“त्यात प्रीती श्रेष्ठ आहे”
“सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.”—१ करिंथकर १३:१३.
१. एका मानवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाने काय म्हटले?
मानवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका प्रख्यात तज्ञाने एकदा असे म्हटलेः “इतिहासातील अवशेषांच्या आमच्या अभ्यासाद्वारे आम्हाला पहिल्यांदाच हे कळून आले की, मानवाची मूलभूत मानसिक गरज ही त्याला प्रेमाची वाटणारी जरुरी, अत्यंत महत्त्वपूर्ण होय. आमच्या सौर व्यवस्थेमध्ये जसा सूर्य केंद्रभागी असून इतर ग्रह त्याच्याभोवती भ्रमण करीत असतात, त्याचप्रमाणे प्रेमाची गरज ही सर्व गरजांच्या केंद्रभागी आहे. . . . ज्या बालकाचे संगोपन प्रेमाने होऊ शकले नाही ती मुले रासायनिक दृष्ट्या, शरीरविज्ञानाधारे व मानसिकरित्या, प्रेमाने वाढविलेल्या मुलांपेक्षा अगदीच वेगळी दिसतात. यांची वाढही वेगळ्याच स्वरुपाने होते. आता आम्हाला हे माहीत होऊ शकले ते हे की, जन्मास येणारा मानव जगण्यासाठी तर येतोच, पण तो प्रेमाची प्राप्ती होऊ शकेल या इच्छेसह जगण्यास येतो. हे अर्थातच, नवीन नाही. कारण याच गोष्टीला डोंगरावरील प्रवचनात बळकटी देण्यात आली आहे.”
२. (अ) प्रेषित पौलाने प्रेमाचे महत्त्व कसे दाखवून दिले? (ब) आता कोणत्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे?
२ होय, या विद्वान गृहस्थाने म्हटले तसे मानवजातीस प्रेमाबद्दल वाटणारे महत्त्व हे नवे नाही. ते आता कुठे जगातील विद्वान माणसांना कळायला लागले आहे. पण ते तर देवाच्या वचनात १९ शतकांआधीच लिहून ठेवण्यात आले होते. या कारणामुळेच प्रेषित पौल हे लिहू शकलाः “सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.” (१ करिंथकर १३:१३) प्रीती ही विश्वास व आशा यांच्यापेक्षा का श्रेष्ठ आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? देवाच्या गुणांमध्ये तसेच त्याच्या आत्म्याच्या फळांमध्ये प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे असे का म्हणता येऊ शकते?
चार प्रकारातील प्रीती
३. प्रणयी प्रेमाची कोणती उदाहरणे शास्त्रवचनात आहेत?
३ मानवाला प्रेम व्यक्त करण्याची क्षमता आहे हे देवाचे सूज्ञान व त्याला मानवजातीबद्दल वाटणारी प्रेमळ कळकळ याचे प्रमाण होय. प्राचीन हेल्लेणी लोकात “प्रीती” यासाठी चार वेगवेगळे शब्द होते हे मनोवेधक आहे. यापैकीचा एक, इʹरॉस हा होता, जो लैंगिक आकर्षणाशी संबंधित असणाऱ्या प्रेमाला अनुलक्षून वापरण्यात येई. खरे पाहता, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे लिखाण करणाऱ्या लेखकांना इʹरॉसचा वापर करण्याचा प्रसंग आला नाही. तो सेप्ट्युजंट भाषांतरकारांनी नीतीसूत्रे ७:१८ व ३०:१६ मध्ये वापरला, तसेच इब्री शास्त्रवचनात प्रणयी प्रेमाबद्दलचे संदर्भ आहेत. उदाहरणार्थ, आम्ही वाचतो की, इसहाकला रिबेकेबद्दल “प्रेम जडले.” (उत्पत्ती २४:६७, न्यू.व.) या प्रकारच्या प्रेमाचे एक लक्षणीय उदाहरण याकोबामध्ये दिसते, जो सुंदर राहेलला प्रथमदर्शनी पाहताच तिच्या प्रेमात पडला. खरे म्हणजे, “याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली. तिजवर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी वाटली.” (उत्पत्ती २९:९-११, १७, २०) गीतरत्नाच्या पुस्तकात देखील एक मेंढपाळ मुलगा व त्याची युवती यांच्या प्रणयी प्रेमाची माहिती आहे. अशा प्रकारातील प्रेम हे समाधान व आनंद यांचा स्रोत असले तरी ते केवळ देवाच्या नीतीमान दर्जांनुरुप व्यक्त केले गेले पाहिजे हे अधिक भर देऊन सांगण्याची जरुरी नाही. पवित्र शास्त्र सांगते की, कायदेशीर विवाह केलेल्या आपल्या बायकोच्या प्रेमानेच पुरुषाने आपले “चित्त मोहित” केले पाहिजे.—नीतीसूत्रे ५:१५-२०.
४. कौटुंबिक प्रेमाचे स्पष्टीकरण शास्त्रवचनात कसे देण्यात आले आहे?
४ याचप्रमाणे, रक्ताच्या नात्यावर आधारलेले बळकट कौटुंबिक प्रेम किंवा नैसर्गिक जिव्हाळा असतो. याला हेल्लेणी लोक स्टॉर․जेʹ हा शब्द वापरीत. “पाण्यापेक्षा रक्त हे दाट असते” या म्हणीला अनुसरुन तो शब्द वापरला जाई. याबद्दलचे उत्तम उदाहरण आपल्याला, मार्था व मरीया या दोघा बहिणींना आपला भाऊ लाजर याविषयी जे प्रेम वाटत होते, त्यामध्ये मिळते. तो त्यांना केवढा मोलाचा वाटत होता हे, लाजरचा एकाएकी मृत्यु घडला तेव्हा त्यांना जे दुःख झाले त्यावरुन दिसून येऊ शकते. पण, जेव्हा त्याचे पुनरुत्थान करण्यात आले तेव्हा त्यांना किती आनंद झाला! (योहान ११:१-४४) आईला आपल्या मुलाबद्दल जे प्रेम वाटत असते ते या प्रकारच्या प्रेमात मोडते. (पडताळा १ थेस्सलीनकाकर २:७.) यहोवाला सियोनेबद्दल केवढी प्रीती वाटत होती ते दाखविताना म्हटले आहे की, आईला आपल्या मुलाबद्दल वाटते त्या प्रेमापेक्षाही ते अधिक होते.—यशया ४९:१५.
५. स्वाभाविक कळवळ्याचा अभाव किंवा ममताहीनपणा आज कसा दिसून येत आहे?
५ आपण “शेवटल्या काळी” “कठीण दिवसात” राहात आहोत याचे एक प्रमाण हे आहे की, यात “ममताहीन”पणा आहे. (२ तीमथ्य ३:१, ३) कौटुंबिक प्रेमाच्या अभावामुळे मुले घरातून पळून जातात; आणि काही प्रौढ मुले आपल्या वृद्ध मातापित्यांकडे दुर्लक्ष करतात. (पडताळा नीतीसूत्रे २३:२२.) स्वाभाविक कळवळ्याचा अभाव मुलांना जी वाईट वागणूक दिली जाते त्यातून दिसून येतो—काही पालक आपल्या मुलांना इतक्या निर्दयीपणाने झोडपतात की, शेवटी मुलांना दवाखान्यात न्यावे लागते. तसेच पालकीय प्रेमाची उणीव, पालक मुलांना शिक्षा करण्यात अपयशी होणे यात देखील दिसते. मुलांना आपल्या इच्छेप्रमाणे वागू देणे हा काही प्रेमाचा पुरावा नव्हे, तर तो कमी प्रतिकाराचा मार्ग अवलंबू देण्यासमान ठरते. जो बाप आपल्या मुलांवर खरोखरी प्रेम करतो तो, जरुर भासते त्यावेळी त्यांना शिक्षाही करतो.—नीतीसूत्रे १३:२४; इब्रीयांस १२:५-११.
६. मित्रांमधील कळवळ्याची शास्त्रवचनीय उदाहरणे द्या.
६ फिलिआ हा आणखी एक हेल्लेणी शब्द आहे व तो दोन मित्र किंवा मैत्रिणींमधील (लैंगिक स्वभाव नसलेल्या) कळवळ्यास अनुलक्षून आहे. दावीद व योनाथान यांना एकमेकांबद्दल जी प्रीती वाटत होती त्यामध्ये आम्हाला याचे उत्तम उदाहरण मिळते. योनाथान लढाईत ठार झाला तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी असा शोक केलाः “माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू मजवर माया करीत असस. तुझे मजवर विलक्षण प्रेम होते; स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते.” (२ शमुवेल १:२६) ख्रिस्ताला प्रेषित योहानाबद्दल विशेष कळवळा वाटत होता हे आपल्याला दिसते, कारण त्या शिष्याला, “ज्याच्यावर येशूची प्रीती होती,” असे संबोधिण्यात आले.—योहान २०:२.
७. अ․गाʹपे प्रेमाचे स्वरुप काय आहे, व हे प्रेम कसे दाखवण्यात आले आहे?
७ पौलाने करिंथकरांस पहिले पत्र १३:१३ मध्ये विश्वास, आशा व प्रीती याबद्दल म्हटले व सांगितले की, “त्यात प्रीती श्रेष्ठ आहे,” तेव्हा येथे त्याने कोणता ग्रीक शब्द वापरला? येथे अ․गाʹपे हा शब्द आहे व हाच शब्द योहानाने “देव प्रीती आहे,” असे म्हणण्यात वापरला होता. (१ योहान ४:८, १६) हे तत्त्वाने मार्गदर्शित किंवा नियंत्रित होणारे प्रेम आहे. त्यात जिव्हाळा व कळवळा असू शकतो किंवा असूही शकत नाही, पण त्यात दुसऱ्याचे भले करण्याची निःस्वार्थ भावना किंवा विचार असतो. ते प्रेम कोणाला दाखवावे किंवा ते दाखविल्यामुळे दात्याला काही फायदा आहे की नाही याचा पक्षपात त्यामध्ये नसतो. केवळ याच प्रेमाने प्रवृत्त होऊन देवाने आपला अत्यंत प्रिय व अंतःकरणाचा ठेवा म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त हा देऊ केला ते “यासाठी की, जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) पौलाने देखील आम्हाला हे चांगले स्मरण दिले आहेः “नीतीमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित् कोणी धाडस करील. परंतु देव आपल्यावरील स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:७, ८) होय, कोणाची जीवनातील स्थिती कशीही असो, किंवा जो ते प्रेम दाखवितो त्याला कितीही किंमत द्यावी लागली तरी ते अ․गाʹपे प्रेम दुसऱ्याचे भलेच करते.
विश्वास व आशा यापेक्षा श्रेष्ठ कशी?
८. अ․गाʹपे विश्वासापेक्षा का श्रेष्ठ आहे?
८ तथापि, हे (अ․गाʹपे) प्रेम विश्वासापेक्षा श्रेष्ठ आहे असे पौल का म्हणाला? त्याने १ करिंथकर १३:२ मध्ये लिहिलेः “मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास मला असला पण माझ्याठायी प्रीती नसली तर मी काहीच नाही.” (पडताळा मत्तय १७:२०.) होय, ज्ञानाची प्राप्ती व विश्वासाची अभिवृद्धी ही स्वार्थी कारणास्तव केल्यास देवाकडून आम्हाला काहीही लाभ मिळू शकणार नाही. यामुळेच, येशूने असे म्हटले की, काहीजण ‘त्याच्या नावाने संदेश देतील, त्याच्या नावाने भूते काढतील व बहुत अद्भुत कृत्ये करतील,’ पण अशांना तो आपली संमती दाखवणार नाही.—मत्तय ७:२२, २३.
९. प्रीती आशेपेक्षा का श्रेष्ठ आहे?
९ पण मग, अ․गाʹपे हा प्रीतीचा प्रकार आशेपेक्षाही का श्रेष्ठ आहे? कारण आशा ही स्व-केंद्रित, केवळ स्वतःलाच कसा लाभ मिळू शकेल यावर प्रामुख्यत्वे आधारलेली असू शकते; तथापि, प्रीती तर “स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) याचप्रमाणे आशा—जशी की, “मोठ्या संकटा”तून वाचविले जाऊन नव्या जगात प्रवेश मिळवणे—ही जेव्हा प्रत्ययास येते तेव्हा संपते. (मत्तय २४:२१) पौल देखील तेच म्हणतोः “आपण आशा धरल्याने तरलो; आशा तर प्राप्त झालेल्यांची नसते. जे प्राप्त झाले त्याची आशा कोण करील? पण जे प्राप्त झाले नाही त्याची आशा जर आपण धरतो तर धीराने त्याची वाट पाहतो.” (रोमकर ८:२४, २५) प्रीती टिकून राहते, ती कधीच अंतर देत नाही. (१ करिंथकर १३:७, ८) अशाप्रकारे, (अ․गाʹपे) हे निःस्वार्थ प्रेम विश्वास व आशा यापेक्षा श्रेष्ठ आहे.
ज्ञान, न्याय व शक्तीपेक्षाही श्रेष्ठ?
१०. देवाच्या चार मूलभूत गुणांमध्ये प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे असे का म्हणता येऊ शकते?
१० आता आपण यहोवा देवाच्या चार मूलभूत गुणांचा विचार करू या. सूज्ञान, न्याय, सामर्थ्य, व प्रीती हे ते गुण आहेत. तर यामध्ये प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणता येऊ शकते का? होय, निश्चितपणे. पण का? कारण देव जे काही करतो त्यामागे प्रीती ही त्याची प्रेरणा असते. प्रेषित योहानाने लिहिलेः “देव प्रीती आहे.” होय, यहोवा ही प्रेममय व्यक्ती आहे. (१ योहान ४:८, १६) देव हा सूज्ञान, न्याय, किंवा सामर्थ्य आहे असे आपल्याला शास्त्रवचनात कोठेही वाचायला मिळत नाही. उलटपक्षी, यहोवाठायी हे गुण आहेत असे आम्हाला सांगण्यात आले आहे. (ईयोब १२:१३; स्तोत्रसंहिता १४७:५; दानीएल ४:३७) त्याच्यामध्ये हे चार गुण परिपूर्ण रुपात आपला समतोल राखून आहेत. यहोवा प्रेमाने प्रेरित होऊन आपल्या उद्देशांची पूर्णता साधण्यासाठी ते इतर तीन गुण वापरतो किंवा त्यांना विचारात घेतो.
११. विश्वाची तसेच आत्मिक व मानवी प्राण्यांची निर्मिती करण्याची यहोवा देवाला प्रेरणा कशामुळे लाभली?
११ तर मग, हे विश्व निर्माण करण्यात तसेच बुद्धीजीवी आत्मिक व मानवी प्राण्यांची निर्मिती करण्यासाठी यहोवाला कशाने प्रेरणा दिली? ते ज्ञान किंवा सामर्थ्य होते का? नाही, कारण देवाने निर्मिती कार्यात ज्ञान व सामर्थ्य वापरले. उदाहरणार्थ, आपण हे वाचतोः “परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला.” (नीतीसूत्रे ३:१९) याखेरीज, देवाने मुक्त नैतिक प्रतिनिधींना निर्माण केलेच पाहिजे असे त्याजठायीच्या न्याय या गुणाने सांगितले नाही. तर देवाच्या प्रेमाने, त्याला बौद्धिक अस्तित्वाचा आनंद इतरांमध्ये सहभागी करण्याची चालना दिली. याचप्रमाणे, आदामाच्या पातकामुळे मानवजातीवर न्यायामुळे जी दंडाज्ञा पडली होती तिला काढून टाकण्याचा मार्ग प्रेमामुळेच देवाला सुचविला गेला. (योहान ३:१६) होय, आणि प्रेमामुळेच यहोवा देवाला, आज्ञाधारक मानवाने येणाऱ्या पृथ्वीव्याप्त नंदनवनात जगू देण्याचा उद्देश राखण्यात चालना देऊ केली.—लूक २३:४३.
१२. देवाचे सामर्थ्य, न्याय व प्रेम याबद्दल आमची प्रतिक्रिया कशी असावी?
१२ देवाठायी सर्वशक्तीमानपणा असल्यामुळे आपण त्याला ईर्ष्येला पेटवण्याचे धाडस करू नये. पौलाने विचारलेः “‘आपण प्रभूला [यहोवा, न्यू.व.] ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा बलवान आहो काय?” (१ करिंथकर १०:२२) यहोवा हा खरेपणाने “ईर्ष्यावान देव” आहे, पण ते वाईट अर्थाने नव्हे, तर “सर्वस्वाची भक्ती अपेक्षिणारा” या अर्थाने. (निर्गम २०:५, किंग जेम्स व्हर्शन) देवाच्या अगम्य ज्ञानाचे प्रदर्शन पाहून ख्रिस्ती या नात्याने आम्ही भयचकित होतो. (रोमकर ११:३३-३५) त्याच्या न्यायाबद्दल आपल्याला वाटणाऱ्या मोठ्या आदराने आपण स्वतःला स्वेच्छापूर्ण पापी मार्गाक्रमणापासून दूर ठेवले पाहिजे. (इब्रीयांस १०:२६-३१) तथापि, देवाच्या चार मूलभूत गुणांमध्ये प्रीती हा निःसंशये सर्वश्रेष्ठ गुण आहे. शिवाय यहोवाच्या निःस्वार्थ प्रेमामुळेच आपण त्याच्याकडे आकर्षिले जातो व त्याला संतुष्ट करण्याची, त्याची भक्ती करण्याची आणि त्याच्या नावाच्या पवित्रीकरणात सहभागी होण्याची इच्छा आम्हाठायी उद्भवली जाते.—नीतीसूत्रे २७:११.
आत्म्याचे सर्वश्रेष्ठ फळ
१३. देवाच्या आत्म्याच्या फळांमध्ये प्रीतीचा क्रमांक कोठे येतो?
१३ गलतीकरांस पत्राच्या ५:२२, २३ मध्ये देवाच्या आत्म्याची जी नऊ फळे देण्यात आली आहेत त्यामध्ये प्रेमाचा क्रमांक कोठे येतो? ती नऊ फळे अशीः “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, व इंद्रियदमन.” यात प्रीतीला दिलेला पहिला क्रमांक पौलाने चांगल्या कारणास्तव दिला. प्रीती ही तिच्यानंतर दाखवण्यात आलेल्या आनंद या गुणापेक्षा श्रेष्ठ आहे का? होय. कारण प्रीतीशिवाय आनंद टिकून राहू शकत नाही. खरे पाहता, आज जग जे इतके आनंदरहित किंवा दुःखी दिसत आहे ते स्वार्थी गुणामुळे किंवा प्रीतीचा अभाव असल्यामुळे आहे. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आपसात प्रीती आहे तसेच त्यांना आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल देखील प्रीती आहे. याच कारणामुळे आपल्याला त्यांना आनंदी बघण्याची अपेक्षा धरता येईल. वस्तुतः असे भाकित करण्यात आले आहे की, ते “हर्षित चित्ताने जयजयकार करतील.”—यशया ६५:१४.
१४. प्रीती ही देवाच्या आत्म्याच्या शांती या फळापेक्षा श्रेष्ठ आहे असे का म्हणता येऊ शकते?
१४ प्रीती ही शांती या देवाच्या आत्म्याच्या फळापेक्षाही श्रेष्ठ आहे. प्रेमाची उणीव असल्यामुळे आज हे जग चकमकी व झगडे यांनी भरलेले आहे. पण यहोवाचे लोक सबंध जगभर एकमेकासोबत शांतीने राहात आहेत. त्यांच्या बाबतीत स्तोत्रकर्त्याने उद्गारिलेले हे शब्द खरे आहेतः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल.” (स्तोत्रसंहिता २९:११) त्यांच्यामध्ये शांती असण्याचे कारण हे की, खऱ्या ख्रिश्चनांचे ओळखचिन्ह, प्रीती ही त्यांजमध्ये आहे. (योहान १३:३५) प्रीती ही सर्व विभाजित घटकांवर, मग ते वंशीय, राष्ट्रीय किंवा सांप्रदायिक असोत, मात करू शकते. ती “पूर्णता करणारे बंधन” आहे.—कलस्सैकर ३:१४.
१५. सहनशीलता या आत्म्याच्या फळासोबत तुलना करून बघितल्यास प्रीतीची श्रेष्ठ भूमिका कशी दिसते?
१५ सहनशीलता या गुणासोबत तुलना करून पाहिल्यास प्रीतीची श्रेष्ठ भूमिका कळून येते. वाईट केल्यावर किंवा डिवचले गेल्यावर त्यामध्ये शांतपणे टिकून राहणे याला सहनशीलता म्हणतात. याचा अर्थ धीर धरुन राहणे तसेच मंदक्रोध बनणे हा आहे. लोक साधारणतः कशामुळे अधीर किंवा लगेच क्रोधिष्ट होतात? प्रीतीची उणीव असल्यामुळेच नाही का? तथापि, आमचा स्वर्गीय पिता सहनशील व “मंदक्रोध” आहे. (निर्गम ३४:६; लूक १८:७) का बरे? कारण त्याची आम्हावर प्रीती आहे आणि “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही.”—२ पेत्र ३:९.
१६. प्रीतीची तुलना ममता, चांगुलपणा, सौम्यता व इंद्रियदमन या गुणांशी कशी होते?
१६ प्रीती ही विश्वास या गुणापेक्षा का श्रेष्ठ आहे ते आपण मागे पाहिले आहे. तेथे दाखवण्यात आलेली कारणे आत्म्याच्या इतर फळांना म्हणजे ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, व इंद्रियदमन यांनाही लागू होणारी आहेत. या सर्व गुणांची आवश्यकता आहे, पण यांचा प्रीतीशिवाय काही उपयोग नाही. हेच पौलाने १ करिंथकर १३:३ मध्ये दाखवून दिले आहे. तेथे त्याने लिहिलेः “मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले, आपले शरीर जाळण्यासाठी दिले, आणि माझ्या ठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.” उलटपक्षी, प्रीतीच ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, व इंद्रियदमन यांना सामोरी आणते. यामुळेच पौल म्हणू शकला की प्रीती दयाळू आहे आणि “सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते. सर्वांसंबंधाने धीर धरते.” होय, “प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:४, ७, ८) या कारणामुळे, प्रीती ही आत्म्याच्या इतर सर्व गुणांचे प्रकटन किंवा विविध पैलू अशी आहे असे जे परिक्षिण्यात आले आहे ते योग्यच आहे. त्यामुळे आत्म्याच्या सर्व नऊ फळांमध्ये प्रीती खरीच सर्वश्रेष्ठ आहे.
१७. प्रीती ही आत्म्याचे सर्वश्रेष्ठ फळ आहे या निर्वाळ्यास कोणते शास्त्रवचनीय विधान आपली पुष्टी देते?
१७ प्रीती ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळांमधील सर्वश्रेष्ठ आहे या निर्णयाला आधार देण्यामध्ये पौल म्हणतोः “एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणाचे ऋणी असू नका. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो तो नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो. . . . आज्ञांचा सारांश, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,’ या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळणे आहे.” (रोमकर १३:८-१०) वस्तुतः आपल्यासारखीच शेजाऱ्यावर प्रीती दाखवणे या गुणाला शिष्य याकोब “राजमान्य नियम” म्हणतो ते अगदी सार्थ आहे.—याकोब २:८.
१८. प्रीती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे याला आणखी पुरावा काय आहे?
१८ प्रीती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे याला दुजोरा देणारी आणखी साक्ष आहे का? होय आहे. एका शास्त्र्याने जेव्हा येशूला असे विचारले की, “सर्वात पहिली आज्ञा कोणती?” तेव्हा काय घडले ते विचारात घ्या. येशू दहा आज्ञांमधील एखादी सांगील असे त्या शास्त्र्याने गृहीत धरले असावे. पण येशूने अनुवाद ६:४, ५ चे अवतरण घेतले व म्हटलेः “पहिली ही आहे की, ‘हे इस्राएला श्रवण करः आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.’” मग, येशू पुढे म्हणालाः “दुसरी की ही, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ याहून मोठी कोणतीही आज्ञा नाही.”—मार्क १२:२८-३१.
१९. अ․गाʹपे याची उल्लेखनीय फळे कोणती आहेत?
१९ पौलाने विश्वास, आशा व प्रीती यांचा उल्लेख करून जेव्हा असे म्हटले की, “त्यात प्रीती श्रेष्ठ आहे,” तेव्हा तो अतिशयोक्ती खरीच करीत नव्हता. प्रीतीचे प्रदर्शन करणे हे आमचा स्वर्गीय पिता आणि मंडळीतील व कुटुंबातील इतर सदस्य यांजसोबत चांगले नाते जोपासण्यात परिणामित होते. प्रीतीचा आम्हावर उभारणीकारक परिणाम घडतो. खरे प्रेम किती प्रतिफळदायक ठरते हे आपल्याला पुढील लेखावरुन कळून येईल.
तुमचा प्रतिसाद कसा असेल?
◻ विश्वास व आशा यांजपेक्षा प्रीती कशी श्रेष्ठ आहे?
◻ अ․गाʹपे काय आहे, व ही प्रीती कशी दाखविली जाते?
◻ देवाच्या चार प्रमुख गुणांमध्ये प्रीती का सर्वश्रेष्ठ आहे?
◻ प्रीती ही कशाप्रकारे आत्म्याच्या इतर फळांपेक्षा श्रेष्ठ आहे?
[१३ पानांवरील चित्रं]
पृथ्वीवरील नंदनवनातील जीवनासाठी मानवजातीची निर्मिती करण्यासाठी देवाला प्रेमाने चालना दिली. तेथे असण्याची आशा तुम्हाला आहे का?