ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज शिकणे
“ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हासाठी कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१.
१. ‘ईश्वरी भक्तीचे रहस्य’ याविषयी यहोवाचा काय उद्देश होता?
“याईश्वरी भक्तीचे रहस्य” आता रहस्य राहिले नाही! (१ तीमथ्य ३:१६) ते गूढ त्रैक्य, जे नेहमीच गूढ राहिले आहे अशा खोट्या धर्माच्या रहस्यांपासून केवढे वेगळे आहे! त्रैक्यासारख्या गूढांना कोणी समजू शकत नाही. उलटपक्षी, येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीमत्वात जे पवित्र गूज प्रकट करण्यात आले त्याला शक्य आहे तेवढी अधिक प्रसिद्धी द्यावी असे यहोवा देवाने उद्देशिले. येशूही स्वतः देवाच्या राज्याचा आवेशी घोषणा करणारा असे उल्लेखनीय उदाहरण बनला. आम्हाला त्याचा संदेश व त्याच्या प्रचार पद्धतीपासून बरेच शिकायला मिळू शकते. ते आपण पाहणार आहोत.
२. येशूच्या खंडणीपेक्षा त्याचे उपाध्यपण पुढे का येते? (मत्तय २०:२८)
२ यासाठी, आपण, येशू “देहाने प्रकट झाला” याविषयी अधिक विचार करू या. (१ तीमथ्य ३:१६) मत्तय २०:२८ मध्ये आपल्याला कळते की, येशू “सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला.” त्याचे हे सेवा करणे खंडणीच्या पुढे जाते. ते कसे? कारण मागे एदेनात त्या धूर्त सापाने मानवजातीवरील यहोवाच्या हक्काच्या सार्वभौमत्वाविषयी विरोध दर्शविला होता व म्हटले की, देवाची निर्मिती दोषयुक्त असून परिक्षेत मानवाला आपली सचोटी सर्वसमर्थ देवास दाखविता येणार नाही. (पडताळा ईयोब १:६-१२; २:१-१०.) तथापि, “शेवटला आदाम,” परिपूर्ण मानव या नात्याने येशूने केलेल्या निष्कलंक उपाध्यपणाने आव्हान देणाऱ्या सैतानाला स्पष्टपणे तो लबाड आहे हे सिद्ध करून दाखविले. (१ करिंथकर १५:४५) याचप्रमाणे, देवाचा “अधिपती व तारणारा” असल्याचे तसेच यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनात “सर्व जगाचा न्याय नीतीमत्वाने करणारा” असल्याचे येशूने पूर्णपणे सिद्ध करून दिले.—प्रे. कृत्ये ५:३१; १७:३१.
३. सैतानाच्या आव्हानांना येशूने कसे पूर्णपणे खोडून टाकले?
३ येशूने सैतानाच्या टोमणेवजा सर्व आव्हानांना पूर्णपणे खोडून टाकले! सबंध इतिहासभर या पृथ्वीवर देवाची सेवा इतक्या भक्तीमानपणे—थट्टा, चाबकाचे फटके खाऊन तसेच शारीरिक व मानसिक पीडा यांचा अनुभव घेऊन—कोणी माणसाने करून दाखविली नाही. देवाचा पुत्र म्हणून ख्रिस्ताला निंदात्मक आरोप सहन करावे लागले. या सर्वांमध्ये तसेच क्रुर व लज्जास्पद मरणापर्यंतही तो आपल्या पित्याला निष्ठा दाखविण्यात निश्चल व अटळ राहिला. फिलिप्पैकरांस २:८, ९ मध्ये पौल लिहितो की, येशूने ‘मरण, वधस्तंभावरचे मरण एथपर्यंत आज्ञापालन केल्यामुळे देवाने त्याला उंच केले व आणि इतर सर्व नावापेक्षा उच्च असणारे नाव त्याला दिले.’ सैतान हा केवढा घातकी लबाड आहे हे येशूने उघड केले!
४. आपण जगात सत्याविषयी साक्ष देण्यासाठी आलो आहोत असे येशू पिलाताला का म्हणू शकला?
४ अशा प्रकारचा आवेशी प्रचार काही वर्षे केल्यावर शेवटी येशू पंतय पिलातास अगदी निर्भिडपणे म्हणू शकलाः “मी राजा आहे असे आपणच म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान १८:३७) सबंध पॅलेस्टाईनभर देवाच्या राज्याविषयीचे सत्य घोषित करण्यामध्ये येशूने अत्युत्तम ईश्वरी भक्ती प्रदर्शित केली. त्याने आपल्या शिष्यांना आवेशी प्रचारक होण्यासाठी तालीम दिली. त्याचे हे उदाहरण आम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून केवढे उत्तेजक आहे बरे!
आमच्या कित्त्याकडून शिकणे
५. येशूकडे पाहत राहून आपल्याला ईश्वरी भक्तीविषयी काय शिकता येईल?
५ यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागून ईश्वरी भक्ती प्रदर्शित करण्यामुळे आपणही दियाबलास लबाड ठरवू शकतो. आम्हाला कोणत्याही परिक्षांचा सामना करावा लागला तरी त्या येशूने अनुभवलेल्या यातना व त्रास यांच्या बरोबरीच्या ठरणार नाहीत. यासाठीच आपण आपल्या कित्त्यापासून शिकून घेऊ या. इब्रीयांस १२:१, २ आम्हाला आर्जविते त्याप्रमाणे “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याजकडे पाहत” राहून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावत राहू या. ईश्वरी भक्तीच्या परिक्षेत आदाम अपयशी ठरला पण येशू या पृथ्वीवर असा माणूस बनला ज्याने सर्व परिक्षा पूर्ण तऱ्हेने पार केल्या. मरणापर्यंत तो “निष्ठावंत, निर्दोष, निर्मळ व पापी जनांपासून वेगळा” असा राहिला. (इब्रीयांस ७:२६) आपल्या निर्दोष सचोटी पालनामुळेच तो त्याच्या शत्रूंना म्हणू शकलाः “तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो?” येशूने सैतानाच्या सर्व आव्हानांना असे म्हणून परतविले की, ‘जगाच्या अधिकाऱ्याची माझ्यावर काही सत्ता नाही.’ तसेच त्याचा विश्वासघात होऊन तो धरुन दिला जाण्याआधी त्याने आपल्या शिष्यांसोबत जे समारोपाचे भाषण केले तेव्हा तो म्हणालाः “धीर धरा! कारण मी जगाला जिंकले आहे.”—योहान ८:४६; १४:३०; १६:३३.
६. (अ) मानवजातीला कसल्या प्रकारचा विसावा किंवा तजेला हवा आहे हे येशूला कसे माहीत आहे? (ब) येशूने कोठपर्यंत ईश्वरी भय प्रदर्शित केले?
६ या पृथ्वीवर असताना मनुष्य असणे, किंवा “देवदूतांपेक्षा किंचित कमी” असणे म्हणजे काय ते येशूला अनुभवास आले. (इब्रीयांस २:७) त्याला मानवी अशक्तपणाचा चांगला परिचय घडला व यामुळेच तो आता मानवजातीचा राजा व याजक या अर्थी हजार वर्षे सेवा करण्यास पात्र बनला आहे. या देवाच्या पुत्राने म्हटले होते की, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुमच्या जिवांस विसावा देईन,” त्यामुळे मानवजातीला कोणत्या प्रकारचा विसावा किंवा तजेला हवा आहे हे त्याला ठाऊक आहे. (मत्तय ११:२८) इब्रीयांस पत्र ५:७-९ आम्हास सांगतेः “आपल्या देहावस्थेच्या दिवसात आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ ख्रिस्ताने मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, ती त्याच्या ईश्वरी भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोशिले तेणेकरून तो आज्ञांकितपणा शिकला; आणि [आज्ञापालनामुळे] परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीचा तारणकर्ता झाला.” द्वेषी सर्प त्याच्या ‘टाचेला डसला’ आणि येशूला मानवी मृत्युची नांगी डसली तरी तो विचलीत झाला नाही. (उत्पत्ती ३:१५) तेव्हा आपण देखील मृत्यु आला तरी नेहमी येशूप्रमाणेच ईश्वरी भय दाखवावे व सोबत याची हमी राखावी की, यहोवा देव आमच्या विनंत्या ऐकील व आम्हाला तारण प्रदान करील.
‘सदाचरणाने जगणे’
७. १ ले पेत्र २:२१-२४ नुसार येशूने आम्हाला अनुसरण्यासाठी कोणता कित्ता सोडला आहे, आणि त्याच्या मार्गाक्रमणाचा आम्हावर कोणता परिणाम होण्यास हवा?
७ देहाने प्रकट झाल्यावर येशूने ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज उलगडून दाखविले. आपण १ पेत्र २:२१-२४ मध्ये वाचतोः “ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावू म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली. यासाठी आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे.” आपण येशूच्या मार्गाक्रमणावर मनन केल्यास त्यामुळे ईश्वरी भक्ती जोपासण्याची, सचोटी राखण्याची आणि सदाचरणाने जगण्याची केवढी चालना मिळते!
८. येशूप्रमाणेच आपण सदाचरणासाठी कसे जगू शकतो?
८ येशू अगदी खरेपणाने सदाचाराने जगला. स्तोत्रसंहिता ४५:७ ने त्याच्याविषयी भाकित केले होतेः “तुला नीतीमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे.” या शब्दांचा अवलंब येशूला लागू करून प्रेषित पौल इब्रीयांस १:९ मध्ये म्हणालाः “तुला न्यायाची चाड व स्वैराचरणाचा वीट आहे.” या ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज आपण लक्षात घेतल्यास आपणही येशूप्रमाणेच सर्वदा जे नीतीमान आहे त्याची आवड बाळगू व जे वाईट त्याचा वीट मानू. सैतानी जगाकडून ज्यावर भयंकर हल्ले चढविण्यात येत आहेत ती आमची ख्रिस्ती नीतीमूल्ये तसेच देवाच्या संस्थेच्या आतील व बाहेरील लोकांसोबतच्या आमच्या सर्व व्यवहारात आपण सदाचरणासाठी जगण्याचा निर्धार राखू या व यहोवाच्या अचूक तत्त्वांना उंचावून धरू या. तसेच ईश्वरी सूक्ष्मदृष्टी लाभावी यासाठी आपण देवाच्या वचनाने स्वतःला सतत भरवीत राहू या, कारण याच सूक्ष्मदृष्टीमुळे सैतान व त्याच्या कुयुक्त्यांचा चांगला प्रतिकार करता येतो.
९. उपाध्यपणात येशूचा आवेश कशामुळे वाढला, आणि यामध्ये खोट्या धर्माच्या मेंढपाळांच्या बाबतीत काय करण्याचे समाविष्ट होते?
९ येशूला आपल्या उपाध्यपणात आणखी एका गोष्टीमुळे आवेश मिळू शकला. ते काय होते? मत्तय ९:३६ मध्ये आम्ही वाचतोः “तेव्हा लोकसमुदायाला पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” यासाठी येशू “त्यांना बहुत गोष्टी शिकवू लागला.” (मार्क ६:३४) यामध्ये खोट्या मेंढपाळांचा दुष्टपणा व अधर्म उघड करून दाखविण्याचेही समाविष्ट होते. मत्तय १५:७-९ नुसार येशू यापैकींच्या काही जणांना असे म्हणालाः “अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशाने यथायोग्य संदेश दिला आहे की, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम.’”
शोचनीय रहस्य
१०. आज “अधर्माचे गूज” कोणावर केंद्रित आहे आणि त्याजवर कोणता दोषारोप आहे?
१० येशू जसे खोट्या धार्मिक पुढाऱ्यांविरुद्ध बोलला तसेच आज आपण ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजाविरुद्ध जे रहस्य उभे आहे त्याची शोचनीयता सर्वांना दाखवून दिली पाहिजे. २ थेस्सलनीकाकर २:७ मध्ये पौलाने याला “अधर्माचे गूज” असे संबोधिले आहे. पहिल्या शतकात ते रहस्यच होते कारण ते प्रेषितांच्या मृत्युनंतर पुष्कळ काळ निघून जाईपर्यंत पुढे येणार नव्हते. आज, ते रहस्य ख्रिस्ती धर्मराज्याच्या पाळकवर्गावर केंद्रित आहे, जे स्वतः देवाच्या नीतीमान राज्याची घोषणा करण्याऐवजी राजकारणात अधिक रस घेऊन आहेत. त्यांच्यामध्ये ढोंगीपणा वाढत आहे. ख्रिस्ती धर्मराज्यातील प्रॉटेंस्टंट पंथांचे दूरदर्शन सुवार्तिक याविषयीचे मोठे उदाहरण आहेतः कळपाची लोकर कातरणारे लुच्चे, बहुलक्षाधीश डॉलर्सचे साम्राज्य उभारणारे, वेश्यांसोबत दळणवळण राखणारे, जेव्हा लबाडी उघडकीस येते तेव्हा मायावीपणाने रडून दाखविणारे, आणि नेहमी पैशांची मागणी करणारे, अधिक पैशांची मागणी मांडणारे. रोमन कॅथोलिकांचे व्हॅटिकन देखील अशाच प्रकारचे निरस चित्र देते, जेथे त्याचे बिनदिक्कतखोर राजकारणी संबंध आहेत, जे बाहेरुन भपकेबाज पण मागे मात्र भ्रष्ट बँकेच्या व्यवहार पद्धतीने भरलेले दिसते.
११. ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढाऱ्यांचे तसेच मोठ्या बाबेलच्या सर्व पुढाऱ्यांचे काय होणार?
११ तद्वत, ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढाऱ्यांना “धर्मत्यागी पुरुष” म्हणणे एवढे आश्चर्याचे वाटणार नाही! (२ थेस्सलनीकाकर २:३) मोठ्या बाबेल या जारिणीचा हा प्रमुख भाग इतर सर्व खोट्या धर्मांसमवेत पूर्णपणे उघड्यावर आणला जाईल व नष्ट केला जाईल. आपण प्रकटीकरण १८:९-१७ मध्ये वाचतो त्याप्रमाणे राजकारणी व व्यापारी (आणि त्यांचे बॅकर्स) शोकाकुल होतील व म्हणतीलः “अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती.” मोठी बाबेल व तिची सर्व रहस्ये ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजाच्या तळपणाऱ्या प्रकाशात उघडी पडतील.
१२. धार्मिकतेवर प्रेम असल्यामुळे येशूला काय करण्याप्रत निरविले गेले?
१२ येशूची धार्मिकतेवरील प्रीती व अधर्माचा त्याला वाटणारा वीट यामुळे त्याने स्वतःस मागे न ठेवता खऱ्या भक्तीसाठी पूर्णपणे देऊ केले. देवाचा अभिषिक्त पुत्र या नात्याने त्याने यरुशलेमाला दिलेल्या पहिल्या भेटीत ख्रिस्ताने मंदिरातून सर्व व्यापारी आणि पैका मोजणारे यांना हाकलून दिले व म्हटलेः “ही येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” (योहान २:१३-१७) मंदिराला दिलेल्या नंतरच्या भेटीत येशू काही विरोधक यहुद्यांना म्हणालाः “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) येशूने त्या धर्मपुढाऱ्यांना त्यांच्या तोंडावर ते लबाड व दियाबलाचे पुत्र आहेत हे केवढ्या धैर्याने म्हटले!
१३. (अ) येशूला अधर्माचा वीट आहे असे हे खासपणे कोठे दिसले? (ब) येशूने शास्त्री व परुश्यांना घोषित केलेल्या न्यायदंडासारखाच न्याय अधर्मी धर्मपुढाऱ्यांना मिळाला पाहिजे ते का?
१३ येशूला जो अधर्माचा वीट वाटत होता तो मत्तयाच्या २३ व्या अध्यायात लिखित असणारा, नीच शास्त्री व परुश्यांविरुद्ध त्याने जो कडक निषेध दर्शविला त्यामध्ये दिसून येतो. तेथे तो त्यांना त्यांची “दुर्दशा” होणार हे कित्येकदा बोलून दाखवितो. तसेच त्यांची तुलना तो ‘चुना लावलेल्या, पण आतून सर्व प्रकारच्या मळांनी भरलेल्या कबरा, ढोंगीपणा व अधर्म’ याजशी करतो. त्या अधर्मापासून लोकांची सुटका व्हावी यासाठी येशूला किती कळकळून वाटते! “यरुशलेमे, यरुशलेमे,” असे तो आक्रोशाने म्हणतो, “जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती! पण तुमची इच्छा नव्हती. पाहा, तुमचे घर तुम्हाला ओसाड सोडले आहे.” (वचने ३७, ३८) आमच्या काळातील अधर्मी पाळकांनाही असा दंड मिळाला पाहिजे कारण २ थेस्सलनीकाकर २:१२ च्या भाषेत, ‘ते सत्यावर विश्वास ठेवीत नाहीत, तर अनीतीत आनंद मानतात.’ येशूने या पृथ्वीवर जी ईश्वरी भक्ती इतक्या निष्ठावंतपणे दाखवली त्याच्यापुढे त्यांचा हा अधर्म हा खूपच विपरीत आहे.
देवाचे न्यायदंड घोषित करणे
१४. ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजाविषयी वाटणाऱ्या रसिकतेने आम्हास काय करण्यास प्रवृत्त केले पाहिजे?
१४ ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजासंबंधी वाटणाऱ्या रसिकतेने आम्हाला येशूची पावले जवळून अनुसरण्यास मार्गदर्शित केले पाहिजे. यशया ६१:२ मध्ये वर्णिण्यात आलेले “यहोवाच्या प्रसादाचे वर्ष आणि आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” या गोष्टी घोषित करण्यामध्ये आम्ही त्याच्यासारखा आवेश दाखविला पाहिजे. याशिवाय “सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन” करण्यात आम्ही आमचा कार्यभाग ईर्ष्येने हाताळावा. यहोवाचे न्यायदंड तसेच टेहळणी बुरुज मधील लेख व रेवलेशन—इट्स् ग्रँड क्लायमॅक्स ॲट हँड! या पुस्तकातील जोरदार संदेश घोषित करण्यासाठी येशूच्या काळी होती तशीच आजही धैर्याची गरज आहे. आम्ही धैर्याने व चतुरपणे प्रचार करावयास हवा व सोबत आमचे बोलणे “मिठाने रुचकर” ठेवावे म्हणजे धार्मिकतेकडे कल असणाऱ्यांना ते आवडेल. (कलस्सैकर ४:६) येशूच्या ईश्वरी भक्तीच्या उदाहरणाकडून शिकून घेतले असल्यामुळे आम्हाला काही काळातच, आम्हाला सोपवलेले काम आम्ही पूर्ण केले आहे असे कळविता आले पाहिजे.—मत्तय २४:१४; योहान १७:४.
१५. देवाच्या पवित्र गूजासंबंधाने १९१४ पासून काय होत आहे?
१५ येशू पार्थिव देहात असताना त्याचे केवढे सुंदर उदाहरण होते! ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज त्याजमध्ये केवढ्या स्पष्टरित्या पूर्ण झाले! त्याने यहोवाच्या नामास केवढ्या धैर्याने पुढे मांडले! आणि येशूच्या पित्यानेही त्याला त्याचा सचोटी राखण्याचा मार्ग चोखाळल्यामुळे केवढे चांगले बक्षिस दिले! पण देवाच्या पवित्र गूजाविषयी आणखी काही बाकी आहे. १९१४ पासून आपण “प्रभुच्या दिवसात” जगत आहोत. (प्रकटीकरण १:१०) प्रकटीकरण १०:७ म्हणते त्याप्रमाणे ‘सुवार्तेनुरुप असलेले देवाचे पवित्र गूज’ पूर्ण होण्याचा हा समय आहे. स्वर्गीय वाणींनी असे म्हटलेः “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे [यहोवा] व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” (प्रकटीकरण ११:१५) यहोवाने मशीही राजा येशू ख्रिस्ताला वैभवी सिंहासनावर त्याचा सहअधिकारी म्हणून अधिष्ठित केले आहे!
१६. नव्यानेच सिंहासनाधिष्ठ झालेला राजा येशू ख्रिस्त याने स्वर्गात देखील देवभिरुपणाविषयची किती आवड आहे हे लगेचच कसे दाखवले?
१६ नवीनच जन्मलेल्या राज्याचा देवासोबतचा सहअधिपती या अर्थी येशूला मीखाएल (म्हणजे, “देवासारखा कोण आहे?”) असे म्हणण्यात आले आहे. कोणाही बंडखोराला देवासारखे होण्यात कधीही यश लाभणार नाही आणि या गोष्टीची प्रचिती नव्यानेच राजासनावर बसलेल्या राजाने लागलेच जुनाट साप, सैतान व त्याच्यासह त्याच्या सर्व दुरात्म्यांना खाली पृथ्वीवर ढकलून देण्यात जी हालचाल केली त्याकरवी दिसली. (प्रकटीकरण १२:७-९) होय, येशूने पृथ्वीवर असताना जशी ईश्वरी भक्ती प्रदर्शित केली त्याचप्रमाणे येथे स्वर्गात त्याला देवभिरुपणाविषयी आवड आहे. खोट्या धर्माचे उच्चाटन आणि सैतानाच्या दृश्य व अदृश्य संस्थांचा पूर्णपणे बिमोड केल्याशिवाय वैभवी येशू ख्रिस्त शांत बसणार नाही.
१७. १९१४ पासून मत्तय २५:३१-३३ च्या पूर्णतेच्या बाबतीत काय होत आहे?
१७ मत्तय २५:३१-३३ मध्ये येशूने स्वतः दिलेल्या भविष्यवादाची १९१४ पासून होत असलेली पूर्णता हिने देवाच्या पवित्र गूजास अधिक उजळविलेले आहे. त्या भविष्यवादात येशूने म्हटले होतेः “जेव्हा मनुष्याचा पुत्र वैभवाने आपल्या सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील. आणि तो मेंढरांस आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.” स्वर्गातील आपल्या केंद्रभागातून हा वैभवशाली राजा, शास्ता व ईश्वरी भक्तीचा जोपासक प्रथम धर्मत्यागी पुरुष व मग मोठ्या बाबेलचे इतर सर्व भाग व नंतर सैतानाच्या पृथ्वीवरील दुष्ट संघटनेवर आपला सूड पूर्ण करील. सैतानाला नंतर अगाधकूपात टाकण्यात येईल. (प्रकटीकरण २०:१-३) पण मेंढरांसमान “धार्मिक लोक” सार्वकालिक जीवनप्राप्तीसाठी जातील. (मत्तय २५:४६) तुम्ही जोपासत असलेला ईश्वरी भक्तीचा मार्ग तुम्हाला त्या सरळ लोकांमध्ये आणून ठेवो!
१८. ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजांच्या अनुषंगाने आम्हास कोणकोणता आनंदी हक्क आहे?
१८ प्रकटीकरण १९:१० आपल्याला “देवाची भक्ती” करण्याचे उत्तेजन देते. पण का? तेच शास्त्रवचन पुढे म्हणतेः “कारण येशूविषयीची साक्ष ही संदेशकथनास प्रेरणा देते.” प्राचीन काळच्या कितीतरी प्रेरित भविष्यवादांनी येशूविषयी साक्ष दिलेली आहे! हे भविष्यवाद जसजसे पूर्ण होत गेले तसतसे देवाचे पवित्र गूज हे स्फटिकासारखे स्पष्ट दिसू लागले. ईश्वरी भक्ती हे पवित्र गूज येशूच्या व्यक्तीमत्वात दिसले हे जाणून आम्हाला आनंद होत आहे. याशिवाय देवाच्या राज्याचे नम्र उपाध्याय असे त्याच्या पावलांस अनुसरण्याचा आमचा हक्क खराच विलोभनीय आहे. होय, सुवार्तेनुरुप असलेल्या देवाच्या सर्व पवित्र गूजांची समज प्राप्त होण्यात व त्यानुरुपची घोषणा करण्यात सहभागी होण्याचा सन्मान आम्हास खराच धन्यतेचा वाटतो!
तुमचा कोणता प्रतिसाद असेल?
◻ ईश्वरी भक्तीविषयी येशूच्या उदाहरणावरुन आम्ही काय शिकू शकतो?
◻ आम्हाला ख्रिस्ताप्रमाणेच सदाचरणासाठी कसे जगता येईल?
◻ ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजासमोर कोणते रहस्य शोचनीय अवस्थेत पडले आहे?
◻ ईश्वरी भक्तीच्या पवित्र गूजाविषयी आम्हाला वाटणारी रसिकता आम्हाला काय करण्यास प्रवर्तक ठरली पाहिजे?
[२० पानांवरील चित्रं]
ईश्वरी भक्तीचा प्रवक्ता आणि राज्याचा आवेशी घोषक या नात्याने येशू पिलातास म्हणू शकलाः “मी यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी”
[२२ पानांवरील चित्रं]
येशूने जेव्हा शास्त्री व परुश्यांचा धिक्कार केला तेव्हा त्याजठायीची ईश्वरी भक्ती तेथे दिसून आली