वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. १८-२३
  • नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आमची जगाच्या जीवनाबद्दल कशी प्रतिक्रिया आहे
  • जीवनात कोण किंवा काय प्रथम येते?
  • भव्य मुक्‍ततेसाठी प्रेमळ तयारी
  • निर्णायक हालचाल इतकी तातडीची का आहे
  • दृष्टीपथात असलेल्या मुक्‍ततेसाठी मिळणारी ईश्‍वरी मदत
  • लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा
    बायबलमधून शिकू या!
  • लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • मुक्‍तता निकट येते तसे धीर धरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. १८-२३

नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा

“लोटाच्या बायकोची आठवण करा.”—लूक १७:३२.

१. आमचा आजचा अभ्यास ईश्‍वरी मुक्‍ततेच्या कोणत्या ऐतिहासिक उदाहरणाची ठळकपणे आम्हासमोर मांडणी करतो, व ते उदाहरण आम्हाला कसे लाभदायक ठरू शकते?

नोहा व त्याचे कुटुंब यांची यहोवाने ज्याप्रकाराने अद्‌भूत मुक्‍तता घडवून आणली त्याची माहिती दिल्यावर प्रेषित पेत्राने आणखी एका ऐतिहासिक उदाहरणाचा उल्लेख केला. येथे त्याने सदोम व गमोरा ही नगरे बेचिराख झाली तेव्हा धार्मिक लोटाचा जो बचाव झाला त्याकडे लक्ष वेधविले. ते आम्हाला २ रे पेत्र २:६-८ मध्ये वाचावयास मिळते. त्याची सविस्तर माहिती आपल्या लाभासाठी बचावून ठेवण्यात आली आहे. (रोमकर १५:४) ती मुक्‍तता घडली तेव्हा जे घडले ते आपल्या अंतःकरणी बिंबवल्यास आम्हाला देवाच्या नव्या जगात बचावून जाण्यासाठी साहाय्य मिळू शकेल.

आमची जगाच्या जीवनाबद्दल कशी प्रतिक्रिया आहे

२. सदोम व गमोरामधील लोकांच्या कोणत्या वर्तणुकीमुळे त्यांना देवाकडून नाश लाभला?

२ ती शहरे व त्यातील रहिवाश्‍यांचा नाश का झाला? प्रेषित पेत्र त्याचे कारण “कामातुर वर्तन” असे देतो. (२ पेत्र २:७) ही संज्ञा ज्या ग्रीक शब्दावरुन अनुवादित आहे त्याचा अर्थ लक्षात घेतल्यास हे दिसते की, सदोम व गमोरा येथील लोक वाईट कर्मात अशा पद्धतीने गढले होते की, ज्यामुळे कायदा व अधिकार यांविषयी अगदीच अनादर तसेच उद्दामपणा दिसून येत होता. यहुदाचे पत्र ७ वे वचन म्हणते की, त्यांनी ‘जारकर्म करून विजातीय अंगाशी संग केला.’ त्यांच्या कर्माचा अति वाईटपणा हा तेव्हा दिसला, जेव्हा सदोम “नगरातल्या लोकांनी, आबालवृद्धांनी” लोटाचे घर वेढले व त्यांनी लोटाला त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांना सदोमच्या माणसांना आपली विपरीत लैंगिक भूक शमविण्यासाठी बाहेर काढण्यासाठी मागणी केली. लोटाने त्यांची विपरीत मागणी धुडकावून लावली तेव्हा त्यांनी त्याचा आरडाओरडा करून निषेध केला.—उत्पत्ती १३:१३; १९:४, ५, ९.

३. (अ) सदोमातील भ्रष्ट वातावरणात लोट व त्याचे कुटुंब कसे राहावयास आले? (ब) सदोमातील लोकांच्या कामातुर वर्तणुकीविषयी लोटाला काय वाटत होते?

३ सदोमच्या जवळ असणारा सुपीक प्रदेश बघून लोट आरंभाला येथे स्थलांतरीत झाला होता; आणि काही काळातच त्याने शहरात आपले घर बनविले. (उत्पत्ती १३:८-१२; १४:१२; १९:१) पण शहरातील लोकांच्या घाणेरड्या आचाराशी तो सहमत नव्हता; शिवाय शहारातील लोकांनी देखील त्याला आपल्यातील एक असे समजले नव्हते; कारण लोट व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनात सहभाग घेतला नव्हता. २ पेत्र २:७, ८ म्हणते त्याप्रमाणे, ‘लोट अधार्मिक लोकांच्या कामातुर वर्तनाने त्रासलेला होता.’ आणि “त्यांची अधार्मिक कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा धर्मशील जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.” अशा या परिस्थितीने लोटापुढे खडतर परीक्षा उभी केली होती; कारण तो स्वतः धार्मिक मनुष्य असल्यामुळे त्याने अशा वर्तणुकीचा धिक्कार केला होता.

४. (अ) आजची परिस्थिती ही प्राचीन सदोमाप्रमाणे कशी आहे? (ब) आपण धार्मिक लोटासारखे आहोत तर सध्याच्या भ्रष्ट परिस्थितीविषयी आपल्याला कसे वाटते?

४ आज आमच्या काळात देखील मानवी समाजाची नैतिक पातळी ढासळत आहे. आज कित्येक देशात अधिकाधिक लोक विवाहपूर्व तसेच विवाहाबाह्‍य लैंगिक आचारात समाविष्ट होतात. शाळेतील युवक देखील अशा आचारात गढले आहेत व जे त्यांच्याबरोबर सहभागी होत नाहीत अशांची ते थट्टा करतात. पुरुषगामी तर उघडपणे आपली ओळख देत आहेत व ते शहरात रस्त्यावर मोर्चे काढून आपणास मान्यता मिळावी या मागण्या करीत आहेत. पाळकांनीही या चैनबाजीत स्वतःला लोटले आहे. पुरुषगामी व जारकर्मी यांना चर्चमध्ये अधिकृतपणे नेमणूका मिळत आहेत. तरीपण खरे पाहता, वृत्त माध्यमानेही वेळोवेळी कळविले त्याप्रमाणे पाळकांच्या वर्गात देखील पुरुषगामी, जारकर्मी व व्यभिचारी आढळणे ही आज आश्‍चर्याची गोष्ट राहिली नाही. वस्तुतः काही धार्मिक पुढाऱ्‍यांना दुसऱ्‍या शहरात स्थलांतरित करण्यात आले व लैंगिक विवादामुळे जबरदस्तीने राजीनामे देण्यास भाग पाडले गेले. अशा या दुष्टपणाला नीतीमत्तेचे चाहते कधीही मंजूरी देणार नाहीत; ते “वाईटाचा वीट” मानतात. (रोमकर १२:९) देवाची सेवा करीत आहोत असा दावा करीत असलेले लोक, देवाच्या नामास निंदा आणतात आणि अजाण लोकांना धर्माचरण सोडावयास प्रवृत्त करतात अशावेळी या धार्मिक लोकांना मोठे दुःख होते.—रोमकर २:२४.

५. यहोवाने सदोम व गमोरा यांचा केलेला नाश यामुळे आम्हाला कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर मिळते?

५ वर्षानुवर्षे ही परिस्थिती अधिकच खालावत आहे. याचा कधी शेवट होईल का? होय, होईल. यहोवाने प्राचीन सदोम व गमोराचे जे केले ते हे स्पष्ट दाखविते की, तो त्याच्या नियुक्‍त समयी आपला न्यायदंड बजावणार. तो दुष्टांचा समूळ नाश करील, पण आपल्या निष्ठावंत सेवकांचा बचाव करील.

जीवनात कोण किंवा काय प्रथम येते?

६. (अ) लोटाच्या कन्यांशी विवाहबद्ध होणाऱ्‍या जावयांकडून आम्हाला कोणता समयोचित धडा शिकावयास मिळतो? (ब) या भावी जावयांनी दाखविलेल्या वृत्तीमुळे लोटाच्या मुलींची कशी परीक्षा झाली?

६ जे ईश्‍वरी भक्‍ती खरेपणाने प्रदर्शित करतात अशांचाचा बचाव होईल. याबद्दल सदोम व गमोरा यांचा नाश होण्याआधी यहोवाच्या दिव्यदूताने लोटास जे म्हटले होते ते विचारात घ्या. तो म्हणालाः “तुझे आणखी येथे कोणी आहेत काय? तुझा जावई, तुझे पुत्र, तुझ्या कन्या आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यांस या स्थानातून बाहेर काढ. कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत.” त्यामुळे लोटाने आपल्या भावी जावयांस हे सांगितले. तो त्यांना सारखी विनंती करू लागला व म्हणालाः “उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण यहोवा या नगराचा नाश करणार आहे.” त्या जावयांचे लोटाच्या घराशी जे संबंध होते त्यामुळे त्यांना बचावाची चांगली संधि होती. पण याविषयी त्यांना व्यक्‍तीगतपणे निर्णय घ्यावयाचा होता. यहोवास आज्ञाधारक आहोत याचा दृश्‍य पुरावा त्यांनी दाखविणे जरुरीचे होते. पण याउलट, या माणसांना आपला भावी सासरा “विनोद करीत आहेसे भासले.” (उत्पत्ती १९:१२-१४) काय घडले हे जेव्हा लोटाच्या मुलींना कळले तेव्हा त्यांना कसे वाटले असावे याचा विचार करा. त्यामुळे त्यांची देवासंबंधाची निष्ठा पणाला लागली.

७, ८. (अ) देवदूतांनी लोटाला आपल्या कुटुंबाला घेऊन पळून जाण्यास सांगितले तेव्हा त्याची कोणती प्रतिक्रिया होती, पण ती सूज्ञपणाची का नव्हती? (ब) बचाव होण्यासाठी लोट व त्याच्या कुटुंबासाठी काय जरुरीचे होते?

७ सकाळी पहाट होताच देवदूत लोटाला घाई करू लागले. ते म्हणालेः “उठ! तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन नीघ. नाहीतर या नगराच्या पातकात तू भस्म होशील.” पण लोट “दिरंगाई करू लागला.” (उत्पत्ती १९:१५, १६) का? कोणत्या गोष्टीमुळे तो खोळंबून होता? जिने त्याला प्रथम सदोममध्ये येण्यास भुरळ पाडली होती, ती भौतिक आस्था का? तो जर या आस्थेला जडून राहिला असता तर सदोमबरोबर त्याचाही नाश झाला असता.

८ त्या देवदूतांनी कळवळ्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांना आपल्या हातांनी धरून नगराच्या बाहेर काढले. सरहद्दीवर आल्यावर यहोवाच्या दिव्यदूताने त्यांना आज्ञापिलेः “आपला जीव घेऊन पळ. मागे वळून पाहू नको व तळवटीत कोठे थांबू नको. डोंगराकडे पळ काढ. नाहीतर तू भस्म होशील.” तरीही लोट दिरंगाई करीत राहिला. सरतेशेवटी त्याला सांगण्यात आले की जवळच असलेल्या एका ठिकाणी त्याने जावे तेव्हा त्याने आपल्या कुटुंबासहित पळ काढला. (उत्पत्ती १९:१७-२२) आता आणखी विलंब नको होता; आज्ञापालन महत्त्वाचे होते.

९, १०. (अ) आपला पती सोबत आहे ही गोष्ट लोटाच्या बायकोला बचावाची पुरेशी हमी देणारी नव्हती ती का? (ब) लोटाची बायको ठार झाली तेव्हा लोट व त्याच्या मुलींवर आणखी कोणती परीक्षा आली?

९ तथापि, सदोममधून बाहेर पडले तरी अद्याप पूर्ण मुक्‍तता घडली नव्हती. उत्पत्ती १९:२३-२५ आम्हास सांगतेः “लोट सोअरात येऊन पोहंचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झाला. तेव्हा यहोवाने सदोम व गमोरा यांवर गंधक व अग्नि यांचा वर्षाव आकाशातून केला. आणि ती नगरे, आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने विध्वंस केला.” पण लोटाची बायको कोठे होती?

१० ती आपल्या पतीबरोबर पळत आली होती. पण तिच्या मनात, पती जे करीत होता त्याविषयी सहमतीदर्शक वृत्ती होती का? सदोमामधील अनैतिकता तिला प्रिय होती असे तिच्याकडून दिसत नव्हते. पण आपले घर व त्यातील चीजवस्तु याविषयी तिचे जे मन जडले होते त्यापेक्षा तिला देवाविषयी अधिक बळकट प्रेम होते का? (पडताळा लूक १७:३१, ३२.) येथे दबाव आल्यावर तिच्या अंतःकरणातील भावना दिसून आल्या. ते सोअरनजीक आले होते व जणू आता त्या शहरात प्रवेश करणार होते, पण तेव्हाच लोटाच्या बायकोने आज्ञा मोडली व तिने मागे वळून बघितले. आणि पवित्र शास्त्र अहवाल म्हणतो त्याप्रमाणे “ती मिठाचा खांब झाली.” (उत्पत्ती १९:२६) आता लोट व त्याच्या मुलींवर निष्ठावंतपणाची परीक्षा आली. लोटाला आपल्या मृत बायकोविषयीचे प्रेम तसेच मुलींना आपल्या मृत आईविषयी वाटणारा जिव्हाळा, ज्याने ही विपत्ती घडवून आणली होती त्या देवाच्या प्रेमापेक्षा अधिक बळकट होता का, हा तो प्रश्‍न होता. आपले जीवश्‍च-कंठश्‍च असे कोणी अवज्ञाकारी झाले तरी ते आता देवाच्या आज्ञा पाळून चालणार होते का? यहोवावर पूर्ण भाव ठेवून ते पुढे जात राहिले, त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

११. यहोवा जी मुक्‍तता प्रदान करतो त्याविषयी आम्हाला काय शिकायला मिळते?

११ होय, ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांना परीक्षेतून कसे वाचवावे हे यहोवाला कळते. खऱ्‍या भक्‍तीत ऐक्याने एकवटलेल्या सबंध कुटुंबाची कशी मुक्‍तता घडवावी हे त्याला चांगले कळते; तसेच वैयक्‍तीकांचीही कशी मुक्‍तता करावी हेही त्याला समजते. जेव्हा ते खरेच त्याजवर प्रीती दाखवतात तेव्हा तो त्यांच्याबरोबर सहानुभूतीने वागतो. “तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो लक्षात ठेवितो.” (स्तोत्रसंहिता १०३:१३, १४) पण त्याच्याकडील मुक्‍तता ही केवळ ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍यांसाठीच, ज्यांची भक्‍ती अस्सल आहे व ज्यांचे आज्ञापालन निष्ठावंतपणाविषयीचा प्रत्यय देते त्यांच्यासाठीच आहे.

भव्य मुक्‍ततेसाठी प्रेमळ तयारी

१२. ज्या मुक्‍ततेची इतक्या उत्कंठतेने अपेक्षा धरली जात आहे त्या आधी यहोवा कोणती प्रेमळ तयारी पूर्ण करणार होता?

१२ यहोवाने नोहा व लोट यांच्या दिवसात जे घडवून आणले त्यामुळे दुष्टता सदासर्वदा नाहीशी झाली नाही. शास्त्रवचने म्हणतात, त्याप्रमाणे तो एक केवळ भावी गोष्टींचा नमुना होता. ते घडून येण्याआधी, आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांच्या लाभासाठी बरेच काही करावे असे यहोवाच्या मनात होते. तो, या पृथ्वीवर आपल्या एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला पाठविण्याचा विचार राखून होता. येथे येशू देवाच्या नामावर लागलेला कलंक आपल्या निष्ठावंत मार्गाक्रमणाद्वारे दूर करणार होता. असे हे आचरण आदाम या परिपूर्ण मानवाकरवी घडून येण्याची तसेच देवाला संपूर्ण निष्ठा प्रदर्शित करण्याची अपेक्षा होती. पण हीच गोष्ट आता येशू अधिक कठीण परिस्थितीत दाखवणार होता. येशू आपले परिपूर्ण मानवी जीवन यज्ञार्पण असे देणार होता की, ज्यामुळे विश्‍वास धरणाऱ्‍या आदामाच्या संततीला, आदामाने जे गमावले ते परत मिळू शकणार होते. यानंतर निष्ठावंत लोकांमधून एक “लहान कळपा”ची निवड देव, त्याने ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात असावे आणि सर्व राष्ट्रांतून गोळा करण्यात आलेला “एक मोठा लोकसमुदाय” याची निवड नवा मानवी समाजाचा पाया या अर्थी करण्यासाठी करणार होता. (लूक १२:३२; प्रकटीकरण ७:९) हे संपन्‍न झाल्यावर मग, देव जलप्रलय तसेच सदोम व गमोरा यांच्या नाशाकरवी चित्रित असणारी भव्य मुक्‍तता घडवून आणणार होता.

निर्णायक हालचाल इतकी तातडीची का आहे

१३, १४. पेत्राने लोट तसेच नोहाच्या काळातील अभक्‍त लोकाच्या नाशाचा उदाहरण म्हणून वापर केला याकरवी आम्हाला काय शिकायला मिळते?

१३ देववचनाचा अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्यांना हे माहीत आहे की, यहोवाने आपल्या सेवकांसाठी पुष्कळ वेळा मुक्‍ततेची कार्ये घडवून आणली. पण प्रत्येक बाबतीत पवित्र शास्त्र असे म्हणत नाही की, ‘त्या काळी जसे होते तसे मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा असेल.’ मग, प्रेषित पेत्राने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली हे दोन विशिष्ट प्रसंग का वर्णिले? लोट तसेच नोहा यांच्या दिवसात जे घडले त्यात कोणता विशिष्ट वेगळेपणा होता?

१४ याविषयीची निश्‍चित सूचना आपल्याला यहुदाच्या पत्राच्या ७व्या वचनात सापडते, जेथे आम्ही असे वाचतोः “सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे . . . सार्वकालिक दंड भोगीत उदाहरणादाखल पुढे ठेविली आहेत.” होय, त्या शहरातील अत्यंत कटु पापाच्या अपराध्यांचा नाश हा सार्वकालिक नमुन्याचा होता व तसाच सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या शेवटी दुष्टांचा नाश होणार आहे. (मत्तय २५:४६) नोहाच्या काळातील जलप्रलय हा देखील सार्वकालिक न्यायाच्या संदर्भात उल्लेखिण्यात आला आहे. (२ पेत्र २:४, ५, ९-१२; ३:५-७) अशाप्रकारे नोहा व लोट यांच्या काळातील अभक्‍त लोकांच्या नाशाकरवी यहोवाने हे दाखविले आहे की, जे अधर्म आचरतात अशांचा तो अनंतकालिक नाश करून आपल्या सेवकांची मुक्‍तता घडवून आणील.—२ थेस्सलनीकाकर १:६-१०.

१५. (अ) जे वाईट कर्मे करण्यात गुंतले आहेत अशांसाठी आज कोणता तातडीचा इशारा घोषित केला जात आहे? (ब) जे अधर्म आचरीत राहतात अशांवर न्याय का बजावण्यात येईल?

१५ दुष्टांचा नाश यहोवाला आनंद देत नाही. तसेच त्याच्या सेवकांनाही त्यामुळे आनंद मिळत नाही. आपल्या साक्षीदारांमार्फत यहोवा लोकांना आर्जवितोः “फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा. . . . तुम्ही का मरता?” (यहेज्केल ३३:११) तरी देखील, लोक जेव्हा ही प्रेमळ विनवणी मानीत नाही तर उलट ते आपल्या स्वार्थी जीवनाच्या मार्गात गढून जातात तेव्हा यहोवा आपल्या पवित्र नामाच्या आदरासाठी तसेच अभक्‍त लोकांच्या हातून आपल्या निष्ठावंत लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्या कारणामुळे त्यांजवर न्यायदंड आणील.

१६. (अ) भाकित करण्यात आलेली मुक्‍तता ही अत्यंत समीप आहे हे आम्हाला आत्मविश्‍वासाने का वाटावे? (ब) ही मुक्‍तता कशापासून होईल व कोठे निरवील?

१६ देवाने मुक्‍तता घडवून आणण्याची वेळ अगदी जवळ आली आहे! येशूने आपल्या उपस्थितीविषयी तसेच युगाच्या समाप्तीविषयी सांगितलेली लक्षणे व घटना आज स्पष्ट दिसत आहेत. त्या चिन्हाची पहिली लक्षणे ७५ पेक्षा अधिक वर्षे आधी दिसू लागली; आणि येशूने म्हटले की, या अभक्‍त जगावर देवाच्या न्यायाची अमलबजावणी होईपर्यंत “ही पिढी” नाहीशी होणार नाही. जेव्हा यहोवा हे ठरवील की, सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याच्या संदेशाची घोषणा पृथ्वीवर राहणाऱ्‍या रहिवाशांना पुरेशा प्रमाणात घोषित करण्यात आली आहे तेव्हा या दुष्ट जगाचा अंत येईल व त्या बरोबरच ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांची मुक्‍तता घडेल. (मत्तय २४:३-३४; लूक २१:२८-३३) मुक्‍तता, पण कशापासून? त्या परीक्षांपासून ज्या त्यांना दुष्टांच्या हातून मिळत होत्या; व त्या परिस्थितीपासून जी त्यांना धार्मिकतेचे चाहते असल्यामुळे नकोशी व त्रस्त करणारी वाटत होती. ती मुक्‍तता त्यांना नव्या जगात घेऊन जाणारी असेल जेथे आजार व मरण या गोष्टी भूतकाळात जमा झालेल्या असतील.

दृष्टीपथात असलेल्या मुक्‍ततेसाठी मिळणारी ईश्‍वरी मदत

१७. (अ) आम्ही स्वतःला कोणता गहन प्रश्‍न विचारला पाहिजे? (ब) आम्ही नोहाप्रमाणेच “ईश्‍वरी भया”ने भारावलेलो आहोत या पुरावा आम्हाला कसा देता येईल?

१७ आता आम्ही प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारुन पाहिला पाहिजे की, ‘मी त्या देवाच्या कृत्यासाठी तयार आहे का?’ जर आम्ही स्वतःचाच आत्मविश्‍वास बाळगत असलो किंवा आम्हाला नीतीमत्तेच्या स्वतःच्याच कल्पना आहेत तर मग आम्ही तयार नाहीत. पण तेच, नोहाप्रमाणे आम्ही “ईश्‍वरी भयाने” भारावून गेलो तर मग, यहोवा आम्हाला जे मार्गदर्शन देत आहे त्याचा आम्ही विश्‍वासाने स्वीकार करीत आहोत असे दिसेल.—इब्रीयांस ११:७.

१८. ईश्‍वरशासित अधिकारास खरा आदर दाखविण्याचे शिकून घेणे हे आमची नव्या जगात मुक्‍तता घडवून आणण्यासाठी जी तयारी होत आहे त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे हे कसे?

१८ यहोवा आजही जे संरक्षण देत आहे त्याचा अनुभव घेणाऱ्‍यांच्या आनंदी स्थितीचे सुंदर वर्णन करताना स्तोत्रसंहिता ९१:१, २ असे म्हणतेः “जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. मी यहोवाला म्हणतोः ‘तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, मी तुजवर भाव ठेवतो.’” येथे असा एक गट आहे ज्याला यहोवा, जणू एखादा पक्षी जसे पंखाखाली आपल्या पिलांना सुरक्षित ठेवतो त्याप्रमाणे, संरक्षण देत आहे. त्या लोकांचा पूर्ण भाव यहोवावर आहे. तो परात्पर, सर्वसमर्थ देव आहे अशी ते कबुली देतात. यामुळेच ते ईश्‍वरी अधिकाराचा आदर करतात व हा अधिकार पित्याकरवी वा “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याकरवी दाखविला जातो, त्याच्या अधीन राहतात. (मत्तय २४:४५-४७) हे आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत खरे आहे का? आम्हीही नोहाप्रमाणेच ‘यहोवा आम्हाला जे आज्ञापितो ते करण्याचे’ शिकून घेतो व त्याच्या मार्गाप्रमाणे करून दाखवितो का? (उत्पत्ती ६:२२) तसे आहे तर मग, यहोवा आमची नव्या धार्मिक जगात मुक्‍तता घडवून नेण्यासाठी जी तयारी करीत आहे त्याला प्रतिसाद देत आहोत असा त्याचा अर्थ होईल.

१९. (अ) आमचे लाक्षणिक अंतःकरण काय आहे, आणि आम्ही त्याकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे? (नीतीसूत्रे ४:२३) (ब) जागतिक मोहपाशांच्या बाबतीत आमची प्रतिक्रिया कशी असावी याविषयी आम्हाला लोटाच्या उदाहरणाकडून कसा लाभ मिळविता येईल?

१९ या तयारीमध्ये आमच्या लाक्षणिक अंतःकरणाकडेही लक्ष देण्याचे समाविष्ट आहे. “यहोवा हृदये पारखितो.” (नीतीसूत्रे १७:३) आम्ही बाहेरून कसे आहोत ते नव्हे तर आम्ही आतून, अंतःकरणापासून कशा व्यक्‍ती आहोत ते जमेस धरले जाते हे तो आम्हास समजण्याची मदत देतो. आम्ही जगाप्रमाणे हिंसाचारात किंवा अनैतिकतेमध्ये स्वतःला गुरफटून घेत नसलो तरी या गोष्टींनी रोमांचित होऊ न देण्याविषयीची दक्षता राखली पाहिजे. अशी ही अधार्मिक कामे होत असल्याचे पाहून आम्हाला लोटाप्रमाणे त्रस्त वाटले पाहिजे. जे वाईटाचा वीट मानतात ते त्यात गुरफटण्याचे मार्ग शोधणार नाहीत. तथापि, जे त्याचा वीट मानीत नाहीत ते कदाचित शारीरिकरित्या सहभागी होण्याचे इच्छिणार नाहीत, मात्र मानसिकरित्या त्यांना त्यामध्ये सहभागी व्हावेसे वाटेल. या कारणास्तव, “अहो यहोवावर प्रीती करणाऱ्‍यांनो, वाईटाचा द्वेष करा.”—स्तोत्रसंहिता ९७:१०.

२०. (अ) पवित्र शास्त्र जडवादी जीवनाविषयी कोणकोणत्या प्रकाराने इशारा देते? (ब) जडवादाविषयी पवित्र शास्त्राने सांगितलेला महत्त्वपूर्ण धडा आम्ही अंतःकरणी लावून घेतला आहे की नाही हे आम्ही कसे सांगू शकतो?

२० आम्ही केवळ अनैतिक वागणूकच नव्हे तर जडवादी जीवनाक्रमणही टाळावे यासाठी यहोवा आम्हाला प्रेमळपणे शिक्षण देत आहे. ‘आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्याने तृप्त असावे,’ असे त्याचे वचन सूचना करते. (१ तीमथ्य ६:८) तारुच्या आत शिरल्यावर नोहा व त्याच्या पुत्रांना आपले घर त्यागावे लागले. याचप्रमाणे आपले जीवन वाचवावे यासाठी लोट व त्याच्या कुटुंबाला सुद्धा आपल्या घर व त्यातील मालकी वस्तु सोडाव्या लागल्या. तर मग, आम्ही आपले चित्त कोठे लावले आहे? “लोटाच्या बायकोची आठवण करा.” (लूक १७:३२) येशूने आर्जविलेः “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याची खटपट करा.” (मत्तय ६:३३) हे आम्ही करतो का? जर यहोवाचे नीतीमान दर्जे आम्हाला मार्गदर्शित करीत आहेत आणि त्याच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे ही आमच्या जीवनातील सर्वप्रथम गोष्ट आहे तर मग, नव्या जगासाठी ज्या लोकांची मुक्‍तता होत आहे त्यांच्या तयारीमध्ये आम्ही स्वतःला समाविष्ट करीत आहोत व त्यानुसार प्रतिसाद देत आहोत असे होईल.

२१. यहोवाने जे मुक्‍ततेचे अभिवचन दिले आहे ते लवकरच पूर्ण होईल असा आत्मविश्‍वास आपण का योग्यपणे बाळगू शकतो?

२१ येशूच्या राज्य सत्तेतील उपस्थितीच्या चिन्हांची पूर्णता बघणाऱ्‍या ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांना त्याने म्हटलेः “नीट उभे राहा व आपली डोकी वर करा; कारण तुमची मुक्‍तता समीप आली आहे.” (लूक २१:२८) तुम्ही ते चिन्ह त्याच्या प्रत्येक तपशीलासह पाहिले आहे का? तर, यहोवाने मुक्‍तता घडवून आणण्याचे जे अभिवचन दिले आहे त्याच्या पूर्णतेविषयी आपला आत्मविश्‍वास कायम ठेवा; कारण ती मुक्‍तता अगदी जवळ आली आहे! “ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांना परीक्षेतून सोडवावे . . . हे यहोवाला कळते,” याविषयी पूर्ण खात्री राहू द्या.—२ पेत्र २:९.

तुम्ही काय शिकला?

◻ जगाच्या जीवनाक्रमणाविषयी आम्ही लोटाप्रमाणेच कशी प्रतिक्रिया दाखवावी?

◻ सदोमातून पळ काढत असताना लोट व त्याच्या कुटुंबाला कोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागले?

◻ पेत्राने वापरलेली उदाहरणे, आम्ही आत्ताच यहोवाच्या बाजूला दृढपणे उभे राहिले पाहिजे यावर कसा जोर देतात?

◻ यहोवा आपल्या लोकांची मुक्‍ततेसाठी तयारी करीत असताना तो कोणते महत्वपूर्ण धडे शिकवीत आहे?

[२० पानांवरील चित्रं]

पक्षी आपल्या पिलांना जसे आपल्या पंखाखाली सुरक्षित ठेवतात त्याप्रमाणे देवाच्या लोकांचे त्याच्याद्वारे संरक्षण केले जात आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा