यहेज्केल
३५ मग यहोवाकडून मला परत असा संदेश मिळाला: २ “मनुष्याच्या मुला, सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशाकडे आपलं तोंड कर आणि त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर.+ ३ त्याला म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “हे सेईरच्या डोंगराळ प्रदेशा! बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय. मी तुझ्यावर आपला हात उगारीन आणि तुला उद्ध्वस्त व उजाड करून टाकीन.+ ४ मी तुझ्या शहरांना दगड-मातीचा ढिगारा करून टाकीन. तू उद्ध्वस्त आणि उजाड होशील,+ तेव्हा तुला कळून येईल की मी यहोवा आहे. ५ कारण तू कायम इस्राएली लोकांशी शत्रुत्व बाळगलंस.+ त्यांच्यावर जेव्हा संकट कोसळलं, त्यांना शेवटली शिक्षा मिळत होती, तेव्हा तू त्यांना तलवारीच्या हवाली केलंस.”’+
६ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, मी तुझा रक्तपात करायची तयारी करीन आणि रक्तपात तुझा पिच्छा करेल.+ तू रक्ताचा द्वेष केलास, म्हणून आता रक्तपात तुझा पाठलाग करेल.+ ७ हे सेईरच्या डोंगराळ प्रदेशा! मी तुला उद्ध्वस्त आणि उजाड करीन.+ तुझ्यातून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचा मी नाश करून टाकीन. ८ मी तुझे डोंगर प्रेतांनी भरून टाकीन. आणि तलवारीने कत्तल झालेल्यांची प्रेतं तुझ्या टेकड्यांवर, दऱ्या-खोऱ्यांत आणि सगळ्या झऱ्यांमध्ये पडून राहतील. ९ मी तुला कायमचं उजाड करून टाकीन, आणि तुझ्या शहरांत पुन्हा कधीच लोकवस्ती होणार नाही.+ तेव्हा तुला कळून येईल, की मी यहोवा आहे.’
१० तू म्हणालास, ‘ही दोन्ही राष्ट्रं, हे दोन्ही देश माझे होतील, आणि मी त्यांच्यावर कब्जा करीन.’+ मी यहोवा स्वतः त्या राष्ट्रांसोबत असताना तू असं म्हणालास. ११ ‘म्हणून मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन तुला सांगतो, तू जसा माझ्या लोकांचा द्वेष केलास, त्यांच्याशी रागाने वागलास आणि त्यांचा हेवा केलास, तसंच मीही तुझ्याशी वागीन,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.+ ‘मी तुला शिक्षा करीन, आणि मी कोण आहे हे त्यांना दाखवून देईन. १२ तेव्हा तुला कळून येईल, की तू इस्राएलच्या डोंगरांचा अपमान करायला ज्या गोष्टी बोललास, त्या सगळ्या मी स्वतः यहोवाने ऐकल्यात. तू म्हणालास, “ते सगळे उजाड पडलेत आणि आपल्याला खाण्यासाठी दिलेत.” १३ तू माझ्या विरोधात मगरुरीने बोललास, माझ्याविरुद्ध वाटेल ते बोललास.+ ते सगळं मी ऐकलंय.’
१४ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘मी जेव्हा तुला उजाड करून टाकीन, तेव्हा संपूर्ण पृथ्वीला आनंद होईल. १५ इस्राएलच्या घराण्याचा वारसा उजाड झाला, तेव्हा तुला आनंद झाला. मीही तुझ्याशी तसंच वागीन.+ हे सेईरच्या डोंगराळ प्रदेशा! हे अदोमच्या संपूर्ण प्रदेशा! तू उद्ध्वस्त आणि उजाड होशील.+ तेव्हा सर्व लोकांना कळून येईल, की मी यहोवा आहे.’”