यहोवा आपल्या वयोवृद्ध सेवकांची प्रेमाने काळजी घेतो
“तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.
१, २. (क) पिकलेल्या केसांच्या व्यक्तीला पाहिल्यावर कधीकधी आपल्याला काय आठवते? (ख) यहोवा वृद्ध ख्रिस्ती व्यक्तींकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो?
मंडळीत जेव्हा तुम्ही पिकलेल्या केसांच्या वृद्ध भाऊ-बहिणींना पाहता तेव्हा तुम्हाला दानीएलाच्या पुस्तकातील एका अहवालाची आठवण होते का? दानीएलाला दिलेल्या एका दृष्टान्तात यहोवा देवाने स्वतःला पांढरे केस असलेल्या एका वयोवृद्धासारखे चित्रित केले. दानीएलाने लिहिले: “मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते.”—दानी. ७:९.
२ नैसर्गिक अवस्थेत लोकर सहसा पांढरी शुभ्र असते. म्हणूनच पांढरे केस व “पुराणपुरुष” ही पदवी देवाच्या अमर्याद वयाची व बुद्धीची आपल्याला जाणीव करून देते. या दोन्ही गोष्टींमुळे यहोवा आपल्या मनःपूर्वक आदरास पात्र आहे. पण पुराणपुरुष, यहोवा आपली विश्वासूपणे सेवा करत असलेल्या वृद्ध स्त्रीपुरुषांकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो? देवाच्या वचनात म्हटले आहे की “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीति. १६:३१) हो, एखाद्या विश्वासू ख्रिस्ती स्त्री किंवा पुरुषाचे केस पिकले असतील किंवा पांढरे झाले असतील, तर वयस्कपणाचे हे चिन्ह देवाच्या नजरेत शोभिवंत आहे. तुम्हीही आपल्या वयस्क भाऊ-बहिणींकडे यहोवाच्याच दृष्टिकोनातून पाहता का?
ते का अनमोल आहेत?
३. वृद्ध भाऊ-बहिणी आपल्यासाठी अनमोल का आहेत?
३ देवाला प्रिय वाटणाऱ्या त्याच्या वृद्ध सेवकांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य, सध्याचे व पूर्वीचे प्रवासी पर्यवेक्षक, आवेशी पायनियर, व राज्य प्रचारक या नात्याने मंडळ्यांमध्ये विश्वासूपणे सेवा करत असलेल्या आपल्या अनेक वयस्क भाऊ-बहिणींचा समावेश करता येईल. तुम्ही नक्कीच अशा अनेक व्यक्तींना ओळखत असाल, ज्यांनी सुवार्तेच्या प्रचाराकरता आपले आयुष्य वेचले व ज्यांच्या उत्तम आदर्शामुळे अनेक तरुणांना आपल्या जीवनात यशस्वीरित्या वाटचाल करण्यास साहाय्य व प्रेरणा मिळाली. काही वयोवृद्ध भाऊ-बहिणींनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या आहेत व सुवार्तेकरता छळालाही तोंड दिले आहे. राज्याच्या प्रचार कार्याला या बांधवांनी आजपर्यंत केलेल्या व आजही ते करत असलेल्या योगदानाची खुद्द यहोवा तसेच ‘विश्वासू व बुद्धिमान दास,’ मनापासून कदर करतात.—मत्त. २४:४५.
४. आपण वयस्क बांधवांचा आदर का केला पाहिजे व त्यांच्यासाठी प्रार्थना का केली पाहिजे?
४ हे विश्वासू भाऊ-बहिणी नक्कीच यहोवा देवाच्या इतर सेवकांच्या प्रशंसेस व आदरास पात्र आहेत. देवाने मोशेला दिलेल्या नियमशास्त्रानुसार तर, वृद्ध जनांप्रती विचारशील असणे व त्यांचा आदर करणे हे देवाचे भय मानण्याशी संबंधित आहे. (लेवी. १९:३२) आपण या विश्वासू बांधवांकरता नियमित रीत्या प्रार्थना केली पाहिजे व त्यांच्या प्रेमळ परीश्रमांबद्दल यहोवाचे आभार मानले पाहिजेत. प्रेषित पौल आपल्या प्रिय सहकाऱ्यांसाठी प्रार्थना करत असे, मग ते तरुण असोत वा वृद्ध.—१ थेस्सलनीकाकर १:२, ३ वाचा.
५. यहोवाच्या वयस्क उपासकांचा सहवास आपल्याकरता हितकारक का ठरू शकतो?
५ शिवाय, वयस्क ख्रिस्ती भाऊ-बहिणींचा सहवास मंडळीतील सर्वांकरता अतिशय हितकारक ठरू शकतो. अभ्यास, निरीक्षण, व स्वानुभव यांद्वारे यहोवाच्या या वयस्क उपासकांनी जणू ज्ञानाचा अमूल्य खजिनाच साठवला आहे. ते जीवनात सर्व प्रसंगी धीर धरण्यास व स्वतःला इतरांच्या जागी ठेवून विचार करण्यास शिकले आहेत. आणि आयुष्यभर साठवलेला ज्ञानाचा व अनुभवाचा हा खजिना पुढच्या पिढीला देताना त्यांना मनस्वी आनंद व समाधान मिळते. (स्तो. ७१:१८) तेव्हा तरुणांनो, सुज्ञ व्हा आणि खोल विहिरीतून पाणी काढावे त्याप्रमाणे, या ज्ञानाच्या खजिन्याचा पुरेपूर लाभ घ्या.—नीति. २०:५.
६. तुम्ही वयस्क बांधवांची मनापासून कदर करता हे तुम्ही त्यांना कसे दाखवू शकता?
६ यहोवा ज्याप्रमाणे वृद्ध जनांची कदर करतो त्याप्रमाणे तुम्हीही करता याची तुम्ही त्यांना जाणीव करून देता का? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या विश्वासूपणामुळे ते तुम्हाला किती प्रिय वाटतात आणि त्यांचा सल्ला तुम्हाला किती महत्त्वाचा वाटतो हे त्यांना सांगणे. त्यांच्याकडून जे शिकायला मिळाले, ते जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष आचरणात आणता तेव्हा त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हा केवळ दाखवण्यापुरता नसून प्रामाणिक आहे हे दिसून येते. बरेच वयस्क ख्रिस्ती, त्यांच्या तरुणपणी त्यांना विश्वासू वृद्ध बांधवांकडून कोणता अमूल्य सल्ला मिळाला व त्याचे पालन केल्याने त्यांना आयुष्यभर कशा प्रकारे फायदा झाला हे तुम्हाला सांगू शकतील.a
मदतीचा हात देऊन कळकळ व्यक्त करा
७. वृद्ध जनांची देखभाल करण्याची जबाबदारी यहोवाने मुख्यतः कोणावर सोपवली आहे?
७ वृद्ध जनांची देखभाल करण्याची जबाबदारी देवाने मुख्यतः या वृद्धांच्या कुटुंबीयांवर सोपवली आहे. (१ तीमथ्य ५:४, ८ वाचा.) वृद्ध जनांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेण्याद्वारे यहोवाने सोपवलेली ही जबाबदारी पूर्ण करतात तेव्हा त्याला आनंद होतो. ही कुटुंबे दाखवून देतात की वृद्ध जनांबद्दल त्यांचाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे. यहोवा अशा कुटुंबांना साहाय्य करतो आणि त्यांना जे काही त्याग करावे लागतात त्यांची दखल घेऊन तो त्यांना अनेक आशीर्वाद देतो.b
८. मंडळ्यांनी वृद्ध होत चाललेल्या बांधवांची काळजी का घेतली पाहिजे?
८ त्याच प्रकारे, मंडळीतील जे विश्वासू वृद्धजन गरजू आहेत पण ज्यांचे नातेवाईक सत्यात नाहीत किंवा त्यांची काळजी घेण्यास इच्छुक नाहीत अशा भाऊ-बहिणींना मदत करण्यासाठी स्थानिक मंडळीतील बांधव पुढे येतात तेव्हाही यहोवाला आनंद होतो. (१ तीम. ५:३, ५, ९, १०) अशी मदत करण्याद्वारे या मंडळ्यांतील बांधव दाखवून देतात की ते वृद्ध जनांप्रती “समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू” आहेत. (१ पेत्र ३:८) वृद्धांबद्दल त्यांना वाटणारी कळकळ पौलाने दिलेल्या एका दृष्टान्तातून स्पष्ट होते. मानवी शरीराचे उदाहरण देऊन पौलाने म्हटले की शरीरातील एक अवयव दुखावला तर, “त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते.” (१ करिंथ. १२:२६) वयस्क बांधवांना मदत करण्यासाठी दयाळूपणे आवश्यक पावले उचलणे हे पौलाने दिलेल्या या सल्ल्यामागील तत्त्वाला अनुसरून आहे: “एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.”—गल. ६:२.
९. उतारवयात कोणत्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागते?
९ वृद्ध भाऊ-बहिणींना कोणत्या अडीअडचणींचे ओझे वाहावे लागते? बहुतेक वयस्क जन लवकर थकतात. डॉक्टरकडे जाणे, पाण्याचे-विजेचे बिल भरणे, घराची स्वच्छता, स्वयंपाक करणे यासारखी साधी कामे देखील त्यांना अवघड वाटू शकतात. उतारवयात सहसा भूक व तहान कमी लागत असल्यामुळे वृद्ध जन आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. हेच आध्यात्मिक आहाराच्या बाबतीतही घडू शकते. त्यांची दृष्टी व श्रवणशक्ती क्षीण झाल्यामुळे वाचन किंवा ख्रिस्ती सभेतील कार्यक्रम ऐकणे त्यांना कठीण वाटते. कधीकधी तर तयार होऊन सभेला जाणेही त्यांना थकवून टाकू शकते. अशा वयस्क भाऊ बहिणींना इतर जण कशा प्रकारे साहाय्य करू शकतात?
तुम्ही कसे साहाय्य करू शकता?
१०. वृद्ध जनांना मदत मिळत आहे याची मंडळीतील वडील कशा प्रकारे खात्री करू शकतात?
१० अनेक मंडळ्यांमध्ये वृद्ध बांधवांची ज्या प्रकारे काळजी घेतली जात आहे ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. मंडळीतील प्रेमळ भाऊ-बहिणी वयस्क बांधवांना खरेदी, स्वयंपाक, साफसफाई यांसारख्या कामांत मदत करतात. ते या बांधवांना अभ्यास करायला, सभांना जाण्यासाठी तयार व्हायला व सेवाकार्यात नियमित सहभाग घ्यायला साहाय्य करतात. तरुण भाऊ व बहिणी त्यांची सोबत करतात व त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था करतात. वृद्ध बांधवांना घराबाहेर पडणेही शक्य नसल्यास, सभेतील कार्यक्रमांचे त्यांच्या घरी दूरध्वनीने प्रक्षेपण केले जाते किंवा कार्यक्रम रेकॉर्ड करून नंतर त्यांना ऐकवला जातो. मंडळीतील वृद्ध जनांच्या गरजा पुरवण्याकरता आवश्यक व्यवस्था करून त्या सुरळीतपणे कार्यान्वित केल्या जात आहेत याकडे शक्यतो वडीलजन जातीने लक्ष देतात.c
११. एका कुटुंबाने एका वयस्क बांधवाला कशा प्रकारे मदत केली?
११ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती देखील वृद्ध भाऊ-बहिणींचे आतिथ्य करू शकते व त्यांच्याप्रती औदार्य दाखवू शकते. एका वयस्क बांधवाच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिची पेन्शन बंद झाल्यामुळे या बांधवाला घरभाडे देणे अशक्य होऊन बसले. या बांधवाने व त्यांच्या पत्नीने पूर्वी एका कुटुंबासोबत बायबलचा अभ्यास केला होता. आईवडील व दोन किशोरवयीन मुली असलेल्या या कुटुंबाने, आपल्या मोठ्या घरातील दोन खोल्या या बांधवाला राहायला दिल्या. यानंतर १५ वर्षे त्यांनी या बांधवाला आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य मानले व अतिशय प्रेमाने त्यांची काळजी घेतली. बांधवाच्या विश्वासू उदाहरणामुळे व गाढ्या अनुभवामुळे या कुटुंबाला बरेच काही शिकायला मिळाले. तर दुसरीकडे, बांधवाला त्यांचा आनंददायक सहवास लाभला. वयाच्या ८९ व्या वर्षी मृत्यू होईपर्यंत हे वयस्क बंधू या कुटुंबासोबतच राहिले. त्यांच्या सहवासामुळे मिळालेल्या अनेक आशीर्वादांबद्दल हे कुटुंब आजही यहोवाचे आभार मानते. एका सहख्रिस्ती बांधवाला मदत पुरवल्यामुळे ते ‘आपल्या प्रतिफळास मुकले नाहीत.’—मत्त. १०:४२.d
१२. वयस्क भाऊ व बहिणींबद्दल कळकळ असल्याचे तुम्ही कसे दाखवू शकता?
१२ या कुटुंबाने ज्याप्रमाणे मदत केली त्याप्रमाणे एखाद्या वयस्क भावाला किंवा बहिणीला मदत करण्याच्या स्थितीत कदाचित तुम्ही नसाल. पण तुम्ही वृद्ध बांधवांना सभांना किंवा क्षेत्र सेवाकार्याला जायला मदत करू शकता. तुम्ही त्यांना आपल्या घरी जेवायला बोलावू शकता किंवा फिरायला अथवा सहलीला जाताना त्यांना आपल्यासोबत नेऊ शकता. ते आजारी पडल्यास, किंवा त्यांना घराबाहेर पडता येत नसल्यास तसेच इतरवेळीही तुम्ही त्यांना भेटायला जाऊ शकता. शिवाय, ते प्रौढ व्यक्ती आहेत हे आठवणीत ठेवूनच नेहमी त्यांच्याशी वागले पाहिजे. मानसिक दृष्ट्या त्यांना जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत, त्यांच्यावर प्रभाव पडेल असा कोणताही निर्णय घेताना त्यांनाही सामील करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वयोमानामुळे ज्यांची विचार करण्याची क्षमता क्षीण झाली आहे ते देखील, आपल्याशी इतर जण आदराने वागत आहेत किंवा नाही हे चटकन ओळखू शकतात.
यहोवा तुमचे श्रम कधीही विसरणार नाही
१३. वृद्ध भाऊ-बहिणींच्या भावना जपून त्यांच्याशी वागणे महत्त्वाचे का आहे?
१३ वृद्ध जनांच्या भावना जपून त्यांच्याशी वागणे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘आपण पूर्वी, चांगली तब्येत असताना काय काय करायचो, आता तीच कामे आपल्याला जमत नाहीत’ असा विचार करून बऱ्याच वृद्धांना खूप दुःख होते. उदाहरणार्थ, एका बहिणीने जवळजवळ ५० वर्षे उत्साहीपणे यहोवाची सेवा केली होती व काही काळ ती सामान्य पायनियरही होती. पण आजारपणामुळे हळूहळू तिला खूप अशक्तपणा येऊ लागला आणि सभांना हजर राहणेही अतिशय कठीण वाटू लागले. आपण पूर्वी यहोवाच्या सेवेत किती उत्साही होतो आणि आज आपली काय अवस्था झाली आहे, याची तुलना करून ही बहीण रडू लागली. मान खाली घालून रडतच ती म्हणाली, “आता मला काहीच जमत नाही.”
१४. यहोवाच्या वृद्ध सेवकांना स्तोत्रांतून कोणते प्रोत्साहन मिळते?
१४ तुम्ही एक वृद्ध व्यक्ती असल्यास, तुम्हालाही कधी अशा दुःखदायक भावनांनी ग्रासले आहे का? किंवा, यहोवाने आपल्याला सोडून दिले आहे असा विचार कधीकधी तुमच्या मनात येतो का? स्तोत्रकर्त्याला कदाचित आयुष्याच्या संधिकाली अशा भावनांनी ग्रासले असावे. कारण त्याने प्रार्थनेत यहोवाला अशी विनवणी केली: “उतारवयात माझा त्याग करू नको; माझी शक्ति क्षीण होत चालली असता मला सोडू नको. . . . मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.” (स्तो. ७१:९, १८) यहोवा या स्तोत्रकर्त्याला अर्थातच वाळीत टाकणार नव्हता. आणि तो तुम्हालाही कधीच सोडणार नाही. दुसऱ्या एका स्तोत्रात दाविदाने यहोवाच्या साहाय्यावर आपला भरवसा व्यक्त केला. (स्तोत्र ६८:१९ वाचा.) जर तुम्ही एक विश्वासू वृद्ध ख्रिस्ती असाल तर तुम्ही याची पूर्ण खात्री बाळगू शकता, की यहोवा तुमच्या पाठीशी आहे आणि तो पदोपदी तुमचा संभाळ करेल.
१५. वृद्ध जनांना आशावादी दृष्टिकोन ठेवण्यास कशामुळे मदत मिळू शकते?
१५ वृद्ध भावांनो व बहिणींनो, यहोवाच्या गौरवाकरता तुम्ही आजपर्यंत जे केले आहे व आजही जे करत आहात ते तो कधीही विसरणार नाही. “तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही,” असे बायबल सांगते. (इब्री ६:१०) तेव्हा सर्व नकारात्मक विचार मनातून झटकून टाका. आपले वय झाल्यामुळे आता यहोवाच्या संस्थेत आपण निरुपयोगी आहोत असा चुकीचा दृष्टिकोन कधीही मनात आणू नका. अशा निराशाजनक, नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांना घेऊ द्या. तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांबद्दल व भविष्याच्या आशेबद्दल आनंदी असा! आपल्याला सर्वात उत्तम अशी “भावी सुस्थितीची आशा” आहे आणि तिची हमी खुद्द आपल्या निर्माणकर्त्याने दिली आहे. (यिर्म. २९:११, १२; प्रे. कृत्ये १७:३१; १ तीम. ६:१९) तेव्हा, या आशेवर मनन करत राहा. मनाने व बुद्धीने तरुण राहण्याचा सतत प्रयत्न करत राहा आणि मंडळीतील बांधवांना तुमची गरज आहे हे कधीही विसरू नका!e
१६. आपण वडील म्हणून सेवा करू नये असे एका वृद्ध भावाला का वाटले, पण वडील वर्गाने त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन दिले?
१६ योहान यांचे उदाहरण घ्या. ते ८० वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नी सानी या पूर्णपणे अंथरुणाला खिळल्या आहेत, त्यामुळे बंधू योहान यांना २४ तास त्यांची देखभाल करावी लागते.f त्यांना सभांना व सेवाकार्याला जायला मिळावे म्हणून, मंडळीतील काही बहिणी आळीपाळीने सानी यांच्यासोबत थांबतात. पण अलीकडे, योहान अतिशय निराश झाले. आपण आता आणखी सहन करू शकत नाही असे त्यांना वाटू लागले. मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यास आपण योग्य नाही असाही ते विचार करू लागले. “मी वडील असून काय उपयोग? मंडळीचे काही काम तर माझ्याने होत नाही” असे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले. इतर वडिलांनी बंधू योहान यांना खात्री दिली की त्यांच्याजवळ असलेली अनुभवाची शिदोरी आणि त्यांची निर्णयक्षमता मंडळीकरता अतिशय मोलाची आहे. त्यांना नाही काही काम करायला जमले तरी हरकत नाही, पण त्यांनी वडील म्हणून पुढेही सेवा करत राहावे, असा त्यांनी बंधू योहान यांना आग्रह केला. यामुळे बंधू योहान यांना खूप प्रोत्साहन मिळाले. ते आजही वडील या नात्याने सेवा करत आहेत आणि त्यांच्या मंडळीकरता अर्थातच हा एक आशीर्वाद आहे.
यहोवा खरोखर काळजी घेतो
१७. वृद्ध ख्रिश्चनांना बायबलमध्ये कोणती आश्वासने सापडतात?
१७ उतारवयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते हे खरे असले तरीही वृद्ध जन आध्यात्मिक रीत्या जोमदार व उत्साही राहू शकतात असे बायबल स्पष्ट सांगते. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते . . . वृद्धपणातहि . . . फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील.” (स्तो. ९२:१३, १४) प्रेषित पौलालाही काहीतरी शारीरिक दुखणे असण्याची शक्यता आहे, पण ‘त्याचा बाह्य देह क्षय पावत असला तरी त्याने धैर्य सोडले नाही.’—२ करिंथकर ४:१६-१८ वाचा.
१८. वृद्धजनांना व त्यांची काळजी घेणाऱ्यांना इतरांच्या मदतीची गरज का असते?
१८ वृद्ध जनही ‘फळ देत राहू’ शकतात या गोष्टीला आधुनिक काळातील कितीतरी उदाहरणे पुष्टी देतात. पण तरीसुद्धा, आजारपणाच्या व वाढत्या वयाच्या समस्यांना तोंड देणे निश्चितच सोपे नाही. वृद्ध जनांचे कर्तव्यनिष्ठ कुटुंबीय त्यांची काळजी घेत असले तरी, कधीकधी हे काळजी घेणारेही थकून जाऊ शकतात. तेव्हा, वृद्ध जनांप्रती व त्यांची काळजी घेणाऱ्यांप्रती आपले प्रेम कृतींतून दाखवण्याचा विशेषाधिकार व जबाबदारी ही मंडळीची आहे. (गल. ६:१०) आपण जेव्हा अशा प्रकारे मदत करतो तेव्हा आपण हे दाखवतो की “ऊब घ्या व तृप्त व्हा” एवढेच म्हणून आपण मोकळे होत नाही, तर व्यावहारिक मार्गांनी आपल्या मंडळीतील वृद्ध जनांना मदत करतो.—याको. २:१५-१७.
१९. विश्वासू वृद्ध ख्रिस्ती भविष्याविषयी खात्री का बाळगू शकतात?
१९ वाढत्या वयामुळे जरी एखादा ख्रिस्ती पूर्वीइतके कार्य करू शकत नसला, तरीसुद्धा यहोवाचे आपल्या एकनिष्ठ वृद्ध सेवकांवरील प्रेम काळाच्या ओघात कमी होत नाही. उलट हे सर्व विश्वासू ख्रिस्ती त्याच्या दृष्टीने अनमोल आहेत. आणि तो त्यांना कधीही एकटे सोडणार नाही. (स्तो. ३७:२८; यश. ४६:४) यहोवा सर्वकाळ त्यांचा संभाळ व मार्गदर्शन करत राहील.—स्तो. ४८:१४.
[तळटीपा]
a “वयोवृद्ध जन तरुणांसाठी एक आशीर्वाद” हा टेहळणी बुरूज जून १, २००७ अंकातील लेख पाहा.
b कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकातील, १५ वा अध्याय, “आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करणे” पाहा.
c काही देशांत, वृद्ध जनांना सरकारी साहाय्य प्राप्त करण्यास मदत करणे हे यात समाविष्ट असू शकते. टेहळणी बुरूज जून १, २००६ (इंग्रजी) अंकातील “देव वृद्ध जनांची काळजी घेतो” हा लेख पाहावा.
d “यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो” हा टेहळणी बुरूजच्या सप्टेंबर १, २००३ अंकातील लेख पाहा.
e “पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे,” हा टेहळणी बुरूज मार्च १५, १९९३ (इंग्रजी) अंकातील लेख पाहा.
f नावे बदलण्यात आली आहेत.
तुमचे उत्तर काय असेल?
• तुम्हाला विश्वासू वृद्ध भाऊ-बहिणी का अनमोल वाटतात?
• आपण वृद्ध भाऊ-बहिणींबद्दल कळकळ कशी व्यक्त करू शकतो?
• वृद्ध जनांना आशावादी दृष्टिकोन ठेवण्यास कशामुळे मदत मिळू शकते?
[१८ पानांवरील चित्रे]
मंडळीतील सदस्य वृद्ध जनांचा मनापासून आदर करतात