अनुवाद
६ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला शिकवण्यासाठी हे नियम, न्याय-निर्णय आणि आज्ञा दिल्या आहेत. तुम्ही पलीकडे जाऊन ज्या देशाचा ताबा घेणार आहात, त्यात गेल्यावर तुम्ही त्यांचं पालन करा, २ म्हणजे तुम्ही तुमचा देव यहोवा याचं भय बाळगाल. त्याचे जे कायदे आणि आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे, त्या तुम्ही पाळा. तुमच्यासोबतच, तुमच्या मुलांनी आणि नातवांनीही+ आपल्या संपूर्ण आयुष्यभर त्या पाळाव्यात म्हणजे तुम्ही बराच काळ जगाल.+ ३ इस्राएली लोकांनो, तुम्ही हे नियम व आज्ञा ऐका आणि त्यांचं काळजीपूर्वक पालन करा; म्हणजे तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, दूध आणि मध वाहत असलेल्या त्या देशात तुमची भरभराट होईल आणि तुमची संख्या खूप वाढेल.
४ इस्राएली लोकांनो, ऐका, आपला देव यहोवा हा एकच यहोवा आहे.+ ५ तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने*+ आणि पूर्ण शक्तीने+ प्रेम करा. ६ मी ज्या आज्ञा तुम्हाला आज सांगत आहे, त्या तुमच्या मनावर कोरलेल्या असाव्यात. ७ आणि त्या आज्ञा तुम्ही आपल्या मुलांच्या मनावर बिंबवा*+ आणि घरात बसलेले असताना, रस्त्याने चालत असताना, झोपताना आणि उठताना त्यांबद्दल त्यांच्याशी बोलत जा.+ ८ तुम्हाला त्या आज्ञांची नेहमी आठवण राहावी, म्हणून त्या आपल्या हातावर बांधा आणि त्या तुमच्या डोक्यावर* कपाळपट्टीसारख्या बांधलेल्या असाव्यात.+ ९ त्या आपल्या घराच्या चौकटींवर आणि फाटकांवर लिहून ठेवा.
१० तुमचा देव यहोवा याने जो देश तुम्हाला देण्याचं वचन, तुमच्या वाडवडिलांना, म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना दिलं होतं, त्या देशात जेव्हा तो तुम्हाला नेईल;+ आणि तिथली मोठी आणि सुंदर शहरं जी तुम्ही बांधली नाहीत,+ ११ सर्व प्रकारच्या चांगल्या वस्तूंनी भरलेली घरं ज्यांच्यासाठी तुम्ही मेहनत केली नाही, पाण्याचे हौद जे तुम्ही खोदले नाहीत आणि द्राक्षमळे व जैतुनाची झाडं जी तुम्ही लावली नाहीत, ती तुम्हाला देईल; आणि जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल,+ १२ तेव्हा ज्याने तुम्हाला तुमच्या गुलामगिरीच्या घरातून, म्हणजे इजिप्त देशातून बाहेर आणलं, त्या यहोवा देवाला तुम्ही विसरणार नाही याची काळजी घ्या.+ १३ तुम्ही आपला देव यहोवा याची भीती बाळगा+ आणि फक्त त्याची उपासना करा+ आणि त्याच्याच नावाने शपथ घ्या.+ १४ तुम्ही इतर देवांच्या, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्रांमधल्या कोणत्याही देवांच्या मागे लागू नका,+ १५ नाहीतर तुमचा देव यहोवा याचा क्रोध तुमच्यावर भडकेल+ आणि तो पृथ्वीच्या पाठीवरून तुमचा सर्वनाश करून टाकेल.+ कारण तुमच्यामध्ये राहणारा तुमचा देव यहोवा, फक्त त्याचीच उपासना केली जावी अशी अपेक्षा करणारा देव आहे.+
१६ तुम्ही मस्सा या ठिकाणी, तुमचा देव यहोवा याची जशी परीक्षा पाहिली,+ तशी त्याची परीक्षा पाहू नका.+ १७ तुमचा देव यहोवा याने ज्या आज्ञा, स्मरण-सूचना आणि नियम तुम्हाला पाळायला सांगितले आहेत, ते मनापासून पाळा. १८ तुम्ही यहोवाच्या नजरेत जे चांगलं आणि योग्य आहे ते करा; म्हणजे तुमची भरभराट होईल आणि ज्या चांगल्या देशाबद्दल तुमचा देव यहोवा याने तुमच्या वाडवडिलांना वचन दिलं होतं,+ त्या देशात जाऊन तुम्ही त्याचा ताबा घेऊ शकाल. १९ तसंच, यहोवाने वचन दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सर्व शत्रूंना आपल्यासमोरून हाकलून लावू शकाल.+
२० पुढे जेव्हा तुमची मुलं तुम्हाला विचारतील, ‘आपला देव यहोवा याने ज्या आज्ञा, स्मरण-सूचना आणि नियम पाळण्याची तुम्हाला आज्ञा दिली आहे, त्यांचा काय अर्थ आहे?’ २१ तेव्हा तुम्ही आपल्या मुलांना असं सांगा, ‘आम्ही इजिप्तमध्ये फारोचे गुलाम होतो. पण यहोवाने त्याच्या शक्तिशाली हाताने आम्हाला तिथून बाहेर काढलं. २२ यहोवाने आमच्या डोळ्यांदेखत मोठमोठी आणि विनाशकारक चिन्हं व चमत्कार करून इजिप्तवर, फारोवर आणि त्याच्या सगळ्या घराण्यावर पीडा आणल्या.+ २३ आणि आमच्या वाडवडिलांना वचन दिलेल्या या देशात आम्हाला आणण्यासाठी आणि हा देश आम्हाला देण्यासाठी त्याने इजिप्तमधून आम्हाला बाहेर काढलं.+ २४ मग आमचं कायम भलं व्हावं आणि आम्ही जिवंत राहावं,+ म्हणून यहोवाने आम्हाला हे सर्व नियम पाळण्याची आणि आमचा देव यहोवा याचं भय मानण्याची आज्ञा दिली.+ आणि त्याप्रमाणेच आज आम्ही जिवंत आहोत. २५ आमचा देव यहोवा याने सांगितल्याप्रमाणे जर आम्ही त्याला आज्ञाधारक राहून त्याच्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, तर आम्ही त्याच्या नजरेत नीतिमान ठरू.’+