मत्तयने सांगितलेला संदेश
१४ त्या वेळी प्रांताधिकारी हेरोद* याने येशूबद्दल ऐकलं+ २ आणि तो आपल्या सेवकांना म्हणाला: “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. म्हणूनच तो ही सगळी अद्भुत कार्यं करतोय.”+ ३ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+ ४ कारण योहान त्याला बऱ्याच वेळा म्हणाला होता: “तू हेरोदियाला आपली बायको बनवलं हे कायद्याने योग्य नाही.”+ ५ खरंतर, योहानला ठार मारायची हेरोदची इच्छा होती. पण त्याला लोकांची भीती वाटत होती, कारण ते योहानला संदेष्टा मानायचे.+ ६ मग हेरोदच्या वाढदिवसाच्या+ सोहळ्यात हेरोदियाची मुलगी नाचली, तेव्हा हेरोद खूप खूश झाला.+ ७ म्हणून त्याने शपथ घेऊन, ती जे काही मागेल ते तिला दिलं जाईल असं वचन दिलं. ८ तेव्हा आपल्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं डोकं मला एका थाळीत आणून द्या.”+ ९ हे ऐकून राजाला दुःख झालं, पण शपथ घेतल्यामुळे आणि त्याच्यासोबत जेवायला बसलेल्या लोकांमुळे त्याने तिला ते देण्याची आज्ञा दिली. १० त्याने तुरुंगात माणसं पाठवून योहानचं डोकं कापलं. ११ मग ते एका थाळीत आणून त्या मुलीला देण्यात आलं आणि तिने ते आपल्या आईकडे नेलं. १२ नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचा मृतदेह तिथून नेला आणि तो पुरला. मग ते येशूकडे आले आणि त्यांनी त्याला सगळी हकिगत सांगितली. १३ हे ऐकल्यावर, एकांत मिळावा म्हणून येशू नावेत बसून अशा एका ठिकाणी निघून गेला, जिथे कोणीही राहत नव्हतं. पण लोकांना हे समजलं तेव्हा ते नगरांतून पायी त्याच्यामागे गेले.+
१४ तो किनाऱ्याजवळ आला तेव्हा लोकांचा मोठा समुदाय पाहून त्याला त्यांचा कळवळा आला+ आणि त्याने त्यांच्यातल्या आजारी लोकांना बरं केलं.+ १५ पण संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “इथे आसपास कोणीही राहत नाही आणि खूप उशीरही झालाय. म्हणून लोकांना पाठवून दे म्हणजे ते जवळच्या गावांत जाऊन स्वतःसाठी काही खायला विकत घेतील.”+ १६ पण येशू त्यांना म्हणाला: “त्यांना जायची गरज नाही. तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” १७ तेव्हा ते म्हणाले: “आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” १८ यावर तो म्हणाला: “ते इकडे माझ्याकडे आणा.” १९ मग त्याने लोकांना गवतावर बसायला सांगितलं. त्यानंतर त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहिलं आणि धन्यवाद देऊन+ भाकरी मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना दिल्या. २० मग सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्न गोळा केलं, तेव्हा त्याच्या १२ टोपल्या भरल्या.+ २१ जेवणाऱ्यांमध्ये जवळजवळ ५,००० पुरुष, तसंच स्त्रिया आणि लहान मुलंही होती.+ २२ मग लगेच त्याने आपल्या शिष्यांना नावेत बसून आपल्यापुढे पलीकडच्या किनाऱ्यावर जायला सांगितलं आणि तो लोकांना निरोप देऊ लागला.+
२३ लोकांना पाठवल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थना करायला निघून गेला.+ संध्याकाळ झाली तेव्हा तो तिथे एकटाच होता. २४ इकडे शिष्यांची नाव किनाऱ्यापासून काही किलोमीटर* दूर गेली होती. ती लाटांमुळे हेलकावे खात होती, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. २५ मग रात्रीच्या चौथ्या प्रहरी,* येशू समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला. २६ शिष्यांनी त्याला समुद्रावर चालताना पाहिलं तेव्हा त्यांना भीती वाटली आणि ते म्हणाले: “आपल्याला काहीतरी भास होतोय!” तेव्हा ते घाबरून ओरडू लागले. २७ पण येशू लगेच त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “तुम्ही का घाबरता? भिऊ नका, मी आहे.”+ २८ पेत्रने त्याला उत्तर दिलं: “प्रभू तू असशील तर मला पाण्यावरून तुझ्याजवळ येण्याची आज्ञा दे.” २९ तो म्हणाला: “ये!” तेव्हा पेत्र नावेतून उतरला आणि पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. ३० पण वादळाकडे पाहून तो घाबरला आणि बुडू लागला. तो ओरडून म्हणाला: “प्रभू, मला वाचव!” ३१ येशूने लगेच आपला हात पुढे करून त्याला धरलं आणि तो म्हणाला: “अरे अल्पविश्वासी माणसा,* तू शंका का घेतलीस?”+ ३२ ते नावेत चढल्यावर वादळ शांत झालं. ३३ तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले: “तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस!” ३४ मग ते पलीकडे गनेसरेतच्या भागात गेले.+
३५ तिथल्या लोकांनी त्याला ओळखलं तेव्हा त्यांनी आसपासच्या प्रदेशात निरोप पाठवला. त्यामुळे, लोक सगळ्या आजारी माणसांना त्याच्याजवळ आणू लागले. ३६ ते त्याला अशी विनंती करू लागले की, आम्हाला फक्त तुमच्या कपड्यांच्या काठाला हात लावू द्या.+ तेव्हा ज्यांनी ज्यांनी हात लावला ते सगळे पूर्णपणे बरे झाले.