११ खोट्या तराजूची यहोवाला घृणा वाटते,
पण अचूक वजनामुळे त्याला आनंद होतो.+
२ गर्व झाला की अपमान ठरलेला असतो,+
पण जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.+
३ सरळ लोकांचा खरेपणा त्यांना मार्ग दाखवतो,+
पण विश्वासघातकी लोकांचा कपटीपणा त्यांचा नाश करतो.+
४ क्रोधाच्या दिवशी संपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही,+
पण नीतिमत्त्वामुळे मृत्यूपासून सुटका होईल.+
५ निर्दोष माणसाचं नीतिमत्त्व त्याचा मार्ग सरळ करतं,
पण दुष्ट आपल्याच दुष्टपणामुळे पडेल.+
६ सरळ माणसांच्या नीतिमत्त्वामुळे त्यांची सुटका होते,+
पण विश्वासघातकी लोक आपल्याच इच्छांच्या सापळ्यात अडकतील.+
७ दुष्ट माणूस मरतो, तेव्हा त्याची आशा संपते;
त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर केलेल्या अपेक्षाही नाहीशा होतात.+
८ नीतिमानाला संकटातून सोडवलं जाईल
आणि दुष्ट त्याची जागा घेईल.+
९ देवाची निंदा करणारा आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्यावर नाश आणतो,
पण नीतिमानांची ज्ञानामुळे सुटका होते.+
१० नीतिमानाच्या चांगुलपणामुळे शहर खूश होतं;
दुष्टाचा नाश होतो, तेव्हा लोक जल्लोष करतात.+
११ सरळ लोकांच्या आशीर्वादामुळे शहराची भरभराट होते,+
पण दुष्टाच्या तोंडामुळे ते जमीनदोस्त होतं.+
१२ ज्याला समज नसते तो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ लेखतो,
पण जो खरोखर समंजस असतो, तो शांत राहतो.+
१३ बदनामी करणारा गुप्त गोष्टी सगळ्यांना सांगत फिरतो,+
पण जो भरवशालायक असतो, तो त्या गुप्त ठेवतो.
१४ कुशल मार्गदर्शन मिळालं नाही, तर लोकांना दुःख सहन करावं लागतं,
पण पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश मिळतं.+
१५ जो अनोळखी माणसाचं कर्ज फेडण्याची हमी देतो, त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही,+
पण जो हात मिळवून करार करण्याचं टाळतो, तो सुरक्षित राहील.
१६ प्रेमळ स्त्रीला सन्मान मिळतो,+
पण निर्दयी लोक संपत्ती बळकावतात.
१७ दयाळू माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो,+
पण क्रूर माणूस स्वतःवर संकट ओढवून घेतो.+
१८ दुष्टाची कमाई बेइमानीची असते,+
पण जो नीतिमत्त्व पेरतो त्याला खरं प्रतिफळ मिळतं.+
१९ जो नीतिमत्त्वासाठी ठाम उभा राहतो त्याला जीवन मिळतं,+
पण जो दुष्टपणाच्या मागे लागतो त्याच्यावर मृत्यू ओढवतो.
२० ज्यांच्या मनात कपट असतं, त्यांची यहोवाला घृणा वाटते,+
पण ज्यांचा मार्ग निर्दोष असतो, त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.+
२१ वाईट माणसाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित,+
पण नीतिमानाची मुलं संकटांतून सुटतील.
२२ समज सोडून वागणारी सुंदर स्त्री, म्हणजे
डुकराच्या नाकातली सोन्याची नथ.
२३ नीतिमानाच्या इच्छेमुळे चांगलं घडतं,+
पण दुष्टांच्या आशेमुळे क्रोध भडकतो.
२४ उदारपणे देणाऱ्याला आणखी मिळतं;+
पण जे दिलं पाहिजे, ते देण्याचं जो टाळतो, त्याच्यावर गरिबी येते.+
२५ उदार माणसाची संपत्ती वाढेल;+
जो दुसऱ्यांची तहान भागवतो, त्याचीही तहान भागवली जाईल.+
२६ जो धान्याचा साठा करून ठेवतो, त्याला लोक शाप देतील,
पण जो धान्य विकतो त्याला ते आशीर्वाद देतील.
२७ जो चांगलं करण्यासाठी मनापासून झटतो, त्याच्यावर कृपा केली जाईल,+
पण जो वाईट करायला पाहतो, त्याच्यासोबत वाईटच घडेल.+
२८ आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणारा खाली पडेल,+
पण नीतिमान हिरव्यागार पानांसारखा बहरेल.+
२९ जो आपल्या घराण्यावर संकट आणतो, त्याच्या हाती काही लागणार नाही,+
आणि मूर्ख बुद्धिमानाची चाकरी करेल.
३० नीतिमानाचं फळ म्हणजे जीवनाचा वृक्ष,+
आणि जो मनं वळवतो तो बुद्धिमान असतो.+
३१ पृथ्वीवर नीतिमानाला आपल्या कामाचं फळ मिळतं,
तर दुष्टाला आणि पापी माणसाला आणखी किती पटींनी मिळेल!+