योहानला झालेलं प्रकटीकरण
११ मग, वेतासारखी एक काठी*+ मला देण्यात आली आणि असं सांगण्यात आलं: “ऊठ आणि देवाच्या मंदिराचं* आणि वेदीचं माप घे आणि त्यात उपासना करणारे किती आहेत ते मोज. २ पण मंदिराच्या* बाहेर असलेलं अंगण सोड, त्याचं माप घेऊ नकोस, कारण ते विदेश्यांना देण्यात आलं आहे; ते पवित्र नगरीला+ ४२ महिने+ पायांखाली तुडवतील. ३ मी माझ्या दोन साक्षीदारांना पाठवीन आणि ते गोणपाट घालून १,२६० दिवस भविष्यवाणी करतील.” ४ पृथ्वीच्या प्रभूसमोर+ उभी असलेली जैतुनाची दोन झाडं+ आणि दोन दीपवृक्ष+ त्यांना सूचित करतात.
५ त्यांना कोणी इजा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या तोंडातून आग निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करून टाकते. जो कोणी त्यांना इजा करायचा प्रयत्न करेल त्याला अशाच प्रकारे ठार मारलं जाईल. ६ त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून+ आकाश* बंद करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.+ तसंच, पाण्याचं रक्त करण्याचा+ आणि वाटेल तितक्या वेळा पृथ्वीला सर्व प्रकारच्या पीडांनी पीडित करण्याचाही त्यांना अधिकार आहे.
७ त्यांचं साक्ष देण्याचं कार्य संपल्यावर, अथांग डोहातून वर येणारा जंगली पशू त्यांच्याशी लढाई करेल आणि त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना ठार मारेल.+ ८ आणि जिला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त* म्हटलं जातं आणि जिथे त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर* खिळण्यात आलं, त्या मोठ्या नगरीच्या मुख्य रस्त्यावर त्यांचे मृतदेह पडून राहतील. ९ पुष्कळ लोकसमूह, वंश, भाषा आणि राष्ट्रं यांतले लोक साडेतीन दिवस त्यांचे मृतदेह पाहत राहतील+ आणि ते त्यांचे मृतदेह कबरेत ठेवू देणार नाहीत. १० पृथ्वीवर राहणारे लोक त्यांच्याबद्दल आनंद साजरा करतील आणि एकमेकांना भेटी पाठवतील. कारण, या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांना यातना दिल्या होत्या.
११ मग, साडेतीन दिवसांनंतर देवापासून असलेली जीवनशक्ती त्यांच्यामध्ये आली,+ तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिलं ते फार घाबरले. १२ आणि त्यांना आकाशातून एक मोठा आवाज ऐकू आला. तो त्यांना म्हणाला: “इथे वर या.” मग, ते ढगातून वर आकाशात गेले आणि त्यांच्या शत्रूंनी त्यांना पाहिलं.* १३ त्याच वेळी एक मोठा भूकंप झाला आणि त्या नगरीचा दहावा भाग कोसळला. भूकंपामुळे ७,००० लोक मारले गेले आणि बाकीचे लोक घाबरले आणि त्यांनी स्वर्गाच्या देवाचा गौरव केला.
१४ दुसरी विपत्ती+ होऊन गेली आहे. पाहा! तिसरी विपत्ती लवकरच येत आहे.
१५ सातव्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला,+ तेव्हा स्वर्गात मोठ्या घोषणा ऐकू आल्या: “जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं+ आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं+ आहे, आणि तो सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.”+
१६ तेव्हा देवासमोर आपल्या राजासनांवर बसलेल्या २४ वडिलांनी+ देवाला नमन करून त्याची उपासना केली. १७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+ १८ पण, राष्ट्रं क्रोधित झाली आणि तुझा क्रोध प्रकट झाला. मेलेल्यांचा न्याय करण्याची आणि तुझ्या दासांना म्हणजे संदेष्ट्यांना,+ पवित्र जनांना आणि तुझ्या नावाची भीती बाळगणाऱ्या लहानमोठ्यांना प्रतिफळ देण्याची+ आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची ठरवलेली वेळ आली.”+
१९ तेव्हा, स्वर्गात देवाचं मंदिर* उघडलं आणि मंदिरात* त्याच्या कराराची पेटी दिसली.+ मग विजा चमकल्या, मोठे आवाज आणि ढगांचे गडगडाट ऐकू आले, भूकंप झाला आणि मोठमोठ्या गारा पडल्या.