वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ८/१५ पृ. १७-२२
  • यहोवाला संतोषविणारे स्तुतीचे यज्ञ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला संतोषविणारे स्तुतीचे यज्ञ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या शिक्षणाकरता व उत्तेजनाकरता
  • शुद्ध व निष्कलंक बलिदाने अर्पण करा
  • पूर्ण मनाने स्तुतीचे यज्ञ अर्पण करा
  • देवासोबत व मनुष्यांसोबत शांतीचे संबंध राखणे
  • यहोवाचे अद्‌भुत आशीर्वाद
  • देवाला संतोषविणारे यज्ञ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ८/१५ पृ. १७-२२

यहोवाला संतोषविणारे स्तुतीचे यज्ञ

“तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.”—रोमकर १२:१.

१. मोशेच्या नियमशास्त्रानुसार दिल्या जाणाऱ्‍या अर्पणांबद्दल बायबलमध्ये काय सांगितले आहे?

“ज्यापुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.” (इब्री लोकांस १०:१) या सरळसोट विधानातून प्रेषित पौलाने स्पष्ट केले, की मोशेच्या नियमशास्त्रानुसार दिली जाणारी अर्पणे मनुष्याला पापापासून व मृत्यूपासून कायमची सुटका देण्यास असमर्थ होती.—कलस्सैकर २:१६, १७.

२. नियमशास्त्रातील अर्पणांबद्दल व बलिदानांबद्दल बायबलमध्ये दिलेली सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ का नाही?

२ मागील वर्षी सबंध जगात यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांचे वाचन व त्यांवर चर्चा केली गेली. बऱ्‍याच जणांना वारंवार वाचूनही या पाच पुस्तकांतील बरेचसे भाग समजायला कठीण वाटले. या बांधवांचे प्रयत्न व्यर्थ होते का? बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांत यज्ञांविषयी व निरनिराळ्या अर्पणांविषयी दिलेली माहिती आजच्या ख्रिश्‍चनांकरता काहीच उपयोगाची नाही का? असे निश्‍चितच म्हणता येणार नाही. कारण बायबल म्हणते, की “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) मग प्रश्‍न असा उद्‌भवतो, की नियमशास्त्रात वेगवेगळ्या अर्पणांबद्दल आणि बलिदानांबद्दल जे काही सांगितले आहे त्यापासून आपण कोणता बोध घेऊ शकतो? तसेच या माहितीमुळे आपल्याला काय उत्तेजन मिळते?

आपल्या शिक्षणाकरता व उत्तेजनाकरता

३. आज सर्व मानवांना कशाची गरज आहे?

३ आज आपल्याला इस्राएली लोकांप्रमाणे बलिदाने देण्याची आवश्‍यकता नाही. पण इस्राएली लोक बलिदान का देत होते याचा विचार करा. पापांची क्षमा व्हावी आणि देवाची कृपा व्हावी यासाठी ते बलिदाने देत होते. आज आपल्यालाही देवाच्या क्षमेची व कृपेची गरज आहे. पण बलिदाने न देता आपल्याला देवाची क्षमा व कृपा कशी मिळू शकेल? याआधी उल्लेख केल्याप्रमाणे पौलाने स्पष्ट केले, की प्राण्यांची बलिदाने मनुष्याला पाप व मृत्यूपासून कायमची सुटका देण्यास समर्थ नाहीत. यानंतर पौल म्हणतो: “[येशू] जगात येतेवेळेस म्हणाला, ‘यज्ञ व अन्‍नार्पण ह्‍यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले; होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्‍यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.’”—इब्री लोकांस १०:५-७.

४. स्तोत्र ४०:६-८ ही वचने पौलाने येशू ख्रिस्ताच्या संदर्भात कशाप्रकारे वापरली?

४ स्तोत्र ४०:६-८ या वचनांचा संदर्भ घेऊन पौल असा मुद्दा मांडतो, की येशू या पृथ्वीवर ‘यज्ञ व अन्‍नार्पण,’ तसेच ‘होम व पापाबद्दलची अर्पणे’ वाहण्याची रीत चालू ठेवण्यासाठी आला नव्हता. कारण पौलाने हे लिहिले तोपर्यंत देवाने यहुद्यांच्या यज्ञांना व अर्पणांना धिक्कारले होते. येशू त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यासाठी तयार केलेले शरीर धारण करून पृथ्वीवर आला होता. आदामाला देवाने ज्याप्रकारचे परिपूर्ण शरीर दिले होते त्याचप्रकारे येशूचे हे शरीरही परिपूर्ण व सर्व प्रकारे आदामाच्या शरीराच्या समतुल्य होते. (उत्पत्ति २:७; लूक १:३५; १ करिंथकर १५:२२, ४५) देवाचा परिपूर्ण पुत्र येशू, उत्पत्ती ३:१५ येथे उल्लेख केलेल्या स्त्रीच्या संततीची भूमिका बजावणार होता. तो सैतानाचे ‘डोके फोडणार’ होता. पण त्याआधी त्याची ‘टाच फोडली’ जाणार होती. यहोवा देव ज्याच्याद्वारे मानवांचे तारण करणार होता, व ज्याची हाबेलच्या काळापासून विश्‍वासू पुरुष वाट पाहात होते तो येशू ख्रिस्त असल्याचे शाबीत झाले.

५, ६. देवाजवळ येण्याचे कोणते श्रेष्ठ माध्यम ख्रिस्ती लोकांकडे आहे?

५ येशूच्या खास भूमिकेविषयी पौलाने म्हटले: “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला [देवाने] तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले; ह्‍यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.” (२ करिंथकर ५:२१) “पाप असे केले” याचे भाषांतर ‘पापाबद्दलचे अर्पण म्हणून दिले’ असेही करता येईल. प्रेषित योहान म्हणतो: “तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.” (१ योहान २:२) त्यामुळे बलिदाने देऊन देवाची उपासना करण्याची इस्राएली लोकांची व्यवस्था तात्पुरती होती. पण ख्रिस्ती लोकांकडे देवाजवळ येण्याचे एक श्रेष्ठ असे माध्यम आहे, अर्थात येशू ख्रिस्ताचे बलिदान. (योहान १४:६; १ पेत्र ३:१८) देवाने पुरवलेल्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवून आपण त्याच्या सर्व आज्ञांचे पालन केले तर आपल्याही पापांची क्षमा होईल आणि यहोवाची कृपादृष्टी व त्याचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहील. (योहान ३:१७, १८) ही गोष्ट उत्तेजन देणारी नाही का? पण खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याचा काय अर्थ होतो?

६ ख्रिस्ती लोकांकडे देवाजवळ येण्याचे एक अधिक चांगले माध्यम आहे असे स्पष्ट केल्यानंतर पौल इब्री लोकांस १०:२२-२५ या वचनांत तीन असे मार्ग दाखवतो ज्यांद्वारे आपण देवाच्या प्रेमळ तरतुदीवर आपला विश्‍वास असल्याचे व तिच्याविषयी कदर असल्याचे दाखवू शकतो. पौलाने हे मार्गदर्शन खरे तर ‘परम पवित्रस्थानात प्रवेश’ करणाऱ्‍यांना, म्हणजेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना केले होते. पण देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या पौलाच्या शब्दांकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. तरच त्यांना येशूच्या खंडणी बलिदानापासून लाभ होऊ शकेल.—इब्री लोकांस १०:१९.

शुद्ध व निष्कलंक बलिदाने अर्पण करा

७. (अ) इब्री लोकांस १०:२२ यातून बलिदानांविषयी कोणती माहिती मिळते? (ब) अर्पण देवाला मान्य होण्याकरता कोणत्या अटी पूर्ण करणे आवश्‍यक होते?

७ देवाच्या प्रेमळ तरतुदीवर आपला विश्‍वास व तिच्याबद्दल कदर व्यक्‍त करण्याच्या पहिल्या मार्गाविषयी पौलाने म्हटले: “आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्‍त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्‍या अंतःकरणाने व विश्‍वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.” (इब्री लोकांस १०:२२) या शब्दांतून आपल्याला नियमशास्त्रातील आज्ञेनुसार बलिदाने दिली जाताना काय केले जायचे त्याची एक झलक मिळते. प्राचीन इस्राएलात, बलिदान देताना ते योग्य उद्देशाने देणे आणि शुद्ध व निष्कलंक बलिदान देणे आवश्‍यक होते. तरच देव त्या बलिदानांचा किंवा अर्पणांचा स्वीकार करायचा. प्राण्यांचे अर्पण देताना ते गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांपैकी म्हणजेच शुद्ध प्राण्यांपैकी असणे आवश्‍यक होते; शिवाय कोणताही व्यंग नसलेला पशू आणणे आवश्‍यक होते. पक्ष्यांचे अर्पण द्यायचे असल्यास केवळ होले किंवा पारव्याची पिले द्यायची होती. या अटी पूर्ण केल्या तरच ते अर्पण “प्रायश्‍चित्तादाखल मान्य” केले जायचे. (लेवीय १:२-४, १०, १४; २२:१९-२५) अन्‍नार्पण देताना त्यात खमीर घातले जात नव्हते कारण खमीर हे अनीतीचे प्रतीक होते. तसेच मध किंवा फळांचा रस देखील टाकण्यास मनाई होती कारण यामुळे अर्पण आंबण्याची शक्यता होती. त्याऐवजी, पशूबली किंवा अन्‍नार्पण वेदीवर देताना त्यात मीठ हा टिकवणारा पदार्थ टाकला जायचा.—लेवीय २:११-१३.

८. (अ) अर्पण देणाऱ्‍या व्यक्‍तीकडून काय अपेक्षा केली जायची? (ब) आपली उपासना यहोवाने स्वीकारावी म्हणून आपण काय केले पाहिजे?

८ अर्पण देणाऱ्‍याविषयी काय? यहोवासमोर येणाऱ्‍या प्रत्येकाने शुद्ध व निष्कलंक असावे, असे नियमशास्त्रात स्पष्ट सांगितले होते. कोणत्याही कारणामुळे अशुद्ध झालेल्या व्यक्‍तीला प्रथम यहोवापुढे पुन्हा शुद्ध होण्याकरता पापार्पण अथवा दोषार्पण द्यावे लागायचे. यानंतरच त्याचे होमार्पण किंवा शांत्यार्पण मान्य केले जायचे. (लेवीय ५:१-६, १५, १७) यहोवाच्या नजरेत नेहमी शुद्ध राहण्याचे महत्त्व आपण ओळखतो का? देवाच्या नियमांविरुद्ध आपल्याकडून लहानशी जरी चूक झाली तरी आपण लगेच ती सुधारली पाहिजे. तरच आपली उपासना देव स्वीकारेल. आपल्याला मदत करण्यासाठी देवाने ‘मंडळीतील वडिलांची’ व “आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त” म्हणून येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची तरतूद केली आहे. तेव्हा विलंब न लावता यहोवाने पुरवलेल्या या मदतीचा आपण लाभ करून घेतला पाहिजे.—याकोब ५:१४; १ योहान २:१, २.

९. यहोवाला दिलेली अर्पणे आणि खोट्या देवतांना दिलेली अर्पणे यात कोणता मुख्य फरक होता?

९ अर्पण देणारी व्यक्‍ती कोणत्याही प्रकारे अशुद्ध असू नये हा नियम केवळ इस्राएल लोकांनाच देण्यात आला होता. इस्राएलच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांना त्यांच्या खोट्या देवतांना अर्पणे देताना शुद्धतेसंबंधी कोणतेही निर्बंध पाळण्याची आज्ञा नव्हती. मोशेच्या नियमशास्त्रातील यज्ञांच्या या वैशिष्ट्याबद्दल एका ग्रंथात असे म्हटले आहे: “इस्राएलातील यज्ञांशी जादूटोणा किंवा शकुनविद्या; अंगात येणे, स्वतःला यातना देणे, वेश्‍यावृत्ती इत्यादींचा अजिबात संबंध नव्हता. उलट फलत्वाकरता केलेल्या अनैतिक रितीभाती, नरबली आणि मृतांसाठी बलिदान करण्याच्या प्रकाराला सक्‍त मनाई होती.” या सर्वावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे यहोवा देव पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारचे पाप किंवा अनीती खपवून घेत नाही. (हबक्कूक १:१३) तेव्हा, यहोवाची उपासना करणाऱ्‍यांनी व त्याला कोणत्याही प्रकारचे बलिदान देणाऱ्‍यांनी शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिकरित्या निष्कलंक असणे आवश्‍यक होते.—लेवीय १९:२; १ पेत्र १:१४-१६.

१०. रोमकर १२:१, २ येथे पौलाने दिलेल्या सल्ल्यानुसार आपण कशाप्रकारे आत्मपरीक्षण केले पाहिजे?

१० यावरून आपण काय शिकू शकतो? आपली सेवा यहोवाला मान्य व्हावी यासाठी आपण आपल्या प्रत्येक कृतीचे परीक्षण केले पाहिजे. आपण ख्रिस्ती सभांना जातो, सेवाकार्यात सहभाग घेतो, त्याअर्थी खासगी जीवनात काहीही केले तरी चालेल असा आपण चुकूनही विचार करू नये. आपण ख्रिस्ती कार्यांत भाग घेतो त्यामुळे जीवनात देवाच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्‍यक नाही असे आपण कधीही समजू नये. (रोमकर २:२१, २२) देवाच्या नजरेत अशुद्ध असणाऱ्‍या कोणत्याही गोष्टींचा आपण विचार करत असू किंवा प्रत्यक्ष अशा गोष्टी करत असू, तर आपण निश्‍चितच देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा करू शकत नाही. पौलाने काय म्हटले ते आठवणीत असू द्या: “बंधुजनहो, मी देवाच्या करूणेमुळे तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:१, २.

पूर्ण मनाने स्तुतीचे यज्ञ अर्पण करा

११. इब्री लोकांस १०:२३ येथे उल्लेख केलेल्या “जाहीर घोषणा” या शब्दांचा काय अर्थ होतो?

११ खऱ्‍या उपासनेच्या दुसऱ्‍या महत्त्वाच्या पैलूविषयी इब्री ख्रिश्‍चनांना लिहिताना पौलाने असे म्हटले: “आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर [“जाहीर घोषणा,” NW] दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्‍वसनीय आहे.” (इब्री लोकांस १०:२३) “जाहीर घोषणा” याचा अर्थ “कबूल करणे असा होतो.” पौलाने “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करण्याविषयी देखील सांगितले. (इब्री लोकांस १३:१५) हाबेल, नोहा, आणि अब्राहाम यांच्या काळात जी यज्ञे दिली जायची त्यांची यावरून आठवण होते.

१२, १३. होमार्पण केल्यामुळे इस्राएली व्यक्‍ती कोणत्या भावना व्यक्‍त करत असे आणि आज आपण देखील अशाप्रकारची मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

१२ होमार्पण देण्याची इस्राएली लोकांवर सक्‍ती नव्हती; एखाद्याला “अर्पावयाचे असल्यास” तो ते देवाला अर्पण करू शकत होता. (लेवीय १:३) हे अर्पण देऊन तो यहोवाच्या विपुल आशीर्वादांबद्दल आणि त्याच्या कृपेबद्दल आपली कृतज्ञता जाहीर करत होता. होमार्पणाचे वैशिष्ट्य असे होते की यात सबंध अर्पण वेदीवर होम केले जाई. परमेश्‍वराची पूर्ण मनाने सेवा करण्याचे व त्याला पूर्णपणे समर्पित असण्याचे हे चिन्ह होते. आज आपण स्वेच्छेने आणि पूर्ण मनाने यहोवाला “स्तुतीचा यज्ञ” म्हणजेच “ओठांचे फळ” अर्पण करतो. याद्वारे आपण खंडणी बलिदानाच्या तरतुदीवर विश्‍वास व त्याबद्दल कदर असल्याचे जाहीर करतो.

१३ आज ख्रिश्‍चनांना इस्राएल लोकांप्रमाणे यज्ञ करण्याची गरज नाही. पण त्यांच्यावर एक खास जबाबदारी आहे. ती म्हणजे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे व येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवणे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) आज्ञाधारक मानवांकरता देवाने जे अद्‌भुत आशीर्वाद राखून ठेवले आहेत त्यांविषयी जास्तीतजास्त लोकांना ज्ञान मिळावे म्हणून तुम्ही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याकरता प्रत्येक संधीचा फायदा घेता का? इतरांना सत्य शिकवण्याकरता व त्यांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्याकरता मदत करण्यासाठी तुम्ही स्वेच्छेने आपला वेळ व शक्‍ती खर्च करता का? आपण सेवेत उत्साहाने सहभाग घेतो तेव्हा, होमार्पणातून येणाऱ्‍या सुगंधाप्रमाणे आपली सेवा यहोवाला संतोषदायक वाटते.—१ करिंथकर १५:५८.

देवासोबत व मनुष्यांसोबत शांतीचे संबंध राखणे

१४. इब्री लोकांस १०:२४, २५ येथील पौलाचे शब्द शांत्यार्पणांशी कशाप्रकारे संबंधित आहेत?

१४ देवाची उपासना करताना आपल्या बांधवांशी आपले कसे संबंध असावेत याविषयी पौल असे म्हणतो: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ,” “एकत्र मिळणे,” तसेच “एकमेकांस बोध करावा” या वाक्यांशांवरून इस्राएलातील शांत्यार्पणांच्या वेळी देवाचे लोक काय करायचे त्याची आपल्याला आठवण होते.

१५. शांत्यार्पणे देण्याचे प्रसंग आणि ख्रिस्ती सभा यांत कोणते साम्य आहे?

१५ “शांत्यार्पणे” या शब्दातील शांती हा मूळ इब्री शब्द बहुवचनी आहे. कदाचित शांत्यार्पणे देणाऱ्‍या व्यक्‍तीचे देवासोबतच नव्हे तर सहउपासकांसोबतही शांतीचे संबंध प्रस्थापित होतात असे या शब्दातून सूचित होत असावे. शांत्यार्पणांबद्दल एका विद्वानाने असे म्हटले: “शांत्यार्पणे देण्याचा समय हा करारांच्या परमेश्‍वरासोबत संगती करण्याचा सोहळा होता. इस्राएलाचा परमेश्‍वर, जो सदैव यजमानाप्रमाणे इस्राएल राष्ट्राला खाऊपिऊ घालायचा तो या प्रसंगी मात्र स्वर्गातून उतरून जणू त्यांचा पाहुणा व्हायचा.” येशूनेही म्हटले होते: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” (मत्तय १८:२०) आपण ख्रिस्ती सभांना जातो तेव्हा आपल्याला भाऊबहिणींच्या सहवासामुळे, तेथे मिळणाऱ्‍या ज्ञानामुळे उत्तेजन मिळते. तसेच येशू ख्रिस्त आपल्यासोबत असतो या विचारानेही आपल्याला खूप उत्तेजन मिळते. म्हणूनच ख्रिस्ती सभा आनंददायक असतात आणि या सभांना उपस्थित राहणाऱ्‍यांचा विश्‍वास अधिक मजबूत होतो.

१६. शांत्यार्पणांप्रमाणेच ख्रिस्ती सभा देखील आनंददायक प्रसंग कशामुळे बनतात?

१६ शांत्यार्पणांत अर्पण केलेल्या पशूची सगळी चरबी—म्हणजे आतडी, गुरदे, कमर, काळीज तसेच चरबीदार शेपटी देखील—वेदीवर हव्य करून यहोवाला अर्पण केली जायची. (लेवीय ३:३-१६) चरबी म्हणजे पशूच्या शरीरातील सर्वात पौष्टिक आणि उत्तम भाग समजला जात होता. तेव्हा वेदीवर चरबी अर्पण करण्याचा अर्थ यहोवाला सर्वात उत्तम ते अर्पण करणे असा होता. आज आपल्या ख्रिस्ती सभा इतक्या आनंददायक असण्याचे एक खास कारण म्हणजे यांत आपल्याला केवळ मार्गदर्शनच केले जात नाही, तर सभांद्वारे यहोवाची स्तुती करण्याची संधीही आपल्याला मिळते. आपण आपल्याकडून होईल ते, आपल्याजवळ असलेले उत्तम ते यहोवाला अर्पण करतो. म्हणजेच आपण सभेत सहभाग घेतो. सभेत उत्साहाने गीत गातो, लक्षपूर्वक ऐकतो आणि प्रश्‍न विचारले जातात तेव्हा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेशाचे स्तवन करा नवे गीत गाऊन परमेश्‍वराचे गुणगान करा. भक्‍तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.”—स्तोत्र १४९:१.

यहोवाचे अद्‌भुत आशीर्वाद

१७, १८. (अ) जेरूसलेम येथील मंदिराच्या उद्‌घाटन प्रसंगी शलमोनाने केलेल्या यज्ञबलीचे वर्णन करा. (ब) या प्रसंगी करण्यात आलेल्या बलिदानांमुळे इस्राएली लोकांना कोणते आशीर्वाद मिळाले?

१७ सा.यु.पू. १०२६ साली जेरूसलेम येथील मंदिराचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी शलमोन राजाने “परमेश्‍वरासमोर यज्ञबलि अर्पिले.” हा अतिशय भव्य यज्ञबली होता. याप्रसंगी “होमबलि, अन्‍नबलि आणि शांत्यार्पणाची वपा” अर्पण करण्यात आली. अन्‍नबलींच्या व्यतिरिक्‍त, एकूण बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे अर्पण करण्यात आली.—१ राजे ८:६२-६५.

१८ या भव्य यज्ञबलिसाठी किती अवाढव्य खर्च आणि परिश्रम करण्यात आले असतील याची कल्पना करा. पण इस्राएल राष्ट्राला मिळालेले अशीर्वाद या खर्चापेक्षा आणि परिश्रमापेक्षा कितीतरी पटीने अधिक होते. सबंध सोहळा पार पडल्यानंतर शलमोनाने “लोकांची रवानगी केली; ते सर्व राजाचे अभीष्ट चिंतून आपआपल्या डेऱ्‍यास गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल याजवर जो प्रसाद परमेश्‍वराने केला त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.” (१ राजे ८:६६) खरोखर, यावरून शलमोनाचे पुढील शब्द खरे ठरले: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२.

१९. आज व अनंतकाळापर्यंत यहोवाचे उदंड आशीर्वाद उपभोगण्याकरता आपण काय केले पाहिजे?

१९ ‘पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया’ ही आज आपल्या या काळात छाया राहिलेली नाही; आता आपण “वास्तविक स्वरूप” पाहू शकतो. (इब्री लोकांस १०:१) आत्मिक मंदिराचा मुख्य याजक येशू ख्रिस्त आहे आणि त्याने स्वर्गात प्रवेश करून स्वतःच्या रक्‍ताचे मोल सादर केले आहे जेणेकरून त्याच्या बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे. (इब्री लोकांस ९:१०, ११, २४-२६) येशूच्या महान बलिदानाच्या आधारावर आपण देवासमोर शुद्ध व निष्कलंक असे स्तुतीचे यज्ञ सादर करत राहू. मग आपण देखील ‘आनंदाने व हर्षभरीत मनाने’ यहोवाचे विपूल आशीर्वाद उपभोगू.—मलाखी ३:१०.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• नियमशास्त्रात बलिदान व अर्पण याविषयी दिलेल्या माहितीतून आपल्याला कोणता बोध आणि सांत्वन प्राप्त होते?

• कोणतेही बलिदान स्वीकारले जाण्याकरता पहिली अट कोणती आहे, आणि यावरून आपल्याकरता काय सूचित होते?

• ऐच्छिक होमार्पणांप्रमाणे आपण यहोवाला काय अर्पण करतो?

• ख्रिस्ती सभांची शांत्यार्पणांशी कशाप्रकारे तुलना केली जाऊ शकते?

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाने मानवांच्या तारणाकरता येशूच्या खंडणी बलिदानाची तरतूद केली

[२० पानांवरील चित्र]

यहोवाने आपली सेवा स्वीकारावी अशी इच्छा असेल, तर आपण सर्व प्रकारच्या अशुद्ध विचारांपासून आणि कृतींपासून दूर राहिले पाहिजे

[२१ पानांवरील चित्र]

प्रचार कार्यात सहभाग घेण्याद्वारे आपण यहोवाच्या आशीर्वादांबद्दल जाहीरपणे कृतज्ञता व्यक्‍त करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा