रोमकर यांना पत्र
२ त्यामुळे अरे माणसा, जर तू इतरांचा न्याय करत असशील तर तू स्वतःला निर्दोष ठरवू शकत नाही; मग तू कोणीही असलास तरी.+ खरंतर इतरांचा न्याय करताना तू स्वतःलाच दोषी ठरवतोस. कारण तू स्वतःसुद्धा त्याच गोष्टी करत आहेस.+ २ आपल्याला माहीत आहे, की अशा गोष्टी करत राहणाऱ्यांचा देव न्याय करतो आणि त्यांना शिक्षेला पात्र ठरवतो. आणि त्याचा न्याय सत्यावर आधारित आहे.
३ पण अरे माणसा, एकीकडे तू अशा गोष्टी करत राहणाऱ्यांचा न्याय करतोस आणि दुसरीकडे तू स्वतःसुद्धा त्याच गोष्टी करतोस. असं असूनही तू देवाचा न्याय चुकवशील, असं तुला वाटतं का? ४ की, देव दयाळूपणे तुला पश्चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे,+ हे न ओळखून तू देवाची अपार दया,+ धीर+ आणि सहनशीलता+ यांना तुच्छ लेखतोस? ५ खरंतर, तुझी वृत्ती कठोर आहे आणि तुझं हृदय अपश्चात्तापी आहे. त्यामुळे, तू देवाच्या क्रोधाच्या आणि त्याचा नीतिमान न्याय प्रकट होण्याच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवत आहेस.+ ६ तो प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे प्रतिफळ देईल.+ ७ जे धीराने चांगली कामं करून गौरव, सन्मान आणि अविनाशीपण+ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना तो सर्वकाळाचं जीवन देईल. ८ तर, जे भांडखोर आहेत आणि जे सत्याचं पालन न करता अनीतीने चालतात, त्यांच्यावर देवाचा संताप आणि क्रोध येईल.+ ९ जो कोणी वाईट गोष्टी करतो त्या प्रत्येकाला* संकटं आणि दुःखं सोसावी लागतील; आधी यहुदी माणसाला आणि मग ग्रीक माणसालाही. १० पण जो चांगल्या गोष्टी करतो त्या प्रत्येकाला, आधी यहुद्याला+ आणि नंतर ग्रीक माणसालाही+ गौरव, सन्मान आणि शांती मिळेल. ११ कारण देव कधीच भेदभाव करत नाही.+
१२ नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केलं, ते नियमशास्त्राशिवाय नाश होतील.+ पण नियमशास्त्राखाली असूनही ज्यांनी पाप केलं, त्यांचा नियमशास्त्राप्रमाणे न्याय केला जाईल.+ १३ कारण देवाच्या दृष्टीत, नियमशास्त्र ऐकणारे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे वागणारे नीतिमान ठरतील.+ १४ कारण ज्यांना नियमशास्त्र नाही,+ असे विदेशी लोक जेव्हा आपणहून नियमशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी करतात, तेव्हा नियमशास्त्र नसतानाही ते स्वतःच आपलं नियमशास्त्र असतात. १५ हे लोक दाखवून देतात, की नियमशास्त्राचं सार त्यांच्या हृदयावर लिहिलेलं आहे. तसंच, त्यांचा विवेकही साक्ष देतो आणि त्यांचे स्वतःचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवतात. १६ मी घोषित करत असलेल्या आनंदाच्या संदेशाप्रमाणे, ज्या दिवशी देव, ख्रिस्त येशूद्वारे मानवजातीच्या गुप्त गोष्टींचा न्याय करेल त्या दिवशी हे घडेल.+
१७ आता, जर तू स्वतःला यहुदी म्हणवत असशील+ आणि नियमशास्त्रावर तुझा भरवसा असेल आणि देवाच्या लोकांपैकी असण्याचा तुला अभिमान असेल; १८ तसंच, देवाची इच्छा काय आहे हे तुला माहीत असेल आणि नियमशास्त्रातून शिक्षण मिळाल्यामुळे* ज्या गोष्टी उत्तम आहेत त्यांना तू मान्यता देत असशील;+ १९ शिवाय, जर तुला खातरी असेल की तू आंधळ्यांचा मार्गदर्शक, अंधारात असलेल्यांसाठी प्रकाश, २० अज्ञानी लोकांचा सुधारक आणि लहान मुलांचा शिक्षक आहेस, आणि जर नियमशास्त्रातल्या ज्ञानाचं आणि सत्याचं स्वरूप तुला माहीत असेल, २१ तर मग इतरांना शिकवणारा तू, स्वतःला का शिकवत नाहीस?+ “चोरी करू नका,”+ असं सांगणारा तू स्वतः चोरी का करतोस? २२ “व्यभिचार करू नका,”+ असं म्हणणारा तू स्वतः व्यभिचार का करतोस? मूर्तींची घृणा करणारा तू स्वतःच मंदिरं का लुटतोस? २३ नियमशास्त्राबद्दल अभिमान बाळगणारा तू, स्वतः नियमशास्त्रातल्या आज्ञा मोडून देवाचा अनादर का करतोस? २४ शास्त्रातही लिहिलं आहे, “तुमच्यामुळे विदेश्यांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे.”+
२५ तू नियमशास्त्राचं पालन करत असशील,+ तरच तुझ्या सुंतेचा*+ काही उपयोग आहे. पण जर तू नियमशास्त्रातल्या आज्ञा मोडत असशील, तर तुझी सुंता न झाल्यासारखीच आहे. २६ तर मग, सुंता न झालेला+ एखादा जर नियमशास्त्रातल्या नीतिनियमांचं पालन करत असेल, तर त्याची सुंता झालेली नसतानाही सुंता झाल्यासारखीच समजली जाईल, नाही का?+ २७ तुझ्याजवळ नियमशास्त्रातल्या लेखी आज्ञा असूनही आणि तुझी सुंता झालेली असूनही, जर तू नियमशास्त्रातल्या आज्ञा मोडत असशील, तर ज्याची शारीरिक सुंता झालेली नाही, तो नियमशास्त्राचं पालन करत असल्यामुळे तुला दोषी ठरवेल. २८ कारण जो फक्त बाहेरून यहुदी आहे तो खरा यहुदी नाही.+ आणि शरीराची केली जाणारी बाहेरची सुंता, ही खरी सुंता नाही.+ २९ तर जो आतून यहुदी, तो खरा यहुदी आहे.+ त्याची सुंता ही कोणत्याही लेखी नियमाप्रमाणे नसून,+ पवित्र शक्तीने* होणारी हृदयाची सुंता आहे.+ अशा व्यक्तीची प्रशंसा माणसांकडून नाही, तर देवाकडून होते.+