वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ११/१ पृ. ८-१२
  • ‘तुमची प्रगति सर्वांस दिसून यावी’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘तुमची प्रगति सर्वांस दिसून यावी’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आत्मपरिक्षणाचा काळ
  • “मुलाच्या गोष्टी”
  • प्रगति कशी दिसून येते
  • तुम्ही “प्रौढ” ख्रिस्ती आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तुमची प्रगती सर्वांस दिसून येऊ द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ‘सत्याचे वचन नीट हाताळणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ११/१ पृ. ८-१२

‘तुमची प्रगति सर्वांस दिसून यावी’

“आता प्रौढ झाल्यावर मी मुलाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.”—१ करिंथकर १३:११.

१. वाढ ही निर्मितीतील आश्‍चर्यापैकी एक कशी आहे?

केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दिसू शकणाऱ्‍या लहानशा अंड्यापासून ३० मीटर लांब व ८० टन वजनाएवढ्या व्हेल माशाची उत्पत्ती होते. याचप्रमाणे एका लहानशा बीजाद्वारे ९० मीटर्स उंचीचा प्रचंड सिकोआ वृक्ष वाढतो. खरेच, वाढ ही जीवनाचे एक आश्‍चर्यच आहे. पौलाने म्हटल्याप्रमाणे, आपण लावू शकतो व पाणीही घालू शकतो, परंतु “वाढविणारा देव हाच काय तो आहे.”—१ करिंथकर ३:७.

२. पवित्र शास्त्रात आणखी कोणत्या प्रकारातील वाढ भाकित करण्यात आली होती?

२ तथापि, आश्‍चर्यकारक वाटणारी आणखी एक वाढ आहे. ही यशया संदेष्ट्याने भाकित केली होती. तो म्हणालाः “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशया ६०:२२) हा भविष्यवाद देवाच्या लोकांच्या वाढीबद्दल आहे; आणि याची भव्य पूर्णता आमच्या काळी होत आहे.

३. यहोवा आपल्या लोकांचे कार्य त्वरेने घडवून आणीत आहे हे १९९१च्या सेवा वर्षाच्या अहवालाद्वारे कसे दिसते?

३ यहोवाच्या साक्षीदारांचा जागतिक कार्य हालचालीचा १९९१चा सेवा वर्षाचा अहवाल दाखवतो की, राज्य प्रचारकाच्या संख्येने ४२,७८,८२० नवे शिखर गाठले असून ३,००,९४५ लोकांचा त्या वर्षभरात बाप्तिस्मा झाला. इतक्या नव्या लोकांची भर पडल्यामुळे ३,१९१ नव्या मंडळ्या प्रस्थापित झाल्या आणि त्यांना अनुलक्षून असणारे नवे विभाग व प्रांत तयार करण्यात आले. याचा अर्थ दर दिवशी आठ नव्या मंडळ्या निर्माण झाल्या, आणि दोन दिवसात एक नवा विभाग बनला. केवढी ही प्रचंड वाढ! खरेच, यहोवा आपले कार्य त्वरेने पूर्ण करीत आहे आणि त्याचे लोक करीत असलेल्या कामावर त्याचे आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहेत.—स्तोत्रसंहिता १२७:१.

आत्मपरिक्षणाचा काळ

४. आपण भविष्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यास कोणते प्रश्‍न विचार करण्यासाठी उभे राहतात?

४ एवढे आशीर्वाद बघून आमचे हृदय उचंबळून येत असले तरी यामुळे आपल्यावर काही जबाबदाऱ्‍या पडतात. या नव्या लोकांच्या सर्व आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसे प्रौढ तसेच इच्छुक लोक असतील का? भविष्याकडे दृष्टिक्षेप टाकून पाहिल्यास या वाढीची काळजी घेण्यासाठी पायनियर्स, उपाध्य सेवक, वडील व प्रवासी देखरेख्यांची जी गरज लागेल तिचा आकडा बघता डोके चक्रावून जाईल. याचप्रमाणे या कार्याला अधिक पाठबळ देण्यासाठी जगभरातील शाखा दप्तेर, बेथेल गृहे यात स्वेच्छेने काम करणाऱ्‍यांचीही मोठ्या प्रमाणात गरज लागेल. आता इतके सारे लोक कोठून येणार? कापणी ही मोठी आहे यात काही शंका नाही. पण ती करण्यासाठी जरुर असणाऱ्‍या कामकऱ्‍यांची गरज आज कोण पूर्ण करू शकतील?—मत्तय ९:३७, ३८.

५. वेगाने होणाऱ्‍या वाढीमुळे काही भागात कशी स्थिती उद्‌भवली आहे?

५ जगाच्या काही भागात अशाही काही मंडळ्यांबद्दल कळविण्यात आले आहे की तेथे साधारण शंभर राज्य-प्रचारक आहेत पण त्यांची काळजी एकच वडील, एक किंवा दोन उपाध्य सेवकांच्या साहाय्याने घेत आहेत. कधी कधी तर एकाच वडीलाला दोन मंडळ्यांची काळजी घ्यावी लागते. इतर काही जागी घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यासाठी लायक अशा ख्रिस्ती सेवकांची इतकी गरज आहे की, नव्या लोकांची नावे जणू प्रतीक्षा यादीवर ठेवावी लागतात. तसेच इतर जागी तर नव्या मंडळ्या इतक्या वेगाने तयार होतात की, एकाच राज्य सभागृहाला तीन, चार, किंवा पाच मंडळ्यांना वापरावे लागत आहे. कदाचित तुम्ही तुमच्या क्षेत्रात अशी वाढ अनुभवली असेल.

६. आपले स्वतःचे परिक्षण स्वतः करून बघणे हे समयोचित का आहे?

६ वरील सर्व घटना आम्हाला काय सांगतात? हेच की काळाची लक्षणे लक्षात घेता आम्ही सर्वांनी आपापल्या परिस्थितीचे परिक्षण करून, आपण स्वतः वेळेचा तसेच आम्हापाशी असणाऱ्‍या साधनांचा सदुपयोग गरजांना प्रतिसाद देण्यासाठी करीत आहोत का हे पाहिले पाहिजे. (इफिसकर ५:१५-१७) पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने असे लिहिलेः “जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता, त्या तुम्हास देवाच्या वचनाची मुळाक्षरे कोणी तरी शिकवावी याची गरज आहे, आणि ज्यांस जड अन्‍न सोसत नाही, दूधच पाहिजे, असे तुम्ही झाला आहा.” (इब्रीयांस ५:१२) या शब्दांकडे लक्ष दिल्यास ख्रिश्‍चनाने वैयक्‍तिकपणे प्रगति करण्यास हवी हे दिसून येईल. ख्रिस्ती प्रौढतेप्रत जाण्याऐवजी आध्यात्मिक बाल्यावस्थेत राहण्याचा धोका असू शकेल. या कारणासाठीच पौल हे आर्जवितोः “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परिक्षा करा, आपली प्रतीती पाहा.” (२ करिंथकर १३:५) तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून तुम्ही आध्यात्मिक रितीने प्रगति करीत आहात की नाही याचे तुम्ही स्वतः परिक्षण केलेले आहे का? किंवा तुम्ही पूर्वी होता तेथेच अजूनही आहात? हे एखाद्याला कसे समजू शकेल?

“मुलाच्या गोष्टी”

७. आपली आध्यात्मिक प्रगति दिसून येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

७ “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी मुलाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.” असे प्रेषित पौल म्हणाला. (१ करिंथकर १३:११) आध्यात्मिक वाढीच्या बाबतीत आपण सर्वजण विचार व कृति करण्यात एकेकाळी बाळासारखेच होतो. तथापि, आपली प्रगति होत आहे हे दाखवण्यासाठी आपण पौलाने म्हटले तसे “मुलाच्या गोष्टी” करणे सोडून टाकण्यास हवे. पण या “मुलाच्या गोष्टी” कोणत्या आहेत?

८. पौलाने इब्रीयांस पत्र ५:१३, १४ मध्ये म्हटले त्यानुसार आध्यात्मिक बाळाचे एक लक्षण कोणते आहे?

८ यासाठी प्रथम, पौलाने इब्रीयांस पत्र ५:१३, १४ मध्ये काय म्हटले ते लक्षात घ्याः “दुधावर राहणारा नीतीमत्त्वाच्या वचनांविषयी अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे. ज्याच्या इंद्रियांस वहिवाटीने पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे अशा प्रौढ मनुष्यांसाठी जडान्‍न आहे.” तुम्ही ‘नीतीमत्त्वाच्या वचनाविषयी’ परिचित झाला आहात का? “पथ्यापथ्य” किंवा बरे काय व वाईट काय याचा फरक समजू शकेल इतक्या प्रमाणात तुम्हाला देवाचे वचन किंवा पवित्र शास्त्र समजले आहे का? पौल म्हणाला की, प्रौढांना ते जमू शकेल, कारण ते नियमितरित्या “जडान्‍न” घेत असतात. अशाप्रकारे सुदृढ असे आध्यात्मिक अन्‍न घेण्याची इच्छा किंवा भूक ही एखादा आध्यात्मिक रितीने वाढलेला आहे की, अद्याप आध्यात्मिक बाळ आहे हे दाखवण्यात चांगले प्रमाण आहे.

९. एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीचे प्रमाण त्याच्या आध्यात्मिक क्षुधेवरून कसे काढता येते?

९ तर मग, तुमची आध्यात्मिक क्षुधा कशी आहे? यहोवा देव पवित्र शास्त्र आधारीत प्रकाशने व ख्रिस्ती सभा आणि संमेलनाद्वारे आध्यात्मिक अन्‍नाची जी विपुल पुरवणूक करीत आहे त्याबद्दल तुमचा कसा दृष्टिकोण आहे? (यशया ६५:१३) वार्षिक प्रांतिय अधिवेशनात एखादे नवे प्रकाशन प्रसिद्ध झाल्याचे पाहून तुम्हाला निश्‍चितपणे आनंद होत असेल. पण ते तुम्ही घरी आणल्यावर त्याचे काय करता? द वॉचटावर किंवा अवेक! मासिकाचा नवा अंक टपालाद्वारे घरी आल्यावर तुम्ही काय करता? तुम्ही ही प्रकाशने वाचण्यासाठी वेळ देता का किंवा तुम्ही ती नुसती त्यातील ठळक मुद्दे वा विषय पाहण्यासाठी चाळता आणि ती आपल्या पुस्तकांच्या कपाटात लावून टाकता? ख्रिस्ती सभांबद्दल देखील असेच प्रश्‍न विचारता येतील. तुम्ही सर्व सभांना नियमितपणे जाता का? तुम्ही त्यांची तयारी करता व त्यात सहभाग घेता का? काही जण, नुसते वरवर चाळणे, जणू घाईघाईने जेवण उरकणे, अशा वाईट आध्यात्मिक सेवनाच्या सवयीत गुरफटल्याचे दिसतात. पण स्तोत्रकर्ता तर यापेक्षा किती वेगळा होता, ज्याने असे म्हटलेः “अहाहा! तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे, दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते.” याशिवाय, दावीद राजाने असे म्हटलेः “महासभेत मी तुझे उपकारस्मरण करीन; बलिष्ठ लोकांमध्ये [“जनसमुदायात,” न्यू.व.] मी तुझे स्तवन करीन.” (स्तोत्रसंहिता ३५:१८; ११९:९७) आपल्याला आध्यात्मिक तरतूदींबद्दल केवढी कदर आहे हे आमची आध्यात्मिक प्रगति मोजून पाहण्याचे प्रमाण आहे.

१०. इफिसकर ४:१४ मध्ये बालकाचे आणखी कोणते लक्षण दाखवण्यात आले आहे?

१० पौलाने आध्यात्मिक बालकाचे आणखी एक लक्षण दाखवले. याबद्दल तो इशारेवजा असे म्हणालाः “आपण यापुढे बाळासमान असू नये; म्हणजे मनुष्यांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गांस नेणाऱ्‍या युक्‍तीने, उपदेशरूपी प्रत्येक वाऱ्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.” (इफिसकर ४:१४) मुलांना प्रत्येक गोष्टीचे कुतुहल असते याची पालकांना जाणीव असते. हे एक असे लक्षण आहे ज्यामुळे त्यांना शोध घेणे, कसून पाहणी करणे व हळूवारपणे प्रौढ व्यक्‍ती होण्यासाठी समर्थ करते. पण यात धोका हा आहे की, ते एका गोष्टीपासून दुसरीकडे सहजपणे विचलीत होऊ शकतात. यात आणखी वाईट गोष्ट ही की, अनुभवाची उणीव असल्यामुळे त्यांची कुतुहुलता त्यांना गंभीर त्रासाकडे देखील निरवू शकते; व याद्वारे स्वतःसाठी व इतरांसाठी धोका उत्पन्‍न होऊ शकतो. हेच आध्यात्मिक बालकांच्या बाबतीत देखील खरे आहे.

११. (अ) “उपदेशरुपी प्रत्येक वाऱ्‍याने” या शब्दप्रयोगाचा वापर करताना पौलाच्या मनात कोणता विचार होता? (ब) आज आपल्याला कोणते ‘वारे’ लागू शकतात?

११ आध्यात्मिक बाळांना “उपदेशरुपी प्रत्येक वाऱ्‍याने” हेलकावे मिळू शकतात, या पौलाच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? येथे “वारा” या शब्दाचा अनुवाद ॲʹने․मॉस या ग्रीक शब्दापासून आहे व याबद्दल इंटरनॅशनल क्रिटीकल कॉमेन्ट्री हे परिक्षण मांडते की, तो “कल्पनेत होणारा बदल” याला अनुलक्षून असावा. हे पौलाच्या, “मनुष्याच्या धूर्तपणाने” या शब्दावरुन कळते. “धूर्तपणा,” याचा मूळ भाषेतील अर्थ, “फासे,” किंवा “फासे-खेळ,” म्हणजे आकस्मिक घडून येणारा खेळ असा आहे. यामागील मुद्दा असा की, आपण नेहमी नवनवीन कल्पना व उद्दिष्टे यांनी घेरलेले राहतो, व अशा गोष्टी साधारणपणे सोज्वळ, मोहक आणि योग्य अशाही दिसतात. पौलाचे शब्द प्रामुख्यत्वे आमच्या विश्‍वासाला अनुलक्षून आहेत—तो, जगव्याप्तणे चर्चेसचे ऐक्य साधण्यासाठी जे संघटित प्रयत्न केले जातात त्याबद्दल, सामाजिक, राजकीय इत्यादिबद्दल कसा आहे? (पडताळा १ योहान ४:१.) पण हेच तत्त्व, मनोरंजन, अन्‍न, आरोग्य किंवा शारीरिक सुदृढता याबद्दल जगाच्या नित्य बदलत राहणाऱ्‍या पद्धतीसाठीही लागू होणारे आहे. अशा गोष्टींमुळे, अनुभव व तारतम्य नसणाऱ्‍या आध्यात्मिक बाळांना सहजपणे हेलकावले जाऊ शकते व त्यांना स्वतःची आध्यात्मिक प्रगति करण्यामध्ये आणि त्यांचे अधिक महत्त्वपूर्ण ख्रिस्ती कर्तव्य पार पाडण्यात अडथळा होतो.—मत्तय ६:२२-२५.

१२. जबाबदाऱ्‍यांच्या बाबतीत लहान मुले प्रौढांपेक्षा कशी वेगळी असतात?

१२ लहान मुलांचे आणखी एक लक्षण म्हणजे, त्यांना मदत व लक्ष देण्याची सतत गरज राहते. त्यांना जबाबदाऱ्‍यांबद्दल जाणीव व काळजीही नसते; बालपणाचा काळ असा असतो की, ज्यात मौजमजा व खेळ याच गोष्टी सर्वकाही असतात. पौलाने म्हटले तसेच ते ‘मुलासारखे बोलतात, मुलासारखी बुद्धि असते व मुलासारखा विचार करतात.’ इतर लोक आपली काळजी करतील असे ते ग्राह्‍य मानतात. हेच आध्यात्मिक बालकांबद्दल देखील म्हणता येते. कोणी नवा मनुष्य आपले पहिले पवित्र शास्त्र भाषण देतो किंवा पहिल्यांदाच क्षेत्र कार्याला येतो तेव्हा आध्यात्मिक पालक आनंदाने त्याच्यासाठी सर्वकाही करतो. पण हा नवा मनुष्य, त्याला मिळणाऱ्‍या मदतीवरच विसंबून राहिला आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलण्यास सिद्ध होऊ शकला नाही तर काय होते? यामुळे तो शिकून घेत नाही हे स्पष्ट आहे.

१३. प्रत्येकाने स्वतःचा भार वाहण्यास का शिकले पाहिजे?

१३ या बाबतीत पौलाने लिहिलेला बोध लक्षात घ्या की, जरी “एकमेकांची ओझी वाहा,” असे त्याने म्हटले तरी तो पुढे म्हणाला की, “प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.” (गलतीकर ६:२, ५) अर्थात, ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या शिकून घेणे व त्या आपल्या खांदी घेण्यासाठी वेळ व श्रम लागतात हे खरे. आणि याकरता काही क्षेत्रात त्यागही पत्करावा लागतो. तथापि, स्वतःला मनोरंजन, प्रवास, लहानसहान यंत्रांचा छंद, किंवा प्रापंचिक कामाचा नको असलेला पाठपुरावा करीत राहणे या गोष्टीत गुंतवून ठेवणे ही गंभीर चूक ठरू शकते व याचा परिणाम एखादा आध्यात्मिक गोष्टीबद्दल नुसता बघत राहणारा, शिष्य बनविण्याच्या कामात वाढ करण्याची इच्छा नसणारा व आध्यात्मिक प्रगति करण्यात वा जबाबदारी उचलण्यात काही मागे राहणारा असा होऊ शकतो. “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुमची भुलवणूक होते,” असे शिष्य याकोबाने आर्जविले.—याकोब १:२२; १ करिंथकर १६:१३.

१४. आपण आध्यात्मिक बाळाची लक्षणे दाखवण्यात का समाधानी असू नये?

१४ होय, प्रौढ व बालके यांचा फरक दाखवणारी पुष्कळ लक्षणे आहेत. तथापि, पौल म्हणतो त्याप्रमाणे महत्त्वाची गोष्ट अशी की, आपण हळूवारपणे बालकांची लक्षणे सोडून देऊन स्वतःची वाढ केली पाहिजे. (१ करिंथकर १३:११; १४:२०) तसे न झाल्यास आपल्याला आध्यात्मिक अर्थाने अडथळा राहील. पण एखादा कशी प्रगती करू शकतो? प्रौढतेप्रत जाण्यासाठी आध्यात्मिक वाढीचा सांभाळ करण्यामध्ये काय काय समाविष्ट आहे?

प्रगति कशी दिसून येते

१५. वाढ होण्यामधील मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत?

१५ स्वाभाविक जगात वाढ कशी होते? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतेः “प्रत्येकाचे जीवन एका साध्या पेशीने सुरु होते. ही पेशी खाद्य गोळा करते व त्याचे बांधणी करणाऱ्‍या साच्यात रुपांतर करते व हा साचा वाढू लागतो. अशाप्रकारे एका साध्या पेशीची आपल्यातच वाढ घडते. ही पेशी वाढून तिचे विभाजन होते व इतर पेशी बनतात. बांधणी, वाढणे व विभाजन ही वाढीची लक्षणे होत.” पेशीची वाढ आपल्यातच घडते ही येथे लक्षणीय बाब आहे. योग्य तो आहार घेतला गेला, पचवला गेला व त्याचा वापर झाला की वाढ घडते. हे नवजात बालकात स्पष्टरित्या दिसू शकते. आपल्याला माहीत आहे की, मूल, स्निग्ध व प्रथिनांनी युक्‍त असणारा आहार म्हणजे मिश्र अन्‍न व दूध घेते; हे वाढीसाठी लागणारे साहित्य आहे. याचा परिणाम काय दिसतो? ते बाळ एका वर्षाच्या कालावधीत वजन व उंची याच्या रुपात जी वाढ करते तिची, त्याच्या बाकीच्या वर्षात होणाऱ्‍या सर्वसाधारण वाढीच्या तुलनेत कधीही बरोबरी होऊ शकणार नाही.

१६. बहुतेक नव्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांमध्ये कोणती वाढ दिसून येते, व ती कशामुळे शक्य बनते?

१६ नैसर्गिक वाढीपासून आपण बरेच काही शिकू शकतो, ज्याचा अवलंब आपल्याला आमच्या आध्यात्मिक प्रगतिच्या बाबतीत, आरंभापासून ते प्रौढतेपर्यंत, लागू करता येईल. सर्वात प्रथम म्हणजे, सतत भरवण्याचा कार्यक्रम जरुरीचा आहे. तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास जेव्हा प्रथमतःच सुरु केला होता त्या काळाची आठवण करा. जर आताही तुम्ही बाकीच्या इतर लोकांसारखे आहात तर देवाच्या वचनाबद्दल साधारणपणे तुम्हाला काहीही माहिती नसणार. तथापि, दर आठवडी तुम्ही धड्यांची तयारी करीत गेला व पवित्र शास्त्र अभ्यास झाला; आणि काही कालावधीतच तुम्हाला शास्त्रवचनातील सर्व मूलभूत शिक्षण कळून आले. ही चांगली प्रगति होती हे तुम्हाला मान्य करावेच लागेल; पण ती देवाच्या वचनाला नियमित रुपाने भरविल्यामुळे घडली गेली!

१७. नियमितरित्या आध्यात्मिक भरवणूकीचा कार्यक्रम हा अत्यावश्‍यक का आहे?

१७ पण सध्याबद्दल काय? आजही तुम्ही नियमित भरवण्याचा कार्यक्रम अनुसरत आहात का? आपला बाप्तिस्मा झाला आहे म्हणून आता पौष्टीक आध्यात्मिक आहार नियमित रुपाने घेण्याची तितकी गरज नाही असा कोणीही विचार करू नये. तीमथ्य हा प्रौढ ख्रिस्ती देखरेखा होता तरी पौलाने त्याला असे आर्जविलेः “तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव, यात गढून जा.” (१ तीमथ्य ४:१५) तर मग, आम्हापैकी प्रत्येकाने हे किती विशेषपणे केले पाहिजे! आपली आध्यात्मिक प्रगति इतरांना दिसून यावी अशी तुमची इच्छा आहे तर असे प्रयत्न अत्यंत जरुरीचे आहेत.

१८. एखाद्याची आध्यात्मिक प्रगति कशी दिसून येते?

१८ आपली प्रगति सर्वांस दाखविण्याचा अर्थ, आपल्याला काहीतरी माहीत आहे हे दाखवण्यासाठी किंवा इतरांवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करणे, हा नाही. येशूने म्हटलेः “तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही.” आणि “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्तय ५:१४; १२:३४) आपली मने व अंतःकरणे ही देवाच्या वचनाच्या चांगल्या गोष्टींनी ओतप्रोत भरलेली आहेत तर आपण जे काही म्हणतो वा करतो त्यामध्ये हे प्रदर्शित होण्याला बांध घालू शकणार नाही.

१९. आपल्या आध्यात्मिक वाढीच्या बाबतीत आपला कोणता निर्धार असावा व कोणता परिणाम आम्ही दृष्टिपथात ठेवला पाहिजे?

१९ यास्तव, प्रश्‍न हा आहे की, आंतरिक, आध्यात्मिक वाढीस चालना देणाऱ्‍या पौष्टीक अशा भोजनाचा स्वाद घेण्यासाठी तुम्ही पवित्र शास्त्राचा नियमितपणे अभ्यास करीत आहात का व नियमितपणे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहता का? आध्यात्मिक वाढीच्या बाबतीत केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका. यहोवा देत असलेले मुबलक आध्यात्मिक अन्‍न घेण्याचा पूर्ण उपयोग करण्यासाठी विधायक पावले घेत आहात याची खात्री करा. तुम्ही, “परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो,” अशांपैकीचे आहात तर तुमच्याबद्दल असे म्हटले जाऊ शकतेः “जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखे” आहात; “आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्रसंहिता १:२, ३) तरीपण, आपली ही आध्यात्मिक वाढ तशीच पुढे चालू राहील याची कशी खात्री करता येईल? याचीच चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.

तुम्हाला उत्तर देता येईल का?

◻ आपली आध्यात्मिक वाढ तपासून बघणे हे समयोचित का आहे?

◻ आध्यात्मिक वाढ ही आध्यात्मिक क्षुधेशी कशी संबंधित आहे?

◻ “उपदेशरुपी प्रत्येक वाऱ्‍याने” हेलकावणे याचा काय अर्थ होतो?

◻ प्रत्येकाने आपापला भार का वाहिला पाहिजे?

◻ आध्यात्मिक प्रगति कशी साध्य करता येते?

[१० पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्र आधारीत प्रकाशने वाचण्यासाठी तुम्ही वेळ देता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा