आशेने स्थिर, प्रीतीने प्रवृत्त
“विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.”—१ करिंथकर १३:१३.
१. प्रेषित पौल आपल्याला कोणती ताकीद देतो?
प्रेषित पौल आपल्याला ताकीद देतो, की जहाज जसे फुटू शकते त्याप्रमाणे आपल्या विश्वासालाही तडा जाऊ शकतो. तो म्हणाला: “विश्वास व चांगला विवेकभाव धर” कारण “कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले.” (१ तीमथ्य १:१९) सा.यु. पहिल्या शतकात जहाज लाकडाचे बनवले जात असे. लाकूड आणि कौशल्यपूर्ण बांधकाम यावर खरे तर जहाजाचे समुद्रात टिकून राहणे अवलंबून असते.
२. आपले विश्वासरूपी तारू चांगल्याप्रकारे का बांधले पाहिजे व यासाठी आपल्याकडून काय अपेक्षा केली जाते?
२ ज्याला आपले विश्वासरूपी तारू म्हटले जाऊ शकते ते मानवजातीच्या खवळलेल्या समुद्रात तरंगत राहिले पाहिजे. (यशया ५७:२०; प्रकटीकरण १७:१५) त्यासाठी ते मजबूतरीत्या बांधले पाहिजे आणि हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रारंभिक ख्रिश्चनांना यहुदी व रोमी जगातील ‘समुद्र’ खवळत चालल्याचे वाटत होते तेव्हा यहुदाने लिहिले: “प्रियजनहो, . . . आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा २०, २१) यहुदा देखील ‘पवित्र जनांच्या हवाली केलेल्या विश्वासासाठी’ लढण्यासंबंधी बोलला असल्यामुळे ‘परमपवित्र विश्वास’ हा वाक्यांश, सर्व ख्रिस्ती शिकवणींना आणि तारणाच्या सुवार्तेला लागू होऊ शकतो. (यहूदा ३) ख्रिस्त त्या विश्वासाचा पाया आहे. खऱ्या ख्रिस्ती विश्वासाशी जडून राहण्याकरता दृढ विश्वासाची गरज आहे.
‘पंथ भयाच्या’ वादळातून निभाव
३. काही जण ‘पंथ भयाचा’ उपयोग कसा करत आहेत?
३ अलीकडील वर्षांत, मोठ्या प्रमाणावर सामूहिक आत्महत्या, कत्तल आणि दहशतवाद्यांसोबत मिळून लहान पंथांनी केलेले हल्ले, यांसारखे भयानक गुन्हे घडले आहेत. अशा घातक पंथांपासून निरपराध लोकांचे विशेषकरून युवकांचे संरक्षण करण्याबाबतची चिंता अनेक लोकांनी आणि प्रामाणिक राजकीय नेत्यांनी दाखवली आहे, हे समजण्याजोगे आहे. या अघोर गुन्ह्यांमागे निश्चितपणे असलेल्या “ह्या युगाच्या दैवताने,” काही जण ज्याला पंथाचे भय म्हणतात ते भय निर्माण केले आहे व या भयाचा उपयोग तो यहोवाच्या लोकांविरूद्ध करत आहे. (२ करिंथकर ४:४; प्रकटीकरण १२:१२) यहोवाच्या लोकांच्या कार्याचा विरोध करण्यासाठी काहींनी या भयाचा वापर केला आहे. काही विशिष्ट राष्ट्रांमध्ये त्यांनी, एक मोहीम काढली आहे जी, ‘घातक पंथांविरूद्ध’ लोकांचे संरक्षण करण्याचा दावा करते; या पंथांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांनाही चुकीने गणले जाते व अशाप्रकारे ते अप्रत्यक्षपणे आपल्यावर खोटा आरोप करत आहेत. यामुळे काही युरोपियन राष्ट्रांत घरोघरचे साक्षीकार्य करणे कठीण झाले आहे व जे लोक आपल्याबरोबर बायबलचा अभ्यास करत होते तो त्यांनी थांबवला आहे. या कारणांमुळे आपले काही बांधव निरुत्साहित देखील झाले आहेत.
४. विरोध होतो तेव्हा आपण निरुत्साहित का होऊ नये?
४ पण, आपला विरोध होतो तेव्हा निरुत्साहित होण्याऐवजी, आपण खरा ख्रिस्ती धर्म आचरीत आहोत हा आपला ठाम विश्वास आणखी दृढ झाला पाहिजे. (मत्तय ५:११, १२) आरंभीचे ख्रिश्चन राजद्रोही पंथाचे आहेत असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता व ‘त्यांच्याविरूद्ध सर्वत्र’ बोलले जात होते. (प्रेषितांची कृत्ये २४:५; २८:२२) परंतु, प्रेषित पेत्राने आपल्या सहविश्वासूंना असे लिहून त्यांना सांत्वन दिले, की: “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांवर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका; ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहां त्याअर्थी आनंद करा; म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसहि तुम्ही उल्लास व आनंद कराल.” (१ पेत्र ४:१२, १३) तसेच, पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या एका सदस्याने लिहिले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांस ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:२-४) जहाज समुद्रात टिकेल की नाही याची परीक्षा सुसाट्याच्या वाऱ्याने होते, त्याचप्रमाणे विरोधाच्या वादळाने आपल्या विश्वासरूपी तारूतील कोणतीही कमतरता दिसून येईल.
संकटामुळे धीर उत्पन्न होतो
५. आपला विश्वास संकटातही स्थिर आहे याची आपण कशी खात्री करू शकतो?
५ संकटाचे वादळ पार केल्यावरच ख्रिश्चनांना आपल्या धीराच्या व विश्वासाच्या स्थैर्याची खात्री होऊ शकेल. आपण ‘कशातही उणे न होता अखंड परिपूर्णता,’ तसेच दृढ विश्वास प्राप्त केला तरच आपला धीर वादळी समुद्रात आपले “कार्य पूर्ण” करील. पौलाने लिहिले: ‘सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात आपली लायकी पटवून देतो.’—२ करिंथकर ६:४.
६. आपण ‘संकटात असताना उल्लास’ का केला पाहिजे व यामुळे आपली आशा बळकट कशी होते?
६ काही वेळा आपल्याला ज्याचा अनुभव घ्यावा लागतो ते संकटरुपी सुसाट्याचे वारे, आपल्या विश्वासाचे तारू उचित व स्थिर आहे हे शाबीत करण्याची संधी देत आहेत असा आपण विचार केला पाहिजे. रोममधील ख्रिश्चनांना पौलाने लिहिले: “आपण आपल्यावर आलेल्या संकटांतहि उल्लासतो कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकट हे धीर उत्पन्न करते, आणि धीराने आपण कसोटीस उतरतो, आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्न होते. आशा तर लाजवीत नाही.” (रोमकर ५:३-५, पं.र.भा.) परीक्षांत स्थिर राहिल्यास आपण यहोवाची पसंती प्राप्त करतो. आणि यामुळे आपली आशा बळकट होते.
काही जणांचे तारू का फुटते
७. (अ) पौलाचे शब्द दाखवून देतात त्याप्रमाणे काहींचे आध्यात्मिक तारू कसे फुटले? (ब) आज काही जण सत्यापासून कशाप्रकारे बहकले आहेत?
७ ‘तारू फुटण्याचा’ ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्याविषयी बोलत असताना पौलाच्या मनात असे लोक होते ज्यांनी आपला चांगला विवेक ‘झुगारला’ व आपला विश्वास गमावला. (१ तीमथ्य १:१९) यांच्यापैकी हुमनाय व आलेक्सांद्र हे होते जे धर्मत्यागी बनले होते, सत्यापासून बहकून निंदनीय गोष्टी बोलत होते. (१ तीमथ्य १:२०, NW; २ तीमथ्य २:१७, १८) आज सत्यापासून बहकलेले धर्मत्यागी, शाब्दिकरीत्या “विश्वासू व बुद्धिमान दासाला” मारतात; म्हणजे, जो हात त्यांना आध्यात्मिक अन्न भरवत होता तोच हात ते चावतात. काही त्या ‘दुष्ट दासाप्रमाणे’ आहेत जो “आपला धनी येण्यास विलंब लागेल” असे सुचवत होता. (मत्तय २४:४४-४९; २ तीमथ्य ४:१४, १५) दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश जवळ असल्याचे ते नाकारतात व यहोवाच्या लोकांमध्ये तातडीची जाणीव कायम राखणाऱ्या आध्यात्मिकरीत्या सतर्क असलेल्या दास वर्गाची टीका करतात. (यशया १:३) अशाप्रकारच्या धर्मत्याग्यांना ‘कित्येकांच्या विश्वासाचा नाश करण्यात’ आणि आध्यात्मिक तारू मोडण्यात यश मिळाले आहे.—२ तीमथ्य २:१८.
८. कशामुळे काहींनी त्यांचे विश्वासरूपी तारू मोडले किंवा बुडवून टाकले?
८ इतर समर्पित ख्रिश्चनांनी आपला विवेक झुगारून व या जगाच्या बेलगाम चैनबाजीत व लैंगिक अनैतिकतेत गुरफटून स्वतःचे विश्वासरूपी तारू फोडून टाकले आहे. (२ पेत्र २:२०-२२) दुसरे काही, आपले विश्वासरूपी तारू बुडवून टाकतात कारण त्यांच्यामते, नवीन व्यवस्थीकरणाचे क्षितिज त्यांना दिसत नाही. विशिष्ट भविष्यवाणींच्या पूर्णतेसंबंधी त्यांना वेळेची मोजणी करता येत नसल्यामुळे व आपल्या मनातून “प्रभूचा दिवस” काढून टाकल्यामुळे ते खरी उपासना सोडून देतात. (२ पेत्र ३:१०-१३; १ पेत्र १:९) आणि काही दिवसांतच ते स्वतःला सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या गढूळ, खवळलेल्या समुद्रात पाहतात. (यशया १७:१२, १३; ५७:२०) ख्रिस्ती मंडळीशी सर्व नातेसंबंध तोडून टाकलेल्या काहींचा अजूनही असा विश्वास आहे, की ही मंडळी खरा धर्म आचरते. पण, यहोवा देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगासाठी थांबून राहण्याकरता लागणारा धीर व सहनशीलता त्यांच्यात नाही. परादीस खूप लवकर येणार आहे असे त्यांना वाटत नाही.
९. काही समर्पित ख्रिस्ती काय करत आहेत व या वस्तुस्थितींवरून आपण काय विचार केला पाहिजे?
९ जगाच्या काही भागातील काही समर्पित ख्रिश्चनांनी आपल्या विश्वासरूपी तारूचे शीड आखूड केले आहे. जहाज तसे तरंगतच असते पण पूर्ण विश्वासाने वेगाने पुढे जाण्याऐवजी हे लोक मंदगतीने जाण्याचे पसंत करतात. “परादीस जवळ” आहे या आशेविषयी ऐकून आकर्षित झालेले काही जण सुरवातीला ते प्राप्त करण्यासाठी खूप झटण्यास तयार होते—प्रचार कार्यात आवेशी होते, सर्व सभांना, संमेलनांना व अधिवेशनांना ते नियमितरीत्या उपस्थित होत होते. पण आता, आपल्या आशेची पूर्णता आपल्या अपेक्षेच्या कितीतरी दूर आहे असा विचार ते करत असल्यामुळे त्यांना पूर्वीइतका आवेश दाखवण्याची इच्छा राहिली नाही. हे, प्रचार कार्यातील कमी सहभाग, सभांची अनियमित उपस्थिती व संमेलनांतील किंवा अधिवेशनांतील काही भाग चुकवण्याची प्रवृत्ती, यांवरून दिसून येते. इतरजण मनोरंजनात व भौतिक ऐषोआराम मिळवण्यात जास्त वेळ खर्च करत आहेत. या सर्व वस्तुस्थिती, यहोवाला आपण केलेल्या समर्पणाच्या सुसंगतेत आपल्या जीवनात कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची असली पाहिजे यावर आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्याच्या सेवेतील आपला आवेश “परादीस लवकर” येणार या आशेवर अवलंबून असला पाहिजे का?
आशेची तुलना नांगराबरोबर
१०, ११. पौलाने आपल्या आशेची तुलना कशाबरोबर केली व ही तुलना उचित का होती?
१० यहोवाने अब्राहामाद्वारे आशीर्वादांचे अभिवचन दिले आहे हे पौलाने दर्शवले. नंतर पुढे त्याने असे स्पष्टीकरण दिले: “देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्याद्वारे [त्याचे वचन व त्याची शपथ] चांगले उत्तेजन मिळावे; ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ . . . आहे.” (इब्री लोकांस ६:१७-१९; उत्पत्ति २२:१६-१८) अभिषिक्त ख्रिश्चनांपुढे स्वर्गामध्ये अमर जीवनाची आशा आहे. आज, यहोवाच्या बहुसंख्य सेवकांना परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जीवनाची अद्भुत आशा आहे. (लूक २३:४३) अशा आशेविना कोणाकडेही विश्वास असणार नाही.
११ नांगर हे शक्तिशाली सुरक्षित साधन असते जे जहाजाला जागेवरच स्थिर धरून राहण्यास व भरकटू न देण्यास अत्यावश्यक असते. कोणताही खलाशी नांगराविना बंदर सोडून जाण्याचा धोका पत्करणार नाही. जहाज फुटण्याचा पौलाला अनेक वेळा अनुभव आला असल्यामुळे खलाशांचे जीवन जहाजाच्या नांगरावर अवलंबून असते हे त्याला चांगल्याप्रकारे माहीत होते. (प्रेषितांची कृत्ये २७:२९, ३९, ४०; २ करिंथकर ११:२५) पहिल्या शतकात, जहाजाला इंजिन नसल्यामुळे कप्तान त्याला हवे तसे जहाज वळवू शकत नव्हता. वल्हवणाऱ्या युद्धजहाजांना सोडून इतर जहाजे पुढे जाण्यासाठी वाऱ्यावर अवलंबून होती. आपले जहाज खडकांवर जाऊन आदळण्याची भीती आहे हे कप्तानाच्या लक्षात येते तेव्हा नांगर टाकून वादळात जहाज तरंगत ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो; त्याला हा भरवसा असतो, की नांगर समुद्रतळाशी घट्ट बसेल. यास्तव, पौलाने एखाद्या ख्रिश्चनाच्या आशेची तुलना ‘जीवाच्या नांगराबरोबर केली जी स्थिर व अढळ’ आहे. (इब्री लोकांस ६:१९) आपल्यावर विरोधाचे किंवा इतर परीक्षांचे वादळ येते तेव्हा आपली अद्भुत आशा नांगरासारखी असते जी आपल्या जीवाला स्थिर ठेवते जेणेकरून आपले विश्वासरूपी तारू संशयाच्या वालूकायमय घातक उथळ बांधांवर किंवा धर्मत्यागाच्या नाशकारक खडकांवर जाऊन आदळत नाही.—इब्री लोकांस २:१; यहुदा ८-१३.
१२. आपण यहोवाला सोडून देण्याचे कसे टाळू शकतो?
१२ पौलाने इब्री ख्रिश्चनांना ताकीद दिली: “बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये म्हणून जपा.” (इब्री लोकांस ३:१२) ग्रीक वचनात, ‘सोडून देणे’ याचा अक्षरशः अर्थ “दूर राहणे” म्हणजेच धर्मत्याग करणे असा होतो. पण आपल्या विश्वासरूपी तारवाला आपण फुटण्यापासून वाचवू शकतो. आपल्यावर येणाऱ्या परीक्षांच्या सर्वात जोरदार वादळातही यहोवाशी जडून राहण्यास विश्वास आणि आशा आपली मदत करतील. (अनुवाद ४:४; ३०:१९, २०) आपला विश्वास धर्मत्यागी शिकवणींच्या वाऱ्यामुळे हेलकावे खाणाऱ्या जहाजाप्रमाणे असणार नाही. (इफिसकर ४:१३, १४) आणि नांगरासमान असलेल्या आपल्या आशेमुळे आपण यहोवाचे सेवक या नात्याने जीवनातील वादळात तग धरून राहू शकतो.
प्रीती व पवित्र आत्म्याने प्रेरित
१३, १४. (अ) फक्तच आशेचा नांगर पुरेसा का नाही? (ब) आपल्याला यहोवाची पवित्र सेवा करण्यास कोणत्या गोष्टीने प्रवृत्त केले पाहिजे व का?
१३ एखाद्या ख्रिश्चनाचा यहोवाची सेवा करण्यामागचा हेतू, परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा मिळण्यापुरताच असला तर तो नवीन व्यवस्था येईपर्यंत कदापि प्रगती करणार नाही. त्याने नांगरासमान असलेल्या त्याच्या आशेला स्वतःच्या जीवनात एक स्थिर घटक बनवले पाहिजे आणि यास व त्याच्या विश्वासास प्रीतीच्या प्रेरक शक्तीची जोड असली पाहिजे. पौलाने असे लिहून या वस्तुस्थितीवर जोर दिला: “विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.”—१ करिंथकर १३:१३.
१४ पवित्र सेवा करण्यामागची प्रेरक शक्ती यहोवावर आपली मनःपूर्वक प्रीती ही असली पाहिजे; त्याने आपल्याला दाखवलेल्या अमर्याद प्रेमापोटी आपण ही प्रीती दाखवली पाहिजे. प्रेषित योहानाने लिहिले: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली. पहिल्याने त्याने आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.” (१ योहान ४:८, ९, १९) स्वतःचे तारण व्हावे या स्वार्थापोटी नव्हे तर त्याच्या पवित्र नामाच्या पवित्रीकरणाची साक्ष देण्याकरता व त्याच्या धार्मिक सार्वभौमत्त्वाच्या समर्थनासाठी आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करू.
१५. यहोवाबद्दल आपल्याला असलेल्या प्रीतीचा संबंध त्याच्या सार्वभौमत्त्वाच्या प्रश्नाशी कसा निगडित आहे?
१५ आपल्याला परादीसमध्ये जायचे आहे म्हणून नव्हे तर आपण यहोवावर प्रीती करतो म्हणून त्याची सेवा करावी असे तो अपेक्षितो. बायबलवर आधारित एन्सायक्लोपिडिआ शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टीa (इंग्रजी) मध्ये म्हटले आहे: “यहोवाचे सार्वभौमत्त्व आणि त्याची सृष्टी त्याला देत असलेला पाठिंबा प्रामुख्याने प्रीतीवर अवलंबून आहे या वस्तुस्थितीने तो आनंदित होतो. त्याच्या उत्तम गुणांबद्दल आणि तो धार्मिक असल्यामुळे त्याच्या सार्वभौमत्त्वावर प्रीती करणारे, इतर कशापेक्षाही त्याच्या सार्वभौमत्त्वाला पसंत करणारेच त्याला आवडतात. (१ करिंथ. २:९) स्वतंत्र राहण्यापेक्षा त्याच्या सार्वभौमत्त्वाच्या अधीन राहून त्याची सेवा करायला त्यांना आवडते. हे यासाठी कारण त्यांना त्याचे ज्ञान आहे व स्वतःपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असलेली त्याची प्रीती, न्याय आणि बुद्धी यांची त्यांना जाण आहे. (स्तोत्र. ८४:१०, ११)”—खंड २, पृष्ठ २७५.
१६. येशूबद्दलची प्रीती आपल्या जीवनात प्रेरक शक्ती कशी आहे?
१६ ख्रिस्ती या नात्याने आपण येशूने आपल्यावर प्रीती केल्यामुळे आपणही त्याच्यावर प्रीती करतो. पौल अशाप्रकारे तर्क करतो: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५) आपले आध्यात्मिक जीवन, आपला विश्वास आणि आपली आशा ज्यावर बांधण्यात आली आहे तो पायाच ख्रिस्त आहे. ख्रिस्त येशूबद्दलची प्रीती विशेषपणे, वादळासमान असलेल्या परीक्षांत आपल्या आशेला आधार देते आणि आपला विश्वास स्थिर करते.—१ करिंथकर ३:११; कलस्सैकर १:२३; २:६, ७.
१७. यहोवा आपल्याला कोणती अद्भुत शक्ती देतो व प्रेषितांची कृत्ये १:८ आणि इफिसकर ३:१६ मध्ये त्याचे महत्त्व कशाप्रकारे दाखवण्यात आले आहे?
१७ ख्रिस्ती या नात्याने देव आणि त्याचा पुत्र यांच्याबद्दलची प्रीती आपल्या जीवनामध्ये प्रमुख प्रेरक शक्ती असली तरी, यहोवा आपल्याला आणखी काही तरी देतो ज्यामुळे आपण त्याच्या सेवेत पुढे जाण्यास प्रवृत्त होतो, शक्ती मिळवतो आणि बळकट होतो. ती त्याची कार्यकारी शक्ती अर्थात त्याचा पवित्र आत्मा आहे. “आत्मा” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे ते इब्री आणि ग्रीक शब्द हवेच्या शक्तिशाली हालचालीला, जसे की जोरदार वाऱ्याला सूचित करतात. पौलाने ज्या जहाजांतून प्रवास केला त्याप्रकारची जहाजे त्यांच्या इष्टस्थळी पोंहचण्याकरता वाऱ्याच्या अदृश्य शक्तीवर अवलंबून होती. तसेच, आपले विश्वासरूपी तारू यहोवाच्या सेवेत पुढे जात राहण्याकरता आपल्याला प्रीती आणि देवाच्या अदृश्य कार्यकारी शक्तीचे कार्य यांची गरज आहे.—प्रेषितांची कृत्ये १:८; इफिसकर ३:१६.
आपल्या इष्टस्थळाच्या दिशेने!
१८. भवितव्यामध्ये आपल्या विश्वासाच्या कोणत्याही परीक्षा घेतल्या जातील तेव्हा काय आपल्याला टिकवून ठेवील?
१८ नवीन व्यवस्थीकरणापर्यंत पोहंचेतोवर आपल्या विश्वासाची व प्रीतीची कडक परीक्षा होऊ शकते. पण, यहोवाने आपल्याला “स्थिर व अढळ” नांगर, अर्थात अद्भुत आशा दिली आहे. (इब्री लोकांस ६:१९; रोमकर १५:४, १३) विरोध किंवा इतर परीक्षांचा आपल्यावर मारा होतो तेव्हा आपल्या आशेद्वारे आपण सुरक्षितपणे नांगर टाकला असेल तरच आपण निभावू शकतो. एक वादळ येऊन गेल्यावर दुसरे वादळ येण्याआधीच आपण आपली आशा दृढ व आपला विश्वास बळकट करण्याचा दृढनिश्चय करू या.
१९. आपण आपले विश्वासरूपी तारू कशाप्रकारे हाकत नेऊन देवाच्या नवीन जगातील बंदरावर पोहंचू शकतो?
१९ “जीवाचा नांगर” याचा उल्लेख करण्याआधी पौल म्हणाला: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था [“वेग वाढवणे,” NW तळटीप] शेवटपर्यंत व्यक्त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री लोकांस ६:११, १२) यहोवा आणि त्याचा पुत्र यांच्याबद्दलच्या प्रीतीने प्रवृत्त होऊन व पवित्र आत्म्याच्या शक्तीने आपण आपले विश्वासरूपी तारू देवाच्या वाग्दत्त नवीन जगातील बंदरापर्यंत हाकू या.
[तळटीपा]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
उजळणीद्वारे
◻ आपल्या विश्वासाबद्दल पौलाने कोणता इशारा दिला आहे?
◻ काहींचे आध्यात्मिक तारू कसे फुटले आहे व काहींची गती कशाप्रकारे मंदावत आहे?
◻ आपल्या विश्वासाबरोबर कोणता ईश्वरी गुण असला पाहिजे?
◻ देवाच्या वाग्दत्त नवीन जगातील बंदरापर्यंत जाण्यास काय आपली मदत करील?
[१६ पानांवरील चित्र]
जीवनाच्या वादळांत टिकण्यासाठी आपले विश्वासरूपी तारू मजबूत बांधले पाहिजे
[१७ पानांवरील चित्र]
आपले विश्वासरूपी तारू मोडू शकते
[१८ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती या नात्याने आशा आपल्या जीवनाचा नांगर आहे