धडा ५७
तुमच्या हातून गंभीर पाप झालं तर काय?
तुमचं यहोवावर मनापासून प्रेम असलं, आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करत असला, तरी कधी ना कधी तुमच्या हातून लहान-मोठ्या चुका होतील. पण काही चुका जास्त गंभीर असतात. (१ करिंथकर ६:९, १०) जर तुमच्या हातून एखादं गंभीर पाप झालं तर हे लक्षात असू द्या, की यहोवाचं तुमच्यावर अजूनही प्रेम आहे. तुम्हाला क्षमा करायला आणि तुम्हाला मदत करायला तो नेहमी तयार आहे.
१. यहोवाने आपल्याला क्षमा करावी म्हणून आपण काय केलं पाहिजे?
यहोवावर प्रेम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा याची जाणीव होते, की आपल्या हातून एक गंभीर पाप घडलंय तेव्हा त्याला खूप दुःख होतं. पण यहोवाने आपल्या लोकांना दिलेल्या या वचनामुळे अशा व्यक्तीला खूप सांत्वन मिळतं: “तुमची पापं रक्तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील.” (यशया १:१८) जर आपण मनापासून पश्चात्ताप केला तर यहोवा आपल्याला पूर्णपणे क्षमा करेल. पण मनापासून पश्चात्ताप करण्यात कोणत्या गोष्टी सामील आहेत? पहिली गोष्ट म्हणजे, आपण केलेल्या चुकीबद्दल आपल्याला मनापासून वाईट वाटतं. त्यामुळे आपण ती चूक करायचं सोडून देतो. यासोबतच आपण यहोवाला कळकळीने प्रार्थना करून माफी मागतो. त्यानंतर, ज्या चुकीच्या विचारांमुळे किंवा सवयींमुळे आपण ते पाप केलं, त्यांवर मात करण्यासाठी आपण मेहनत घेतो. तसंच, आपण यहोवाच्या शुद्ध स्तरांप्रमाणे जगायचा प्रयत्न करतो.—यशया ५५:६, ७ वाचा.
२. आपल्या हातून पाप होतं तेव्हा यहोवा वडिलांद्वारे आपल्याला कशी मदत करतो?
यहोवा आपल्याला सांगतो की जर आपल्या हातून एखादं गंभीर पाप झालं, तर आपण “मंडळीच्या वडिलांना बोलवावं.” (याकोब ५:१४, १५ वाचा.) पवित्र शक्तीद्वारे नियुक्त केलेल्या या बांधवांचं यहोवावर आणि त्याच्या कळपातल्या मेंढरांवर खूप प्रेम आहे. ते यहोवासोबत पुन्हा चांगलं नातं जोडायला आपल्याला मदत करू शकतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय.—गलतीकर ६:१.
आपल्या हातून गंभीर पाप झालं असेल तर वडील आपल्याला कशी मदत करतील? दोन किंवा तीन वडील आपली चूक सुधारण्यासाठी आपल्याला बायबलमधून सल्ला देतील. हे पाप आपल्या हातून पुन्हा होऊ नये म्हणून बायबलमधला सल्ला कसा लागू करायचा, हे ते आपल्याला सांगतील आणि आपल्याला प्रोत्साहनही देतील. जेव्हा गंभीर पाप करणारी व्यक्ती पश्चात्ताप करत नाही, तेव्हा वडील तिला मंडळीतून काढून टाकायचा निर्णय घेतात. वाईट प्रभावांपासून मंडळीचं संरक्षण व्हावं म्हणून ते असं करतात.
आणखी जाणून घेऊ या
आपण एखादं गंभीर पाप केलं, तर यहोवा आपल्याला कशी मदत करतो हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्याबद्दलची कदर वाढवा.
३. पाप कबूल केल्यामुळे आपल्याला फायदा होतो
आपण जेव्हा पाप करतो तेव्हा खरंतर यहोवाचं मन दुखावत असतो. म्हणून त्याच्याजवळ आपलं पाप कबूल करणं योग्यच आहे. स्तोत्र ३२:१-५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
आपण केलेलं पाप लपवण्यापेक्षा ते यहोवाजवळ कबूल करणं का चांगलंय?
यहोवाजवळ आपलं पाप कबूल करण्यासोबतच, आपण जेव्हा मंडळीतल्या वडिलांची मदत घेतो, तेव्हा आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नावर चर्चा करा.
व्हिडिओमध्ये वडिलांनी कॅननला यहोवाकडे परत यायला कशी मदत केली?
वडिलांशी बोलताना, आपण काहीही मनात न ठेवता सगळंकाही प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं पाहिजे. कारण आपल्याला मदत करायची त्यांना इच्छा आहे. याकोब ५:१६ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
वडिलांशी प्रामाणिकपणे बोलल्यामुळे आपल्याला मदत करणं त्यांना सोपं का जातं?
पाप कबूल करा, वडिलांना खरं सांगा आणि यहोवाची प्रेमळ मदत स्वीकारा
४. यहोवा पाप करणाऱ्यांना दया दाखवतो
गंभीर पाप करणारी एखादी व्यक्ती जेव्हा यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगायला नकार देते, तेव्हा तिला मंडळीतून काढून टाकलं जातं आणि आपण तिच्यासोबत उठणं-बसणं ठेवत नाही. १ करिंथकर ५:६, ११ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
ज्या प्रकारे खमीर संपूर्ण पिठाला फुगवतं, त्याच प्रकारे पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवल्यामुळे पूर्ण मंडळीवर वाईट प्रभाव कसा पडू शकतो?
मंडळीतले वडील पाप करणाऱ्यांना यहोवासारखी दया दाखवतात. ज्यांना मंडळीतून काढून टाकलंय त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आणि त्यांना मदत करायचा ते प्रयत्न करतात. पाप करणाऱ्यांना मंडळीतून काढून टाकल्यामुळे सुरुवातीला जरी त्यांना खूप दुःख झालं, तरी यामुळे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. आणि यामुळेच बऱ्याच जणांना मंडळीत परत यायला मदत झाली आहे.—स्तोत्र १४१:५.
यहोवा पाप करणाऱ्यांशी जसं वागतो त्यावरून तो न्यायी, दयाळू आणि प्रेमळ असल्याचं कसं कळतं?
५. पश्चात्ताप करणाऱ्यांना यहोवा क्षमा करतो
एखादी व्यक्ती पश्चात्ताप करते, तेव्हा यहोवाला कसं वाटतं हे समजावण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं. लूक १५:१-७ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
यातून तुम्हाला यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं?
यहेज्केल ३३:११ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
पश्चात्ताप करण्यामध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट सामील आहे?
एका मेंढपाळाप्रमाणे यहोवालाही आपल्या मेंढरांची खूप काळजी आहे
काही जण म्हणतात: “मी जे केलंय त्याबद्दल मंडळीतल्या वडिलांना सांगायला मला भीती वाटते. ते मला मंडळीतून काढून टाकतील.”
असं वाटणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय सांगाल?
थोडक्यात
आपल्या हातून गंभीर पाप झालं, तरीसुद्धा जर आपल्याला त्याबद्दल मनापासून वाईट वाटत असेल, आणि ती चूक पुन्हा न करण्याचा जर आपण निश्चय केला असेल, तर यहोवा आपल्याला नक्की क्षमा करेल.
उजळणी
यहोवाजवळ आपलं पाप कबूल करणं का चांगलंय?
आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून आपण काय केलं पाहिजे?
आपण गंभीर पाप केलं असेल, तर आपण मंडळीतल्या वडिलांची मदत का घेतली पाहिजे?
हेसुद्धा पाहा
यशया १:१८ या वचनातले शब्द एका माणसाच्या बाबतीत कसे खरे ठरले ते पाहा.
गंभीर पाप करणाऱ्यांना मंडळीतले वडील कशा प्रकारे मदत करतात?
“गंभीर पाप करणाऱ्यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?” (टेहळणी बुरूज, ऑगस्ट २०२४)
पश्चात्ताप न करणाऱ्या पापी व्यक्तीला प्रेम आणि दया कशी दाखवली जाते ते पाहा.
“मंडळीतून काढून टाकलेल्यांसाठी मदत” (टेहळणी बुरूज, ऑगस्ट २०२४)
यहोवानेच आपल्याला त्याच्याकडे परत आणलं, असं मंडळीपासून दूर गेलेल्या एका माणसाला का वाटतं हे, “मी यहोवाकडे परत वळलं पाहिजे” या अनुभवात वाचा.