वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१ पृ. १४-१९
  • यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वर्गीय परमपवित्र स्थान
  • देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे इतर पैलू
  • पवित्र स्थान
  • देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे भव्य वैभव
  • यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवा पुष्कळ पुत्रांना गौरवात आणतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१ पृ. १४-१९

यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर

‘आपल्याला असा प्रमुख याजक आहे जो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर यहोवाने घातलेल्या खऱ्‍या मंडपाचा सेवक आहे.’—इब्री लोकांस ८:१, २.

१. पापी मानवजातीसाठी देवाने कोणती प्रेममय योजना केली?

यहोवा देवाने, मानवजातीवरील त्याच्या प्रीतीपोटी जगाचे पाप हरण करण्याकरता एका अर्पणाची योजना केली. (योहान १:२९; ३:१६) त्यासाठी स्वर्गातील त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे जीवन, मरिया नामक एका यहुदी कुमारिकेच्या पोटी स्थानांतर करावे लागले. यहोवाच्या देवदूताने स्पष्टपणे मरियेला समजावून सांगितले, की तिला जो गर्भ राहणार होता “त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील.” (लूक १:३४, ३५) मरियासोबत मागणी झालेल्या योसेफाला येशूच्या चमत्कारिक गर्भधारणेविषयी सांगण्यात आले होते व हा येशू, “आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील” हे त्याला समजले.—मत्तय १:२०, २१.

२. येशू सुमारे ३० वर्षांचा असताना त्याने काय केले, व का?

२ येशू जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याला त्याच्या चमत्कारिक जन्माविषयीची थोडीफार वस्तुस्थिती समजली असावी. त्याच्या स्वर्गीय पित्याने पृथ्वीवर जीवन वाचवण्याचे कार्य त्याच्यावर सोपवले होते हे त्याला माहीत होते. म्हणूनच, ३० वर्षांचा एक प्रौढ पुरूष या नात्याने, येशू जॉर्डन नदीत बाप्तिस्मा घेण्यासाठी देवाचा संदेष्टा योहान याच्याकडे आला.—मार्क १:९; लूक ३:२३.

३. (अ) ‘यज्ञ व अर्पणांची तुला इच्छा नव्हती,’ असे येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (ब) जे कोणी त्याचे शिष्य होऊ इच्छितात त्या सर्वांसाठी त्याने कोणते उत्तम उदाहरण मांडले आहे?

३ येशू त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी प्रार्थना करीत होता. (लूक ३:२१) त्याच्या जीवनातील या क्षणापासून त्याने स्तोत्र ४०:६-८ हे वचन स्वतःला लागू केले हे उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून दिसते; याच वचनाला प्रेषित पौलाने देखील नंतर सूचित केले: ‘यज्ञ व अर्पणांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले.’ (इब्री लोकांस १०:५) अशा प्रकारे येशूने, त्याला ही जाणीव झाल्याचे दाखवून दिले, की देवाला जेरूसलेमच्या मंदिरात प्राण्यांची अर्पणे करीत राहण्याची “इच्छा नव्हती.” त्याऐवजी, येशूला बलिदान देता यावे म्हणून त्याच्यासाठी देवाने एक परिपूर्ण मानवी शरीर तयार करून दिले होते हे त्याने जाणले. याकारणास्तव प्राण्यांच्या अर्पणांची यापुढे गरज लागणार नव्हती. पूर्ण अंतःकरणाने देवाच्या इच्छेनुसार वागण्याची इच्छा प्रदर्शित करून येशू पुढे प्रार्थना करू लागला: “पाहा, हे देवा, (ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे,) तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” (इब्री लोकांस १०:७) येशूचे भावी शिष्य होणाऱ्‍यांसाठी त्याने त्या दिवशी धैर्य आणि निःस्वार्थ भक्‍तीचे केवढे उत्कृष्ट उदाहरण मांडले!—मार्क ८:३४.

४. येशूने स्वतःला प्रस्तुत केल्यावर देवाने स्वतःची स्वीकृती कशा प्रकारे प्रदर्शित केली?

४ बाप्तिस्म्याच्या वेळी येशूने केलेल्या प्रार्थनेला देवाने स्वीकृती दर्शवली का? येशूने निवडलेल्या एका प्रेषिताच्या तोंडूनच आपण उत्तर ऐकू या: “मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्‍वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा आकाशातून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’”—मत्तय ३:१६, १७; लूक ३:२१, २२.

५. वास्तविक मंदिरातील वेदी कशाला चित्रित करते?

५ अर्पणासाठी तयार असलेल्या येशूच्या शरीराच्या प्रस्तुतीवर देवाच्या स्वीकृतीचा अर्थ असा झाला, की एका आध्यात्मिक अर्थाने, जेरूसलेमच्या मंदिरातील वेदीपेक्षा मोठी वेदी पुढे आली होती. ज्या वेदीवर प्राण्यांना अर्पण केले जात होते ती स्वाभाविक वेदी आध्यात्मिक वेदीचे पूर्वचिन्ह होती म्हणजे, अर्पण म्हणून येशूचे मानवी जीवन स्वीकार करण्यासाठी ती देवाची ‘इच्छा’ किंवा व्यवस्था होती. (इब्री लोकांस १०:१०) म्हणूनच तर प्रेषित पौल सहख्रिश्‍चनांना लिहू शकला: “आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची [किंवा, मंदिराची] सेवा करणाऱ्‍यांना नाही.” (इब्री लोकांस १३:१०) दुसऱ्‍या शब्दात सांगायचे तर खऱ्‍या ख्रिश्‍चनांना, बहुतेक यहुदी याजकांनी ज्याला नाकारले त्या सर्वोत्कृष्ट पापाची भरपाई करणाऱ्‍या अर्पणाचा लाभ होतो.

६. (अ) येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी काय पुढे आले? (ब) मशीहा किंवा ख्रिस्त या पदव्यांचा काय अर्थ होतो?

६ पवित्र आत्म्याने येशूच्या अभिषेकाचा अर्थ असा झाला, की देवाने आता, त्याची संपूर्ण आध्यात्मिक मंदिर व्यवस्था अस्तित्वात आणली होती ज्यामध्ये येशू महायाजक होता. (प्रेषितांची कृत्ये १०:३८; इब्री लोकांस ५:५) ही महत्त्वपूर्ण घटना ज्या वर्षी घडली ते वर्ष ‘तिबिर्य कैसर ह्‍याच्या राज्याचे पंधरावे वर्ष’ असल्याचे दर्शवण्यास शिष्य लूक प्रेरित झाला. (लूक ३:१-३) ते सा. यु. २९ या वर्षाशी—अर्तहशश्‍त राजाने ज्या वर्षी जेरूसलेमच्या भिंतीची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा दिली तेव्हापासून म्हणजे, बरोबर ६९ सप्तकांच्या वर्षांशी किंवा ४८३ वर्षांशी जुळते. (नहेम्या २:१, ५-८) भविष्यवाणीनुसार ‘मशिही अधिपती’ भाकीत केलेल्या त्या वर्षी प्रकट होणार होता. (दानीएल ९:२५) अनेक यहुद्यांना याची जाणीव होती. मशीहा किंवा ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची ‘लोक वाट पाहत होते,’ असा लूक अहवाल देतो. मशीहा किंवा ख्रिस्त या हिब्रू आणि ग्रीक शब्दांतून येणाऱ्‍या पदव्या आहेत ज्यांचा “अभिषिक्‍त जन” हा एकच अर्थ होतो.—लूक ३:१५.

७. (अ) “पवित्रांचा पवित्र” याचा अभिषेक देवाने कधी केला, व याचा काय अर्थ झाला? (ब) येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला आणखी काय झाले?

७ येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी, देवाचे स्वर्गीय वास्तव्य अभिषिक्‍त होते, किंवा महान मंदिराच्या व्यवस्थेत “पवित्रांचा पवित्र” म्हणून वेगळे होते. (दानीएल ९:२४) ‘माणसाने नव्हे तर यहोवाने घातलेला खरा मंडप [किंवा मंदिर]’ आता क्रियाशील बनला होता. (इब्री लोकांस ८:२) शिवाय, पाणी आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झालेला पुरूष, येशू ख्रिस्त याचा देवाचा आत्मिक पुत्र या नात्याने नव्याने जन्म झाला होता. (पडताळा योहान ३:३.) याचा अर्थ योग्य वेळी देव त्याच्या पुत्राला स्वर्गाय जीवनासाठी परत घेणार होता जेथे तो त्याच्या पित्याच्या उजव्या हाताला बसून “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा” राजा आणि महायाजक या नात्याने सेवा करणार होता.—इब्री लोकांस ६:२०; स्तोत्र ११०:१, ४.

स्वर्गीय परमपवित्र स्थान

८. आता स्वर्गामधील देवाच्या सिंहासनाने कोणते नवे पैलू स्वीकारले होते?

८ येशूच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी, देवाच्या स्वर्गीय सिंहासनाने आता नवे पैलू स्वीकारले. जगाच्या पापांची भरपाई करण्यासाठी एका परिपूर्ण मानवी अर्पणाविषयी देवाने प्रस्तुत केलेल्या सादरतेमुळे मानवाच्या पापीपणाच्या विरोधात असलेल्या देवाच्या पावित्र्यावर जोर दिला. देवाची दया देखील येथे ठळकपणे दिसून आली ती या अर्थी, की आता त्याने समेट करण्यास किंवा प्रसन्‍न होण्यास त्याची तयारी दर्शवली. अशा प्रकारे देवाचे सिंहासन, मंदिरातील त्या अंतर्पटासारखे झाले होते जेथे महायाजक एका लाक्षणिक मार्गाने पापांची भरपाई करण्यासाठी प्राण्यांचे रक्‍त घेऊन वर्षांतून एकदा प्रवेश करीत असे.

९. (अ) पवित्र आणि परमपवित्र यांना दुभागणारा पडदा कशाला चित्रित करत होता? (ब) येशूने कशा प्रकारे देवाच्या आध्यात्मिक मंदिरातील पडदा ओलांडला?

९ पवित्र आणि परमपवित्र यांना दुभागणारा पडदा येशूच्या स्वाभाविक शरीराला चित्रित करत होता. (इब्री लोकांस १०:१९, २०) येशूचे शरीर, तो मानव म्हणून पृथ्वीवर होता तेव्हा त्याच्या पित्याची उपस्थिती असलेल्या स्वर्गात प्रवेश करण्यापासून त्याला अटकाव करीत होते. (१ करिंथकर १५:५०) येशूच्या मृत्यूच्या वेळी, “पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.” (मत्तय २७:५१) यावरून, स्वर्गामध्ये प्रवेश करण्यापासून येशूला मज्जाव करणारे अडखळण आता काढण्यात आले होते हे नाट्यमयरीत्या सूचित झाले. तीन दिवसांनंतर यहोवा देवाने एक उल्लेखनीय चमत्कार केला. त्याने येशूला मांस आणि रक्‍ताचा मर्त्य मानव म्हणून नव्हे, तर “युगानुयुग राहणारा“ एक वैभवी आत्मिक प्राणी म्हणून मृतातून उठवले. (इब्री लोकांस ७:२४) चाळीस दिवसांनंतर येशूने स्वर्गारोहण केले व “देवासमोर उभे राहण्यास” खऱ्‍याखुऱ्‍या “पवित्रांचा पवित्र” यात प्रवेश केला.—इब्री लोकांस ९:२४.

१०. (अ) येशूने त्याच्या अर्पणाचे मूल्य त्याच्या स्वर्गीय पित्याला सादर केले तेव्हा काय झाले? (ब) पवित्र आत्म्याने अभिषेक होण्याचा ख्रिस्ताच्या शिष्यांसाठी कोणता अर्थ झाला?

१० येशूने वाहिलेल्या रक्‍ताचे मूल्य जगाच्या पापांची भरपाई म्हणून देवाने स्वीकारले का? होय, त्याने स्वीकारले. या स्वीकृतीचा पुरावा, येशूच्या पुनरुत्थानाच्या बरोबर ५० दिवसांनंतर, म्हणजे पेन्टेकॉस्टच्या सणाच्या दिवशी देण्यात आला. जेरूसलेममध्ये एकत्र आलेल्या येशूच्या १२० शिष्यांवर देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला. (प्रेषितांची कृत्ये २:१, ४, ३३) त्यांचा महायाजक येशू ख्रिस्त याच्याप्रमाणे त्यांचाही देवाच्या महान मंदिरासमान व्यवस्थेत “आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी . . . पवित्र याजकगण” या नात्याने कार्य करण्यासाठी आता अभिषेक करण्यात आला होता. (१ पेत्र २:५) शिवाय, या अभिषिक्‍तांचे एक नवे राष्ट्र, आध्यात्मिक इस्राएलांचे मिळून देवाचे “पवित्र राष्ट्र” प्रस्थापित करण्यात आले होते. यापुढे, यिर्मया ३१:३१ मध्ये नमूद केलेल्या ‘नव्या कराराच्या’ भविष्यवाणीप्रमाणे इस्राएलविषयी चांगल्या गोष्टींच्या सर्व भविष्यवाण्या ‘देवाचे इस्राएल,’ अर्थात अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीला लागू होणार होत्या.—१ पेत्र २:९; गलतीकर ६:१६.

देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे इतर पैलू

११, १२. (अ) येशूच्या बाबतीत याजकीय अंगण कशाला चित्रित करत होते व त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या बाबतीत ते काय आहे? (ब) पाण्याचे गंगाळ कशाला सूचित करते व त्याचा कसा वापर केला जातो?

११ देव जेथे सिंहासनाधिष्ठ आहे ते परम पवित्र स्थान ‘प्रत्यक्षात स्वर्गाला’ चित्रित करत असले तरी, देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे इतर पैलू पृथ्वीवरील गोष्टींशी संबंधित आहेत. (इब्री लोकांस ९:२४) जेरूसलेममधील मंदिरात एक आंतरिक याजकीय अंगण होते ज्यामध्ये अर्पणासाठी एक वेदी आणि पवित्र सेवा करण्याआधी याजक स्वतःचे हात पाय धुण्यासाठी जे पाणी वापरत ते पाण्याचे एक गंगाळ होते. देवाच्या आध्यात्मिक मंदिर व्यवस्थेत या गोष्टी कोणाला चित्रित करतात?

१२ येशू ख्रिस्ताच्या बाबतीत, ते आंतरिक याजकीय अंगण, देवाचा परिपूर्ण मानवी पुत्र या नात्याने त्याच्या निर्दोष स्थितीला चित्रित करते. येशूच्या अर्पणावर विश्‍वास प्रदर्शित करून ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांना धार्मिकतेने विभूषित केले जाते. अशा प्रकारे, देव उचितपणे त्यांच्याबरोबर ते जणू काय निर्दोष आहेत असा व्यवहार करू शकतो. (रोमकर ५:१; ८:१, ३३) म्हणूनच हे अंगण, पवित्र याजकगणाचे प्रत्येक सदस्य देवासमोर जी विभूषित धार्मिक मानवी स्थिती उपभोगतात त्यालाही चित्रित करते. त्याचवेळी, अभिषिक्‍त ख्रिस्ती अद्यापही अपरिपूर्ण आहेत व पाप करण्याच्या अधीन आहेत. अंगणातील पाण्याचे गंगाळ देवाच्या वचनाला चित्रित करते; महायाजक, पवित्र याजकगणाला प्रगतिशीलपणे शुद्ध करण्यासाठी त्यातील पाण्याचा वापर करतो. शुद्धिकरणाच्या या प्रक्रियेच्या अधीन राहण्याद्वारे त्यांनी, देवाचा आदर करणारे व त्याच्या शुद्ध उपासनेकडे आकर्षित करणारे प्रतिष्ठित स्वरूप प्राप्त केले आहे.—इफिसकर ५:२५, २६; पडताळा मलाखी ३:१-३.

पवित्र स्थान

१३, १४. (अ) येशू आणि त्याच्या अभिषिक्‍त शिष्यांच्या बाबतीत मंदिरातील पवित्र स्थान कशाला चित्रित करते? (ब) सोनेरी दीपवृक्ष कशाला चित्रित करतो?

१३ मंदिराचा पहिला कक्ष, अंगणापेक्षाही श्रेष्ठ स्थितीला चित्रित करतो. परिपूर्ण मानव येशू ख्रिस्ताच्या बाबतीत तो, स्वर्गीय जीवन जगण्यास परत जाणारा देवाचा एक आध्यात्मिक पुत्र या नात्याने त्याच्या पुनर्जन्माला चित्रित करतो. ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्‍तावरील त्यांच्या विश्‍वासाच्या आधारावर त्यांना धार्मिक म्हणून घोषित केल्यानंतर, हे अभिषिक्‍त अनुयायी देवाच्या आत्म्याचे हे खास कार्यवहन देखील अनुभवतात. (रोमकर ८:१४-१७) ‘पाणी [म्हणजे, त्यांचा बाप्तिस्मा] व आत्मा’ याच्याद्वारे देवाचे आध्यात्मिक पुत्र या नात्याने ते ‘नव्याने जन्म’ घेतात. त्यामुळे, जर ते मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिले तर त्यांना देवाचे आत्मिक पुत्र म्हणून स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित होण्याची आशा आहे.—योहान ३:५, ७; प्रकटीकरण २:१०.

१४ पृथ्वीवरील मंदिराच्या पवित्र स्थानात सेवा करणारे याजक बाहेरच्या उपासकांना दिसत नव्हते. त्याचप्रमाणे, अभिषिक्‍त ख्रिस्ती एक अशी आध्यात्मिक स्थिती अनुभवतात जिच्यामध्ये परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असणारे देवाचे बहुसंख्य उपासक भाग घेऊ शकत नाहीत किंवा त्या स्थितीला पूर्णपणे समजू शकत नाहीत. निवासमंडपातील सोनेरी दीपवृक्ष अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या प्रज्वलित स्थितीला सूचित करतो. दीपांमधील तेलाप्रमाणे देवाच्या पवित्र आत्म्याची क्रिया बायबलवर प्रकाशझोत टाकते. त्यामुळे ख्रिश्‍चनांना मिळणारी समज, ते आपल्याजवळ ठेवत नाहीत. उलटपक्षी, ते येशूचे ऐकतात ज्याने असे म्हटले: “तुम्ही जगाचा प्रकाश आहा; . . . त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडूं द्या की त्यांनी तुमची सत्कर्में पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.”—मत्तय ५:१४, १६.

१५. समक्षतेच्या मेजावरील भाकर कोणाला चित्रित करते?

१५ या प्रज्वलित स्थितीत कायम राहण्यासाठी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी नियमितरीत्या समक्षतेच्या मेजावरील भाकर जिला चित्रित करते ती सेवन केली पाहिजे. त्यांच्या आध्यात्मिक अन्‍नाचा प्रमुख स्रोत देवाचे वचन आहे, ज्याला ते दररोज वाचण्याचा व त्यावर मनन करण्याचा प्रयत्न करतात. येशूने त्याच्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ ‘यथाकाळी खावयास अन्‍न देईल’ असेही त्यांना अभिवचन दिले. (मत्तय २४:४५) हा ‘दास’ पृथ्वीवरील कोणत्याही विशिष्ट समयातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा संपूर्ण वर्ग आहे. बायबल भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवर माहिती प्रकाशित करण्यासाठी आणि आधुनिक दिवसांतील दैनिक जीवनाकरता असलेल्या बायबल तत्त्वांना अनुसरण्याबद्दल योग्यवेळी मार्गदर्शन देण्यासाठी ख्रिस्ताने ह्‍या अभिषिक्‍त वर्गाचा उपयोग केला आहे. म्हणूनच, अभिषिक्‍त ख्रिस्ती या सर्व आध्यात्मिक तरतुदींची कदर बाळगून त्या आत्मसात करतात. पण त्यांची आध्यात्मिक उपजीविका, त्यांच्या मनांत आणि अंतःकरणांत देवाचे ज्ञान घेण्यापेक्षा अजून कशावर तरी अवलंबून आहे. येशू म्हणाला होता: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) त्याचप्रमाणे, देवाची प्रकट इच्छा पूर्ण करण्यात स्वतःला रोज परिश्रमी ठेवून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना समाधान मिळते.

१६. धूपवेदीची सेवा कशाला चित्रित करते?

१६ सकाळी आणि संध्याकाळी, एक याजक देवासमोर पवित्र स्थानात धूपवेदीवर धूप जाळत. त्याचवेळी, याजक नसलेले उपासक देवाच्या मंदिराच्या बाहेरील अंगणात उभे राहून त्याला प्रार्थना करीत. (लूक १:८-१०) ‘ते धूप’ म्हणजे “पवित्र जनांच्या प्रार्थना” आहेत असे बायबल स्पष्टीकरण देते. (प्रकटीकरण ५:८) स्तोत्रकर्त्या दावीदाने लिहिले: ‘माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे होवो.’ (स्तोत्र १४१:२) अभिषिक्‍त ख्रिस्ती येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाला प्रार्थना करण्याच्या त्यांच्या सुहक्काचा देखील सांभाळ करतात. हृदयातून येणाऱ्‍या कळकळीच्या प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे आहेत. इतरांना शिकवण्यासाठी आपल्या ओठांचा उपयोग करून अभिषिक्‍त ख्रिस्ती इतर मार्गांनी देखील देवाची स्तुती करतात. संकट काळी त्यांची सहनशीलता आणि परीक्षांमध्ये त्यांची सचोटी देवाला विशेषपणे संतुष्ट करते.—१ पेत्र २:२०, २१.

१७. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी परमपवित्र स्थानात महायाजकाच्या पहिल्या प्रवेशाद्वारे जे भविष्यसूचक चित्र दिले जाते त्याच्या पूर्णतेमध्ये काय समाविष्ट होते?

१७ प्रायश्‍चित्ताच्या दिवशी इस्राएलच्या महायाजकाला परमपवित्र स्थानी प्रवेश करून जळते निखारे असलेल्या एका सोनेरी धुपारतीत धूप जाळायचा होता. पापार्पणाचे रक्‍त आत आणण्याआधी त्याला हे करायचे होते. या भविष्यसूचक चित्राच्या पूर्णतेत, येशू, स्वतःचे जीवन आपल्या पापांसाठी कायमचेच अर्पण म्हणून देण्याआधी यहोवा देवासोबत एकनिष्ठ राहिला. यावरून त्याने प्रदर्शित केले, की सैतानाने कितीही दबाव आणले तरी एक परिपूर्ण मनुष्य देवाशी एकनिष्ठ राहू शकतो. (नीतिसूत्रे २७:११) परीक्षेत असताना येशूने “मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत” प्रार्थनेचा उपयोग केला “आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली.” (इब्री लोकांस ५:७) अशा प्रकारे त्याने विश्‍वाचा धार्मिक आणि योग्य सार्वभौम या नात्याने यहोवाचा महिमा केला. देवाने येशूला मृतातून उठवून अमर स्वर्गीय जीवनाचे बक्षीस दिले. या वैभवशाली हुद्द्‌यावरुन येशू पृथ्वीवर येण्याच्या त्याच्या दुय्यम कारणाकडे अर्थात, पश्‍चात्तापी पापी लोकांचा देवाबरोबर समेट करणे, याकडे लक्ष देतो.—इब्री लोकांस ४:१४-१६.

देवाच्या आध्यात्मिक मंदिराचे भव्य वैभव

१८. कशा प्रकारे यहोवाने त्याच्या आध्यात्मिक मंदिरात उल्लेखनीय वैभव आणले आहे?

१८ “या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल,” असे यहोवाने भाकीत केले. (हाग्गय २:९) अमर राजा आणि महायाजक म्हणून येशूचे पुनरुत्थान करून यहोवाने त्याच्या आध्यात्मिक मंदिराला उल्लेखनीय वैभव आणले. येशू आता “आपल्या आज्ञेत राहणाऱ्‍या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला” आहे. (इब्री लोकांस ५:९) सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, अशा प्रकारची आज्ञाधारकता दाखवणारे १२० शिष्य प्रथम होते. प्रकटीकरणाच्या पुस्तकात असे भाकीत केले आहे, की इस्राएलच्या या आध्यात्मिक पुत्रांची संख्या सरतेशेवटी १,४४,००० इतकी असेल. (प्रकटीकरण ७:४) यांच्यापैकी अनेकांना त्यांचा मृत्यू घडल्यावर, येशूची राजसी सत्तेमध्ये उपस्थिती घडण्याच्या काळापर्यंत मानवजातीच्या सामान्य कबरेत बेशुद्ध स्थितीत पडून राहावे लागले. दानीएल ४:१०-१७, २०-२७ मधील भविष्यसूचक कालगणना, १९१४ हे वर्ष येशूला त्याच्या शत्रूंमध्ये राज्य करण्यास सुरु करण्याचे वर्ष होते याकडे अंगुली दर्शवते. (स्तोत्र ११०:२) १९१४ च्या अनेक दशकांच्या आधीपासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चन त्या वर्षाची आतुरतेने वाट पाहत होते. पहिले जागतिक युद्ध आणि त्याबरोबर मानवजातीवर आलेले अनर्थ यांनी हे शाबीत केले, की येशू खरोखरच १९१४ मध्ये स्वर्गात राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ झाला. (मत्तय २४:३, ७, ८) त्यानंतर लगेचच, ‘देवाच्या घरापासून न्यायनिवाडा’ करण्याची वेळ जवळ आल्यामुळे येशू, मृत्यूमध्ये झोपी गेलेल्या त्याच्या अभिषिक्‍त शिष्यांना दिलेले अभिवचन पूर्ण करणार होता की, “मी . . . पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन.”—१ पेत्र ४:१७; योहान १४:३.

१९. स्वर्गातील परमपवित्र स्थानात १,४४,००० चे शेष कशा प्रकारे जाऊ शकतील?

१९ पवित्र याजकगणाच्या १,४४,००० सदस्यांतील सर्वांनीच शेवटला शिक्कामोर्तब अनुभवलेला नाही व ते त्यांच्या स्वर्गीय वास्तव्यात गेलेले नाहीत. त्यांच्यातील शेष अजूनही पवित्र स्थान ज्याला चित्रित करते त्या पृथ्वीवरील आध्यात्मिक स्थितीत आहेत. ते देवाच्या पवित्र उपस्थितीपासून त्यांच्या स्वाभाविक शरीराच्या ‘पडद्यामुळे’ किंवा अडखळणामुळे वेगळे आहेत. शेवटपर्यंत विश्‍वासू राहून मरण पावल्यावर, त्यांचे एका निमिषात पुनरुत्थान होते व ते स्वर्गामध्ये १,४४,००० जणांपैकी आधीच तेथे असलेल्यांमध्ये सामील होतात.—१ करिंथकर १५:५१-५३.

२०. पवित्र याजकगणाचे शेष या समयात कोणते महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत व त्याचे परिणाम काय आहेत?

२० थोर महायाजकाबरोबर इतके याजक सेवा करत असल्यामुळे देवाच्या आध्यात्मिक मंदिराला पहिल्यापेक्षा अधिक वैभव प्राप्त झाले आहे. दरम्यान, पवित्र याजकगणातील शेषजण पृथ्वीवर एक अनमोल कार्य पार पाडत आहेत. त्यांच्या प्रचाराद्वारे, हाग्गय २:७ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे देव त्याच्या न्यायनिवाड्याच्या अभिव्यक्‍तींनी ‘सर्व राष्ट्रांना हलवून सोडत आहे.’ त्याचवेळी, “निवडक वस्तु” असे ज्यांचे वर्णन केले आहे ते लक्षावधी उपासक यहोवाच्या पार्थिव मंदिराच्या अंगणात झुंडीने येत आहेत. हे लोक उपासनेसाठी असलेल्या देवाच्या व्यवस्थेच्या योग्यतेचे होतात व त्याच्या महान आध्यात्मिक मंदिराच्या कोणत्या भावी वैभवाची आपण अपेक्षा करू शकतो? या प्रश्‍नांचे परिक्षण पुढील लेखात केले जाईल.

उजळणीचे प्रश्‍न

◻ सा. यु. २९ मध्ये येशूने कोणते उल्लेखनीय उदाहरण मांडले?

◻ सा. यु. २९ मध्ये कोणत्या व्यवस्थेच्या कार्यास सुरवात झाली?

◻ पवित्र आणि परमपवित्र कशाला चित्रित करते?

◻ महान आध्यात्मिक मंदिराला कशा प्रकारे वैभवी करण्यात आले आहे?

[१७ पानांवरील चित्रं]

सा. यु. २९ मध्ये येशूचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला तेव्हा देवाच्या महान आध्यात्मिक मंदिराच्या कार्यास सुरवात झाली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा