मार्कने सांगितलेला संदेश
७ मग, परूशी आणि यरुशलेमहून आलेले काही शास्त्री येशूच्या भोवती जमले.+ २ त्यांनी पाहिलं, की त्याचे काही शिष्य अशुद्ध हातांनी, म्हणजे हात न धुता* जेवत होते. ३ (कारण परूशी आणि सगळे यहुदी, वाडवडिलांच्या परंपरांचं काटेकोरपणे पालन करतात. ते कोपरांपर्यंत हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत ४ आणि बाजारातून आल्यावर स्वतःला पाण्याने शुद्ध केल्याशिवाय ते जेवत नाहीत. त्यांना प्याले, घागरी आणि तांब्याची भांडी विधिपूर्वक धुणं,* यांसारख्या इतर बऱ्याच परंपराही देण्यात आल्या आहेत आणि ते त्यांचं काटेकोरपणे पालन करतात.)+ ५ त्यामुळे परूश्यांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारलं: “तुमचे शिष्य, वाडवडिलांच्या परंपरांचं पालन का करत नाहीत आणि अशुद्ध हातांनी का जेवतात?”+ ६ तो त्यांना म्हणाला: “तुम्हा ढोंग्यांबद्दल यशयाने भविष्यवाणीत जे म्हटलं होतं ते अगदी खरंय. त्याने लिहिलं, ‘हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे.+ ७ ते माझी उपासना करत असले, तरी ती व्यर्थ आहे कारण ते माणसांच्या आज्ञा, देवाचे सिद्धान्त म्हणून शिकवतात.’+ ८ तुम्ही देवाची आज्ञा पाळायचं सोडून माणसांच्या परंपरांना धरून बसता.”+
९ तो त्यांना असंही म्हणाला: “तुमच्या परंपरांचं पालन करण्यासाठी तुम्ही देवाची आज्ञा चलाखीने टाळता.+ १० उदाहरणार्थ, मोशेने म्हटलं, ‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,’+ आणि ‘जो आपल्या वडिलांशी किंवा आईशी अपमानास्पद बोलतो* त्याला ठार मारलं जावं.’+ ११ पण तुम्ही म्हणता, ‘जर एखादा आपल्या वडिलांना किंवा आईला म्हणतो, की “तुम्हाला उपयोगी पडेल असं जे काही माझ्याकडे आहे ते कुर्बान आहे (म्हणजे देवाला अर्पण केलेलं आहे),” तर यात काहीच गैर नाही.’ १२ असं म्हणून तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.+ १३ आणि अशा रितीने तुम्ही वर्षानुवर्षं चालू ठेवलेल्या तुमच्या परंपरांमुळे देवाचं वचन तुच्छ लेखता.+ शिवाय, अशा आणखी कितीतरी गोष्टी तुम्ही करता.”+ १४ मग, लोकांना पुन्हा आपल्याजवळ बोलावून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही सगळे माझं ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या.+ १५ अशी कोणतीही बाहेरची गोष्ट नाही, जी माणसाच्या आत जाऊन त्याला अशुद्ध करते. तर, ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्याच त्याला अशुद्ध करतात.”+ १६*——
१७ मग तो लोकांच्या गर्दीतून निघून काही अंतरावर असलेल्या एका घरात गेला. तेव्हा त्याने दिलेल्या या उदाहरणाबद्दल शिष्य त्याला प्रश्न विचारू लागले.+ १८ त्यामुळे तो त्यांना म्हणाला: “त्यांच्याप्रमाणेच तुम्हालाही समजलं नाही का? बाहेरून माणसाच्या आत जाणारी कोणतीही गोष्ट त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्हाला माहीत नाही का? १९ कारण ती त्याच्या हृदयात नाही, तर त्याच्या पोटात जाऊन शरीराबाहेर टाकली जाते.” असं म्हणून त्याने खाण्याच्या सगळ्या गोष्टी शुद्ध ठरवल्या. २० मग तो म्हणाला: “ज्या गोष्टी माणसाच्या आतून निघतात त्याच गोष्टी त्याला अशुद्ध करतात.+ २१ कारण आतून म्हणजे माणसाच्या हृदयातून+ दुष्ट विचार निघतात. त्यामुळे अनैतिक लैंगिक कृत्यं,* चोऱ्या, खून, २२ व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, फसवणूक, निर्लज्ज वर्तन,* ईर्ष्या,* निंदा, गर्व आणि मूर्खपणा या गोष्टी घडतात. २३ या सगळ्या वाईट गोष्टी माणसाच्या आतून निघतात आणि त्याला अशुद्ध करतात.”
२४ नंतर तो तिथून उठला आणि सोर आणि सीदोनच्या प्रदेशात गेला.+ तिथे तो एका घरात गेला. पण आपण तिथे आहोत हे कोणालाही कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी, लोकांना ते कळलंच. २५ इतक्यात एक स्त्री, जिची लहान मुलगी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेली होती, तिने येशूबद्दल ऐकलं आणि ती त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडली.+ २६ ती स्त्री ग्रीक होती आणि सीरिया प्रांतातल्या फेनिके इथे राहणारी होती. ती आपल्या मुलीतून दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकण्याची त्याला पुन्हापुन्हा विनंती करत होती. २७ पण तो तिला म्हणाला: “आधी मुलांचं पोट भरलं पाहिजे, कारण मुलांसाठी असलेली भाकर घेऊन कुत्र्याच्या पिल्लांपुढे टाकणं योग्य नाही.”+ २८ पण ती त्याला म्हणाली: “खरंय प्रभू, पण मेजाखाली असलेली कुत्र्याची पिल्लंसुद्धा, मुलांच्या हातातून पडणारे तुकडे खातातच ना.” २९ तेव्हा तो तिला म्हणाला: “तू हे बोललीस, म्हणून जा, तुझ्या मुलीतून दुष्ट स्वर्गदूत निघून गेलाय.”+ ३० मग ती आपल्या घरी गेली तेव्हा तिने पाहिलं, की तिची मुलगी अंथरुणावर पडलेली आहे आणि तिच्यातून दुष्ट स्वर्गदूत निघून गेला आहे.+
३१ सोरच्या प्रदेशातून परत आल्यावर, येशू सीदोन आणि दकापलीसच्या* मार्गाने गालील समुद्राकडे आला.+ ३२ इथे लोकांनी एका बहिऱ्या माणसाला त्याच्याकडे आणलं. त्याला स्पष्टपणे बोलताही येत नव्हतं.+ येशूने त्या माणसावर हात ठेवावा अशी त्यांनी त्याला विनंती केली. ३३ तेव्हा, त्याने त्याला एका बाजूला, गर्दीपासून दूर नेलं. त्याने त्या माणसाच्या कानांत बोटं घातली आणि तो थुंकला. मग त्याने त्याच्या जिभेला स्पर्श केला.+ ३४ त्यानंतर आकाशाकडे पाहून त्याने मोठा उसासा टाकला आणि तो त्याला म्हणाला: “एप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.” ३५ तेव्हा, त्याचे कान उघडले+ आणि त्याच्या बोलण्यातला दोष जाऊन तो स्पष्टपणे बोलू लागला. ३६ येशूने लोकांना बजावून सांगितलं, की त्यांनी याबद्दल कोणालाही सांगू नये.+ पण त्याने त्यांना जितकं बजावून सांगितलं, तितकाच जास्त ते त्याबद्दल गाजावाजा करू लागले.+ ३७ ते खूप आश्चर्यचकित होऊन म्हणाले:+ “तो किती अद्भुत गोष्टी करतो! बहिऱ्यांना आणि मुक्यांनाही बरं करतो.”+