शांती—तुम्ही ती कशी मिळवू शकता?
या दुष्ट जगात राहत असल्यामुळे शांती मिळवण्यासाठी आपण खूप मेहनत करणं गरजेचं आहे. आपल्याकडे जरी काही प्रमाणात शांती असली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो. खरी आणि कायम टिकणारी शांती मिळवण्यासाठी मदत व्हावी म्हणून देवाचं वचन आपल्याला कोणता सल्ला देतं? आणि ती मिळवण्यासाठी आपण इतरांना मदत कशी करू शकतो?
खरी शांती मिळवण्यासाठी कशाची गरज आहे?
खरी शांती अनुभवण्यासाठी आपल्यामध्ये सुरक्षिततेची भावना असली पाहिजे आणि आपण भावनिक रीत्या सुदृढ असलं पाहिजे. तसंच, आपण इतरांशी घनिष्ठ मैत्री जोपासण्याचीही गरज आहे. कायम टिकणारी शांती मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण देवाशी जवळचा नातेसंबंध जोडला पाहिजे. हे आपण कसं करू शकतो?
जीवनातल्या चिंतेमुळे अनेकांची शांती हिरावते
जेव्हा आपण देवाच्या नीतिमान स्तरांचं आणि आज्ञांचं पालन करतो, तेव्हा आपला त्याच्यावर भरवसा आहे आणि त्याच्यासोबत एक शांतीपूर्ण नातेसंबंध जोडण्याची आपली इच्छा आहे हे आपण दाखवतो. (यिर्म. १७:७, ८; याको. २:२२, २३) असं केल्यामुळे देव आपल्या जवळ येतो आणि मनाची शांती देऊन आपल्याला आशीर्वादित करतो. यशया ३२:१७ म्हणतं: “नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.” मनापासून यहोवाच्या आज्ञा पाळल्यामुळे आपल्याला खरी मनाची शांती मिळते.—यश. ४८:१८, १९.
आणखी एका मार्गाने आपल्याला कायम टिकणारी शांती मिळू शकते. आपल्या पित्याने दिलेल्या अद्भुत भेटवस्तूद्वारे म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे आपण ती मिळवू शकतो.—प्रे. कार्ये ९:३१.
शांती मिळवायला मदत करणारा देवाचा पवित्र आत्मा
प्रेषित पौलने शांती हा गुण ‘आत्म्याच्या फळातला’ तिसरा पैलू असल्याचं सांगितलं. (गलती. ५:२२, २३) खरी शांती देवाच्या आत्म्याद्वारे उत्पन्न होत असल्यामुळे ती विकसित करण्यासाठी आपण पवित्र आत्म्याला आपल्यावर कार्य करू दिलं पाहिजे. देवाचा पवित्र आत्मा कोणत्या दोन मार्गांनी शांती मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतो ते आपण आता पाहू.
पहिला मार्ग म्हणजे, देवाच्या प्रेरित वचनाचं नियमितपणे वाचन करण्याद्वारे आपण शांती मिळवू शकतो. (स्तो. १:२, ३) जेव्हा आपण बायबलच्या संदेशावर मनन करतो, तेव्हा अनेक गोष्टींबद्दल असलेले यहोवाचे विचार समजण्यासाठी आपल्याला त्याच्या आत्म्याद्वारे मदत होते. उदाहरणार्थ, तो कशा प्रकारे शांती टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि शांतीचा गुण त्याच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हेही आपल्याला समजतं. जेव्हा आपण देवाच्या वचनातून शिकलेले धडे लागू करतो, तेव्हा आपण आपल्या जीवनात जास्त शांती अनुभवू शकतो.—नीति. ३:१, २.
दुसरा मार्ग म्हणजे, देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करणं. (लूक ११:१३) यहोवा आपल्याला वचन देतो की जर आपण त्याच्याकडे मदत मागितली, तर “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे [आपल्या] मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.” (फिलिप्पै. ४:६, ७) आपण जर नियमितपणे प्रार्थना केली आणि देवाचा पवित्र आत्मा मागितला तर देव आपल्याला मनाची शांती देईल. ही शांती फक्त त्यांनाच मिळते ज्यांची यहोवासोबत घनिष्ठ मैत्री असते.—रोम. १५:१३.
यहोवासोबत, इतरांसोबत आणि स्वतःसोबत कायम टिकणारी शांती अनुभवण्यासाठी काही लोकांनी शास्त्रातला हा सल्ला कसा लागू केला आणि आवश्यक असणारे बदल कसे केले?
काहींनी कायम टिकणारी शांती कशी मिळवली
आज ख्रिस्ती मंडळीत असे काही लोक आहेत जे आधी “रागीट” स्वभावाचे होते. पण आता ते खूप विचारपूर्वक बोलतात. तसंच ते इतरांसोबत दयाळूपणे, सहनशीलतेने आणि शांतीने व्यवहार करतात.a (नीति. २९:२२) ही गोष्ट एका बांधवाच्या आणि बहिणीच्या बाबतीत कशी खरी ठरली ते पाहा. आपल्या रागावर नियंत्रण मिळवायला आणि इतरांसोबत शांती प्रस्थापित करायला त्यांना मदत मिळाली.
बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आणि देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना केल्यामुळे शांती मिळवणं आपल्याला शक्य होतं
डेविडच्या बोलण्यावर त्याच्या वाईट स्वभावाचा परिणाम झाला होता. देवाला जीवन समर्पित करण्याआधी तो बऱ्याचदा लोकांची निंदा करायचा आणि कुटुंबातल्या लोकांशी कठोरपणे बोलायचा. कालांतराने डेविडला स्वतःमध्ये बदल करून शांती प्रस्थापित करण्याची गरज भासली. मग तो शांती टिकवून ठेवायला कसं शिकला? तो म्हणतो: “मी माझ्या जीवनात बायबलची तत्त्वं लागू करू लागलो आणि त्यामुळे मी माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना आदर देऊ लागलो आणि तेही माझ्याशी आदराने वागू लागले.”
रेचलच्या स्वभावावर तिच्या पार्श्वभूमीचा प्रभाव होता. ती म्हणते: “आजही मला माझ्या रागीट स्वभावाशी झगडावं लागतं कारण मी अशा घरात वाढले होते जिथे सर्वांचाच स्वभाव रागीट होता.” मग कोणत्या गोष्टीने तिला शांती प्रस्थापित करायला मदत केली? याचं उत्तर देताना ती म्हणते: “मी नियमितपणे यहोवाला प्रार्थना करायचे आणि त्याला मदत मागायचे.”
डेविड आणि रेचलच नाही तर असे इतरही आहेत, ज्यांनी बायबलच्या तत्त्वांचं पालन करून आणि देवाकडे पवित्र आत्म्याची मदत मागून शांती मिळवली आहे. यावरून हे स्पष्ट होतं, की या दुष्ट जगात राहत असतानाही आपण मनाची शांती मिळवू शकतो. यामुळे आपल्याला कुटुंबासोबत आणि बंधुभगिनींसोबत एकतेने राहायला मदत होते. पण त्यासोबतच आपण “सर्व माणसांसोबत . . . शांतीने” राहावं असा आर्जवही यहोवा करतो. (रोम. १२:१८) असं करणं खरंच शक्य आहे का? शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याचे कोणते फायदे होतात?
इतरांसोबत शांती प्रस्थापित करा
प्रचार कार्याद्वारे आपण लोकांना देवाच्या राज्याबद्दल शांतीपूर्ण संदेश सांगतो. यामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल आपण त्यांना सांगतो. (यश. ९:६, ७; मत्त. २४:१४) आनंदाची गोष्ट म्हणजे, अनेकांनी या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे ते त्यांच्या सभोवती चाललेल्या गोष्टींमुळे निराशेच्या आणि रागाच्या आहारी जात नाही. याउलट, आज त्यांच्याकडे भविष्याबद्दलची खरी आशा आहे. तसंच शांती शोधण्यासाठी व तिचं अवलंबन करण्यासाठी ते प्रेरित होतात.—स्तो. ३४:१४.
सर्वच जण आपल्या संदेशाला चांगला प्रतिसाद देतील असं नाही, निदान सुरुवातीला तरी नाही. (योहा. ३:१९) असं असलं तरी देवाच्या आत्म्याच्या मदतीने आपण त्यांना शांतीने आणि आदराने आनंदाचा संदेश सांगू शकतो. अशा प्रकारे वागण्याद्वारे आपण मत्तय १०:११-१३ मध्ये प्रचार कार्यासाठी येशूने दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन करत असू. तिथे म्हटलं: “एखाद्या घरात गेल्यावर घरातल्या लोकांना नमस्कार करा आणि त्यांना शांती मिळो अशी सदिच्छा व्यक्त करा. ते घर योग्य असेल, तर त्यांना शांती लाभेल; पण जर योग्य नसेल, तर ती शांती तुमच्याकडे परत येईल.” जेव्हा आपण येशूच्या सल्ल्याचं पालन करू तेव्हा आपण आपली शांती न गमावता तिथून निघून जाऊ शकतो. तसंच ती व्यक्ती पुढे जाऊन आपला संदेश ऐकेल अशी आशाही आपण ठेवू शकतो.
सरकारी अधिकाऱ्यांशी आदराने बोलण्याद्वारेही आपण शांती प्रस्थापित करण्याला हातभार लावत असतो. या अधिकाऱ्यांमध्ये अशांचाही समावेश आहे जे कदाचित आपल्या कामाचा विरोध करतात. उदाहरणार्थ, आफ्रिकेच्या एका देशातल्या सरकाराला आपल्याबद्दल पूर्वग्रह असल्यामुळे ते राज्य सभागृह बांधण्याच्या कामाला परवानगी देत नव्हतं. ही समस्या शांतीने सोडवता यावी म्हणून, त्या देशात आधी मिशनरी म्हणून सेवा केलेल्या एका बांधवाला आफ्रिकेतल्या राजदूताला भेटायला पाठवण्यात आलं. हा बांधव त्याला भेटायला इंग्लंडमधल्या लंडन शहरात गेला. यहोवाचे साक्षीदार त्या देशात शांतीपूर्ण पद्धतीने काम करत आहेत हे त्याला राजदूताला सांगायचं होतं. मग काय झालं?
बांधव सांगतात: “मी जेव्हा रिसेप्शन डेस्कजवळ आलो तेव्हा तिथल्या रिसेप्शनीस्टच्या पेहरावावरून मला कळलं की मी ज्या जमातीची भाषा शिकलो होतो ती त्याच जमातीची आहे. त्यामुळे मी तिला तिच्याच भाषेत अभिवादन केलं. या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटलं. तिने मला तिथे येण्याचं कारण विचारलं. मी नम्रतेने तिला सांगितलं की मला राजदूताला भेटायचं आहे. तिने त्याला फोन लावला आणि तो मला भेटायला बाहेर आला व त्याने आपल्या भाषेत मला अभिवादन केलं. त्यानंतर मी त्याला साक्षीदारांच्या शांतीपूर्ण कार्यांबद्दल सांगत असताना त्याने माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं.”
बांधव त्या राजदूताशी आदरपूर्वक बोलल्यामुळे आपल्या कार्याबद्दल असलेले त्यांचे बरेचसे गैरसमज आणि पूर्वग्रह दूर झाले. काही काळाने आफ्रिकेच्या त्या देशातल्या सरकाराने सभागृह बांधण्याची परवानगी दिली. या चांगल्या परिणामामुळे बांधवांना किती आनंद झाला असावा! खरंच, इतरांना आदराने वागवल्यामुळे खूप चांगले परिणाम घडून येतात आणि आपण इतरांसोबत शांतीही राखू शकतो.
शांतीचा लाभ सर्वकाळासाठी!
आज देवाचे लोक आध्यात्मिक नंदनवनात खरी शांती अनुभवत आहेत. या शांतीला हातभार लावण्यासाठी आत्म्याच्या फळाच्या या पैलूला तुम्हीही विकसित करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं केल्यामुळे तुम्हाला देवाची स्वीकृती आणि नवीन जगात भरपूर प्रमाणात व कायम टिकणारी शांती मिळेल.—२ पेत्र ३:१३, १४.
a “आत्म्याचे फळ” यावर आधारित असलेल्या या मालिकेत पुढच्या एका लेखात आपण दया या गुणाबद्दल चर्चा करणार आहोत.