१२ जो शिक्षणावर प्रेम करतो, तो ज्ञानावर प्रेम करतो,+
पण जो ताडनाचा तिरस्कार करतो, त्याला समज नसते.+
२ चांगल्या माणसाला यहोवाची पसंती मिळते,
पण जो दुष्ट योजना करतो, त्याला देव दोषी ठरवतो.+
३ दुष्टपणा करणारे सुरक्षित राहू शकत नाहीत,+
पण नीतिमान अशा झाडासारखा होईल, ज्याला उपटता येत नाही.
४ सद्गुणी बायको आपल्या नवऱ्यासाठी मुकुटासारखी असते,+
पण जी निर्लज्जपणे वागते, ती त्याच्या हाडांना सडवणाऱ्या रोगासारखी असते.+
५ नीतिमानाचे विचार न्यायाचे असतात,
पण दुष्टाचं मार्गदर्शन कपटी असतं.
६ दुष्टांचे शब्द जीवघेण्या सापळ्यासारखे असतात,+
पण सरळ माणसांचे शब्द त्यांना वाचवतात.+
७ दुष्टांचा नाश होतो तेव्हा त्यांचं नामोनिशाण राहत नाही,
पण नीतिमानांचं घर कायम टिकून राहील.+
८ विचार करून बोलणाऱ्या माणसाची प्रशंसा केली जाते,+
पण कपटी मनाच्या माणसाला तुच्छ लेखलं जाईल.+
९ प्रतिष्ठा मिरवून उपाशी राहणाऱ्या माणसापेक्षा,
घरी एकच नोकर असलेला सर्वसामान्य माणूस बरा!+
१० नीतिमान माणूस आपल्या गुराढोरांची काळजी घेतो,+
पण दुष्ट क्रूर असतात.
११ आपल्या जमिनीची मशागत करणाऱ्याला भरपूर अन्न मिळेल,+
पण निरुपयोगी गोष्टींच्या नादी लागणाऱ्याला समज नसते.
१२ वाईट लोकांच्या लुटीचा दुष्टाला हेवा वाटतो,
पण नीतिमान माणूस खोलवर मुळावलेल्या फलदायी झाडासारखा असतो.
१३ दुष्ट माणूस आपल्याच तोंडून निघणाऱ्या वाईट गोष्टींमध्ये अडकतो,+
पण नीतिमान संकटातून सुटतो.
१४ माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+
त्याच्या मेहनतीचं प्रतिफळ त्याला मिळेल.
१५ मूर्खाला आपला मार्ग योग्यच वाटतो,+
पण बुद्धिमान माणूस सल्ला स्वीकारतो.+
१६ मूर्ख आपला राग लगेच दाखवतो,+
पण शहाणा माणूस अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
१७ खोटा साक्षीदार फसव्या गोष्टी बोलतो,
पण जो प्रामाणिकपणे साक्ष देतो, तो खरं बोलेल.
१८ विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे असतात,
पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.+
१९ खरं बोलणारे ओठ सर्वकाळ टिकून राहतील,+
पण खोटं बोलणारी जीभ क्षणभरासाठी असते.+
२० ज्यांच्या मनात कपट असतं, ते इतरांचं वाईट करण्याची योजना करतात,
पण जे शांती टिकवण्याचा प्रयत्न करतात, ते आनंदी असतात.+
२१ नीतिमानाचं कोणतंच नुकसान होणार नाही,+
पण दुष्टांवर एकापाठोपाठ एक संकटं येतील.+
२२ खोटं बोलणाऱ्या ओठांची यहोवाला घृणा वाटते,+
पण जे विश्वासूपणे वागतात त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.
२३ शहाणा माणूस आपल्याजवळ असलेली माहिती प्रकट करत नाही,
पण मूर्ख आपला सगळा मूर्खपणा बोलून दाखवतो.+
२४ मेहनत करणारे राज्य करतील,+
पण आळश्यांना सक्तीची मजुरी करावी लागेल.+
२५ मनातल्या चिंतेने माणूस खचून जातो,+
पण दिलासा देणाऱ्या शब्दांमुळे त्याला आनंद होतो.+
२६ नीतिमान माणूस आपली कुरणं विचारपूर्वक निवडतो,
पण दुष्टांचा मार्ग त्यांना भरकटायला लावतो.
२७ आळशी आपल्या शिकारीच्या मागे धावत नाही,+
पण कष्टाळू वृत्ती, माणसाची मौल्यवान संपत्ती असते.
२८ नीतिमत्त्वाचा मार्ग जीवनाकडे नेतो;+
त्या वाटेवर मृत्यू नसतो.