वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ११/१५ पृ. ८-१३
  • परीक्षांतही तुमच्या विश्‍वासाला जडून राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • परीक्षांतही तुमच्या विश्‍वासाला जडून राहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण परीक्षांना तोंड देतो तेव्हा
  • सुज्ञतेचा शोध
  • गरीब आणि श्रीमंत दोघांनाही आनंदाचे कारण
  • परीक्षेत टिकणारा धन्य
  • सर्वोत्तम गोष्टींचा उगम—देव
  • “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा”
  • धर्माचरणी उपासक असणे पुरेसे नाही
  • परीक्षांचा सामना करतानाही आनंदी कसं राहायचं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • “वचनाप्रमाणे आचरण करणारे” आनंदी लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • आम्हाला विश्‍वास व ज्ञानाची का जरुरी आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ११/१५ पृ. ८-१३

परीक्षांतही तुमच्या विश्‍वासाला जडून राहा!

“माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.”—याकोब १:२.

१. यहोवाचे लोक कोणत्या परिस्थितीतही त्याच्यावर विश्‍वास ठेवून व “उल्हासित मनाने” त्याची सेवा करतात?

यहोवाचे लोक, त्याच्यावर विश्‍वास ठेवून व “उल्हासित मनाने” त्याचे साक्षीदार या नात्याने त्याची सेवा करतात. (अनुवाद २८:४७; यशया ४३:१०) विविध परीक्षांनी घेरलेले असताही ते असे करतात. संकटात असताही त्यांना, “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो,” या शब्दांतून सांत्वन मिळते.—याकोब १:२, ३.

२. याकोबाच्या पत्राच्या लेखकाविषयी काय माहिती आहे?

२ येशू ख्रिस्ताचा सावत्र भाऊ याकोब याने सा.यु. ६२ मध्ये वरीलप्रमाणे लिहिले. (मार्क ६:३) याकोब जेरूसलेममधील मंडळीत वडील या नात्याने कार्य करीत होता. खरे पाहता तो, केफा (पेत्र), आणि योहान, “आधारस्तंभ” अर्थात मंडळीचे खंबीर, भक्कम स्तंभ होते. (गलतीकर २:९) सा.यु. ४९ मध्ये ‘प्रेषित व वडीलवर्गासमोर’ सुंतेचा वादविषय आला तेव्हा याकोबाने शास्त्रवचनांवर आधारित मुद्दा मांडला जो पहिल्या शतकातील नियमन मंडळाने अंगीकारला.—प्रेषितांची कृत्ये १५:६-२९.

३. पहिल्या शतकातील ख्रिस्तीजन कोणत्या काही समस्यांचा सामना करीत होते व याकोबाच्या पत्रातून आपल्याला सर्वोत्तम लाभ कसा मिळू शकतो?

३ काळजीवाहक आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने याकोबाला “कळपांची स्थिति” माहीत होती. (नीतिसूत्रे २७:२३, पं.र.भा.) ख्रिस्ती तेव्हा कडक परीक्षांचा सामना करीत आहेत हे त्याने ओळखले. काही ख्रिश्‍चन, श्रीमंतांची तरफदारी करत असल्यामुळे त्यांना आपल्या मानसिकतेत फेरफार करण्याची आवश्‍यकता होती. पुष्कळ ख्रिश्‍चनांना, उपासना म्हणजे एक रीत वाटत होती. काही जण आपल्या बेलगाम जिभेने दुसऱ्‍यांना इजा पोहंचवत होते. जगीक आत्म्याचे त्यांच्यावर दुष्परिणाम होत होते; पुष्कळ जण अधीर झाले होते तर काही जण प्रार्थनाशील नव्हते. एकूणच, काही ख्रिश्‍चन आध्यात्मिकरीत्या आजारी पडले होते. याकोबाचे पत्र या बाबींना एका उभारणीकारक पद्धतीत मांडते आणि त्याचा सल्ला सा.यु. पहिल्या शतकात जितका व्यावहारिक होता तितकाच आजही आहे. हे पत्र जणू आपल्यालाच लिहिले आहे असे समजून जर आपण त्यावर विचार केला तर आपल्यालाही व्यक्‍तिगतरीत्या त्याचा फायदा होऊ शकतो.a

आपण परीक्षांना तोंड देतो तेव्हा

४. परीक्षांकडे आपण कसे पाहावे?

४ परीक्षांकडे कसे पाहावे ते याकोब आपल्याला दाखवतो. (याकोब १:१-४) देवाच्या पुत्रासोबत त्याचे काय नाते आहे ते न सांगता तो स्वतःला विनम्रपणे “देवाचा व प्रभु येशू ख्रिस्ताचा दास” म्हणवतो. याकोब, आध्यात्मिक इस्राएलच्या ‘बारा वंशांना’ लिहितो जे सुरवातीला छळामुळे ‘पांगले’ होते. (प्रेषितांची कृत्ये ८:१; ११:१९; गलतीकर ६:१६; १ पेत्र १:१) ख्रिस्ती या नात्याने आपलाही छळ होतो आणि आपल्याला ‘नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते.’ पण जर का आपण हे ध्यानात ठेवले, की आपण ज्या परीक्षांना तोंड दिले त्यांच्यामुळे आपला विश्‍वास बळकट झाला आहे तर आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा आपण ‘आनंद मानू.’ परीक्षांदरम्यान देवाशी सचोटी टिकवून ठेवल्यामुळे आपल्याला चिरकालिक सौख्यानंद मिळेल.

५. आपल्यावर कोणकोणत्या परीक्षा येऊ शकतात व आपण यशस्वीरीत्या त्यांना तोंड देतो तेव्हा काय होते?

५ आपल्या परीक्षा म्हणजे मानवजातीला सर्वसामान्यपणे तोंड द्यावी लागणारी संकटे होत. उदाहरणार्थ, आपली निकृष्ट प्रकृती आपल्याला त्रास देऊ शकेल. देव आता चमत्कारिक इलाज करत नाही, पण आजारपणाशी झगडण्यासाठी लागणारी सुज्ञता व धैर्य आपण त्याच्याकडे मागतो तेव्हा तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो. (स्तोत्र ४१:१-३) यहोवाचे छळग्रस्त साक्षीदार म्हणून धार्मिकतेमुळेही आपल्याला त्रास होतो. (२ तीमथ्य ३:१२; १ पेत्र ३:१४) अशा परीक्षांना आपण यशस्वीरीत्या सहन करतो तेव्हा आपला विश्‍वास सिद्ध, ‘पारखलेला गुण’ ठरतो. आणि आपला विश्‍वास विजयी होतो तेव्हा त्यातून “धीर उत्पन्‍न होतो.” परीक्षांद्वारे बळकट झालेला विश्‍वास, भविष्यात परीक्षांना तोंड देण्यास आपल्याला साहाय्य करील.

६. ‘धीर आपले कार्य पूर्ण’ कसे करतो आणि परीक्षेत असताना आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो?

६ पण, “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या,” असे याकोब म्हणतो. आपल्यावर आलेल्या परीक्षेत अशास्त्रवचनीयरीतीने खंड पाडण्याचा प्रयत्न आपण केला नाही तर विश्‍वासात उणे न पडणारे ख्रिस्ती म्हणून आपल्याला पूर्ण करण्यास धीर आपले “कार्य” करील. अर्थातच, एखाद्या परीक्षेमुळे आपल्यातल्या काही कमतरता दिसून आल्या तर त्यांच्यावर मात करण्याकरता आपण यहोवाचे साहाय्य मागितले पाहिजे. ती परीक्षा, लैंगिक अनैतिकतेच्या मोहात पाडणारी असेल तर? याविषयी आपण प्रार्थना करू आणि मग आपल्या प्रार्थनांच्या सुसंगतेत कार्य करू. आपल्याला कदाचित आपले नोकरीचे ठिकाण बदलावे लागेल किंवा देवाशी असलेली आपली सचोटी टिकवून ठेवण्याकरता इतर पावले उचलावी लागतील.—उत्पत्ति ३९:७-९; १ करिंथकर १०:१३.

सुज्ञतेचा शोध

७. परीक्षांना तोंड देण्याकरता आपल्याला साहाय्य कसे मिळू शकेल?

७ आपल्यावर एखादी परीक्षा येते तेव्हा आपण तिला कशाप्रकारे तोंड द्यावे हे आपल्याला माहीत नसल्यास आपण काय करावे ते याकोब आपल्याला दाखवतो. (याकोब १:५-८) आपल्यामध्ये सुज्ञतेची उणीव असल्यास व विश्‍वासाने ती प्रार्थनेद्वारे मागितल्यास यहोवा आपल्याला तुच्छ लेखणार नाही. एखाद्या परीक्षेकडे योग्य दृष्टीने पाहून ती सहन करण्यास तो आपल्याला मदत करील. सहविश्‍वासू किंवा बायबल अभ्यासादरम्यान आपल्याला शास्त्रवचने दाखवली जातील. ईश्‍वरी मार्गदर्शनाद्वारे घडवून आणलेल्या या घटना आपण काय करावे ते पाहण्यास आपल्याला मदत करू शकतात. आपल्याला देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळू शकेल. (लूक ११:१३) हे लाभ मिळवायचे असतील तर साहजिकच आपण देव आणि त्याच्या लोकांशी जडून राहणे आवश्‍यक आहे.—नीतिसूत्रे १८:१.

८. संशय करणाऱ्‍याला यहोवाकडून काहीच का मिळणार नाही?

८ ‘संशय न धरता विश्‍वासाने मागितल्यास’ यहोवा आपल्याला परीक्षांना तोंड देण्याकरता सुज्ञता देतो. संशय धरणारा “वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा,” असतो. आपण आध्यात्मिकरीत्या असेच अस्थिर असलो तर ‘यहोवापासून काही मिळण्याची’ आपण अपेक्षा करू शकत नाही. तेव्हा आपण प्रार्थनेत किंवा इतर कोणत्याही मार्गात ‘अनिश्‍चयी’ व “चंचल” असू नये. तर, सुज्ञतेचा उगम असलेल्या यहोवावर विश्‍वास ठेवू या.—नीतिसूत्रे ३:५, ६.

गरीब आणि श्रीमंत दोघांनाही आनंदाचे कारण

९. यहोवाचे उपासक या नात्याने आनंद करण्याचे आपल्याजवळ कारण का आहे?

९ गरिबी ही आपल्या परीक्षांमधील एक असल्यास, श्रीमंत आणि गरीब ख्रिस्ती आनंद मानू शकतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवू या. (याकोब १:९-११) येशूचे अनुयायी बनण्याआधी पुष्कळ अभिषिक्‍त जनांची आर्थिक परिस्थिती बेताची होती व जग त्यांना तुच्छ लेखत होते. (१ करिंथकर १:२६) पण राज्य वारस या नात्याने त्यांच्या “उच्च स्थितीविषयी” ते आनंद मानू शकले. (रोमकर ८:१६, १७) याच्या उलट, एके काळी सन्मानित असलेले श्रीमंत, ख्रिस्ताचे अनुयायी बनल्यामुळे ‘दीन स्थिती’ अनुभवतात कारण जग आता त्यांचा तिरस्कार करते. (योहान ७:४७-५२; १२:४२, ४३) परंतु, यहोवाचे सेवक या नात्याने आपण सर्वजण आनंद मानू शकतो कारण जगीक धन व प्रतिष्ठा, आपण अनुभवतो त्या आध्यात्मिक आनंदाच्या तुलनेत शून्यात जमा होते. शिवाय, आपल्यामध्ये सामाजिक प्रतिष्ठेला काहीच थारा नाही याबद्दल आपण किती आभारी आहोत!—नीतिसूत्रे १०:२२; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

१०. भौतिक संपत्तीबद्दल एखाद्या ख्रिश्‍चनाने कसा दृष्टिकोन बाळगावा?

१० धनसंपत्ती किंवा जगीक साध्यतांवर आपले जीवन अवलंबून नाही हे याकोब आपल्या निदर्शनास आणून देतो. एखाद्या फुलाचे सौंदर्य जसे त्याला सूर्याच्या ‘तीव्र तेजामुळे’ कोमेजण्यापासून वाचवू शकत नाही तसेच, श्रीमंत मनुष्याची धनसंपत्ती त्याचे आयुष्यमान वाढवू शकत नाही. (स्तोत्र ४९:६-९; मत्तय ६:२७) “उद्योगाच्या भरात” अर्थात कदाचित उद्योग करता करताच त्याची जीवनज्योत मालवू शकते. तेव्हा, “देवविषयक बाबतीत धनवान” होऊन शक्य तितकी राज्य आस्थेची उन्‍नती करणे महत्त्वाची गोष्ट आहे.—लूक १२:१३-२१; मत्तय ६:३३; १ तीमथ्य ६:१७-१९.

परीक्षेत टिकणारा धन्य

११. परीक्षेत असतानाही आपल्या विश्‍वासाशी जडून राहणाऱ्‍यांचे भवितव्य काय आहे?

११ आपण गरीब असो किंवा श्रीमंत, परीक्षेत टिकून राहण्यामुळेच आपण धन्य होऊ. (याकोब १:१२-१५) अशा परीक्षा भक्कम विश्‍वासाने सहन केल्यास आपण धन्य ठरवले जाऊ, कारण देवाच्या नजरेत योग्य ते करण्यातच धन्यता आहे. जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्या विश्‍वासानिशी जडून राहिल्यामुळे आत्म्याने अभिषेक झालेल्या ख्रिश्‍चनांना “जीवनाचा मुगूट,” अर्थात स्वर्गात अमरत्व प्राप्त होते. (प्रकटीकरण २:१०; १ करिंथकर १५:५०) पार्थिव आशा असलेले आपण देवावर विश्‍वास टिकवून ठेवल्यास परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची वाट पाहू शकतो. (लूक २३:४३; रोमकर ६:२३) यहोवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांप्रती तो किती चांगला आहे!

१२. संकटात असताना, “देवाने मला मोहांत घातले,” असे आपण कदापि का म्हणू नये?

१२ यहोवाच आपल्यासमोर संकटे आणून आपली परीक्षा घेतो हे शक्य तरी आहे का? “देवाने मला मोहांत घातले,” असे आपण कदापि म्हणू नये. पाप करण्यास आपल्याला प्रवृत्त करण्याचा यहोवा प्रयत्न करीत नाही तर आपण विश्‍वासात खंबीर राहिलो तर परीक्षांत टिकून राहण्याकरता लागणारे साहाय्य व बळ देण्यास तो हरहमेशा तयार असतो. (फिलिप्पैकर ४:१३) देव पवित्र असल्यामुळे, तो आपल्यासमोर अशी परिस्थिती उभी करणार नाही की जेथे पाप करण्यास आपली प्रतिकार क्षमता निर्बळ ठरेल. अभक्‍त परिस्थितीत सापडून आपल्या हातून एखादे पाप घडल्यास आपण देवाला दोष देणार नाही कारण “देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” आपल्या भल्यासाठी शिक्षा देण्याकरता यहोवा आपल्यासमोर एखादी परीक्षा येऊ देतो तेव्हा, आपली परीक्षा घेत असताना त्याच्या मनात कोणताही दुष्ट हेतू नसतो. (इब्री लोकांस १२:७-११) सैतान आपल्याला पाप करण्यास मोहित करू शकतो पण देव आपल्याला त्या दुष्टापासून वाचवू शकतो.—मत्तय ६:१३.

१३. गलत वासना मनातून काढून टाकली नाही तर काय होऊ शकते?

१३ एखाद्या विशिष्ट परिस्थितीत चुकीची इच्छा आपल्याला पाप करण्यास प्रवृत्त करू शकते म्हणून आपण सतत प्रार्थना करीत राहिले पाहिजे. याकोब म्हणतो: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो.” आपले अंतःकरण पापी वासनांवर मनन करीत असताना आपल्या हातून पाप घडते तेव्हा आपण देवाला दोष देऊ शकत नाही. पापी वासना काढून टाकली नाही तर आपल्या अंतःकरणात तिला खतपाणी मिळून ती “गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” आणि पाप परिपक्व झाल्यावर “मरणास उपजविते.” म्हणूनच, आपण आपली अंतःकरणे जपणे व पापी प्रवृत्तींचा प्रतिकार करणे आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे ४:२३) पाप काईनावर झडप घालणार आहे याची ताकीद त्याला आधीच देण्यात आली परंतु त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. (उत्पत्ति ४:४-८) आपण एखाद्या अशास्त्रवचनीय मार्गावर चालू लागलो तर काय? आपण देवाविरुद्ध पाप करू नये म्हणून ख्रिस्ती वडिलांनी आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न केल्यास आपण त्यांचे निश्‍चितच आभार मानले पाहिजे.—गलतीकर ६:१.

सर्वोत्तम गोष्टींचा उगम—देव

१४. देवाच्या देणग्या “परिपूर्ण” आहेत हे कोणत्या अर्थी म्हणता येते?

१४ यहोवा परीक्षांचा नव्हे तर सर्वोत्तम गोष्टींचा उगम आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. (याकोब १:१६-१८) याकोब सहविश्‍वासूंना “प्रिय बंधूंनो” असे संबोधून, देव “प्रत्येक उत्तम देणगी व पूर्ण दान” देतो हे दाखवतो. यहोवाच्या आध्यात्मिक व भौतिक देणग्या “उत्तम,” किंवा कशातही उणे नसलेल्या अर्थात परिपूर्ण आहेत. त्या, स्वर्गातील देवाच्या निवासस्थानातून म्हणजेच “वरून” येतात. (१ राजे ८:३९) सूर्य, चंद्र आणि तारे—‘ज्योतिमंडळाचा पिता’ यहोवा आहे. तो आपल्याला आध्यात्मिक प्रकाश व सत्यही देतो. (स्तोत्र ४३:३; यिर्मया ३१:३५; २ करिंथकर ४:६) सूर्य जसजसा बदलत जातो तसतसे सावल्यांचा आकारही बदलतो व फक्‍त भरदुपारीच तो झळाळत असतो; परंतु देवाच्या बाबतीत असे नाही, तो नेहमीच चांगल्या गोष्टी पुरवतो. त्याचे वचन व ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरविल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक तरतुदींचा आपण पुरेपूर फायदा घेतला तर परीक्षांना तोंड देण्याकरता तो नक्कीच आपल्याला तयार करील.—मत्तय २४:४५.

१५. यहोवाच्या उत्तम देणगींपैकी एक कोणती आहे?

१५ देवाच्या सर्वोत्तम देणगीपैकी एक कोणती आहे? “सत्यवचनाने” अथवा सुवार्तेच्या जोडीने चालणाऱ्‍या आध्यात्मिक पुत्रांना पवित्र आत्म्याद्वारे जन्म देणे, ही ती देणगी आहे. आध्यात्मिक जन्माचा अनुभव घेणारे ‘काही प्रथमफळे’ आहेत ज्यांना स्वर्गीय “राज्य व याजक” होण्याकरता मानवजातीतून निवडण्यात आले आहे. (प्रकटीकरण ५:१०; इफिसकर १:१३, १४) याकोबाच्या मनात कदाचित, येशूचे पुनरुत्थान झाले तो दिवस म्हणजे, सातूची प्रथमफळे अर्पिण्यात येतात तो निसान १६ आणि पवित्र आत्मा ज्या दिवशी ओतण्यात आला तो गव्हाच्या दोन भाकरी अर्पिण्याचा पेन्टेकॉस्टचा दिवस असावा. (लेवी २३:४-११, १५-१७) येथे, येशू पहिली उपज आणि त्याचे सहवारीस ‘काही प्रथमफळे’ असणार होते. आणि आपल्याला पार्थिव आशा असल्यास? ती आशा ध्यानात ठेवल्याने, राज्य शासनाखाली सार्वकालिक जीवन शक्य करून देणाऱ्‍या ‘प्रत्येक उत्तम देणगीच्या’ दात्यावर असलेल्या आपल्या विश्‍वासाशी जडून राहण्यास आपल्याला मदत होईल.

“वचनाप्रमाणे आचरण करणारे असा”

१६. आपण “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” का असले पाहिजे?

१६ विश्‍वासासंबंधाने आपल्याला सध्या परीक्षांना तोंड द्यावे लागत असले किंवा नसले तरीही, आपण “वचनाप्रमाणे आचरण करणारे” असावे. (याकोब १:१९-२५) आपण देवाचे वचन ऐकण्याबाबत “तत्पर,” व आज्ञाधारकपणे त्याचे आचरण करणारे असावे. (योहान ८:४७) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपला तोंडावर ताबा असावयास हवा, म्हणजेच आपण ‘बोलावयास धीमे’ असावयास हवे. (नीतिसूत्रे १५:२८; १६:२३) याकोब कदाचित आपल्याला आर्जवत असेल की आपण, देवच आपल्यावर परीक्षा आणत आहे असे बोलून मोकळे होऊ नये. याशिवाय आपल्याला ‘रागास मंद असण्याचा’ सल्ला दिला जात आहे “कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही.” एखाद्याच्या बोलण्याचा आपल्याला राग आल्यास, द्वेषयुक्‍त प्रत्युत्तर देण्याचे टाळता यावे म्हणून आपण “रागास मंद” बनू या. (इफिसकर ४:२६, २७) आपल्याला तसेच इतरांना त्रास देऊ शकणाऱ्‍या आपल्या चिडखोर वृत्तीमुळे आपण, आपल्या धर्मी देवावर विश्‍वास ठेवण्याजोगे आचरण निर्माण करू शकणार नाही. याव्यतिरिक्‍त, आपण “महाबुद्धिवान” असल्यास, आपल्याला “लवकर क्रोध” येणार नाही व यामुळे आपले बंधू व भगिनी आपल्याकडे आकर्षित होतील.—नीतिसूत्रे १४:२९.

१७. मन व अंतःकरण यांतून दुष्टपणा काढून टाकल्याने काय साध्य होते?

१७ यहोवास वीट आणणाऱ्‍या व चिडचिडेपणा वाढवणाऱ्‍या ‘सर्व मलिनतेपासून’ आपण स्वतःला मुक्‍त करणे अगत्याचे आहे. याशिवाय, ‘उचंबळून येणारा तो दुष्टभावही’ आपण सोडून दिला पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या जीवनातून सर्व प्रकारची शारीरिक अथवा आध्यात्मिक अशुद्धता काढून टाकली पाहिजे. (२ करिंथकर ७:१; १ पेत्र १:१४-१६; १ योहान १:९) मन व अंतःकरण यांतून दुष्टपणा काढून टाकण्यामुळेच तर आपण सत्याचे ‘मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारू’ शकलो. (प्रेषितांची कृत्ये १७:११, १२) आपण कितीही काळापासून ख्रिस्ती असलो तरी, अधिकाधिक शास्त्रवचनीय सत्ये आपल्यात मुळावू द्यावे. का? कारण आपल्यात मुळावलेले वचन देवाच्या आत्म्याद्वारे तारण करावयास समर्थ असलेले ‘नवीन मनुष्यत्व’ निर्माण करते.—इफिसकर ४:२०-२४.

१८. वचन केवळ ऐकणारा आणि वचनाचे आचरण करणारा यांच्यात काय फरक आहे?

१८ देवाचे वचन आपले मार्गदर्शक आहे हे आपण कसे दाखवतो? ‘केवळ ऐकणारे न होता, वचनाप्रमाणे आचरण करणारे होण्याद्वारे’ आपण दाखवून देतो की वचन आपले मार्गदर्शक आहे. (लूक ११:२८) ‘आचरण करणाऱ्‍यांजवळ,’ अशा प्रकारचा विश्‍वास असतो जो, ख्रिस्ती सेवेत आवेशी सहभाग व देवाच्या लोकांच्या सभांमध्ये नियमित उपस्थिती यांसारखी कार्ये उत्पन्‍न करतो. (रोमकर १०:१४, १५; इब्री लोकांस १०:२४, २५) वचन केवळ ऐकणारा मनुष्य, “आरशांत आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या माणसासारखा आहे.” आरशात तो आपले स्वरूप पाहून जातो पण त्याला त्याच्या स्वरूपात काही सुधारणा कराव्या लागतील हे तो विसरून जातो. “वचनाप्रमाणे आचरण करणारे” या नात्याने आपण देवाच्या ‘परिपूर्ण नियमांचा’ काळजीपूर्वक अभ्यास करून त्यांचे पालन करतो; या ‘परिपूर्ण नियमांत’ देव आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्या सर्वांचा समावेश होतो. याद्वारे मिळणारे स्वातंत्र्य, पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वाच्या अगदी विपरीत आहे कारण ते आपल्याला जीवनाप्रत नेते. तेव्हा, आपण सतत आत्मपरीक्षण करीत व ‘परिपूर्ण नियमांचे पालन करीत’ त्यात टिकून राहू या. अंमल विचार करा! ‘ऐकून विसरणारे न होता, कृति करणारे’ या नात्याने आपल्याला देवाच्या मर्जीत राहण्याचा सुहक्क आहे.—स्तोत्र १९:७-११.

धर्माचरणी उपासक असणे पुरेसे नाही

१९, २०. (अ) याकोब १:२६, २७ नुसार, शुद्ध उपासना आपल्याकडून काय अपेक्षिते? (ब) शुद्ध उपासनेची काही उदाहरणे कोणती?

१९ ईश्‍वरी कृपापसंती हवी असल्यास आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, खरी उपासना केवळ शिष्टाचार नाही. (याकोब १:२६, २७) आपल्याला वाटेल, की आपण यहोवाचे स्वीकारयोग्य “धर्माचरण करणारे” आहोत; पण हे, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत यहोवा ठरवेल. (१ करिंथकर ४:४) जीभेला आळा न घालण्याची एक गंभीर चूक असू शकते. आपण इतरांची निंदा केली, खोटे बोललो किंवा इतर मार्गांनी आपल्या जिभेचा गैरवापर केला तरी, देव आपली उपासना स्वीकारतो असा आपला गैरसमज झाला तर आपण स्वतःला फसवत असतो. (लेवीय १९:१६; इफिसकर ४:२५) आपले “धर्माचरण” ‘निरर्थक’ व्हावे व कोणत्याही कारणास्तव देवाने त्याचा अस्वीकार करावा असे आपल्याला मुळीच वाटणार नाही.

२० शुद्ध उपासनेच्या प्रत्येक पैलूचा याकोबाने उल्लेख केलेला नसला तरी त्यात “अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे” समाविष्ट आहे असे तो म्हणतो. (गलतीकर २:१०; ६:१०; १ याहोन ३:१८) ख्रिस्ती मंडळी विधवांची काळजी घेण्यात खास रस घेते. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६; १ तीमथ्य ५:८-१०) देव, विधवा आणि अनाथांचा वाली असला तरी, आध्यात्मिकरीत्या व भौतिकरीत्या त्यांना हवे असलेले साहाय्य देऊन आपणही त्याला सहकार्य देऊ या. (अनुवाद १०:१७, १८) शुध्द उपासनेचा अर्थ, सैतानाच्या सान्‍निध्यात असलेल्या अधार्मिक मानवी समाजापासून म्हणजेच ‘जगापासून स्वतःला निष्कलंक ठेवणे’ असाही होतो. (योहान १७:१६; १ योहान ५:१९) यास्तव, जगाच्या अभक्‍त आचरणापासून आपण स्वतःला मुक्‍त ठेवू या, जेणेकरून आपल्याला यहोवाचे गौरव करता येईल आणि त्याच्या सेवेत उपयुक्‍त ठरता येईल.—२ तीमथ्य २:२०-२२.

२१. याकोबाच्या पत्राच्या संबंधाने, कोणत्या प्रश्‍नांचा आपण विचार करणे अगत्याचे आहे?

२१ आता पर्यंत आपण विचारात घेतलेल्या याकोबाच्या सल्ल्यामुळे, परीक्षांना तोंड देण्यास व आपल्या विश्‍वासाशी जडून राहण्यास आपले साहाय्य झाले पाहिजे. उत्तम देणगींच्या प्रेमळ दात्याबद्दल आपली प्रशंसा वाढली पाहिजे. तसेच याकोबाचे हे शब्द, शुद्ध उपासना आचरण्यास आपली मदत करतात. या व्यतिरिक्‍त तो आपल्या लक्षात आणखी कोणत्या गोष्टी आणून देतो बरे? यहोवावर आपला सच्चा विश्‍वास आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?

[तळटीप]

a या आणि यानंतरच्या दोन लेखांचा खासगीत किंवा कौटुंबिक अभ्यास करताना, याकोबाच्या पत्रातील प्रत्येक विश्‍वास-प्रवर्तक उल्लेखित भागांचे वाचन तुम्हाला फायदेकारक वाटेल.

तुम्ही कसे उत्तर द्याल

◻ परीक्षांना तोंड देण्यास काय आपल्याला साहाय्य करील?

◻ परीक्षेत असतानाही ख्रिस्ती जन आनंद का करू शकतात?

◻ आपण वचनाचे आचरण करणारे कसे होऊ शकतो?

◻ शुद्ध उपासनेत कशाचा समावेश होतो?

[९ पानांवरील चित्र]

परीक्षेत असताना, प्रार्थनांचे उत्तर देण्यास यहोवा सामर्थ्यशाली आहे यावर विश्‍वास ठेवा

[१० पानांवरील चित्र]

“वचनाप्रमाणे आचरण करणारे” संपूर्ण जगभरात देवाच्या राज्याची घोषणा करत आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा