संकटात अनाथ व विधवांना साहाय्य करणे
आज आपण प्रेमहीन जगात राहत आहोत हे ओळखणे काही कठीण नाही. “शेवटल्या काळी” कशाप्रकारचे लोक असतील त्याविषयी सांगताना प्रेषित पौलाने लिहिले: “कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, . . . ममताहीन” असतील. (२ तीमथ्य ३:१-३) हे शब्द किती खरे आहेत!
आपल्या काळातील नैतिक वातावरणामुळे पुष्कळजण कठोर हृदयाचे बनले आहेत. लोकांना इतरांच्या हिताची काही चिंता उरलेली नाही; काही बाबतीत तर स्वतःच्या कौटुंबिक सदस्यांबद्दलही काहींना चिंता वाटत नाही.
याचा प्रतिकूल परिणाम, परिस्थितीमुळे निराधार झालेल्या अनेकांवर पडतो. युद्धे, नैसर्गिक आपत्ती आणि निर्वासित झाल्यामुळे विधवा आणि अनाथांची संख्या वाढत आहे. (उपदेशक ३:१९) संयुक्त राष्ट्रे बाल निधीच्या एका अहवालानुसार “युद्धामुळे १० लाखांपेक्षा अधिक [मुले] एकतर अनाथ किंवा आपल्या कुटुंबांपासून विलग झाली आहेत.” शिवाय, एकट्या, सोडलेल्या किंवा घटस्फोट दिलेल्या असंख्य माताही तुम्हाला ठाऊक असतील ज्यांच्यासमोर कोणाच्याही मदतीविना उदरनिर्वाह करण्याचा आणि मुलांना वाढवण्याचा कठीण प्रश्न असेल. काही देशांमध्ये तर गंभीर प्रकारची आर्थिक स्थिती असल्यामुळे त्या देशातील पुष्कळसे नागरिक अत्यंत गरिबीत दिवस कंठत आहेत. आणि यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
हे सर्व विचारात घेता, संकटात असलेल्यांना काही आशा आहे का? विधवा आणि अनाथांचे दुःख कसे दूर केले जाऊ शकते? ही समस्या कधी सोडवण्यात येईल का?
बायबल काळात प्रेमळ काळजी
विधवा आणि अनाथांच्या शारीरिक व आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे हा देवाच्या उपासनेचा अविभाज्य भाग राहिला आहे. पीकांची कापणी किंवा फळांची तोडणी केल्यावर शेतात राहिलेले धान्य किंवा फळे इस्त्राएलांना वेचायचे किंवा गोळा करायचे नव्हते. राहिलेले धान्य किंवा फळे “उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी” राहू द्यायची होती. (अनुवाद २४:१९-२१) मोशेच्या नियमशास्त्रात हे स्पष्ट केले होते की, “तुम्ही कोणत्याच विधवेला किंवा अनाथ मुलाला जाचू नका.” (निर्गम २२:२२, २३, पं.र.भा.) बायबलमध्ये सांगितलेल्या विधवा आणि अनाथ मुले गरीबांचे योग्य चित्रण करतात; कारण पतीचा, पित्याचा किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यावर कुटुंबातील बाकीजण एकटे आणि निराधार होतात. कुलपिता ईयोब म्हणाला: “रडणाऱ्या दीनाला, अनाथाला आणि ज्याचे साहाय्य करायला कोणी नव्हता त्यालाही मी सोडवीत असे.”—ईयोब २९:१२, पं.र.भा.
ख्रिस्ती मंडळीच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये, दीनांची आणि पालक किंवा पती गमावल्यामुळे खरोखर गरजवंत असलेल्यांची मदत करणे हे खऱ्या उपासनेचे मुख्य वैशिष्ट्य होते. अशांचे हित मनी बाळगून शिष्य याकोबाने लिहिले: “अनाथ व विधवांना संकटात सहाय्य करणे व जगातील भ्रष्टतेपासून स्वतःला निष्कलंक ठेवणे हा देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व मंगल धार्मिकपणा आहे.”—याकोब १:२७, मराठी कॉमन लँग्वेज.
अनाथ आणि विधवांचा उल्लेख करण्याव्यतिरिक्त याकोबाने गरीब आणि निराधार असलेल्यांसाठी देखील चिंता व्यक्त केली. (याकोब २:५, ६, १५, १६) प्रेषित पौलसुद्धा अशाचप्रकारे विचारशील होता. त्याला आणि बर्णबाला प्रचारकार्याची नेमणूक मिळाली तेव्हा “गरिबांची आठवण ठेवावी” अशी सूचना देखील त्यांना मिळाली होती. पौल शुद्ध विवेकाने असे म्हणू शकला की, “मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो.” (गलतीकर २:९, १०) ख्रिस्ती मंडळीच्या स्थापनेनंतर लगेचच तिच्या कार्यांविषयीचा अहवाल म्हणतो: “त्यांच्यातील कोणालाहि उणे नव्हते . . . मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.” (प्रेषितांची कृत्ये ४:३४, ३५) होय, अनाथ, विधवा आणि निराधार असलेल्यांची काळजी घेण्यासाठी प्राचीन इस्राएलमध्ये केलेली व्यवस्था ख्रिस्ती मंडळीतही उपयोगात आणली जात होती.
अर्थात, पुरवले जाणारे साहाय्य माफक प्रमाणात आणि ज्या त्या मंडळीच्या ऐपतीनुसार होते. पैसा विनाकारण खर्च केला जात नव्हता आणि साहाय्य दिले जाणारे लोक खरोखर गरजवंत होते. कोणाही ख्रिश्चनाला या व्यवस्थेचा दुरुपयोग करायचा नव्हता आणि मंडळीवर अनावश्यक ओझे लादायचे नव्हते. १ तीमथ्य ५:३-१६ येथे पौलाने दिलेल्या सूचनांमध्ये हे अगदी स्पष्ट करण्यात आले होते. तेथे आपल्याला दिसून येते की, नातेवाईकांनी शक्य असल्यास गरजवंतांची जबाबदारी पेलायची होती. काही विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणाऱ्या गरजवंत विधवांनाच साहाय्य दिले जात होते. या सर्वावरून गरजवंतांची काळजी घेण्यासाठी यहोवा कशी सुज्ञपणे व्यवस्था करतो हे दिसून येते. पण त्याच वेळी, दाखवल्या जाणाऱ्या दयेचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून समतोलही राखण्याची आवश्यकता होती.—२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२.
आज अनाथ व विधवांची काळजी घेणे
संकटात असलेल्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यासंबंधी आणि त्यांचे साहाय्य करण्यासंबंधी गतकाळातील देवाचे सेवक जी तत्त्वे अनुसरत होते तीच तत्त्वे आजही यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये लागू केली जातात. बंधूप्रेम त्यांचे एक वैशिष्ट्य आहे; येशूने त्याविषयी असे म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) काहीजण गरीबी, आपत्ती, युद्धे किंवा आंतरिक झगड्यांचे बळी असले तर आंतरराष्ट्रीय बंधुवर्गातील बाकीचे बंधूभगिनी आध्यात्मिक आणि भौतिक मदत द्यायला लगेच उत्सुक असतात. हे कसे केले जात आहे ते पाहण्यासाठी आपण काही आधुनिक काळातील अनुभव पाहू या.
पेड्रो दीड वर्षांचा असतानाच त्याची आई वारली; त्यामुळे त्याला तिच्याबद्दल काही आठवत नाही. तो पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे वडीलही वारले. मग, फक्त तो आणि त्याचे भाऊ मागे राहिले. यहोवाचे साक्षीदार पेड्रोच्या वडिलांना भेट देत असल्यामुळे, वडिलांच्या मृत्यूनंतर पेड्रो आणि त्याच्या मोठ्या भावांचा घरीच बायबल अभ्यास घेतला जाऊ लागला.
पेड्रो म्हणतो: “त्यानंतरच्या आठवडीच आम्ही सभांना जाऊ लागलो. बांधवांसोबत सहवास राखल्यामुळे त्यांचे प्रेम आम्ही अनुभवले. मंडळी माझ्यासाठी सुरक्षित स्थान होती कारण तेथील बंधू-बहिणी मला अगदी माझ्या आई-वडिलांसारखंच प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं वागवायचे.” पेड्रो आठवून सांगतो की, एक ख्रिस्ती वडील त्याला त्यांच्या घरी बोलवायचे. विरंगुळ्यासाठी तो तेथे जाऊन त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांशी गप्पा मारायचा. पेड्रो म्हणतो, “या माझ्या काही सुखद आठवणी आहेत.” पेड्रो वयाच्या ११ व्या वर्षी आपल्या विश्वासाबद्दल इतरांना साक्ष देऊ लागला आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्याने बाप्तिस्मा घेतला. त्याच्या मोठ्या भावांनाही मंडळीने अशाप्रकारे मदत केल्यामुळे त्यांनीसुद्धा आध्यात्मिकरित्या प्रगती केली.
डेव्हिडचेही उदाहरण पाहा. त्याचे आईवडील एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हा तो व त्याची जुळी बहीण दोघांनाही असेच वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यांच्या आजीआजोबांनी व मावशीने त्यांना लहानाचे मोठे केले. “आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला कळू लागले तेव्हा आम्हाला असुरक्षित वाटू लागले; आम्ही खूप दुःखी झालो. आम्हाला कोणाचा तरी आधार हवा होता. माझी मावशी यहोवाची साक्षीदार बनली आणि तिच्यामुळेच आम्हाला बायबलच्या सत्याचे शिक्षण मिळाले. बांधवांनी आम्हाला खूप प्रेम दिले; लळा लावला. आमच्यावर त्यांचा खूप जीव होता; त्यांनी आम्हाला काही ध्येये ठेवायला आणि यहोवाची सेवा करत राहायला उत्तेजन दिले. मी दहा-एक वर्षांचा होतो तेव्हा एक सेवा सेवक मला क्षेत्र सेवेमध्ये सोबत घेऊन जात असत. दुसरे बांधव माझ्या अधिवेशनांचा खर्च उचलत असत. एकाने तर राज्य सभागृहात मला अनुदान देता यावे म्हणून काही मदतही दिली.”
वयाच्या १७ व्या वर्षी डेव्हिडचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर तो मेक्सिकोतल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात काम करू लागला. आजही तो हे कबूल करतो: “पुष्कळसे वडील मला काही न काही शिकवतात आणि उपयोगी सल्ला देतात. त्यामुळे, मला वाटणारा असुरक्षितपणा आणि एकटेपणा हळूहळू दूर होऊ लागला आहे.”
मेक्सिकोतील एका मंडळीत अनेक विधवा आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे; त्याच मंडळीत, एबल हे एक वडील आहेत. ते म्हणतात: “माझी पूर्ण खात्री पटली आहे की, विधवांना सर्वात जास्त भावनिक आधार हवा असतो. काही वेळा त्या दुःखी असतात; त्यांना एकदम एकटं-एकटं वाटतं. त्यामुळे, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं ऐकून घेणं फार महत्त्वाचं असतं. आम्ही [मंडळीतले वडील] त्यांना वारंवार भेटी देतो. त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांना आध्यात्मिक सांत्वनही मिळतं.” परंतु, काही वेळा आर्थिक मदत देखील करावी लागते. एबल यांनी काही काळाआधी असे सांगितले, “आम्ही एका विधवा बहिणीसाठी घर बांधत आहोत. शनिवारच्या दिवशी किंवा काही वेळा दुपारच्या वेळी आम्ही हे काम करतो.”
अनाथ व विधवांना मदत देण्याविषयी आणखी एका मंडळीतले वडील स्वतःचा अनुभव सांगतात: “मला असं वाटतं की, विधवांपेक्षा अनाथांना ख्रिस्ती प्रेम मिळण्याची जास्त गरज असते. कारण आईवडील असलेल्या मुलांपेक्षा किंवा किशोरवयीनांपेक्षा या अनाथ मुलांना झिडकारल्यासारखं वाटण्याची जास्त शक्यता असते. त्यांना अनेक मार्गांनी जिव्हाळा दाखवण्याची आवश्यकता असते. सभा संपल्यानंतर त्यांना भेटून त्यांची विचारपूस केली पाहिजे. आमच्याकडे एक विवाहित बांधव आहे; लहान असतानाच तो अनाथ झाला. सभेत आल्यावर मी नेहमी त्याला जाऊन भेटत असतो; आणि तोसुद्धा मला पाहिल्यावर लगेच मिठी मारतो. यामुळे बंधुप्रेमाचे बंध आणखी मजबूत होतात.”
यहोवा ‘दरिद्री असलेल्याला सोडवील’
विधवा आणि अनाथांच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वात आधी यहोवावर भरवसा ठेवण्याची गरज आहे. त्याच्याविषयी असे म्हटले आहे: “परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करितो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो.” (स्तोत्र १४६:९) अशा समस्या, केवळ येशू ख्रिस्ताच्या शासनाधीन, देवाच्या राज्याकरवीच पूर्णपणे सोडवल्या जातील. मशीहाच्या त्या शासनाचे भविष्यसूचक वर्णन करताना स्तोत्रकर्त्याने लिहिले: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.”—स्तोत्र ७२:१२, १३.
सद्य व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येतो तसे, ख्रिश्चनांना सर्वसाधारणपणे तोंड द्यावे लागणारे तणाव निश्चित वाढतील. (मत्तय २४:९-१३) ख्रिश्चनांनी दररोज एकमेकांबद्दल अधिक चिंता व्यक्त केली पाहिजे आणि “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति” केली पाहिजे. (१ पेत्र ४:७-१०) ख्रिस्ती पुरुष, विशेषतः वडिलजन, अनाथ असलेल्यांबद्दल काळजी आणि करुणा दाखवू शकतात. आणि मंडळीतल्या प्रौढ स्त्रिया विधवांना आधार देऊ शकतात व त्यांचे सांत्वन करू शकतात. (तीत २:३-५) खरे तर, क्लेशात असलेल्यांबद्दल काळजी दाखवून सगळेच जण मदत करू शकतात.
“आपला बंधु गरजवंत आहे” हे पाहूनही “स्वतःला त्याचा कळवळा येऊ” न देण्याची मनोवृत्ती खऱ्या ख्रिश्चनांमध्ये नाही. प्रेषित योहानाच्या सल्ल्याचे ते जाणीवपूर्वक पालन करतात: “मुलांनो, आपल्या “शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.” (१ योहान ३:१७, १८) तर मग, आपण “अनाथ व विधवांना संकटात सहाय्य” करू या.—याकोब १:२७.
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
“शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.” १ योहान ३:१७, १८
[१० पानांवरील चित्रे]
खरे ख्रिस्ती अनाथ व विधवांना भौतिक आध्यात्मिक, आणि भावनिक मदत पुरवतात