक्ट्रॉनिक साधनं मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमातून आणि शाळा सोबत्यांकडून जो दबाव मुलांवर येतो तो दबाव ही मुलं सतत आणखीन नव्या वस्तूंची फर्माईश करून पर्यायाने आपल्या आईवडिलांवर आणत असतात.

आईवडिलांवर असणारा आणखीन एक दबाव, जो हल्ली अत्यंत रौद्र रूप धारण करतो आहे, तो म्हणजे बंडखोरपणा. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर मुलं आईवडिलांच्या आज्ञेविरुद्ध वागतील हे आपल्या बिकट काळाचे आणखीन एक चिन्ह असेल असे बायबलने भाकीत केले होते. (२ तीमथ्य ३:२) मुलांना वळण लावण्यासंबंधी समस्या काही आजच्या नाहीत. आणि मूल नीट वागत नाही म्हणून पालकांनी त्याला गैरवर्तणूक द्यावी हेही योग्य ठरणार नाही. पण, आज तर जणू सारी संस्कृतीच बंडखोर बनली आहे आणि अशा या संस्कृतीत आपल्या मुलांचे संगोपन करण्याची आईवडिलांवर पाळी आली आहे असे नाही का तुम्हालाही वाटत? क्रोध, विद्रोह, आणि औदासीन्य यांचा पुरस्कार करणारे लोकप्रिय संगीत; आईवडील बेअक्कल आणि मुलं मात्र त्यांच्यापेक्षा शहाणी, असे चित्र रेखाटणारे टीव्ही कार्यक्रम; हिंसात्मक आवेशात येऊन केलेल्या कृत्यांना शाबासकी देणारे सिनेमे—अशाप्रकारच्या कितीतरी कुप्रभावांचा मुलांवर सतत भडिमार होत असतो. या संस्कृतीशी एकरूप होऊन तिचे अनुकरण करणारी मुलं आपल्या आईवडिलांना भयंकर तणावात आणतात.

“नैसर्गिक स्नेह नसलेले”

पण याच प्राचीन भविष्यवाणीचा आणखीही एक पैलू आहे ज्यात आजच्या कुटुंबाची आणखीनच दैनावस्था होण्याविषयीचा संकेत आहे. तो संकेत असा, की अधिकाधिक लोकांठायी “नैसर्गिक स्नेह” नसेल. (२ तीमथ्य ३:३, NW) नैसर्गिक स्नेहच ते बंधन असतं जे कुटुंबाला एकजूट ठेवतं. आणि बायबल भविष्यवाणीवर तितकासा विश्‍वास न ठेवणारे देखील हे मान्य करतील की आपल्या काळात कौटुंबिक जीवन धक्कादायकरितीने मोडकळीस आले आहे. सबंध जगभरात, घटस्फोटांचे प्रमाण आकाशाला भिडले आहे. कित्येक समाजांत पारंपरिक कुटुंबांपेक्षा एक-पालक कुटुंबे आणि सावत्र आई किंवा वडील असलेली कुटुंबेच अधिक पाहायला मिळतात. एकट्या पालकांना आणि सावत्र पालकांना कधीकधी अशा काही असामान्य आव्हानांना आणि दबावांना तोंड द्यावं लागतं ज्यांमुळे मुलांना आवश्‍यक असलेलं प्रेम व्यक्‍त करणं त्यांना अत्यंत जड जातं.

तथापि, या समस्येची मुळं फार खोलवर रुजलेली आहेत. आजच्या आईवडिलांपैकी कित्येक जण स्वतः अशा कुटुंबांत लहानाचे मोठे झाले आहेत, ज्यांमध्ये ‘नैसर्गिक स्नेहाचा’ एक तर अभाव होता, किंवा ते अजिबातच नव्हते—अशी कुटुंबे, जी व्यभिचार आणि घटस्फोट यांमुळे उद्धवस्त झाली होती; ज्यांवर निरुत्साहाचे आणि तिरस्काराचे सावट होते; आणि कदाचित अशी कुटुंबे ज्यांत शाब्दिक, भावनिक, शारीरिक किंवा लैंगिक दुर्व्यवहार देखील एक दररोजचा प्रकार बनला होता. अशा कुटुंबांत लहानाचे मोठे झाल्यामुळे या मुलांना बालपणातच नव्हे तर त्यांच्या प्रौढावस्थेत देखील याचे नुकसान झेलावे लागते. आकडेवारीवर नजर टाकल्यास एका अंधकारमय भविष्याची चिन्हे दिसतात—कारण ज्या आईवडिलांना लहानपणी दुर्व्यवहार सहन करावा लागला ते स्वतः देखील आपल्या मुलांसोबत दुर्व्यवहार करतील अशी दाट शक्यता आहे. बायबलच्या काळात यहुद्यांमध्ये एक म्हण होती: “बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले.”—यहेज्केल १८:२.

पण, देवाने आपल्या लोकांना सांगितले की हे असेच चालत राहावयाचे नाही. (यहेज्केल १८:३) येथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो. या सर्व दबावांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे आपल्या मुलांसोबत दुर्व्यवहार करण्याखेरीज आईवडिलांसमोर मार्गच नाही असा अर्थ होतो का? निश्‍चितच नाही! तुम्ही वरती उल्लेखलेल्या दबावांना तोंड देत असलेले पालक असून, आपल्याला कधीतरी चांगल्या प्रकारे आपली पालकीय भूमिका पार पाडता येईल की नाही या विवंचनेत असल्यास, धीर धरा! तुम्ही म्हणजे केवळ एक आकडा नव्हे. तुमच्या भूतकाळात जे घडले त्याकरवी तुमचे भविष्य काही कायमचे ठरले नाही.

परिस्थितीत सुधारणा करता येणे शक्य आहे या शास्त्रवचनांतील आश्‍वासनाच्याच धर्तीवर कल्याणकारक संगोपन (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते: “तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईवडिलांपेक्षा वेगळे वागण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न न केल्यास, तुमच्या बालपणात घडलेल्या गोष्टी पुन्हा घडतील, मग तुमची इच्छा असो वा नसो. हे दुष्टचक्र कुठंतरी थांबवायचे असेल, तर तुम्ही भूतकाळातील ज्या अहितकारक गोष्टींची पुनरावृत्ती करत आहात त्यांविषयी सतर्क होऊन त्यांमध्ये बदल करण्याचे शिकून घ्यायला हवे.”

दुर्व्यवहारी संगोपनाचे दुष्टचक्र तुम्ही नक्कीच थांबवू शकता! आणि आजच्या काळात ज्या दबावांमुळे मुलांचे संगोपन करणे अत्यंत कठीण बनले आहे त्या दबावांना देखील तुम्ही यशस्वीपणे तोंड देऊ शकता. पण ते कसे? कल्याणकारक संगोपनाचे सर्वात उत्कृष्ट, सर्वात खात्रीलायक आदर्श तुम्हाला कुठून शिकायला मिळतील? हा विषय आमच्या पुढच्या लेखात विचारात घेण्यात आला आहे.

[६ पानांवरील चित्र]

दबावांच्या ओझ्याखाली, काही आईवडील आपल्या मुलांप्रती प्रेम व्यक्‍त करत नाहीत

[७ पानांवरील चित्र]

मुलांना आवश्‍यक असलेले प्रेम आईवडिलांनी व्यक्‍त केले पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा