रोमकर यांना पत्र
१३ प्रत्येकाने* वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावं,+ कारण देवाकडून नाही असा कोणताही अधिकार नाही.+ जे काही अधिकार आहेत, ते देवानेच नेमले आहेत.+ २ त्यामुळे, जो अधिकाराचा विरोध करतो तो देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा विरोध करतो. आणि देवाच्या व्यवस्थेचा विरोध करणारे स्वतःवर न्यायदंड ओढवतील. ३ कारण अधिकाऱ्यांची भीती चांगली कामं करणाऱ्यांना नाही, तर वाईट कामं करणाऱ्यांना असते.+ आपल्याला अधिकाऱ्याची भीती नसावी, असं तुला वाटतं का? तर मग, चांगलं ते करत राहा+ म्हणजे तो तुझी प्रशंसा करेल. ४ कारण तो तुझ्या भल्यासाठी नेमलेला देवाचा सेवक आहे. पण, तू जर वाईट कामं करत असशील तर मात्र भीती बाळग. कारण तो काही उगीच तलवार ठेवत नाही; तर वाईट कामं करत राहणाऱ्यांविरुद्ध क्रोध व्यक्त करण्यासाठी* तो सूड घेणारा देवाचा सेवक आहे.
५ म्हणून फक्त त्याच्या क्रोधामुळे नाही, तर आपल्या विवेकामुळेही तुम्ही त्याच्या अधीन राहणं गरजेचं आहे.+ ६ त्यामुळेच, तुम्ही करही भरता. कारण अधिकारी देवाचे जनसेवक आहेत आणि हेच काम करत असतात. ७ ज्याला जे द्यायचं आहे, ते त्याला द्या: ज्याला कर द्यायचा आहे त्याला कर द्या,+ ज्याला जकात द्यायची आहे त्याला जकात द्या, ज्याची भीती बाळगली पाहिजे त्याची भीती बाळगा+ आणि ज्याचा आदर केला पाहिजे त्याचा आदर करा.+
८ एकमेकांवर प्रेम करणं, याशिवाय कोणाचं काही कर्ज ठेवू नका.+ कारण जो दुसऱ्यावर प्रेम करतो त्याने नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन केलं आहे.+ ९ कारण, “व्यभिचार करू नका,+ खून करू नका,+ चोरी करू नका,+ लोभ धरू नका,”+ या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असेल, तर तिचा सारांश एकाच वचनात आहे. ते म्हणजे: “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम करा.”+ १० प्रेम कधीही आपल्या शेजाऱ्याचं वाईट करत नाही;+ म्हणून प्रेम नियमशास्त्राची पूर्णता आहे.+
११ आपण कोणत्या काळात जगत आहोत हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून या गोष्टी करा. आता तुम्ही झोपेतून उठायची वेळ आली आहे.+ कारण आपण विश्वास स्वीकारला तेव्हापेक्षा आता आपलं तारण* जास्त जवळ आहे. १२ रात्र सरत आली आहे आणि लवकरच दिवस उजाडणार आहे. म्हणून, आपण अंधाराची कामं टाकून देऊ या+ आणि प्रकाशाची शस्त्रं धारण करू या.+ १३ आपण दिवसा शोभेल असं चालू या.+ बेलगाम मौजमस्ती* आणि दारूबाजी, अनैतिक लैंगिक संबंध आणि निर्लज्ज वर्तन,*+ भांडणतंटे आणि हेवा या गोष्टी आपण करू नयेत.+ १४ त्याऐवजी, प्रभू येशू ख्रिस्ताला वस्त्रासारखं घाला*+ आणि शरीराच्या वासना पूर्ण करायच्या योजना करू नका.+