वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१ पृ. २९-३१
  • ‘सत्याचे वचन नीट हाताळणे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘सत्याचे वचन नीट हाताळणे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देववचनाच्या दुधाचे वाटप करणे
  • देवाच्या वचनाचे जड अन्‍न हाताळणे
  • उत्साह देणारे आणि शुद्ध करणारे पाणी
  • देववचनाचा आरशाप्रमाणे उपयोग करा
  • तरवारीप्रमाणे देवाचे वचन
  • आध्यात्मिकरीत्या तुम्ही योग्य प्रकारे सेवन करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • दूधाच्या धारेतून चमचाभर दूध पावडर
    सावध राहा!—१९९९
  • ‘तुमची प्रगति सर्वांस दिसून यावी’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • ‘सत्याचे वचन नीट हाताळणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१ पृ. २९-३१

‘सत्याचे वचन नीट हाताळणे’

देवाचे वचन यशस्वी जीवनासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या तत्त्वांचे भांडारच आहे. ते, सेवकास सद्‌बोध, दोष दाखविणे आणि सुधारणुकीसाठी साह्‍य करू शकते. (२ तीमथ्य ३:१६, १७) तथापि, या ईश्‍वरप्रदत्त मार्गदर्शकापासून पूर्णपणे लाभ घेण्याकरता पौलाने तीमथ्याला दिलेल्या सल्ल्याचा आपण अवलंब करण्यास हवा: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:१५.

देवाच्या वचनाची तुलना पौष्टिक दूध, जड अन्‍न, उत्साह देणारे व स्वच्छ करणारे पाणी, आरसा आणि तीक्ष्ण तरवार यांसारख्या इतर गोष्टींसोबत केली आहे. या संज्ञा कोणत्या गोष्टींस सूचित होतात, याची समज मिळाल्याने बायबलचा कुशलतेने उपयोग करण्यास सेवकाला मदत होते.

देववचनाच्या दुधाचे वाटप करणे

दूध नवजात बालकांचे आवश्‍यक अन्‍न आहे. लहान मूल मोठे होते तसे त्याच्या पचन तंत्राला जड अन्‍नाचा परिचय होतो, परंतु आरंभाला ते केवळ दुधाचेच पचन करू शकते. देवाच्या वचनाविषयी तुटपुंजी माहिती असणारे लोक अनेक बाबींमध्ये बालकांप्रमाणेच असतात. एखादा मनुष्य देवाच्या वचनाबद्दल नवोदित आस्थेवाईक असो किंवा काही काळापूर्वी तो देवाच्या वचनाशी परिचित झालेला असो, परंतु बायबल जे म्हणते त्याची केवळ वरकरणीच समज त्याला आहे, तर आध्यात्मिक दृष्ट्या तो केवळ बालक असून पचण्यास सुलभ असे आध्यात्मिक दूधच घेतो. तो अद्याप, “जड अन्‍न” अर्थात देवाच्या गहन गोष्टी पचवण्यास समर्थ नसतो.—इब्रीयांस ५:१२.

करिंथमधील नवीनच स्थापण्यात आलेल्या मंडळीला पौलाने लिहिले तेव्हा तिची अवस्था अशीच होती: “मी तुम्हास दूध पाजले, जड अन्‍न दिले नाही; कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्‍ति नव्हती.” (१ करिंथकर ३:२) करिंथकरांना प्रथमतः “देवाच्या वचनांची मुळाक्षरे” शिकण्याची गरज होती. (इब्रीयांस ५:१२) त्यांच्या विकासाच्या अवस्थेमध्ये, ते ‘देवाच्या गहन गोष्टींचे’ पचन करू शकले नसते.—१ करिंथकर २:१०.

पौलाप्रमाणे, ख्रिस्ती सेवक देखील आज आध्यात्मिक बालकांबद्दल त्यांची चिंता, त्यांना “दूध” प्रदान करण्याद्वारे अर्थात मूलभूत ख्रिस्ती शिकवणुकीवर दृढपणे पाया बांधण्यासाठी त्यांना मदत करण्याद्वारे व्यक्‍त करतात. ते, अशा प्रकारच्या नवोदितांना किंवा अपरिपक्व जणांना “नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्‍या दुधाची” इच्छा धरण्यास उत्तेजन देतात. (१ पेत्र २:२) प्रेषित पौलाने दाखविले, की त्याने नवोदितांना आवश्‍यक असणाऱ्‍या विशेष लक्षास ओळखले होते जेव्हा त्याने लिहिले: “दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे.” (इब्रीयांस ५:१३) देवाचे सेवक, बायबल अभ्यासांद्वारे आणि मंडळीमध्ये नवोदित आणि अल्पानुभवी जणांसोबत वचनाच्या शुद्ध दुधाची सहभागिता करतात तेव्हा त्यांच्याकडे सहनशीलता, विचारीपणा, समजुतदारपणा आणि सभ्यता असणे आवश्‍यक आहे.

देवाच्या वचनाचे जड अन्‍न हाताळणे

तारण प्राप्त करण्याकरता एखाद्या ख्रिश्‍चनाला ‘दुधापेक्षा’ अधिक काही आवश्‍यक आहे. एखाद्याला बायबलच्या मूलभूत सत्यांची समज प्राप्त झाल्यानंतर आणि त्यांचा स्वीकार केल्यानंतर, ‘प्रौढांसाठी असलेले जड अन्‍न’ घेण्यासाठी तो तयार होतो. (इब्रीयांस ५:१४) तो, हे कशा प्रकारे करू शकतो? मुख्यत्वे, व्यक्‍तिगत अभ्यासाचा नियमित परिपाठ आणि ख्रिस्ती सभांमध्ये सहवास यांद्वारे. अशा चांगल्या सवयी एखाद्या ख्रिश्‍चनाला आध्यात्मिकरीत्या दृढ, प्रौढ आणि सेवाकार्यात प्रभावशील होण्यास मदत करतील. (२ पेत्र १:८) ज्ञानाखेरीज आध्यात्मिक अन्‍नामध्ये यहोवाच्या इच्छेची पूर्ती करण्याचाही समावेश होतो, याचे आपणास विस्मरण होता कामा नये.—योहान ४:३४.

आज, देवाच्या सेवकांना यथाकाळी अन्‍न पुरवण्यासाठी आणि ‘देवाच्या नानाविध ज्ञानाची’ समज प्राप्त करून देण्यासाठी ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाची’ नियुक्‍ती करण्यात आली आहे. यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे शास्त्रवचनीय सत्यांना या एकनिष्ठ सेवकाच्या माध्यमाने प्रकट करतो जो सेवक ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न’ विश्‍वासूपणे प्रकाशित करतो. (मत्तय २४:४५-४७; इफिसकर ३:१०, ११; पडताळा प्रकटीकरण १:१, २.) अशा प्रकाशित तरतुदींचा संपूर्ण उपयोग करण्यास प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती जबाबदार आहे.—प्रकटीकरण १:३.

अर्थातच, बायबलमधील काही गोष्टी प्रौढ ख्रिश्‍चनांना सुद्धा “समजावयास कठीण” आहेत. (२ पेत्र ३:१६) त्यामध्ये संभ्रमात टाकणाऱ्‍या अभिव्यक्‍ती, भविष्यवाद आणि दृष्टान्त आहेत, त्यासाठी पुष्कळ अभ्यास व मनन करण्याची गरज आहे. यास्तव, व्यक्‍तिगत अभ्यासामध्ये देवाच्या वचनात उत्खनन करण्याचा समावेश होतो. (नीतिसूत्रे १:५, ५; २:१-५) वडील जेव्हा मंडळीला शिकवतात तेव्हा विशेषतः त्यांच्यावर या बाबतीत जबाबदारी येते. मंडळीचा पुस्तक अभ्यास किंवा टेहळणी बुरूज अभ्यास संचालित करणे, जाहीर भाषणे देणे किंवा इतर शैक्षणिक पदांच्या नात्याने सेवा करणे, हे सर्व करत असताना वडिलांनी त्यांच्या साहित्याशी पूर्णपणे परिचित असण्यास हवे आणि मंडळीला जड अन्‍न देते वेळी त्यांच्या ‘शिकवण्याच्या कलेकडेही’ त्यांनी लक्ष देण्यास तत्पर असले पाहिजे.—२ तीमथ्य ४:२.

उत्साह देणारे आणि शुद्ध करणारे पाणी

येशूने शोमरोनी स्त्रीला विहिरीजवळ म्हटले, की तो तिला पिण्यासाठी असे काही देईल जे तिच्याकरता “सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा” होणार होते. (योहान ४:१३, १४; १७:३) या जीवनप्रदायक पाण्यामध्ये, जीवन प्राप्त करण्यासाठी देवाच्या कोकऱ्‍याद्वारे देवाने केलेल्या सर्व तरतुदींचा अंतर्भाव होतो आणि बायबलमध्ये या तरतुदींचे वर्णन करण्यात आले आहे. वैयक्‍तिकांच्या नात्याने ‘पाण्यासाठी’ तान्हेले असणारे आपण ‘जीवनाचे पाणी फुकट घ्या,’ या आत्मा आणि ख्रिस्ताची वधू यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करतो. (प्रकटीकरण २२:१७) हे पाणी प्राशन करण्याचा अर्थ सार्वकालिक जीवन होतो.

याशिवाय, खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी बायबल नैतिक आणि आध्यात्मिक दर्जे लावून देते. आपण या ईश्‍वर प्रस्थापित दर्जांना कार्यान्वयित करतो तसे आपण यहोवाच्या वचनाद्वारे स्वच्छ होतो आणि यहोवा ज्या चालिरीतींची घृणा करतो त्यांपासून आपण ‘धुऊन स्वच्छ’ होतो. (१ करिंथकर ६:९-११) या कारणास्तव, प्रेरित वचनातील सत्यास ‘जलस्नान’ असे म्हटले जाते. (इफिसकर ५:२६) आपण, देवाच्या वचनास या प्रकारे आपणास स्वच्छ करण्यास अनुमती न दिल्यास, आपल्या उपासनेचा त्याच्याद्वारे स्वीकार केला जाणार नाही.

मनोरंजक गोष्ट म्हणजे, ‘देवाच्या वचनास नीट हाताळणाऱ्‍या’ वडिलांची सुद्धा पाण्याबरोबर तुलना करण्यात आली आहे. यशया म्हणतो, की ते “रूक्ष भूमीत पाण्याचे नाले” असे आहेत. (यशया ३२:१, २) वडील त्यांच्या बांधवांना आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने भेटी देतात आणि देवाच्या उत्साहवर्धक वचनाची उभारणी, सांत्वन, दृढ आणि मजबूत करणारी आध्यात्मिक माहिती देतात तेव्हा ते या वर्णनास पूर्ण करतात.—पडताळा मत्तय ११:२८, २९.a

मंडळीचे सदस्य वडिलांच्या भेटींची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. “वडील किती सांत्वनदायक असू शकतात, हे मला ठाऊक आहे आणि यहोवाने ही तरतूद केल्याबद्दल मी फार आनंदी आहे,” असे बॉनी म्हणते. लिंडा ही एकमाता लिहिते: “शास्त्रवचनीय उत्तेजनासोबत समस्यांना तोंड देण्यातही वडिलांनी मला मदत केली. त्यांनी माझे ऐकले आणि सहानुभूती दाखविली.” मायकल म्हणतो: “काळजी घेणाऱ्‍या संघटनेचा मी एक भाग आहे, याची जाणीव करून देण्यास त्यांनी मला मदत केली.” “घोर निराशेच्या काळांमध्ये तग धरून राहण्यासाठी वडिलांच्या भेटींनी मला मदत केली,” असे आणखी एक व्यक्‍ती सांगते. आध्यात्मिकरीत्या उभारणी करणारी वडिलांची भेट शीतल, उत्साहवर्धक पेयासारखी आहे. मेंढरासमान लोकांना शास्त्रवचनीय तत्त्वे त्यांच्या परिस्थितीला कशा प्रकारे लागू होतात, हे दाखविण्यासाठी प्रेमळ वडील त्यांना मदत करतात तेव्हा त्यांना सांत्वन प्राप्त होते.—रोमकर १:११, १२; याकोब ५:१४.

देववचनाचा आरशाप्रमाणे उपयोग करा

एखादा जड अन्‍न ग्रहण करतो तेव्हा केवळ रूचीचा आस्वाद घ्यावा हाच त्यामागील हेतू नसतो. उलटपक्षी, पौष्टिकता लाभावी अशी त्याची अपेक्षा असते जेणेकरून तो कार्य करण्यास समर्थ होईल. तो लहान असल्यास अन्‍नाने त्याला प्रौढ होण्यासाठी मदत करावी, अशी त्याची अपेक्षा असते. आध्यात्मिक अन्‍नाच्या बाबतीत देखील असेच आहे. व्यक्‍तिगत अभ्यास आनंदमय होऊ शकतो, परंतु त्यासाठी केवळ तेवढेच कारण पुरेसे नाही. आध्यात्मिक अन्‍नामुळे आपल्यात बदल होण्यास हवा. ते, आपल्याला आत्म्याची फळे ओळखण्यास आणि निर्माण करण्यास मदत करते तसेच ‘जो आपल्या निर्माणकर्त्याच्या अचूक ज्ञानात नवा केला जात आहे, असा नवा मनुष्य’ धारण करण्यासही आपल्याला साह्‍य करते. (कलस्सैकर ३:१०; गलतीकर ५:२२-२४) आध्यात्मिक अन्‍न प्रौढतेप्रत जाण्यास तसेच आपल्याला समस्या सोडविण्यासाठी शास्त्रवचनीय तत्त्वांना लागू करण्यास आणि इतरांना त्यांच्या समस्यांशी तोंड देण्यास चांगल्या प्रकारे समर्थ करते.

बायबलचा आपल्यावर असा परिणाम होतो किंवा नाही, हे आपण कसे सांगू शकतो? आपण बायबलचा आरशाप्रमाणे उपयोग करतो. याकोबाने म्हटले: “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका . . . . जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या माणसासारखा आहे; तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.”—याकोब १:२२-२५.

आपण देववचनाचे जवळून परीक्षण करतो आणि आपण देवाच्या दर्जांनुसार कसे असले पाहिजे आणि सध्या कसे आहोत यांमध्ये आपण तुलना करतो तेव्हा देववचनामध्ये आपण “निरीक्षण” करतो. असे करण्याद्वारे आपण ‘केवळ ऐकणारे नव्हे, तर वचनाप्रमाणे आचरण करणारे’ होऊ. बायबलचा आपल्यावर उत्तम परिणाम झालेला असेल.

तरवारीप्रमाणे देवाचे वचन

अखेरीस, आपण देवाचे वचन तरवारीप्रमाणे कसे वापरू शकतो, हे दाखविण्यास प्रेषित पौल आपल्याला मदत करतो. ‘सत्ता, सध्याच्या काळोखातील जगाचे अधिपती, आकाशातील दुरात्मे,’ यांच्या विरोधात इशारा देत असताना तो आपल्याला ‘आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन स्वीकारण्याचे’ आर्जवतो. (इफिसकर ६:१२, १७) देवाचे वचन असे अत्यावश्‍यक शस्त्र आहे ज्याच्या साह्‍याने “देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व काही” आपण छाटून टाकू शकतो.—२ करिंथकर १०:३-५.

निःसंदेह, ‘देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे.’ (इब्रीयांस ४:१२) यहोवा मानवजातीबरोबर त्याच्या प्रेरित वचनाच्या पृष्ठांच्या माध्यमाने बोलतो. इतरांना शिकविण्याकरता आणि खोट्या शिकवणुकींना उघड करण्याकरता त्याचा चांगला उपयोग करा. इतरांना उत्तेजन देण्यासाठी, उभारणी करण्यासाठी, ताजेतवाने करण्यासाठी, सांत्वन देण्यासाठी, चालना देण्यासाठी आणि आध्यात्मिकरीत्या मजबूत करण्यासाठी त्याचा लाभ घ्या. आणि मग यहोवा त्याच्या “इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो,” ज्यामुळे तुम्ही त्याच्या “दृष्टीने जे आवडते ते” नेहमी कराल.—इब्रीयांस १३:२१.

[तळटीपा]

a पाहा टेहळणी बुरूज (इंग्रजी) लेख शीर्षक “ते दयाळुपणे लहान मेंढराचे मेंढपाळकत्व करतात,” सप्टेंबर १५, १९९३, पृष्ठे २०-३.

[३१ पानांवरील चित्रं]

देवाच्या वचनास नीट हाताळण्याद्वारे’ वडील इतरांना उत्तेजन देतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा