वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ९/८ पृ. ८-११
  • तुमच्या मुलांना बहरू द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या मुलांना बहरू द्या
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आदर्श वातावरण
  • शाबासकी
  • संभाषण
  • राग येतो तेव्हा
  • सुव्यवस्थितपणा आणि आदर
  • आध्यात्मिक गरजा पुरवणे
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • प्रेमाने शिस्त लावण्याचे महत्त्व
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ९/८ पृ. ८-११

तुमच्या मुलांना बहरू द्या

कित्येक आईवडील बाल संगोपनासंबंधी प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी आकाशपाताळ एक करतात; पण खरं पाहता ही सारी उत्तरं त्यांना स्वतःच्या घरातच मिळण्यासारखी असतात. असंख्य कुटुंबांपाशी एक बायबल आहे, पण बाल संगोपनासाठी त्याचा उपयोग केला जाण्याऐवजी ते कुठंतरी धूळ खात पडलेलं असतं.

कौटुंबिक जीवनात बायबलचा एक मार्गदर्शक म्हणून उपयोग करण्याविषयी कित्येकजण आज साशंक दृष्टिकोन बाळगतात. ते कालबाह्‍य, जुनाट विचारांचे किंवा अवाजवीपणे कडक आहे असे समजून काहीजण त्याचा विचार मनातून काढून टाकतात. पण प्रामाणिकपणे परीक्षण केल्यास तुम्हाला दिसून येईल की बायबल हे कुटुंबांकरता एक व्यावहारिक पुस्तक आहे. कसे, ते आपण पाहू या.

आदर्श वातावरण

मुलांना ‘आपल्या मेजाभोवती असलेल्या जैतुनाच्या रोपांसारखे’ समजावे असे बायबल वडिलांना सांगते. (स्तोत्र १२८:३, ४) काळजीपूर्वक निगा न घेण्यात आल्यास, आणि योग्य पोषण, माती आणि पाणी न मिळाल्यास कोवळी रोपं मोठी होऊन फलद्रूप वृक्षे बनणारच नाहीत. तशाचप्रकारे, यशस्वी बाल संगोपनाकरता परिश्रम आणि निगा आवश्‍यक आहे. प्रगल्भतेप्रत विकास होण्याकरता मुलांना एका कल्याणकारक वातावरणाची गरज आहे.

अशी वातावरण निर्मिती करण्यासाठी अगदी पहिला आवश्‍यक घटक म्हणजे प्रेम—पती आणि पत्नी यांमध्ये तसेच आईवडील आणि मुलांमध्ये. (इफिसकर ५:३३; तीत २:४) कित्येक कौटुंबिक सदस्य एकमेकांवर प्रेम तर करतात पण हे प्रेम व्यक्‍त करण्याची गरज आहे असे त्यांना मुळीच वाटत नाही. पण जरा विचार करा: जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पत्रं लिहून ठेवलीत पण त्यांवर पत्ता लिहिला नाही, तिकीट लावले नाही आणि ती कधी पाठवलीही नाहीत तर तुम्ही तुमच्या मित्राच्या संपर्कात आहात असे तुमचे म्हणणे योग्य ठरेल का? बायबल देखील असेच सांगते की खरे प्रेम म्हणजे हृदयाला सुखावणारी केवळ एक भावना नव्हे, तर खरे प्रेम शब्दांतून आणि कृतींतून व्यक्‍त होते. (योहान १४:१५ आणि १ योहान ५:३ पडताळा.) देवाने आपल्यापुढे आदर्श ठेवला, त्याने आपल्या पुत्राबद्दलचे प्रेम या शब्दांतून व्यक्‍त केले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”—मत्तय ३:१७.

शाबासकी

आईवडिलांनी आपल्या मुलांबद्दलचे हे प्रेम कसे दाखवावे? पहिले पाऊल म्हणजे, चांगले गुण शोधा. मुलांचे दोष अगदी सहज काढता येतात. त्यांचा पोरकटपणा, अनुभवाचा अभाव, आणि स्वार्थी प्रवृत्ती उठताबसता कितीतरी गोष्टींमधून व्यक्‍त होत असते. (नीतिसूत्रे २२:१५) पण मुलं दररोज कितीतरी चांगल्या गोष्टी देखील करतात. तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करणार? देव केवळ आपल्या दोषांवरच अडून राहत नाही तर आपण केलेल्या चांगल्या गोष्टी तो आठवणीत ठेवतो. (स्तोत्र १३०:३; इब्री लोकांस ६:१०) आपणही आपल्या मुलांशी अशाचरितीने वागले पाहिजे.

एका तरुणाने म्हटले: “घरी किंवा शाळेत काही साध्य केल्याबद्दल—उभ्या आयुष्यात कधी आमच्या घरी कोणत्याही प्रकारची शाबासकी मिळाल्याचे मला आठवत नाही.” आईवडिलांनो, आपल्या मुलांच्या या गरजेकडे दुर्लक्ष करू नका! सर्व मुलांना त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल वेळोवेळी शाबासकी देणे आवश्‍यक आहे. असे केल्यास, आपल्या हातून कधीच काही चांगले घडू शकत नाही अशी मुलांची पक्की धारणा बनून, ती ‘खिन्‍नावस्थेत’ लहानाची मोठी होण्याचा जो धोका असतो तो टाळता येतो.—कलस्सैकर ३:२१.

संभाषण

मुलांवर प्रेम व्यक्‍त करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे याकोब १:१९ येथील सल्ला अनुसरणे, जेथे म्हटले आहे: ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे, रागास मंद असावे.’ तुम्ही तुमच्या मुलांना, मनातले बोलायला लावून त्यांचे म्हणणे मन लावून ऐकता का? आपले बोलणे संपते न संपते की आईबाबांचे भाषण सुरू होईल, किंवा आपले मत काय ते कळल्यावर आईबाबांना राग येईल अशी तुमच्या मुलांना खात्री असल्यास, कदाचित ते आपल्या भावना मनातच कोंडून ठेवतील. पण तुम्ही मन लावून ऐकाल अशी त्यांना खात्री असल्यास, ते नक्कीच तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करतील.—पडताळा नीतिसूत्रे २०:५.

पण त्यांनी व्यक्‍त केलेल्या भावना अयोग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे, अशावेळेस काय करावे? रागावून प्रतिक्रिया दाखवणे, म्हणजे लांबलचक भाषण देणे किंवा शिक्षा करणे अशावेळेस योग्य ठरेल का? काहीवेळा मुलांच्या पोरकट भावनातिरेकांसमोर ‘बोलावयास धीमे, रागास मंद असणे’ फारच जड जाते हे कबूल आहे; पण आपल्या मुलांशी वागण्यासंबंधाने पुन्हा एकदा देवाचे उदाहरण लक्षात घ्या. त्याच्या मुलांना मनातल्या खऱ्‍या भावना व्यक्‍त करायला भीती वाटावी अशाप्रकारच्या दहशतीचे वातावरण तो निर्माण करतो का? नाही! स्तोत्र ६२:८ म्हणते: “अहो लोकहो, सर्वदा [देवावर] भाव ठेवा. त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे.”

म्हणूनच तर सदोम आणि गमोरा या नगरांचा नाश करण्याच्या देवाच्या निर्णयाबद्दल अब्राहामाला काळजी वाटत होती तेव्हा, “या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो. . . . सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?,” असे आपल्या स्वर्गीय पित्याला म्हणण्याचे तो धाडस करू शकला. यहोवाने त्याला फटकारले नाही; उलट त्याने अब्राहामाचे ऐकून घेतले आणि त्याला धीर दिला. (उत्पत्ति १८:२०-३३) देव विलक्षण सहनशीलतेने आणि कोमलतेने आपल्या मुलांशी वागतो; ती अत्यंत अवाजवी आणि असमंजस भावना व्यक्‍त करतात तेव्हा देखील.—योना ३:१०-४:११.

पालकांनी देखील असे एक वातावरण निर्माण करावे, ज्यात मुलांना आपल्या सर्वात अंतरस्थ भावना, मग त्या कितीही धक्कादायक असल्या तरीसुद्धा त्या व्यक्‍त करण्यास भीती वाटू नये. म्हणून भावनांच्या भरात तुमचे मूल भडाभड काहीही बोलू लागले, तरीही, ऐकून घ्या. रागावण्याऐवजी, तुमच्या मुलांच्या भावनांची दखल घ्या आणि त्यांना असे वाटण्यामागची मूळ कारणे त्यांच्याकडून काढून घ्या. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित असे म्हणता येईल: ‘तू अमुक-अमुकवर भलताच रागावलेला दिसतोस. काय झालं, सांग बघू.’

राग येतो तेव्हा

अर्थात, यहोवाइतके सहनशील कोणतेच पालक नसतील. आणि कधीकधी मुलंही खरंच आईवडिलांच्या सहनशक्‍तीचा अंत पाहतात. तुम्हालाही कधी तुमच्या मुलांवर राग आल्यास, पालक म्हणून आपण नाकाबील आहोत या विचाराने वाईट वाटून घेऊ नका. काहीवेळा, तुमचे रागावणे अगदी यथायोग्य असेल. देव स्वतः यथायोग्यपणे आपल्या मुलांवर, अगदी प्रिय वाटणाऱ्‍या मुलांवर देखील रागावतो. (निर्गम ४:१४; अनुवाद ३४:१०) तथापि, त्याच्या वचनात आपल्याला शिकवण्यात आले आहे की आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे.—इफिसकर ४:२६.

हे कसे करता येईल? काही क्षण दुसरीकडे लक्ष केंद्रित केल्यास तुमचा राग थंड व्हायला मदत मिळेल. (नीतिसूत्रे १७:१४) आणि लक्षात असू द्या, शेवटी हे मूल आहे! त्याच्याकडून प्रौढांसारख्या वागणुकीची किंवा प्रगल्भ विचारांची अपेक्षा करू नका. (१ करिंथकर १३:११) तुमचे मूल विशिष्ट प्रकारे का वागते हे समजून घेतल्यास, तुमचा राग थोडा मंदावू शकेल. (नीतिसूत्रे १९:११) वाईट कृती करणे आणि मुळातच वाईट असणे यामध्ये जो जमीन अस्मानाचा फरक आहे याचा कधीही विसर पडू देऊ नका. वाईट आहेस असे म्हणून मुलांवर आरडाओरडा केल्यास, ती कदाचित असा विचार करू लागतील की ‘चांगले होण्याचा प्रयत्न करण्यात तरी काय अर्थ आहे?’ पण प्रेमाने चुकीची दुरुस्ती केल्यास, पुढच्या वेळेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मुलांना मदत होईल.

सुव्यवस्थितपणा आणि आदर

पालकांपुढे असणारे एक फार मोठे आव्हान म्हणजे मुलांमध्ये सुव्यवस्थितपणाची आणि आदराची जाणीव निर्माण करणे. आजच्या स्वैराचारी जगात, मुलांवर कोणतेही निर्बंध लावणे चुकीचे आहे की काय असे अनेक पालकांना वाटू लागले आहे. बायबल याचे उत्तर देते: “छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतिसूत्रे २९:१५) काहींना “छडी” हा शब्द खटकतो कारण यात बाल दुर्व्यवहाराचा अर्थ असावा असा त्यांचा ग्रह असतो. पण हे खरे नाही. “छडी” याकरता वापरलेला हिब्रू शब्द मेंढपाळाच्या काठीच्या संदर्भात होता; मेंढपाळ या काठीच्या साहाय्याने आपल्या मेंढरांना दिशा दाखवतो—त्यांच्यावर वार करीत नाही.a त्याअर्थी छडी शिस्तीचे प्रतीक आहे.

बायबलमध्ये, शिस्त लावण्याचा अर्थ मुळात शिकवणे असा होतो. म्हणूनच तर मूळ हिब्रू भाषेतील नीतिसूत्रांत जवळजवळ चार वेळा ‘शिस्तीचा बोध ऐक’ या अर्थाचे शब्दप्रयोग वापरण्यात आले आहेत. (नीतिसूत्रे १:८; ४:१; ८:३३; १९:२७) चांगले केल्याने त्याचे चांगले प्रतिफळ मिळते तर वाईट केल्याने त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात हे मुलांना कळून आले पाहिजे. ज्याप्रकारे शाबासकीसारख्या चांगल्या प्रतिफळांतून चांगले वागण्याचे प्रोत्साहन मिळते तशाच प्रकारे शिक्षा ही दोषदर्शक धडे मनावर बिंबवण्यासाठी सहायक ठरते. (पडताळा अनुवाद ११:२६-२८.) देवाने आपल्या लोकांना सांगितले की तो त्यांना “योग्य” शासन करील, म्हणून शिक्षा देण्याच्या बाबतीत आईवडिलांनी देवाच्या उदाहरणाचे अनुकरण केल्यास बरे होईल. (तिरपे वळण आमचे.) (यिर्मया ४६:२८) काही मुलं नुसते खडसावून बोलल्याने वठणीवर येत नाहीत. काहींसाठी तर त्याहूनही कडक उपाय करावे लागतात. पण मुलांना ज्यामुळे दीर्घकालीन भावनात्मक किंवा शारीरिक अपाय होऊ शकेल अशा प्रकारच्या शिक्षेला नक्कीच “योग्य” म्हणता येणार नाही.

संतुलित शिस्त लावणे म्हणजे मुलांना सीमा आणि मर्यादांची ओळख करून देणे. यांपैकी कित्येक देवाच्या वचनात स्पष्टपणे घालून दिलेल्या आहेत. बायबल खासगी जमिनीभोवती असलेल्या सीमांचे महत्त्व ओळखण्याची शिकवण देते. (अनुवाद १९:१४) हिंसाचाराची आवड धरणे, किंवा मुद्दामहून कुणाला त्रास देणे बायबलमध्ये अयोग्य ठरवले आहे त्याअर्थी त्यात शारीरिक मर्यादा देखील घालून दिलेल्या आहेत. (स्तोत्र ११:५; मत्तय ७:१२) शिवाय त्यात लैंगिक मर्यादा आहेत, ते अगम्यगमनाचे खंडन करते. (लेवीय १८:६-१८) वैयक्‍तिक आणि भावनिक मर्यादांनाही ते मान्यता देते, कारण ते इतर कुणाबद्दल तिरस्करणीय शब्द वापरून न बोलण्याची आणि इतर कोणत्याही प्रकारचे अपमानास्पद संभाषण न करण्याची ताकीद देते. (मत्तय ५:२२) मुलांना या सीमा आणि मर्यादांविषयी—शब्दांतून आणि कृतीतूनही शिकवणे, कुटुंबात एक कल्याणकारक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे.

कुटुंबात सुव्यवस्थितपणा आणि आदरणीयता कायम राखण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे कौटुंबिक भूमिका समजून घेणे. आज कित्येक कुटुंबांत, या भूमिका अस्पष्ट आहेत किंवा त्यांविषयी गोंधळ आहे. काही कुटुंबांत, आई किंवा वडील आपल्या दुःसह समस्यांविषयी आपल्या मुलांजवळ बोलतात; अर्थात, या समस्या सोडवण्याची क्षमता मुलांमध्ये नसते. इतर कुटुंबांत मुलांचंच राज्य चालू दिलं जातं, संबंध कुटुंबासाठी तीच निर्णय घेतात. हे अयोग्य आणि नुकसानकारक आहे. लहान मुलांच्या—शारीरिक, भावनिक किंवा आध्यात्मिक गरजा पुरवण्याचे कर्तव्य आईवडिलांचे आहे, याचे उलट नव्हे. (२ करिंथकर १२:१४; १ तीमथ्य ५:८) याकोबाचे उदाहरण लक्षात घ्या, लहान मुलांना प्रवास कठीण जाऊ नये म्हणून त्याने आपल्या समस्त कुटुंबाच्या आणि सोबतच्या प्रवाशांच्या प्रवासाच्या व्यवस्थेत फेरबदल केला. त्याने त्यांच्या मर्यादा समजून घेतल्या आणि तो त्यानुसार वागला.—उत्पत्ति ३३:१३, १४.

आध्यात्मिक गरजा पुरवणे

कुटुंबात एक कल्याणकारक वातावरण कायम ठेवण्यासाठी आध्यात्मिकतेसारखी दुसरी महत्त्वाची गोष्ट नाही. (मत्तय ५:३) आध्यात्मिकतेच्या बाबतीत मुलं अत्यंत सक्षम असतात. त्यांच्या मनांत असंख्य प्रश्‍न असतात: आपण का जगतो? जग, प्राणी, झाडंझुडपं, समुद्र, हे सारे कुणी निर्माण केले? माणसं का मरतात? मग काय होतं? चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का सोसाव्या लागतात? या प्रश्‍नांच्या यादीला जणू अंतच नसतो. खरं तर आईवडीलच सहसा असल्या गोष्टींचा विचार करण्याची तसदी घेत नाहीत.b

आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण देण्यासाठी वेळ काढण्याचा बायबल आईवडिलांना आग्रह करते. हे प्रशिक्षण म्हणजे आईवडील आणि मुलांमधील नित्याचं संभाषण असल्याचे बायबल उबदार शब्दांत वर्णन करते. आईवडील आपल्या मुलांना त्यांच्यासोबत कुठे जाताना, घरात एकत्र बसले असताना, रात्री झोपण्यापूर्वी—जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा, देवाविषयी आणि त्याच्या वचनाविषयी शिकवू शकतात.—अनुवाद ६:६, ७; इफिसकर ६:४.

बायबल अशाप्रकारच्या आध्यात्मिक कार्यक्रमाची केवळ शिफारसच करत नाही तर त्यासाठी आवश्‍यक असणारे साहित्य देखील ते पुरवते. शेवटी, तुम्ही वरती उल्लेखलेल्या तुमच्या मुलांच्या प्रश्‍नांची कशी उत्तरं देणार? बायबलमध्ये ही उत्तरं आहेत. ही उत्तरं स्पष्ट, लक्षवेधक आहेत आणि ती या निराशाजनक जगात एक मोठी आशा देतात. विशेष म्हणजे, बायबलमधील सुबुद्धी आत्मसात केल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सर्वात भक्कम आधार देऊ शकाल, आजच्या गोंधळविणाऱ्‍या काळात सर्वात खात्रीलायक मार्गदर्शन. हे तुम्ही त्यांना दिल्यास ती नक्कीच बहरतील—आता आणि भविष्यातही.

[तळटीपा]

a सावध राहा! (इंग्रजी) सप्टेंबर ८, १९९२, पृष्ठे २६-७ पाहा.

b कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाची रचना कौटुंबिक अभ्यासाच्या दृष्टीने करण्यात आली आहे आणि यात विवाह आणि बाल संगोपनावरती बायबलमधले व्यावहारिक मार्गदर्शन देण्यात आले आहे. हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुमच्या मुलांना वेळोवेळी विशिष्ट गोष्टीसाठी शाबासकी देण्याचा प्रयत्न करा

[९ पानांवरील चौकट/चित्र]

मुलांना बहरण्यास साहाय्य करणे

• आपल्यावर प्रेम केलं जातं आणि आपली गरज आहे असे त्यांना वाटू शकेल असे सुरक्षित वातावरण निर्माण करा

• वेळोवेळी त्यांना शाबासकी द्या. विशिष्ट गोष्टींविषयी प्रशंसा करा

• ऐकून घेण्यास तत्पर असा

• राग अनावर होतो तेव्हा दुसरीकडे लक्ष वळवा

• स्पष्ट, वारंवार न बदलणाऱ्‍या सीमा आणि मर्यादा घालून द्या

• मुलांमधील प्रत्येकाच्या वैयक्‍तिक गरजेनुसार शिस्त लावा

• वाजवीपेक्षा तुमच्या मुलांकडून अधिक अपेक्षा करू नका

• देवाच्या वचनाच्या नियमित अभ्यासाद्वारे आध्यात्मिक गरजा भागवा

[१० पानांवरील चौकट]

काळाच्या दोन पावलं पुढे

बायबलच्या शिकवणुकींच्या साहाय्याने प्राचीन इस्राएलातील लोकांना त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांच्या तुलनेत कितीतरी सरस दर्जाचे कौटुंबिक जीवन जगता आले. इतिहासकार ॲल्फ्रेड एडरशाइम सांगतात: “इस्राएलच्या सीमेपलीकडे, आपण ओळखतो त्या रूपात कौटुंबिक जीवन किंवा कुटुंब नावाची काही वस्तू होती असेही म्हणता येणार नाही.” उदाहरणार्थ, प्राचीन रोमन कुटुंबात वडिलाची पूर्ण सत्ता असे. त्याला आपल्या मुलांना विकण्याचा, मजूर म्हणून त्यांना राबवण्याचा, एवढेच काय तर त्यांना मृत्यूदंड देण्याचाही अधिकार होता—आणि हे सारे, कोणतीही शिक्षा होण्याच्या भीतीशिवाय.

काही रोमन लोकांना यहुद्यांचे आपल्या मुलांना प्रेमळपणे वागवणे विचित्र वाटे. खरं तर, पहिल्या शतकातील रोमन इतिहासकार टॅसिटस याने आपल्या लिखाणात एका ठिकाणी यहुद्यांची असे म्हणून निर्भत्सना केली आहे, की त्यांच्या “चालीरिती विकृत आणि किळसवाण्या” आहेत. पण त्याने मान्य केले: “त्यांच्यात नवजात अर्भकाला मारून टाकणे हा गुन्हा आहे.”

बायबलमधील आदर्श उदात्त होता. त्यानुसार यहुद्यांना शिकवण्यात आले होते, की मुलं बहुमूल्य आहेत—स्वतः देवाकडून मिळालेला वारसा या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहायचे होते—आणि त्यानुषंगाने त्यांना वागवायचे होते. (स्तोत्र १२७:३) स्पष्टपणे कित्येक यहुदी या मार्गदर्शनाचे पालन करीत होते. त्यांची भाषा देखील या संबंधाने पुष्कळ काही सांगून जाते. एडरशाइम सांगतात की पुत्र आणि कन्या या शब्दांशिवाय प्राचीन हिब्रू भाषेत मुलं या अर्थाचे, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांना लागू होणारे नऊ वेगवेगळे शब्द होते. उदाहरणार्थ, अद्याप अंगावरचे पिणाऱ्‍या बाळासाठी एक शब्द आणि अंगावर पिण्याचे सुटलेल्यासाठी देखील एक शब्द होता. त्यापेक्षा किंचित मोठ्या मुलांसाठी एक शब्द होता, या शब्दात मूल कणखर आणि मजबूत होत असल्याचा ध्वनितार्थ होता. शिवाय, मोठ्या तरुणांसाठी एक शब्द होता ज्याचा अक्षरशः ‘स्वतःला मोकळे करून घेणे’ असा अर्थ होता. एडरशाइम म्हणतात: “निश्‍चितच, बालकांच्या विकासातील प्रत्येक टप्प्याला सचित्र संबोधन देण्याइतपत बारकाईने बालजीवनाचे निरीक्षण करणाऱ्‍या या लोकांना स्वतःच्या मुलांविषयी खूपच जिव्हाळा असावा.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा