याकोब याचं पत्र
४ तुमच्यामध्ये भांडणतंटे आणि झगडे कशामुळे आहेत? तुमच्या मनाशी* संघर्ष करणाऱ्या शारीरिक इच्छांमुळेच नाहीत का?+ २ तुम्ही इच्छा तर करता, पण ज्या गोष्टीची इच्छा करता ती तुम्हाला मिळत नाही. तुम्ही खुनशी वृत्ती आणि ईर्ष्या बाळगता आणि तरीही तुम्हाला ती मिळवता येत नाही. तुम्ही झगडे आणि भांडणतंटे करत राहता.+ पण तुम्हाला हवं आहे ते मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही. ३ आणि जेव्हा मागता तेव्हासुद्धा तुम्हाला ते मिळत नाही कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने, म्हणजेच आपल्या शारीरिक इच्छा तृप्त करण्यासाठी मागता.
४ व्यभिचाऱ्यांनो,* जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्हाला माहीत नाही का? ज्याला जगाचा मित्र बनायचं आहे, तो स्वतःला देवाचा वैरी बनवतो.+ ५ “आपल्यात असणारी ईर्ष्या करण्याची प्रवृत्ती सतत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची लालसा धरायला लावते,” असं शास्त्रात उगीच म्हटलं असेल का?+ ६ पण, देवाकडून मिळणारी अपार कृपा या प्रवृत्तीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. म्हणूनच शास्त्र म्हणतं: “देव गर्विष्ठांचा विरोध करतो,+ पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.”+
७ म्हणून देवाच्या अधीन व्हा.+ पण, सैतानाचा* विरोध करा+ म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळेल.+ ८ देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.+ अरे पापी लोकांनो, आपले हात स्वच्छ करा;+ अरे चंचल वृत्तीच्या लोकांनो, आपली मनं शुद्ध करा.+ ९ दुःखी व्हा, शोक करा आणि रडा.+ तुमचं हसणं शोकात आणि तुमचा आनंद दुःखात बदलो. १० यहोवाच्या* नजरेत नम्र व्हा+ म्हणजे तो तुमचा सन्मान करेल.+
११ बांधवांनो, एकमेकांच्या विरोधात बोलायचं सोडून द्या.+ जो कोणी एखाद्या भावाच्या विरोधात बोलतो किंवा आपल्या भावाला दोषी ठरवतो, तो देवाच्या नियमांच्या विरोधात बोलतो आणि त्यांत दोष काढतो. आणि जर तुम्ही देवाच्या नियमांत दोष काढला, तर तुम्ही नियम पाळणारे नाही तर न्यायाधीश ठराल. १२ पण नियम देणारा आणि न्यायाधीश फक्त एक आहे.+ तोच नाश करू शकतो आणि वाचवूही शकतो.+ पण, तुम्हाला दुसऱ्या माणसाला* दोषी ठरवण्याचा काय अधिकार?+
१३ आता, तुम्ही असं म्हणता की “आज किंवा उद्या आपण अमुक ठिकाणी जाऊ, तिथे वर्षभर राहून व्यापार करू आणि पैसा कमवू.”+ पण माझं ऐका, १४ उद्या तुमचं जीवन कसं असेल, हे तुम्हाला माहीत नाही.+ कारण तुम्ही धुक्यासारखे आहात, जे थोडा वेळ दिसतं आणि मग नाहीसं होतं.+ १५ त्याऐवजी तुम्ही असं म्हटलं पाहिजे, की “जर यहोवाची* इच्छा असेल+ तर आपण जिवंत राहू आणि अमुक किंवा तमुक करू.” १६ पण, तुम्ही तर गर्विष्ठपणे बढाई मारण्यात मोठेपणा मानता. अशी बढाई मारणं दुष्टपणाचं लक्षण आहे. १७ तेव्हा, योग्य काय हे माहीत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.+