तरुण लोक विचारतात . . .
मी सत्य स्वतःलाच कसे पटवू शकते?
“मी सत्यातच लहानाची मोठी झाले आणि मला नेहमी वाटायचं की, सत्यातच आपण वाढलो तर आपल्याला यहोवा कोण आहे हे चांगलं माहीत असतं. पण हे चुकीचं होतं!”—ॲन्टनेट.
“सत्य काय आहे?” येशूला वधण्यास ज्याने परवानगी दिली त्या पंतय पिलाताने हा सुप्रसिद्ध प्रश्न विचारला होता. (योहान १८:३८) पण येशूकडून उत्तर जाणून घेण्याच्या इच्छेने हा उपहासात्मक प्रश्न विचारलेला नव्हता, उलट त्याला संभाषण तेथेच थांबवायचे होते. “सत्य” जाणून घ्यायची त्याची इच्छा नव्हती. पण तुमच्याबद्दल काय? तुम्हाला खरोखरच सत्य जाणून घ्यायचे आहे का?
कित्येक शतकांपासून सत्य नेमके काय आहे हे जाणून घ्यायला तत्त्ववेत्त्यांनी डोके खाजवले पण काहीच झाले नाही. तुम्हाला मात्र पिलाताच्या या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते. येशू ख्रिस्ताने शिकवले की देवाचे वचन हे सत्य आहे. येशूने स्वतःलाही “सत्य” असे संबोधले. शिवाय प्रेषित योहानाने लिहिले: ‘सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.’ (योहान १:१७; १४:६; १७:१७) सबंध ख्रिस्ती शिकवणी ज्या नंतर बायबलमध्ये समाविष्ट करण्यात आल्या त्यांनाही ‘सत्य’ किंवा ‘सुवार्तेचे सत्य’ म्हणण्यात आले. (तीत १:१४; गलतीकर २:१४; २ योहान १, २) या ख्रिस्ती शिकवणींमध्ये, देवाचे व्यक्तिगत नाव, देवाच्या राज्याचे स्थापन होणे, पुनरुत्थान आणि येशूची खंडणी या सर्व गोष्टी सामील होतात.—स्तोत्र ८३:१८; मत्तय ६:९, १०; २०:२८; योहान ५:२८, २९.
हजारो असे तरुण आहेत ज्यांच्या पालकांनी त्यांना बायबलचे सत्य शिकवले आहे. पण याचा अर्थ हे सर्वजण ‘सत्याने चालत आहेत’ असा होतो का? (३ योहान ३, ४) तसे काही नाही. २० वर्षांच्या जेनीफरचेच उदाहरण घ्या ना; तिला यहोवाची साक्षीदार म्हणूनच लहानाची मोठी करण्यात आली होती. ती म्हणते: “माझी आई मला साक्षीदारांच्या अधिवेशनांमध्ये घेऊन जायची आणि मी सुद्धा बाप्तिस्मा घेण्याचा विचार करावा असं मला सुचवायची. पण मी विचार केला, ‘मला मुळीच साक्षीदार व्हायचं नाहीय. मला फक्त मौज मजा हवीय!’”
काही तरुण असे आहेत जे शिकवलेल्या गोष्टींवर विश्वास करतात पण बायबल खरोखर काय शिकवते याची त्यांनी खोलवर समज प्राप्त करून घेतलेली नसते. यात कोणता धोका आहे? काही व्यक्तींना ‘त्यांच्यामध्ये मूळ नाही’ असे येशूने सांगितले होते. असे लोक “अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात.” (मार्क ४:१७) इतरजणांना, बायबलमधील विश्वासांविषयी थोडेफार समजावून सांगता येते पण वैयक्तिकपणे त्यांनी देवाला ओळखलेले नसते. ॲनिसा नावाची एक तरुणी म्हणते: “मी लहान होते तेव्हा यहोवासोबत माझं स्वतःचं असं नातं नव्हतं . . . आईवडिलांचं होतं म्हणून माझंही होतं.”
तुमच्याबाबतीत काय? यहोवा हा तुमच्या पालकांचा देव आहे एवढेच तुम्हाला वाटते का? किंवा, बायबलच्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे, “हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे; मी म्हणतो, तूच माझा देव आहेस” असे तुम्ही म्हणू शकता का? (स्तोत्र ३१:१४) वस्तुस्थितीला तोंड द्यायला धैर्य लागते. ॲलेक्सांडर नावाचा एक तरुण म्हणतो: “मी पहिल्यांदा प्रामाणिकपणे आत्म-परीक्षण केलं.” अशा तऱ्हेने स्वतःचे परीक्षण करून पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, तुम्ही स्वतःला सत्य (सबंध ख्रिस्ती शिकवणुकी) पटवून दिलेलेच नाही. तुमचा कदाचित ठाम विश्वास नसेल आणि म्हणून जीवनाला काही दिशा नाही, अर्थ नाही असे तुम्हाला वाटत राहील.
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मिटिंग्समध्ये “मेक द ट्रुथ युवर ओन” हे गीत गातात.a तो सल्ला तुम्हाला लागू होत असेल. पण तुम्हाला हे कसे करता येईल? त्याची सुरवात तुम्ही कोठून करणार?
स्वतः समजून घ्या
रोमकर १२:२ येथे आपल्याला प्रेषित पौलाचा सल्ला वाचायला मिळतो: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे.” हे कसे करता येईल? ‘सत्याचे पूर्ण ज्ञान’ घेण्याद्वारे. (तीत १:१) बिरुया शहरातील प्राचीन लोकांना जे सांगण्यात आले ते त्यांनी फक्त ऐकून घेतले नाही. पण, ते शिकत असलेल्या “गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११.
एरीन नामक एका ख्रिस्ती तरुणीने स्वतः तेच करायचे ठरवले. ती म्हणते: “मी खूप अभ्यास केला. ‘हाच खरा धर्म हे मी कसं मानावं? यहोवा नावाचा कोणी देव आहे हे कशावरून?’ असं मी स्वतःलाच विचारलं.” तुम्हीसुद्धा स्वतःचा वैयक्तिक अभ्यासक्रम का ठेवत नाही? सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या बायबलवर आधारित असलेल्या पुस्तकाद्वारे तुम्ही सुरवात करू शकता.b ते लक्षपूर्वक वाचून काढा. तेथे दिलेली सर्व शास्त्रवचने उघडून वाचा आणि मग ती शास्त्रवचने तेथे का दिली आहेत हे पाहा. “सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला. . . कामकरी” तुम्ही बनाल तेव्हा सत्याविषयी तुमचे मत किती वेगळे असेल हे पाहून तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल!—२ तीमथ्य २:१५.
प्रेषित पेत्र म्हणाला की, बायबलमधील काही गोष्टी “समजावयास कठीण” आहेत आणि हे खरेच असल्याचे तुम्हाला कळेल. (२ पेत्र ३:१६) पण देवाचा आत्मा तुम्हाला कठीण विषयही समजायला मदत करील. (१ करिंथकर २:११, १२) काही समजत नाही तेव्हा देवाच्या मदतीसाठी प्रार्थना करा. (स्तोत्र ११९:१०, ११, २७) वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांमध्ये आणखी शोध करायचा प्रयत्न करा. कसे करायचे ते माहीत नसल्यास कोणाची तरी मदत घ्या. तुमचे आईवडिल किंवा ख्रिस्ती मंडळीतले इतर प्रौढ सदस्य तुमची मदत करू शकतील.
लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या ज्ञानाची फुशारकी मारण्यासाठी अभ्यास करत नाही. कॉलीन नावाचा एक तरुण म्हणतो: “तुम्ही यहोवाच्या गुणांबद्दल जाणून घेत असता.” तुम्ही जे काही वाचता त्यावर मनन करा म्हणजे ते तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहंचेल.—स्तोत्र १:२, ३.
ख्रिस्ती सभांमध्ये जाऊन मंडळीतल्या लोकांशी मिळणेजुळणे ठेवल्याने तुम्हाला आणखी मदत मिळू शकेल. नाहीतरी प्रेषित पौलाने म्हटलेच आहे की, मंडळी “सत्याचा स्तंभ व पाया” आहे. (१ तीमथ्य ३:१५) ख्रिस्ती सभा कंटाळवाण्या असतात अशी तक्रार काही तरुण करतात. “पण एक गोष्ट आहे, मिटिंगची तयारी केली नाही तर मिटींग्समधून इतके काही शिकायला मिळणार नाही,” असे कॉलीन म्हणतो. म्हणून, तयारी करूनच या. काय चालले आहे हे फक्त पाहत न बसता सहभाग घेतला तर मिटींग्समध्ये आणखीनच मजा येते.
अभ्यासाला वेळ नाही?
होय, शाळेचा गृहपाठ आणि घरातल्या कामांमुळे अभ्यासासाठी वेळ काढणे कठीण असेल. सुझन नावाची एक तरुणी लिहिते: “कितीतरी वर्षांपासून मला ठाऊक होतं की मिटींगची तयारी केली पाहिजे, पर्सनल स्टडी केला पाहिजे पण जमलंच नाही.”
सुझन, कम महत्त्वाच्या कामांमधून ‘वेळ काढू’ लागली. (इफिसकर ५:१५, १६, NW) पहिल्यांदा, तिने कशाकशाचा अभ्यास करायचा आहे त्याची यादी केली. मग, त्या प्रत्येकासाठी तिने वेळ ठरवली. पण तिने विरंगुळ्यासाठीही वेळ ठरवली. ती म्हणते: “सगळाचा सगळा रिकामा वेळ वापरू नका. आपल्याला थोडाफार विरंगुळाही हवा असतोच ना.” तुम्ही पण वेळ ठरवून पाहिले तर कदाचित त्याचा फायदा होईल.
शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगणे
शिकलेल्या गोष्टींचा उपयोग केला तर त्या गोष्टी आपल्यामध्ये भिनवण्यास आणखी मदत होते. दुसऱ्या कोणा व्यक्तीला शिकवण्याचा प्रयत्न करा. स्तोत्रकर्ता म्हणाला: “माझे मुख ज्ञान वदणार आहे; माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार.”—स्तोत्र ४९:३.
तुम्हाला सुवार्तेची लाज वाटत नसल्यास, तुम्ही तुमच्या शाळा सोबत्यांना आणि तुम्हाला भेटणाऱ्या इतर लोकांना तिच्याविषयी सांगायला कचरणार नाही. (रोमकर १:१६) इतरांशी सत्याविषयी बोलण्याच्या अशा संधींचा फायदा घेतल्याने तुम्ही शिकलेल्या गोष्टी उपयोगात आणत असाल; आणि अशा तऱ्हेने तुम्ही स्वतःच्या मनात आणि अंतःकरणात सत्य रुजवाल.
संगती जपा
पहिल्या शतकातल्या काही ख्रिश्चनांनी उत्तम आध्यात्मिक प्रगती केली होती. पण काही काळानंतरच प्रेषित पौलाला लगेच त्यांना पत्र लिहून विचारावे लागले: “मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?” (गलतीकर ५:७) ॲलेक्स नावाच्या एका तरुणाच्या बाबतीत असेच घडले. तो देवाच्या वचनाचा अभ्यास करत होता पण “वाईट संगतीत पडल्याने” तो मागे पडला असे तो कबूल करतो. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हालाही या बाबतीत काही बदल करावे लागतील.
त्याच्या उलट, चांगल्या संगतीने तुमची प्रगती होईल. नीतिसूत्रे २७:१७ म्हणते: “तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो.” ज्यांचे अनुकरण करता येईल अशा व्यक्ती शोधून काढा—ज्या स्वतःच्या जीवनात सत्य लागू करतात. तुमच्या घरातच तुम्हाला असे लोक भेटतील. जेनीफर ही तरुणी म्हणते: “आजोबांचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. रविवारच्या मिटींगसाठी आधीच तीन तास बायबल अभ्यासाची तयारी करायचे; त्यांची ती सवयच होती. प्रत्येक वचन ते वेगवेगळ्या बायबल भाषांतरणांमध्ये काढून पाहायचे आणि डिक्शनरीत अवघड शब्द पाहायचे. बायबलमधल्या बारीकसारीक तपशीलांची त्यांना फार माहिती. तुम्ही त्यांना काहीही विचारलं तरी त्याचे उत्तर ते बरोबर शोधून काढायचे.”
सत्य स्वतः समजून घेतल्यावर फार मोठा मौल्यवान खजिना मिळाल्यासारखे वाटते—जे तुम्ही कोणत्याही किंमतीवर दुसऱ्या कोणाला देणार नाही. म्हणून “माझ्या पालकांचा धर्म” म्हणजे सत्य असे कधीच समजू नका. तुमची खात्री अगदी स्तोत्रकर्त्यासारखी असली पाहिजे ज्याने म्हटले: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) बायबल काय शिकवते हे खरोखर जाणून घेतल्याने, त्यावर विश्वास केल्याने, इतरांना त्याविषयी सांगितल्याने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यानुसार चालल्याने तुम्ही सत्य स्वतः समजून घेतले आहे हे दाखवून द्याल.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या यहोवाचे गुणगान करा (इंग्रजी) या पुस्तकातून
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित
[१४ पानांवरील चित्र]
रिसर्च आणि व्यक्तिगत अभ्यास करून स्वतःला सत्य पटवून द्या