१५ सौम्यपणे दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो,+
पण कठोर शब्दामुळे क्रोध भडकतो.+
२ बुद्धिमानांची जीभ ज्ञानाचा चांगला वापर करते,+
पण मूर्खांच्या तोंडून फक्त मूर्खपणाच निघतो.
३ यहोवाची नजर सगळीकडे असते,
तो चांगल्या आणि वाईट, सर्व लोकांना पाहतो.+
४ शांतपणे बोललेले शब्द म्हणजे जीवनाचा वृक्ष,+
पण कपटी शब्दांमुळे मन दुखावतं.
५ मूर्ख आपल्या वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा अनादर करतो,+
पण शहाणा माणूस ताडन स्वीकारतो.+
६ नीतिमानाच्या घरात भरपूर संपत्ती असते,
पण दुष्टाच्या उत्पन्नामुळे त्याच्यावर संकट येतं.+
७ बुद्धिमानाचे ओठ बऱ्याच लोकांना ज्ञान देतात,+
पण मूर्खाला तसं करण्याची इच्छा नसते.+
८ दुष्टाने दिलेल्या बलिदानाची यहोवाला घृणा वाटते,+
पण प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने त्याला आनंद होतो.+
९ यहोवाला दुष्टाच्या मार्गाची घृणा वाटते,+
पण जो नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर तो प्रेम करतो.+
१० चांगला मार्ग सोडून देणाऱ्याला शिक्षा नकोशी वाटते,+
पण ताडनाचा तिरस्कार करणारा आपला जीव गमावेल.+
११ कबर आणि विनाशाचं ठिकाण यहोवापासून लपलेलं नाही,+
मग माणसांची मनं त्याच्यापासून कशी लपलेली असतील?+
१२ गर्विष्ठ माणूस आपलं ताडन करणाऱ्याचा द्वेष करतो.+
तो बुद्धिमानांकडून सल्ला घेत नाही.+
१३ मन आनंदी असेल, तर चेहराही आनंदी दिसतो,
पण दुःखामुळे मन खचून जातं.+
१४ समजशक्ती असलेल्या माणसाचं मन ज्ञान शोधतं,+
पण मूर्खाच्या तोंडून मूर्खपणाच बाहेर पडतो.+
१५ दुःखी माणसासाठी सगळेच दिवस वाईट असतात,+
पण ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.+
१६ भरपूर संपत्ती असून चिंता असण्यापेक्षा,+
यहोवाची भीती बाळगून गरीब असणं बरं.+
१७ जिथे द्वेष आहे तिथे मेजवानी करण्यापेक्षा,+
प्रेम असलेल्या घरातलं साधं जेवण बरं.+
१८ तापट माणूस वाद सुरू करतो,+
पण जो लगेच रागवत नाही तो भांडण मिटवतो.+
१९ आळश्याचा मार्ग काट्यांच्या कुंपणासारखा असतो,+
पण सरळ मनाच्या माणसाची वाट महामार्गासारखी असते.+
२० बुद्धिमान मुलामुळे वडिलांना आनंद होतो,+
पण मूर्ख माणूस आपल्या आईला तुच्छ लेखतो.+
२१ ज्याला समज नसते, त्याला मूर्खपणात मौज वाटते,+
पण समंजस माणूस सरळ मार्गाने चालत राहतो.+
२२ मनमोकळी चर्चा होत नाही, तेव्हा योजना निष्फळ होतात,
पण पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.+
२३ योग्य उत्तर दिल्यामुळे माणसाला खूप आनंद होतो!+
योग्य वेळी बोललेला शब्द किती चांगला असतो!+
२४ सखोल समज असलेल्या माणसाला जीवनाचा मार्ग उंचावर नेतो,+
तो त्याला खाली कबरेत जाण्यापासून वाचवतो.+
२५ गर्विष्ठ माणसाचं घर यहोवा पाडून टाकेल,+
पण विधवेच्या जमिनीचं तो रक्षण करेल.+
२६ दुष्टांच्या योजनांची यहोवाला घृणा वाटते,+
पण प्रेमळ बोल त्याला शुद्ध वाटतात.+
२७ बेइमानीची कमाई करणारा आपल्याच घराण्यावर संकट आणतो,+
पण ज्याला लाचखोरीची घृणा वाटते, तो जिवंत राहील.+
२८ नीतिमान माणूस विचार करून उत्तर देतो,+
पण मूर्ख माणूस विचार न करता वाईट गोष्टी बोलतो.
२९ यहोवा दुष्टांपासून फार दूर असतो,
पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.+
३० तेजस्वी डोळ्यांमुळे मन आनंदी होतं;
चांगल्या बातमीमुळे हाडांना बळ मिळतं.+
३१ जो जीवन देणारं ताडन ऐकतो,
तो बुद्धिमानांमध्ये राहतो.+
३२ जो शिक्षण नाकारतो, तो आपल्या जीवनाला तुच्छ लेखतो,+
पण जो ताडन स्वीकारतो, त्याला समजशक्ती मिळते.+
३३ यहोवाची भीती माणसाला बुद्धिमानपणे वागायला शिकवते,+
नम्रता दाखवल्यामुळे पुढे गौरव होतो.+