वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १२/१ पृ. १२-१७
  • ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांसाठी मुक्‍तता समीप आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांसाठी मुक्‍तता समीप आहे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नोहाच्या काळी प्रचलित असणारा आत्मा
  • मुक्‍ततेप्रत नेणारा मार्ग
  • नोहाच्या अनुभवाचा तुम्हासाठी काय अर्थ होतो?
  • तो “देवाबरोबर चालला”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • नोहाचा विश्‍वास जगाला दोषी ठरवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १२/१ पृ. १२-१७

ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांसाठी मुक्‍तता समीप आहे!

“ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांस परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे यहोवाला कळते.”—२ पेत्र २:९.

१. (अ) आमच्या काळात मानवजातीला कोणत्या त्रासदायक परिस्थितीचा अनुभव येत आहे? (ब) हे सर्व बघता, आम्ही कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत?

सबंध मानवजातीमध्ये जीवनाविषयीच्या समस्या वाढत आहेत. हे, एखादा भौतिक गोष्टी मुबलक असलेल्या राष्ट्रात राहात असो किंवा त्या तितक्या नाहीत अशा ठिकाणी राहात असो, या समस्या सर्वत्र सारख्याच आहेत. सर्वत्र असुरक्षितता वाटते आहे. अस्थिर आर्थिक समस्यांमुळे त्रास हा आहेच पण जोडीला पर्यावरणाचीही समस्या आहे, जी पृथ्वी व तिजवरील जीवनास धोक्याचा इशारा देत आहे. आजार तर वाढताहेत. आजारांचा संसर्ग, ह्रदयाचे विकार आणि कर्करोगाची पीडा भयंकर बळी घेत आहे. अनैतिकतेने मानवी भावना तसेच कौटुंबिक जीवनाशी मोठाच खेळ मांडला आहे. इतके आहे तरी जगात हिंसाचाराने थैमान माजविले आहे. मानवी समाजाला जे जे सहन करावे लागत आहे त्याकडे बघता आम्हाला हे विचारावेसे वाटतेः या सर्वांपासून लवकरच मुक्‍तता घडण्याचे एखादे सबळ कारण आहे का? जर आहे, तर ती कोणाकरवी येणार?—पडताळा हबक्कुक १:२; २:१-३.

२, ३. (अ) २ रे पेत्र २:९ मध्ये जे सांगितले आहे ते आज आमच्या काळी सांत्वनदायक का वाटते? (ब) आमच्या उत्तेजनार्थ पवित्र शास्त्र कोणकोणत्या मुक्‍ततेच्या प्रसंगांचा उल्लेख करते?

२ आमच्या काळात जे घडत आहे ते पाहता आम्हाला मानवी इतिहासात अगदी अभूतपूर्व काळात जे घडले होते त्याचे स्मरण घडते. त्या काळी देवाने जी मुक्‍ततेची कृत्ये केली त्याकडे प्रेषित पेत्र आपले लक्ष वेधवितो व शेवटी हे सांत्वनपर बोल लिहितोः “ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांस परीक्षेतून सोडविणे . . . हे यहोवाला कळते.” (२ पेत्र २:९) हे विधान ज्या संदर्भात लिहिण्यात आले त्याविषयीचा संदर्भ लक्षात घ्या. तो २ पेत्र २:४-१० मध्ये दिला आहेः

३ “ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना तार्तरसमध्ये टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधःकारमय खाड्यात ठेविले. त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्‍तीच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतीमत्त्वाचा उपदेशक नोहा याचे सात जणांसह रक्षण केले. पुढे होणाऱ्‍या अभक्‍तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांस विध्वंसाची शिक्षा केली; आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतीमान लोट ह्‍याची सुटका केली. (तो नीतीमान माणूस त्यांच्यामध्ये राहात होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतीमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत हाता;) ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांस परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे यहोवाला कळते. विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्‍यांस कसे राखून ठेवावे हे यहोवाला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे असे आहेत.” ही शास्त्रवचने सांगतात त्याप्रमाणे जे नोहाच्या काळी व लोटाच्या दिवसात घडले ते आम्हासाठी अर्थ राखून आहे.

नोहाच्या काळी प्रचलित असणारा आत्मा

४. नोहाच्या काळी देवाला पृथ्वी भ्रष्ट झालेली का दिसली? (स्तोत्रसंहिता ११:५)

४ उत्पत्तीच्या पुस्तकात ६ व्या अध्यायात आढळणारा ऐतिहासिक अहवाल आम्हाला माहिती देतो की, नोहाच्या काळी देवाला ही पृथ्वी भ्रष्ट झालेली दिसली. ते का बरे? हिंसाचारामुळे. हे कोणा गुन्हेगारी हिंसाचाराचे विशिष्ट कृत्य नव्हते. उत्पत्ती ६:११ कळविते की, “पृथ्वी . . . ही घोरकर्माने भरली होती.”

५. (अ) नोहाच्या काळी जो हिंसाचार घडत होता त्याला लोकांची कोणती प्रवृत्ती जबाबदार होती? (ब) अभक्‍तांविषयी हनोखने कोणता संदेश दिला?

५ यामागे काय होते? पेत्राच्या दुसऱ्‍या पत्रातील आत्ताच अवतरीत करण्यात आलेले वचन अधार्मिक लोक किंवा अभक्‍तांचा उल्लेख करते. हे लोक ईश्‍वरी नियमांचा साधारण स्वरुपाचा अनादर करीत नव्हते तर देवाविरुद्ध देखील त्यांची उद्दामपणाची प्रवृत्ती होती.a जर लोकच देवाशी उद्दामपणा करीत आहेत तर मग ते आपल्या सहमानवांशी दयाळूपणे वागतील असे अपेक्षिता येईल का? नोहाचा जन्म होण्याआधी ही भक्‍तीहीनता इतक्या मोठ्या प्रमाणात बोकाळली होती की यहोवाने हनोखाला याचा काय परिणाम होणार त्याविषयीचे भाकित वदविण्यास सांगितले होते. (यहुदा १४, १५) त्यांनी देवाविरुद्ध दाखविलेला उद्दामपणा त्यांच्यावर निश्‍चये ईश्‍वरी दंडाज्ञा आणणार होता.

६, ७. दिव्यदूतांचा समावेश असणारी कोणती गोष्ट जलप्रलयाआधी जी वाईट परिस्थिती सर्वत्र वाढली होती त्याला प्रामुख्यत्वे कारणीभूत होती?

६ त्या काळच्या हिंसाचाराला आणखी एक प्रभाव कारणीभूत होता. उत्पत्ती ६:१, २ याकडे आमचे लक्ष वेधवून असे म्हणतेः “नंतर भूतलावर मानवांची वाढ होऊ लागली आणि त्यांस कन्या झाल्या. तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवापुत्रांनी पाहिले व ज्या त्यांना पसंत वाटल्या त्या त्यांनी बायका केल्या.” हे देवपुत्र कोण होते? ते मानव नव्हते हे खरे. मानवाने तर शतकांपासून सुंदर दिसणाऱ्‍या स्त्रीकडे आपले लक्ष दिले व तिच्याशी विवाह साधला. तर हे देवपुत्र रुपांतरित झालेले देवदूत होते. यहुदाचे पत्र ६ व्या वचनात त्यांचे असे वर्णन आहे की, “ज्या देवदूतांनी आपले उच्चपद न राखता आपले स्वस्थान सोडले.”—पडताळा १ पेत्र ३:१९, २०.

७ ज्यांनी स्वतःला मानवात रुपांतरित केले त्या अतिमानुष प्राण्यांनी जेव्हा मानवकन्यांशी शारीरिक समागम केला तेव्हा काय परिणाम दिसला? “त्या काळी भूतलावर नेफिलिम (महाकाय) होते. पुढे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले तेव्हा त्यांस पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.” होय, त्या अनैसर्गिक मिलनाची नेफिलिम ही संतती उद्‌भवली. ते खूप बलवान निघाले व त्यांनी आपल्या बळाचा वापर इतरांवर दंडेलशाही करण्यासाठी केला.—उत्पत्ती ६:४.

८. पृथ्वीवरील वाईट परिस्थिती पाहून यहोवाला कसे वाटले?

८ तेव्हा ती परिस्थिती केवढ्या विकोपाला गेली? ती इतकी वाईट झाली की, “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणारे सर्व विचारतरंग केवळ एकसारखे वाईट असतात हे यहोवाने पाहिले.” मग, देवाने याविषयी कोणती प्रतिक्रिया दाखवली? “मानव पृथ्वीवर उत्पन्‍न केल्याचा यहोवाला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.” याचा अर्थ, देवाने मानवजात निर्माण केल्याची चूक केली आहे असे त्याला वाटले, असा नाही. याउलट, मानवाच्या निर्मितीनंतर मानवाने आपली वागणूक भयंकर वाईट केल्यामुळे देवाला आता त्यांचा नाश करावा लागत आहे याचे त्याला वाईट वाटले.—उत्पत्ती ६:५-७.

मुक्‍ततेप्रत नेणारा मार्ग

९. (अ) नोहावर देवाची कृपादृष्टी का होती? (ब) देवाने नोहाला कोणती आगाऊ कल्पना दिली?

९ तथापि, नोहाच्या बाबतीत पाहता, त्याच्यावर “देवाची कृपादृष्टी होती. . . . नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता, नोहा देवाच्या समागमे राहात असे.” (उत्पत्ती ६:८, ९) या कारणास्तव यहोवाने नोहाला अगाउपणे ही सूचना दिली की तो आता गोलार्धव्याप्त जलप्रलय आणणार. त्याने नोहाला तारू बांधण्यास सांगितले. नोहा व त्याच्या कुटुंबाशिवाय बाकीची सर्व मानवजात पृथ्वीच्या पाठीवरुन नाहीशी होणार होती. इतकेच काय पण, ज्या प्राण्यांच्या प्राथमिक स्वरुपाच्या जोड्या नोहा आपल्या तारवात नेणार होता त्याखेरीज इतर सर्व प्राणीवर्गाचाही नाश होणार होता.—उत्पत्ती ६:१३, १४, १७.

१०. (अ) बचावाच्या दृष्टीने कोणकोणती तयारी करायची होती, व ते केवढे मोठे काम होते? (ब) नोहाने मिळालेली नेमणूक ज्या पद्धतीने सांभाळली त्याबद्दल लक्षवेधक गोष्ट कोणती दिसते?

१० ह्‍या आगाऊ कळलेल्या माहितीने नोहावर भारी जबाबदारी टाकली. तारु बांधायचे होते. ते एका मोठ्या पेटाऱ्‍यासारखे बनवावयाचे होते व त्याचा आकार एकंदर १४,००,००० चौरस फूट इतका करावयाचा होता. त्यात अन्‍नसाठा भरावयाचा होता व नंतर “प्रत्येक जातीतून” लहानमोठी जनावरे व पक्षी बचावासाठी येणार होते. हे असे काम होते ज्याला पूर्ण करावयाला कित्येक वर्षे लागणार होती. नोहाला हे सगळे जाणून कसे वाटले? “नोहाने तसेच केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्पत्ती ६:१४-१६, १९-२२; इब्रीयांस ११:७.

११. नोहाला आपल्या कुटुंबाच्या बाबतीत कोणती महत्त्वपूर्ण जबाबदारी होती?

११ हे काम करीत असताना नोहाला आपल्या कुटुंबाची आध्यात्मिकता वाढविण्याचेही काम करण्यास वेळ द्यावा लागला. कुटुंबाच्या सदस्यांनी त्यांच्या सभोवताली राहणाऱ्‍या लोकांच्या उद्दामपणाच्या प्रवृत्तीचे व हिंसाचारी मार्गांचे अनुकरण करू नये म्हणून त्यांचे संरक्षण करण्याची गरज होती. याचबरोबर दैनंदिन जीवनात त्यांनी पूर्णपणे गढून न जाण्याविषयीची दक्षता बाळगणे महत्त्वाचे होते. देवाने त्यांच्यासाठी काम दिले होते व त्यामुळे यांनी या कामाभोवती आपले जीवन केंद्रित करणे अगत्याचे होते. नोहाच्या कुटुंबाने त्याच्या सूचना मान्य केल्या व नोहाचा जो विश्‍वास होता त्याची सहभागी केली हे आपल्याला कळते, कारण नोहा, त्याची बायको, त्याचे तीन मुलगे व या मुलांच्या बायका अशा एकंदर आठ जणांविषयी शास्त्रवचनात संमतीकारक माहिती दर्शविण्यात आली आहे.—उत्पत्ती ६:१८; १ पेत्र ३:२०.

१२. दुसरे पेत्र २:५ मध्ये दाखविल्यानुसार नोहाने कोणती जबाबदारी विश्‍वासूपणाने पार पाडली?

१२ याशिवाय नोहावर आणखी एक जबाबदारी होती व ती म्हणजे येणाऱ्‍या जलप्रलयाबद्दल लोकांना इशारा देणे व तो का येत आहे हेही त्यांना सांगणे. ही जबाबदारी त्याने विश्‍वासूपणे पूर्ण केल्याचे दिसते; कारण त्याला देवाच्या वचनात “धार्मिकतेचा उपदेशक” असे म्हणण्यात आले आहे.—२ पेत्र २:५.

१३. देवाने दिलेली नेमणूक पूर्ण करीत असता नोहाला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला?

१३ आता जरा, नोहाने आपली नेमणूक कोणत्या परिस्थितीमध्ये पार पाडली त्याचा विचार करा. तुम्हाला स्वतःला त्याच्या जागी ठेवा. तुम्ही नोहा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एक असता तर नेफिलिम तसेच अधार्मिक लोकांच्या हिंसाचारी मार्गाचा धुमाकूळ तुम्हाभोवती आला असता. तुम्हाला थेटपणे बंडखोर देवदूतांच्या प्रभावांचा संपर्क आला असता. तुम्ही तारु तयार करण्याच्या कामात गुंतले असताना तुम्हाला थट्टा व उपहास ऐकायला मिळाली असती. तसेच वर्षामागून वर्षे तुम्ही येणाऱ्‍या जलप्रलयाविषयी इशारा देत राहिला तसतसे लोक आपल्या दैनंदिन कामात इतके गढून गेल्याचे तुम्हाला दिसले असते की, ‘त्यांनी लक्ष दिलेले नाही.’ म्हणजेच, “जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत” त्यांनी लक्ष दिले नाही.—मत्तय २४:३९; लूक १७:२६, २७.

नोहाच्या अनुभवाचा तुम्हासाठी काय अर्थ होतो?

१४. नोहा व त्याच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीचा सामना द्यावा लागला तिची समज होणे आज आपल्याला तितके कठीण का वाटत नाही?

१४ अशा प्रकारच्या परिस्थितीचे आकलन होणे हे आमच्या बहुतेक वाचकांना तितकेसे जड वाटणार नाही. ते का? कारण आमच्या काळात अस्तित्वात असणारी परिस्थिती ही नोहाच्या काळी होती तशीच आहे. असे घडण्याची अपेक्षा धरावी असे येशू ख्रिस्ताने म्हटले होते. व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या काळी त्याची जी उपस्थिती प्रकट होणार होती त्याविषयीचा मोठा भविष्यवाद कथन करताना त्याने भाकित केले की, “नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”—मत्तय २४:३७.

१५, १६. (अ) नोहाच्या काळाप्रमाणेच आज देखील ही पृथ्वी हिंसाचाराने भरली आहे हे कसे खरे आहे? (ब) यहोवाच्या सेवकांवर खासपणे कोणता हिंसाचार ओढावतो?

१५ ते तसेच असल्याचे दिसले का? आज जग हिंसाचाराने भरलेले आहे का? होय! आमच्या शतकातील युद्धात दहा कोटींपेक्षा अधिक लोकांचा संहार घडला आहे. आमच्या काही वाचकांना याचे थेट परिणाम जाणवले असतील. तसेच अधिकाधिक लोकांना गुन्हेगारांकरवी त्यांचे पैसे किंवा इतर बहुमोल गोष्टी लुटण्याच्या दहशतीचा अनुभव घडला आहे. याचप्रमाणे आम्हातील युवकांना शाळेतील हिंसाचाराला तोंड द्यावे लागत आहे.

१६ तथापि, यहोवाच्या सेवकांना युद्धाची नासधूस आणि गुन्हेगारीच्या हिंसाचाराचा अनुभव यापेक्षा अधिक गोष्टी प्रत्ययास येत आहेत. ते स्वतः या जगाचा भाग नसल्यामुळे व ईश्‍वरी भक्‍ती आचरण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे ते देखील हिंसाचारास तोंड देऊन आहेत. (२ तीमथ्य ३:१०-१२) कधीकधी हा हिंसाचार ढकलाढकली किंवा चपडाका बसणे याचे रूप घेतो तर काही वेळेला त्यामध्ये मालकी हक्काच्या गोष्टींचा विध्वंस, जबर मारहाण व शिवाय मरण यांचाही अनुभव येतो.—मत्तय २४:९.

१७. आज अभक्‍तपणा अधिकाधिक पसरत आहे का? विवेचीत करा.

१७ अशा प्रकारची हिंसक कृत्ये करताना अभक्‍त लोकांनी कधीकधी तर अगदी स्पष्टरित्या देवाविरुद्धचा आपला उद्दामपणा जाहीर केला. आफ्रिकेतील एका जागी पोलिसांनी असे घोषित केलेः “सरकार आमचे आहे. तुम्ही तुमच्या देवाकडे जा आणि त्याने येऊन तुम्हाला मदत करावी असे त्याला सांगा.” यहोवाच्या साक्षीदारांना तुरुंगात तसेच राजकीय बंद्यांच्या छावण्यात बॅरॅनॉवस्की यासारख्या लोकांचा संपर्क येत असतो. या गृहस्थाने जर्मनीतील सॅस्चेनहॉसेन येथे असे म्हटले होतेः “मी यहोवाविरुद्ध लढत आरंभिली आहे. आपण बघू या की, कोण समर्थ आहे, मी की यहोवा.” काही काळातच बॅरॅनॉवस्की आजारी पडला व मरण पावला; पण इतरांनी तीच क्रूद्ध वागणूक दाखविणे चालू ठेवले. धार्मिक लोकांचा छळ करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांठायीच देवाचा उपहास करण्याची प्रवृत्ती दिसते असे नाही. जगभर देवाच्या सेवकांनी जे पाहिले व ऐकले आहे त्याकरवी हे स्पष्ट दिसून आले की, हिंसाचार करणाऱ्‍यांना आपल्या अंतर्यामी देवाचे मुळीच भय नसते.

१८. मानवजातीच्या खवळलेल्या स्थितीस दुरात्मे आणखी कोणत्या मार्गाने प्रक्षोभक बनवीत आहेत?

१८ नोहाच्या काळाशी सदृश्‍य असणाऱ्‍या आजच्या दिवसात दुरात्म्यांकरवीची ढवळाढवळ देखील आम्हाला पहावयास मिळते. (प्रकटीकरण १२:७-९) हे दुरात्मे तेच आहेत ज्यांनी पूर्वी रुपांतर केले होते व नोहाच्या काळातील मानवकन्यांशी लग्न केले होते. जलप्रलय आला तेव्हा त्यांच्या बायका व मुले त्यात गुदमरून मेली, पण ते बंडखोर दूत मात्र आत्मिक क्षेत्राकडे परत धावले. पण त्यांना आता यहोवाच्या पवित्र संस्थेमध्ये कोणतेही स्थान राहिले नव्हते तर त्यांना तार्तरसमध्ये म्हणजे काळोख्या स्थितीत, जेथे ईश्‍वरी प्रकाशाचा कोणताही किरण दिसत नाही त्या स्थितीत बद्ध करण्यात आले होते. (२ पेत्र २:४, ५) सैतानाच्या मार्गदर्शनाखाली राहून काम करीत असल्यामुळे त्यांनी पूर्वीसारखे रुपांतरीत होता येत नाही तरी मानवाशी जवळचा संपर्क ठेवून पुरुष, स्त्रिया व मुलांवर देखील आपला प्रभाव पाडण्याचे चालू ठेवले आहे. हा संपर्क ते भूतविद्येच्या माध्यमाने साधतात. मानवी विचाराला आव्हान देणाऱ्‍या मार्गाने ते मानवजातीस चिथावून एकमेकांचा संहार घडवून आणण्यास उद्युक्‍त करतात. पण एवढेच नाही.

१९. (अ) हे दुरात्मे खासपणे कोणाविरुद्ध आपला राग दाखवून आहेत? (ब) दुरात्मे आम्हावर काय करण्याची जबरदस्ती करीत आहेत?

१९ पवित्र शास्त्र प्रकटविते की, दुरात्मे “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष पटविणारे” लोक यांजशी लढत देत आहेत. (प्रकटीकरण १२:१२, १७) यहोवाच्या सेवकांवर छळ आणण्यासाठी हे दुरात्मे प्रामुख्यत्वे चिथावणी देणारे आहेत. (इफिसकर ६:१०-१३) ते हर प्रकारच्या मार्गाचा वापर करून विश्‍वासू लोकांची यहोवाप्रीत्यर्थ असणारी सचोटी भंगविण्याचा व यहोवाच्या राज्याचा तसेच त्या राज्याचा मशीही राजा येशू आहे हा प्रचार थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.

२०. आपल्या कब्जातून मुक्‍त होऊ पाहणाऱ्‍या लोकांना दुरात्मे कसे अडवण्याचा प्रयत्न करतात? (याकोब ४:७)

२० आपल्या जाचक प्रभावापासून दूर होण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांना हे दुरात्मे मागे खेचतात. ब्राझिलमधील एक पूर्वीची भूतविद्याप्रवीण स्त्री सांगते की, जेव्हा साक्षीदारांनी तिचे दार ठोठावले तेव्हा एका दुरात्म्याने तिला दार उघडू नकोस असे सांगितले; पण तिने दार उघडले व तिला सत्य मिळाले. कित्येक भागात हे दुरात्मे भूतविद्याप्रवीणांचा वापर यहोवाच्या साक्षीदारांचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी करतात. उदाहरणार्थ, सुरीनाम देशात यहोवाच्या साक्षीदारांचा विरोध करणाऱ्‍या लोकांनी एका सुप्रसिद्ध भूतविद्याप्रवीणाचा संपर्क घेतला, जो आपणाकडील नुसती जादूची कांडी एखाद्या माणसाकडे करून त्याचा एकाएकी मृत्यु घडवून आणण्यात चतुर होता. हा माणूस आपणाभोवती नाचणाऱ्‍या, ढोल बडविणाऱ्‍या लोकांना घेऊन दुरात्मिक प्रभावाने संचारुन यहोवाच्या साक्षीदारांना सामोरा गेला. त्याने आपल्या तोंडाने मंत्र पुकारला व आपली जादूची कांडी त्यांच्याकडे केली. खेडूतांना वाटले की, आता साक्षीदार जागच्या जागीच कोसळून मरणार. पण झाले उलटेच. साक्षीदारांऐवजी त्या मांत्रिकास भोवळ आली आणि मग भयचकित झालेल्या त्याच्या साथीदारांनी त्याला फरफटत नेले.

२१. नोहाच्या काळी होते त्याचप्रमाणे आज बहुतेक लोक आमच्या प्रचार कार्याविषयी कोणती प्रतिक्रिया दाखवितात, व का?

२१ जेथे भूतविद्या व मंत्रतंत्र इतक्या उघडपणे आचरले जात नाही अशा देशात यहोवाच्या साक्षीदारांना अशा लोकांचा संपर्क येतो जे आपल्या नित्य व्यवहारात इतके गढून गेलेले असतात की त्यांना साक्षीदार करीत असलेल्या प्रचाराविषयी लक्ष द्यायला देखील वेळ नसतो. नोहाच्या दिवसातही हेच होते की बहुतेकांनी ‘लक्ष दिले नाही.’ (मत्तय २४:३७-३९) आमची एकता बघून, आमची कार्यसिद्धी बघून पुष्कळांना मोठा अचंबा वाटतो. पण आमचे आध्यात्मिक उभारणीचे काम म्हणजे, व्यक्‍तीगत अभ्यास, सभांची नियमित उपस्थिती आणि क्षेत्र कार्य यामध्ये आम्ही केवढा वेळ देतो ते सारे त्यांना मूर्खपणाचे व वायफळ वाटते. त्यांनी त्यांचे जीवन भौतिक गोष्टींचे संपादन तसेच त्यांना मिळू शकणारा सुखोपभोग याजभोवती केंद्रित ठेवले असल्यामुळे आम्ही देवाच्या वचनातील अभिवचनांवर व्यक्‍त करीत असलेला विश्‍वास ते थट्टेवारी नेतात.

२२, २३. नोहाच्या काळी घडलेल्या गोष्टी, यहोवा ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांना परिक्षेतून सोडवू शकतो याची कशी सबळ खात्री देतात?

२२ तर मग, ज्यांच्याठायी देवाविषयी प्रेम नाही ते यहोवाच्या निष्ठावंत सेवकांना असेच सदासर्वदा जाचत राहणार का? मुळीच नाही! देवाने निर्देश केल्यावर नोहा आपल्या कुटुंबासोबत तयार झालेल्या तारवात शिरला. मग, देवाने ठरवून दिलेल्यावेळी, “महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशकपाटे उघडली.” हा प्रलय इतका मोठा होता की त्याच्या पाण्याने डोंगरांचे माथेही झाकले गेले. (उत्पत्ती ७:११, १७-२०) ज्या देवदूतांनी आपले स्वस्थान सोडले होते त्यांना परत आपली रुपांतरीत शरीरे टाकून द्यावी लागली व आत्मिक क्षेत्राकडे धावावे लागले. नेफिलिम व जगातील बाकीचे सर्व अभक्‍त लोक तसेच ज्यांनी नोहाचा इशारा हेतूपुरस्सर दुर्लक्षिला त्या सर्वांचा नाश झाला. पण दुसऱ्‍या बाजूस नोहा, त्याची बायको, त्याचे तीन पुत्र व त्या मुलांच्या बायका यांचा बचाव झाला. अशाप्रकारे यहोवाने नोहा व त्याच्या घराण्याला, त्यांनी इतकी वर्षे विश्‍वासूपणे सहन केलेल्या परीक्षेतून वाचविले.

२३ हेच यहोवा आजही ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांसाठी करून दाखवील का? यात कोणताही संशय नाही. याविषयी त्याने वचन दिले आहे व त्याविषयी त्याला खोटे बोलता येत नाही.—तीतास १:२; २ पेत्र ३:५-७.

[तळटीपा]

a  “ॲनोमिया याचा अर्थ देवाच्या कायद्यांविषयीचा अनादर किंवा उद्दामपणा; ॲसेबिया, [‘अभक्‍त लोक’ हे नाम ज्यापासून तयार झाले तो शब्द] याचा अर्थ म्हणजे देवाविषयी तीच वृत्ती असणे.”—वाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वर्डस्‌, खंड ४, पृष्ठ १७०.

तुम्हाला आठवते का?

◻ ईश्‍वरी भक्‍ती आचरणाऱ्‍या लोकांना परीक्षेतून सोडवणे यहोवाला ठाऊक आहे हे पेत्राने कसे दाखविले?

◻ नोहाच्या काळी हिंसाचार कोणकोणत्या गोष्टींमुळे वाढीस लागला?

◻ भावी गोलार्धव्याप्त जलप्रलयाच्या अनुषंगाने नोहावर कोणती जबाबदारी आली?

◻ नोहाच्या काळातील कोणकोणत्या समांतरता आज आपल्या काळी आपल्याला दिसतात?

[१४ पानांवरील चित्रं]

तारु बांधण्याचे काम मोठे कठीण व कितीतरी वर्षांचे होते

[१५ पानांवरील चित्रं]

नोहाने आपल्या कुटुंबाची आध्यात्मिकता वाढीस लावण्यासाठी वेळ देऊ केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा