इब्री लोकांना पत्र
११ विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरवसा+ आणि न पाहिलेल्या खऱ्या गोष्टींचा खातरीलायक पुरावा आहे. २ कारण त्याच्याद्वारेच, प्राचीन काळातल्या लोकांना* अशी साक्ष देण्यात आली, की त्यांना देवाची पसंती मिळाली आहे.
३ विश्वासानेच, आपण हे समजू शकतो, की जगातल्या सर्व गोष्टी* देवाच्या वचनाद्वारे उत्पन्न झाल्या.* याचा अर्थ, दिसणाऱ्या गोष्टी न दिसणाऱ्या गोष्टींमधून अस्तित्वात आल्या आहेत.
४ विश्वासानेच, हाबेलने काइनपेक्षा जास्त चांगलं बलिदान अर्पण केलं.+ आणि त्या विश्वासाद्वारेच, देवाने त्याचं अर्पण स्वीकारून त्याला अशी साक्ष दिली, की तो नीतिमान आहे.+ तो मेला असला, तरी त्याच्या विश्वासाद्वारे आजही बोलतो.+
५ विश्वासामुळेच, हनोखला+ मृत्यूचा अनुभव येऊ नये, म्हणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. तो कुठेही सापडला नाही, कारण देवानेच त्याला नेलं होतं.+ आणि त्याआधी त्याला अशी साक्ष देण्यात आली, की त्याने देवाचं मन आनंदित केलं आहे. ६ तसंच, विश्वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे, कारण देवाजवळ येणाऱ्याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो.+
७ विश्वासानेच, नोहाने+ देवाचं भय बाळगून आपल्या घराण्याला वाचवण्यासाठी एक जहाज* बांधलं.+ कारण, न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल त्याला देवाकडून सूचना मिळाली होती.+ या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं+ आणि विश्वासामुळे उत्पन्न होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वारस बनला.
८ विश्वासानेच, जेव्हा अब्राहामला+ बोलावण्यात आलं, तेव्हा त्याने आज्ञा मानली आणि देवाकडून वारशाने मिळणार असलेल्या ठिकाणी तो जायला निघाला. आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही तो गेला.+ ९ विश्वासानेच तो वचन दिलेल्या देशात, परक्या देशात राहत असलेल्या विदेश्यासारखा राहिला.+ जे त्याच्यासोबत त्याच अभिवचनाचे वारस होते+ त्या इसहाक आणि याकोब यांच्यासोबत तो तंबूंत राहिला.+ १० कारण, खरा पाया असलेल्या अशा शहराची तो वाट पाहत होता, ज्याची रचना* आणि बांधकाम करणारा देव आहे.+
११ विश्वासानेच, सारालासुद्धा वय होऊन गेल्यानंतरही गर्भधारणेची शक्ती मिळाली.+ कारण वचन देणारा विश्वसनीय* असल्याचं तिने मानलं. १२ याच कारणामुळे, जो जवळजवळ निर्जीव झाला होता अशा एका माणसाद्वारे,+ आकाशातल्या ताऱ्यांइतकी आणि समुद्रकिनारी असलेल्या वाळूच्या कणांइतकी+ मुलं जन्माला आली.+
१३ हे सगळे जण मरेपर्यंत विश्वासू राहिले. ते अभिवचनांची पूर्णता पाहू शकले नाहीत,+ तरीसुद्धा त्यांनी ती दुरून पाहिली+ आणि आनंद मानला. तसंच, त्या देशात आपण परके आणि तात्पुरते रहिवासी असल्याचं त्यांनी जाहीरपणे घोषित केलं. १४ कारण जे अशा प्रकारे बोलतात ते हेच दाखवून देतात, की आपलं स्वतःचं असं एक ठिकाण मिळवण्यासाठी ते उत्सुक आहेत. १५ खरंतर, ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाची जर ते सतत आठवण करत राहिले असते,+ तर तिथे परत जाण्याची संधी ते शोधू शकले असते. १६ पण, आता ते एका जास्त चांगल्या ठिकाणाची आशा बाळगतात. त्या ठिकाणाचा संबंध स्वर्गाशी आहे. म्हणूनच, स्वतःला त्यांचा देव म्हणवून घ्यायची देवाला लाज वाटत नाही,+ कारण त्याने त्यांच्यासाठी एक शहर तयार केलं आहे.+
१७ विश्वासानेच, अब्राहामने, त्याची परीक्षा घेण्यात आली+ तेव्हा इसहाकचं जवळजवळ अर्पण केलंच होतं. हो, ज्या माणसाने आनंदाने अभिवचनं स्वीकारली होती, तो आपल्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करायला तयार झाला.+ १८ “जे इसहाकपासून येतील त्यांना तुझी संतती* म्हटलं जाईल,”+ असं सांगण्यात आलेलं असतानाही त्याने असं केलं. १९ पण, देव इसहाकला मेलेल्यांतूनही उठवायला समर्थ आहे, असा निष्कर्ष त्याने काढला. एका लाक्षणिक अर्थाने तो खरोखरच त्याला मेलेल्यांतून परत मिळाला.+
२० विश्वासानेच, इसहाकने याकोब+ आणि एसाव+ यांना येणाऱ्या गोष्टींबद्दल आशीर्वाद दिला.
२१ विश्वासानेच, याकोबने आपल्या मृत्यूच्या वेळी+ योसेफच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला+ आणि आपल्या काठीचा आधार घेऊन देवाची उपासना केली.+
२२ विश्वासानेच, योसेफने आपल्या मृत्यूच्या वेळी, इस्राएलच्या मुलांची इजिप्त देशातून सुटका होईल असं सांगितलं आणि आपल्या अस्थींबद्दल* सूचना दिल्या.*+
२३ विश्वासानेच मोशेच्या आईवडिलांनी त्याच्या जन्मानंतर त्याला तीन महिने लपवून ठेवलं.+ कारण मूल खूप सुंदर असल्याचं त्यांनी पाहिलं+ आणि राजाच्या आदेशाला ते घाबरले नाहीत.+ २४ विश्वासानेच, मोशेने मोठा झाल्यावर+ स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणवून घ्यायला नकार दिला.+ २५ पापाचं क्षणिक सुख उपभोगण्यापेक्षा त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करायचं निवडलं. २६ देवाचा अभिषिक्त* या नात्याने अपमान सहन करणं, हे इजिप्तच्या सर्व वैभवापेक्षा जास्त मौल्यवान आहे असं त्याने मानलं. कारण त्याने आपली नजर प्रतिफळावर केंद्रित केली होती. २७ विश्वासानेच त्याने इजिप्त देश सोडला.+ पण त्याने राजाच्या क्रोधाला भिऊन असं केलं नाही.+ तर जो अदृश्य होता त्याला+ पाहत असल्यासारखा तो विश्वासात खंबीर राहिला. २८ विश्वासानेच त्याने वल्हांडण सण पाळला आणि नाश करणाऱ्याने त्यांच्या प्रथमपुत्रांना इजा करू नये,* म्हणून त्याने दाराच्या चौकटीवर रक्त शिंपडलं.+
२९ विश्वासानेच, ते कोरड्या जमिनीवरून चालावं तसं तांबड्या समुद्रातून चालत गेले.+ पण इजिप्तच्या लोकांनी तसंच करायचा प्रयत्न केला, तेव्हा समुद्राने त्यांना गिळून टाकलं.+
३० विश्वासानेच, इस्राएली लोकांनी यरीहो शहराभोवती सात दिवस फेऱ्या घातल्यावर शहराच्या भिंती कोसळल्या.+ ३१ विश्वासामुळेच, राहाब वेश्येचा आज्ञा न मानणाऱ्या लोकांसोबत नाश झाला नाही. कारण तिच्या घरी आलेल्या हेरांचं तिने शांतीने स्वागत केलं.+
३२ आणखी काय सांगू? कारण जर मी गिदोन,+ बाराक,+ शमशोन,+ इफ्ताह,+ दावीद+ तसंच शमुवेल+ आणि इतर संदेष्ट्यांबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. ३३ विश्वासाद्वारेच त्यांनी राज्यं जिंकली,+ न्यायनीती स्थापन केली, अभिवचनं मिळवली,+ सिंहांची तोंडं बंद केली,+ ३४ आगीची शक्ती निकामी केली,+ ते तलवारीच्या धारेपासून बचावले,+ दुर्बळ स्थितीतून शक्तिशाली बनले,+ युद्धात शूरवीर ठरले+ आणि त्यांनी आक्रमण करणाऱ्या सैन्यांना पळवून लावलं.+ ३५ स्त्रियांना त्यांचे मेलेले प्रियजन पुनरुत्थानाद्वारे* परत मिळाले;+ पण इतरांचा छळ करण्यात आला; ते खंडणी भरून स्वतःची सुटका करून घ्यायला तयार झाले नाहीत, कारण त्यांना जास्त चांगलं पुनरुत्थान मिळवायचं होतं. ३६ हो, इतर बऱ्याच जणांची थट्टा करण्याद्वारे आणि फटके मारण्याद्वारे परीक्षा झाली. इतकंच नाही, तर त्यांना साखळदंडाची बंधनं+ आणि तुरुंगवासही सोसावा लागला.+ ३७ त्यांना दगडमार करण्यात आला,+ त्यांची परीक्षा घेण्यात आली, करवतीने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आले, तलवारीने त्यांची कत्तल करण्यात आली,+ ते मेंढरांची आणि बकऱ्यांची कातडी पांघरून फिरत राहिले.+ ते निराधार, पीडित+ आणि छळलेले+ होते; ३८ आणि हे जग त्यांच्यासाठी लायक नव्हतं. ते रानावनांतून, डोंगरांतून, गुहांतून+ आणि जमिनीतल्या खाचखळग्यांतून भटकत राहिले.
३९ या सगळ्यांना त्यांच्या विश्वासामुळे, देवाची पसंती मिळाल्याची साक्ष तर देण्यात आली, पण त्यांनी अभिवचनाची पूर्णता पाहिली नाही. ४० कारण देवाने आपल्यासाठी जास्त चांगलं असं काहीतरी आधीच ठरवलं होतं.+ हे यासाठी, की त्यांना आपल्याशिवाय परिपूर्ण केलं जाऊ नये.