वाचकांचे प्रश्न
पहिले योहान ४:१८ आपल्याला सांगते: “प्रीतिच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते.” परंतु पेत्राने लिहिले: “बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा.” (१ पेत्र २:१७) आपण या दोन वचनांची सांगड कशी घालू शकतो?
पेत्र आणि योहान हे दोघेही प्रेषित असून त्यांनी स्वतः येशू ख्रिस्ताकडून शिक्षण प्राप्त केले होते. यास्तव त्यांनी जे काही लिहिले ते एकमेकांसोबत जुळते याची आपल्याला खात्री असू शकते. वर उद्धृत केलेल्या वचनांच्या बाबतीत उपाय म्हणजे, दोन्ही प्रेषित वेगवेगळ्या प्रकारच्या भयाविषयी बोलत होते.
आपण पहिल्यांदा पेत्राच्या सल्ल्याचा विचार करू या. संदर्भानुसार, पेत्र, सहख्रिश्चनांना अधिकारपदी असलेल्यांबद्दल त्यांच्या मनोवृत्तीविषयी प्रेरित सल्ला देत होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो विशिष्ट क्षेत्रांमध्ये अधीनतेच्या योग्य दृष्टिकोनावर विवेचन मांडत होता. अशा प्रकारे, त्याने ख्रिश्चनांना मानवी सरकारात राजे किंवा शासक यासारख्या अधिकारयुक्त पदांवर असलेल्यांच्या अधीन राहण्याचा सल्ला दिला. (१ पेत्र २:१३, १४) तसेच पुढे पेत्राने लिहिले: “सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.”—१ पेत्र २:१७.
संदर्भ लक्षात घेता, ख्रिश्चनांनी ‘देवाचे भय धरले पाहिजे’ असे पेत्राने म्हटले तेव्हा आपल्याला देवाबद्दल गाढ, आदरयुक्त भय, सर्वात उच्च अधिकारपदी असेल्यांना नाखूष करण्याचे भय असले पाहिजे असा त्याच्या बोलण्याचा अर्थ होतो हे अगदी स्पष्ट आहे.—पडताळा इब्रीयांस ११:७.
प्रेषित योहानाच्या विवेचनांबद्दल काय? आधी १ योहानाच्या ४ थ्या अध्यायात, खोट्या संदेष्ट्यांकडून आलेल्या ‘प्रेरित उद्गारांची’ परीक्षा घेण्याच्या गरजेविषयी प्रेषित बोलला होता. हे उद्गार निश्चितच यहोवा देवाकडून येत नाहीत; ते या दुष्ट जगाकडून येतात किंवा प्रतिबिंबित होतात.
याउलट, अभिषिक्त ख्रिस्ती “देवापासून” आहेत. (१ योहान ४:१-६) त्यामुळे, योहानाने आर्जवले: “प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीति करावी, कारण प्रीति देवापासून आहे.” देवाने प्रीती दाखवण्यात पुढाकार घेतला—“तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” (१ योहान ४:७-१०) आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी?
स्पष्टतः, आपण आपल्या प्रेमळ देवाच्या ऐक्यतेत राहिले पाहिजे. आपण त्याची धास्ती बाळगू नये किंवा त्याला प्रार्थना करण्याची भीती बाळगू नये. पूर्वी योहानाने सल्ला दिला: “आपले मन आपल्याला दोषी ठरवीत नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करितो.” (१ योहान ३:२१, २२) होय, चांगला विवेक आपल्याला प्रार्थनेत देवाकडे दुर्बल किंवा प्रतिबंधक भयाविना जाण्याचे स्वातंत्र्य देतो. प्रीतीमुळे आपल्याला यहोवाला उद्देशून प्रार्थना करावेसे वाटते किंवा त्याच्याकडे जावेसे वाटते. या बाबतीत पाहता, “प्रीतिच्या ठायी भीति नसते.”
तर मग आता आपण या दोन विचारांना जुळवू या. एका ख्रिश्चनाला यहोवाबद्दल, त्याचे पद, शक्ती आणि न्याय याबद्दल गाढ आदरातून निर्माण होणारी श्रद्धापूर्ण भीती असली पाहिजे. परंतु आपण आपल्या देवाला आपला पिता म्हणूनही प्रेम करतो व आपल्याला त्याच्या अगदी जवळ असल्यासारखे वाटते शिवाय त्याच्याकडे मनमोकळेपणाने आपण जाऊ शकतो. त्याच्याबद्दलची धास्ती बाळगून मनातल्या मनात दबून जाण्याऐवजी, एका लहान मुलाला आपल्या प्रेमळ पालकाकडे जाताना जसे वाटते त्याचप्रकारे आपणही त्याच्याकडे जाऊ शकतो ही आपल्याला खात्री आहे.—याकोब ४:८.