खोट्या शिक्षकांपासून सावधान!
“तुम्हांतहि खोटे शिक्षक होतील.”—२ पेत्र २:१.
१. यहूदाने कशाविषयी लिहिण्याचे ठरवले होते, आणि त्याने आपला विषय का बदलला?
केवढे धक्कादायक! पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत खोटे शिक्षक! (मत्तय ७:१५; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) यहूदा या येशूच्या सावत्र भावाला देखील या परिस्थितीची जाणीव होती. त्याने सहविश्वासू बांधवांना सांगितले की खरे तर “आपल्या समाईक तारणाविषयी” लिहिण्याचे त्याने ठरवले होते, पण तो पुढे खुलासा करतो की: ‘विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले.’ यहूदाने आपला विषय का बदलला? कारण तो सांगतो, “कित्येक माणसे चोरून [मंडळीच्या] आत शिरली आहेत; ती . . . आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करुन तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात.”—यहूदा ३, ४.
२. यहूदाचे पत्र आणि २ पेत्र यातील २ ऱ्या अध्यायात एवढे साम्य का आहे?
२ पेत्राने त्याचे दुसरे पत्र लिहिल्यानंतर अवघ्या काही काळातच यहूदाने आपले पत्र लिहिले. पेत्राच्या या पत्राचा मजकूर यहूदाला निश्चितच माहीत होता. त्याच्या स्वतःच्या जोरदार प्रोत्साहनदायक पत्रात त्याने नक्कीच अनेक समान विचार व्यक्त केले आहेत. म्हणूनच २ पेत्र यातील २ ऱ्या अध्यायाचे परीक्षण करताना, यहूदाच्या पत्राशी ते कसे मिळतेजुळते आहे ते आपण पाहू.
खोट्या शिकवणुकींचे दुष्परिणाम
३. गतकाळात घडलेली कोणती गोष्ट पुन्हा घडेल असे पेत्राने सांगितले?
३ बांधवांना भविष्यवाणीकडे लक्ष देण्याचे प्रोत्साहन दिल्यावर पेत्र म्हणतो: “तर [प्राचीन इस्राएलात] संदेष्टे होते तसे तुम्हांतहि खोटे शिक्षक होतील.” (२ पेत्र १:१४–२:१) प्राचीन काळात देवाच्या लोकांना खरे भविष्यसूचक संदेश प्राप्त झाले होते, पण त्यांना खोट्या संदेष्ट्यांच्या भ्रष्ट शिकवणुकीविरुद्धही लढा द्यावा लागला. (यिर्मया ६:१३, १४; २८:१-३, १५) यिर्मयाने लिहिले, “यरुशलेमेतल्या संदेष्ट्यांच्या ठायीहि मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करितात व लबाडीने चालतात.”—यिर्मया २३:१४.
४. खोटे शिक्षक नाशास पात्र का आहेत?
४ ख्रिस्ती मंडळीत खोटे शिक्षक काय करतील याविषयी वर्णन करताना पेत्र म्हणतो: “ते विध्वंसक पाखंडी मते [पंथ] गुप्तपणे प्रचारात आणतील, ज्या स्वामीने [येशू ख्रिस्ताने] त्यांना विकत घेतले त्यालाहि ते नाकारतील, आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील.” (२ पेत्र २:१; यहूदा ४) पहिल्या शतकातील असे पंथ निर्माण करण्याचा अंतिम परिणाम आज आपल्याला ख्रिस्ती धर्मजगताच्या स्वरूपात दिसतो. खोटे शिक्षक नाश होण्यास का एवढे पात्र आहेत ते पेत्र स्पष्ट करतो: “त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करितील; त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.”—२ पेत्र २:२.
५. खोटे शिक्षक कशासाठी जबाबदार होते?
५ जरा विचार करा! खोट्या शिक्षकांच्या कुप्रभावामुळे, मंडळ्यांमधील पुष्कळ लोक कामातुर आचरणात सामील होतील. ‘कामातुर आचरण’ असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचे, लैंगिक स्वैराचार, बेलगाम वर्तन, बीभत्सता, अश्लीलपणा, निर्लज्ज आचरण इत्यादि अर्थबोध आहेत. पेत्राने याआधी म्हटले होते की ख्रिश्चनांनी ‘वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवली आहे.’ (२ पेत्र १:४) पण, काहीजण या भ्रष्टतेत पुन्हा परतणार होते आणि यासाठी मुख्यतः कोण जबाबदार होते, तर मंडळ्यांतील खोटे शिक्षक! ओघाओघाने सत्य मार्गाची बदनामी होणार होती. किती खेदजनक! नक्कीच, ही एक अशी बाब आहे जिच्याकडे सर्व यहोवाच्या साक्षीदारांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपल्या आचरणाने आपण यहोवा देव आणि त्याच्या लोकांना एकतर मोठेपणा आणू शकतो किंवा त्यांना कलंकित करू शकतो याचा आपण कधीही विसर पडू देऊ नये.—नीतिसूत्रे २७:११; रोमकर २:२४.
खोट्या शिकवणुकी आणणे
६. खोट्या शिक्षकांचे मूळ इरादे कसे असतात, आणि ते आपले हेतू कशाप्रकारे साध्य करतात?
६ खोटे शिक्षक त्यांची भ्रष्ट विचारधारा कशाप्रकारे मंडळीत आणतात हे जाणून घेणे सुज्ञतेचे आहे. पेत्र आधी म्हणतो की ते अगदी साळसूदपणे किंवा बेमालूमपणे अगदी कळत नकळत प्रवेश करतात. पुढे तो सांगतो: “ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुम्हांवर पैसे मिळवितील.” या खोट्या शिक्षकांचे मूळ इरादे स्वार्थी असतात, हे द जेरूसलेम बायबलच्या भाषांतरावरून अधिक स्पष्ट होते: “ते आपल्या कावेबाज भाषणांनी स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला विकत घ्यावे म्हणून खटपट करतील.” त्याचप्रकारे, याठिकाणी जेम्स मॉफटच्या भाषांतरात असे म्हटले आहे: “आपल्या हव्यासापायी ते कपटी युक्तिवादाने तुमचा गैरफायदा घेतील.” (२ पेत्र २:१, ३) आध्यात्मिकरित्या जागरूक नसणाऱ्या व्यक्तीला खोट्या शिक्षकांचे बोलणे कदाचित विश्वासार्ह वाटेल, पण त्यांचा शब्द न् शब्द लोकांना ‘विकत घेण्यासाठी,’ अर्थात त्यांना फसवेगिरी करणाऱ्यांचे स्वार्थी हेतू साध्य करायला लावण्यासाठी धूर्तपणे योजलेला असतो.
७. पहिल्या शतकात कोणते तत्त्वज्ञान प्रचारात आले होते?
७ पहिल्या शतकातील खोट्या शिक्षकांवर तत्कालीन जगिक विचारधारेचा पगडा होता यात काहीच शंका नाही. पेत्राने पत्रे लिहिली त्याच सुमारास, ज्ञानवाद नावाचे एक तत्त्वज्ञान प्रचारात येऊ लागले होते. ज्ञानवाद्यांची अशी समजूत होती की विषयाशी संबंधित असणारे सर्वकाही वाईट असून जे काही आत्मिक आहे तेच केवळ चांगले असते. यामुळे त्यांच्यापैकी काहींचे असे म्हणणे होते की माणसाने आपल्या शारीरिक देहाचा कसाही उपयोग केला तरी चालते. कालांतराने माणसाचा हा देह तर राहणारच नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी असा निष्कर्ष काढला की या कारणास्तव, शारीरिक—तशीच लैंगिक पापे देखील गंभीर नाहीत. अर्थातच, ख्रिस्ती धर्म अनुसरण्याचा दावा करणाऱ्या काही लोकांवर असल्या दृष्टिकोनांचा प्रभाव पडू लागला.
८, ९. (अ) कोणत्या विपर्यस्त युक्तिवादाने सुरवातीच्या काही ख्रिश्चनांवर प्रभाव पडला होता? (ब) यहूदाने सांगितल्यानुसार मंडळीतील काहीजण काय करीत होते?
८ एका बायबल अभ्यासकाने असे निरीक्षण केले की ‘चर्चमधील काहींनी ईश्वरी दयेच्या किंवा अपात्री कृपेच्या सिद्धान्ताचा विपरीत अर्थ लावला.’ (इफिसकर १:५-७) त्याच्या मते, काहींजण असा तर्क करीत होते: “देवाची [अपात्री कृपा] प्रत्येक पाप झाकून टाकण्याइतकी अगाध आहे ना? . . . मग आपण पाप करीत राहूया, कारण देवाची [अपात्री कृपा] प्रत्येक पाप पुसून टाकण्यास समर्थ आहे. खरे तर आपण जितके अधिक पाप करू, तितक्याच अधिक वेळा देवाच्या [अपात्री कृपेला] प्रकट होण्यास संधी मिळेल.” यापेक्षा अधिक विपर्यस्त युक्तिवाद कोणता असू शकेल?
९ देवाच्या दयेसंबंधी अयोग्य समजुतींचे खंडन करीत पौलाने प्रश्न उपस्थित केला: “कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय?” त्याने पुढे विचारले: “आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय?” या दोन्ही प्रश्नांचे पौलाने सडेतोड उत्तर दिले: “कधीच नाही!” (रोमकर ६:१, २, १५) यहूदाने लक्षात आणून दिल्याप्रमाणे, काहीजण “आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करुन तिला कामातुरपणाचे स्वरूप” आणीत होते हे अगदी उघड आहे. तथापि, पेत्र अशांविषयी सांगतो की, “त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.”—यहूदा ४; २ पेत्र २:३.
इशारेवजा उदाहरणे
१०, ११. पेत्र कोणती तीन इशारेवजा उदाहरणे देतो?
१० जाणूनबुजून चूक करणाऱ्यांना देव निश्चित शिक्षा देईल यावर जोर देण्याकरता पेत्र शास्त्रवचनांतून तीन इशारेवजा उदाहरणांचा उल्लेख करतो. पहिले, तो लिहितो: “ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही.” यहूदा सांगतो की यांनी “आपले अधिकारपद न राखता” स्वर्गातील आपले “वसतिस्थान सोडले.” ते जलप्रलयापूर्वी पृथ्वीवर आले आणि मनुष्यांच्या कन्यांसोबत शरीरसंबंध ठेवता यावेत म्हणून शारीरिक देह धारण केले. त्यांच्या या अनुचित, अनैसर्गिक आचरणासाठी दंड म्हणून त्यांना “टार्टरस” (NW) यामध्ये टाकण्यात आले किंवा यहूदाच्या अहवालानुसार, त्यांना “निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान् दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले.”—२ पेत्र २:४; यहूदा ६; उत्पत्ति ६:१-३.
११ यानंतर, पेत्र नोहाच्या काळातील लोकांच्या संदर्भात बोलतो. (उत्पत्ति ७:१७-२४) तो म्हणतो, की नोहाच्या काळात देवाने “प्राचीन जगाचीहि गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला.” शेवटी तो लिहितो की देवाने “पुढे होणाऱ्या अभक्तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांस विध्वंसाची शिक्षा केली.” याच्या जोडीला यहूदा आणखी माहिती देतो की तेथील लोकांनी “[“भयंकर,” NW] जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला.” (२ पेत्र २:५, ६; यहूदा ७) त्या माणसांनी केवळ स्त्रियांसोबतच निषिद्ध लैंगिक संबंध ठेवले असे नाही, तर त्यांना इतर पुरुषांच्या, एवढेच काय तर हिंस्र पशूंच्या शरीराची देखील लालसा होती.—उत्पत्ति १९:४, ५; लेवीय १८:२२-२५.
१२. पेत्रानुसार, नीतिमान आचरणासाठी कोणते प्रतिफळ मिळते?
१२ तथापि, दुसरीकडे पाहता, पेत्र सांगतो की आपली विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांना यहोवा प्रतिफळ देणारा आहे. उदाहरणार्थ, देवाने जलप्रलय आणला तेव्हा त्याने कशाप्रकारे “नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले,” याविषयी तो सांगतो. शिवाय, सदोमच्या नाशाच्यावेळी यहोवाने “नीतिमान् लोट” याला कशाप्रकारे सोडवले याबाबतीत सांगून तो शेवटी म्हणतो: “भक्तिमान् लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान् लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.”—२ पेत्र २:५, ७-९.
दंडनीय कृत्ये
१३. कोण विशेषतः न्यायासाठी राखून ठेवलेले आहेत, आणि ते कोणत्या प्रकारच्या स्वप्नांत रमतात?
१३ पेत्र हा मुद्दा ठळकपणे मांडतो की देवाच्या न्यायासाठी विशेषतः कोणास राखून ठेवण्यात आले आहे, अर्थात, “अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांस.” पेत्राच्या शब्दांतून त्याला वाटणारा तिरस्कार स्पष्ट दिसून येतो: “ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.” यहूदाने लिहिल्याप्रमाणे “हे देखील . . . विषयस्वप्नांत देहाला विटाळवितात, . . . व थोरांची निंदा करितात.” (२ पेत्र २:१०; यहूदा ८) या विषयस्वप्नांत, त्यांच्या अनैतिक लैंगिक उपभोगास चालना देणाऱ्या लैंगिक मनोकल्पनांचा समावेश असू शकतो. तथापि, ते कोणत्या अर्थाने ‘अधिकार तुच्छ मानतात’ आणि “थोरांची निंदा करितात”?
१४. खोटे शिक्षक कोणत्या अर्थाने ‘अधिकार तुच्छ मानतात’ आणि “थोरांची निंदा करितात”?
१४ तर, देवाने नेमलेल्या अधिकाराला पाण्यात पाहण्याकरवी ते असे करतात. ख्रिस्ती वडील, थोर यहोवा देव आणि त्याच्या पुत्राचे प्रतिनिधी आहेत, या कारणाने त्यांना देखील काही प्रमाणावर थोर लेखण्यात आले आहे. त्यांच्याकडून चुका होतात हे कबूल आहे, पेत्राकडूनही झाल्या होत्या, पण शास्त्रवचनांत असे प्रोत्साहन देण्यात आले आहे की मंडळीतील सदस्यांनी या थोर जनांच्या अधीन असावे. (इब्री लोकांस १३:१७) फक्त त्यांच्यात काही कमतरता आहेत म्हणून त्यांची निंदा करणे अनुचित आहे. पेत्र म्हणतो की देवदूत “प्रभूसमोर [खोट्या शिक्षकांची] निंदा करून त्यांस दोषी ठरवीत नाहीत.” पेत्र पुढे म्हणतो, “पण हे लोक स्वतःस न कळणाऱ्या गोष्टीविषयी निंदा करीत असतात; नैसर्गिक नियमानुसार पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेतच नाश होईल.”—२ पेत्र २:१०-१३.
“तुम्हाबरोबर मेजवान्या झोडतांना”
१५. खोट्या शिक्षकांच्या काही पद्धती कोणत्या आहेत, आणि ते आपल्या मोहपाशांचा कोठे उपयोग करतात?
१५ ही भ्रष्ट माणसे “दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात . . . सुख मानतात” आणि “डाग व कलंक आहेत,” पण तरीसुद्धा ती अत्यंत कावेबाज देखील असतात. पेत्राने याआधी सांगितल्याप्रमाणे ते “बनावट गोष्टी” करून “गुप्तपणे” कार्य करतात. (२ पेत्र २:१, ३, १३) याअर्थी, ते देवाच्या नैतिक दर्जांना कायम राखू पाहणाऱ्या वडिलांचा कदाचित उघड उघड विरोध करणार नाहीत किंवा ते जाहीरपणे स्वतःच्या लैंगिक उपभोगामागे लागणार नाहीत. उलटपक्षी, पेत्र म्हणतो की ते “तुम्हाबरोबर मेजवान्या झोडतांना . . . कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते.” आणि यहूदा यांच्याविषयी असे लिहितो: “ते तुमच्या प्रीतिभोजनांत झाकलेले खडक असे आहेत.” (यहूदा १२) पाण्याखालचे टोकदार खडक जसे एखाद्या नावेचे बूड चिरून, बेसावध नाविकांना बुडवू शकतात तशाच प्रकारे, खोटे शिक्षक देखील “प्रीतिभोजनांत” प्रीतीचे सोंग घेऊन बेसावध लोकांना भ्रष्ट करू शकतात.
१६. (अ) ‘प्रितीभोजन’ काय असत, आणि आज त्यांसारखे कोणते प्रसंग आहेत ज्यांत अनैतिक लोक कार्य करू शकतात? (ब) खोटे शिक्षक कोणाच्या शोधात असतात, आणि अशांनी काय केले पाहिजे?
१६ हे ‘प्रितिभोजन’ म्हणजे सामाजिक प्रसंग होते, जेव्हा पहिल्या शतकातील ख्रिस्तीजन एकत्र येऊन खातपीत असत आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत. आज यहोवाचे साक्षीदार देखील काहीवेळा सामाजिक एकत्रीकरणांत, उदाहरणार्थ, लग्नाचे स्वागतसमारंभ, सहली किंवा एखाद्या सायंकाळी लहानशा पार्टीत भाग घेतात. अशा प्रसंगांचा गैरफायदा घेऊन भ्रष्ट लोक कशाप्रकारे काहींना फसवू शकतात? पेत्र लिहितो: “त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली आहे . . . आणि . . . ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात.” ‘लोभाला सवकलेले त्यांचे हृदय’ आध्यात्मिकरित्या अस्थिर लोकांच्या शोधात असते, ज्यांनी सत्य पूर्णपणे आपलेसे केलेले नसते. यास्तव, पेत्राच्या काळात जे घडले त्यावरून धडा घ्या आणि सावध राहा! कोणत्याही अशुद्ध प्रस्तावांचा धिक्कार करा, आणि असले अनैतिक प्रस्ताव ठेवू पाहणाऱ्याच्या मोहक व्यक्तिमत्त्वाला किंवा शारीरिक आकर्षणाला बळी पडू नका!—२ पेत्र २:१४.
“बलाम ह्याच्या मार्गाने”
१७. ‘बलामाचा मार्ग’ कोणता होता आणि त्याचा २४,००० इस्राएली लोकांवर कसा परिणाम झाला?
१७ या “शापग्रस्त” लोकांना काही काळापासून सत्याचे ज्ञान असते. अजूनही ते मंडळीत क्रियाशील आहेत असे कदाचित भासेल. पण पेत्र म्हणतो: “ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले.” (२ पेत्र २:१४, १५) बलामाने स्वतःच्या स्वार्थी हेतूप्राप्तीसाठी, अनैतिक भुलवणुकीचा उपयोग करण्यात यावा असा सल्ला देण्याचा मार्ग पत्करला होता. त्याने मवाबी राजा बालाक यास सांगितले की इस्राएली लोकांची भुलवणूक करून त्यांना जारकर्म करावयास लावले तर देव इस्राएलास शाप देईल. परिणामी, मवाबी स्त्रियांनी देवाच्या लोकांपैकी कित्येकांना भुलविले आणि २४,००० लोकांना त्यांच्या अनैतिक वर्तणुकीमुळे मारून टाकण्यात आले.—गणना २५:१-९; ३१:१५, १६; प्रकटीकरण २:१४.
१८. बलाम कोठवर हटखोरासारखा वागला, आणि शेवटी जे झाले त्यावरून खोट्या शिक्षकांच्या अंतिम परिणामाविषयी काय म्हणता येईल?
१८ पेत्र याकडे लक्ष वेधतो की बलामाचे गाढव त्याच्याशी बोलले तेव्हा त्याला खरे तर अडविण्यात आले होते, पण असे घडले तेव्हासुद्धा बलामाने ‘अनीतीचे वेतन इतके काही प्रिय मानले’ की त्याने आपल्या ‘वेडेपणाचा मार्ग’ सोडलाच नाही. (२ पेत्र २:१५, १६) किती हा दुष्टपणा! बलामासारखेच, देवाच्या लोकांना अनैतिक कृत्ये करण्याच्या मोहात पाडून भ्रष्ट करू पाहणाऱ्यांचा धिक्कार असो! बलाम आपल्या वाईटपणापायी मेला, त्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचीही काय गत होईल, याची जणू ती पूर्वझलक होती.—गणना ३१:८.
त्यांचे सैतानी मोहपाश
१९, २०. (अ) बलामासारख्यांची तुलना कशासोबत करण्यात आली आहे, आणि असे का? (ब) ते कोणाला मोहात पाडतात, आणि कशाप्रकारे? (क) त्यांचे मोहपाश सैतानी असतात असे का म्हणता येईल आणि त्यांच्यापासून आपण स्वतःचे आणि इतरांचेही संरक्षण कशाप्रकारे करू शकतो?
१९ बलामासारख्या लोकांचे वर्णन करताना, पेत्र म्हणतो: “ते निर्जल झरे [किंवा, विहिरी], वादळाने उडविलेले धुके [किंवा, ढग], असे आहेत.” वाळवंटात एखाद्या तृषित प्रवाशाला आटलेली विहीर सापडणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच. म्हणूनच तर अशा प्रकारच्या गोष्टींसारखे असणाऱ्यांसाठी “धनांधकाराची काळोखी राखलेली आहे,” यात नवल नाही! पेत्र पुढे म्हणतो, “भ्रमांत असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालितात.” ते अननुभवी लोकांना “स्वतंत्रतेचे वचन” देऊन मोहात पाडतात, पण पेत्र सांगतो त्याप्रमाणे ते “स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत.”—२ पेत्र २:१७-१९; गलतीकर ५:१३.
२० या भ्रष्ट शिक्षकांचे मोहपाश सैतानी असतात. उदाहरणार्थ, ते कदाचित म्हणतील: ‘आपण कमजोर आहोत आणि वासनेच्या आहारी आहोत हे देवाला माहीत आहे. म्हणून आपण मनसोक्त वागून स्वतःच्या लैंगिक वासना तृप्त केल्या, तरी देव आपल्यावर दया दाखवील. पाप कबूल केल्यास, आपण सत्यात आलो तेव्हा त्याने आपल्याला कशी क्षमा केली, तशीच आताही करील.’ दियाबलाने हव्वेला फसवण्यासाठी काहीसा असाच पावित्रा घेतला होता, हे तुम्हाला आठवत असेल; देवाविरुद्ध पाप केल्यास काहीही बिघडणार नाही अशी त्याने तिला हमी दिली. हव्वेच्या बाबतीत पाहू जाता, त्याने असा दावा केला की देवाविरुद्ध पाप केल्याने तिला समज आणि स्वातंत्र्य मिळेल. (उत्पत्ति ३:४, ५) अशाप्रकारची नीतिभ्रष्ट व्यक्ती मंडळीसोबत सहवास राखत असल्याचे आपल्याला आढळल्यास, ख्रिस्ती मंडळीतील जबाबदार बांधवांना या व्यक्तीबद्दल माहिती देण्याकरवी स्वतःचे आणि इतरांचेही संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.—लेवीय ५:१.
अचूक ज्ञानाकरवी संरक्षित
२१-२३ (अ) अचूक ज्ञान आचरणात न आणल्यामुळे कोणते दुष्परिणाम घडून येतात? (ब) आणखी कोणत्या समस्येविषयी पेत्र चर्चा करतो, जी पुढील लेखात विचारात घेतली जाईल?
२१ पेत्र आपल्या पत्राच्या या भागाच्या शेवटी ज्ञान आचरणात न आणल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात याविषयीचे वर्णन करतो; ज्ञानाचे अवलंबन “जीवनास व सुभक्तीस” अत्यावश्यक असल्याचे त्याने याआधीच सांगितले होते. (२ पेत्र १:२, ३, ८) तो लिहितो, “प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या [“अचूक,” NW] ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यांत गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.” (२ पेत्र २:२०) किती शोचनीय! पेत्राच्या काळात काहींनी, क्षणभंगूर लैंगिक सुखोपभोगासाठी अमर स्वर्गीय जीवनाच्या मोलवान आशेचा अव्हेर केला.
२२ म्हणूनच पेत्र म्हणतो: “नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरविणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते. ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशी जी खरी म्हण आहे, तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.”—२ पेत्र २:२१, २२; नीतिसूत्रे २६:११.
२३ सुरवातीच्या ख्रिश्चनांना आणखी एका समस्येने ग्रासले होते, जी आज काहींवर परिणाम करीत असलेल्या एका समस्येसारखी होती. त्याकाळी, काहीजण ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयीचे वचन पूर्ण होत नसल्याचे भासण्याविषयी कुरकूर करू लागले होते असे दिसते. पेत्र हा विषय कसा हाताळतो त्याचे आता आपण परीक्षण करून पाहू या.
तुम्हाला आठवते का?
◻ पेत्र कोणत्या तीन इशारेवजा उदाहरणांचा उल्लेख करतो?
◻ खोटे शिक्षक कशाप्रकारे ‘अधिकार तुच्छ मानतात?’
◻ बलामाचा मार्ग म्हणजे काय, आणि हा मार्ग अनुसरणारे इतरांना कशाप्रकारे मोहात पाडायला पाहतात?
◻ अचूक ज्ञान आचरणात न आणल्यामुळे कोणते दुष्परिणाम घडून येतात?
[१६, १७ पानांवरील चित्र]
बलाम एक इशारेवजा उदाहरण आहे