मत्तयने सांगितलेला संदेश
८ मग, तो डोंगरावरून खाली उतरल्यावर लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे जाऊ लागला. २ तितक्यात एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि आदराने त्याच्यापुढे वाकून* त्याला म्हणाला: “प्रभू, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”+ ३ तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि तो म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.”+ आणि त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग बरा होऊन तो शुद्ध झाला.+ ४ मग येशू त्याला म्हणाला: “हे बघ, कुणालाही याबद्दल सांगू नकोस.+ तर याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव+ आणि त्यांना* साक्ष मिळावी म्हणून मोशेने सांगितलेलं अर्पण दे.”+
५ तो कफर्णहूमला आला तेव्हा सैन्यातला एक अधिकारी त्याच्याकडे येऊन त्याला विनंती करू लागला+ ६ आणि म्हणाला: “प्रभू, माझा नोकर घरी आजारी आहे, त्याला लकवा मारलाय आणि खूप त्रास होतोय.” ७ तो त्याला म्हणाला: “तिथे आल्यावर मी त्याला बरं करीन.” ८ तेव्हा तो अधिकारी म्हणाला: “प्रभू, तुम्ही माझ्या घरी यावं इतकी माझी लायकी नाही. तुम्ही फक्त तोंडातून शब्द काढला तरी माझा नोकर बरा होईल. ९ कारण मी स्वतः दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस आहे. माझ्या हाताखालीही सैनिक आहेत. मी त्यांच्यापैकी एकाला ‘जा!’ म्हटलं तर तो जातो आणि दुसऱ्याला ‘ये!’ म्हटलं तर तो येतो. माझ्या दासाला मी, ‘अमुक कर!’ असं म्हटलं तर तो ते करतो.” १० येशूने हे ऐकलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. म्हणून त्याच्यामागे येणाऱ्या लोकांना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, मला इस्राएलमध्ये इतका मोठा विश्वास असलेला एकही माणूस पाहायला मिळाला नाही.+ ११ पण मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून बरेच जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर एकाच मेजावर बसून जेवतील.+ १२ पण राज्याच्या मुलांना बाहेर अंधारात टाकलं जाईल. तिथे ती रडतील आणि आक्रोश करतील.”*+ १३ मग येशू त्या अधिकाऱ्याला म्हणाला: “जा. तू दाखवलेल्या विश्वासाप्रमाणे घडो.”+ आणि त्याच वेळी त्याचा नोकर बरा झाला.+
१४ मग येशू पेत्रच्या घरी आला तेव्हा त्याने पाहिलं, की त्याची सासू+ तापाने आजारी आहे.+ १५ त्याने तिच्या हाताला स्पर्श केला,+ तेव्हा तिचा ताप उतरला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. १६ नंतर, संध्याकाळ झाल्यावर लोकांनी त्याच्याकडे दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्या बऱ्याच जणांना आणलं. तेव्हा त्याने फक्त आपल्या शब्दाने दुष्ट स्वर्गदूतांना घालवलं आणि आजारी असलेल्या सर्वांना बरं केलं. १७ अशा प्रकारे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेले हे शब्द पूर्ण झाले: “त्याने आमचे आजार आणि आमची दुखणी स्वतःवर घेतली.”+
१८ मग आपल्याभोवती लोक जमलेले पाहून येशूने शिष्यांना पलीकडे जायची आज्ञा दिली.+ १९ तेव्हा एक शास्त्री त्याच्याकडे येऊन म्हणाला: “गुरुजी, तुम्ही जिथेही जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”+ २० पण येशू त्याला म्हणाला: “कोल्ह्यांना राहायला गुहा आणि आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत. पण मनुष्याच्या मुलाला तर डोकं टेकायलाही जागा नाही.”+ २१ मग शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला: “प्रभू, आधी मला जाऊन माझ्या वडिलांना पुरू द्या.”+ २२ येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे चालत राहा आणि जे मेलेले आहेत त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे.”+
२३ मग तो एका नावेत चढल्यावर त्याचे शिष्यही त्याच्यामागे गेले.+ २४ अचानक, समुद्रात मोठं वादळ आलं आणि लाटा नावेवर आदळू लागल्या; पण तो झोपला होता.+ २५ तेव्हा, त्याच्याकडे येऊन त्यांनी त्याला उठवलं आणि म्हटलं: “प्रभू, वाचव, आपण बुडतोय!” २६ पण, तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता?* किती कमी विश्वास आहे तुमच्यात!”+ मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला आणि समुद्राला दटावलं. तेव्हा समुद्र अगदी शांत झाला.+ २७ हे पाहून शिष्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हा माणूस आहे तरी कोण? वारा आणि समुद्रही याचं ऐकतात.”
२८ मग तो पलीकडे गदरेकरांच्या प्रदेशात आला. तेव्हा, दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेली दोन माणसं कबरस्तानातून येताना त्याला दिसली.+ ती माणसं इतकी भयंकर होती, की त्या रस्त्याने जाण्याचं कोणाचंही धाडस व्हायचं नाही. २९ अचानक ती माणसं किंचाळून म्हणाली: “देवाच्या मुला, तुझ्याशी आमचं काय घेणंदेणं?+ नेमलेल्या वेळेआधीच+ तू आम्हाला शिक्षा द्यायला* आलास का?”+ ३० तिथून बऱ्याच अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.+ ३१ त्यामुळे ते दुष्ट स्वर्गदूत त्याला अशी विनवणी करू लागले: “तू जर आम्हाला काढून टाकणार असशील, तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठव.”+ ३२ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “जा!” मग ते त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये शिरले. तेव्हा, तो कळप धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि बुडून मेला. ३३ मग, कळप चारणारे तिथून पळाले. ते शहरात गेले आणि घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल, तसंच दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्या माणसांबद्दलही त्यांनी लोकांना सांगितलं. ३४ तेव्हा शहरातले सगळे लोक येशूला भेटायला निघाले आणि त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला आपल्या प्रदेशातून निघून जायची विनंती केली.+