जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
१-७ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना ७-८
“इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे”:
इन्साइट-१ ४९७ ¶३
मंडळी
इस्राएलमध्ये ज्यांना अधिकारी किंवा प्रमुख म्हणून नेमलं होतं, ते लोकांच्या वतीने काम कारायचे. (एज १०:१४) त्यामुळे उपासना मंडप स्थापन केल्यावर “कुळांच्या प्रमुखांनी” देवासमोर अर्पणं वाहिली. (गण ७:१-११) तसंच, नहेम्याच्या दिवसात जेव्हा करार करण्यात आला, तेव्हा याजक, लेवी आणि इतर ‘अधिकाऱ्यांनी’ त्या करारावर मोहर लावून तो करार पक्का केला. (नहे ९:३८–१०:२७) इस्राएली लोक अरण्यात प्रवास करत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये ‘इस्राएली लोकांच्या प्रधानांपैकी, मंडळीतून निवडलेले, तसंच नावाजलेले’ काही लोक होते. यांच्यापैकीच २५० लोकांनी कोरह, दाथान, अबीराम आणि ओन यांना मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध जाण्यासाठी साथ दिली. (गण १६:१-३) मोशेला ‘इस्राएल लोकांचा भार एकट्याला उचलावा लागू नये’ म्हणून देवाने त्याला इस्राएलच्या वडीलजनांमधून ७० लोकांना निवडायला सांगितलं. हे लोक अधिकारी म्हणून मोशेला मदत करणार होते. (गण ११:१६, १७, २४, २५) लेवीय ४:१५ मध्ये ‘इस्राएली लोकांच्या वडीलजनांबद्दल’ सांगितलं आहे. असं दिसतं, की हे वडीलजन इस्राएली लोकांच्या गटांचे प्रतिनिधी, वंशांचे प्रधान, न्यायाधीश आणि अधिकारी म्हणून काम करायचे.—गण १:४, १६; यहो २३:२; २४:१.
इन्साइट-२ ७९६ ¶१
रऊबेन
इस्राएलच्या छावणीत रऊबेन वंशाच्या लोकांची वस्ती उपासना मंडपाच्या दक्षिणेला होती. त्यांच्या एका बाजूला शिमोन वंशाचे लोक तर दुसऱ्या बाजूला गाद वंशाचे लोक होते. इस्राएलची छावणी जायला निघायची, तेव्हा यहूदा, इस्साखार आणि जबुलून वंशांचा गट सर्वात पुढं असायचा. आणि मग त्यांच्या मागोमाग रऊबेन, शिमोन आणि गाद या तीन वंशांचा गट जायचा. ज्यामध्ये सर्वात पुढे रऊबेन वंश असायचा. (गण २:१०-१६; १०:१४-२०) उपासना मंडपाचं उद्घाटन करण्यात आलं तेव्हा, याच क्रमाने इस्राएलच्या वंशांनी आपापली अर्पणं आणली होती.—गण ७:१, २, १०-४७.
गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
८:२५, २६. लेव्यांच्या सेवेसाठी पात्र पुरुषांना नेमले जाते याची खात्री करण्यासाठी व वृद्ध पुरुषांच्या वयाचा विचार करून त्यांना बंधनकारक कामातून निवृत्त होण्याची आज्ञा देण्यात आली होती. परंतु ते स्वेच्छेने इतर लेव्यांना मदत करू शकत होते. आज राज्य उद्घोषक होण्यापासून कोणी निवृत्त होऊ शकत नसला तरी, या नियमामागचे तत्त्व आपल्याला एक मौल्यवान धडा शिकवते. वाढत्या वयामुळे एखादा ख्रिस्ती बांधव अथवा भगिनी विशिष्ट जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नसेल तर तो किंवा ती आपल्या कुवतीप्रमाणे सेवेत भाग घेऊ शकतो/शकते.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ ८३५
प्रथम जन्मलेला, प्रथमपुत्र
इस्राएलांच्या कुळांमध्ये सगळ्यात आधी जन्मलेले मुलगे पुढे आपापल्या कुळांचे प्रमुख बनणार होते. त्यामुळे एका अर्थाने ते संबंध इस्राएल राष्ट्रालाच सूचित करत होते. यहोवाने अब्राहामसोबत जो करार केला होता त्यामुळे हे राष्ट्र जणू यहोवासाठी प्रथम जन्मलेलं राष्ट्र होतं. म्हणून त्याने या संपूर्ण राष्ट्रालाच “माझा प्रथमपुत्र” असं म्हटलं. (निर्ग ४:२२) यहोवाने इजिप्तमध्ये १० व्या पिडेच्या वेळी इस्राएलच्या सर्व पहिल्या जन्मलेल्या मुलांचा जीव वाचवला होता. म्हणून “माणसांमधला आणि प्राण्यांमधला पहिला जन्मलेला प्रत्येक नर” माझ्यासाठी पवित्र असेल अशी आज्ञा यहोवाने त्यांना दिली होती. (निर्ग १३:२) अशा प्रकारे पहिला जन्मलेला प्रत्येक मुलगा देवासाठी पवित्र होता.
८-१४ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना ९-१०
“यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो”
इन्साइट-१ ३९८ ¶३
छावणी
इस्राएलांची छावणी जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची तेव्हा त्याच्यांत किती जबरदस्त व्यवस्था होती, ते दिसून यायचं. जोपर्यंत उपासना मंडपावर ढग येऊन थांबलेला असायचा, तोपर्यंत इस्राएलची छावणी तिथे तळ देऊन राहायची. आणि जेव्हा ढग उपासना मंडपावरून हालायचा तेव्हा तेही आपला तळ तिथून हलवायचे. “यहोवाच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोक निघायचे आणि यहोवाच्या आज्ञेप्रमाणेच ते छावणी करायचे.” (गण ९:१५-२३) आणि त्यासाठी चांदीच्या दोन कर्ण्यांचा वापर करून इस्राएली लोकांना एकत्र करण्यासाठी आणि तळ हलवण्यासाठी इशारा दिला जायचा. (गण १०:२, ५, ६) एका खास चढत्या-उतरत्या स्वरात कर्णे वाजवले जायचे, तेव्हा इस्राएलची छावणी जायला निघायची. ही गोष्ट सर्वात पहिल्यांदा दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात [इ.स. १५१२ मध्ये] २० व्या दिवशी झाली होती. सर्वात पुढे यहोवाच्या कराराची पेटी असायची आणि त्यामागून इस्राएलच्या तीन वंशांचा पहिला गट असायचा. यामध्ये सर्वात आधी यहूदाचा वंश आणि त्यामागे इस्साखार आणि जबुलूनचा वंश असायचा. मग त्यांच्यामागे गेर्षोनी आणि मरारी लोक मंडपाचं साहित्य वाहून न्यायचे. त्यांच्यामागे रऊबेन, शिमोन आणि गाद वंशाचा गट असायचा, ज्यात रऊबेनचा वंश पुढे असायचा. मग पवित्र ठिकाणाचं सामान उचलून नेणारे कहाथी लोक असायचे आणि त्याच्यामागे एफ्राईमच्या छावणीचा तीन वंशांचा गट असायचा, ज्यात मनश्शेचा वंश आणि बन्यामीनचा वंश होता. सर्वात शेवटी दानच्या छावणीचा गट असायचा, आणि त्याच्या मागोमाग आशेर आणि नफतालीच्या वंशाचे लोक होते.—गण १०:११-२८.
देव तुम्हाला मार्गदर्शित करत असल्याचा पुरावा तुम्ही पाहता का?
देव देत असलेल्या मार्गदर्शनाची आपण कदर करतो हे आपण कसे दाखवू शकतो? प्रेषित पौलाने असे म्हटले: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.” (इब्री १३:१७) असे करणे नेहमीच सोपे नसेल. उदाहरणार्थ, स्वतःला मोशेच्या दिवसांतील एका इस्राएली व्यक्तीच्या जागी ठेवा. अशी कल्पना करा, तुम्ही काही वेळ चालल्यानंतर मेघस्तंभ एका ठिकाणी थांबतो. तो किती वेळ या ठिकाणी थांबेल? एक दिवस? एक आठवडा? अनेक महिने? तुम्हाला प्रश्न पडतो, ‘बांधलेले सर्व सामान पुन्हा बाहेर काढावे का?’ सुरुवातीला कदाचित तुम्ही फक्त गरजेच्या वस्तू बाहेर काढाल. पण काही दिवसांनंतर, तुम्हाला लागणारी प्रत्येक वस्तू बांधलेल्या सामानातून तुम्हाला शोधून काढावी लागते; त्यामुळे अगदी वैतागून बांधलेले सर्व सामान तुम्ही बाहेर काढता. पण तेवढ्यात, मेघस्तंभ वर उठत असल्याचे तुम्हाला दिसते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व सामान बांधावे लागते! असे करणे नक्कीच इतके सोपे व सोयीचे नसेल. तरीसुद्धा, “जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत.”—गण. ९:१७-२२.
तर मग, आपल्याला देवाकडून मार्गदर्शन मिळते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो? आपण लगेच त्याचे पालन करतो का? की आपण आपल्या जुन्या सवयींप्रमाणेच सर्व गोष्टी करत राहतो? गृह बायबल अभ्यास संचालित करणे, परदेशी भाषा बोलणाऱ्या लोकांना प्रचार करणे, नियमितपणे कौटुंबिक उपासनेत सहभाग घेणे, इस्पितळ संपर्क समितीला सहकार्य करणे आणि अधिवेशनांत आपले आचरण योग्य ठेवणे या सगळ्या बाबतींत आपल्याला ज्या नवीन मार्गदर्शक सूचना मिळतात त्यांच्याशी आपण परिचित आहोत का? आपल्याला दिलेला सल्ला आपण स्वीकारतो तेव्हादेखील आपण दाखवून देतो, की देवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाची आपल्याला कदर आहे. आपल्यासमोर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहत नाही, तर यहोवा व त्याच्या संघटनेद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनावर आपण अवलंबून राहतो. एखादे मोठे वादळ येते तेव्हा एक मूल संरक्षणासाठी जसे आपल्या पालकांकडे धाव घेते, तसेच या जगातील समस्यांच्या मोठ्या वादळाचा तडाखा आपल्याला बसतो तेव्हा आपण यहोवाच्या संघटनेत संरक्षण मिळवतो.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ १९९ ¶३
एकत्र येण्याची तरतूद
एकत्र येण्याचं महत्त्व. इस्राएली लोकांना एकत्र येऊन आपली उपासना करता यावी म्हणून यहोवाने काही तरतूदी केल्या होत्या. या तरतूदींचं महत्त्व वल्हाडण सण साजरा करण्याबद्दल त्याने दिलेल्या आज्ञेवरून समजतं. कारण त्यात म्हटलं होतं की जर एखादा माणूस शुद्ध असेल आणि तो प्रवासाला गेलेला नसेल आणि तरीही त्याने वल्हाडण सण साजरा करायचं टाळलं तर त्याला ठार मारलं जावं. (गण ९:९-१४) जेव्हा हिज्किया राजाने यहूदा आणि इस्राएलच्या सर्व रहिवाशांना वल्हांडण सण साजरा करण्यासाठी एकत्र बोलवलं, तेव्हा आपल्या अधिकाऱ्यांकडून पाठवलेल्या पत्रात त्याने असं म्हटलं होतं: “इस्राएलच्या लोकांनो! . . . इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे परत या। . . . आपल्या वाडवडिलांसारखं अडेलपणे वागू नका. यहोवाच्या अधीन व्हा आणि जे मंदिर यहोवाने कायमसाठी पवित्र केलंय, तिथे येऊन तुमच्या देवाची उपासना करा. म्हणजे तुमच्यावर भडकलेला त्याचा क्रोध शांत होईल। . . . कारण तुमचा देव यहोवा हा करुणामय आणि दयाळू आहे. म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत आलात, तर तो तुमच्यापासून आपलं तोंड फिरवणार नाही.” (२इत ३०:६-९) जर मुद्दामहून कोणी एकत्र येऊन यहोवाची उपासना करायचं टाळत असेल तर याचा अर्थ त्याने यहोवाकडे पाठ फिरवली आहे असा व्हायचा. आज ख्रिश्चनांना वल्हांडणासारखे सण पाळायची गरज नाही. पण देवाच्या लोकांनी एकत्र येण्याचं टाळू नये अशी विनंती पौलने केली आहे. त्याने म्हटलं: “एकमेकांचा विचार करून आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या. तसंच, काहींची रीत आहे त्याप्रमाणे आपण एकत्र येणं सोडू नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावं आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो, तसतसं हे आणखी जास्त करावं.”—इब्री १०:२४, २५.
१५-२१ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना ११-१२
“कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा”
ऐकून विसरणारे होऊ नका
२० खऱ्या ख्रिश्चनांपैकी अधिकांश जण लैंगिक अनैतिकतेच्या मोहाचा यशस्वीपणे प्रतिकार करत आहेत. पण आपण कधीही अशाप्रकारे वागू नये, जेणेकरून आपल्याला कुरकूर करण्याची सवय लागेल आणि त्यामुळे यहोवा आपल्यावर अप्रसन्न होईल. पौल आपल्याला सल्ला देतो: “त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.” (१ करिंथकर १०:९, १०) इस्राएल लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध, एवढेच काय तर देवाविरुद्धही कुरकुर केली; यहोवाने चमत्कारिकरित्या पुरवलेल्या मान्नाला त्यांनी तुच्छ लेखले. (गणना १६:४१; २१:५) त्यांच्या जारकर्मामुळे यहोवा त्यांच्यावर जितका क्रोधित झाला होता त्यापेक्षा तो त्यांच्या कुरकुर करण्यामुळे काही कमी क्रोधित झाला का? बायबल सांगते, की कुरकुर करणारे बरेचजण सर्पदंशाने मारले गेले. (गणना २१:६) या आधी एका प्रसंगी कुरकुर करणाऱ्या १४,७०० बंडखोरांचा नाश करण्यात आला होता. (गणना १६:४९) तेव्हा, आपण कधीही यहोवाच्या तरतुदींचा अनादर करून त्याच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये.
‘कुरकुर करू नका’
७ इस्राएल लोकांची मनोवृत्ती किती बदलली होती! ईजिप्तमधून व तांबड्या समुद्रातून सुटका झाल्यानंतर याच इस्राएलांनी आनंदाने यहोवाची स्तुती-गीते गाऊन आभार व्यक्त केले होते. (निर्गम १५:१-२१) पण आता जेव्हा त्यांच्यावर रानात कसल्याही सुखसोयींविना राहायची पाळी आली होती व कनानी लोकांची त्यांना भीती वाटू लागली तेव्हा ते लगेच कुरकुर करू लागले. आभारी मनोवृत्तीच्या ऐवजी त्यांची तक्रारी वृत्ती झाली होती. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल यहोवाचे आभार मानण्याऐवजी, ते यहोवाला दोष देत होते. त्यांच्यामते यहोवा त्यांच्याशी रास्तपणे वागत नव्हता. कुरकुर करण्याद्वारे त्यांनी, यहोवाने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल घोर कृतघ्नता दाखवली. म्हणूनच तर यहोवा त्यांच्याविषयी असे म्हणाला: “ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार?”—गणना १४:२७; २१:५.
इन्साइट-२ ७१९ ¶४
वादविवाद
कुरकुर. कुरकुर केल्यामुळे दुसरे निराश होतात आणि त्यांचं मन दुखावलं जातं. इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर काही काळातच इस्राएली लोकांनी यहोवाविरुद्ध कुरकुर केली. मोशे आणि अहरोनद्वारे यहोवा त्यांना जे मार्गदर्शन देत होता, त्याबद्दल ते तक्रार करू लागले. (निर्ग १६:२, ७) त्यांच्या कुरकुर करण्याच्या सवयीमुळे मोशे इतका दुःखी झाला की त्याने “मला आत्ताच मारून टाक” अशी विनंती देवाला केली. (गण ११:१३-१५) कुरकुर करण्याच्या वृत्तीमुळे एखाद्याचा जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो. इस्राएली लोक मोशेविरूद्ध कुरकुर करत होते, तेव्हा ते जणू आपल्या अधिकाराविरूद्ध बोलून बंड करत आहेत, असं यहोवाला वाटलं. (गण १४:२६-३०) चुका शोधत राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी आपला जीव गमावला.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-२ ३०९
मान्ना
स्वरूप. मान्ना पांढऱ्या रंगाचा आणि “दिसायला धण्यासारखा” होता. तो “झाडाच्या डिंकासारखा” एक पारदर्शक पदार्थ होता आणि त्याचा आकार मोत्यासारखा होता. त्याची चव “मध घालून केलेल्या पोळीसारखी” लागायची. इस्राएली लोक तो गोळा करायचे आणि जात्यावर दळल्यानंतर किंवा उखळीत कुटल्यानंतर त्याचं पीठ भांड्यात घालून उकळायचे किंवा त्यापासून भाकरी बनवायचे.—निर्ग १६:२३, ३१; गण ११:७, ८.
२२-२८ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना १३-१४
“विश्वासामुळेच आपण धैर्य दाखवू शकतो”:
विश्वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान व्हा
५ यहोशवा आणि कालेब हे दोन हेर मात्र वचनयुक्त देशात प्रवेश करण्यास उत्सुक होते. ते म्हणाले: कनानी लोक “आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे. त्यांची भीती बाळगू नका.” (गणना १४:९) यहोशवा आणि कालेब विनाकारण आशा बाळगत होते का? मुळीच नाही. इस्राएल राष्ट्रांतील इतर लोकांप्रमाणे त्यांनी देखील, यहोवाने दहा पीडांद्वारे शक्तिशाली ईजिप्त देश आणि त्यांच्या देवांची नालस्ती केली होती हे पाहिले होते. यहोवाने फारो आणि त्याच्या सैन्याचा लाल समुद्रात कसा नाश केला होता हे देखील त्यांनी पाहिले होते. (स्तोत्र १३६:१५) तेव्हा, ते दहा हेर आणि त्यांच्या अफवांवर विश्वास करणारे लोक जी भीती दाखवत होते ती रास्त नव्हती. या लोकांची ही मनोवृत्ती पाहून यहोवाला अतिशय वाईट वाटले; तो अगदी कळवळून म्हणाला: “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत?”—गणना १४:११.
६ यहोवाने या लोकांची मूळ समस्या काय होती ती दाखवून दिली. त्यांच्यात विश्वासाची कमी असल्यामुळे त्यांची भित्रट मनोवृत्ती झाली होती. होय, विश्वास आणि धैर्य या गुणांचा परस्परांशी जवळून संबंध आहे. इतका की, प्रेषित योहानाने ख्रिस्ती मंडळीविषयी आणि तिच्या कल्याणाविषयी असे लिहिले: “ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास.” (१ योहान ५:४) आज, आबालवृद्ध, सशक्त आणि अशक्त असे साठ लाखांपेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार यहोशवा आणि कालेबसारखा विश्वास दाखवत असल्यामुळे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगभरात होत आहे. कोणताही शत्रू या शक्तीशाली, धैर्यवान सैन्याला रोखू शकलेला नाही!—रोमकर ८:३१.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ ७४०
देवाने इस्राएली लोकांना दिलेला देश
देवाने इस्राएलांना जो देश दिला होता तो खरंच खूप सुपीक आणि चांगला प्रदेश होता. मोशेने जेव्हा त्या देशाची पाहणी करण्यासाठी काही हेरांना तिथे पाठवलं तेव्हा नमुना म्हणून त्यांनी तिथून द्राक्षांचा घड असलेली फांदी तसंच काही डाळिंब आणि अंजिरंही आणली. द्राक्षांचा तो घड इतका मोठा होता की तो दोन माणसांना एका दांड्यावर उचलून आणावा लागला! जरी ते हेर त्यांच्या कमकुवत विश्वासामुळे तिथल्या लोकांना घाबरून गेले होते तरी त्या देशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “खरोखर तिथे दूध आणि मध वाहतं.”—गण १३:२३, २७.
२९ मार्च-४ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना १५-१६
“गर्व आणि फाजील आत्मविश्वासापासून सावध राहा”
यहोवा तुम्हाला ओळखतो का?
१२ पण, इस्राएल राष्ट्र प्रतिज्ञात देशाकडे प्रवास करत असताना, देवाच्या व्यवस्थेत समस्या आहेत असे कोरहाला वाटले. त्या सुधारण्यासाठी इस्राएल राष्ट्रात पुढाकार घेणाऱ्या २५० पुरुषांनी कोरहाची बाजू घेतली. यहोवासोबत आपला नातेसंबंध घनिष्ठ आहे याची कोरहाला व इतरांना खातरी असावी. ते मोशेला व अहरोनाला म्हणाले: “तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे.” (गण. १६:१-३) किती फाजील आत्मविश्वास व गर्विष्ठ मनोवृत्ती! मोशे त्यांना म्हणाला: ‘परमेश्वराचे कोण हे परमेश्वर दाखवील.’ (गणना १६:५ वाचा.) दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत, कोरह आणि त्याची बाजू घेणारे सर्व जण मरण पावले.—गण. १६:३१-३५.
यहोवा तुम्हाला ओळखतो का?
११ यहोवाच्या व्यवस्थेचा व त्याच्या निर्णयांचा आदर करण्याच्या बाबतीत मोशे व कोरह यांनी जी उदाहरणे मांडली ती एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. त्यांनी जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून यहोवा त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे दिसून आले. कोरह हा एक कहाथी लेवी होता आणि त्याला सेवेचे अनेक विशेषाधिकार मिळाले होते. यहोवाने कशा प्रकारे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रातून वाचवले होते हे पाहण्याची संधी बहुधा त्याला मिळाली होती. तसेच, सीनाय पर्वताजवळ अवज्ञाकारी इस्राएल लोकांवर यहोवाचे न्यायदंड बजावण्यात त्याने भाग घेतला असावा, आणि कराराचा कोश वाहून नेण्यातही त्याने मदत केली असावी. (निर्ग. ३२:२६-२९; गण. ३:३०, ३१) तो बहुधा अनेक वर्षे यहोवाला एकनिष्ठ राहिला होता आणि त्यामुळे इस्राएल लोकांच्या नजरेत तो आदरणीय होता.
आध्यात्मिक रत्नं
प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देण्याची खात्री करा!
यहोवाच्या नजरेत ही गंभीर गोष्ट होती. बायबल म्हणते, “तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, ‘ह्या मनुष्याला अवश्य जिवे मारावे.’” (गणना १५:३५) त्या माणसाने जे केले ते यहोवाने इतक्या गंभीरपणे का घेतले?
लाकडे गोळा करायला त्याचप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी त्या लोकांजवळ सहा दिवस होते. सातवा दिवस त्यांना त्यांच्या आध्यात्मिक गरजांसाठी द्यायचा होता. लाकडे गोळा करण्यात गैर काही नव्हते, पण जी वेळ यहोवाच्या उपासनेसाठी बाजूला राखायची होती त्या वेळेचा उपयोग करणे चुकीचे होते. आज ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राखाली नसले, तरी आपले अग्रक्रम ठरवण्यासाठी या घटनेवरून आपल्याला धडा शिकायला मिळत नाही का?—फिलिप्पैकर १:१०.
५-११ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना १७-१९
“मीच तुझा वारसा आहे”
तुम्ही यहोवाला आपला वाटा मानत आहात का?
९ लेव्यांचा विचार करा. त्यांना जमिनीचे वतन मिळाले नव्हते. त्यांनी आपल्या जीवनात शुद्ध उपासनेला प्राधान्य दिले होते; त्यामुळे आपला सांभाळ करण्यासाठी त्यांना यहोवावर विसंबून राहायचे होते. यहोवाने त्यांना म्हटले: ‘मीच तुझा वाटा आहे.’ (गण. १८:२०) लेवी व याजक यांच्याप्रमाणे आज आपण खरोखरच्या मंदिरात सेवा करत नसलो, तरी आपण त्यांच्या मनोवृत्तीचे अनुकरण करू शकतो; अर्थात यहोवा आपला सांभाळ करील असा आत्मविश्वास आपण बाळगू शकतो. या जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे तसतसा आपला सांभाळ करण्याच्या देवाच्या सामर्थ्यावर आपण अधिकाधिक भरवसा ठेवला पाहिजे.—प्रकटी. १३:१७.
यहोवा माझा वाटा आहे
४ या नेमणुकीचा लेव्यांकरता काय अर्थ होता? यहोवाने म्हटले की तो त्यांचा वाटा होणार होता, म्हणजे त्यांना प्रतिज्ञात देशात वतन देण्याऐवजी, त्याने त्यांच्यावर सेवेचा मौल्यवान विशेषाधिकार सोपवला होता. “परमेश्वराने त्यांना दिलेली याजकवृत्ती” हेच त्यांचे वतन होते. (यहो. १८:७) गणना १८:२० च्या संदर्भावरून दिसून येते की यामुळे ते दरिद्री बनले नाहीत. (गणना १८:१९, २१, २४ वाचा.) लेवी जी सेवा करत होते त्याबद्दल इस्राएल लोकांकडून त्यांना दशमांश दिला जाणार होता. त्यांना इस्राएल राष्ट्राच्या उत्पन्नाचा आणि पाळीव प्राण्यांच्या वाढलेल्या संख्येचा दहा टक्के भाग मिळणार होता. लेव्यांना मिळालेल्या या दशमांशाचा दहा टक्के भाग, म्हणजे सर्वात ‘उत्तम भाग’ त्यांनी याजकवर्गाला द्यायचा होता. (गण. १८:२५-२९) इस्राएल लोकांनी देवाच्या उपासनेसाठी आणलेली सर्व ‘पवित्र समर्पणेदेखील’ त्यांनी याजकांना द्यायची होती. अशा प्रकारे, यहोवा आपला सांभाळ करेल असा विश्वास बाळगण्याचे सबळ कारण याजकवर्गाच्या सदस्यांजवळ होते.
आध्यात्मिक रत्नं
सावध राहा!०२ ६/८ १४ ¶२
मीठ—एक उपयुक्त पदार्थ
बायबल काळात एखाद्या न बदलणाऱ्या आणि टिकाऊ गोष्टीला मीठाची उपमा दिली जायची. म्हणून बायबलमध्ये यहोवाने इस्राएली लोकांसोबत केलेल्या कायमच्या आणि न बदलणाऱ्या कराराला “मिठाचा करार” म्हटलं आहे. अशा कराराला पक्कं करण्यासाठी, ज्यांच्यामध्ये हा करार झाला आहे ते एकत्र येऊन सोबत जेवण आणि मीठ खायचे. (गणना १८:१९) मोशेच्या नियमशास्त्रानुसार वेदीवर बलिदानं अर्पण केली जायची तेव्हा त्यामध्ये मीठसुद्धा टाकलं जायचं. कारण त्यामुळे एखादी गोष्ट नाश होण्यापासून, कुजण्यापासून किंवा खराब होण्यापासून सुरक्षित आहे, असा अर्थ सूचित व्हायचा.
१२-१८ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना २०-२१
“तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा”
नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा
१९ आपण चुका करण्याचं टाळू. मोशेचा विचार करा. तो बराच काळ नम्र बनून राहिला आणि त्याने यहोवाचं मन आनंदित केलं. पण ४० वर्षांच्या कठीण प्रवासाच्या शेवटी, एका प्रसंगी मोशे नम्रता दाखवण्यापासून चुकला. त्याच्या बहिणीचा काही वेळापूर्वीच मृत्यू झाला होता आणि तिला कादेशमध्ये पुरण्यात आलं होतं. या बहिणीनेच इजिप्तमध्ये असताना त्याचा जीव वाचवला असावा. आता इस्राएली लोक पुन्हा एकदा कुरकुर करू लागले की त्यांच्या गरजांकडे कोणीच लक्ष देत नाही. या प्रसंगी पुरेसं पाणी नसल्यामुळे ते लोक “मोशेशी भांडू लागले.” यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांसाठी अनेक चमत्कार केले होते आणि मोशेनेही या लोकांचं निःस्वार्थपणे नेतृत्व केलं होतं, तरीदेखील लोक कुरकुर करू लागले. त्यांनी फक्त पुरेसं पाणी नसल्याचीच तक्रार केली नाही, तर ते मोशेविरुद्ध बोलू लागले आणि या परिस्थितीसाठी त्यालाच जबाबदार ठरवू लागले.—गण. २०:१-५, ९-११.
नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा
२० यामुळे मोशेला खूप राग आला आणि रागाच्या भरात तो नम्रता दाखवण्यात चुकला. यहोवाने त्याला आज्ञा दिली होती की त्याने खडकाशी बोलावं, पण याउलट मोशे लोकांशी कठोरतेने बोलला आणि तो स्वतः चमत्कार करेल असं त्याने लोकांना सांगितलं. मग त्याने खडकावर दोन वेळा काठी मारली आणि त्यातून पाणी वाहू लागलं. गर्व आणि राग यांमुळे त्याच्या हातून ही गंभीर चूक घडली. (स्तो. १०६:३२, ३३) या प्रसंगात त्याने नम्रता दाखवली नाही, म्हणून त्याने वचनयुक्त देशात जाण्याची संधी गमावली.—गण. २०:१२.
२१ या घटनेवरून आपण बरेच धडे घेऊ शकतो. पहिला म्हणजे, आपण नेहमी नम्रता विकसित करत राहिलं पाहिजे. तसं करण्याचं आपण थोड्या वेळासाठीही थांबवलं, तर मग आपल्या मनात गर्व येऊ शकतो आणि आपल्या शब्दांतून व कार्यांतून आपण चुका करू शकतो. दुसरं म्हणजे, तणावामुळे आपल्याला नम्रता दाखवणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आपण नेहमी, अगदी तणावात असतानाही नम्र बनून राहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहिले पाहिजेत.
नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश
पहिले कारण, देवाने मोशेला लोकांशी बोलायला सांगितले नव्हते, मग त्यांना बंडखोर ठरवणे तर दूरच. दुसरे कारण, मोशे व अहरोन देवाचे गौरव करायला चुकले होते. देवाने त्यांना म्हटले: “[तुम्ही] माझे पावित्र्य प्रगट केले नाही.” (वचन १२) “आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय?” असे बोलण्याद्वारे मोशेने, चमत्काराने पाणी देणारा देव नसून, तो व अहरोन आहे असे सुचवले. तिसरे कारण, देवाने आधी केलेल्या न्यायाच्या सुसंगतेत ही शिक्षा होती. बंडाळी करणाऱ्या आधीच्या पिढीला देवाने कनान देशात प्रवेश करू दिला नव्हता. मोशेला व अहरोनालाही त्याने हीच शिक्षा दिली. (गणना १४:२२, २३) चौथे कारण हे होते की मोशे व अहरोन इस्राएली लोकांचे नेते होते. ख्रिस्ती मंडळीत अधिक जबाबदारी असणारे यहोवासमोर जास्त जबाबदार आहेत.—लूक १२:४८.
आध्यात्मिक रत्नं
मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?
१२ यांपैकी प्रत्येक परिस्थितीत यहोवा अहरोनाला लगेच शिक्षा देऊ शकला असता. पण यहोवाला हे माहीत होते, की अहरोन मुळात वाईट नव्हता. त्याने चुका केल्या हे खरे आहे, पण सहसा परिस्थितीच्या किंवा लोकांच्या दबावाला बळी पडून त्याने असे केले होते. पण, जेव्हा त्याचे दोष त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने ते लगेच कबूल केले आणि यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारले. (निर्ग. ३२:२६; गण. १२:११; २०:२३-२७) अहरोनाचे यहोवावर प्रेम होते आणि त्याने पश्चात्तापी वृत्ती दाखवली. त्यामुळे, यहोवाने त्याला क्षमा केली. म्हणूनच, कित्येक शतकांनंतरही, अहरोन व त्याच्या वंशजांना यहोवाचे विश्वासू सेवक म्हणून ओळखण्यात आले.—स्तो. ११५:१०-१२; १३५:१९, २०.
१९-२५ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना २२-२४
“यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला”
“येशूविषयीचा आनंदाचा संदेश” घोषित करण्यात आला
५ पहिल्या शतकाप्रमाणे आजही, देवाच्या लोकांचा छळ करणाऱ्यांना त्यांचं प्रचारकार्य थांबवण्यात यश आलेलं नाही. बऱ्याचदा ख्रिश्चनांना तुरुंगात टाकण्यात आलं, किंवा दुसऱ्या ठिकाणी जायला भाग पाडलं गेलं. पण, यामुळे एका नवीन ठिकाणी राज्याचा संदेश सांगण्यासाठी त्यांना उलट मदतच झाली. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धात यहोवाचे साक्षीदार नात्झींच्या छळ छावण्यांमध्ये कित्येक लोकांना साक्ष देऊ शकले. अशाच एका छळ छावणीत साक्षीदारांशी भेट झालेल्या एका ज्यूइश माणसाने म्हटलं, “यहोवाचे साक्षीदार असलेल्या कैद्यांचं धैर्य पाहून, त्यांचा विश्वास शास्त्रवचनांवर आधारित असल्याची मला खातरी पटली आणि त्यामुळे मीही एक साक्षीदार बनलो.”
इन्साइट-२ २९१
वेडेपणा
यहोवाविरुद्ध जाण्याचा वेडेपणा. मवाबी राजा बालाक याच्यापासून संपत्ती मिळेल या मोहाने बलाम इस्राएली लोकांना शाप देण्यासाठी निघाला होता. हा त्याचा मूर्खपणाच होता. पण यहोवाने त्याला असं करण्यापासून रोखलं. बलाम किती मूर्ख होता हे सांगताना प्रेषित पेत्र म्हणतो, की “ओझं वाहणाऱ्या मुक्या जनावराने माणसाच्या आवाजात बोलल्यावर तो संदेष्टा आपल्या मूर्खपणाच्या मार्गावरून मागे फिरला.” इथे मूर्खपणा यासाठी प्रेषित पेत्रने जो ग्रीक शब्द पॅराफ्रोनीया वापरला, त्याचा अर्थ एखाद्याचं डोकं ‘ठिकाणावर नसणं’ असा होतो.—२पेत्र २:१५, १६; गण २२:२६-३१.
आध्यात्मिक रत्नं
गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
२२:२०-२२—बलामाविरुद्ध यहोवाचा कोप का भडकला? यहोवाने संदेष्टा बलाम याला सांगितले होते, की त्याने इस्राएलांना शाप देऊ नये. (गणना २२:१२) तरीसुद्धा बलाम, बालाकाच्या सेवकांबरोबर इस्राएलांना शाप द्यायला गेला. बलामाला मवाबी राजाला खूष करून त्याच्याकडून बक्षीस मिळवायचे होते. (२ पेत्र २:१५, १६; यहूदा ११) बलामाला बळजबरीने इस्राएलला शाप देण्याऐवजी आशीर्वाद देण्यास भाग पाडण्यात आले तेव्हाही त्याने, बआलची उपासना करणाऱ्या स्त्रियांद्वारे इस्राएली पुरुषांना फुसलावता येईल असे सुचवून राजाची मर्जी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. (गणना ३१:१५, १६) बलामाच्या तत्त्वशून्य लोभामुळे देवाचा कोप त्याच्यावर भडकला.
२६ एप्रिल-२ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | गणना २५-२६
“फक्त एका व्यक्तीमुळेही फरक पडू शकतो का?”
“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”
एक कोळी, आपल्या आवडत्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी जातो. आज कोणता मासा पकडायचा हे त्याने मनात आधीच ठरवले आहे. त्यासाठी तो गळाला लावण्यासाठी एक लालूच निवडतो आणि तो पाण्यात टाकतो. थोड्याच वेळात, गळ जड वाटू लागतो आणि गळाला बांधलेली काठी वाकते. आपण योग्य लालूच वापरले म्हणून तो मनातल्या मनात खूष होतो.
२ काहीसे असेच सा.यु.पू. १४७३ साली बलाम नावाच्या एका मनुष्याने केले. त्यानेही गळाला कोणते लालूच लावायचे यावर खूप विचार केला होता. त्याला देवाच्या लोकांना फसवायचे होते. वचन दिलेल्या देशाच्या सीमेवरील मवाबाच्या मैदानावर देवाच्या लोकांनी तळ ठोकला होता. आपण यहोवाचा संदेष्टा आहोत असा बलाम दावा करत होता परंतु खरे तर, तो एक लोभी मनुष्य होता. इस्राएलवर शाप आणण्यासाठी त्याला पैसे देऊन विकत घेण्यात आले होते. पण यहोवाने मधे हस्तक्षेप केल्यामुळे बलामाच्या तोंडून इस्राएलाबद्दल आशीर्वादच निघत होते. बलाम मात्र पैशासाठी इतका हपापलेला होता की, देवाच्या लोकांना एखादे गंभीर पाप करण्याच्या प्रलोभनात पाडून त्यांना शाप देण्यास तो देवाला उद्युक्त करू शकतो, असा विचार त्याने केला. त्यामुळे, इस्राएली पुरुषांना फसवण्यासाठी त्याने तरुण मवाबी स्त्रियांचा मोहजाल टाकला.—गणना २२:१-७; ३१:१५, १६; प्रकटीकरण २:१४.
“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”
४ पण हा अनर्थ कशामुळे ओढवला होता? अनेक इस्राएली पुरुषांचे मन, ज्या देवाने त्यांना ईजिप्तच्या दास्यत्वातून सोडवले होते, रानात त्यांना खाऊ घातले होते, वचन दिलेल्या देशापर्यंत त्यांना सुखरूप आणले होते त्या यहोवापासून दूर गेल्यामुळे दुष्ट बनले होते. (इब्री लोकांस ३:१२) या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देत प्रेषित पौलाने लिहिले: “त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.”—१ करिंथकर १०:८.
आध्यात्मिक रत्नं
इन्साइट-१ ३५९ ¶१-२
हद्द
असं दिसतं, की इस्राएली वंशांना चिठ्ठ्या टाकून आणि प्रत्येक वंशातल्या लोकांची संख्या किती आहे, हे पाहून जमिनीचे वाटे दिले जायचे. प्रत्येक वंशाला जमिनीचा वाटा अंदाजे कोणत्या भागात मिळेल, म्हणजे उत्तरेला, दक्षिणेला, पुर्वेला की पश्चिमेला तसंच समुद्रकिनाऱ्याला की डोंगराळ भागात, हे चिठ्ठ्या टाकून ठरवलं जायचं. चिठ्ठ्या टाकल्यामुळे जो काही निर्णय व्हायचा तो यहोवाकडून होता. त्यामुळे याबाबतीत त्यांनी एकमेकांचा द्वेष करायचं किंवा एकमेकांशी भांडणं करायचं कारण नव्हतं. (नीत १६:३३) चिठ्ठ्या टाकल्यावर जो काही निर्णय यहोवाने दिला त्यातून हेही दिसून आलं की सर्व वंशाना याकोबच्या भविष्यवाणीप्रमाणे नेमलेल्या जमिनीचा भाग मिळेल याची काळजी यहोवाने घेतली होती. ही भविष्यवाणी याकोबने आपल्या मरण्यापुर्वी केली होती आणि आपल्याला ती उत्पत्ती ४९:१-३३ मध्ये वाचायला मिळते.
प्रत्येक वंशाला कुठे जमीन दिली जाईल हे चिठ्ठ्या टाकून ठरवल्यानंतर त्यांना जमिनीचा किती मोठा भाग मिळेल हे ठरवावं लागणार होतं. यहोवाने त्यांना म्हटलं: “तुम्ही चिठ्ठ्या टाकून वारशाची जमीन तुमच्या घराण्यांमध्ये वाटून घ्या. मोठ्या घराण्यांसाठी मोठा वाटा आणि लहान घराण्यांसाठी लहान वाटा, वारसा म्हणून दिला जावा. जी चिठ्ठी निघेल त्याप्रमाणे प्रत्येकाला वारसा मिळेल.” (गण ३३:५४) अशा प्रकारे जमीन कोणत्या ठिकाणी मिळेल हे ठरवण्यात आलं. पण वारशाने मिळणाऱ्या या जमिनीचा हिस्सा मात्र वंशातल्या लोकांच्या संख्येनुसार कमी-जास्त केला जाऊ शकत होता. त्यामुळे यहूदा वंशाला मिळालेल्या जमिनीचा वाटा खूपच मोठा आहे हे लक्षात आल्यावर त्याचा काही भाग शिमोनच्या वंशाला देण्यात आला.—यहो १९:९.