ख्रिस्ताच्या नियमानुसार चालणे
“एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.”—गलतीकर ६:२.
१. ख्रिस्ताचा नियम हा आजच्या काळात चांगले ते घडवून आणणारा प्रचंड आवेग आहे असे का म्हणता येईल?
र्वांडा या देशात अलीकडेच माजलेल्या नृजातीय संहारापासून एकमेकांना वाचवण्यासाठी, यहोवाचे साक्षीदार असलेल्या हुतु व तुत्सी बांधवांनी स्वतःचे जीव धोक्यात घातले. कोबे, जपान येथील विनाशकारी भूकंपात कौटुंबिक सदस्यांना गमावून बसलेले यहोवाचे साक्षीदार त्यांना झालेल्या नुकसानामुळे हेलावून गेले होते. तरीसुद्धा, इतर भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी लगेच हालचाल केली. खरोखर, जगभरातील अशी संतोषकारक उदाहरणे दाखवून देतात की ख्रिस्ताचा नियम आज क्रियाशील आहे. तो चांगले ते घडवून आणणारा प्रचंड आवेग आहे.
२. ख्रिस्ती धर्मजगत मुळात ख्रिस्ताच्या नियमाचा अर्थ कशाप्रकारे समजू शकलेले नाहीत, व आपण त्या नियमास पूर्ण करण्यासाठी काय करण्यास हवे?
२ त्याच वेळेस, या कठीण ‘शेवटल्या काळाबद्दल’ केलेली बायबलची भविष्यवाणी पूर्ण होत आहे. अनेक जण “सुभक्तीचे केवळ बाह्य रूप” दाखवतात पण ते ‘तिचे सामर्थ्य नाकारतात.’ (२ तीमथ्य ३:१, ५) विशेषतः, ख्रिस्ती धर्मजगतात धर्म हा सहसा अंतःकरणाशी नव्हे तर औपचारिकतेशी संबंधित असतो. हे, ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालणे अतिशय कठीण असल्यामुळे आहे का? नाही. ज्या नियमानुसार चालता येणे शक्य नाही असा नियम ख्रिस्ताने आपल्याला दिलाच नसता. ख्रिस्ती धर्मजगत हे मुळात या नियमाचा अर्थच समजू शकलेले नाही. “एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल,” या प्रेरित शब्दांकडे लक्ष पुरवण्यात ते अपेशी ठरले आहे. (गलतीकर ६:२) आपण परुशांचे अनुकरण करून आपल्या बांधवांच्या ओझ्यांत विनाकारण भर पाडण्याऐवजी एकमेकांची ओझी वाहण्याकरवी ‘ख्रिस्ताचा नियम पूर्ण करतो.’
३. (अ) ख्रिस्ताच्या नियमात समाविष्ट असलेले काही नियम कोणकोणते आहेत? (ब) ख्रिस्ती मंडळीत ख्रिस्ताने दिलेल्या सुस्पष्ट आज्ञांव्यतिरिक्त इतर कोणतेही नियम नसावेत असा निष्कर्ष काढणे अयोग्य का ठरेल?
३ ख्रिस्ताच्या नियमात ख्रिस्त येशूच्या सर्व आज्ञा समाविष्ट आहेत—मग त्या प्रचार करणे व शिक्षण देण्याविषयी असोत, दृष्टी शुद्ध व साधी ठेवण्याविषयी असोत, शेजाऱ्यासोबत शांती राखण्याचा प्रयत्न करण्याविषयी असोत किंवा मंडळीतून अशुद्धता घालवण्याविषयी असोत. (मत्तय ५:२७-३०; १८:१५-१७; २८:१९, २०; प्रकटीकरण २:१४-१६) खरोखरच, ख्रिस्ताच्या अनुयायांना बायबलमध्ये देण्यात आलेल्या सर्व आज्ञांचे पालन करणे हे ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य आहे. याहूनही अधिक यात गोवलेले आहे. यहोवाच्या संघटनेला, तसेच प्रत्येक मंडळीला देखील सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक नियम व पद्धती ठरवाव्या लागतात. (१ करिंथकर १४:३३, ४०) केव्हा, कोठे व कशाप्रकारे सभा चालवाव्यात याविषयी ख्रिस्ती लोकांकडे नियम नसते तर ते एकत्र भेटूच शकले नसते! (इब्री लोकांस १०:२४, २५) संघटनेत अधिकार देण्यात आलेल्यांनी घालून दिलेल्या व्यवहार्य मार्गदर्शक नियमांना सहकार्य देणे हे देखील ख्रिस्ताचा नियम पूर्ण करण्यात समाविष्ट आहे.—इब्री लोकांस १३:१७.
४. शुद्ध उपासनेस प्रवृत्त करणारी शक्ती कोणती आहे?
४ तथापि, खरे ख्रिस्ती त्यांच्या उपासनेस, नियमांची एक निर्रथक संरचना बनू देत नाहीत. केवळ एखादी व्यक्ती किंवा संघटना करावयास सांगते म्हणून ते यहोवाची सेवा करत नाहीत. याउलट प्रीती ही त्यांच्या उपासनेत त्यांना प्रवृत्त करणारी शक्ती आहे. पौलाने लिहिले: “ख्रिस्ताची प्रीति आम्हाला गळ घालते.” (तिरपे वळण आमचे.) (२ करिंथकर ५:१४, पंडिता रमाबाई भाषांतर) येशूने त्याच्या अनुयायांना एकमेकांवर प्रीती करण्याची आज्ञा दिली. (योहान १५:१२, १३) स्वार्थत्यागी प्रीती ख्रिस्ताच्या नियमाचा आधार आहे व ती सबंध जगातील खऱ्या ख्रिस्ती लोकांना कुटुंबात तसेच मंडळीतही, जणू गळ घालते किंवा प्रवृत्त करते. कशाप्रकारे ते आपण पाहू.
कुटुंबात
५. (अ) आईवडील कुटुंबात ख्रिस्ताचा नियम कशाप्रकारे पूर्ण करू शकतात? (ब) पालकांकडून मुलांना कशाची गरज असते व ती पूर्ण करण्यासाठी काही पालकांनी कोणत्या अडथळ्यांवर मात करण्यास हवी?
५ प्रेषित पौलाने लिहिले: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२५) एक पती ख्रिस्ताचे अनुकरण करून आपल्या पत्नीसोबत प्रेमाने व समजूतदारपणे वागतो तेव्हा तो ख्रिस्ताच्या नियमाचा एक म्हत्त्वपूर्ण पैलू पूर्ण करतो. याशिवाय, येशूने लहान मुलांना प्रेमाने कवटाळून, त्यांच्यावर हात ठेवून व त्यांना आशीर्वाद देऊन त्यांबद्दल आपले वात्सल्य मोकळेपणाने प्रदर्शित केले. (मार्क १०:१६) ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणारे आईवडील देखील आपल्या मुलांबद्दल वात्सल्य प्रदर्शित करतात. काही पालकांना या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणे जड जाते हे कबूल आहे. काही जण स्वभावतःच भावना व्यक्त करणारे नसतात. पालकांनो, अशा प्रकारच्या विचारांना तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला वाटणारी प्रीती प्रदर्शित करण्याच्या आड येऊ देऊ नका! तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल प्रीती आहे हे केवळ तुम्हाला माहीत असणे पुरेसे नाही. त्यांना देखील ते कळून येण्यास हवे. तुम्ही तुमची प्रीती प्रदर्शित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढत नाही तोपर्यंत त्यांना हे कळून येणार नाही.—पडताळा मार्क १:११.
६. (अ) मुलांना पालकांनी घालून दिलेल्या नियमांची गरज असते का, व तुम्ही असे उत्तर का देता? (ब) घरातील नियम घालून देण्याचे कोणते मूळ कारण मुलांना समजून येण्यास हवे? (क) ख्रिस्ताचा नियम घरात पाळला जातो तेव्हा कोणते धोके टळतात?
६ त्याच वेळेस, मुलांना निर्बंधांची गरज असते; म्हणजेच त्यांच्या पालकांनी नियम घालून द्यावेत व काहीवेळा या नियमांचा अवलंब करण्यासाठी शिक्षाही द्यावी. (इब्री लोकांस १२:७, ९, ११) असे असले तरीसुद्धा, हे नियम घालून देण्याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्या आईवडिलांची त्यांच्यावर प्रीती आहे, हे समजून घेण्यास मुलांना सातत्याने मदत पुरवण्यास हवी. शिवाय, त्यांच्या पालकांना आज्ञाधारक राहण्यामागे प्रीती हेच सर्वोत्तम कारण आहे हे त्यांनी शिकण्यास हवे. (इफिसकर ६:१; कलस्सैकर ३:२०; १ योहान ५:३) सुज्ञ पालकाचे लक्ष्य आपल्या लहान मुलांना पुढे योग्य निर्णय घेता येतील यासाठी त्यांच्या ‘तर्कशक्तीचा’ उपयोग करण्यास शिकविणे हे असते. (रोमकर १२:१, NW; पडताळा १ करिंथकर १३:११.) दुसरीकडे पाहता, नियम हे अत्याधिक किंवा शिस्त ही अनावश्यकपणे निष्ठुर असू नये. पौल म्हणतो: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” (कलस्सैकर ३:२१; इफिसकर ६:४) ख्रिस्ताचा नियम घरात पाळला जातो तेव्हा अनिर्बंध रागाच्या भरात किंवा खोचक उपरोधाने शिक्षा दिली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा घरात मुलांना ओझ्याखाली दबल्यासारखे वाटत नाही व ते खचून जात नाहीत त्याउलट त्यांना सुरक्षित वाटते व ते प्रोत्साहित होतात.—पडताळा स्तोत्र ३६:७.
७. घरात नियम घालून देण्याच्या बाबतीत बेथेल गृहे कोणत्या प्रकारे उदाहरण पुरवतात?
७ सबंध जगातील विविध बेथेल गृहांना भेट दिलेले लोक या गृहांबद्दल म्हणतात की ती कुटुंबातील नियमांच्या बाबतीत संतुलनाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या संस्थांमध्ये प्रौढ लोक असले तरी त्यांतील कारभार कुटुंबांसारखेच चालतात.a बेथेलमध्ये वैविध्यपूर्ण कामकाज केले जात असल्यामुळे बऱ्याचशा नियमांची आवश्यकता भासते—हे नियम सर्वसामान्य कुटुंबात असणाऱ्या नियमांपेक्षा निश्चितच अधिक असतात. तथापि बेथेल गृहांचे, कार्यालयांचे व कारखान्यातील कारभाराचे नेतृत्व करणारे वडील ख्रिस्ताचा नियम कृतीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते केवळ कारभाराचे व्यवस्थापन करण्याचेच नव्हे तर त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आध्यात्मिक प्रगती व ‘परमेश्वराविषयीचा आनंद’ वाढीस लावण्याचे कार्य देखील त्यांना नेमलेले आहे असा दृष्टिकोन बाळगतात. (नहेम्या ८:१०) या उद्देशाने ते सकारात्मक व प्रोत्साहक पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करतात व समंजस होण्यासाठी झटतात. (इफिसकर ४:३१, ३२) बेथेल कुटुंबे आपल्या आनंदी मनोभावाकरता प्रसिद्ध आहेत यात काहीच नवल नाही!
मंडळीत
८. (अ) मंडळीत आपले नेहमीच कोणते ध्येय असण्यास हवे? (ब) काहींनी कोणत्या परिस्थितींमध्ये नियमांची मागणी केली आहे अथवा स्वतः नियम स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे?
८ याच धर्तीवर, मंडळीतही प्रीतीच्या आत्म्याने एकमेकांची उभारणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:११) यास्तव, व्यक्तिगत पसंतीच्या बाबतीत इतरांवर आपले विचार लादण्याद्वारे इतरांची ओझी वाढवू नयेत यासाठी सर्व ख्रिस्ती लोकांनी सतर्क राहण्यास हवे. काही वेळेस, काही जण विशिष्ट चित्रपटांबद्दल, पुस्तकांबद्दल एवढेच काय तर खेळण्यांबद्दलही कसा दृष्टिकोन बाळगावा हे ठरवण्यासाठी वॉच टावर संस्थेला पत्र लिहितात. तथापि, अशा बाबींची शहानिशा करण्याचा किंवा त्यांवर निर्णय देण्याचा संस्थेला अधिकार नाही. पुष्कळ प्रकरणांत, स्वतः व्यक्तीने किंवा कुटुंब प्रमुखाने बायबलच्या तत्त्वांविषयी असलेल्या प्रीतीच्या आधारावर निर्णय घ्यावा अशा या बाबी असतात. इतर लोक संस्थेने सुचवलेल्या गोष्टी व मार्गदर्शन यांचे नियमांत रूपांतर करतात. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूजच्या मार्च १५, १९९६ या अंकात, मंडळीतील सदस्यांना नियमित मेंढपाळकत्वाच्या भेटी देण्याचे वडिलांना प्रोत्साहन देणारा एक सुरेख लेख होता. याद्वारे नियम स्थापित करण्याचा उद्देश होता का? नाही. सुचवलेल्या गोष्टींचे पालन करणे ज्यांना शक्य होते त्यांना त्यातून अनेक लाभ मिळतात; तथापि, काही वडील असे करण्यास समर्थ नाहीत. त्याचप्रकारे, टेहळणी बुरूजच्या एप्रिल १, १९९५ या अंकातील “वाचकांचे प्रश्न” या लेखात, बाप्तिस्म्याच्या प्रसंगी अतिशयोक्ती करून उदाहरणार्थ, बेफाम पार्ट्या देऊन किंवा विजयोत्सव साजरा करून, त्या प्रसंगाच्या गांभिर्यापासून लक्ष विचलित करण्याविरुद्ध ताकीद देण्यात आली होती. काहींनी मात्र या सुज्ञ सल्ल्याविषयी टोकाची भूमिका घेऊन, या प्रसंगी प्रोत्साहन देणारे एखादे कार्ड पाठवणेही चुकीचे ठरेल असा नियम स्थापित केला आहे!
९. आपण एकमेकांविरुद्ध अनावश्यक टीका करण्याचे व दोष लावण्याचे टाळावे हे महत्त्वपूर्ण का आहे?
९ शिवाय, ‘स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचा’ प्रभाव आपल्यामध्ये राखावयाचा असल्यास सर्व ख्रिस्ती विवेक सारखे नसतात हे आपण कबूल करण्यास हवे. (याकोब १:२५) काही जणांना, शास्त्रवचनीय तत्त्वांचे उल्लंघन न करणाऱ्या व्यक्तिगत आवडीनिवडी असल्यास आपण वितंडवाद मांडावा का? नाही. आपले असे करणे विभाजक ठरेल. (१ करिंथकर १:१०) सह ख्रिस्ती बांधवावर दोष लावण्याविरुद्ध इशारा देताना पौलाने म्हटले: “तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.” (रोमकर १४:४) प्रत्येकाच्या विवेकास ठरवू द्याव्यात अशा बाबतीत एकमेकांविरुद्ध टीका केल्यास आपण देवाला नाराज करण्याची जोखीम पत्करतो.—याकोब ४:१०-१२.
१०. मंडळीवर देखरेख करण्यासाठी कोणास नेमलेले आहे व आपण त्यांना कोणत्या प्रकारे आधार देण्यास हवा?
१० तसेच, देवाच्या कळपावर देखरेख करण्यासाठी वडिलांना नेमले आहे हे देखील आपण आठवणीत ठेवू. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) मदत करण्यासाठी ते आहेत. सल्ला हवा असल्यास आपण निसंकोचपणे त्यांच्याकडे जावे कारण ते बायबलचे अभ्यासक असतात व वॉच टावर संस्थेच्या साहित्यात चर्चा करण्यात आलेले विषय त्यांना सुपरिचित असतात. शास्त्रवचनीय तत्त्वांचे उल्लंघन करण्यास चालना देणारे आचरण घडत असल्याचे त्यांना दिसून आल्यास ते निर्भयपणे आवश्यक असलेले मार्गदर्शन देतात. (गलतीकर ६:१) मंडळीचे सदस्य पुढाकार घेणाऱ्या या प्रिय मेंढपाळांसोबत सहकार्य करण्याद्वारे ख्रिस्ताच्या नियमाचे पालन करतात.—इब्री लोकांस १३:७.
वडिलांद्वारे ख्रिस्ताच्या नियमाचे पालन
११. वडील मंडळीत ख्रिस्ताचा नियम कसा लागू करतात?
११ मंडळीत ख्रिस्ताचा नियम पूर्ण करण्यास वडील उत्सुक असतात. ते सुवार्तेच्या प्रचारात पुढाकार घेतात, अंतःकरणाचा ठाव घेता येईल अशाप्रकारे बायबलमधून शिकवतात, तसेच “जे अल्पधीराचे आहेत” त्यांच्याशी प्रेमळ, कोमल मेंढपाळांसारखे बोलतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) ते ख्रिस्ती धर्मजगताच्या कितीतरी धर्मांत अस्तित्वात असणाऱ्या गैर-ख्रिस्ती मनोवृत्ती बाळगण्याचे टाळतात. खरोखर, हे जग झपाट्याने लयास जात आहे व पौलाप्रमाणेच अनेक वडिलांना कळपाविषयी काळजी वाटते; तथापि अशा काळजीच्या बाबींवर कृती करताना ते संतुलन राखतात.—२ करिंथकर ११:२८.
१२. एखादा ख्रिस्ती, वडिलांजवळ मदतीसाठी येतो तेव्हा वडिलांनी कशी प्रतिक्रिया दाखवावी?
१२ उदाहरणार्थ, कोणा ख्रिश्चनास कोणत्याही खास सुस्पष्ट शास्त्रवचनीय उल्लेखांतर्गत न येणाऱ्या व वेगवेगळ्या ख्रिस्ती तत्त्वांत संतुलन साधावयास लावणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कोणा वडिलांशी विचारविनिमय करण्याची इच्छा असू शकेल. कदाचित, त्याला त्याच्या नोकरीत बढतीचा प्रस्ताव मिळाला असावा ज्याकरवी त्याला अधिक पगार मिळेल पण त्याची जबाबदारी वाढेल. किंवा एखाद्या तरुण ख्रिश्चनाचे, सत्य न मानणारे पिता त्याजकडून त्याच्या सेवेवर परिणाम करू शकतील अशा अपेक्षा करीत असतील. अशा परिस्थितींमध्ये वडील एक व्यक्तिगत अभिप्राय देत नाहीत. याउलट, ते कदाचित बायबल उघडतील व समर्पक तत्त्वांवर तर्क करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करतील. ते, टेहळणी बुरूज व इतर प्रकाशनांमध्ये सदर विषयाबद्दल ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ काय म्हटलेले आहे हे शोधून काढण्यासाठी, उपलब्ध असल्यास टेहळणी बुरुज प्रकाशन सूची (इंग्रजी) उपयोगात आणतील. (मत्तय २४:४५) यानंतर, त्या ख्रिश्चनाने वडिलांच्या मते योग्य नसणारा निर्णय घेतला तर काय? तो निर्णय बायबल तत्त्वांचे व नियमांचे प्रत्यक्ष उल्लंघन करत नसल्यास, त्या ख्रिश्चनास दिसून येईल की, “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे” ही जाणीव राखून, वडील तो निर्णय घेण्याच्या त्या व्यक्तीच्या अधिकारास मान देतात. तथापि, “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल” हे मात्र या ख्रिश्चनाने लक्षात ठेवण्यास हवे.—गलतीकर ६:५, ७.
१३. प्रश्नांची थेट उत्तरे देण्याऐवजी किंवा स्वतःचे वैयक्तिक अभिप्राय देण्याऐवजी वडील इतरांना त्या बाबतीत तर्क करण्यास का मदत करतात?
१३ अनुभवी वडील अशाप्रकारे व्यवहार का करतात? दोन कारणांमुळे. पहिले म्हणजे पौलाने एका मंडळीस सांगितले की तो ‘त्यांच्या विश्वासावर सत्ता गाजवत नाही.’ (२ करिंथकर १:२४) वडील आपल्या बांधवास शास्त्रवचनांतून तर्क करण्यास व स्वतःचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यासाठी मदत करण्याद्वारे पौलाचे अनुकरण करत आहेत. येशूने त्याचा अधिकार मर्यादित आहे याची जाणीव राखली त्याच प्रकारे ते देखील त्यांचा अधिकार मर्यादित आहे याची जाणीव राखतात. (लूक १२:१३, १४; यहूदा ९) त्याच वेळेस, वडील उपयोगी व जेथे आवश्यक असते तेथे सडेतोड शास्त्रवचनीय मार्गदर्शन देखील देतात. दुसरे म्हणजे, ते त्यांच्या सह ख्रिस्ती बांधवास प्रशिक्षित करत आहेत. प्रेषित पौलाने म्हटले: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.” (इब्री लोकांस ५:१४) यास्तव, प्रौढतेप्रत प्रगती करण्यासाठी, आपण नेहमीच आपल्याला उत्तरे मिळावीत या अपेक्षेने इतरांवर विसंबून न राहता स्वतःच्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करण्यास हवा. शास्त्रवचनांतून कशाप्रकारे तर्क करावा हे आपल्या सह ख्रिस्ती बांधवास दाखवण्याद्वारे वडील त्याला प्रगती करण्यास मदत करत असतात.
१४. प्रौढ जन, यहोवावर भरवसा ठेवत असल्याचे कसे दाखवू शकतात?
१४ यहोवा देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने खऱ्या उपासकांच्या अंतःकरणांवर प्रभाव करील याबद्दल आपण विश्वस्त राहू शकतो. या खात्रीने, प्रौढ ख्रिस्ती त्यांच्या बांधवांच्या अंतःकरणातील भावनांना आर्जव करतात व प्रेषित पौलाप्रमाणे त्यांना विनंती करतात. (२ करिंथकर ८:८; १०:१; फिलेमोन ८, ९) ताळ्यावर ठेवण्यासाठी सविस्तर नियमांची गरज नीतिमानांना नव्हे तर अनीतिमान लोकांना असते हे पौलास माहीत होते. (१ तीमथ्य १:९) त्याने त्याच्या बांधवांबद्दल संशयी किंवा अविश्वासी वृत्ती दाखवली नाही तर विश्वास प्रदर्शित केला. एका मंडळीला त्याने लिहिले: ‘तुम्हाविषयी प्रभूमध्ये आम्हाला भरवसा आहे.’ (२ थेस्सलनीकाकर ३:४) पौलाचा विश्वास, खात्री व भरवसा यांमुळे त्या ख्रिश्चनांना निश्चितच बरेच प्रोत्साहन मिळाले. आजही वडील व प्रवासी पर्यवेक्षकांसमोर अशाचप्रकारची उद्दिष्टे आहेत. देवाच्या कळपाचे प्रेमळपणे पालन करतेवेळी हे विश्वासू पुरुष केवढे उत्साहवर्धक असतात!—यशया ३२:१, २; १ पेत्र ५:१-३.
ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालणे
१५. आपण आपल्या बांधवांसोबतच्या नातेसंबंधात ख्रिस्ताच्या नियमाचा अवलंब करत आहोत किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण स्वतःस कोणते प्रश्न विचारू शकतो?
१५ आपण ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालत आहोत का व त्यास उचलून धरत आहोत का हे पाहण्यासाठी आपण सर्वांनी नियमितपणे स्वतःचे परीक्षण करणे आवश्यक आहे. (२ करिंथकर १३:५) ‘मी प्रोत्साहक आहे किंवा टीकात्मक आहे? संतुलित आहे किंवा अतिरेकी आहे? मी इतरांविषयी समजूतदारपणा दाखवतो का, की स्वतःच्याच अधिकारांवर जोर देतो?’ यांसारखे प्रश्न विचारणे हे आपल्या सर्वांनाच लाभदायक ठरू शकते. ख्रिस्ती व्यक्ती, बायबलमध्ये विशिष्टपणे हाताळण्यात आलेल्या नाहीत अशा बाबतीत आपल्या बांधवाने कोणती पावले उचलावीत किंवा उचलू नयेत यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत नाही.—रोमकर १२:१; १ करिंथकर ४:६.
१६. स्वतःबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असलेल्यांची मदत करून आपण ख्रिस्ताच्या नियमाचा एक महत्त्वपूर्ण पैलू कशाप्रकारे पूर्ण करू शकतो?
१६ या कठीण काळात, एकमेकांस प्रोत्साहन देण्याचे मार्ग शोधून काढणे महत्त्वाचे आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५; पडताळा मत्तय ७:१-५.) आपण आपल्या बंधूभगिनींकडे पाहतो तेव्हा त्यांच्या उणीवांपेक्षा त्यांचे सद्गुण हेच आपल्यासाठी अधिक महत्त्व राखतात, नाही का? यहोवाच्या नजरेत प्रत्येक जण मौल्यवान आहे. खेदाची बाब अशी, की सर्वच जण अशाप्रकारे विचार करत नाहीत—स्वतःबद्दलही नाही. अनेकांना स्वतःमध्ये केवळ व्यक्तिगत दोष व कमतरता पाहण्याची सवय असते. अशांना व इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला प्रत्येक सभेत एखाददोन लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणे व मंडळीत त्यांची उपस्थिती व त्यांचा महत्त्वाचा हातभार आपल्याला मोलाचा का वाटतो हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणे शक्य होईल का? या मार्गाने त्यांचे ओझे हलके करणे व त्याकरवी ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणे केवढे आनंदप्रद ठरेल!—गलतीकर ६:२.
ख्रिस्ताचा नियम क्रियाशील आहे!
१७. तुमच्या मंडळीत ख्रिस्ताचा नियम क्रियाशील आहे हे तुम्हास कोणत्या वेगवेगळ्या मार्गांनी प्रत्ययास येते?
१७ ख्रिस्ती मंडळीत ख्रिस्ताचा नियम क्रियाशील आहे. साक्षीदार बांधव आवेशाने सुवार्तेचा प्रचार करतात तेव्हा, ते एकमेकांना सांत्वन व प्रोत्साहन देतात तेव्हा, अत्यंत बिकट अडचणी असतानाही ते यहोवाची सेवा करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतात तेव्हा, मुलांनी आनंदी अंतःकरणांनी यहोवावर प्रेम करावे या उद्देशाने पालक त्यांचे संगोपन करण्याचा यत्न करतात तेव्हा, यहोवाची सर्वकाळ सेवा करण्यासाठी पर्यवेक्षक आपल्या कळपाला ज्वलंत आवेश बाळगण्याची चेतना देऊन, प्रेमाने व कळकळीने देवाचे वचन शिकवतात तेव्हा, अर्थात दररोजच आपल्याला याचा प्रत्यय येत असतो. (मत्तय २८:१९, २०; १ थेस्सलनीकाकर ५:११, १४) आपण व्यक्तिगतपणे आपल्या जीवनात ख्रिस्ताचा नियम कृतीत आणतो तेव्हा यहोवाचे अंतःकरण केवढे आनंदित होते! (नीतिसूत्रे २३:१५) त्याच्या परिपूर्ण नियमावर प्रीती करणाऱ्या सर्वांनी सर्वकाळ जगावे अशी त्याची इच्छा आहे. येणाऱ्या परादीसमध्ये, मानवजात परिपूर्ण असेल असा काळ आपण पाहू, एक असा काळ ज्यात नियमांचे उल्लंघन करणारे नसतील व एक असा काळ जेव्हा आपल्या अंतःकरणातील प्रत्येक इच्छा नियंत्रणात असेल. ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालण्याचे केवढे हे भव्य प्रतिफळ!
[तळटीपा]
a अशी गृहे ख्रिस्ती धर्मजगताच्या मठांसारखी नसतात. त्याअर्थी यांत कोणतेही “ॲबॉट” किंवा “पिता” नसतात. (मत्तय २३:९) जबाबदार बांधवांना आदर दिला जातो तथापि, सर्व वडिलांवर नियंत्रण करणाऱ्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाखालीच ते देखील सेवा करतात.
तुम्हाला काय वाटते?
◻ ख्रिस्ती धर्मजगत ख्रिस्ताच्या नियमाचा मुळात अर्थच का समजू शकलेले नाही?
◻ आपण ख्रिस्ताचा नियम कुटुंबात कोणकोणत्या प्रकारे कृतीत आणू शकतो?
◻ मंडळीत ख्रिस्ताच्या नियमाचा अवलंब करण्यासाठी आपण काय टाळण्यास हवे व काय करण्यास हवे?
◻ मंडळीसोबत व्यवहार करताना वडील ख्रिस्ताच्या नियमाचे पालन कशाप्रकारे करू शकतात?
[२३ पानांवरील चित्रं]
तुमच्या मुलास प्रीतीची अत्यंत गरज आहे
[२४ पानांवरील चित्रं]
आपले प्रेमळ मेंढपाळ किती उत्साहवर्धक आहेत!