पालकांनो व मुलांनो: देवाला प्रथम स्थान द्या!
“देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ.”—उपदेशक १२:१३.
१. पालक व मुलांनी कोणते भय विकसित करण्याची गरज आहे आणि हे त्यांच्यासाठी काय करील?
येशू ख्रिस्ताविषयी केलेल्या एका भविष्यवाणीत म्हटले की, “परमेश्वराचे [यहोवा, NW] भय त्याला सुगंधमय होईल.” (यशया ११:३) त्याची देवावर प्रीती असल्यामुळे विशेषपणे, देवाविषयीचे भय म्हणजे, त्याच्याबद्दल मनःपूर्वक आणि भीतीयुक्त आदर आणि नाखूष करण्याचे भय होते. पालक व मुलांनी असे ख्रिस्तासारखे देवाचे भय विकसित करण्याची गरज आहे, ज्यामुळे येशूला मिळाला त्याप्रमाणे त्यांनाही आनंद मिळेल. देवाच्या आज्ञापालन करून त्यांनी त्यांच्या जीवनात देवाला प्रथम स्थान देण्याची गरज आहे. बायबलच्या एका लेखकाच्या मते, ‘हेच मनुष्यकर्तव्य आहे.’—उपदेशक १२:१३.
२. नियमशास्रातील सर्वात महत्त्वपूर्ण आज्ञा कोणती होती आणि प्रामुख्याने ती कोणाला देण्यात आली होती?
२ नियमशास्रातील अधिक महत्त्वाची आज्ञा म्हणजे, यहोवावर आपण ‘पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती’ करावी ही मुख्यत्वे, पालकांना दिली होती. हे नियमशास्रातील पुढील शब्दांवरून प्रदर्शित होते: “तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर [यहोवावर प्रीती करण्याविषयीचे हे वचन] बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:४-७; मार्क १२:२८-३०) अशा प्रकारे, स्वतः देवावर प्रीती करून आणि असेच त्यांच्या मुलांनी करावे म्हणून त्यांना शिकवण देऊन देवाला प्रथम स्थान देण्याची आज्ञा पालकांना दिली होती.
ख्रिस्ती जबाबदारी
३. येशूने मुलांकडे लक्ष देण्याचे महत्त्व कसे प्रदर्शित केले?
३ येशूने, तरुण मुलांकडे देखील लक्ष देण्याचे महत्त्व प्रदर्शित केले. येशूच्या पार्थिव सेवेच्या शेवटल्या एके प्रसंगी, लोक त्याच्याजवळ त्यांची लेकरे आणू लागली. येशू अतिशय व्यग्र असल्यामुळे त्याला त्रास होईल असा विचार करून शिष्यांनी लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण येशूने त्याच्या शिष्यांना दटावले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांस मनाई करू नका.” येशूने ‘मुलांना कवटाळलेही;’ अशा रितीने लहान मुलांकडे लक्ष देण्याचे महत्त्व हृदयस्पर्शी रीतीने दाखवले.—लूक १८:१५-१७; मार्क १०:१३-१६.
४. “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा,” ही आज्ञा कोणाला दिली होती आणि त्यांनी यासाठी काय करण्याची अपेक्षा होती?
४ आपल्या अनुयायांनी स्वतःच्या मुलांना शिकवण्याव्यतिरिक्त इतरांना देखील शिकवण्याच्या जबाबदारीला येशूने स्पष्ट केले. येशू त्याच्या मृत्यू व पुनरूत्थानानंतर “पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला”—यामध्ये काही पालकांचाही समावेश होता. (१ करिंथकर १५:६) ही घटना गालीलातील डोंगराजवळ घडली; तेथे ११ प्रेषित सुद्धा जमलेले होते. तेथे येशूने त्या सर्वांना आर्जवले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २८:१६-२०) या आज्ञेकडे कोणीही ख्रिस्ती रास्तपणे दुर्लक्ष करू शकत नाही! ही आज्ञा पूर्ण करण्यासाठी, आई वडिलांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याची आणि जाहीर प्रचार व शिकवण्याच्या कार्यात भाग घेण्याची गरज आहे.
५. (अ) सर्वच नसले तरी, बहुतेक प्रेषित विवाहित होते आणि शक्यतो त्यांना मुलेही असावीत, हे कशावरून दिसते? (ब) कौटुंबिक मस्तकांनी कोणता सल्ला गंभीरपणे घेण्याची गरज आहे?
५ प्रेषितांनी देखील त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीसोबत प्रचार करण्याच्या व देवाच्या कळपाची काळजी घेण्याच्या कर्तव्याचा समतोल राखावयाचा होता, हे अर्थपूर्ण आहे. (योहान २१:१-३, १५-१७; प्रेषितांची कृत्ये १:८) याचे कारण असे की, सर्वच नसले तरी त्यांच्यातील बहुतेक जन विवाहित होते. याप्रमाणे, प्रेषित पौलाने स्पष्टीकरण दिले: “इतर प्रेषित, प्रभुचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हालाहि एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेण्याचा हक्क नाही काय?” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर ९:५; मत्तय ८:१४) काही प्रेषितांना मुले देखील होती. पेत्राला मुले होती, असे इसुबियुस यांसारखे आरंभीचे इतिहासकारही म्हणतात. आरंभीच्या सर्व ख्रिस्ती पालकांना हा शास्रवचनीय सल्ला ऐकण्याची आवश्यकता होती: “जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.
प्राथमिक जबाबदारी
६. (अ) कुटुंबे असलेल्या ख्रिस्ती वडिलांना कोणते आव्हान आहे? (ब) वडिलाची प्रमुख जबाबदारी काय आहे?
६ आज, कुटुंब असलेल्या ख्रिस्ती वडिलांची परिस्थिती प्रेषितांसारखीच आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक व शारीरिकरित्या काळजी घेण्याच्या जबाबदारीचा जाहीर प्रचार व देवाच्या कळपाची काळजी घेण्याच्या कर्तव्यासोबत समतोल राखला पाहिजे. कोणत्या कार्याला प्राथमिकता दिली जाण्यास हवी? मार्च १५, १९६४ चे वॉचटावर नियतकालिक म्हणते: “[पित्याचे] पहिले बंधन त्याच्या कुटुंबाकरता आहे आणि वास्तविक पाहता जर त्याने या बंधनाची काळजी घेतली नाही, तर सेवा करण्यास तो योग्य नाही.”
७. ख्रिस्ती पिता देवाला प्रथम स्थान कसे देतात?
७ यास्तव, पित्यांनी, ‘त्यांच्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा,’ ही आज्ञा ऐकून देवाला प्रथम स्थान दिले पाहिजे. (इफिसकर ६:४) पित्याला ख्रिस्ती मंडळीतील कार्यांवर देखरेख करण्याची नेमणूक असली तरी, ही जबाबदारी दुसऱ्या कोणावर सोपवली जाऊ शकत नाही. अशा पित्यांना आपल्या जबाबदाऱ्या—कौटुंबिक सदस्यांची शारीरिक, आध्यात्मिक आणि भावनात्मकरित्या भरवणूक करून—त्याचवेळी मंडळीत अध्यक्षता व देखरेख करण्याचे कसे सांभाळता येऊ शकते?
आवश्यक पाठबळ देणे
८. एखाद्या वडिलांची पत्नी त्यांना कशी साहाय्य देऊ शकते?
८ कौटुंबिक जबाबदाऱ्या असणाऱ्या वडिलांना पाठबळ दिल्याने लाभ होऊ शकतो, हे स्पष्ट आहे. ख्रिस्ती पत्नी, तिच्या पतीला पाठबळ देऊ शकते असे वर उद्धृत केलेल्या वॉचटावर नियतकालिकाने निरिक्षिले. ते म्हणते: “त्याला विविध नेमणुकांची तयारी करता यावी म्हणून ती शक्यतो सोयिस्कर बनवू शकते आणि घरात चांगला आराखडा ठेवून, वेळेवर जेवण तयार करून आणि मंडळीच्या सभांना जाण्यासाठी तत्परतेने तयार होण्याकरवी ती पतीचा तसेच स्वतःचा देखील मोलाचा वेळ वाचवू शकते. . . . ख्रिस्ती पत्नी, मुलांनी यहोवाला ज्या मार्गाने संतुष्ट केले पाहिजे त्यासाठी पतीच्या मार्गदर्शनानुसार त्यांना शिक्षण देण्यास पुष्कळ काही करू शकते.” (नीतिसूत्रे २२:६) होय, पत्नीला “साहाय्यक” म्हणून निर्माण केले होते आणि तिचा पती तिचे साहाय्य सुज्ञतेने स्वीकारील. (उत्पत्ति २:१८) तिच्या पाठबळामुळे त्याला कौटुंबिक आणि मंडळीतील जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास शक्य होऊ शकते.
९. मंडळीतील इतर सदस्यांना मदत करण्यासाठी थेस्सलनीकाकर मंडळीतील कोणाला उत्तेजन मिळाले होते?
९ तथापि पर्यवेक्षकांना, “देवाच्या कळपाचे पालन” आणि स्वतःच्या घराण्याची काळजी घेता यावी म्हणून त्यांच्या कार्यात पाठबळ देण्यासाठी केवळ ख्रिस्ती वडिलांच्या पत्नींच नाहीत. (१ पेत्र ५:२) आणखी कोण पाठबळ देऊ शकतात? प्रेषित पौलाने थेस्सलनीकातील बांधवांना, त्यांच्यामध्ये ‘अध्यक्षाचे काम पाहणाऱ्यांचा’ सन्मान करण्याचे आर्जवले. तथापि, प्रेषित पौलाने विशेषकरून जे अध्यक्षाचे काम पाहत नाहीत अशा बांधवांचा उल्लेख करून पुढे लिहिले: “बंधूनो, आम्ही तुम्हांस बोध करितो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१२-१४.
१०. मंडळीवर, सर्व बांधवांच्या प्रेमळ मदतीचा काय परिणाम होतो?
१० अल्पधीराचे असलेल्यांना धीर देणे, अशक्तांना आधार देणे, अव्यवस्थितांना बोध करणे आणि सर्वांबरोबर सहनशीलतेने वागणे, यासाठी मंडळीतील बांधवांना प्रीती प्रवृत्त करते तेव्हा ते किती उत्तम असते! थेस्सलनीकाकर बांधवांनी कठीण संकटे सहन करत असताना अलीकडेच बायबल सत्याचा स्वीकार करून पौलाने सांगितलेल्या सल्ल्याचा अवलंब केला. (प्रेषितांची कृत्ये १७:१-९; १ थेस्सलनीकाकर १:६; २:१४; ५:११) संपूर्ण मंडळीला दृढ करण्यात आणि तिचे ऐक्य घडवून आणण्यात त्यांच्या प्रेमळ सहकार्याच्या उत्तम परिणामाचा विचार करा! अशाच प्रकारे, आज बांधव, एकमेकांना सांत्वन, आधार आणि बोध करतात तेव्हा अनेकदा कुटुंबाची काळजी घ्यावी लागत असलेल्या वडिलांना आपल्या मेंढपाळकत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे अधिक सोपे जाते.
११. (अ) “बंधूनो” या संज्ञेत स्त्रियांचा समावेश करण्यात आला होता, असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत का आहे? (ब) आज प्रौढ ख्रिस्ती स्त्रिया तरुण स्त्रियांना कशी मदत करू शकतात?
११ प्रेषित पौल संबोधित असलेल्या ‘बांधवांमध्ये’ स्त्रियांचाही समावेश होता का? होय, कारण पुष्कळ स्त्रिया विश्वासू बनल्या होत्या. (प्रेषितांची कृत्ये १७:१, ४; १ पेत्र २:१७; ५:९) या स्त्रियांना कशा प्रकारची मदत देता येऊ शकत होती? मंडळीत काही तरुण स्त्रिया होत्या ज्यांना ‘कामुकपणा’ काबूत ठेवण्याची समस्या होती किंवा त्या “अल्पधीराच्या” झाल्या होत्या. (१ तीमथ्य ५:११-१३) आज काही स्त्रियांना याच समस्या आहेत. त्यांना ऐकणारे कान किंवा सहानुभूती दाखवणाऱ्यांची अधिक आवश्यकता असेल. हे साहाय्य देण्यासाठी एखाद्या प्रौढ ख्रिस्ती स्त्रीची मदत उत्तम असेल. उदाहरणार्थ, तिला दुसऱ्या कोणा स्त्रीसोबत अशा काही व्यक्तीगत समस्यांची चर्चा करणे जमू शकेल जे सहसा एखाद्या ख्रिस्ती माणसाला योग्यपणे हाताळता येऊ शकणार नाही. अशी मदत पुरवण्याच्या मूल्याचे स्पष्टीकरण देताना पौलाने लिहिले: “वृद्ध स्त्रियांनी . . . सुशिक्षण देणाऱ्या असाव्या; त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपआपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.”—तीतास २:३-५.
१२. मंडळीतील सर्वांनी कोणाच्या मार्गदर्शनाचा अवलंब करणे महत्त्वपूर्ण आहे?
१२ आपल्या पतींना व वडिलांना सहकार्याने पाठबळ देणाऱ्या या नम्र बहिणी मंडळीत केवढा आशीर्वाद आहेत! (१ तीमथ्य २:११, १२; इब्रीयांस १३:१७) प्रीतीच्या आत्म्याने सर्व जण एकमेकांना सहकार्य करण्यासाठी मदत करतात आणि सर्व जण नियुक्त मेंढपाळांच्या निर्देशनाच्या अधीन राहतात तेव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या असणाऱ्या वडिलांना विशेष लाभ होतो.—१ पेत्र ५:१, २.
पालकांनो, तुम्ही कशाला प्रथम स्थान देता?
१३. अनेक पिता आपल्या कुटुंबांच्या बाबतीत कसे अपयशी ठरतात?
१३ काही वर्षांपूर्वी, करमणूक करणाऱ्या एका प्रसिद्ध व्यक्तीने निरीक्षले: “शेकडो लोक असलेल्या कंपन्यांचा कारभार सांभाळणाऱ्या यशस्वी लोकांना मी पाहतो; प्रत्येक परिस्थितीत कसा व्यवहार करावा, व्यापारी जगात शिस्त कशी लावावी आणि कसे बक्षीस द्यावे हे त्यांना माहीत आहे. परंतु ते चालवत असलेला सर्वाधिक मोठा व्यापार म्हणजे, त्यांचे कुटुंब होय आणि यात ते अपयशी झाले आहेत.” का बरे? त्यांनी देवाचा सल्ल्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा व्यापार व इतर आस्थांना प्रथम स्थान दिल्यामुळे हे घडले नाही का? देवाचे वचन सांगते: ‘ज्या गोष्टी मी तुला बजावून सांगत आहे त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.’ हे रोज करावयाचे होते. पालकांनी आपला भरपूर वेळ देण्याची—विशेषकरून त्यांना प्रीती व सखोल काळजी दाखवण्याची आवश्यकता आहे.—अनुवाद ६:६-९.
१४. (अ) पालकांनी आपल्या मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे? (ब) मुलांच्या योग्य प्रशिक्षणात कशाचा समावेश होतो?
१४ मुले यहोवाकडील धन असल्याची आठवण आपल्याला बायबल करून देते. (स्तोत्र १२७:३) तुम्ही तुमच्या मुलांची, देवाची मालमत्ता, त्याने दिलेली देणगी या अर्थाने काळजी घेत आहात का? तुमच्या मुलाला किंवा मुलीला जवळ घेण्याद्वारे तुमची प्रेमळ काळजी व लक्ष प्रदर्शित केल्यास बहुधा ते प्रतिसाद देतील. (मार्क १०:१६) परंतु, मुलाच्या ‘स्थितीस अनुरूप असे शिक्षण देण्यासाठी’ केवळ त्याला मिठीत घेणे आणि चुंबन घेणे यापेक्षा अधिक गोष्टीची जरूरी असते. जीवनातील खाचखळगे टाळण्यास बुद्धीने सज्ज होण्यासाठी मुलाला प्रेमळ शिस्तीची देखील गरज असते. ‘मुलाला वेळीच शिक्षा करून’ पालक खरी प्रीती दाखवतात.—नीतिसूत्रे १३:१, २४; २२:६.
१५. पालकीय शिस्तीची आवश्यकता आहे हे कशावरून दिसते?
१५ पालकीय शिस्तीची गरज, शाळेतील सल्लागार बाईंच्या कार्यालयामध्ये आलेल्या मुलांबद्दल त्यांनी केलेल्या वर्णनावरून पाहिली जाऊ शकते: “ती दयनीय, दबलेले आणि असाहाय्य आहेत. खरी परिस्थिती कशी आहे याबद्दल बोलताना ते रडत आहेत. अत्यानंदी असल्यामुळे नव्हे तर अतिशय दुःखी, काळजी न घेतलेले असे त्यांना वाटत असल्यामुळे आणि कोवळ्या वयातच, नियंत्रण ठेवण्यास आणि हाताळण्यास अधिक असलेल्या परिस्थितीच्या दबावावर मात करता येण्यासाठी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला—ही गोष्ट एक व्यक्ती विचार करू शकते त्यापेक्षा अधिक आहे.” बाईंनी पुढे म्हटले: “काही गोष्टींचा भार सांभाळावा लागतो हा विचारच तरुणाला धडकी भरणारा आहे.” मुलांना शिक्षा नकोशी वाटते हे खरे, पण मुले पालकांचे मार्गदर्शन आणि प्रतिबंधांची वास्तविकपणे गुणग्राहकता बाळगतात. मर्यादा घालून देण्यापुरते पालक दखल घेतात याचा त्यांना आनंद वाटतो. ज्याच्या पालकांनी अशा मर्यादा घातल्या होत्या अशा तरुणाने सांगितले की त्यामुळे, “मनावरचे भयंकर ओझे उतरवले गेले.”
१६. (अ) ख्रिस्ती घरात संगोपन झालेल्या काही मुलांच्या बाबतीत काय घडते? (ब) हट्टी मुलाचे मार्गाक्रमण, पालकांनी दिलेले प्रशिक्षण चांगले नव्हते, असा अर्थ सहसा का ध्वनित करीत नाही?
१६ तथापि, काही तरुणांचे पालक प्रीती करणारे आणि उत्तम प्रशिक्षण देणारे असतानाही येशूच्या दाखल्यातील उधळ्या पुत्राप्रमाणे असे तरुण पालकीय मार्गदर्शन नाकारतात व चुकीच्या मार्गाने जातात. (लूक १५:११-१६) तथापि, असे घडते तेव्हा याचा अर्थ, नीतिसूत्रे २२:६ निर्देशित करते त्यानुसार पालकांनी मुलांना योग्यपणे शिक्षण देण्याची जबाबदारी पूर्ण केली नाही, असा होत नाही. ‘मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण दिल्याने तो त्यापासून परावृत्त होणार नाही’ हे विधान सामान्यपणे दिले होते. उधळ्या पुत्राप्रमाणे काही मुले ‘पालकांची आज्ञा तुच्छ मानतील,’ हे दुःखाचे आहे.—नीतिसूत्रे ३०:१७.
१७. हट्टी मुलाचे पालक कशापासून सांत्वन मिळवू शकतात?
१७ एका हट्टी मुलाच्या वडिलाने दुःख व्यक्त केले: “त्याच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला. पुष्कळ गोष्टींचा प्रयत्न करुन पाहिल्यामुळे आता काय करावे, हे मला कळत नाही. कशाचाही उपयोग झाला नाही.” कालांतराने, अशी हट्टी मुले, त्यांना मिळालेल्या प्रेमळ प्रशिक्षणाची आठवण करतील आणि उधळ्या पुत्राप्रमाणे ते परततील, अशी आशा बाळगता येईल. तथापि, काही मुले बंडाळी करून अनैतिकता आचरतात व त्यामुळे पालकांना अतिशय दुःख होते, ही वास्तविकता कायम राहते. या पृथ्वीवर राहिलेल्या सर्वश्रेष्ठ शिक्षकानेही दीर्घकाळापासून असलेला त्याचा विद्यार्थी, यहूदा इस्कर्योत याने विश्वासघात केल्याचे पाहिले; हे जाणल्याने पालक सांत्वन मिळवू शकतात. याशिवाय, यहोवाचा कोणताही दोष नसताना त्याच्या अनेक आत्मिक पुत्रांनी त्याचा सल्ला नाकारून स्वतःला बंडखोर शाबीत केले तेव्हा यहोवाला खेद झाला, यात काही संशय नाही.—लूक २२:४७, ४८; प्रकटीकरण १२:९.
मुलांनो—तुम्ही कोणाला संतुष्ट कराल?
१८. मुले, देवाला प्रथम स्थान दिल्याचे कसे दाखवू शकतात?
१८ तुम्हा तरुणांना यहोवा आर्जवतो: “प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा.” (इफिसकर ६:१) तरुण असे करण्याद्वारे देवाला प्रथम स्थान देतात. मूर्ख होऊ नका! देवाचे वचन सांगते, “मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानितो.” तुम्ही शिस्तीविना काही करू शकता असेही उद्धटपणे गृहीत धरू नका. ही वास्तविकता आहे की, “आपल्या स्वतःला शुद्ध समजणारांचा एक वर्ग आहे; तरी त्यांना चिकटलेली घाण अद्याप धुतली गेलेली नाही.” (नीतिसूत्रे १५:५; ३०:१२, कॉमन लँग्वेज अनुवाद) यास्तव, ईश्वरी मार्गदर्शन ऐका—पालकांच्या आज्ञा आणि शिस्त ‘ऐका,’ ‘साठवून ठेवा,’ ‘विसरू नका,’ ‘लक्ष द्या,’ आणि ‘सोडू नका.’—नीतिसूत्रे १:८; २:१; ३:१; ४:१; ६:२०.
१९. (अ) यहोवाचे आज्ञापालन करण्यासाठी मुलांकडे कोणते शक्तिशाली कारण आहे? (ब) तरुण जण, देवाला ऋणी असल्याचे कसे दाखवू शकतात?
१९ यहोवाचे आज्ञापालन करण्यासाठी तुम्हाकडे शक्तिशाली कारणे आहेत. तो तुमच्यावर प्रीती करतो व तुमचे संरक्षण व्हावे आणि आनंदी जीवनाचे सुख उपभोगण्यास मदत व्हावी म्हणून त्याने आपले नियम दिले आहेत व यामध्ये मुलांनी त्यांच्या पालकांना आज्ञाधारकता दाखवणे या नियमाचाही समावेश होतो. (यशया ४८:१७) त्याने आपला पुत्रही तुमच्यासाठी मरण्यास दिला जेणेकडून पाप आणि मृत्यूपासून तुमचा बचाव होऊन तुम्ही सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. (योहान ३:१६) तुम्ही याबद्दल ऋणी आहात का? देव स्वर्गातून निरीक्षण करतो, तुम्ही त्याच्यावर खरी प्रीती करता आणि त्याच्या तरतुदींची गुणग्राहकता बाळगता का हे पाहण्यासाठी तो तुमचे हृदय पारखतो. (स्तोत्र १४:२) सैतान देखील निरीक्षण करत आहे, तुम्ही देवाचे आज्ञापालन करणार नाही असा दावा करून तो देवाला टोमणा देत आहे. तुम्ही देवाची अवज्ञा करता तेव्हा सैतानाला आनंदी करता व यहोवाला ‘दुःखी करता.’ (स्तोत्र ७८:४०, ४१) यहोवा तुम्हाला अपील करतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) होय, प्रश्न असा आहे की, तुम्ही कोणाला संतुष्ट कराल, सैतानाला की यहोवाला?
२०. एका युवतीला भय वाटत असतानाही तिने यहोवाची सेवा करण्याचे साहस कसे टिकवले?
२० सैतान आणि त्याचे जग आपल्यावर आणत असलेल्या दबावांना तोंड देताना देवाची इच्छा पूर्ण करणे सोपे नाही. ते धडकी भरणारे असू शकते. एका युवतीने म्हटले: “घाबरट असणे थंड असण्यासारखे आहे. याविषयी तुम्हाला काही करता येण्याजोगे आहे.” तिने म्हटले: “तुम्हाला थंडी वाटत असल्यास स्वेटर घालता. तुम्हाला अजूनही थंडी वाटत असल्यास, तुम्ही दुसरे घालता. जोवर थंडी वाजण्याचे थांबत नाही तोवर तुम्ही काहीतरी घालत राहता आणि आता तुम्हाला थंडी वाजत नाही. अशाप्रकारे तुम्ही घाबरलेले असता तेव्हा यहोवाला प्रार्थना करणे म्हणजे, थंडी वाजते तेव्हा ते स्वेटर घालण्यासारखे आहे. एकदा प्रार्थना केल्यावर मला अजूनही भीती वाटत असल्यास मी पुनःपुन्हा, भीती वाटणार नाही तोवर प्रार्थना करते. त्यामुळे परिणाम घडून येतो. याने मला त्रासापासून मुक्त ठेवले आहे!”
२१. आपल्या जीवनात यहोवाला प्रथम स्थान देण्याचा खरा प्रयत्न आपण करतो तेव्हा तो आपल्याला कशी पुष्टी देतो?
२१ आपण देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याचा खरोखर प्रयत्न केल्यास, यहोवा आपल्याला पुष्टी देईल आणि आवश्यक असेल तेव्हा, आपल्या पुत्राच्या बाबतीत केले त्याप्रमाणेच तो देवदूतीय मदत देऊन आपल्याला दृढ करील. (मत्तय १८:१०; लूक २२;४३) तुम्ही पालकांनो व मुलांनो साहसी व्हा. ख्रिस्तासारखी भीती बाळगा व ती तुम्हाला आनंद देईल. (यशया ११:३) होय, “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
तुम्हाला उत्तर देता येईल का?
◻ येशूच्या आरंभीच्या अनुयायांना कोणत्या जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखावयाचा होता?
◻ ख्रिस्ती पालकांना कोणती जबाबदारी पूर्ण करावयाची आहे?
◻ कुटुंबे असणाऱ्या ख्रिस्ती वडिलांना कोणती मदत उपलब्ध आहे?
◻ बहिणी, मंडळीमध्ये बहुमोलाच्या कोणत्या सेवा पूर्ण करू शकतात?
◻ मुलांनी ऐकावे म्हणून कोणता सल्ला आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे?
[१५ पानांवरील चित्रं]
अनेकदा प्रौढ स्त्रिया, तरुण स्त्रियांना आवश्यक मदत देऊ शकतात
[१७ पानांवरील चित्रं]
शास्रवचनांतून, हट्टी मुलांसहित त्यांच्या पालकांना काय सांत्वन मिळू शकते?