१ राजे
१९ एलीयाने जे काही केलं आणि त्याने कसं सगळ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकलं+ ते सर्व अहाबने+ ईजबेलला+ सांगितलं. २ तेव्हा ईजबेलने एका दूताच्या हातून एलीयाला असा संदेश पाठवला: “उद्या जर या वेळेपर्यंत मी त्या संदेष्ट्यांसारखीच तुझी दशा केली नाही, तर माझे देव मला कठोरातली कठोर शिक्षा करोत!” ३ हे ऐकून एलीया फार घाबरला, आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेला.+ तो यहूदातल्या+ बैर-शेबा+ इथे आला आणि तिथे त्याने आपल्या सेवकाला सोडलं. ४ मग तो ओसाड रानात एक दिवसाचा प्रवास करून गेला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. आपल्याला मरण यावं अशी विनंती तो करू लागला. तो म्हणाला: “हे यहोवा, पुरे झालं! आता माझा जीव घेऊन टाक,+ कारण मी काही माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला नाही.”
५ मग त्या झाडाखाली अंग टाकून तो गाढ झोपला. पण अचानक एक स्वर्गदूत त्याला स्पर्श करून+ म्हणाला: “ऊठ, थोडं खाऊन घे.”+ ६ त्याने पाहिलं तेव्हा त्याला आपल्या उशाजवळ तापलेल्या दगडांवर ठेवलेली एक भाकर आणि जवळच पाण्याने भरलेली एक सुरई दिसली. ७ नंतर यहोवाचा स्वर्गदूत दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला: “ऊठ आणि थोडं खाऊन घे. कारण तुला जो प्रवास करायचाय तो तुझ्यासाठी फार कठीण असणार आहे.” ८ म्हणून मग तो उठला आणि त्याने खाऊनपिऊन घेतलं. आणि त्या अन्नातून मिळालेल्या शक्तीच्या जोरावर त्याने ४० दिवस व ४० रात्री प्रवास केला. शेवटी तो खऱ्या देवाच्या पर्वताजवळ, म्हणजे होरेब पर्वताजवळ पोहोचला.+
९ तिथे त्याने एका गुहेत+ रात्र काढली. तेव्हा पाहा! यहोवाकडून त्याला संदेश मिळाला. तो म्हणाला: “एलीया, तू इथे काय करतोस?” १० त्यावर एलीया म्हणाला: “मी सैन्यांचा देव यहोवा याची अतिशय आवेशाने सेवा करत आलोय.+ इस्राएलच्या लोकांनी तुझा करार पाळायचं सोडून दिलंय.+ त्यांनी तुझ्या वेदी पाडून टाकल्या आहेत आणि तुझ्या संदेष्ट्यांनाही तलवारीने मारून टाकलंय.+ मी एकटाच उरलोय. आणि आता ते माझाही जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत.”+ ११ पण तो म्हणाला: “बाहेर जा आणि यहोवासमोर पर्वतावर उभा राहा.” तेव्हा पाहा! यहोवा तिथून जात असताना,+ जोरदार सोसाट्याच्या वाऱ्याने पर्वतांना तडे गेले आणि यहोवासमोर खडक फुटले.+ पण त्या वाऱ्यामध्ये यहोवा नव्हता. वाऱ्यानंतर भूकंप झाला,+ पण त्या भूकंपात यहोवा नव्हता. १२ भूकंपानंतर अग्नी आला,+ पण त्या अग्नीतही यहोवा नव्हता. मग अग्नीनंतर एक शांत व मंद वाणी ऐकू आली.+ १३ ती वाणी ऐकताच एलीयाने आपलं तोंड झग्याने* झाकून घेतलं+ आणि बाहेर येऊन तो गुहेच्या तोंडाजवळ उभा राहिला. मग त्या वाणीने त्याला विचारलं: “एलीया, तू इथे काय करतोस?” १४ त्यावर तो म्हणाला: “मी सैन्यांचा देव यहोवा याची अतिशय आवेशाने सेवा करत आलोय. इस्राएलच्या लोकांनी तुझा करार पाळायचं सोडून दिलंय.+ त्यांनी तुझ्या वेदी पाडून टाकल्या आहेत आणि तुझ्या संदेष्ट्यांनाही तलवारीने मारून टाकलंय. मी एकटाच उरलोय. आणि आता ते माझाही जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत.”+
१५ यहोवा त्याला म्हणाला: “दिमिष्कच्या ओसाड रानात परत जा. तिथे पोहोचल्यावर हजाएलला+ सीरियाचा राजा म्हणून अभिषिक्त कर. १६ आणि निमशीचा नातू येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त कर.+ तसंच, आबेल-महोला इथे राहणारा शाफाटचा मुलगा अलीशा* याला तुझ्या जागी संदेष्टा म्हणून अभिषिक्त कर.+ १७ जो कोणी हजाएलच्या तलवारीपासून निसटेल,+ त्याला येहू ठार मारेल;+ आणि जो कोणी येहूच्या तलवारीपासून निसटेल, त्याला अलीशा ठार मारेल.+ १८ आणि पाहा! इस्राएलमध्ये अजूनही अशी ७,००० माणसं आहेत,+ ज्यांनी बआलपुढे गुडघे टेकले नाहीत+ किंवा त्याचं चुंबन घेतलं नाही.”+
१९ त्यानंतर एलीया तिथून निघाला. त्याला शाफाटचा मुलगा अलीशा हा बैलांच्या १२ जोड्या घेऊन नांगरणी करताना दिसला; अलीशा बैलांच्या १२ व्या जोडीमागे होता. मग एलीया त्याच्याजवळ गेला आणि त्याने आपला झगा+ त्याच्यावर टाकला. २० तेव्हा तो बैलांना सोडून एलीयाच्या मागे धावत गेला आणि म्हणाला: “कृपा करून मला माझ्या आईवडिलांचा मुका घेऊन त्यांचा निरोप घेऊ द्या. त्यानंतर मी तुमच्यासोबत येईन.” तेव्हा एलीया त्याला म्हणाला: “जा, मी तुला थांबवणार नाही.” २१ म्हणून मग अलीशा गेला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने त्यांचं बलिदान दिलं. नंतर त्याने नांगरणी करायची लाकडी अवजारं जाळून त्यांवर बैलांचं मांस शिजवलं आणि ते लोकांना खायला दिलं. मग तिथून निघून तो एलीयाच्या मागे गेला आणि त्याची सेवा करू लागला.+